स्थळ : हापिसातील बॉस क्र. १ ची प्रशस्त वातानुकूलित केबिन.
वेळ : हापिस सुरु होऊन १ तासानंतर.
काळ : लवकर पुढे सरकत नसलेला कंटाळवाणा .
प्रसंग : अकौंटस क्लार्कच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी (तब्बल) ६५ उमेदवारांच्या मुलाखतीचा.
पात्रे : मुलाखतकार : १. बॉस क्र. १
२. सदस्य , लेखा विभाग
३. सदस्य , प्रशासन विभाग
४. मी , महिला सदस्य
उमेदवार : ५८ मुली व ७ मुले १७ ते २० वयोगटातील.
बॉस क्र. १ समोरच्या फायलीतली उमेदवारांची माहिती चाळून पाहत आहेत.
बॉस प्रशासन सदस्यांकडे पाहून विचारतात.
‘अहो मोहिते, ही सगळी कॉलेजची पोरे अन पोरी दिसताहेत ?’
‘साहेब, महिना २२०० पगारात अन १२ वी पास या शिक्षणात आणखी कोण मिळणार ?’ प्रशासन सदस्य अदबीने.
‘अन या पोरी बऱ्याच दूरदूरच्या खेड्यापाड्यातल्या दिसताहेत ?’
‘साहेब, त्यांना जवळच्या तालुक्यातल्या डिविजनमध्ये पोस्टिंग देता येईल...’
‘या पंधरामध्ये रिझर्वेशनच्या किती जागा आहेत ?’
‘पाच, साहेब.’
‘मार्किंग स्कीम ?’
‘अॅकॅडमिक १० मार्क, सामान्य ज्ञान १० आणि विषय ज्ञान १०.’
‘एकूण ६५ म्हणजे २ -२ मिनिटात एकेकाला आटपायला पाहिजे..?’
‘ होय, साहेब.’
‘ ठीक आहे. करा चालू. ‘
बॉस बेल दाबतात. शिपाई डोकावतो. त्याच्याकडे पाहून म्हणतात,
‘एकाएकाला पाठवा आत.’
उमेदवार क्र. १ ही १८ वर्षीय कन्यका आहे. (१८ वर्षे हे मला फायलीतल्या कागदावर वाचून समजलं. )
‘मे आय कमिन सर ?’
‘या.’ बॉस
उ. क्र. १ आत येते. टेबलाशी भांबावल्यासारखी उभी राहते.
लेखा सदस्य ‘त्या खुर्चीत बस.’
ती बसते.
‘नाव काय ?’
‘अस्मिता नारायण बेलेकर.’
‘शिक्षण ?’ लेखा सदस्य
‘एस. वाय. बी. कॉम. मधे शिकतेय.’
‘बी. कॉम. चा फुल फॉर्म ?’ बॉस
‘अं...?’
‘बी. कॉम. शिकता ना ? तो कशाचा शॉर्टफॉर्म आहे ?’
‘अं.. म्हणजे ते आपलं......’
एक मिनिट शांतता.
‘स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण ?’ मी.
‘.......ते ... कोणतरी राजेन्द्रकुमार...?’
‘ऑ... राजेन्द्रकुमार ??’ प्रशासन सदस्य दचकतात.
‘नाही.. नाही..राजेन्द्रप्रसाद..!’
‘हां..हां..’
‘सध्या कोण आहे राष्ट्रपती ?’ प्र. सदस्य.
‘त्याच की आपल्या.. प्रतिभाताई पाटील !’
‘स..ध्या...???’
‘हो..!’
‘बरं , अकौंटचे प्रकार किती ?’ आता लेखा सदस्य सूत्रे हातात घेतात.
‘किती..?’
‘किती ?’
पुन्हा १ मिनिट शांतता.
‘बारावीला किती मार्क ?’ पुन्हा लेखा सदस्य.
’६६.३५ टक्के.’
‘कितीपैकी किती ?’
‘६०० पैकी ३९८’
‘हा घ्या कागद . काढून दाखवा ६६.३५ ‘
उमेदवार कागदावर आकडे लिहिते __ ६०० भागिले ३९८. पेन पुढे सरकत नाही.
‘आले का ६६.३५ टक्के ?’
‘ना..हि..’
‘अहो मग अकौंट कसा ठेवणार तुम्ही ?’
१ मिनिट शांतता.
‘अस्मिताबाई, तुमच्या कॉलेजचं टायमिंग काय ?’ बॉस.
‘सात ते अकरा.’
‘मग आमचं ऑफिस तर दहाला सुरु ? कसं काय करणार ?’
‘करणार की दोनी...’
‘कसं ?’
‘शेवटचा तास बंक मारणार ..’
‘रोज ?’
‘होय. सरांना तसं सांगूनच आलेय मुलाखतीला !’
‘ठीक आहे . या तुम्ही.’
‘आत यु का सायेब ?’ आणखी एक उमेदवार.. १९ वर्षीय कॉलेजकुमार.
‘या. बसा तिथं.’
उमेदवार बसतो.
‘नाव ?’
‘मल्ल्याप्पा दरग्याप्पा हिट्टीनहळ्ळी ‘ प्रत्येक जोडाक्षराबरोबर लेखा सदस्यांचा चेहेरा बिर्याणीत खडे आल्यागत.
‘गाव ?’
‘चिक्कोडी ‘
‘डिस्ट्रिक्ट कोणता चिक्कोडीचा ?’ मी.
‘डिस्ट्रिक्ट ? ...नाय म्हायती... आता हितं महाराष्ट्रातच आसतो आमी. निमशिरगावला.’
‘काय शिकता ?’
‘ते काय, आता यफ. वाय. बी. काम. करतोय की !’
‘बी. कॉम. चा फुल फॉर्म ?’ बॉस
‘ब्याचलर हॉफ कम्युनिकेशन !’
‘कम्युनिकेशन ...?’ मी.
‘व्हय.’
‘बरं, कर्नाटकात जिल्हे किती ?’ प्र. सदस्य.
‘जिल्हे व्हय ? आसतील की पंचवीसभर ! ‘
‘नक्की पंचवीसचं का ?’
‘दोनचार कमी-जास्तपन आसतील.’
‘नॅशनल अँथेम कोणती ?’ मी.
‘भारत मेरा देश है...’
‘अहो, ती प्रतिज्ञा..! राष्ट्रगीत सांगा....’
‘हां, ते व्हय, वंदे मातरम.’
मी हैराण होऊन बॉसकडे पाहते.
‘बारावीला मार्क किती ?’ लेखा सदस्य.
‘यकोणपन्नास...’
‘....पूर्णांक किती ?’
‘....’
‘ही घ्या तुमच्या मार्कलिस्टची प्रत. अन टक्केवारी काढा बरं..’
‘क्याल्क्युलेटर पायजे सायेब.’
‘तसंच नाही का काढता येणार ?’
‘कशाला टायम फुकट घालवायचा ?’
१ मिनिट शांतता.
‘इथं कोणत्या ऑफिसात मुलाखतीला आलाय ?’
‘.......?’
‘कोणी बोलावलीय मुलाखत ?’
‘....?....?’
‘नाव काय आमच्या कार्यालयाचं ? मुलाखतीचं पत्र वाचलंय ना ?’
‘…….’
पुन्हा एक मिनिट शांतता.
‘बरं, अकौंट कशासाठी ठेवतात ?’ लेखा सदस्य.
‘कंपनीला फायदा हुतो..’
‘नुसता अकौंट ठेवल्यामुळे ?’
‘बरं आसतं ठेवल्यालं...’
‘तुमच्या कॉलेजचं टायमिंग काय ?’ बॉस
‘साडेसात ते बारा साहेब.’
‘मग नोकरी अन कॉलेज दोन्ही कसं करणार ? आमचं टायमिंग दहा ते पाच.’
‘म्यानेज करणार साहेब.’
‘कुणाला म्यानेज करणार ? कॉलेजला का आम्हाला ?’
‘दोघान्लाबी !’
‘.....!!! वा..छान ! या तुम्ही.’
तिसरी उमेदवार. १७ वर्षीय स्मार्ट बालिका.
‘मे आय कमिन सर ?’
‘या बसा त्या खुर्चीवर.’
‘नाव ?’
‘राधिका रमेश तिवारी.’
‘शिक्षण ?’
‘ बी. कॉम. फर्स्ट यर..’
‘बी. कॉम. चा फुल फॉर्म ?’ बॉस
‘ब्याचलर ऑफ कॉमर्स’
‘छान. बारावीला मार्क किती ?’
’७८.५६ टक्के.’
‘म्हणजे कितीपैकी किती ?’ लेखा सदस्य.
‘अं, ६०० पैकी.... किती ते आठवत नाही.’
‘आं ? तुमचेच मार्क ना ? का दुसरं कोण बसलं होतं परिक्षेला ?’ बॉस.
उमेदवार खुदकन हसते. ‘नाही हो, मीच..’
‘हं, इथं लिहिलेत बघा तुमचे मार्क. कागद घ्या..काढून दाखवा बघू टक्केवारी.’
उमेदवार टक्केवारी बरोबर काढते.
‘गुड ! अकौंटचे प्रकार किती ?’ लेखा सदस्य.
‘तीन.’
‘कोणते ?’
उमेदवार नावे बरोबर सांगते.
‘व्हेरी गुड. याआधी कुठं काम केलंय का ?’
‘हो सर .बँकेत सहा महिने काम केलंय एन्ट्री करायचं.’
‘कॉम्प्यूटरवर ?’
‘हो’
‘बँकेत किती प्रकारची खाती असतात ?’
‘अं, बचत खाते, चालू खाते... आणि.....आणि...’
‘ठीक आहे. आता कोणत्या ऑफिसात मुलाखतीला आलात सांगा.’ बॉस
‘महाराष्ट्र राज्य .......कंपनी मर्यादित.’
‘कोणाचे ऑफीस ?’
‘सरकारचे..’
‘तसं नव्हे, ह्या ऑफिसचा इनचार्ज कोण ?’
‘अं..अधिक्षक अभियंता.’
‘कुठं आहेत ते ?’
‘खिक... अय्या, तुम्हीच की !’
सौम्य हशा पिकतो.
‘तुम्ही कॉलेजात कधी जाता ?’
‘सात ते अकरा.’
‘अन मग ऑफिसात दहाला कसं येणार ?’
‘अं, थोडा वेळ होईल यायला, पण मी दुपारच्या सुट्टीत काम करीन सर.’
‘अहो, पण तुम्हाला आम्ही ह्या ऑफिसात नाही देणार काम ! आटपाडीला देणारेय ...!’
‘आटपाडी..? सर इथच द्या ना.’
‘इथं जागा नाही हो.’
‘बाहेर भरपूर जागा आहे साहेब.’
‘च.. म्हणजे व्हेकन्सी हो..!’
‘हां हां .. मग राहूदे बै..’
‘इथं जागा मिळाली तर करणार का ?’
‘हो...!’
‘ठीक आहे..या आता.’
------------------*******************------------------------
अन अशाच मुलखती पुढे चालल्या...
प्रतिक्रिया
8 Oct 2012 - 11:00 pm | मदनबाण
"मुक्ताफळे" आवडली ! :)
8 Oct 2012 - 11:30 pm | आशु जोग
खूपच छान आहे सारे !
8 Oct 2012 - 11:48 pm | शिल्पा ब
अनुभव सदरात लिहिलंय त्यामुळे वरची मुक्ताफळं खरोखरीची आहेत वाटतंय. असो.
आजकालची मुलं भारीच बोल्ड बै !
9 Oct 2012 - 9:06 pm | सस्नेह
होय शिल्पा. खरोखरीचीच मुक्ताफळे आहेत ती. मुलाखत घेताना आमचीहि अशिच साशंक अवस्था झाली.
8 Oct 2012 - 11:59 pm | दादा कोंडके
एक अनुभव म्हणून मुलाखती घेणं खूप छान.
असे प्रश्न विचारायची माझी खूप इच्छा असते पण दुर्दैवाने आम्हाला तांत्रिकच प्रश्न विचारावे लागतात. :(
9 Oct 2012 - 2:37 am | बहुगुणी
मजा आली वाचून, आणखी थोड्या मुलाखती वाचायल्या आवडल्या असत्या....आधी ६५ उमेदवार, प्रत्येकी दोन मिनिटं, म्हंटल्यावर उमेदवारांची कीव वाटली होती, पण पहिले दोन नमूने पाहिल्यावर मुलाखतकारांचंच कौतुक करावंसं वाटतं!
9 Oct 2012 - 2:46 am | जेनी...
खरच मजा आला =))
9 Oct 2012 - 8:10 am | ५० फक्त
लई भारी, आमच्या क्षेत्रात पॉवर फॅक्टर म्हणजे काय हे समजवा, हा लसिथ मलिंगाने टाकलेला लेग स्टंम्प यॉर्कर असतो..
9 Oct 2012 - 8:10 am | पाषाणभेद
मजा आली.
पण प्रोफेशनल लाईफमधल्या चुकीच्या मुलाखती आठवल्या.
मुलाखती घेण्याचही तंत्र असते. तांत्रीक बाबी हाताळणार्या सगळ्यांनाच मुलाखती घेता येतातच असं नाही.
9 Oct 2012 - 8:26 am | सोत्रि
+१ प्रचंड सहमत.
- (मुलाखतीच्या तंत्राचे प्रशिक्षण मिळालेला) सोकाजी
9 Oct 2012 - 11:58 am | रमताराम
पाभे नि सोत्रिंशी लै वेळा सहमत.
(मुलाखती घेण्यास नालायक असा शिक्का भाळी मिरवणारा) रमताराम
9 Oct 2012 - 11:41 pm | सुहास..
+११११११११
लई वेळा सहमत , पण तांत्रिक मध्ये तर अजुन मज्जा येते..बहुतांशी वेला जाना था जपान पहुंच गये चीन असे ही होते ..
मी : सो व्हॉट डु यु डु व्हेन सर्वर ईज अनव्हेलेबल
तो ( फुल्ल टु अॅक्सेन्ट ) : सर, आय लॉगिन फ्रॉम माय टॅब
:(
असे बरेच आहेत..
9 Oct 2012 - 8:39 am | सुनील
ग्रामिण भागातही "तिवारी"च बाजी मारताहेत तर! ;)
9 Oct 2012 - 9:02 am | चौकटराजा
माझा भाउ पुण्याच्या एफ सी मधे लेक्चरर होता. एफ वाय बी एस्सी च्या उत्तर पत्रिकेत-
व्हाट आर युझेस ओफ कॉपर याचे उत्तर इट इज युझ्ड फॉर मेकिंग " बंब" मीन्स पानी तापविण्याचे भांडे !हे इंग्रेजीत लिहिलेले होते.
एका दहावीच्या उत्तर पत्रिकेत जनगणना म्हणजे काय याचे उत्तर" ते १५ ऑगस्ट व २६ जानेवारीला म्हणतात "असे होते.
काउ चा नेटवरचा यु पी एस्स सी मधला निबंध सर्वाना माहीत आहे. काउ हॅज फोर लेग्ज, टू फॉरवर्ड अॅन्ड टू बॅकवर्ड !
9 Oct 2012 - 3:43 pm | चिगो
चौरा, किस्से झकास आहेत तुमचेही..
काउ चा नेटवरचा यु पी एस्स सी मधला निबंध सर्वाना माहीत आहे. काउ हॅज फोर लेग्ज, टू फॉरवर्ड अॅन्ड टू बॅकवर्ड !
लिंक देता का प्लीज? नाही म्हणजे बरेच दिवसांपासून ऎकतोय ह्या निबंधाबद्दल, पण युपीएस्सीने गायीवर निबंध घेतलेला बघण्यात किंवा ऎकण्यात नाही. आणि ज्याचं इंग्रजी कच्चं आहे तो त्याला जी येत असेल त्याच भाषेत परीक्षा देईल की..
9 Oct 2012 - 9:37 am | प्रभाकर पेठकर
इथल्या शाळेत, कितवीच्या आठवत नाही पण एका वर्गात, 'महात्मा गांधींच्या पत्नीचे नांव काय?' ह्या प्रश्नाला, एका विद्यार्थ्याकडून, 'फुलनदेवी' असे उत्तर मिळाले होते.
नशीब महात्मा गांधी हयात नाहीत. नाहीतर नथुराम गोडसेंमुळे झाल्या नसतील त्याहून जास्त वेदना ह्या उत्तराने झाल्या असत्या.
9 Oct 2012 - 11:17 am | जेनी...
=))
9 Oct 2012 - 3:30 pm | स्पंदना
फुलनदेवी?
आई आई ग!
माझ्या दिराने शिवाजी महाराजांचे गुरु दादा कोंडके अस लिहिल होत.
9 Oct 2012 - 9:51 am | llपुण्याचे पेशवेll
पुढच्या मुलाखतीही द्या .. वाचताना मजा येत आहे.
9 Oct 2012 - 10:39 am | अद्द्या
‘खिक... अय्या, तुम्हीच की !’
:D
9 Oct 2012 - 11:22 am | बिपिन कार्यकर्ते
‘बरं आसतं ठेवल्यालं...’
=)))))))))))))
9 Oct 2012 - 11:23 am | विलासराव
‘ही घ्या तुमच्या मार्कलिस्टची प्रत. अन टक्केवारी काढा बरं..’
‘क्याल्क्युलेटर पायजे सायेब.’
‘तसंच नाही का काढता येणार ?’
‘कशाला टायम फुकट घालवायचा ?’
झक्कास !!!!!!
9 Oct 2012 - 11:38 am | झकासराव
हाहाहाहा...
लयी भारी अनुभव आणि काहि काहि प्रतिसाद देखील. :)
9 Oct 2012 - 11:41 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छान. मुलाखती थोड्या रंजक केल्या आहेत, पण थोड्याफार फरकानं असंही असू शकतं.
-दिलीप बिरुटे
9 Oct 2012 - 11:56 am | सविता००१
मस्त आणि भारी अनुभव. अजुन येउद्या. मजा येतेय.
अवांतरः एका साखर कारखान्याच्या हुशार अकाउंटंट ने कारखान्याच्या चेअरमनच्या वडिलांच्या अंत्ययात्रेचा खर्च 'packing and forwarding' मध्ये दाखवला होता. ऑडिट करताना यावरून तुफान हसलो होतो आम्ही. आणि तो अकाउंटंट आपलं काय चुकलं आता? असा पहात होता आमच्याकडे.
9 Oct 2012 - 11:57 am | मृत्युन्जय
मुलाखात घेण्याचा प्रदीर्घ आणि भयाण अनुभव असल्याने मी तुमची व्यथा समजु शकतो. पण मी घेतलेले इंटर्व्ह्यु टेक्निकल असल्याने इथे सांगत नाहि. लैच भन्नाट आहेत हे मात्र खरे.
9 Oct 2012 - 1:16 pm | क्लिंटन
मी एक नंबरचा बथ्थड इंजिनिअर होतो हे वेगळे सांगायलाच नको. मी होतो मेकॅनिकल इंजिनिअरींगला.त्या दरम्यान तोंडी परिक्षांमध्ये एकाहून एकेक सिक्सर मारल्या होत्या. त्यातील दोन किस्से:
१. पहिल्या वर्षाला बेसिक सिव्हिल इंजिनिअरींग हा विषय होता. सिव्हिल हा माझा विषय नसल्यामुळे फारसा गांभीर्याने घेतला नव्हता (इतरही विषय फार गांभीर्याने घेतले होते असे नाही पण हा तर अजिबातच नाही).तोंडी परिक्षेत जर्नलमध्ये लिहिलेल्या माहितीबरोबरच आमच्याकडून काढून घेतलेल्या दोन ड्रॉईंग शीटवरही प्रश्न विचारले जातील ही शक्यता अजिबातच ध्यानात घेतली नव्हती.तोंडी परिक्षा एका वेळी तिघांची होती.प्राध्यापकांनी त्या शीटवरील एका आकृतीवरून एक प्रश्न विचारला: "इमारतीचा पाया आणि मशीनचा पाया यात फरक काय". याचे उत्तर होते-- मशीन व्हायब्रेट होत असल्यामुळे व्हायब्रेशनचा डायनॅमिक अॅस्पेक्ट मशीनच्या पायाचे डिझाईन करताना विचारात घ्यावा लागतो तर इमारतीच्या पायाच्या बाबतीत त्याची गरज पडत नाही. (अर्थात ही माहिती मला लेखी परिक्षेच्या आधी प्रिपरेटरी लीव्हमध्ये अभ्यास करताना समजली). मी बिनधास्त ठोकून दिले: "मशीनच्या पायाचे डिझाईन करताना मातीची बेअरींग कपॅसिटी विचारात घ्यायची गरज नसते तर इमारतीच्या पायाचे डिझाईन करताना ती ध्यानात घ्यावी लागते". आमचे प्राध्यापक इंडिअन इंजिनिअरींग सर्व्हिस ही इंजिनिअरींगमधील सर्वात कठिण परीक्षा चांगल्या क्रमांकाने पास झालेले आणि शासकिय नोकरीतील भ्रष्टाचार न झेपल्यामुळे ते सोडून शिक्षकी पेशा स्विकारलेले एक सद्गृहस्थ होते.ते म्हणाले--"मी गेल्या दहा वर्षापासून शिक्षकाची नोकरी करत आहे.विद्यार्थ्यांनी मारलेल्या कितीतरी थापा मी ऐकल्या आहेत.पण याला मात्र तोड नाही". :(
२. शेवटच्या वर्षाला असताना इंटर्नल कम्बश्चन इंजिन विषयाची तोंडी परिक्षा होती.त्यावेळी बाजूला ठेवलेल्या इंजिनचा कार्ब्युरेटर दाखव असे आमच्या प्राध्यापकांनी सांगितले.इंजिन बरेच मोठे होते आणि त्याचा कार्ब्युरेटर उजव्या बाजूला होता.आणि मी इंजिनच्या डाव्या बाजूला जाऊन थोडे लांब उभे राहून उगीचच कुठेतरी बोट दाखवत होतो. जर कार्ब्युरेटर डाव्या बाजूला निघाला असता तर मला "हो तोच तो कार्ब्युरेटर" असे म्हणून पळवाट काढता आली असती आणि तोच माझा डाव होता पण कार्ब्युरेटर नेमका उजव्या बाजूला निघाल्यामुळे पचका झाला :( शेवटी प्राध्यापक स्वतः उठून आले आणि त्यांनी कार्ब्युरेटर नक्की कोणता ते दाखविले. आणि जाताजाता लगावलेला टोला--"काय राव तुम्ही अजून ६ महिन्यात मेकॅनिकल इंजिनिअर बनणार आणि साधा कार्ब्युरेटर पण ओळखता येत नाही" अजूनही लक्षात आहे :(
9 Oct 2012 - 11:38 pm | आनंदी गोपाळ
तुम्ही चांगले विंजीनेर असाल याचा कॉन्फिडन्स आहे!
(ईएनटिच्या तोंडी परीक्षेत युव्हुलाला व्हल्व्हा म्हटलेले ऐकून आनंदी झालेला) गोपाळ
9 Oct 2012 - 1:39 pm | खुशि
मुलाखती छानच आहेत्.पण आपल्या देशातील बेकारी प्रकर्षाने जाणवली.शिकण्याच्या वयात नोकरी करावी लागते,शिक्षणाचा दर्जाही खालावला आहे ह्याचे वाईट वाटते.
9 Oct 2012 - 9:09 pm | सस्नेह
खुशीताई, फक्त आपल्या महान देशातच वयाच्या २५-२६ वर्षांपर्यंत मुले आई-वडिलांच्या खर्चाने शिकतात अन जगतात. इतर देशांतून १८व्या वर्षीच कमावून शिकू लागतात.
9 Oct 2012 - 1:43 pm | स्वाती दिनेश
मुलाखतीतले किस्से सॉलिड आहेत (आणि क्लिंटनचेही)
स्वाती
9 Oct 2012 - 2:30 pm | नगरीनिरंजन
भारी आहेत किस्से लेखातले आणि प्रतिसादातलेही.
शिक्षकांच्या जागांसाठीच्या मुलाखतींवर वाचलेला असाच एक लेख वाचल्याचे स्मरते.
माझ्या एका मुलाखतीच्या शेवटी तुला काही प्रश्न विचारायचे असेल तर विचार असे सांगितल्यावर मी "तुमचे नाव काय?" असे विचारून मुलाखतकर्त्याला पोट धरून हसवले होते. ;-)
9 Oct 2012 - 3:37 pm | स्पंदना
मस्त किस्से! अजुन दोन चार सहज चालले असते.
बाकि आमच्या वेळी दोन किस्से फार गाजले होते. इंजीनियरिंगच्या तोंडी परिक्षेत भावाच्या कॉलेजात,"व्हॉट इस अ सर्कल?" या प्रश्नाला "जिथे सरकेल तिथे सरकेल दॅट इज अ सर्कल." हा एक अन आय ए एस मध्ये "ही किल्ली खाली पडली तर कसा आवाज येइल?" या प्रश्नाला सरळ किल्ली उचलुन खाली टाकुन "असा!" हे उत्तर.
9 Oct 2012 - 3:38 pm | कपिलमुनी
पण अशी नावांची टिंगल करू नये
9 Oct 2012 - 9:11 pm | सस्नेह
मला वाटते, मी लेखनात कुठेही वैयक्तिक टिप्पणी केलेली नाही. जे घडले ते फक्त सांगत गेले आहे. यात टिंगल आढळली असल्यास कृपया क्षमस्व.
9 Oct 2012 - 7:09 pm | रेवती
पटक्न वाचून संपलं कि हो, और भी आंदो.
हे लेखन आवडले.
9 Oct 2012 - 9:12 pm | सस्नेह
धन्स रेवती आणि इतर. आणखीही किस्से अर्थातच आहेत. लवकरच टाकत आहे.
9 Oct 2012 - 9:27 pm | बॅटमॅन
आयला एकसे एक खतरा आणभव!!! पोरंपोरी काय ड्वायलाक मारतील सांगता येणं मुश्किलच नै तर नांउमकिन है!!!
9 Oct 2012 - 9:40 pm | श्रीरंग_जोशी
सर्वच किस्से एकाहून एक आहेत. अन त्यांना खुसखुशीत लेखनशैलीची जोड मिळालेली आहेच.
गणकयंत्र बिनधास्तपणे मागणारा युवक आयुष्यात खूप प्रगती करेल असे वाटते.
9 Oct 2012 - 9:50 pm | गणपा
एकदम हलकं फुलकं मस्त वाटल वाचायला.
६२ उमेदवार अजुन बाकी आहेत तेव्हा और भी आंदो . :)
10 Oct 2012 - 7:42 am | इन्दुसुता
<तुम्ही चांगले विंजीनेर असाल याचा कॉन्फिडन्स आहे!>
<<(ईएनटिच्या तोंडी परीक्षेत युव्हुलाला व्हल्व्हा म्हटलेले ऐकून आनंदी झालेला) गोपाळ >>>
ही ही ही.... तोंडी परीक्षा घेणारे पडले असतिल बिचारे....
तुम्ही चांगले ईएनटी झालात काय?
10 Oct 2012 - 9:24 am | चौकटराजा
एका मुलाखतीत अभियात्रिकी उमेदवाराला विचारले
" हाउ द एसी मोटर स्टार्टस ?? "
तो क्षणभर गप्प
" कमॉन मॅन गिव्ह द आन्सर " मुलाखत घेणारा.
तो उमेदवार आणखी क्षण भर थांबून तोंडाने आवाज काढतो . हळू हळू स्वर टिपेला . मोटार फुल आर पी एम ला.
स्टॉप.......स्टॉप... धिस नॉन्सेन्स " मुलाक्खत घेणारा.
हं...........हु,,,,,,,, आवाज खाली येतो मोटर झिरो आर पी एम ला.
दुसर्या एका अभियांत्रिकीच्याच मुलाखतीत
ओके व्हाट इज एक अ फोरस्ट्रोक एंजिन ? मुलाखत घेणारा.
" सर, इट्स अ टेक्नोलॉजी हॅविंग टू सिलेडर्स विथ टू स्ट्रीकस इन ईच सिलिंडर !!!! " उमेदवार बोलता झाला.
10 Oct 2012 - 5:08 pm | सुधीर
स्नेहांकिता यांनी लिहिलेल किस्से भारी आहेत. तुमचा किस्सा वाचून पण हसू आलं. विनोद म्हणून ठिक आहे, पण प्रत्यक्षात असा अनुभव आला असेल तर, धन्य आहे.
11 Oct 2012 - 1:36 am | जेनी...
बापरे ..कसले भारी इंगीनीअर हायेत राव
मी आता झीरो आर पी एम ला हसतेय :(
=))
10 Oct 2012 - 6:28 pm | तिमा
एका गुजराथेतल्या केमिकल कंपनीत इंटरव्ह्यू घ्यायला आम्ही बसलो होतो. जनरल मॅनेजरला टेक्निकल ज्ञान पाजळायची फारच हौस होती.
ज. मॅनेजर : व्हॉट इज एचपी ?
कँन्डिडेटसह आमचीही विकेट उडाली, नंतर लक्षांत आल्यावर त्याला हळूच प्रॉम्प्टिंग केले.
ज. मॅनेजर : हां, हां, आय मीन व्हॉट इज पीएच ?
तरीही त्या बी.एससी. मुलाची दांडी उडालीच !
मुंबईतल्या एका मोठ्या कंपनीत एका आग्री वर्करचा प्रॅक्टिकल इंटरव्ह्यू चालला होता. कंटिन्यूअस प्लांटमधे आंत येणारे रसायन दाखवून त्याला विचारले.
साहेबः हे काय वहात आहे ?
पोरगा: माल आहे साहेब.
मग प्लांटच्या दुसर्या टोकाला बाहेर येणारे रसायन दाखवून विचारले.
साहेबः आणि हे काय आहे सांग बघू ?
पोरगा: मालच आहे तो!
साहेब निघून गेला. पोरगा मला म्हणाला, आयला, सायेब यवढा शिकला तरी माल वळखत नाही, वर मलाच इचारतो ! पोरगा सिलेक्ट झाला.
10 Oct 2012 - 7:00 pm | Pearl
मस्त खुसखुशीत किस्से :-)
अजून येऊ द्या.
10 Oct 2012 - 10:32 pm | पिवळा डांबिस
मूळ धाग्यातले तसेच प्रतिसादातले किस्से खूप आवडले.
पण हे फक्त ग्रामीण किंवा अल्प शिक्षित उमेदवारांच्या बाबतीतच घडतं असं नाही...
हा आम्हाला आलेला एक अनुभव...
अगदी हिरव्या नोटांच्या, वातानुकूल, गुबगुबीत, माजोरड्या वगैरे देशातला!!! :)
मास स्पेक अॅनालिसिस करायला व्हेकन्सी होती....
समोर बसलेला उमेदवार भारतीय दाक्षिणात्य, कीटकशास्त्रातली पीएचडी केलेला...
जबरदस्त तयारी करून (पुस्तकी माहिती वाचून) आलेला पण आयुष्यात कधी हे यानं काम केलेलं नाही हे सहज दिसून येत होतं.....
शेवटी त्याला विचारलं की, "बाबारे, तुझ्याकडे कीटकशास्त्रातली डॉक्टरेट आहे, तू तुझ्या विषयाशी संबंधित अशा क्षेत्रात, अॅग्रो म्हणा, इन्सेक्टिसाईड म्हणा का नोकरी शोधत नाहीस?
व्हाय डू यू वॉन्ट टू जॉईन फार्मा-बायोटेक?"
"टू गेट द ग्रीन कार्ड स्सार!", समोरून बाणेदार उत्तर आलं!!!
:)
काय करणार? साभार परत पाठवला!!!!
11 Oct 2012 - 5:19 am | किसन शिंदे
भारी किस्से आहेत, लेखातले आणि प्रतिसादातलेसुध्दा!
11 Oct 2012 - 12:57 pm | विकाल
मायला आट्पाडी जणू गडचिरोली हाय काय की गड्या ?
11 Oct 2012 - 2:42 pm | सानिकास्वप्निल
किस्से भारी आहेत एकदम :)