आमचा एक इव्हेंट मॅनेजमेंट ग्रुप आहे. जो मोठ्या कलाकारांचे कार्यक्रम आयोजीत करतो. अशाच एका महान कलाकाराचा कार्यक्रमाची साक्षीदार होण्याचे भाग्य नुकतेच मला लाभले. ‘Lamhe A Journey With The Hundred Strings’ असे या कार्यक्रमाचे नाव ठरले.
पंडित शिवकुमार शर्मां यांचा हा कार्यक्रम धारवाड मध्ये करायचे ठरले आणि आम्ही तयारीला लागलो.ह्या कार्यक्रमाचे स्वरूप शिवकुमारजींचे फक्त संतूरवादन असे नसून त्यांचा सांगीतिक जीवन प्रवास अर्थात स्वतः त्यांचा कडून ऐकण्याची सुवर्णसंधीही होती.. पूर्वार्धात त्यांचे संतूरवादन व उत्तरार्धात त्यांचा संगीत प्रवास व त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटातील
गाजलेली गाणी पडद्यावर पाहणे असे होते. .
तसेच त्या काळी त्यांना संगीत देताना आलेले अनुभव खुद्द त्यांच्याकडून ऐकणे हि एक पर्वणीच होती.सगळे तयारीला लागलो त्यांना हुबळी विमानतळ वरून घ्यायला कोणी जायचे पासून राहण्याची सोय कुठे करायची वगैरे सगळी तयारी चालूच होती..
हा कार्यक्रम धारवाड मध्ये करायचे ठरले. धारवाड हे एज्युकेशनल हब आहे हे तिथे गेल्यावर समजले. तिथली कर्नाटक युनिव्हरसिटी, मोठे डेंटल कॉलेज, इत्यादि भरपूर पाहायला मिळाले.अतिशय निसर्ग रम्य आणि प्रसन्न वातावरण असलेले धारवाड आम्हा सगळ्यांना खूपच आवडले. प्रसिद्ध गायिका गंगुबाई हनगल ह्या पण धारवाडच्याच आहेत. अशा या पावन ठिकाणी अतिशय सुंदर अशा ऑडिटोरिअम मधे हा कार्यक्रम करायचे ठरले.
सगळी तयारी पूर्ण झाली.त्यांचे स्वागत करण्यासाठी आम्ही हुबळी विमानतळावर गेलो. हातात पुष्पगुच्छ घेऊन आम्ही त्यांचा वाटेकडे डोळे लावून बसलो होतो. इतक्यात कोणीतरी म्हणाले 'आलेत ते'. आमची नजर सगळ्या गर्दीतून त्यांना शोधत होती इतक्यात ते समोरून बाहेर आले. त्या रुबाबदार व्यक्तिमत्वाकडे आम्ही पाहताच राहिलो. वयाची सत्तरी ओलांडली तरीही अतिशय देखणे, अंतर्मुख, शांत, तेजस्वी असे व्यक्तिमत्व आहे. इतके दिवस ज्यांना आपण टीव्ही आणि रेडिओ वर ऐकत आणि बघत आलो तेच हे पंडित शिवकुमार शर्मा आपल्या समोर उभे आहेत यावर काही क्षण विश्वास बसेना .
आम्ही त्यांचे स्वागत केले पण सगळेजण इतक्या जवळून त्यांना पाहायला मिळाले त्यामुळे भारावून गेलो होतो. त्यांची गाडी हॉटेल कडे रवाना झाली.
कार्यक्रमाची वेळ जवळ आली तसे सगळे जण सज्ज झालो. साउंड वगैरे सेट झाले. सगळी तयारी झाली. पूर्ण हॉल लोकांनी तुडुंब भरला होता. कार्यक्रमाची वेळ झाली. बरेचसे लोक मागे उभे होते. सगळे जण पंडितजीं चे व्यासपिठावर वर आगमन होण्याची वाट पाहत होते. इतक्यात कार्यक्रमाला सुरुवात झाली. अनाउन्समेंट झाली. पंडितजी आणि विजय घाटे हे दोघे व्यासपीठावर आले. टाळ्यांचा कडक़डाटात त्या दोघांचे स्वागत झाले. माईक पंडितजींचा हातात होता. ते म्हणाले मी मधुवंती राग वाजवणार आहे आधी रूपक ताल आणि मग त्रिताल. मधुवंती राग हा खूप जणांचा आवडता असल्याने टाळ्यांने स्वागत झाले. ते पुढे म्हणाले "मधुवंती राग बाजाने के बाद मै मेरे म्युजिक करिअर के बारेमे बात करुंगा..तब आप मुझे बताइये के मै बजाता अच्छ हूं या बाते अच्छी करता हूं " दिसणे जसे रुबाबदार आहे तसेच त्यांचा आवाजही भरदार आहे. सगळे जण तन्मयतेने संतूरवादन ऐकत होते. त्यांचा जादूई संतुर वादनाने मध्यंतर कधी झाली ते समजलेच नाही. १० मिनिटांचा विश्रांती नंतर. श्रीयुत दिलीप काळे यांनी त्यांची मुलाखत घेण्यास सुरुवात केली. मला व माझा सारख्या अनेक जणांना कदाचित हे माहिती नव्हते की पंडितजी हे उत्कृष्ट तबला वादक आहेत. वयाचा ५ व्या वर्षापासून त्यांनी तबला शिकायला व वाजवायला सुरुवात केली. त्यांचे वडील हे त्यांचा कडून खूप रिआज करून घेत असत. १०-१० तास ते तबला वाजवण्यात मग्न असायचे. एकटे असताना ताब्ल्याचेच बोल बोलत असायचे. त्यांचे वडील हे त्यांचे संगीत गुरु देखील होते. अचानक एक दिवस त्यांचा वडिलांनी त्यांना संतूर हे वाद्य हातात आणून दिले आणि आज पासून तू तबला बंद करून हे वाजवायचे असे सांगितले. पूर्वी कधीही न पाहिलेले आणि ऐकेले हे वाद्य त्यांना वाजवण्यासाठी देण्यात आले होते. ह्या वाद्याचा पूर्वीचा कोणताही संदर्भ त्यांचा कडे नव्हता. अर्थातच त्यामुळे गुरुही नव्हता स्वतः संशोधन करायचे होते. त्यांनी ते आव्हान स्वीकारले आणि संतूर वादन सुरु केले. नुसते स्वीकारले नाहीतर त्या वाद्याची नवीन ओळख जगाला करून दिली आणि त्यामध्ये बरेच प्रयोग करून ते नावारूपाला आणले. त्यांचे संतूर वादनात किती महत्वपूर्ण योगदान आहे हे इथे सांगणे कठीण आहे.
वयाचा १९ व्या वर्षी त्यांनी जम्मू मधले आपले घर सोडले व काहीतरी करण्यासाठी मुंबई मध्ये आले. कुठे जायचे नक्की काय करायचे काहीच ठरवले नव्हते वडिलांची कोणतीही ओळख व मदत न स्वीकारता त्यांना स्वतःचे स्थान बनवायचे होते. हातात फक्त होते ते संतूर. ते घेऊन ते मुंबई ला आले. रेडिओ वर आणि अनेक कार्यक्रमात त्यांनी संतूर वादन केले. व्ही शांताराम यांनी त्यांचे संतूर ऐकून त्यांचा एका चित्रपटात त्यांची संगीत दिग्दर्शक म्हणून निवड केली.त्या काळी इतक्या मोठ्या निर्मात्या कडून आमंत्रण मिळाले तरी त्यांनी मला आत्ता वेळ नाही नंतर बघू असे सांगून ते टाळले करण चित्रपट संगीत हे त्यांचे ध्येय नव्हते. तरीही स्वतः व्ही शांताराम त्यांना भेटले आणि ते कसे बसे तयार झाले. त्यानंतर अनेक गाजलेल्या चित्रपटात त्यांनी संगीत दिले. अनेक महान संगितकारांबरोबर त्यांनी काम केले. हरिप्रसाद चौरासिया यांचा बरोबर शिव-हरी नावाने यश चोप्रा यांचा अनेक चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. त्यांनी संगीत दिलेल्या आणि गाजलेल्या गाण्याची यादी फारच मोठी आहे. सिलसीला, चांदनी, लमहे, डर ह्या व अशा अनेक चित्रपटांचा त्यांचा संगिताला अनेक पुरस्कार मिळाले. अनेक वर्षे त्यांनी संतूर वादनात संशोधन करून नवीन प्रयोग करून देश विदेशात संतूर वादनाचे कार्यक्रम केले आणि या वाद्याची जगाला ओळख करून दिली. ५० वर्षांपेक्षाहि जास्त वर्षे तपश्चर्या करून ह्या वाद्याला मानाचे स्थान मिळवुन दिलेया बद्दल सगळेच विशेषतः भारतीय संगीत क्षेत्र त्यांचे ऋणी राहील. मंत्र मुग्ध करणारे त्यांचे संतूरवादन ऐकून अनेक श्रोते भारावले.
सत्तर हून अधिक वय असून त्यांचा ठायी असणार्या जिद्दीचे, उत्साहाचे कौतुक वाटते..
आत्ता त्यांचे सुपुत्र राहुल शर्मा हे त्यांचा वारसा चालवत आहेत हे पाहून समाधान वाटते. स्वतः त्यांचा तोंडून ऐकलेला त्यांचा सांगीतिक प्रवास, सोसलेला त्रास, स्वतः कडे काही नसताना आणि तेंव्हाचा काळातल्या तांत्रिक आव्हानांना तोंड देत कलेसाठी आयुष्य पणाला लावणारे असे महान कलावंत आपल्या भारतवासीयांना लाभले हे आपले भाग्य आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले पद्मभूषण,पद्मविभूषण अशा अनेक पुरस्कारांचे ते मानकरी झाले. संतूर म्हणजे पंडित शिवकुमार शर्मा असे समीकरणच झाले आहे.. अशा ह्या महान The Pioneer of Santoor असलेल्या कलाकाराला मनापासून प्रणाम!!
प्रतिक्रिया
27 Sep 2012 - 2:52 pm | बहुगुणी
नशिबवान आहात! कार्यक्रमाचा वृत्तांत देऊन आम्हाला सहभागी करून घेतल्याबद्दल धन्यवाद! जमलं तर काही ऑडिओ क्लिप्स असल्या तर द्या कार्यक्रमाच्या.
27 Sep 2012 - 3:45 pm | कवितानागेश
छान.
27 Sep 2012 - 4:07 pm | किसन शिंदे
लेख वाचताना मनात हेच विचार येत होते कि मधूवंती रागाची एखादी लहानशी क्लिप ऎकायला मिळाली असती तर खुप बहार आली असती.
आणि भाग्यवान आहात खुप पंडितजीसारख्या माणसाचा सहवास तुम्हाला मिळाला ते.
2 Oct 2012 - 1:25 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
त्यांचे अनेक कार्यक्रम लाईव्ह ऐकले आहेत, पण प्रत्यक्ष भेटून पायावर डोके ठेवण्याचे भाग्य अजूनही लाभले नाही.
बघू नशिबात असेल तसे....
4 Oct 2012 - 1:50 pm | मूकवाचक
+३
27 Sep 2012 - 2:57 pm | सुहास..
यु लकी चॅप !!
27 Sep 2012 - 3:30 pm | अन्या दातार
हेवा वाटतो हो तुमचा.
<खवचट मोड ऑन> कलाकारांना मखरात बसवू नये <खवचट मोड ऑफ>
27 Sep 2012 - 4:59 pm | प्रभाकर पेठकर
>>>>त्या काळी त्यांना संगीत देताना आलेले अनुभव खुद्द त्यांच्याकडून ऐकणे हि एक पर्वणीच होती.
त्यातले एक दोन निवडक अनुभव आमच्या बरोबर वाटून घेतले असते तर आम्हालाही पर्वणीची अनुभूती मिळाली असती. बाकी तुमच्या नशिबाचा हेवा करण्यापलिकडे आम्ही काय करू शकतो?
>>>> ते म्हणाले मी मधुवंती राग वाजवणार आहे आधी रूपक ताल आणि मग त्रिताल. मधुवंती राग हा खूप जणांचा आवडता असल्याने टाळ्यांने स्वागत झाले.
ह्या रागावर, तालावर, श्रोत्यांच्या मंत्रमुग्धतेवर आणि एकूण भारावलेल्या वातावरणावर चार वर्णनपर शब्द अपेक्षित होते.
>>>> ह्या वाद्याचा पूर्वीचा कोणताही संदर्भ त्यांचा कडे नव्हता. अर्थातच त्यामुळे गुरुही नव्हता स्वतः संशोधन करायचे होते. त्यांनी ते आव्हान स्वीकारले आणि संतूर वादन सुरु केले.
म्हणजे बिना गुरू शिकले? त्यांची आई, उमा दत्त शर्मा ह्यांचे संतूर वाद्यात बरेच योगदान आहे. कदाचित सुरुवातीचे धडे आईनेच त्यांना दिले असतील असे वाटते.
>>>>>त्यामध्ये बरेच प्रयोग करून ते नावारूपाला आणले. त्यांचे संतूर वादनात किती महत्वपूर्ण योगदान आहे हे इथे सांगणे कठीण आहे.
संतूर वाद्य इराणी संगितात वापरले जाई. त्या वाद्याला भारतिय शास्त्रिय संगीतात स्थान देण्यासाठी त्यांनी त्या वाद्यावर सातत्याने अनेक प्रयोग केले, नविन तारा जोडून ते वाद्य त्यांनी भारतिय शास्त्रिय संगीतासाठी 'तयार' केले.
>>>>काहीतरी करण्यासाठी मुंबई मध्ये आले.
काहितरी करण्यासाठी नाही. कलाकार म्हणून नांव कमविण्यासाठी.
>>>>करण चित्रपट संगीत हे त्यांचे ध्येय नव्हते. ......
...त्यानंतर अनेक गाजलेल्या चित्रपटात त्यांनी संगीत दिले<<<<
त्यांचे मतपरिवर्तन होण्यासाठी नेमके काय घडले? त्यांची विचारप्रक्रिया काय होती?
>>>या वाद्याची जगाला ओळख करून दिली. ५० वर्षांपेक्षाहि जास्त वर्षे तपश्चर्या करून ह्या वाद्याला मानाचे स्थान मिळवुन दिलेया बद्दल सगळेच विशेषतः भारतीय संगीत क्षेत्र त्यांचे ऋणी राहील.
सहमत.
>>>>त्यांचा तोंडून ऐकलेला त्यांचा सांगीतिक प्रवास, सोसलेला त्रास, स्वतः कडे काही नसताना आणि तेंव्हाचा काळातल्या तांत्रिक आव्हानांना तोंड देत कलेसाठी आयुष्य पणाला लावणारे...
ह्यावर एक परिच्छेद अपेक्षित आहे.
असे >>अनेक<< महान कलावंत आपल्या भारतवसीयांना लाभले हे आपले भाग्य आहे.
>>>>अशा ह्या महान The Pioneer of Santoor असलेल्या कलाकाराला मनापासून प्रणाम!!
शतशः प्रणाम.
27 Sep 2012 - 6:23 pm | अक्षया
प. ऊमादत्त हे त्यांचे वडील होते. आई नाही..ते अतिशय जाणकार संगीतकार होते. पण ते स्वत: कधीच संतुर वाजवत नव्हते. दिलरुबा आणि तबला वाजवत असत. भारतात त्याचा संदर्भ कुठे नव्हता. त्यांनी ते प्रथम काश्मिर मधे पाहीले त्याला पुर्वी शततंत्री विणा असे होते. त्याची रचना पुर्ण पणे वेगळी होती. पण त्यात बदल करुन लोकांसमोर आणले ते शिवकुमार शर्मा यांनी. त्यांचा बद्द्ल आणि अनुभवांबद्द्ल इथे बरेच काही लिहु शकते पण त्यामुळे लेख फारच लांबला असता. झालेल्या कार्यक्रमा बद्द्ल आणि महान कलाकाराविषयी थोडक्यात लिहायचे होते. आपल्या प्रतिक्रीये बद्द्ल धन्यवाद..
28 Sep 2012 - 2:17 am | प्रभाकर पेठकर
>>>>प. ऊमादत्त हे त्यांचे वडील होते. आई नाही
हो. ती माझी चूक झाली. 'उमा' नांवामुळे घाईघाईत वाचताना ती त्यांची आई असावी असे मला वाटले. क्षमस्व.
27 Sep 2012 - 6:32 pm | बॅटमॅन
ओये लक्की लक्की ओये :) बहुत भाग्यवान आहात हे मात्र खरं :) अशा लोकांचे कार्यक्रम लाईव्ह ऐकणे हेच एक मोठे भाग्य, त्यात परत त्यांच्या सहवासात काही क्षण घालवायला मिळणे म्हणजे यासम हाच!!
1 Oct 2012 - 11:33 am | sagarpdy
+1
2 Oct 2012 - 6:49 am | मोदक
+११
3 Oct 2012 - 11:12 pm | अत्रुप्त आत्मा
+२२
27 Sep 2012 - 8:04 pm | स्वप्निल घायाळ
This is the exact reason why they say "Journey more beautiful than destination"...
27 Sep 2012 - 8:17 pm | तर्री
पंडितजीचे "आंतर्मुख" हे विशेषण भावले. सलाम ! आपले जगणे सार्थक करणारा एक क्षण तुम्हांला गवसला !!अभिनंदन !!!
28 Sep 2012 - 11:37 am | यशोधरा
सही!
1 Oct 2012 - 11:34 am | लीलाधर
न भूतो न भविष्यती एवढेच म्हणेन
आणि आपण आपल्याला लाभलेले मौलिक क्षण ईथे आमच्याशी शेअर केल्याबद्द्ल आपले मनापासून आभार ----^----
2 Oct 2012 - 1:04 am | श्रीरंग_जोशी
आवडत्या कलाकाराची मैफिल अनुभवायला मिळणे अन त्यातूनही अधिक म्हणजे मैफिलीखेरीजही त्याचा सहवास लाभणे; एका रसिकाला अजून काय हवे?
तुम्हाला हे लम्हे अनुभवायला मिळाल्याबद्दल अभिनंदन व या लेखनाद्वारे आमच्यासोबत वाटल्याबद्दल मनापासून आभार.
अवांतर - प्रपेंनी मांडलेली बहुतांश निरीक्षणे नवलेखकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. लेखन करण्यापूर्वी ध्यानांत ठेवणे व लिहून झाल्यावर प्रकाशित करण्यापूर्वी पुनरवलोकनासाठी त्यांचा उपयोग केल्यास लेखन नक्कीच परिपूर्णपणाकडे अधिक जोमाने वाटचाल करेल.
3 Oct 2012 - 9:21 am | अक्षया
प्रपेंनी मांडलेली निरीक्षणे नक्कीच मार्गदर्शक आहेत. पुढ्च्या लेखनाचा वेळी या गोष्टिंचा नक्कीच उपयोग होईल.
धन्यवाद!!
2 Oct 2012 - 9:38 pm | दादा कोंडके
हेवा वाटतो बाई तुमचा! :)
3 Oct 2012 - 4:50 pm | अन्या दातार
खरंच की काय??
मला ब्वा http://www.misalpav.com/comment/381665#comment-381665 हे आठवले.
4 Oct 2012 - 12:28 am | प्रास
अन्याभौ, त्यांनी म्हंटलेलं, "अय्या, कित्ती छान!" हे निसटलं की काय तुमचं?
भौ, फुकट गेलं खोदकाम! ;-)
4 Oct 2012 - 12:52 am | दादा कोंडके
:)
5 Oct 2012 - 11:45 am | अस्मी
व्वाह!! खरंच फारच भाग्यवान तुम्ही!!
परत असा काही इवेंट असेल तर आम्हाला नक्की सांगा बरं.
5 Oct 2012 - 12:02 pm | अक्षया
आता बहुतेक डिसेंबर मधे असेल पुण्यामचे. नक्कीच सांगेन.
8 Oct 2012 - 12:47 pm | अक्षया
सर्व प्रतिसादांबद्दल धन्यवाद !!