चावडीवरच्या गप्पा - असुरक्षित भारत

सोत्रि's picture
सोत्रि in जनातलं, मनातलं
11 Aug 2012 - 11:27 pm

“आता भारत अजिबात सुरक्षित राहिलेला नाही, पुण्यात बॉम्बस्फोट... चक्क पुण्यात!”, चिंतोपंत, उत्तर भारत सहलीमुळे बर्‍याच दिवसांनी कट्ट्यावर हजेरी लावत.

“काय म्हणता! बॉम्बस्फोट तर डेक्कनजवळ झाला, सदाशिवपेठेत नाही, खी खी खी”, भुजबळकाका.

“कळतात हो टोमणे कळतात, पण ही वेळ टोमणे मारायची नाहीयेय, भारत खरंच सुरक्षित राहिलेला नाहीयेय”, चिंतोपंत जरा चिडून.

“तुम्हाला काय चिंता चिंतोपंत, सगळ्या जगात तुमचा गोतावळा पसरला आहे, जा की तिकडें”, इति घारुअण्णा.

“हो ना, काय हो चिंतोपंत जाणार होतात ना, काय झाले?”, शामराव बारामतीकरांनी घारुअण्णांची री ओढली.

“ह्म्म्म, अमेरिकेत जाणार होतो थोरल्याकडे पण त्यावेळी नेमका त्या ओसामाने घोळ घातला”, चिंतोपंत.

“त्याला झाला की आता बराच काळ, आता जां!”, सानुनासिक उपरोधात घारुअण्णा.

“आताही तिकडे बोंबच आहे, गोळीबार करत फिरत आहेत तिथे माथेफिरु”, चिंतोपंत.

“मग तुमच्या धाकट्याकडे का नाही जात, तिकडे इंग्लंडात?””, नारुतात्यांनी चर्चेत तोंड घातले.

“तिथेही जाणार होतो, पण तेव्हा तिकडेही बॉम्बस्फोट झाला. आता तर काय काळ्या लोकांना प्रोब्लेम आहे म्हणे तिथे, रेसिस्ट लेकाचे”, चिंतोपंत.

“बर मग मधल्याकडे जा, ऑस्ट्रेलियात”, शामराव बारामतीकर.

“अजिबात नको! तिकडे तर सरळ भोसका भोसकी चालू आहे म्हणे, त्यापेक्षा तुम्ही जपानला का नाही जात तुमच्या भावाकडे”, घारुअण्णां

“जाणार होतो, पण भाउ म्हणाला की तोच परत यायचा विचार करतोय, तिथे अणुभट्टीचा धोका अजुनही आहे म्हणे”, चिंतोपंत.

“मग त्यात काय एवढे, लेकीकडे जा ना, जावई आखातात असतात ना तुमचे”, नारुतात्या.

“नाही हो! तिथे देवाधर्माचे काही नाही करता येत, आपला धर्म कसा काय बुडवू”, चिंतोपंत.

“हां! हे मात्र खरें हों तुमचें”, घारुअण्णा हात जोडून आकाशाकडे बघत.

“अहो सोकाजीनाना कसला विचार करताय, लक्ष कुठे आहे तुमचे?”, शामराव बारामतीकर.

“ह्म्म्म.., काही नाही ऐकतो आहे तुमचे सगळ्यांचे”, सोकाजीनाना.

“मग तुमचे काय मत? काय करावे चिंतोपंतांनी?”, नारुतात्या.

“अहो त्यांचे म्हणणे नीट ऐकले का? ही असुरक्षितता सगळीकडेच आहे. सध्याच्या धकाधकीच्या आणि ह्या वेगवान युगात वेगवेगळ्या प्रकारची असुरक्षितता सगळ्याच देशांना भेडसावत आहे. त्यामुळे भारतच असुरक्षित आहे वगैरे म्हणून भारत सोडून जाण्यात काय अर्थ आहे? हा आपला देश आहे आणि त्याला सुरक्षित ठेवण्याचे आपले कर्तव्यच आहे. देश सोडून जाऊन काय हशील होणार आहे. आपल्या घराची आपण काळजी घेतो की नाही? की एरियात चोर्‍या होऊ लागल्या म्हणून आपण घर सोडून जातो? चिंतोपंत, ह्या, भारत सोडून परदेशात स्थायिक झालेल्यांच्या, भारताविषयीच्या येणार्‍या फुकाच्या कळवळ्याने काळजीग्रस्त व्हायचे सोडा, त्याला उंटावरून शेळ्या हाकणे असं म्हणतात. 'कसे होणार' ह्याची चिंता सोडा, 'काय करावे', भारत, आपला देश, कसा सुरक्षित करवा ह्याची चिंता करा!”, सोकाजीनाना.

“काय पटतयं का? पटत असेल तर चला चहा मागवा पटकन”, सोकाजीनाना मिष्कील हसत.

चिंतोपंतांनी मान हलवत चहाची ऑर्डर दिली.

समाजमाध्यमवेधविरंगुळा

प्रतिक्रिया

दादा कोंडके's picture

11 Aug 2012 - 11:34 pm | दादा कोंडके

पण,

ह्या, भारत सोडून परदेशात स्थायिक झालेल्यांच्या, भारताविषयीच्या येणार्‍या फुकाच्या कळवळ्याने काळजीग्रस्त व्हायचे सोडा, त्याला उंटावरून शेळ्या हाकणे असं म्हणतात.

ह्याच्याशी १००% सहमत! :)

मन१'s picture

11 Aug 2012 - 11:36 pm | मन१

भारीच. खुसखुशीत.सुरुवातीचा बहग प्रचंड आवडला.(वैतागसम्राताच्या डायरीसारखा.)

भारत सोडून परदेशात स्थायिक झालेल्यांच्या, भारताविषयीच्या येणार्‍या फुकाच्या कळवळ्याने काळजीग्रस्त व्हायचे सोडा, त्याला उंटावरून शेळ्या हाकणे असं म्हणतात. 'कसे होणार' ह्याची चिंता सोडा, 'काय करावे', भारत, आपला देश, कसा सुरक्षित करवा ह्याची चिंता करा!”, सोकाजीनाना.

बरं बुवा आमच्या बुडाखाली बॉम्ब फुटेपर्यंत वाट बघू.
एकूणातच "सगळेच असे आहेत" हा सध्याच्या भारतीय व्यवस्थेचा निगरगट्टपणा आहे. मुंबै स्पिरिट नावानं खरं तर अगतिक अशा सामान्य माणसाची थट्टा सुरु आहे. शेवट पटला नाही.

कायमचा भारतावासी

पिंगू's picture

12 Aug 2012 - 11:43 am | पिंगू

+१

मुंबै स्पिरिट म्हणजे वर्तमानपत्रातून जे मुंबैकरांचं गुणगाण केलं जातं ना ते. बाकी सामान्य मुंबैकरांना ह्याबद्दल विचाराल, तर एकच उत्तर मिळेल डोंबलाच स्पिरीट. एक दिवस रोजी बुडाली, तर दिवस कंठायचा कसा हीच बिचार्‍यांची विवंचना असते.. :(

मन१'s picture

14 Aug 2012 - 10:37 pm | मन१

लेख पुन्हा वाचला.
'कसे होणार' ह्याची चिंता सोडा, 'काय करावे', भारत, आपला देश, कसा सुरक्षित करवा ह्याची चिंता करा!”, हा मेसेज महत्वाचा वाटला. आताच समजला. मी पूर्वी घाइत वाचल्याचा परिणाम असावा. फुकटात बोंब मारल्याबद्दल सॉरी. उपप्रतिसाद आल्याने आता तो पुन्हा संपादितही करता येत नाही.

तक्रार काय होती ते सांगतो.आपल्यालाच काहीतरी केले पाहिजे हे शेवटच्या लायनीत लिहिलय. आधीच्या प्रास्ताविकातून तसं काही मला जाणवलं नाही. ती लाइनही तेवढी माझ्या मनावर उमटलीच नाही.
"काहीतरी केले पाहिजे" ही भावना असणेही पुरेसे आहे.

अपूर्व कात्रे's picture

11 Aug 2012 - 11:40 pm | अपूर्व कात्रे

लेख वाचून मनाला आलेली निराशा दूर झाली.
शेजाऱ्यांची घरेसुद्धा जळत आहेत ना? मग मी तरी कशाला माझ्या घरात अग्निशामक यंत्रणा बसवून घेऊ? शेजारी जळून मरताहेत ना? मग मीच कशाला जिवंत राहण्याचा आटापिटा करू?

शिल्पा ब's picture

12 Aug 2012 - 9:37 am | शिल्पा ब

+ १

प्रभाकर पेठकर's picture

12 Aug 2012 - 1:14 am | प्रभाकर पेठकर

जावई आखातात असतात ना तुमचे”, नारुतात्या.

“नाही हो! तिथे देवाधर्माचे काही नाही करता येत, आपला धर्म कसा काय बुडवू”, चिंतोपंत.

दुर्दैवाने चिंतोपंतांना आखाताविषयी काही माहिती दिसत नाही. गेली ३२ वर्षे मी आखातात (मस्कतमध्ये) राहतो आहे. इथे देवळे आहेत, नवरात्रीचे ९ काय १०-११ दिवस गरबा होतो, गणपती उत्सव साजरा होतो, जन्माष्टमी सोहळा, होळी, दिवाळी (अगदी आकाशकंदील लावून), दुर्गामातेची प्रतिष्ठापना आणि उत्सव बंगाली बंधू करतात, ख्रिश्चनांची चर्चेस आहेत त्यांचाही ख्रिस्तमस चर्च मध्ये आणि घरातही चांदणी लावून, येशू जन्माचे देखावे उभारून साजरा होतो.
कांही बंधनं जरूर आहेत पण 'देवधर्माचे काही करता येत नाही' हे चुकीचे आहे. असो.

आणि हे सर्व म्हणजे धर्म नाही. हे उपचार आहेत. हे केले किंवा नाही केले तरी आचरणात स्विकारलेला धर्म बुडत नाही.
चिंतोपंतांना म्हणावं, 'खुशाल निशंक मनाने जा मुलीकडे आखातात. तुमचा धर्म बुडणार नाही.'

ह्या, भारत सोडून परदेशात स्थायिक झालेल्यांच्या, भारताविषयीच्या येणार्‍या फुकाच्या कळवळ्याने काळजीग्रस्त व्हायचे सोडा, त्याला उंटावरून शेळ्या हाकणे असं म्हणतात.

ह्म्म्म! सोकाजीनानांनाही धाग्याच्या शंभरीचे आकर्षण आहे असेच दिसते आहे. मन जरा चुकचुकले, बाकी, चालू द्या.

मन जरा चुकचुकले, बाकी, चालू द्या.

अगदी हेच म्हणायचे आहे.

मस्त हो सोकाजीनाना ,वाचायला मजा आली... :)

बॅटमॅन's picture

13 Aug 2012 - 12:41 am | बॅटमॅन

चिंतोपंत, ह्या, भारत सोडून परदेशात स्थायिक झालेल्यांच्या, भारताविषयीच्या येणार्‍या फुकाच्या कळवळ्याने काळजीग्रस्त व्हायचे सोडा, त्याला उंटावरून शेळ्या हाकणे असं म्हणतात. 'कसे होणार' ह्याची चिंता सोडा, 'काय करावे', भारत, आपला देश, कसा सुरक्षित करवा ह्याची चिंता करा!”, सोकाजीनाना.

भारतात राहणारे जसे काय लै दिवेच लावणारेत किनै. की रॉचे एजंट वैग्रे होणारेत? फुकाचा कळवळा वैग्रे सोडा, अनिवासींची भारतविषयक चिंता एका अर्थी जरी निरर्थक , उष्ट्रासीन अजापालकाची वाटली तरी निवासी लोक तरी कुठे विशेष एम्पॉवर्ड आहेत? इतकेच की भारतात जी सुधारणा/अपकर्ष होईल त्याची फळे ते डायरेक्ट भोगू शकतात-रादर, त्यांना भोगावी लागतात. नपेक्षा प्र्याक्टिकली कोणाचाही कळवळा एका लिमिटपलीकडे शष्प कामाचा नै हो सोत्रिअण्णा.

पैसा's picture

14 Aug 2012 - 9:38 am | पैसा

काय गंभीर विषयांवर चर्चा करता हो? कोण काय बरंवाईट करताहेत ते करू द्यात! आम्ही लोकं मस्त झोपेत आहोत. सलमानचा पुढचा पिच्चर रौप्यमहोत्सवी की सुवर्णमहोत्सवी असल्या महत्त्वाच्या प्रश्णांची चर्चा करायचं सोडून नसते विचार कशाला करताय? त्तुम्ही पण परदेशात जावा की सुखाने!

मदनबाण's picture

14 Aug 2012 - 7:51 pm | मदनबाण

काय ठेवलयं या देशात ? उगाच रेल्वे प्रवास करताना बॉम्ब स्फोटात मारले जाल !
बरं इकडचे पोलिस फार विनोदी आहेत बरं ! पुण्यात स्फोटक सायकलवर ठेवली होती म्हणुन आता सर्व सायकल विक्रेत्यांना त्यांच्या दुकानात सिसिटीव्ही कॅमेरे लावायला सांगितले आहेत्,तसेच ग्राहकांची ओळखपत्रे( त्या संबंधी कागदपत्रे) सुद्धा जमा करुन घ्यावीत असे त्यांना सांगितले.ज्या रस्त्यावर स्फोट झाले तिथले कॅमेरे बंद का होते ? असा प्रश्न मात्र दुकानदारांनी विचारला नसावा बहुधा... उद्या बाईकचा वापर झाला आणि परवा कारचा वापर झाला तर त्या सर्व डिलर मंडळींनी आत्ता पासुनच कॅमेरा फुटेज आणि कागदपत्र तयार ठेवावी.
मुंबईत स्फोट होउन वर्षे लोटली तर अजुन सिसिटीव्ही बसवण्याची निविदा निघत नाही, इतके आपले सरकार कार्यक्षम आहे ! किती किती काळजी यांना आपल्या जनतेची नाही का ?
http://alturl.com/9znfd

जाता-जाता :--- उगाच पुण्यात इथे तिथे फिरु नका... आसाम,मेघालय मधील विद्यार्थ्यांना मारणारे संशयीत म्हणुन तुम्हालाच आत टाकले तर उगाच पोकळ बांबुचे फटके खावे लागतील ! ;)