जीवनव्रती...

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जनातलं, मनातलं
3 Aug 2012 - 7:27 pm

कोकणातला मंडणगड तालुका म्हणजे एकेकाळी सरकारी नोकरांसाठी `अंदमान'! इथे बदली होणं ही शिक्षा समजली जायची. याच तालुक्यातल्या हजारभर वस्तीच्या घराडी गावातली ही कथा.
रायगड जिल्ह्य़ात उरण गावातली शाळा आजही `किनरे गुरुजींची शाळा' म्हणून ओळखली जाते. गावातल्या पालकांनी मुलांना शाळेत पाठवावं म्हणून किनरे गुरुजींनी घरोघर अक्षरश: वणवण करून पटसंख्या जमविली. ९० मुलांनिशी सुरू झालेल्या या शाळेत आज चार हजार मुलं आहेत. किनरे गुरुजींचं शाळेशी असलेलं नातं आजही शाळेनं जपलंय. किनरे गुरुजींच्या पत्नीचं माहेर घराडीतलं. वागळ्यांकडचं. माहेरचं हे घर किनरे यांच्या पत्नीला मिळालं होतं. घराडी गावातल्या त्या घरात १९९२ मध्ये घडलेल्या एका अप्रिय घटनेतून एका महान कामाची बीजे रुजली.
किनरे गुरुजींचा स्मृतिदिन होता. त्याच दिवशी चोरीच्या उद्देशानं घरात घुसलेल्या काही तरुणांनी किनरे गुरुजींच्या वृद्ध पत्नीची घरात हत्या केली, आणि पाच एकरांच्या विस्तीर्ण परिसरातलं ते घर एकदम उदास झालं. किनरे गुरुजींच्या पाच मुली अस्वस्थ झाल्या. त्यांची मुलगी आशाताई कामत त्या वेळी साठीच्या आसपास होत्या. पती लष्करातून निवृत्त झालेले, मुलगा एअरफोर्समध्ये, मुलगी अमेरिकेत. कुटुंब स्थिरावलेलं. आईच्या पश्चात हे घर रितं राहू द्यायचं नाही, इथे काहीतरी केलं पाहिजे, असं त्यांनी ठरवलं. अनुताई वाघांचा आदर्श डोळ्यांसमोर होता,
त्यांची धाकटी बहीण प्रतिभा सेनगुप्ता त्या वेळी पुण्याच्या अंधशाळेत शिक्षिका होती. तिच्याशी बोलताबोलता आईच्या घरात अंधांसाठी शाळा सुरू करायची, असा निर्णय झाला. आशाताईंनी शाळेच्या व्यवस्थापनाचं काम बघायचं, आणि प्रतिभाताईंनी मुलांना शिकवायचं, अशी कामाची विभागणीही झाली.
रत्नागिरी जिल्ह्य़ात त्या वेळी अंधांसाठी कुठेच शिक्षणाची सोय नव्हतीच. शिवाय अंध मुलांना शिकवण्याची, स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी सक्षम करायची गरज असते याची जाणीवही पालकांमध्ये फारशी रुजलेली नव्हती. आपल्या कुटुंबात जन्मलेल्या अंध मुलाचे आईबाप एकतर मुलांचा जिवापाड सांभाळ करीत किंवा मुलांकडे पूर्ण दुर्लक्ष करीत. या मुलांना सक्षम करण्यासाठी शिक्षण देण्याची गरज असते आणि तशी सोयही असते, हे पालकांच्या गावीही नव्हते.
आशाताई आणि प्रतिभाताईंनी जिल्ह्य़ातले गाव-गाव पालथे घातले. अंध मुले शोधली, आणि त्यांच्या आईवडिलांना गळ घातली. `आम्ही तुमच्याइतकीच काळजी घेऊन मुलाला वाढवू. त्याला आपल्या पायावर उभं राहण्याची ताकद देऊ.' असा शब्द मुलांच्या पालकांना दिला.
अशा चार पालकांना या बहिणींची तळमळ समजली आणि त्यांनी आपली अंध मुले आशाताई आणि प्रतिभाताईंच्या हाती सोपवली.
किनरे गुरुजींच्या घरात, घराडीतल्या वागळे इस्टेटमध्ये, `स्नेहज्योती निवासी अंधशाळा' नावाची शाळा सुरू झाली. हे काम ईश्वरानं आपल्यावर सोपवलं आहे, ते व्रत म्हणून स्वीकारायचं आणि सर्व शक्तिनिशी पार पाडायचं आहे, हे सगळ्या बहिणींनी स्वीकारलं आणि पाचही बहिणींनी या कामासाठी सुरुवातीला लागणारा निधीही उभारला. अंध मुलांना शाळा आणि `दोन आया' असलेलं एक मायेचं घर मिळालं. हळूहळू मुलांची संख्या वाढू लागली, आणि घराशेजारीच स्वतंत्र इमारतही उभी राहिली.
आपल्यावर मोठी जबाबदारी आहे, हे आशाताई आणि प्रतिभाताई वारंवार स्वत:ला बजावत होत्या. अंधशाळेतल्या मुलांच्या खर्चाचा कोणताही भार त्यांच्या पालकांवर ठेवायचा नाही, हे त्यांनी सुरुवातीलाच ठरवलं होतं.
एखाद्या कामातला सेवाभाव लोकांना पटला की त्याला अनेक हातांचा आधार मिळू लागतो. यथाशक्ति सहकार्य करणारी अनेक माणसंही या कामामागे उभी राहिली आणि ईश्वरी इच्छेतून एका कुटुंबानं उभ्या केलेल्या कामाला संस्थात्मक रूप आलं. आपल्यावर मोठी जबाबदारी आहे, हे आशाताई आणि प्रतिभाताई वारंवार स्वत:ला बजावत होत्या. वायफळ खर्च करायचा नाही, अंधशाळेतल्या मुलांच्या खर्चाचा कोणताही भार त्यांच्या पालकांवर ठेवायचा नाही, हे त्यांनी सुरुवातीलाच ठरवलं होतं. ही मुलं हे आपलं कुटुंब आहे ही त्यांची भावना होती. तितकं प्रेम मुलांना इथे मिळू लागलं. आता या `घरातल्या शाळे'त ३४ मुलं आहेत आणि घराची आठवणदेखील येऊ नये, इतकं आईचं प्रेमही त्यांना इथेच मिळते आहे. दिवाळीच्या सुट्टीत मुलं जड मनानंच घरी जातात. पण त्यांची घराची ओढ कमी होऊ नये, यासाठी त्यांना सक्तीनं घरी पाठवलं जातं.
आशाताई आणि प्रतिभाताई दोघीही इथेच, या घरात राहून शाळेची व्यवस्था पाहतात. आता सहा शिक्षकही नेमलेत. आणखी काही कर्मचारीही आहेत. विशेष म्हणजे, या शाळेतले शिक्षकही अंध आहेत. त्यामुळे शिकविण्याची वेगळीच तळमळ त्यांच्याकडे आहे. सुरुवातीला जेमतेम पाचशे रुपये पगार मिळूनही इथे शिकविण्यासाठी तयार झालेल्या या शिक्षकांनाही हे आपले घर वाटते. कारण पाचशे रुपये पगारात बाहेर राहण्याचा खर्च परवडणारा नाही, हे ओळखून आशाताई आणि प्रतिभाताईंनी शिक्षकांच्या राहण्याची सोयही येथेच केली.
हजारभर वस्तीच्या या कोपऱ्यातल्या गावाचं `स्नेहज्योती निवासी अंधशाळे'मुळे सगळीकडे नाव झालं आणि मदतीसाठी अनेक हात पुढे आले. संस्थेच्या वाढत्या पसाऱ्यासोबत वाढणाऱ्या खर्चासाठी सहज निधी उभा राहू लागला, आणि हे दैवी काम असल्याची आशाताई आणि प्रतिभाताईंची श्रद्धाही घट्ट झाली.
शाळेतली मुलं अंध आहेतच, पण त्यांचं वयही लहान आहे. त्यांना वेगळं शिक्षण गरजेचं आहे. त्यांना खूप शिकवावं लागतंच. पण विशेष म्हणजे, त्यांच्या अंधत्वालाही झाकोळून टाकणारे काही गुण देवानंच त्यांना बहाल केलेले असतात, असं या बहिणींना वाटतं. मुलांचा आत्मविश्वास वाढावा, त्यांना आपल्या वैगुण्याची जराही खंत वाटू नये, यासाठी या बहिणींचे प्रयोग सुरू असतात. आशाताईंनी वयाची सत्तरी गाठली आहे, तर प्रतिभाताई ६४ वर्षांच्या आहेत. पण रोज सहा ते आठ तास त्या मुलांसोबत राहून त्यांना शिकवितात. मुलांना इंग्रजीची आवड निर्माण व्हावी म्हणून नॉर्मल मुलांसोबत अनेक स्पर्धा घेतल्या जातात. त्यात ही मुलं बाजी मारतात आणि प्रतिभाताईंचा आनंद ओसंडून जातो. आता व्यावहारिक शिक्षणाबरोबरच व्यावसायिक शिक्षणही या शाळेत सुरू झालंय. मुलं कागदाच्या छान पिशव्या बनवतात, सुंदर राख्या तयार करतात, मेणबत्त्या, अगरबत्त्या बनविण्याचं शिक्षणही इथे दिलं जातं.
‘मुलं इथं शिकून बाहेर पडली की स्वाभिमानानं आणि आत्मविश्वासानं स्वत:च्या पायावर उभी राहतील. त्यांना समाजातही आपोआपच प्रतिष्ठा मिळेल’, असं सांगताना प्रतिभाताईंच्या सुरातून समाधानही ओसंडत असते. मग त्या मुलांच्या विश्वात नकळतपणे शिरतात. त्यांची नजर लांबवर कुठेतरी स्थिरावते.
त्या दिवशी प्रतिभाताईंशी फोनवर बोलतानादेखील मला हे स्पष्ट जाणवलं. संध्याकाळचे सात वाजले असावेत. मुलं एकएक करून परतत होती. बाजूला गलका होता आणि प्रतिभाताई बोलत होत्या. विषय होता, फक्त मुलं!
`ही आमच्या आईची जागा असली तरी आता फक्त संस्थेची. आमचं काही नाही. इथले आंबे, काजू सगळं या मुलांचं. आंब्या-काजूच्या दिवसांत इथला परिसर वासानं घमघमून जातो आणि मुलांचं बालपण ताजंतवानं होतं. मुलं हुंदडू लागतात. मोकाट सुटतात. झाडावरचे आंबे-काजू वासानंच ओळखून काढतात आणि फळ हातात आलं की तिथूनच ओरडून सांगतात, बाई, मी काजू खाल्ला!'
`मार्च-एप्रिल हे महिने इथे फक्त मुलांचे असतात. मुलं काजूच्या बिया गोळा करतात, स्वत:च भाजतात आणि काजूगर काढतात. बाजारात मिळणारे तयार काजूगर सहज होत नसतात हे त्यांना कळलं पाहिजे.' मुलांच्या हुंदडण्यानं, बागडण्यानं सुखावणाऱ्या प्रतिभाताईंच्या मनात तेव्हाही त्यांच्या मानसिक विकासाचेच विचार घर करून असतात, हे त्यांच्या बोलण्यातून जाणवत असतं.
प्रतिभाताई बोलत असतानाच मुलांची जेवणं आटोपली होती. सगळी मुलं हॉलमध्ये जमली होती. `कारण टीव्ही लावायची वेळ झालीय' प्रतिभाताई म्हणाल्या.
या वेळी माझ्या चेहऱ्यावर उमटलेलं आश्चर्य त्यांना कदाचित जाणवलं असावं.
`त्यांना सातच्या बातम्या ऐकायच्या आहेत'. लगेचच त्यांनी खुलासाही केला. पण एक लहानगा त्यांच्या शेजारीच उभा होता.
`आई, बातम्या नाहीत. त्याच्या आधी तो `पटलं तर घ्या' कार्यक्रम. तोही ऐकायचाय'. त्यानं प्रतिभाताईंना सांगितलं आणि तिकडे टीव्ही सुरू झाला.
मुलं शांतपणे बसल्याचं मला लांबवरून, फोनवरूनही जाणवलं.
आईच्या मायेची पाखर घालणारी ही `स्नेहज्योती' गेल्या दहा वर्षांत चांगलीच स्थिरावली आहे. प्रतिभाताई सेनगुप्ता आणि आशाताई कामत यांच्या या `व्रतपूर्ती'साठी असंख्य हातांचा आधार लाभला आहे, हे सांगताना आशाताईंच्या डोळ्यांत पाणी साचलंय, हे मला त्यांच्याशी फोनवरून बोलतानाही लक्षात येत होतं.
`सात वर्षांपूर्वी, २००५ मध्ये नवी इमारत बांधायचं ठरवलं. फक्त १०० रुपयांचा वाटा उचला असं आवाहन केलं, आणि समाजातून शंभर रुपयांचा पाऊस पडला. पावत्या लिहिताना आणि फाडताना हात दुखून आले. पैशांपेक्षाही लोकांचं प्रेम आणि आधार मोठा आहे, याची खात्री झाली आणि सरकारी अनुदान नाही, याची खंत एका क्षणात संपली. अजूनही कुणी धान्य देतं, कुणी पैसे देतं. हे ईश्वरी कार्य आहे, ते सुरू राहणारच..' आशाताईंचा स्वर ओला झाला होता.
रत्नागिरी जिल्ह्य़ात अंधांसाठी दुसरी शाळा नाही. आज या शाळेत सहा शिक्षकांसह १३ कर्मचारी आहेत आणि जवळपास ३५ मुलं आहेत. शाळेला मंजुरी मिळावी म्हणून २००३ मध्ये केलेल्या अर्जावर चार वर्षांनी निर्णय झाला आणि शाळेला मान्यता मिळाली. पण सरकारकडून एका पैशाचेही अनुदान मिळत नाही. हितचिंतकांच्या देणग्या आणि कुटुंबांतून उभारलेला पैसा यांवरच संस्थेचा कारभार चालतो.
आता तर आणखीही काही प्रकल्प आशाताईंच्या नजरेपुढे आहेत. हे वर्ष संस्था दशकपूर्तीचे वर्ष म्हणून साजरे करणार आहे. संस्थेची नवी इमारत तयार होतेय, त्याचं उद्घाटन, मुलांसाठी व्यवसाय शिक्षण केंद्राची सुरुवात, आणि मुलांना सन्मानाने कमाई करता यावी, कुणापुढेही हात पसरायची वेळ येऊ नये, यासाठी त्यांच्यातील संगीतकलेला वाव देणारं `संगीत साधना' नावाचं केंद्र सुरू करण्यात येतंय. `या मुलांमध्ये संगीताचं उपजत ज्ञान असतं. त्यांना सुरांचं ज्ञान ही त्यांना निसर्गानं दिलेली देणगी असते. हे ज्ञान त्यांनी आत्मविश्वासानं जपावं, जोपासावं म्हणून आम्ही हातभार लावतोय', असं आशाताई म्हणतात.
समाजातून मिळणाऱ्या आधाराबद्दल आशाताई आणि प्रतिभाताई अत्यंत कृतज्ञ आहेत. त्यांच्या प्रत्येक शब्दात ही कृतज्ञता ओथंबलेली दिसते. आता आणखी चार-पाच वर्षांत हा भार पेलणारी नवी पिढी समाजातूनच तयार होणार आहे, हा विश्वास आशाताईंच्या बोलण्यातून डोकावतो..
हे `जीवनव्रत' भविष्यातही तितक्याच निष्ठेने सुरू राहणार, याविषयी या दोघी बहिणी निश्चिंत आहेत.
- http://www.lokprabha.com/lokprabha/20120810/maticha_akash.htm
Dinesh.gune@expressindia.com

समाजजीवनमानमाध्यमवेध

प्रतिक्रिया

प्रभाकर पेठकर's picture

3 Aug 2012 - 9:17 pm | प्रभाकर पेठकर

सुंदर परिचय.

समाजसेवेला अक्षरशः वाहून घेतलेल्या व्यक्ती पाहिल्या की 'देव' ह्या संकल्पनेचा जन्म कशामुळे झाला असावा ह्याचा अंदाज येतो आणि मन म्हणतं, 'होय! देव अस्तित्वात आहे.'

+१
अगदी सुंदर परिचय करून दिलात.
मी.. माझं.. करत न राहता दुसर्‍यांसाठी स्वतःचं आयुष्य आनंदाने वेचणारे लोक बघितले की स्वतःच्या खुजेपणाची फार लाज वाटते.

रामपुरी's picture

4 Aug 2012 - 2:53 am | रामपुरी

मी.. माझं.. करत न राहता दुसर्‍यांसाठी स्वतःचं आयुष्य आनंदाने वेचणारे लोक बघितले की स्वतःच्या खुजेपणाची फार लाज वाटते.
+१

त्यांच्या कार्याला हातभार कसा लावता येईल हेही सांगता आलं तर फारच उत्तम.

स्मिता.'s picture

5 Aug 2012 - 3:14 am | स्मिता.

परिचय आवडला आणि त्याने भारावून गेले.

समाजाचे ऋण फेडायची संधी मिळावी असं आता फार वाटायला लागलंय.

स्पंदना's picture

6 Aug 2012 - 6:05 am | स्पंदना

होय!

प्रभाकरकाका अन मराठे दोघांच्याही प्रतिस्सादात बरच काही उमटलय.

किनरे कुटुंबियांना सलाम.

दिनेशराव जवळजवळ दीडवर्षानी लिहताय. आता एवढी मोठी सुटी नाही घ्यायची हा!

sneharani's picture

4 Aug 2012 - 10:30 am | sneharani

उत्तम कार्याचा, खूप चांगला आढावा!
:)

इरसाल's picture

4 Aug 2012 - 10:43 am | इरसाल

क्षणभर का होइना, पण भावनिक झालो.

धन्यवाद.

उत्तम परिचय. खूप लोकांना मदत करायची असते आणि खूप लोकांना मदतीची गरज असते, पण या सगळ्यांचं कोओर्डीनेशन करणं कठीण असतं.
त्यांच्या कार्याला हातभार कसा लावता येईल हेही सांगता आलं तर फारच उत्तम.
+१

जाई.'s picture

4 Aug 2012 - 9:28 pm | जाई.

+२

अन्या दातार's picture

4 Aug 2012 - 4:38 pm | अन्या दातार

!

पैसा's picture

4 Aug 2012 - 9:48 pm | पैसा

वाचताना फार चांगलं वाटलं. असेही लोक अजून आहेत!

चौकटराजा's picture

5 Aug 2012 - 7:36 am | चौकटराजा

माझा देवाच्या अस्तित्वावर विश्वास नाही पण त्याच्या लीलेच्या अस्तित्वावर आहे.जीवनाचे स्वरूप व्यामिश्र आहे. म्हणून कुठे निर्दयपणा अन निलाजरेपणा जन्माला आला की कुठे करूणा , संवेदनशीलता ही जन्माला येते.

पिवळा डांबिस's picture

5 Aug 2012 - 11:52 am | पिवळा डांबिस

सुरेख परिचय!
अवांतरः बाकी दिनेशभाऊ, बर्‍याच दिवसांनी मिपावर दिसलांत, आनंद वाटला...
तुमच्या जुंगफ्राऊला देखील शुभेच्छा!!!

प्रसन्न शौचे's picture

10 Aug 2012 - 7:26 pm | प्रसन्न शौचे

सुरेख परिचय करुन दिला आपण आशाताई आणि प्रतिभाताई चा .
मी.. माझं.. करत न राहता दुसर्‍यांसाठी स्वतःचं आयुष्य आनंदाने वेचणारे लोक बघितले की स्वतःच्या खुजेपणाची फार लाज वाटते.
समाजसेवेला अक्षरशः वाहून घेतलेल्या व्यक्ती पाहिल्या की 'देव' ह्या संकल्पनेचा जन्म कशामुळे झाला असावा ह्याचा अंदाज येतो आणि मन म्हणतं, 'होय! देव अस्तित्वात आहे.'
क्षणभर का होइना, पण भावनिक झालो.

धन्यवाद.

बहुगुणी's picture

25 Aug 2012 - 5:59 pm | बहुगुणी

या आणि अशा लेखांचं संकलन करण्याचा संपादकांचा आणि संस्थळचालकांचा निर्णय अत्यंत स्पृहणीय आहे, त्याबद्दल त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन!

असे लेख देतानाच, मूळ लेखात तसा उल्लेख आलेला नसेल (जसा तो इथे आलेला नाही), तर असं निरपेक्ष कार्य करणार्‍या लोकांशी संपर्कासाठी माहिती (फोन नं., इ-मेल, असल्यास संस्थळाचा पत्ता, वगैरे) संपादकांनी त्या लेखाखाली तळटीपेत द्यावी असं सुचवेन, त्याआधारे ज्यांना अशा कार्यात सक्रिय भाग घ्यायचा आहे किंवा इतर काही मदत करायची इच्छा आहे, त्यांना चालना मिळेल. बरेचदा संपर्काची नेमकी माहिती सहज उपलब्ध नसल्याने मनात आलेली मदत करण्याची ऊर्मी/ उबळ विरून जाते, तसं होऊ नये म्हणून ही विनंती.

एका अद्वितीय कार्याची ओळख करून दिल्याबद्दल दिनेशरावांचे पुन्हा एकदा आभार!

एस's picture

28 Aug 2012 - 11:32 pm | एस

हेच म्हणणार होतो.

सुधीर१३७'s picture

2 Sep 2012 - 1:38 pm | सुधीर१३७

+१११११११११

संस्थेचा पत्ता व फोन नंबर मिळाला तर बरे होईल. ..............

मूकवाचक's picture

29 Aug 2012 - 3:58 pm | मूकवाचक

_/\_