भारतीय सिनेमाला आता शंभर वर्षांचा इतिहास आहे व संगीताचे आज चित्रपटातील महत्व तुलनात्मक रित्या कमी झालेले असले तरी संगीत हा भारतीय बोलपटाचा ( टॉकी) एकेकाळी प्राण होता यात शंका नाही. भारतीय बोलपटांच्या विषयात काळाच्या संदर्भाप्रमाणे बदल झाले तसे संगीताच्या शैलीतही.पहिल्या कालखंडात गायक व नट ही भूमिका एकच व्यक्ति करीत असे. त्यामुळे अभिनय यथातथा असला तरी चालेल पण गाता आले पाहिजे अशी अट असे. पु़ढे तांत्रिक प्रगति होऊन पार्श्व गायनाचे युग निर्माण झाले. सैगल, पंकज मलिक, सुरेंद्र, श्याम, यांची जागा तलत महमूद, रफी, मन्ना डे, हेमंतकुमार किशोरकुमार यानी घेतली. पन्नासच्या दशकात सर्वच संगीतकारांच्या प्रतिभेत सुवर्ण युगाचा संचार झाला. चित्रपटातील नायकांची प्रतिमा पूर्वीपेक्षा वेगळी झाली. साहजिकच गायकांच्या गायन शैलीतही फरक पडत गेला. सुरवातीस मोहमंद रफी यांच्या शैलीवरही जुन्या गायकांच्या शैलीचा प्रभाव दिसून येतो. ( आठवा - मै जिंदगीमे हरदम रोता ही रहां हू १९४९ ) . पण रफींच्या आयुष्यात दोन महत्वाचे संगीतकार १९५२ ते १९६० या काळात आले ते म्हणजे शंकर जय किशन व ओ पी नय्यर . या दोघानी संथ संगीताचा नूरच पार दूर भिरकावून दिला. रफीनी १९५२ नंतर आपली गायकी शैली बनण्यात ओपी नय्यर यांचा हात असल्याचे कबूल केले असे शम्मी साहेबानी एका मुलाखतीत सांगितले होते. ही शैली म्हणजे " मेलोड्रामा" शैली. या शैलीत प्रत्येक मूड हा थोड्या अतिरेकी प्रमाणात आणायचा असतो. रडणे हसणे , विस्परिंग, मृदुपणा, सारेच थोडे वाढवायचे. असा प्रकार मन्ना डे याना ही करता यायचा पण रफी यांच्या गायनात एकूण एक डझन आवाज लपलेले होते. त्यांच्या आवाजाचा पोत हा नायकाच्या पडद्यावरील रुपाचा ध्वनी माध्यमातील अविष्कार असे. रफी साहेब पुढे १९६९ पर्यंत आघाडीचे पुरूष गायक राहिले ते या दोन कारणाने .
या मेलोड्राम शैलीच्या गायकीची काय काय रूपे रफीनी दाखविली ते पाहणे रंजक आहे.
१) शायराना अंदाज - पूर्वी आपल्या सिनेमात मुस्लिम सोशल नावाचा एक फॉरमॅट होता. त्यात मेरे महबूब, पालकी , दिल हीतो है, चौदवीका चांद ई चित्रे आली. रफी याना शायराचा आवाज हा उत्तम पणे व्यक्त करता येत असे. विशेषत: न थरथरणारा, सुस्पट उचारांचा व प्रसंगी सॉफ्ट व प्रसंगी शार्प
होणारा आवाज रफी काढू शकत होते. त्यामुळे मुशायरा म्ह्टले की रफी. असा संकेतच होऊन बसला.
२) देशभक्ताचा आवाज- रफींचे दुसरे सामर्थ्य म्हणजे देशभक्तीपर गीत असले की ते एक वेगळाच मूड त्यांच्या शब्दफेकीत आणत- ऐ वतन ऐ वतन , वतनकी राहमे वतनके नौजवा , कर चले हम फिदा,अपनी आजादिको हम ही गीते ऐकली की कोणालाही स्फुरण चढावे अशी ताकद रफींच्या फेकीत असे. पुढे रफी यानाच गुरू मानणारे महेंद्र कपूर यानी आपला एक नवा देशभक्तीचा पहनावा
पुढे आणला हा भाग वेगळा.
३) लहान मुलांसाठीच्या गीतातील रफी.- हिदी सिनेमात लहान मुलांचे वाढदिवस ई गीताना स्थान असे. त्यात ही मेलोड्रामा शैली रफी खुलवत असत , नन्हे मुनन्नी बच्चे तेरी, रे मामा रे मामा रे, हम भी अगर बच्चे होते, आयी हे बहारे मिटे व चक्के मे चक्का ही गीते पहा .रफी कशी निभावून नेत.
४) शराबी मूड- हा मूड तर रफींचा हात खंडा- निराश शराबी- कभी न कभी , जरा सभ्य शराबी - मैने पीना सीख लिया, विनोदी शराबी- जंगलमे मोर नाचा संत्रस्त शराबी- मैने पी शराब तुमने क्या पिया
यात निरागस , धार्मिक मोहंमद रफी हा माणूस कुठेही आपल्याला आढळणार नाही. आपण पक्के व्यावसायिक पार्श्वगायक आहोत याचे भान रफी व आशा भोसले यानी जितके मनापासून ठेवले आहे त्या पुढे रसिकाची मान झुकलीच पाहिजे.
५) रडका चेहरा- उदास ,हताश रडका नायक व चरित्रनायक साकार करणे यात रफीनी कहरच केला
होता. है द्नुनिया उसीकी , बाबुलकी दुआए लेती जा, ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है, जाने ने क्या ढूंढती रहती है ये आखे मुझमे, ई गीते यासाठी पुरे आहेत.
६) विशिष्ठ आवाज - रफींनी सिंगापूर या चित्रात " रासासायंग रे रासा सायां " असे गाणे गायले आहे. त्यात त्यानी वेगळाच चिनी आवाज काढला आहे, त्यानीच गायलेल्या ले गई दिल गुडिया जापानकी
यातील जापान लव इन टोकियो यातील रफीचा आवाज ऐका.
७) विनोदवीरासाठीचा आवाज - प्रत्येक सिनेमात पूर्वी एक विनोदी पात्र नायकाच्या जोडीला असे त्याना सुद्धा रफी वेगळाच बाज असलेला आवाज देत. ऑल लाईन किल्यर, मै बम्बईका बाबू, हम काले है तो क्या हुआ दिलवाले है, सुनो सुनो मिस चट्रर्जी ई गीते विनोदवीरानी पडद्यावर सादर केली आहेत हे वेगळे सांगावेच लागत नाही.
या खेरीज, टांगेवाला असो खेळणीवाला असो, भिकारी असो सर्वांसाठी पार्श्व गायनाचे भन्नाट दुकान रफी यांच्या मालकीचे होते. रफी गरजू निर्माता गरजू संगीतकार असेल तर कित्येक वेळा या दुकानातील माल उदार हस्ते वाटीत. शम्मीकपूर, जॉनी वॉकर, दिलीप कुमार, राजेंद्रकुमार, यांचे वाटचालीत तर या आवाजाने किती हिस्सा उचलला याचा हिशेबच नाही. एका बाजूस मधुबनमे राधिका वा नाचे मन मोरा गाणारे रफी दुसर्या बाजूस बदनपे सितारे किंवा, अकेले अकेले हे गाणे म्हणूच कसे शकतात ? एका बाजूस किसी की यादमे दुनियाके है भुलाये हुवे किंवा तेरी ऑखोंके सिवा चा गजला गाणारे रफी दिवाना मस्ताना किंवा यार चुलबुला है यासारखी नटखट गाणी कशी म्हणू शकतात याचे उत्तर कोठे मिळेल? रफीना अभिनेताच व्हायचे होते म्हणे !
मराठीतील कवि ग दि माडगूळकर ,संगीतकार वसंत प्रभू व वसंत पवार , हिंदीतील गायक किशोरकुमार, हिदीतील अभिनेते संजीव कुमार , संगीतकार आर डी बर्मन, मदनमोहन याना काहीसे कमीच आयुष्य मिळाले तरी त्यानी त्यातच इतके काही करून ठेवले की आजही ते आपल्यात आहेत असेच वाटते . ३२ वर्षानंतरही मरहुम मोहंमद रफींची आठवण येते ती ही अशीच !
प्रतिक्रिया
29 Jul 2012 - 6:34 pm | बहुगुणी
परवा ३१ जुलैला रफीची पुण्यतिथी आहे. बहुधा तेच निमित्त साधून आपण हा लेख लिहिला असावा. 'एक से बढकर एक' अशा गाण्यांच्या छान आठवणी जागवल्यात तुम्ही, धन्यवाद! इथे गेल्या वर्षी ३१ जुलैला एक लेख लिहिला होता रफी विषयी, त्यावरच्या प्रतिक्रियांमध्ये वाचकांनी यांतली बरीचशी गाणी उद्धृत केली होती.
29 Jul 2012 - 6:33 pm | चिंतामणी
३२ वर्षानंतरही मरहुम मोहंमद रफींची आठवण येते ती ही अशीच !
जबरदस्त रेंज असलेले ते एक गायक होते. त्यांच्याबद्दल आणि त्याकाळातील सगळ्याच गायक, गायीका आणि संगीतकारांबद्दल लिहीयला बसले की कुठे थांबायचे हेच उलगडत नाही.
29 Jul 2012 - 7:16 pm | प्रभाकर पेठकर
मोहम्मद रफी ह्या गुणी गायकावर अतिशय समर्पक लेख.
रफी साहेब गेले तेंव्हा झालेल्या दूरदर्शन मुलाखतीत जॉनी वॉकर म्हणाला होता, ''मालीश.... तेल मालीश, सर जो तेरा टकराए' ह्या गाण्याच्या आधी रफी साहेबांनी मुद्दाम मला त्यांच्या घरी बोलावून माझ्याशी चर्चा केली. चित्रपटातील माझ्या लकबीचा अभ्यास केला आणि नंतर ते ते गाणे गायले.' ही आठवण सांगताना जॉनी वॉकरच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.
रफी साहेबांची अजून एक जमेची बाजू म्हणजे त्यांच्या आवाजात 'पुरूषी लडिवाळपणा' भरपूर होता.
पु.लं.च्या साहित्याइतकेच रफीच्या गायकीचे गारूड मनावर आहे ते तसेच राहो एवढीच इच्छा.
29 Jul 2012 - 7:39 pm | JAGOMOHANPYARE
छान
29 Jul 2012 - 8:18 pm | प्रचेतस
रफी- जितका महान गायक तितकाच सज्जन माणूस.
29 Jul 2012 - 9:29 pm | पैसा
यातली बहुतेक गाणी सर्वांनीच खूप ऐकलेली आहेत. रफी साहेबांची जागा घ्यायचा प्रयत्न नंतर खूपजणांनी केला पण कोणीही त्यात यशस्वी झालं नाही. अलीकडे रफीच्या जवळपास पोचणारा गायक म्हणजे सोनू निगम. सोनूला संगीताचं शास्त्रशुद्ध शिक्षण मिळालेलं आहे, रफींनी सुरुवातीला कोणतंही संगीत शिक्षण घेतलं नव्हतं असं काहीसं वाचलेलं आठवतंय. (चूक असू शकेल, कोणी खरी माहिती दिली तर उपकृत होईन.) टेक्निकली कदाचित सोनू जास्त परफेक्ट असेल. पण सोनूचं गाणं रफीइतकं भावनापूर्ण वाटत नाही. लेखासाठी धन्यवाद आणि रफींना श्रद्धांजली.
30 Jul 2012 - 6:50 am | चौकटराजा
रफीनी बडे गुलाम अलीं व इतर दोघांकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले.तुलनाच करायची झाली तर रफींपेक्षा लताबाई, आशाबाई, व मन्न्ना दा यांची या बाबतीतली " तयारी "जास्त होती. गायनाचे टेकनिक म्हणाल तर सोनू निगमना रफी व्हायला आणखी एक जन्म घ्यावा लागेल. रफीनी गायलेली गीते सोनू पेक्षा त्यांचे वडील अधिक चांगली म्हणतात.( हे आपले माझे मत ) सोनू हे गायक अभिनेते नकलाकार असे मिश्र रसायन मात्र मस्त आहे.
रफी साहेबांची जागा नंतर कोणी घेण्याचा प्रश्नच नाही कारण त्यांच्या शैलीची गीते त्यांच्या पश्चात कोणी
बनविलेलीच नाहीत. कुमार शानू व उदीत नारायन यांची ही स्वता: ची एक शैली आहे.
30 Jul 2012 - 12:24 pm | चित्रगुप्त
रफी, हेमंत कुमार, मुकेश, मुबारक बेगम, गीता दत्त, शमशाद बेगम, इ. इ. नावं कळण्याएवढे मोठे होण्यापूर्वीच त्यांची गाणी मधल्या म्युझिक सकट पाठ झाली होती...
या सर्वांनी जन्मभरासाठी अनमोल, अक्षय ठेवा दिलेला आहे. सर्वांना श्रद्धांजली.
30 Jul 2012 - 1:26 pm | मंदार दिलीप जोशी
रफी साहेबांचा आवाज हा पृथ्वीवरचा आवाज नव्हताच. स्वरगंधर्व होते ते.
लेखनाबद्दलः
गायकांवर मुळात साधं लिखाण करणं अत्यंत कठीण असतं. तू तर अत्यंत अभ्यासपूर्ण लिहीलं आहेस याचा जास्त आनंद आहे. अतिशय छान. आवडलं.
हा लेख संदर्भासाठी साठवून ठेवतो आहे.
31 Jul 2012 - 9:00 pm | चैतन्य गौरान्गप्रभु
रफी साहब नागपूरला आले असता रफीसाहेबांचे हे छायाचित्र १९७१. सोबत नागपूरचे एक गायक एम ए कादिर. या छायाचित्रातूनच अवघं व्यक्तीमत्त्व कळतं...
1 Aug 2012 - 9:59 am | प्रभाकर पेठकर
नागपूरचे गायक एम ए कादिर ह्यांच्या पायाशी दोन बाटल्या कसल्या असाव्यात? एक उभी आहे तर दुसरी चक्क लुढकलेली आहे.
1 Aug 2012 - 4:34 am | रामपुरी
खरं सांगायचं तर रफीपेक्षा किशोरकुमारचं नाव या लेखात जास्त चपखल बसलं असतं. रफीचा आवाज सगळ्या गाण्यात सारखाच वाटतो. त्याच्या आवाजातली आनंदी गीते मलातरी जवळपास ऐकवत नाहीत. त्यापेक्षा किशोरकुमार हा सगळ्या प्रकारच्या गाण्यांना चांगला न्याय देतो. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे.
3 Aug 2012 - 4:32 pm | राघव
रफीसाहेब आपले फेवरेटेस्ट आहेत.. त्यामुळे लेख आणिकच भावला..
वाचनखूण म्हणून साठवत आहे.
राघव
3 Aug 2012 - 4:50 pm | कवटी
८० च्या आधीची रफीची गाणी म्हणजे लाजवाब....
मस्त झालाय लेख.
अवांतर : मधली काही वर्ष लता मंगेशकरांनी रफी बरोबर गायला नकार दिला होता. त्याचे कारण कोणास माहित आहे का? मी ऐकले होते के रफिने लतातैंना प्रपोज केले होते म्हणून.... पण हे गॉसिप पण असू शकते... खरे कारण कोणास माहित आहे का?
3 Aug 2012 - 6:27 pm | प्रदीप
हे ऐकून मरहूम रफीसाहेब सुटकेचा निश्वास सोडतील. कारण ८० नंतरची त्यांची गाणी आपणास आवडली असे कूणीही म्हटले तर ते विपरीत ठरावे ! (८० साली ते निधन पावले).
लता- रफी वाद तात्विक होता, त्यात वैयक्तिक काही नव्हते. गाण्यांच्या रॉयल्टीत पाश्वगायकांनाही त्यांचा हिस्स्सा मिळावा ह्याकरीता लताने पुढाकार घेऊन सर्व पाश्वगायकांना एका छत्राखाली आणून प्रोड्यूसर्सशी लढा देण्याचे आव्हाहन केले होते. माझ्या माहितीप्रमाणे तिला स्वतःला रॉयल्टी अनेक प्रोड्यूसर्सनी अगोदरच देऊ केली होती, पण तिला हे सर्वच गायकांना लागू व्हावे असे वाटत होते. रफीला ह्यात यावे असे वाटेना. त्यावरून एका बैठकीत त्याचा व लताचा खटका उडाला.
मरहूम रफीसाहेब आपणांतून शारीर दृष्ट्या जावून ३२ वर्षे झाली आहेत हे वास्तव आहे. पण त्यांची गाणी माझ्यासारख्या अनेकांच्या मनात आजही अत्यंत ताजी आहेत. त्यांना माझी श्रद्धांजलि.
3 Aug 2012 - 6:51 pm | कॉमन मॅन
सुंदर लेख.. एका रसिल्या गायकाला आमची विनम्र श्रद्धांजली..!