मला गाण्यांतलं शास्त्र वगैरे काही कळत नाही. केवळ आवडतात म्हणून मी गाणी ऐकतो, वेळ मिळेल तेंव्हा, मिळेल त्या ठिकाणी. त्यामुळे प्रसिद्ध गायक-गायिकांची वा संगीतकारांची जन्मतिथी-पुण्यतिथी वगैरे मी शोधत बसत नाही. कधी कधी आंतर्जालावर बातम्या वाचतांना अचानक लक्षात असे दिवस येतात. आर डी च्या बद्दल लिहिलेल्या लेखाच्या बाबतीत असंच झालं होतं.
आज ३१ जुलैला रफीच्या ३१व्या पुण्यतिथीची बातमी वाचली. आणि आपल्या आयुष्यात सोनेरी क्षण आणणार्या या जादुगाराला पुन्हा एकदा अनुभवावं म्हणून गाणी ऐकत गेलो, ते करतांना महंमद रफी या गायकाची माणूस म्हणून ओळख करून देणारे काही किस्से आठवले, सापडले. ते किस्से, आणि मला भावलेल्या त्याच्या असंख्य गाण्यांपैकी काही गाणी इथे पेश करतो आहे. तुम्ही आस्वाद घ्याल, आणि आणखी गाणी देऊन या कलाकाराचा सन्मान कराल अशी अपेक्षा आहे.
(इथे 'रफी' असा एकेरी उल्लेख मी बर्याच ठिकाणी करतो आहे ते केवळ त्या वयातीत कलाकारावरच्या प्रेमामुळे, मला क्रिकेटची बॅट 'केवळ धरता येते; इतक्याच भांडवलावर सचिन आणि सुनील यांचा उल्लेख करतांना एकेरी वापर केला जातो तसाच :-))
बडे गु़लाम अली खान यांच्या बंधुंकडे शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेऊन महंमद रफी मुंबईच्या सिनेसृष्टीत नशीब आजमावायला निघाला तेंव्हा त्याच्या वडिलांनी विरोध न करता त्याला जाऊ दिलं, फक्त एक सल्ला दिला:
"बेटा, आदमी चाहे जितना ही उंचा क्यूं न उड ले, उसे अपने पांव ज़मींपर ही रखने पडते हैं| इसलिये कभी घमंड मत करना, किसी ग़रीब का दिल ना दुखाना, और हो सके तो कोशिश करना दुसरोंका सहारा बनने की|"
रफीने हे शब्द कायम लक्षातच ठेवले नाही तर आचरणात आणले.
त्याच्या पहिल्या गाण्यासाठी त्याने नौशाद यांच्याकडे विचारणा केली, त्यांनी आवाज कसा आहे हे पारखण्यासाठी त्याच्याकडून स्टुडिओमध्ये थोडंसं गाऊन दाखवायला सांगितलं, त्याचं शास्त्रीय संगीताची भक्कम बैठक असलेलं गाणं त्यांना आवडलं, पण त्यांनी सांगितलं की सध्या लगेच काही ते त्याला गाणं देऊ शकणार नाहीत, हवं तर 'पहेले आप' या चित्रपटाच्या एका श्याम कुमार गाणार असलेल्या गाण्यात कोरस गायक म्हणून ते संधी देऊ शकतील. रफी तयार झाला. ही १९४४ ची गोष्ट, दुसरं महायुद्ध भरात आलेलं होतं आणि मला वाटतं सैनिकांशी संबंधित असलेलं गाणं होतं, संगीतात बुटाचा ठेका नौशादना हवा होता. साऊंड मिक्सिंगसाठी एकच स्टुडिओ होता आणि तो त्या दिवशी मोकळा नव्हता. म्हणून नौशाद यांनी मुंबईच्या चोर बाजारातून बुटांचे जोड आणवले आणि सर्व गायकांना बूट घालून गायला आणि गातांना ठेका द्यायला सांगितलं. सर्वांनी त्याप्रमाणे बूट घालून गाणं म्हंटलं आणि ते रेकॉर्ड झालं. नौशादना आणि प्रोड्यूसरला गाणं आवडलं आणि रफीबरोबरच प्रत्येक कोरस गायकाला १० रुपये बिदागी मिळाली, ही रफीची पहिली कमाई. खरं तर त्याआधी स्टुडिओंची भटकंती करून रफीचे तळपाय सुजलेले होते, पण त्याने तसेच ते जड बूट घालून, ठेका देत देत आनंदाने गाणं म्हंटलं, त्याच्या पायांचं दुखणं नौशादना नंतरच कळलं.
त्या कोरस मध्ये रफी फारसा कुठे जाणवत नाही. रेकॉर्डिंगनंतर प्रोड्यूसरने एक समारंभ हॉटेल मिनर्व्हा मध्ये ठेवला होता, इतर सर्व कलाकार गेले, रफी सोडून. कारण त्याच्याकडे बस साठी पैसे नव्हते, नौशादना ते कळलं, त्यांनी पैसे देऊन त्याला यायला लावलं (५५ वर्षांनंतर २००० साली एका मुलाखतीत नौशाद यांनी ही आठवण सांगितली, पण ही प्रसिद्ध करू नका म्हणून विनंती केली होती, तरीही मेहताबउद्दीन या वार्ताहराने त्याच्या अप्रकाशित पुस्तकात ही आठवण दिली आहे, रफीने किती अवघड दिवस काढली असतील हे रसिकांना कळावे म्हणून. असे कष्टच पुढे त्यांची कारकीर्द झळाळून टाकण्यास कारणीभूत असतील.)
हिंदोसतां के हम हैं, हिंदोस्ता हमारा - पहले आप (१९४४, रफी चं नौशाद बरोबरचं पहिलं गाणं, कोरस मध्ये)
पान, सुपारी, बिडी-सिगारेट, दारू यांपैकी कशाच्याही वाटेला न गेलेला रफी. अतिशय सुसंस्कृत, मृदू, शांत आणि दातृत्ववान म्हणून त्याची सिनेसृष्टीत ओळख होती. त्याच्या न चिडण्यावरून नौशाद यांनी सांगितलेली एक गोष्ट वाचनात आली. नौशाद यांनी रफीच्या पत्नीला - बशीरा बेगमला- म्हंटलं, "आप को तो सब कुछ इतनी मीठी आवाज़ में मिलती होगी, प्यार की बातें भी और गुस्से की बातें भी|"
बशीरा बेगमने म्हंटलं, "प्यार की बातें छोड दीजिये, मगर गुस्से की बातें तो आज तक नही मिली हमें, गुस्सा तो उन को आता ही नहीं, अगर आता भी होगा तो उठके चले जाते हैं, बस उसीसे हम समझ जाते हैं|"
एकदा रोजच्या नेमाच्या सकाळच्या फिरण्यानंतर मित्राबरोबर परत फिरतांना एक गरीब माणूस आडवा आला आणि त्याने हात पुढे करून मदत मागितली. रफीने खिशात हात घालून ज्या नोटा बाहेर आल्या त्या सर्व त्या माणसाला दिल्या आणि चालू लागला.
पुढे गेल्यावर मित्र म्हणाला, "क्या आप किसी को भी बिना गिने रूपये दे देते हैं?"
त्या प्रश्नाचं केवळ रफीच देऊ शकला असता असं उत्तर होतं: "जब खुद मुझे बिन गिने रुपये दे रहा है, तो मैं उसके कुछ ज़रूरतमंद बंदोंको भला गिन कर रूपये क्यों दूं?"
रफीच्या मुलीचं लग्न ठरलं आणि साऱ्या सिनेसृष्टीला आमंत्रणं गेली. लग्न हॉटेल होरायझन मध्ये होतं. नौशाद यांनी रफीचा मेहुणा आणि सेक्रेटरी मोहम्मद झहीर याला फोन केला, "मियां, जरा रफी साहब को फोन देना!" त्यांनी फोन दिला.
"रफी साहब, क्या ये होटल आपका घर है?"
उत्तर आलं, "नही तो!"
"जनाब, लडकी जिस घर में पैदा होती है, पलती है, उसी घर से बिदा होती ही, होटल से नही!"
रफी क्षणभर शांत राहिला, म्हणाला, "आप सही कह रहे हैं, गुस्ताखी माफ किजिये, अभी बदल देता हूं!" हजारो रुपयांचं नुकसान सोसून रफी ने विवाह समारंभ आपल्या घरी आयोजित केला.
३१ जुलै १९८० रोजी हृदयविकाराच्या झटक्याने रफी गेला. त्याची अंत्ययात्रा निघाली तेंव्हा मुंबईत मुसळधार पाऊस होता. तशा पावसातही त्याचे असंख्य चाहते अंत्ययात्रेत सामील झाले. दहा हजारांहून आधिक जनसमुदाय असलेल्या मुंबईतील या अंत्ययात्रेने सगळे रेकॉर्ड ब्रेक केले. सर्व जाती-धर्मांचे आणि गरीब-श्रीमंत लोक, स्त्री-पुरुष, राजकारणी, उद्योगपती, चित्रपट कलाकार, स्टुडिओंमधील सामान्य माणसे अशा सर्वांनी रफीला मानवंदना देण्यासाठी गर्दी केली. त्याचं पार्थिव शरीर ठेवलेला ट्रक बांद्र्याच्या त्याच्या घरापासून जवळच असलेल्या जुहूच्या दफनभूमीकडे निघाला. रस्त्यात ठिकठिकाणी पार्थिवावर पुष्पवृष्टी होत होती. अखेरीला दफनभूमीपाशी शवाला खांदा देण्यासाठी रफीच्या कुटुंबियांबरोबरच राज कपूर, शम्मी कपूर, विनोद खन्ना, अमजद खान, बी आर चोप्रा ही मंडळी पुढे झाली. तशा गर्दीत चार सामान्य तरूण पुढे झाले, खांदा देण्याची विनंती करीत. रफीच्या कुटुंबियांनी आणि इतर दिग्गजांनी जनेच्छेला मान दिला आणि रफी अखेरची पावलं त्याच्या रसिकांबरोबर चालला.
आत गेल्यावर दफनविधी चालू असतांना लोक आपापल्या आठवणी एकमेकाला सांगत होते. स्वतःचे अश्रू रोखू न शकणार्या एका स्टुडिओमधल्या लिफ्टमनने त्याची आठवण सांगितली.
रफी 'नया रास्ता' या चित्रपटातील गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी स्टुडिओत आला होता. लिफ्ट मधून वर जातांना लिफ्टमनला नेहेमीप्रमाणे त्याने 'कैसे हो, भाई?" म्हणून विचारणा केली. तेंव्हा लिफ्टमनने त्याला मुलीचा विवाह ठरल्याचं पण पैशाची चणचण असल्याचं सांगितलं. गाणं पूर्ण करून रफी परत निघाला त्याने पूर्ण रक्कम असलेलं बिदागीचं पाकिट लिफ्टमनच्या हातात ठेवलं.
"जनाब, आज मेरी खूष लडकी और मै उस नेक इन्सान के लिये दुआ मांगते हैं|"
ईश्वर अल्ला तेरो नाम, सब को संमती दे भगवान - नया रास्ता
गेल्या वर्षी, इतर नव्या शवांना जागा देण्यासाठी रफीची थडगं उकरण्यात आलं. आज रफीचे चाहते भेट देतात ते तिथे उभ्या असलेल्या एका नारळाच्या झाडाला, रफीची स्मृती म्हणून.
नाही म्हणायला मुंबईत एक पाटी आहे त्याच्या नावाची एका रस्त्यावरच्या चौकात, या साध्या माणसाला इतकीही अपेक्षा नसेल जगाकडून. तो जगाला आनंद देत जगला, आपण आनंद घेत जगुयात.
मृत्यूपूर्वी दोनच दिवस रफीची शेवटची मुलाखत घेतली होती सुलतान महंमद यांनी 'शमा' या नियतकालिकासाठी. रफीच्या हॉटेल मध्ये झालेल्या मुलाखतीनंतर फोटो सेशन झालं. अतिशय मितभाषी असलेला रफी फोटोग्राफर सांगेल तशा पोझेस देऊन फोटो काढवून घेत होता. सर्व फोटो संपल्यावर हळूच रफीने विचारलं, "एक फोन के साथ फोटो हो जाये?" मग त्याने हॉटेलचा फोन कानाला लावून फोटो काढवून घेतला. फोटो प्रिंट होऊन आल्यानंतर संध्याकाळी सुलतान महंमद यांनी व त्यांच्या मुलाने रफीला ते दाखवायला आणले. फोटो चाळत असतांना त्या फोन वाल्या फोटोपाशी रफी थबकला, आणि लहान मुलाच्या निरागसतेने म्हणाला, "ये मैने खीचवायी थी! अच्छी आयी है ना?"
शेवटी, मला आवडलेली आणि या क्षणी आठवणारी काही गाणी:
आजा आजा, मैं हूं प्यार तेरा - तीसरी मंझील
दिल का भंवर करे पुकार - तेरे घर के सामने
आ जा तुझ को पुकारे मेरा प्यार - नील कमल
मांग के साथ तुम्हारा - नया दौर
सारे जमाने पे, मौसम सुहाने पे- आप आये बहार आयी
बहारों फूल बरसाओं - सूरज
चले थे साथ मिलके चलेंगे साथ मिल कर - हसीना मान जायेगी
दीवाना मुझ सा नही, इस अंबर के नीचे - तीसरी मंझील
तुम जो मिल गये हो - हंसते ज़ख़्म
दिल के झरोखोंमें तुझ को बिठाकर - ब्रम्हचारी
इक ना इक दिन ये कहानी बनेगी - गोरा और काला
तेरी प्यारी प्यारी सूरत को - ससुराल
अभी ना जाओ छोडकर - हम दोनों
न तू ज़मीं के लिये - दास्तान
मैने पूछा चांद से - अब्दुल्ला
हाय रे हाय नींद नही आये - हमजोली
जनम जनम का साथ है - तुमसे अच्छा कौन है
कोई नजराना लेकर आया हूं - आन मिलो सजना
लिखे जो खत तुझे - कन्यादान
मैं गाऊं तुम सो जाओ - ब्रम्हचारी
मस्त बहारों का मैं आशिक - फर्ज़
मेरे देस में पवन चले पुरवाई - जिगरी दोस्त
नि सुलताना रे, प्यार का मौसम आया - प्यार का मौसम
ओ हसीना ज़ुल्फों वाली - तीसरी मंझील
ये मेरा प्रेम पत्र पढ कर - संगम
भीगी भीगी रुत है - तकदीर का बादशाह (हा चित्रपट रफीच्या निधनानंतर, १९८२ साली प्रदर्शित झाला)
ये माना मेरी जां मुहब्बत सजा है, मजा इस मे इतना मगर किस लिये है - हंसते ज़ख़्म
प्रतिक्रिया
31 Jul 2011 - 12:39 pm | प्यासा
इथे 'रफी' असा एकेरी उल्लेख मी बर्याच ठिकाणी करतो आहे ते केवळ त्या वयातीत कलाकारावरच्या प्रेमामुळे, मला क्रिकेटची बॅट 'केवळ धरता येते; इतक्याच भांडवलावर सचिन आणि सुनील यांचा उल्लेख करतांना एकेरी वापर केला जातो तसाच हे पटले !!
ये दुनिया ये मेहफिल मेरे काम की नही अन पुकारता चला हुं अशी आणखी काही अवीट गाणी यात मी वाढवितो ...
31 Jul 2011 - 12:46 pm | सहज
शम्मी कपूर यांनी सांगीतलेल्या रफीसाहेबांच्या आठवणी
दुवा १, दुवा २, दुवा ३
बाकी बहुगुणी साहेब, ही एवढी एप्लेट टाकून धाग्याचे प्राण कंठाशी कशाला आणता? हा धागा दुरुस्त केल्याशिवाय मी नाही परत उघडणार.
31 Jul 2011 - 12:53 pm | तिमा
हा माणूस देवाचा माणूस, आणि म्हणूनच त्याच्या आवाजात तो १०० टक्के शुध्दपणा होता. असा कलाकार पुन्हा होणे नाही.
एक सूचना: गाण्यांचे व्हिडिओ देण्यापेक्षा फक्त लिंक द्याव्या, जेणेकरुन धागा उघडायला प्राण कंठाशी येणार नाहीत.
31 Jul 2011 - 6:13 pm | विश्वनाथ मेहेंदळे
>>एक सूचना: गाण्यांचे व्हिडिओ देण्यापेक्षा फक्त लिंक द्याव्या, जेणेकरुन धागा उघडायला प्राण कंठाशी येणार नाहीत.
व्हिडिओ एम्बेड केले तर धागा हळू हा उघडावा ? त्यामुळे काही व्हिडिओ डाऊनलोड होत नाहीत, आपण जोवर क्लिक करत नाही तोवर. लिंक देण्यापेक्षा व्हिडिओ देऊन फार फरक पडू नये असे वाटते.
जाणकारांनी जरूर वाटली तर प्रकाश वगैरे टाकावा.
31 Jul 2011 - 1:15 pm | पांथस्थ
रफी साब हम आपको ना भुला पायेंगे!
मस्त लेख.
31 Jul 2011 - 6:23 pm | पंगा
रफीसाहेबांची मराठी गाणी केवळ अविस्मरणीय.
31 Jul 2011 - 6:33 pm | नितिन थत्ते
श्रीकांत ठाकरे यांनी रफी यांच्यासह छान गाणी केली आहेत.
31 Jul 2011 - 2:50 pm | राही
आमरण,आपादमस्तक,आसेतुहिमाचल,यावच्चंद्रदिवाकरौ वगैरे वगैरे जे काय असेल ते. उषा,बजाज,क्राँप्टन जे काय असेल ते.
कारवाँ गुजर गया, हम बेखुदी में तुम को पुकारे चले गये, छू लेने दो ना़जुक होटों को,हुस्नवाले तेरा जवाब नहीं,मैं ने जीना सीख लिया, दीवाना हुआ बादल,गोरी चलो ना हंस की चाल, चाहूंगा मैं तुझे, खोया खोया चाँद,यह दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है, सुहानी रात ढल चुकी....
किती आठवणार...
त्या अजातशत्रु व्यक्तिमत्वाला सलाम.
31 Jul 2011 - 2:27 pm | अन्या दातार
हिंदोसतां के हम हैं, हिंदोस्ता हमारा - पहले आप (१९४४, रफी चं नौशाद बरोबरचं पहिलं गाणं, कोरस मध्ये)
हे जरा नवीनच होते माझ्यासाठी.
पण कोरस मधुन सेपरेटली ओळखता येण्यासारखा आवाज आपल्याला या गाण्याच्या शेवटी ऐकायला मिळेल. :)
राफा आणि रफीप्रेमी
अनिरुद्ध
31 Jul 2011 - 5:45 pm | बहुगुणी
फक्त दुवे देण्याचा प्रयत्न करणार होतो पण माझी स्व-संपादन सुविधा काढून घेतली गेलेली दिसते आहे :-( !
संपादकांपैकी कुणी मदत केली तरच ही दुरूस्ती होणं शक्य आहे, आता या क्षणी कुणी संपादक पटावर दिसत नाही.
त्रासाबद्दल क्षमस्व!
31 Jul 2011 - 7:24 pm | चिरोटा
आणखी एक् वाचलेला किस्सा होता-
साधारण १९३९/४० साली सैगलचा कार्यक्रम रफी राहत्(त्यावेळी पंजाबमध्ये) तिकडे होता. गात असताना अचानक वीज गेली आणि सैगल ह्यांचा आवाज दूरपर्यंत जाईना. मग ते गाणे त्यांनी थांबवले. मधल्यावेळेत करमणूक म्हणून कोणी तरी गाउन दाखवायची सूचना संयोजकांनी केली. श्रोत्यांमध्ये रफी,त्याचे मित्र,भाऊ होते.त्यांनी रफीला स्टेजपर्यंत ओढतच नेले आणि गायची विनंती केली. रफीने एक सैगल साहेबांचे एक गाणे म्हणून दाखवले.
सैगलने ते ऐकून म्हणाले- तूम बहोत बडे गायक बनोगे.
त्यांचे शब्द खरे झाले.
1 Aug 2011 - 4:15 am | इंटरनेटस्नेही
अतिशय माहितीपुर्ण लेख.
1 Aug 2011 - 4:32 am | रेवती
लेखन आवडले.
1 Aug 2011 - 9:04 am | प्रभो
म. रफींना माझी आदरांजली.
ही काही माझी आवडती गाणी (ड्युएट्स सकट)
१. बार बार देखो
२.बदन पे सितारे
३.एहसान होगा तेरा मुझ पर
४.ये चांद सा रोशन चेहरा
५.एक था गुल
६.अभी ना जाओ छोड कर
७.दिवाना हुआ बादल
८.कौन है हो सपनों मै आया
९.मेरे महबूब तुझे मेरी महोब्बत की कसम
१०.पूछो ना यार क्या हुआ
११.ये है बॉम्बे मेरी जान
१२.तेरे मेरे सपने - गाईड
१३.तुमसे अच्छा कौन है
१४.गुनगूना रहे हैं भवरें
१५.तेरी बिंदीया रे
१६.क्या हुआ तेरा वादा
१७.चांद मेरा दिल
आणी लास्ट बट नॉट लीस्ट १८. दर्द्-ए-दिल
2 Aug 2011 - 4:28 am | मेघवेडा
माझीही आदरांजली. माझी आवडती वर दिलेल्या लिष्टमधली सगळी. आणि तीच लिस्ट पुढे कंटिन्यू करतो - यात धाग्यात आत्तापर्यंत आलेली गाणी येऊ नयेत याची दक्षता घेतली आहे पण चुकून एखादं रिपीट झालं असल्यास दुर्लक्ष करावे! :)
१९. हुई शाम उनका खयाल आ गया
२०. तेरी आंखोंके सिवाह दुनिया में रखा क्या है?
२१. तसवीर तेरी दिल में जिस दिन से उतारी है
२२. धीरे धीरे चल चाँद गगन में
२३. देखो कसम से कसम से कहते हैं तुमसे हाँ (मस्त मूड रिफ्रेश करणारं गाणं - माझं पर्सनल फेव्हरिट टॉप टेन वगैरे!)
२४. सर पर टोपी लाल हाथ में रेशम का रूमाल हो तेरा क्या केहना
२५. यूं तो हमने लाख हंसीं देखे है, तुमसा नही देखा
२६. उडे जब जब झुल्फें तेरी
२७. इशारों इशारों मे दिल लेनेवाले
२८. अकेले हैं चले आओ जहाँ हो
२९. मै जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं मे उडाता चला गया - (अजून एक पर्सनल टॉप टेन वगैरे!)
३०. जिया हो.. जिया हो जिया कुछ बोल दो
३१. छलकाये जाम, आईये आपकी आँखों के नाम, होठोंके नाम
३२. छू लेने दो नाजुक होटोंको
३३. दिल की आवाज भी सुन
३४. पर्दा जरा हटाओ तो फिर कोई बात हो
३५. तू इस तरह से मेरी जिंदगी में शामिल है
३६. खोया खोया चाँद
३७. चलो दिलदार चलो चाँद के पार चलो
आणखी बरीच आहेत..
बाकी अशा प्रतिभावंत मंडळींबद्दल आपण पामर काय बोलणार.. गाणी ऐकायची आणि आनंद लुटायचा झालं. धागा मस्तच हां बहुगुणी! हे ब्येष्टं केलंत एकदम!
1 Aug 2011 - 1:21 pm | विजुभाऊ
माझे आवडते गाणे
रिमझीम के तराने लेके आई बरसात
अच्छा जी मै हारी चलो मान जाऑ ना
1 Aug 2011 - 5:52 pm | बहुगुणी
रिमझीम के तराने लेके आई बरसात: http://www.youtube.com/watch?v=DRebkTpMmRs
अच्छा जी मै हारी चलो मान जाओ ना: http://www.youtube.com/watch?v=g2rFmmdUIbQ&ob=av3e
1 Aug 2011 - 1:37 pm | स्मिता.
रफी... कोणताही मूड असो, रफीची गाणी त्यात अगदी फिट्ट बसतात. माझाही ऑल टाईम फेवरेट गायक! लेख छानच हे वे सां न.
या माणसाने गाणी गायली ती गाण्यांच्या अर्थात शिरून. काही ठरावीक शब्दांवर दिलेला जोर किंवा दिलेला किंचितसा हेल गाण्याला जादुई करून टाकतो. कधी कधी तर मी अश्या एखाद्या गाण्याच्या तुकड्याकरता एखादे गाणे वारंवार ऐकते.
1 Aug 2011 - 3:12 pm | मुलूखावेगळी
माझ्या आवडीची रफींची गाणी
१. गुलाबी आंखे जो तेरी
२.तेरे मेरे सपने
३.कौन है जो सपने मे आया
४.अब तुम्हारे हवाले वतन
५.क्या हुआ तेरा वादा
६.चांद मेरा दिल
७.लिखे जो खत तुझे
८.तुम जो मिल गये हो
1 Aug 2011 - 6:02 pm | बहुगुणी
धागा शक्य तेवढा One stop reference व्हावा म्हणून दुवे इथे देतो आहे:
१. गुलाबी आंखे जो तेरी: http://www.youtube.com/watch?v=ezVzSxthVW0
२.तेरे मेरे सपने: http://www.youtube.com/watch?v=27ASuBNWBQQ&ob=av3e
३.कौन है जो सपने मे आया: http://www.youtube.com/watch?v=jN5lLXMYiYM
४.अब तुम्हारे हवाले वतन: http://www.youtube.com/watch?v=kvSeGR-qcz0
माझं खूप आवडतं गाणं. देशावर जीव ओवाळून टाकणार्या सैनिकांवरचे असे चित्रपट आणि गाणी पुन्हा होतील अशी अजूनही आशा बाळगून आहे...
५.क्या हुआ तेरा वादा: हा दुवा इतरत्र दिला आहे
६.चांद मेरा दिल: http://www.youtube.com/watch?v=BEJJNaZ7RhQ
७.लिखे जो खत तुझे: हाही दुवा इतरत्र दिला आहे
८.तुम जो मिल गये हो: हाही दुवा इतरत्र दिला आहे
1 Aug 2011 - 3:30 pm | मराठी_माणूस
लेख आवडला
रफीची काही आवडती गाणी
१)मै ये सोचकर तेरे दरसे उठा था
२)कभी खुद पे कभी हालात पे रोना आया
३)हमने तो दिल को आपके कदमो पे रख दिया (मस्त सोलो व्हायोलीन ओब्लिगेटो)
४)एक हंसी शाम को दिल मेरा खो गया
५)पाँव छु लेने दो फुलो को इनायत होगी
६)फिर वो भुलीसी याद आई है
७)रंग और नुर की बारात किसे पेश करु (अप्रतीम व्हायोलीन्स )
८)सुबह न आयी शाम न आयी
९)दिल की तमन्ना थे मस्ती मे
१०))गाईड मधील सर्व गाणी
1 Aug 2011 - 5:48 pm | बहुगुणी
इथेच आनंद मिळावा म्हणून दुवे देतो आहे:
१)मै ये सोचकर तेरे दरसे उठा था: http://www.youtube.com/watch?v=6p6VvdCuxJM
२)कभी खुद पे कभी हालात पे रोना आया: http://www.youtube.com/watch?v=XnHmqhkBcCU
३)हमने तो दिल को आपके कदमो पे रख दिया (मस्त सोलो व्हायोलीन ओब्लिगेटो): http://www.youtube.com/watch?v=EiwtPdDELpo - हे गाणं मूळ चित्रपटात कुठे आहे ते सापडलं नाही, कुणाला यू ट्यूब चा दुवा माहित असेल तर तो द्या
४)एक हंसी शाम को दिल मेरा खो गया: http://www.youtube.com/watch?v=hQ6HpFjYWTo
५)पाँव छु लेने दो फुलो को इनायत होगी: http://www.youtube.com/watch?v=WFvw_ZlxzQI
६)फिर वो भुलीसी याद आई है: http://www.youtube.com/watch?v=aV-IgetEalg
७)रंग और नुर की बारात किसे पेश करु (अप्रतीम व्हायोलीन्स ): http://www.youtube.com/watch?v=z4t3IQx5U_A
८)सुबह न आयी शाम न आयी: http://www.youtube.com/watch?v=4pTMQoHuDGs
९)दिल की तमन्ना थे मस्ती मे: http://www.youtube.com/watch?v=mgsPCjE5ZpA
1 Aug 2011 - 3:57 pm | साधा_सरळ
खरं तर रफीची आवडणारी सगळी गाणी नमूद करणे अवघड आहे, पण माझ्या आवडीची काही...
रफी गायक म्हणून श्रेष्ठ की माणूस म्हणून? सांगता येणार नाही...
कित्येक नवोदित संगीतकारांबरोबर / नवख्या (आणि/वा ठोकळ्या) नायकांसाठी / चरित्र अभिनेत्यांसाठी गाणी गाऊन रफीने त्यांनाही ओळख मिळवून दिली...
धन्यवाद रफीसाब - कित्येक अजरामर गाणी गाऊन आणि कित्येक गाणी अजरामर करून तुम्ही गेलात! आता आमचं काम एकच - ती सगळी शोधून त्यांचा रस घेणे!
1 Aug 2011 - 4:08 pm | गणपा
दर्द भर्या गाण्यांत रफीला तोड नाही.
बरीच आवडती गाणी आधीच आली आहेत.
रफीने गायलेली माझी काही आवडती गाणी.
हापिसातुन दुवे देता येत नाही. :(
१) आज पुरानी राहोसे कोई मुझे आवाज ना दे........ आदमी (१९६८)
२) ओ दुनियाँ के रखवाले..... बैजु बावरा (१९५२)
३) सुहानी रात ढल चुकी.... दुलारी (१९४९)
४) आज की रात मेरे दिल की सलामी ले ले ..... राम और श्याम (१९६७)
५) मेरे मेहबुब तुझे मेरी मुहोब्बत की कसम.... मेरे मेहबुब (१९६३)
६) बहारों फुल बरसाओ.... सुरज (१९६८)
७) एहसान होगा तेरा मुझपर दिल केहता है वो केहेने दो....जंगली (१९६१)
८) क्या हुवा तेरा वादा... हम किसी से कम नही (१९७७)
९) जो बात तुझमे है तेरी तस्वीर मे नही... ताज महल (१९६३)
१०) लिख्खे जो खत तुझे.... कन्यादान (१९६९)
११) आजा तुझको पुकारे मेरे गीत रे... गीत (१९७०)
१२) परदेसीयोंसे ना अखियाँ मिलाना.... जब जब फुल खिलें (१९६५)
यादी बरीच मोठी आहे सध्या इथेच आवरते घेतो.
1 Aug 2011 - 5:34 pm | बहुगुणी
१) आज पुरानी राहोसे कोई मुझे आवाज ना दे........ आदमी (१९६८): http://www.youtube.com/watch?v=ZPtUf2OSzAo
२) ओ दुनियाँ के रखवाले..... बैजु बावरा (१९५२): http://www.youtube.com/watch?v=FIZ3EHG15co
३) सुहानी रात ढल चुकी.... दुलारी (१९४९): http://www.youtube.com/watch?v=7LjF6yjrgYU
४) आज की रात मेरे दिल की सलामी ले ले ..... राम और श्याम (१९६७): http://www.youtube.com/watch?v=eUZkTcjGhIM
५) मेरे मेहबुब तुझे मेरी मुहोब्बत की कसम.... मेरे मेहबुब (१९६३): http://www.youtube.com/watch?v=kJ3DwFWhQuE&feature=related
६) बहारों फुल बरसाओ.... सुरज (१९६८): वर आलेलं आहे हे गाणं
७) एहसान होगा तेरा मुझपर दिल केहता है वो केहेने दो....जंगली (१९६१): http://www.youtube.com/watch?v=oBBKIPsA55k
८) क्या हुवा तेरा वादा... हम किसी से कम नही (१९७७): http://www.youtube.com/watch?v=gvgBcKgZVm4
९) जो बात तुझमे है तेरी तस्वीर मे नही... ताज महल (१९६३): http://www.youtube.com/watch?v=U5kuatik-tM&feature=fvst
१०) लिख्खे जो खत तुझे.... कन्यादान (१९६९): http://www.youtube.com/watch?v=SyGEp7XqbDE
११) आजा तुझको पुकारे मेरे गीत रे... गीत (१९७०): http://www.youtube.com/watch?v=Lm47gDG5Ygw&feature=fvst
१२) परदेसीयोंसे ना अखियाँ मिलाना.... जब जब फुल खिलें (१९६५): http://www.youtube.com/watch?v=Hs9us0xln-M&ob=av3e
1 Aug 2011 - 6:54 pm | गणपा
हे ब्येस केलत बहुगुणी.
हा धागा वाचन खुणेत साठवला गेल्या आहे. :)
1 Aug 2011 - 7:35 pm | मुलूखावेगळी
+१
1 Aug 2011 - 7:22 pm | प्राजु
चौधवी का चांद हो..... हे एक अप्रतिम गाणे..
बहुगुणी, धागा अप्रतिम आहे... खूप छान.
2 Aug 2011 - 1:50 am | बहुगुणी
चौदहवी का चांद हो
1 Aug 2011 - 9:09 pm | नितिन थत्ते
१ दिल जो न कह सका - भीगी रात - रोशन
२ जिंदगीभर नही भूलेगी वो बरसात की रात - बरसात की रात - रोशन
३ तुमने मुझे देखा हो कर मेहरबाँ - तीसरी मंजिल - आर डी
४ याद ना जाये - दिल एक मंदिर - शंकर जयकिशन
५ तुम मुझे यूं भुला ना पाओगे - पगला कही का - शंकर जयकिशन
वरील गाणि पाहताना भारत भूषण, प्रदीप कुमार यांना पहावे लागेल. :( त्याला नाईलाज आहे. ;)
2 Aug 2011 - 2:42 pm | ज्ञानोबाचे पैजार
आमच्या या अतिशय आवडत्या कलाकाराला मानाचा मुजरा.
रफी साहेबांचे मराठी मधे योगदान काही कमी नाही.
- प्रभु तु दयाळु कॄपावंत दाता
- हे मना आज कोणी बघ तुला साद घाली
- शोधिसी मानवा राउळी मंदीरी
- हा रुसवा सोड सखी
याशिवाय हिंदी मधली त्यांनी गायलेली भजने जसे की,
- मन तडपत हरी दरशन को आज
- ओ दुनीया के रखवाले
- बडी देर भयी नंदलाला
-आना हो तो आ
- ईन्साफ का मंदीर है ये
- सुख के सब साथी
आणि बरीच काही
25 Jun 2012 - 3:40 pm | इनिगोय
आईशप्पत! मिपा म्हणजे काय आहे? वाट्टेल त्या विषयावरच्या माहितीचा खजिना!!
कोणत्याही चलनात मोल करता येणार नाही अशी या कलाकाराची कला आणि तेवढंच त्याच्या चाहत्यांचं त्याच्यावरचं प्रेम!...
आणि तितकाच अप्रतिम असा हा लेख, वा..!