थेकडीला पोचलो आणि विश्रामगृहात येउन थडकलो. प्रवेशद्वारानजीक एका दरवाजावर कसलीशी सूचना डकवली होती. बघतो तर काय, तिथे उतरलेल्यांसाठी सूचना होती. आजच्या तारखेला स्थानिक लोकांनी जमिनीसंबंधी काही वादा निमित्त एक दिवस बंद चे आवाहन केले होते आणि ते लक्षात घेता तिथे उतरलेल्या मंडळींपैकी कुणी बाहेर जायचा कार्यक्रम ठेवु नये अशी ती सूचना होती. आम्ही फारच सुदैवी, रस्त्यात कुठेही अडथळा न येता सुखरूप आलो. तरीच येताना अनेक गावात दुकाने बंद दिसली. मात्र दुपारी दुकाने बंद ठेवत असतील असा आमचा समज झाला होता. अर्थात त्यामुळे आम्हाला रस्त्यात फारशी रहदारी लागली नाही हे बरेच झाले. सगळ्यांना भूका लागल्या होत्या. सामान स्वागत कक्षात ठेवून आम्ही थेट जेवणा कडे धाव घेतली. तीन वाजायला आले होते, जेवण संपले तर पंचाईत.
पोटे भरल्यावर मंडळी जरा सुखावली आणि सुस्तावली. संध्याकाळी जवळच एक पायी फेरफटका मारायचा असे ठरले. दुसर्या दिवशी काय कार्यक्रम करावा हे ठरवायला आम्ही प्रवास कक्षात पोचलो. सकाळी साडेसातला बोटीने दिड तासाचा पेरियार अभयारण्याचा फेरफटका सर्वानुमते निश्चित करंण्यात आला. मात्र आम्हाला सांगितले गेले की सध्या प्रवासी मोसम भरात आहे त्यामुळे जर साडेसातची तिकिटे हवी असतील तर सहाला तिथे पोचले पाहिजे. अरे देवा! म्हणजे साडेपाचला तरी उठायला हवे. अखेर इतके आलो आहोत तर जाऊया असे ठरले. मग आम्ही आमच्या विश्रामगृहाच्या परिसरात फेरफटका मारला. परिसर रमणीय होता. मुळात उंच इमारत आणि त्यात खोल्या असा प्रकार नसून प्रत्येक कुटुंबाला स्वतंत्र कुटी होत्या. पक्के कॉंक्रिटचे बांधकाम मात्र छप्पराला गवत व झावळ्यांनी शाकारुन एक वेगळेच रूप दिले होते.
सगळ्या कुटी पहिल्या मजल्याच्या उंचीवर. चढुन जायला आठ दहा पायर्यांचा छोटेखानी जीना. बाहेर भला मोठा वरांडा आणि बाक, चहाचे टेबल व खुर्ची. आजुबाजुला भरपूर झाडे होती. मोठ्या झाडांच्या बुंध्यांना झुले बांधलेले होते. सामान आपापल्या घरात ठेवुन सर्वांनी कपडे बदलले व ताणुन दिली. सहा-साडेसहाला आम्ही चहाला जमलो. हळु हळु दिवस अस्ताला चालला होता. आम्ही सूर्यास्त दिसेल असे ठिकाण जवळपास आहे का अशी चौकशी केली होती मात्र तितके जवळ असे ठिकाण नव्हते. चहा घेत असताना एकीकडे कुठल्याश्या पक्षाचा आवाज सुरु झाला. फार मोठा नाही पण शांततेला चिरुन जाणारा. एखादे यंत्र सुरू व्हावे तसा र्रॅंव र्रॅंव असा हळूहळू गतिमान होत जाणारा आवाज टिपेला पोचायचा आणि क्षणात पुन्हा चढला तसा कमी होत जायचा. मात्र हा पक्षी एकटा नव्हता. रिले रेस प्रमाणे पहिला जिथे थांबेल तिथे दुसऱ्याचे सुरू व्हायचे. मग जरा पत्ते झाले. घरात गेल्यावर उगाच टीव्ही बघत न जागता जरा लवकर झोपायचे ठरले. उद्या सकाळी लवकर उठायचे होते.
म्हणता म्हणता निघेपर्यंत साडेसहा झाले. प्रथम अभयारण्याचे प्रवेशद्वार गाठुन प्रवेशाचे तिकिट घ्यायचे होते. मग नदीकाठी गेल्यावर तिथे बोटीचे तिकिट मिळणार होते. जरासे अंतर गेल्यावर गाड्या व बसेसची लांब रांग दिसली. बोंबला! गपचुप खाली उतरलो आणि तिकिट घराकडे गेलो. अचानक तिकिटविक्री सुरु झाली व वाहने हलु लागली. एकदाचे तिकिट मिळाले. तोपर्यंत आमची रांगेत खोळंबलेली गाडी गेटावर आली. लगबगीने आंत शिरलो आणि अभयारण्याच्या दिशेने गाडी निघाली. आंत अडीच एक किमी अंतरावर गाड्यांचा थांबा केला होता, त्यापुढे जंगलात जाण्यास गाड्यांना मनाई होती. मग अम्ही पाय उतार झालो. एकुण उसळलेली गर्दी पाहताच आम्ही समजुन चुकलो की प्रवेशाचे तिकिट मिळाले असले तरी बोटीचे तिकिट मिळणे अशक्य आहे. त्यातल्या त्यात प्रयत्न म्हणुन मी आणि माझा मुलगा लगबगीने पुढे गेलो पण अंदाजानुसार साडेसातच्या फेरीची तिकिटे संपली होती. दहाला दुसरी फेरी होती, पण इतक्या उशीरा बोटीने जाण्यात मजा नाही. नदी काठी प्राणी सकाळी आढळतात व दिवस चढु लागताच ते आत जंगलात गायब होतात. शिवाय सकाळपासुन उठुन बसलेले आणि फक्त चहावर बाहेर पडलेले आम्ही रिकाम्या पोटी, अंघोळही केलेली नाही असे तिथे ताटकळणे शक्य नव्हते. जंगलाचे आवार पाहुन गुमान परत फिरलो. शनिवार रविवार प्रेक्षणिय स्थळ पाहायला जाऊ नये हेच खरे. बाहेरगावच्या पर्यटकांबरोबर स्थानिक पर्यटकही मोठ्या संख्येने येतात, मागे म्हैसुरला आमचा असाच पोपट झाला होता.
आम्ही घरी परतलो. मात्र अनायसे सगळे लोळणे सोडुन उठलेच आहेत तर परत गेल्यावर अंघोळी व नाश्ता पटकन उरकुन भटकायला बाहेर पडायचे ठरले. सजीने मसाल्याच्या वाड्या पाहायचा प्रस्ताव मांडला व तो एकमताने संमत झाला. थेकडीपासून अगदी जवळ म्हणजे गाडीने अवघ्या दहा मिनिटांवर कुमळी हे मसाल्यांसाठी सुप्रसिद्ध असलेले गांव आहे. पर्यटन संस्थांच्या भाषेत ’क्युमिली - द स्पाईस विलेज’. कोचिन मुक्कामी मला भेटायला आलेल्या माझ्या मल्लु सहकार्यांनी काही खास सूचना केल्या होत्या, त्यातली एक म्हणजे कुठल्याही मसाल्याच्या बागेत मसाल्याचे पदार्थ खरेदी न करण्याचे. मसाल्याचे पदार्थ वाटेतल्या दुकानात अधिक स्वस्त मिळतात व ते आजुबाजुच्या मळ्यांतलेच असतात. खरोखरच कुमळीची बाजारपेठ मसाल्याच्या दुकानांनी गजबजली होती. एकंदरीत मळ्यात मसाले घेणे म्हणजे पेण हुन येताना रस्त्याच्या कडेला असलेल्या तथाकथित मळ्यातल्या भाज्या विकणाऱ्या टपर्यांवरुन भाजी घेण्यासारखे होते. ही भाजी ए पी एम सी बाजारातुन आणलेली असते, सगळ्याच भाजा काही बाजुच्या गावांत होत नाहीत. वर गाडीतले गिर्हाईक आले म्हणजे भाव चढेच असणार. सजी आम्हाला त्याच्या परिचयाच्या अशा एका मळ्यात घेऊन गेला, त्या मळ्याचे नाव ग्रीन व्हॅली. या सर्व मळ्य़ांची रचना सारखीच असते. मुख्य बागाईत आत असते, बाहेर एक प्रतिकात्मक लागवड असते जिथे सर्व मसल्याची झाडे पाहायला मिळतात. ग्रीन व्हॅली मळ्याच्या दारातच मालकिणीने स्वागत केले, आमची नाव नोंदवुन प्रवेश मूल्य वसूल केले - माणशी शंभर रुपये. इथुन पुढे जॉन नामे एका वल्लीने आमचा ताबा घेतला. मळा अर्थातच सपाटीच्या जमिनीवर नव्हता तर उतरणीला होता. पहिल्या दोन पायर्या उतरताच मी समोर लटकलेल्या व रस्त्यात लोंबणाऱ्या वेलीवरच्या फुलाचा फोटो घ्यायला कॅमेरा सरसावला. जॉनने मला थांबवले. ’ह्या फुलाचा फोटो असा काढण्यात मजा नाही; या फुलाला लेडीज शू म्हणतात’ असे सांगत जॉनने ते फुल फिरवले आणि बोटात धरुन म्हणाला ’ हां, आता घ्या असा फोटो’.
हे जॉन प्रकरण जरा अवघडच होते. त्याने सांगितलेली माहिती प्रत्येकाने लक्षपूर्वक ऐकावी असा त्याचा आग्रह होता. त्याने तुळस या विषयावर दहा मिनिटे व्याख्यान दिले, व ते अखेर ’तुळशीचा काढा किती उपयुक्त व तो कसा करावा’ याने संपले. चिरंजीवांनी आजुबाजुच्या कुणाला मराठी समजत नाही असे खातरजमा करुन मराठीत ओरडुन सांगितले, ’जॉन सकाळीच काढा घेऊन आला आहे’. पुढे जॉनच्या जवळ जाताच येणार्या सुगंधाने ते खरे असल्याचे समजले. तुळस, वाताहारी, घायपात, हाडमोडी, इन्शुलिन, टिंक्चर अशा नाना औषधी वनस्पती पाहायला मिळाल्या. मसाल्याची झाडे म्हणजे लवंग, दालचिनी, वेलची, मिरी, कोको वगैरे मुबलक होती. वर सावली धरायला उंच व फळांनी लगडलेली फणसाची झाडेही होतीच. फणसांच्या आठळ्यांचा एक नवा उपयोग समजला - ’टाल्कम पावडर’ करण्यासाठी. जॉनचे धावते समालोचन व माहिती सुरुच होते. कोकोचे फळ दाखवित त्याने सांगितले की रोज कपभर उन दुधात एक चमचा लोणी व एक चमचा कोको घालुन पिणे आरोग्याला उत्तम. इन्शुलिनच्या झाडाविषयी त्याने असे सांगितले की या झाडाची पाने खाऊन मधुमेह बरा होतो हे चुकीचे आहे मात्र, इथे मिळणारी इन्शुलिनची पूड डॉक्टरच्या औषधांबरोबर दिड महिना सातत्याने घेतल्यास मधुमेहावर काबु मिळवता येतो. मग चेहेऱ्याच्या मुरुमांपसून ते सांधेदुखीपर्यंत अनेक रोगांवरची औषधे ऐकायला मिळाली.
वातहारी
टिंक्चर
लवंग
इन्शुलिन
वेलची
या सर्व मसाल्यावर सावली धरायला दाट पानांची झाडी होती. प्रखर सूर्यप्रकाशात या पानांची हिरवी गर्दी झकास दिसत होती.
मळ्याचा मालक शौकिन असावा. त्याने काही पक्षी पाळले होते. पैकी मैनेच्या पिंजऱ्याजवळ जात जॉन म्हणाला ’मोठा हुषार पक्षी. माणसागत शब्द बोलतो व हसतो देखिल’. मघाशी जॉनच्या मुखाचा मंद सुगंध अनुभवल्याने आम्ही ते मनावर घेतले नाही. मात्र जॉन मागे हटायला तयार नव्हता. त्याने मैनेला हाका मारल्या, शिट्टी घातली, नाना मनधरण्या केल्या पण ती मैना काही ऐकेना. आम्ही एकमेकांकडे पाहुन मिश्किलपणे हसत होतो. आम्ही त्याची समजूत घातली, ’जॉन, जाउ दे. होत अस कधी कधी. आम्ही जायला परत फिरलो आणि मागुन आवाज आला ’बायबाय’. आम्ही चाट पडलो. मागे वळुन पाहता पाहता हलक्या हसण्याचा आवाज आला हहहह...ती मैना बेरकीपणे आमच्याकडे बघत होती. आता चकित व्हायची वेळ आमच्यावर आली होती.
मसाला पर्यटन संपले तर जेमतेम साडेबारा झाले होते. नाश्ता भरपूर झाल्याने जेवायची घाई नव्हती. सजीने गाडी हत्तीशाळेकडे घेतली. इथे हत्तींबरोबर फोटो, हत्तीवर सफर, हत्तींची अंघोळ, ह्त्तींचे भोजन वगैरे अनेक प्रकार होते. मग हत्तींवर बसून अर्ध्या तासाचा फेरफटका झाला. या हत्तीशाळेच्या परिसरात देखील वेलदोडे, कॉफी मुबलक दिसत होते.
फेरी मारुन झाल्यावर हत्तींसह फोटो व मग हत्तींची सोंड उंचावुन सलामी आणि डोक्यावर सोंड ठेवुन आशीर्वाद घेण्याचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाची वेळ आणि प्रकारानुसार माणशी साडेतीनशे ते १२०० असे दर होते. दुपारे भरपेट जेवण झाल्यावर झोपायच्या आधी उद्या काय यावर चर्चा झाली. दुसर्या दिवशी तर रविवार होता म्हणजे लवकर जाउनही बोटीची तिकिटे मिळायची शक्यता कमीच, अगदी नगण्य. मग आम्ही ठरविले की इतक्या कोलाहलात त्या बोटीने गेलो तरी काही वन्य प्राणी दिसणे कठिण आहे, असलेले पळुन जातील. मग आम्ही तीन तासाचा ’पेरियार निसर्ग भ्रमण’ हा कार्यक्रम घ्यायचे ठरविले. सजी तत्परतेने आम्हाला वनखात्याच्या कचेरीत घेऊन गेला. साधारण ५ ते सहा जणांच्या गटाबरोबर एक वनरक्षक येतो आणि तो तीन तास जंगलात फिरवुन आणतो. आकार माणशी दोनशे रुपये. तिकिटे काढुन आलो आणि मस्त ताणुन दिली.
संध्याकाळी कलारी पायट्टु म्हणजे केरळातील पारंपारीक युद्धकलेचा खेळ पाहिला. पहिल्या मजल्यावर चोहोबाजुंनी खुर्च्या लावुन प्रेक्षागार तयार केले होते. मधोमध दहा फूट खोल लाल मातीचा आखाडा होता. कलारीपायट्टु ही केरळाची पिढ्यानपिढ्या चालत आलेली युद्धकला. यात सशस्त्र आणि नि:शस्त्र असे दोन्ही युद्धप्रकार असतात. स्वसंरक्षण आणि आक्रमण अशी दोन्ही अंगे असतात. कमरेला बांधलेल्या लाल लांब उपरणे वजा कपड्याने सशस्त्र शत्रुला मात देणे, विषम शस्त्र संग्राम, कवायती-कसरती आणि चापल्याची अनेक प्रात्यक्षिके या खेळात असतात. सुमारे एक तास हा खेळ चालतो.
कलारीपायट्टु पाहुन झाल्यावर थोडावेळ कुमळी गावात जरा बाजारात फेरफटका मारला. बाजारातुन जाणाऱ्या रस्त्याने दहा-पंधरा मिमिटे चालत गेले की समोर तामिळनाडुची हद्द लागते. तिथुन परत फिरलो आणि चिप्स व घरगुती चॉकलेट्सचा स्वाद घेत घरी आलो.
प्रतिक्रिया
24 Jul 2012 - 10:51 pm | अत्रुप्त आत्मा
--^--^--^--
केवळ अप्रतिम
25 Jul 2012 - 4:44 am | किसन शिंदे
जबरा!!
तो टिंक्चरचा फोटो लय आवडला.
25 Jul 2012 - 6:27 am | सहज
सिंब्ळी ग्रेट फोटोस साऽर.
विश्रामगृह छान दिसतेय.
25 Jul 2012 - 8:07 am | ५० फक्त
मस्त मस्त मस्त ओ, धन्यवाद.
25 Jul 2012 - 8:49 am | प्रचेतस
अतिशय सुंदर फोटो व सुरेख वर्णन.
पुभाप्र.
25 Jul 2012 - 9:11 am | इरसाल
मस्त एकदम.आवडले.फोटोतर अप्रतिम.
25 Jul 2012 - 10:56 am | पियुशा
लेडिज शुज चा फोटु आवडला :)
अन बोलणारी मैना ,तिचा फोटो का नै टाकला वो ?
25 Jul 2012 - 1:58 pm | झकासराव
मस्तच. :)
टिन्क्चरचा फोटो जबरदस्त ..
25 Jul 2012 - 3:53 pm | कपिलमुनी
फोटू आवडले
25 Jul 2012 - 4:18 pm | पिंगू
सही, फोटु आवडले.
बाकी ते इन्शुलीनचं झुडुप म्हणजे मला तरी गुडमार वाटलं. अधिक माहितीसाठी प्रासबुवांना विचारा..
25 Jul 2012 - 5:00 pm | मदनबाण
मस्त फोटोज ! :)
(मसाला प्रेमी) ;)