सुवर्णक्षण

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in जनातलं, मनातलं
17 Jul 2012 - 2:09 pm

मागल्या शनिवारी अर्थात ७ जुलैला आमचे नित्याचेच उद्योग चालू होते. त्यातच ऐन दुपारी मोबाइलने मान टाकली आणि तो दुरुस्तीला द्यावा लागला. रात्री मोबाइल ताब्यात घेतला आणि घराकडे कूच केली. साधारण रात्री १०.३० च्या सुमाराला मिस कॉल अ‍ॅलर्ट मिळाला की 'हे नराधमा तुला एकूण ३१ मिस कॉल येऊन गेलेले आहेत.' येवढी कोणा कोणाला बॉ माझी आस लागली आहे, असा विचार करून एकेका मिस कॉलला डायल करायला सुरुवात केली. पहिला फोन लावला तो आमचे मित्र कीर्तिकुमार ह्यांना मुंबईला.

'काय रे फोन करत होतास का ? माझा डब्बा दुरुस्तीला दिला होता, आत्ता चालू केला आहे.'

"प्रसाद, अरे किती फोन लावायचे तुला? तुला उद्या मातोश्रीला जायचे आहे, तुझ्या प्रकाशनाच्या पुस्तकाचे बाळासाहेबांच्या हस्ते उद्घाटन आहे,"

पुढे तो काय काय बोलला हे मला अजूनही आठवत नाही. आ.श्री. दिवाकर रावते ह्यांच्या 'मी मंत्रालय बोलतोय..' ह्या पुस्तकाचा मी प्रकाशक असल्याने त्या पुस्तकाच्या उद्घाटनाला मी हजर राहायलाच हवे आहे येवढेच माझ्या डोक्यात शिरले. काही वेळाने डोके काम करायला लागल्यावरती पुन्हा एकदा फोना फोनी करून ही गंमत नसल्याची खातरजमा करून घेतली. अर्थात त्या क्षणानंतर जी धाकधूक आणि काहीशी विचित्र मन:स्थिती होती तिचे वर्णन करणे खरेतर अशक्यच आहे. सकाळी ११ च्या सुमाराला समारंभ असल्याने पहाटेच मुंबईला निघणे आवश्यक होते. मन अजूनही खात्री देत नव्हतेच. अशातच श्रावण मोडकांना फोन करून त्यांच्या कानावरती बातमी घातली आणि कौतुकाचे चार बोल ऐकून घेतले.

सकाळी शिवनेरीने थेट दादर गाठले. मातोश्री परिसरातला बंदोबस्त पाहून हबकलोच. अहो एक चिलखती गाडी देखील तिथे उभी होती. श्री. दिवाकर रावतेंनी आमची नावे आधीच देऊन ठेवली असल्याने, आणि स्वतः ते देखील उपस्थित असल्याने चौकशी टळली, मात्र सलग तीन ठिकाणी तपासणीला सामोरे जावेच लागले. एकेक तपासणी नाका पार करत एकदाचे मातोश्री मध्ये प्रवेशकर्ते झालो आणि पुन्हा एकदा मातोश्रीच्या अंगणात तपासणीला सामोरे जावे लागले. पायर्‍या चढून मातोश्रीत शिरलो आणि कसेतरी दाबून धरलेले दडपण पुन्हा एकदा उसळी मारून वरती आले. आजूबाजूचे काय बोलत आहेत, काय विचारत आहेत हे देखील पटकन कळत नव्हते. हॉल मधून आत शिरताच लक्ष वेधून घेते ते माँ साहेब आणि बाळासाहेबांचे फुलसाईझ भव्य चित्र. जणू दोघे समोरच उभे आहेत असा सतत भास होतो. काही वेळाने 'साहेब आले आहेत, वरती बोलावले आहे. पण फक्त पाच जणांनीच चला' असा निरोप आला आणि आम्ही लिफ्ट मधून वरच्या मजल्यावरती पोचलो.

लिफ्टमधून बाहेर आलो तर समोरच्या जिन्यात साध्याश्या टीशर्ट आणि पँट मध्ये श्री. उद्धव ठाकरे उभे होते. त्यांना मी ओळखलेच नाही, इतक्या साधेपणाने ते तिथे वावरत होते. सगळ्यात पुढे श्री. दिवाकर रावते, त्यानंतर सामना, नवाकाळचे दोन पत्रकार, फोटोग्राफर आणि सगळ्यात मागे थांबलेलो मी. रावते साहेब आत गेले तेव्हा आम्ही बाहेरच थांबलो होतो. सगळ्यात शेवटी जावे आणि शक्यतो मागेच थांबावे अशा विचारता मी असतानाच आतून 'ताम्हनकर, या आत या' असा आवाज आला आणि आपोआप मोकळी झालेली वाट तुडवत मी साहेबांच्या बैठकीच्या खोलीत प्रवेश केला. आजवर फक्त न्यूज चॅनलमध्येच ही खोली पाहिली होती. खोली कसली, मस्त मोठा हॉल आहे तो. हॉल डाव्या हाताच्या भिंतीजवळ त्यांच्या नेहमीच्या खुर्ची वरती साहेब बसले होते. इतका मोठा हॉल तो, पण बाळासाहेबांच्या नुसत्या उपस्थितीनेच भरल्यासारखा वाटत होता. आत गेल्यानंतर काही वेळाने हा हॉल नुसता भरलेलाच नसून भारलेला देखील आहे हे जाणवले.

आत शिरल्या शिरल्याच मा. बाळासाहेबांनी 'ए कोणी वाकून नमस्कार वगैरे करू नका बरं का. मला अजिबात आवडत नाही ते' असा खणखणीत आदेशच दिला. एका हाताच्या अंतरावरून त्या हिंदूहृदयसम्राटाला बघताना आणि तो गरजता आवाज ऐकताना असे काही रोमांच उभे राहिले म्हणून सांगू.. अंग चोरतच कसा तरी मी साहेबांच्या डाव्या हाताला उभा राहिलो. सोबत आणलेला पुष्पगुच्छ साहेबांच्या हातात देताना माझ्या हातांची थरथर मलाच जाणवच होती. साहेबांनी पुष्पगुच्छ हातात घेताच मी पटकन हात मागे घेतले. हो उगाच हाताची थरथर जाणवायला नको.

"अहो थांबा, हात लावून ठेवा. फोटो काढतायत ते."

पुन्हा एकदा आमचे हात पुष्पगुच्छाला चिकटले. फोटो काढून होताच पुष्पगुच्छ बाजूला ठेवण्यात आला आणि तीच संधी साधून मी साहेबांच्या पाया पडून घेतले. पाठीवरती हात आला आणि मी उभा राहिलो. साहेबांनी एकदा माझ्याकडे पाहिले आणि काहीतरी विचारायला रावते साहेबांकडे वळले. अचानक पुन्हा माझ्याकडे वळले आणि त्या भारून टाकणार्‍या आवाजात साहेबांनी विचारले "कानात काय घातले आहे हो तुम्ही ते?"

झाले, आमची हवा गुल. कोरडे पडलेले ओठ आणि सुकलेला घसा ओला करत कसेतरी ' भि क बा ळी' हे शब्द तोंडात गोळा करत असतानाच साहेबच पुन्हा म्हणाले. "भिकबाळी आहे का हो ती? "

"हो साहेब.."

"खर्‍या भिकबाळीचे डिझाइन असे नसते, हे जरा वेगळे दिसते आहे. कोणाची युक्ती ही ?"

"म म म.. माझीच साहेब."

"छान दिसते आहे. मग पेशवे का तुम्ही ?

ह्या प्रश्नावर काय बोलावे तेच सुचेना. तेवढ्यात बाजूला सामनाचे श्री. द्विवेदी साहेब उभे होते. ते पटकन म्हणाले "साहेब, अहो पुण्याचेच आहेत ते."

साहेब पुन्हा माझ्याकडे बघून विचारते झाले, "पुण्याचे का? मग गाता का तुम्ही?" ह्या प्रश्नावरती आजूबाजूला छान हशा पिकला आणि आमचे 'त त प प..' पुन्हा वाढले.

"नाही साहेब गात नाही."

"मग काय करत ?"

"साहेब प्रकाशन करतात ते" परस्पर कोणीतरी माहिती पुरवली.

"फक्त प्रकाशन करता ? किती प्रकाशन केलीत आजवर?" साहेबांचा कळीचा प्रश्न आला.

"अं.. भरपूर केलीत साहेब." काय पण उत्तर दिले मी. वाह ! पुन्हा एकदा आजूबाजूला छानशी खसखस पिकली.
त्या परिस्थितीतून माझी सुटका करायला रावते साहेब अगदी देवासारखे धावले आणि त्यांनी साहेबांसाठी आणलेली शाल माझ्यापुढे केली. एकतर साहेब बाजूला उभे असल्याचे दडपण, त्यात त्यांच्या प्रश्नांनी उडालेली भंबेरी अशा अवस्थेत मला धड शालीची घडी देखील उलगडता येईना. शेजारी श्री. उद्धव ठाकरे छानशे माझी अवस्था बघून गालातल्या गालात हसत होते. शेवटी रावते साहेबांनीच शाल उघडून दिली आणि ती थरथरत्या हाताने मी बाळासाहेबांना पांघरली. मखमली कापडात गुंडाळलेल्या पुस्तकाच्या प्रती आल्या आणि मा. बाळासाहेब आणि श्री. उद्धव ठाकरे ह्यांच्या हस्ते 'मी मंत्रालय बोलतोय..' ह्या पुस्तकाचे प्रकाशन झाले.

आता कधी एकदा इथून बाहेर पळतोय अशी माझी अवस्था झाली होती. प्रकाशन आटोपले आणि बाळासाहेब पुन्हा एकदा विचारते झाले, "हं कशावरती केले आहे पुस्तक ?"

"साहेब, मंत्रालयाला जी आग लागली, त्या घटनेवरती केले आहे." रावते साहेबांनी माहिती दिली.

"अरे ! येवढ्यात छापून देखील आले ?" येवढे बोलून साहेब माझ्याकडे वळले आणि म्हणाले, "तुम्हाला माहिती होते का आधी हे घडणारे म्हणून ? आधीच तयारीला लागला होतात का काय ?" हास्याची एक जोरदार लाट उसळली आणि त्या लाटेत मी आपले कसेतरी गुळमुळीत 'नाही नाही..' येवढेच बोलू शकलो. मग पुन्हा एकदा तोच प्रश्न रावते साहेबांना देखील विचारला गेला.

साहेबांनी पुस्तक चाळले, त्याच्या किमतीची माहिती करून घेतली, त्यातील लेखांची माहिती घेतली, सामनातले कुठले कुठले लिखाण त्यात समाविष्ट केले आहे ते देखील आवर्जून जाणून घेतले. ते रूप, तो आवाज, तो करारीपण, प्रत्येक गोष्टीवरचे बारीक लक्ष पाहून क्षणभर वाटले की 'साहेबांच्या प्रकृतीची, ते भाषण करू शकतील का नाही' ह्याची सतत विनाकारण वांझोटी चिंता करणार्‍या काही सुमार पत्रकारांना ह्या क्षणी इथे बोलावावे आणि 'आता लिहा बरं तुमची बातमी' असे सांगावे.

जाता जाता :- शक्यतो महिन्याभरातच माझ्या नवीन ग्रंथदालनाची सुरुवात करतो आहे. ह्या प्रसंगी मिपाकरांना खास सवलतीत पुस्तके देण्याचा मानस आहे. तरी ज्यांची खरेदीची इच्छा असेल त्यांनी व्यनी अथवा खरडीतून नोंदणी करावी अशी विनंती. पुस्तके तुमच्या हातात पडल्यावरतीच पैशाची देवाण घेवाण होणार आहे. ह्या व्यवहाराचा व मिपाचा काहीही संबंध नाही.

साहित्यिकबातमीअनुभव

प्रतिक्रिया

सुमीत भातखंडे's picture

18 Jul 2012 - 11:22 am | सुमीत भातखंडे

मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा!

सुहास झेले's picture

18 Jul 2012 - 11:41 am | सुहास झेले

सहीच... वाघाच्या गुहेतील परिस्थिती योग्य शब्दात मांडलीस ;) :)

परिकथेतील राजकुमार's picture

18 Jul 2012 - 11:58 am | परिकथेतील राजकुमार

सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद.

पुस्तकांच्या यादी विषयी बर्‍याच जणांनी विचारणा केली आहे. पुस्तकाची माझी स्वतःची अशी यादी नाही. तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या पुस्तकांची यादी स्वतःच बनवायची. :) तुम्हाला ती पुस्तके जास्तीत जास्त सवलतीत मिळवून देण्याचे काम माझे. अर्थात यादी आधी पाठवून दिल्यास पुस्तके मिळवणे सोपे जाणार असल्याने, आपल्या भेटीच्या किमान ४ दिवस आधी तरी यादी पाठवावी अशी विनंती.

फोटोतील व्यक्ती :-

डावीकडून : सामनाचे पत्रकार मा. श्री. द्विवेदी, त्यांच्या शेजारी मा. आ. दिवाकर रावते, मा. श्री बाळासाहेब ठाकरे, मा. श्री. उद्धव ठाकरे, व त्यांच्या शेजारी मी. माझ्या व मा. श्री. उद्धव ठाकरेंच्या मागे फक्त चेहरा दिसत आहे ते आहेत अ‍ॅड. श्री. अनिल काळे.

michmadhura's picture

18 Jul 2012 - 12:00 pm | michmadhura

अभिनंदन आणि शुभेच्छा!

किणकिनाट's picture

18 Jul 2012 - 12:31 pm | किणकिनाट

हार्दिक अभिनंदन परिकथेतील राजकुमार साहेब आणि अनेक शुभेच्छा !

किणकिनाट .....

नि३सोलपुरकर's picture

18 Jul 2012 - 12:56 pm | नि३सोलपुरकर

परा ,
हार्दिक अभिनंदन...
आणि खुप खुप शुभेच्छा

सुचेता's picture

18 Jul 2012 - 1:07 pm | सुचेता

९५-९६ मधे अखिल भारतीय कामगार संघा च्या वार्षीक संमेलनात व्यासपिठा वरुन बोलण्याचे भाग्य लाभले होते, त्याची आठवण झाली.

प्रत्य़क्श बाळासाहेबांना पाहने ही मर्म बंधातली च ठेव होय.

सुचेता

अभिज्ञ's picture

18 Jul 2012 - 10:28 pm | अभिज्ञ

अभिनंदन आणि शुभेच्छा!

सुवर्णक्षणाचा अनुभव आवडला.

बादवे, पुस्तकांची यादी जरुर अद्ययावत करावीत जेणे करून पुढच्या वारीला एकाच दुकानातून हवा असलेला माल उचलता येईल.

अभिज्ञ.

सुवर्णक्षणाबद्द्ल अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!!

नगरीनिरंजन's picture

19 Jul 2012 - 12:28 pm | नगरीनिरंजन

अभिनंदन!

परा हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा रे !

सुधीर's picture

19 Jul 2012 - 1:02 pm | सुधीर

शुभेच्छा! मातोश्रीवर जावून आल्यासारखं वाटलं.

मेघवेडा's picture

19 Jul 2012 - 1:24 pm | मेघवेडा

वा! झकास हो मालक!

अत्रुप्त आत्मा's picture

19 Jul 2012 - 1:39 pm | अत्रुप्त आत्मा

गणेशा's picture

19 Jul 2012 - 1:57 pm | गणेशा

अभिनंदन आणि मनपुर्वक शुभेच्छा.

कपिलमुनी's picture

19 Jul 2012 - 2:13 pm | कपिलमुनी

आयुष्यात एकदा तरी भेटून पाया पडाव्या अशांपैकी बाळासाहेब आहेत...
कृतार्थतेचा क्षण !!

अभिनंदन पराशेठ :)

बाकी तुझी जी अवस्था लेखात वर्णन केली आहे ती फोटुत दिसतेच आहे. :)

तु राज (ह्याआधीच्या पुस्तकाच प्रकाशन त्यांच्या हस्ते झालेल ना?), बाळासाहेब आणि उद्धव ह्या तिघानाही भेटला आहेस. ग्रेट :)

प्रभाकर पेठकर's picture

19 Jul 2012 - 4:06 pm | प्रभाकर पेठकर

'फास्टेस्ट सेंच्युरी' साठीही अभिनंदन.

जातीवंत भटका's picture

19 Jul 2012 - 6:23 pm | जातीवंत भटका

कधी काळी माझं एखादं पुस्तक प्रकाशित करशील ना रे ??? :)

मैत्र's picture

20 Jul 2012 - 2:54 am | मैत्र

जबरा परा शेठ !
एकदम गुहेत प्रवेश !!

अभिनंदन.. पुस्तकांची माहिती इथे लवकर प्रकाशित करा ...

भाग्यश्री's picture

20 Jul 2012 - 7:59 am | भाग्यश्री

अभिनंदन परा!! खूपच मस्त बातमी! :)

अमित's picture

20 Jul 2012 - 5:49 pm | अमित

अभिनंदन आणि शुभेच्छा!

अँग्री बर्ड's picture

20 Jul 2012 - 11:17 pm | अँग्री बर्ड

सुवर्णक्षणच आहे हा, वाचताना बाळासाहेबांना imagine करतानाच वाट लागली होती. असो, एक सोडून दोन डाव मातोश्रीवर जाण्याचा चान्स आला होता, दोन्हीवेळा हुकला. पुढच्यावेळी जाईनच. बाकी तुमच्या प्रकाशनाला शुभेच्छा ! मी काही पुस्तके तुमच्याकडून मागवेन म्हणतो, मला किती दिवसात मिळू शकतील ?

भिकापाटील's picture

21 Jul 2012 - 4:13 pm | भिकापाटील

पराकाकांचे हार्टीयेटली कॉन्ग्र्याच्युलेशन्स एण्ड विश यु व्हेरी ब्राईट फ्युचर.
मग आता एन्टीक्युटी कधी? :P

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

21 Jul 2012 - 4:22 pm | निनाद मुक्काम प...

अभिनंदन
ग्रंथदालन कल्पना आवडली.
विंग्रजी पुस्तके सुद्धा मिळतील का ?

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

21 Jul 2012 - 4:23 pm | निनाद मुक्काम प...

अभिनंदन
ग्रंथदालन कल्पना आवडली.
विंग्रजी पुस्तके सुद्धा मिळतील का ?

श्यामल's picture

21 Jul 2012 - 11:58 pm | श्यामल

परा, मनःपुर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!

विशाखा राऊत's picture

22 Jul 2012 - 4:03 pm | विशाखा राऊत

मस्त परा.. :)

कुलभूषण's picture

19 Nov 2012 - 2:13 pm | कुलभूषण

फार भाग्यवान आहात तुम्ही....

ह भ प's picture

19 Nov 2012 - 3:27 pm | ह भ प

व्य. नि. करेन.. पुस्तकासाठी..

मालोजीराव's picture

16 Sep 2013 - 11:20 am | मालोजीराव

"तुम्हाला माहिती होते का आधी हे घडणारे म्हणून ? आधीच तयारीला लागला होतात का काय ?"

:))

खरंच सुवर्णक्षण होते रे , पुन्हा मिळणे नाही