नऊवारी पातळापासून पाचवारी गोल साडी हा प्रवास हेच मुळी फॅशनच्या दुनियेतील धीट विधान आहे यावर आजच्या काळात फारच थोडी माणसं विश्वास ठेवतील. एकेकाळी मुलगी गोल साडी नेसते या कारणासाठी लग्नं मोडली आहेत. गोल साडी म्हणजे पाचवारी साडी. नऊवारी ते पाचवारी हे सामाजिक स्थित्यंतराचे माप झाले. वाराचे -चाळीस इंचाचे माप-जाऊन पन्नास वर्ष झाली. मोजमाप मीटर-सेंटीमीटरमध्ये सुरू झाले. साडी नव्या मापाने साडेपाच मीटरची झाली. बोलीभाषेत पातळ या शब्दाची जागा साडी या शब्दाने घेतली पण नऊवारीचे माप समाजमनात राहिल्याने साडी अजूनही पाचवारीच राहिली.
गोल साडी नेसून-सायकलवरून नोकरीला जाणारी बाई हे सामाजिक स्थित्यंतराचे मोठे वळण होते.
इतर फॅशनची सुरुवात जशी समाजातल्या उच्चभ्रू नगरजनांपासून होते तशीच पाचवारी साडी नेसण्याची पद्धत उच्चभ्रू घरातून झाली.
एखाद्या नव्या पायंडय़ाची सुरुवात दु:खातून कशी होते याचे उदाहरण म्हणजे कूचबिहारच्या राजमाता इंदिरादेवींचे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीचा त्यांचा प्रेमविवाह कूचबिहारच्या राजपुत्राशी झाला. कूचबिहारच्या घराण्याला अतिमद्यासक्तीचा शाप होता. त्यामुळे इंदिरादेवींच्या पतीचे निधन फार लवकर झाले. वयाच्या तिशीच्या आतच राणीवर राजमाता बनण्याची जबाबदारी येऊन पडली. संस्थानाच्या कारभारासाठी लोकांसमोर येणे भाग होते, पण कपाळी वैधव्य असल्याने राजघराण्यातील भरजरी साडय़ा नेसायची मुभा नव्हती. यावर उपाय म्हणून त्यांनी पाच वारी शिफॉनच्या साडय़ांचा वापर सुरू केला. शिफॉनच्या कपडय़ाला एक प्रकारची ऐट असते. थोडेसे झिरझिरीत असे हे कापड भडक दिसत नाही .त्याचा पोत ज्याला सब्डय़ुड म्हणता येईल असा असतो. त्यावर वापरले जाणारे रंग त्यामुळे झगमगत नाहीत. त्यामुळे भारदस्त अशी छाप पडते. त्यानंतर त्यांच्या सगळ्या साडय़ा पॅरिसहून विणून यायच्या.
आयुष्यातल्या एका खिन्न परिवर्तनाला त्यांनी हे असे वेगळे वळण दिले.
फॅशनचा जन्म होतो तो असा. काही वर्षांनतर पाचवारी साडी फॅशन न राहता अभिव्यक्ती प्रगटीकरणाची एक पायरी झाली. बायकोच्या उत्पन्नाला घराघरातून मान्यता मिळाल्यावर सबलीकरणातून आधुनिकीकरण ही पुढची पायरी आपोआप मोकळी झाली. त्या काळी सुरू झालेल्या बाजारपेठेतील खटावची वायल (मूळ शब्द voil )-म्हणजे एक लँडमार्क.
वायल म्हणजे चंदेरी-महेश्वरी-कांचीपुरमम -पठणी -बनारसी या रांगेत बसणारी साडी नव्हे. या साडय़ा म्हणजे बाईला शोभिवंत वस्तू बनवणाऱ्या साडय़ा. वायल म्हणजे नव्या युगाची साडी. इंग्रजीत ज्याला वर्कींग वुमन्स अटायर म्हणता येईल अशी साडी. नोकरीसाठी बाहेर पडणाऱ्या स्त्रीला डोळ्यासमोर ठेवून बनवलेली साडी.
ही साडी लोकप्रिय होण्याची अनेक कारणे होती. त्यापकी महत्त्वाचे म्हणजे वायल नेसल्यानंतर मिळणारा फील. एकप्रकारचा सुखदायी स्पर्श. खटावमध्ये वायलसाठी वापरण्यात येणारा धागा नेहमी अंडरस्पीन असायचा. धागा गुंफला जातो तेव्हा एका इंचात त्याचे किती पेड गुंफावे याचे एक गणित असते. ही गुंफण कमी असली की धागा थोडासा सलसर होतो आणि तयार होणाऱ्या कापडात कंफर्ट फील जास्त मिळतो. साहजिकच अंडरस्पीन धाग्यामुळे तयार होणाऱ्या कापडाचे वजन -पर्यायाने खर्च वाढतो. कम्फर्ट फीलमुळे वायल लोकप्रिय होते म्हटल्यावर शेवटपर्यंत धागा अंडरस्पीन ठेवला गेला. गिरणीच्या अर्थशास्त्रात कापड जेव्हढे ताणले जाईल तेव्हढा फायदा जास्त. विव्हींग करताना ताण दिला की कापडाची लांबी वाढते. हा स्ट्रेच फॅक्टरसुद्दा इतर गिरण्यांपेक्षा खटावमध्ये कमी ठेवला जायचा. त्यामुळे वायलची साडी कधी आटायची नाही. बाजारात मिळणाऱ्या साडय़ा थोडय़ाफार चोर पन्ह्याच्या असतात. खटावच्या वायलच्या पन्ह्यात चोरी नसायची.
उंच बाईला पण हा पन्हा पुरेसा असायचा. वायलसारख्या कपडय़ाला प्रिटींग करण्यासाठी साधे रंग चालायचे नाहीत. रंग कमजोर पडला तर साडीवर ढग असल्यासारखा आभास व्हायचा. म्हणून सुरुवातीपासून आयात केले विदेशी रंगच वापरले जायचे. एक ब्रँड विकसित करताना जे जे म्हणून लागते ते सगळे खटावमध्ये व्हायचे. हॅपी मोमेंट्स ऑफ लाइफ शेअर विथ खटाव ही तेव्हाच्या अनेक टॅग लाइनपकी एक.
वायलचे सगळ्यात मोठे फॅन म्हणजे तृतीयपंथी . दिवाळीच्या दरम्यान हिजड्यांची गर्दी मिलच्या दुकानावर व्हायची एकेक हिजडा साताठ ह्जाराची खरेदी करायचा. कामगार डिस्काउंट कुपनं त्यांना विकायचे. पण हे सगळं ऐंशीच्यास्दशकात संपलं .खटावच्या विव्हींग मशीनचे कंट्रोल पॅनेल्स दगडी चाळीत गेले आणि खटाव बंद पडली.
वायलही दिसेनाशी झाली.
तसेही त्या ब्रँडचे अवतारकार्य संपतच आले होते.
सिनेमा रंगीत झाला आणि साडीच्या उत्क्रांतीचे पुढचे टप्पे सरू झाले. ब्रह्मचारी (हिंदी) सिनेमानंतर मुमताज नावाची साडी आली. लेडीज टेलर ही स्पेशलाइज्ड जमात पण अस्तित्वात आली. हे लेडीज टेलर नवीन सिनेमा लागला की पहिल्या शोची तिकीट काढून येणाऱ्या फॅशनचा अंदाज घ्यायला लागले. नवनवीन प्रयोग पण सुरू झाले. साडी आली म्हणजे सोबत पोलकं पण आलंच. आधी पोलकं मग झंपर त्यानंतर ब्लाऊज अशी नामांतरं पण आपोआप सुरू झाली. तेव्हा सिनेमा फॅशनचा स्रोत होता तर आता नवीन सीरिअलप्रमाणे ब्लाऊज आणि साडय़ांची फॅशन बदलते आहे. उदाहरणार्थ चार-पाच वर्षांपूर्वी कसौटी जिंदगी की’ नावाच्या एक सीरिअलमध्ये दोन पात्रे होती. एक होती कोमलीका आणि दुसरी रमोला. कोमलीका हा साडीचा प्रकार तेव्हा अस्तित्वात आला. कोमलीका साडी लो वेस्ट नेसणीची आणि सोबत मॅचिंग बॅकलेस ब्लाऊज आणि रमोला साडी म्हणजे जवळजवळ पारदर्शक साडी.
हे उदाहरण देण्याचे कारण इतकेच खटावची वायल एक वìकग वुमन्स फॅशन होती आणि नवीन सीरिअलमधून येणार्या साड्याय़ा बाईला पुन्हा एकदा ओन्ली सेक्स ऑब्जेक्ट या पातळीवर नेत आहेत.
कदाचीत फॅशनचे वर्तुळ पूर्ण होते ते असे.
(साप्ताहीक लोकप्रभासाठी लिहीलेला हा शेवटचा लेख मिपावर प्रकाशित केला नव्हता .)
प्रतिक्रिया
3 Jul 2012 - 9:21 pm | अमितसांगली
साड्यांमध्ये फक्त नऊवारी व सहावारी हे दोनच प्रकार माहीत होते...पाचवारी साडी याविषयी प्रथमच वाचले...
3 Jul 2012 - 9:21 pm | jaypal
आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी दर्शन दिलत. नमन स्विकारा.
3 Jul 2012 - 9:40 pm | अर्धवटराव
नेमका प्रतिसाद. दुनियादारी इतक्या विविधांगाने आणि रंजकतेने दाखवणारा हा ई-गुरु. जय हो.
अर्धवटराव
5 Jul 2012 - 1:17 am | सुहास झेले
अगदी ह्येच बोलतो...
(तुमच्या लिखाणाचा चार पाती गरागरा फिरणारा पंखा) सुझे :) :)
3 Jul 2012 - 9:23 pm | नि३
रामदास काकांचा लेख म्हणजे पर्वणीच....
मस्त माहीती....
3 Jul 2012 - 9:28 pm | रेवती
:)
3 Jul 2012 - 9:29 pm | गणपा
क्लास !!!
3 Jul 2012 - 9:35 pm | सर्वसाक्षी
नेहमीप्रमाणेच आगळा वेगळा लेख. थोडा छोटा वाटला. या लेखात साड्यांचे प्रकार व माहिती वाचायला मिळेल असे वाटले होते.
3 Jul 2012 - 11:49 pm | चतुरंग
अजून उत्सुकता वाढते आहे तोवरच संपला लेख! :(
पण काही का असेना रामदासांचे लेखन वाचायला मिळाले आज, हे ही नसे थोडके! :)
-(साडीप्रेमी)रंगा
3 Jul 2012 - 9:38 pm | सुहास..
लुगड नावाचा लेख आठवला ( लिंकवा कोणीतरी )
लेख आधीच वाचुन आवडल्या गेल्या आहे !!
3 Jul 2012 - 10:06 pm | अत्रुप्त आत्मा
3 Jul 2012 - 10:08 pm | टुकुल
तुमचा लेख बघुन सर्व काम बाजुला ठेवुन पहिल्यांदा लेख वाचला, नेहमीप्रमाणे सुंदर लेख. एक वारी म्हणजे चाळीस इंच हे पहिल्यांदाच कळाले.
--टुकुल.
3 Jul 2012 - 10:47 pm | शिल्पा ब
लेख आवडला.
3 Jul 2012 - 10:54 pm | Dhananjay Borgaonkar
टिपीकल रामदास काका टच.
दंडवत स्विकारावे _/\_
आजच सकाळी मारुती गाडीवरचा लेख वाचला तेव्हा कोणीतरी म्हणालच रामदास काकांच्या स्टाईल ने झालाय म्हणुन आणि आता लगेच तुमचा लेख. क्या बात है!!
3 Jul 2012 - 11:07 pm | श्रावण मोडक
पुढे? मिपा आहेच. मालिका अर्ध्यावर सोडू नका.
4 Jul 2012 - 12:14 am | सुनील
पुढे? मिपा आहेच. मालिका अर्ध्यावर सोडू नका.
हेच म्हणतो.
4 Jul 2012 - 10:35 am | मी_आहे_ना
अगदी अगदी.. रामदासकाकांच्या अशाच सुंदर लेखालंकारांनी मिपा असेच सजत, नटत, बहरत राहावे असे वाटते.
4 Jul 2012 - 12:46 pm | स्वाती दिनेश
पुढे? मिपा आहेच. मालिका अर्ध्यावर सोडू नका.
असेच, श्रामोंसारखेच म्हणते,
स्वाती
3 Jul 2012 - 11:28 pm | जेनी...
:)
3 Jul 2012 - 11:42 pm | धनंजय
मस्त लेखन.
3 Jul 2012 - 11:50 pm | स्मिता.
फारशी वापरात नसली तरी जिव्हाळ्याचा विषय असलेल्या साडीवरचा एवढा सुंदर लेख थोडक्यात आटोपावा हे काही पटले नाही. ही उणीव पुढच्या लेखांनी भरून निघेल अशी अपेक्षा आहे.
4 Jul 2012 - 12:18 am | वीणा३
तुमचे लेख नेहमीच वाचते. वेगवेगळ्या विषयांची माहिती अतिशय सोप्या भाषेत वाचताना खूपच मजा येते.
4 Jul 2012 - 1:05 am | प्रभाकर पेठकर
साडी, पातळाविषयी एखाद्या पुरुषाने इतके तपशिलवार लिहावे हेच कौतुकास्पद आहे. मस्त झाला आहे लेख.
भारतिय साडीचे, जागतीक फॅशनच्या दुनियेत, 'कुठेही न शिवलेल्या, एवढ्या मोठ्ठ्या, नुसत्या कापडाने सुद्धा स्त्री अत्यंत देखणी दिसू शकते' ह्यावर आश्चर्य मिश्रित कौतुक झाल्याचे कुठेतरी वाचले आहे.
स्व. दादा कोंडके म्हणायचे, 'माझी हिरॉईन सर्वांगाला एवढे मोठे कापड (९वारी पातळ) नेसूनही मादक सौंदर्याचा अॅटमबॉम्ब दिसते. हिन्दी चित्रपटवाल्यांसारखी आमच्या हिरॉइनला कमी कपड्यात दाखवायची गरज भासत नाही.'
4 Jul 2012 - 2:10 am | चतुरंग
स्व. दादांच्या म्हणण्यावरुन "मादक सौंदर्याला मिनी स्कर्ट कशाला!" अशी नवीन म्हण तयार करायला हरकत नसावी ;)
-रंगादादा
4 Jul 2012 - 7:55 am | श्रीरंग_जोशी
दादा तुस्सी ग्रेट थे!! त्यांना भविष्यात काय होणार हे केव्हाच उमगले होते, हे पहा...
4 Jul 2012 - 9:16 am | प्यारे१
पोरगी (कार्टी) 'करंटी ' वाटली.
(तिच्याच हातात कात्री आहे म्हणून!)
.
.
.
.
एवढंच!
रामदासकाकांना वंदन.
4 Jul 2012 - 1:02 pm | गणपा
एका चांगल्या लेखावर हा प्रतिसाद आवडला नाही.
4 Jul 2012 - 1:17 am | मुक्त विहारि
छान माहिती..
4 Jul 2012 - 6:20 am | मराठमोळा
असेच लिहित रहा अशी विनंती. :)
4 Jul 2012 - 6:51 am | सहज
सात आठ परिच्छेद वाचून, ही तर फक्त सुरवात आहे, अजुन लेखन हवेहवेसे वाटणे हे महान लेखकाचे एक लक्षण आहे.
4 Jul 2012 - 8:25 am | प्रचेतस
रामदासकाकांचे लेख वाचणे ही पर्वणीच.
4 Jul 2012 - 11:24 am | प्रशांत
+१
4 Jul 2012 - 9:11 am | ऋषिकेश
वा! छानच!
4 Jul 2012 - 9:24 am | चौकटराजा
@ रामदास जी
हा लेख नेहमीप्रमाणेच भारी.
जाता जाता आठवले. ६२ साली एका मेळ्यात ऐकलेले गीत ----
मूळ चाल तडपाओगे तडपालो - संगीत चित्रगुप्त- फिल्म बरखा
गीत असे
नायलानचे पातळ घ्या
ही नवीन नवीन फॅशन मला पाहिजे आहे .
यासोबतच खटाव(उ) साडयांच्या जाहिराती नजरेसमोरून सरकून गेल्या. वेंकटगिरी हे नाव ही आपल्या लक्शांत असेलच. एक नवीन विषय सुचवू म्हणतो- किचनचे बदलते स्वरूप - आडवा तीन इंची ओटा, वैलचूल, भुशा ची शेग्डी, कोळशाची शेगडी, एल पी जीचा उदय ताटाळी,नंतर स्लॉटेड अँगल मांडण्या , हिंदालियमची कपाटे किचन टेबल, ओटा, ते चिमनी, मॉड्यलर किचन . ई. प्रवास .
पु ले शू
4 Jul 2012 - 10:38 am | अमृत
कालच एका प्रतिक्रियेमधे तुमची आठवण काढली आणि आज तुमचा लेख :-)
अमृत
4 Jul 2012 - 11:06 am | गवि
वा वा.. रामदासकाका.. खास लेख एकदम..
राम नगरकरांच्या रामनगरीमधली त्यांची बायको आठवली.. तिला "सुधारण्याचे" नवर्याचे सारे प्रयत्न फुकट गेले.. चांगली गोल पातळ नेसायला लागलेली पुन्हा थोड्या दिवसात नऊवारीत.. आणि गोल साडी न नेसण्याचं तिचं एक्स्प्लेनेशन "लई मोकळं मोकळं वाटतंय बगा.."
4 Jul 2012 - 12:31 pm | शिल्पा ब
माझे आजोबा धोतर नेसत असंत. धोतरावरसुद्धा एखादा लेख येउ द्या. थोडी माहीती तरी मिळेल.
बाकी, बायका अजुनही साड्या नेसतात पण धोतर का गायबलंय म्हणे?
4 Jul 2012 - 9:08 pm | jaypal
पण सासर कडुन धोतर मिलत नाहीना .म्हणुन ;-)
4 Jul 2012 - 12:49 pm | चित्रगुप्त
लेख अतिशय आवडला. जुन्या वस्तु, फॅशन इ. बद्दल आणखी लिहावेत, ही विनंती.
वार, मीटर बद्दलः
एक वार = एक गज = एक यार्ड... म्हणजे ३६ इंच.
(हा यार्ड म्हणजे बारव्या शतकातील इंग्लंडचा राजा हेन्री -१ याच्या नाकाच्या शेंड्यापासून त्याच्या अंगठ्याचा टोकापर्यंत चे अंतर होते म्हणे)
पूर्वी कापड मोजण्याचा 'गज' ३६ इंचाचा असायचा. लुगडे नऊ वारी, पातळ पाच/सहा वारी असायचे.
पुढे दशमान पद्धती आल्यावर 'मीटर' मधे कापड मोजले जाऊ लागले.
एक मीटर हा साधारणपणे ४० इन्च (अगदी काटेकोर : ३९.३७००७८७ इंच).
4 Jul 2012 - 1:02 pm | सूड
निवांत वाचण्यासाठी हा लेख बाजूला ठेवला होता. कुठे वाचलेलं/ ऐकलेलं आठवत नाही पण पूर्वी विकच्छ साड्या फक्त देवदासी वैगरेच नेसत असत, गोल साड्या नेसणार्या मुलींची लग्ने मोडण्याचे कारण हेच असावे का ?
4 Jul 2012 - 3:20 pm | चित्रगुप्त
कूचबिहारच्या महाराणी इंदिराराजे बाईसाहेब या बडोद्याच्या सुप्रसिद्ध सयाजीराव महाराज यांच्या कन्यका, आणि जयपूरच्या महाराणी गायत्रीदेवी यांच्या मातोश्री.
इंदिराराजे नऊवारीत, मातोश्री चिमणाबाई यांचे सोबतः
महाराणी चिमणा बाईंचे राजा रविवर्मा ने केलेले चित्रः
इंदिराराजे शिफॉन साडीतः
वरील चित्रासोबत गायत्रीदेवी:
4 Jul 2012 - 1:41 pm | निनाद मुक्काम प...
अमिताभ राजकारणात गेल्यावर म्हणजे सिनेमातून विजनवास घेतल्यावर त्याच्याजागी गरीबांचा अमिताभ म्हणजे मिथुन ( गेला बाजार भाव चंकी ,व उदयउन्मुख गोविंदा ) ह्यांनी रसिकांचे मनोरंजन केले.
ततेच रामदास काका जेव्हा मुकवाचक असतात तेव्हा आमच्यासारखे गरिबांचे रामदास मिपावर
फुटकळ टंकणे करीत राहतात.
अर्थात सूर्याचा उदय झाल्यावर लुकलुकणाऱ्या तार्यांचे लुप्त होणे जेवढे स्वाभाविक तेवढेच काकांचा लेखासमोर आमच्या सारख्यांचे ....
पण सदर लेख आटोपता घेतला गेला असे वाटते बुआ.
खटाव मिल म्हटले की नाईक व गवळी आठवतात.
काकांनी विमल व इतर ब्रांड विषयी अजुन लिहावे असे वाटते.
ह्या निमित्ताने आठवला
एक फुटकळ इनोद
एकदा कमल व विमल ह्या दोन बहिणी बस थांब्यावर बस ची वाट पाहत असतात. दोघींना घरी जायचे असते. मात्र बस आल्यावर विमल बस मध्ये चढते व कमल मात्र गर्दी नसूनही बस थांब्यावर थांबते.
कारण
बस वर लिहिले असते
ओन्ली विमल
4 Jul 2012 - 1:43 pm | गणेशा
मस्त लेख
4 Jul 2012 - 5:19 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
काका, एकदम जम्या.. :)
4 Jul 2012 - 6:39 pm | नाना चेंगट
लेख छान !!
साडी म्हटले की आम्हाला हा फटू आठवतो.
15 Jan 2016 - 3:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नाना कुठे आहेस रे ? चेंगटपणा मीस करतोय.
-दिलीप बिरुटे
4 Jul 2012 - 6:59 pm | चित्रगुप्त
....साडी म्हटले की आम्हाला हा फटू आठवतो....
आणि आम्हाला हा:
(कन्नड्/तमिळ नटी पूजा)
5 Jul 2012 - 10:32 pm | आनंदी गोपाळ
कित्ती सोज्वळ फोटो आहे. अन हातात धरलेला तो पोपट... आहाहा! असे सात्विक काहीतरी आठवायला हवे.
नाही तर ते वर पोस्ट केलेले फोटू.. ईक! एका फटू मधली कापून टाकलेलली रेशमी साडी पाहून ड्वाले पाणावले..
4 Jul 2012 - 11:02 pm | पैसा
साड्यांबद्दल रामदासकाकांनी छानच माहिती लिहिलीय. गोल साडी नेसायची पद्धत पारशी स्त्रियांकडून हिंदू स्त्रियांनी उचलली असं काहीसं वाचलेलं आठवतंय. या साडीचे दक्षिण भारतीय स्वरूप (घागरा आणि ओढणीसारखी अर्धी साडी) पूर्वीपासून सिनेम्यांमधे पाहत आलोय. पण तो प्रकार आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रात वापरात आला नाही.
वॉयल इतकी आरामदायक का याबद्दल माहिती सुंदरच दिली आहे. तसंच जॉर्जेट हा प्रकार एकदम खानदानी. रेशमी, गर्भरेशमी सुती, इरकली, इचलकरंजी या साड्यांचे किती प्रकार! नायलॉन हे धुवायला सोपं. चुरगळत नाही आणि हलके, स्वस्त. या गुणांमुळे लोकप्रिय झाले.
पण प्रत्येक साडीप्रेमी मराठी बाईला एकतरी पैठणी मिळाल्याशिवाय जन्म सार्थकी लागला असं नाही वाटतं! एकदा येवल्याला गेले होते. तिथे एका विणकराच्या घरी गेले. त्याने एक अनुभव सांगितला. एका आजीबाईंना पैठणी हवी होती. जन्मात कधी नाही मिळाली, पण मुलाने आईची हौस पुरी करायची ठरवली आणि ५० हजाराच्या पैठणीची ऑर्डर दिली. पैठणी विणून पुरी झाली आणि या आजीबाई आजारी पडून देवाघरी गेल्या. पैठणी नाहीच नेसायला मिळाली. पण मुलाने आईला निरोप देताना ते महावस्त्र आईला पांघरलं! आजीबाईंचा आत्मा नक्कीच समाधान पावला असेल!
5 Jul 2012 - 9:17 am | प्रभाकर पेठकर
मुलाने आईला निरोप देताना ते महावस्त्र आईला पांघरलं! आजीबाईंचा आत्मा नक्कीच समाधान पावला असेल!
धन्य तो मुलगा. फारच हृद्य किस्सा आहे. मन हेलावून गेले.
8 Jul 2012 - 3:11 pm | नंदन
सहमत आहे. 'वासांसि जीर्णानि...'च्या दृष्टांताची शब्दशः प्रचीती!
5 Jul 2012 - 11:30 am | मृत्युन्जय
पण मुलाने आईला निरोप देताना ते महावस्त्र आईला पांघरलं! आजीबाईंचा आत्मा नक्कीच समाधान पावला असेल!
त्या मुलाची अवस्था काय झाली असेल त्याची कल्पना पण करवत नाही. पण त्याचे हे कृत्य नक्कीच हेलावून गेले.
5 Jul 2012 - 8:12 am | एमी
छान लेख! आवडला!
5 Jul 2012 - 11:18 am | मृत्युन्जय
चला मी अर्धशतक पुर्ण करुन टाकतो. :)
5 Jul 2012 - 4:32 pm | खडीसाखर
सुरेख माहीती!
5 Jul 2012 - 10:35 pm | आनंदी गोपाळ
रामदासकाकांचा नॉस्ट्याल्जिक लेख. ते सोनीच्या क्यासेटींसारखा.
पण ना
हे नाही आवडलं-->
डायरेक्ट ट्रान्सलेशन विंग्रजीतूण मर्हाठीत.
Very few people will belive that the journey from 9vari to 5vari gol saree is in itself a bold statement in the world of fashion.
6 Jul 2012 - 10:04 am | दिपक
छान लेख काका. :-)
अजुन वाचायला आवडलं असतं .
11 Jul 2012 - 7:33 pm | चिगो
मी आठवी नववीत असतांना लोकप्रभा फक्त कणेकर आणि अभिजीत देसाईंच्या लेखांसाठी वाचयचो.. आता (इ) लोकप्रभा वाचतो ती रामदास काकांच्या लेखांसाठी..
12 Jul 2012 - 11:22 am | मनोज श्रीनिवास जोशी
खूप आवडले. जबरी अभ्यास खास शैली !
आता आपले इतर लेखन वाचणे आले !!
12 Jul 2012 - 10:20 pm | अर्धवटराव
http://www.misalpav.com/node/19057
अर्धवटराव
15 Jan 2016 - 3:30 pm | अजया
अप्रतिम लेख.आईच्या मऊमऊ वायल आठवल्या.आईबरोबर तेव्हाही आनंदाने साडी खरेदीला जात असल्याने हा लेख अगदी पर्वणी सारखा वाटला.आईला वाचायला पाठवते :) धन्यवाद काका_/\_
15 Jan 2016 - 4:08 pm | कविता१९७८
छान लेख
23 Jan 2021 - 8:28 am | NAKSHATRA
खटावच्या विव्हींग मशीनचे कंट्रोल पॅनेल्स दगडी चाळीत गेले आणि खटाव बंद पडली.
निव्वळ अप्रतिम काका....
1 Feb 2021 - 1:04 pm | चौथा कोनाडा
व्वा, गोल साडी आणि खटाव वायल युगाचा सुंदर फेरफटका !