Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by रामदास on Tue, 07/03/2012 - 21:10
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
नऊवारी पातळापासून पाचवारी गोल साडी हा प्रवास हेच मुळी फॅशनच्या दुनियेतील धीट विधान आहे यावर आजच्या काळात फारच थोडी माणसं विश्वास ठेवतील. एकेकाळी मुलगी गोल साडी नेसते या कारणासाठी लग्नं मोडली आहेत. गोल साडी म्हणजे पाचवारी साडी. नऊवारी ते पाचवारी हे सामाजिक स्थित्यंतराचे माप झाले. वाराचे -चाळीस इंचाचे माप-जाऊन पन्नास वर्ष झाली. मोजमाप मीटर-सेंटीमीटरमध्ये सुरू झाले. साडी नव्या मापाने साडेपाच मीटरची झाली. बोलीभाषेत पातळ या शब्दाची जागा साडी या शब्दाने घेतली पण नऊवारीचे माप समाजमनात राहिल्याने साडी अजूनही पाचवारीच राहिली. गोल साडी नेसून-सायकलवरून नोकरीला जाणारी बाई हे सामाजिक स्थित्यंतराचे मोठे वळण होते. इतर फॅशनची सुरुवात जशी समाजातल्या उच्चभ्रू नगरजनांपासून होते तशीच पाचवारी साडी नेसण्याची पद्धत उच्चभ्रू घरातून झाली. एखाद्या नव्या पायंडय़ाची सुरुवात दु:खातून कशी होते याचे उदाहरण म्हणजे कूचबिहारच्या राजमाता इंदिरादेवींचे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीचा त्यांचा प्रेमविवाह कूचबिहारच्या राजपुत्राशी झाला. कूचबिहारच्या घराण्याला अतिमद्यासक्तीचा शाप होता. त्यामुळे इंदिरादेवींच्या पतीचे निधन फार लवकर झाले. वयाच्या तिशीच्या आतच राणीवर राजमाता बनण्याची जबाबदारी येऊन पडली. संस्थानाच्या कारभारासाठी लोकांसमोर येणे भाग होते, पण कपाळी वैधव्य असल्याने राजघराण्यातील भरजरी साडय़ा नेसायची मुभा नव्हती. यावर उपाय म्हणून त्यांनी पाच वारी शिफॉनच्या साडय़ांचा वापर सुरू केला. शिफॉनच्या कपडय़ाला एक प्रकारची ऐट असते. थोडेसे झिरझिरीत असे हे कापड भडक दिसत नाही .त्याचा पोत ज्याला सब्डय़ुड म्हणता येईल असा असतो. त्यावर वापरले जाणारे रंग त्यामुळे झगमगत नाहीत. त्यामुळे भारदस्त अशी छाप पडते. त्यानंतर त्यांच्या सगळ्या साडय़ा पॅरिसहून विणून यायच्या. आयुष्यातल्या एका खिन्न परिवर्तनाला त्यांनी हे असे वेगळे वळण दिले. फॅशनचा जन्म होतो तो असा. काही वर्षांनतर पाचवारी साडी फॅशन न राहता अभिव्यक्ती प्रगटीकरणाची एक पायरी झाली. बायकोच्या उत्पन्नाला घराघरातून मान्यता मिळाल्यावर सबलीकरणातून आधुनिकीकरण ही पुढची पायरी आपोआप मोकळी झाली. त्या काळी सुरू झालेल्या बाजारपेठेतील खटावची वायल (मूळ शब्द voil )-म्हणजे एक लँडमार्क. वायल म्हणजे चंदेरी-महेश्वरी-कांचीपुरमम -पठणी -बनारसी या रांगेत बसणारी साडी नव्हे. या साडय़ा म्हणजे बाईला शोभिवंत वस्तू बनवणाऱ्या साडय़ा. वायल म्हणजे नव्या युगाची साडी. इंग्रजीत ज्याला वर्कींग वुमन्स अटायर म्हणता येईल अशी साडी. नोकरीसाठी बाहेर पडणाऱ्या स्त्रीला डोळ्यासमोर ठेवून बनवलेली साडी. ही साडी लोकप्रिय होण्याची अनेक कारणे होती. त्यापकी महत्त्वाचे म्हणजे वायल नेसल्यानंतर मिळणारा फील. एकप्रकारचा सुखदायी स्पर्श. खटावमध्ये वायलसाठी वापरण्यात येणारा धागा नेहमी अंडरस्पीन असायचा. धागा गुंफला जातो तेव्हा एका इंचात त्याचे किती पेड गुंफावे याचे एक गणित असते. ही गुंफण कमी असली की धागा थोडासा सलसर होतो आणि तयार होणाऱ्या कापडात कंफर्ट फील जास्त मिळतो. साहजिकच अंडरस्पीन धाग्यामुळे तयार होणाऱ्या कापडाचे वजन -पर्यायाने खर्च वाढतो. कम्फर्ट फीलमुळे वायल लोकप्रिय होते म्हटल्यावर शेवटपर्यंत धागा अंडरस्पीन ठेवला गेला. गिरणीच्या अर्थशास्त्रात कापड जेव्हढे ताणले जाईल तेव्हढा फायदा जास्त. विव्हींग करताना ताण दिला की कापडाची लांबी वाढते. हा स्ट्रेच फॅक्टरसुद्दा इतर गिरण्यांपेक्षा खटावमध्ये कमी ठेवला जायचा. त्यामुळे वायलची साडी कधी आटायची नाही. बाजारात मिळणाऱ्या साडय़ा थोडय़ाफार चोर पन्ह्याच्या असतात. खटावच्या वायलच्या पन्ह्यात चोरी नसायची. उंच बाईला पण हा पन्हा पुरेसा असायचा. वायलसारख्या कपडय़ाला प्रिटींग करण्यासाठी साधे रंग चालायचे नाहीत. रंग कमजोर पडला तर साडीवर ढग असल्यासारखा आभास व्हायचा. म्हणून सुरुवातीपासून आयात केले विदेशी रंगच वापरले जायचे. एक ब्रँड विकसित करताना जे जे म्हणून लागते ते सगळे खटावमध्ये व्हायचे. हॅपी मोमेंट्स ऑफ लाइफ शेअर विथ खटाव ही तेव्हाच्या अनेक टॅग लाइनपकी एक. वायलचे सगळ्यात मोठे फॅन म्हणजे तृतीयपंथी . दिवाळीच्या दरम्यान हिजड्यांची गर्दी मिलच्या दुकानावर व्हायची एकेक हिजडा साताठ ह्जाराची खरेदी करायचा. कामगार डिस्काउंट कुपनं त्यांना विकायचे. पण हे सगळं ऐंशीच्यास्दशकात संपलं .खटावच्या विव्हींग मशीनचे कंट्रोल पॅनेल्स दगडी चाळीत गेले आणि खटाव बंद पडली. वायलही दिसेनाशी झाली. तसेही त्या ब्रँडचे अवतारकार्य संपतच आले होते. सिनेमा रंगीत झाला आणि साडीच्या उत्क्रांतीचे पुढचे टप्पे सरू झाले. ब्रह्मचारी (हिंदी) सिनेमानंतर मुमताज नावाची साडी आली. लेडीज टेलर ही स्पेशलाइज्ड जमात पण अस्तित्वात आली. हे लेडीज टेलर नवीन सिनेमा लागला की पहिल्या शोची तिकीट काढून येणाऱ्या फॅशनचा अंदाज घ्यायला लागले. नवनवीन प्रयोग पण सुरू झाले. साडी आली म्हणजे सोबत पोलकं पण आलंच. आधी पोलकं मग झंपर त्यानंतर ब्लाऊज अशी नामांतरं पण आपोआप सुरू झाली. तेव्हा सिनेमा फॅशनचा स्रोत होता तर आता नवीन सीरिअलप्रमाणे ब्लाऊज आणि साडय़ांची फॅशन बदलते आहे. उदाहरणार्थ चार-पाच वर्षांपूर्वी कसौटी जिंदगी की’ नावाच्या एक सीरिअलमध्ये दोन पात्रे होती. एक होती कोमलीका आणि दुसरी रमोला. कोमलीका हा साडीचा प्रकार तेव्हा अस्तित्वात आला. कोमलीका साडी लो वेस्ट नेसणीची आणि सोबत मॅचिंग बॅकलेस ब्लाऊज आणि रमोला साडी म्हणजे जवळजवळ पारदर्शक साडी. हे उदाहरण देण्याचे कारण इतकेच खटावची वायल एक वìकग वुमन्स फॅशन होती आणि नवीन सीरिअलमधून येणार्या साड्याय़ा बाईला पुन्हा एकदा ओन्ली सेक्स ऑब्जेक्ट या पातळीवर नेत आहेत. कदाचीत फॅशनचे वर्तुळ पूर्ण होते ते असे. (साप्ताहीक लोकप्रभासाठी लिहीलेला हा शेवटचा लेख मिपावर प्रकाशित केला नव्हता .)
  • Log in or register to post comments
  • 37578 views

प्रतिक्रिया

Submitted by नंदन on Sun, 07/08/2012 - 15:11

In reply to हृद्य किस्सा... by प्रभाकर पेठकर

Permalink

सहमत

फारच हृद्य किस्सा आहे.
सहमत आहे. 'वासांसि जीर्णानि...'च्या दृष्टांताची शब्दशः प्रचीती!
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on गुरुवार, 07/05/2012 - 11:30

In reply to जिव्हाळ्याचा विषय! by पैसा

Permalink

पण मुलाने आईला निरोप देताना

पण मुलाने आईला निरोप देताना ते महावस्त्र आईला पांघरलं! आजीबाईंचा आत्मा नक्कीच समाधान पावला असेल! त्या मुलाची अवस्था काय झाली असेल त्याची कल्पना पण करवत नाही. पण त्याचे हे कृत्य नक्कीच हेलावून गेले.
  • Log in or register to post comments

Submitted by एमी on गुरुवार, 07/05/2012 - 08:12

Permalink

छान लेख! आवडला!

छान लेख! आवडला!
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on गुरुवार, 07/05/2012 - 11:18

Permalink

चला मी अर्धशतक पुर्ण करुन

चला मी अर्धशतक पुर्ण करुन टाकतो. :)
  • Log in or register to post comments

Submitted by खडीसाखर on गुरुवार, 07/05/2012 - 16:32

Permalink

सुरेख माहीती!

सुरेख माहीती!
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदी गोपाळ on गुरुवार, 07/05/2012 - 22:35

Permalink

हं!

रामदासकाकांचा नॉस्ट्याल्जिक लेख. ते सोनीच्या क्यासेटींसारखा. पण ना हे नाही आवडलं-->
नऊवारी पातळापासून पाचवारी गोल साडी हा प्रवास हेच मुळी फॅशनच्या दुनियेतील धीट विधान आहे यावर आजच्या काळात फारच थोडी माणसं विश्वास ठेवतील.
डायरेक्ट ट्रान्सलेशन विंग्रजीतूण मर्‍हाठीत. Very few people will belive that the journey from 9vari to 5vari gol saree is in itself a bold statement in the world of fashion.
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक on Fri, 07/06/2012 - 10:04

Permalink

मस्तच

छान लेख काका. :-) अजुन वाचायला आवडलं असतं .
  • Log in or register to post comments

Submitted by चिगो on Wed, 07/11/2012 - 19:33

Permalink

सुंदर लेख..

मी आठवी नववीत असतांना लोकप्रभा फक्त कणेकर आणि अभिजीत देसाईंच्या लेखांसाठी वाचयचो.. आता (इ) लोकप्रभा वाचतो ती रामदास काकांच्या लेखांसाठी..
  • Log in or register to post comments

Submitted by मनोज श्रीनिवास जोशी on गुरुवार, 07/12/2012 - 11:22

Permalink

रामदास : एकदम कसदार लेखन.

खूप आवडले. जबरी अभ्यास खास शैली ! आता आपले इतर लेखन वाचणे आले !!
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on गुरुवार, 07/12/2012 - 22:20

In reply to रामदास : एकदम कसदार लेखन. by मनोज श्रीनिवास जोशी

Permalink

हॅपी वीकएण्ड :)

http://www.misalpav.com/node/19057 अर्धवटराव
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Fri, 01/15/2016 - 15:30

Permalink

अप्रतिम लेख.आईच्या मऊमऊ वायल

अप्रतिम लेख.आईच्या मऊमऊ वायल आठवल्या.आईबरोबर तेव्हाही आनंदाने साडी खरेदीला जात असल्याने हा लेख अगदी पर्वणी सारखा वाटला.आईला वाचायला पाठवते :) धन्यवाद काका_/\_
  • Log in or register to post comments

Submitted by कविता१९७८ on Fri, 01/15/2016 - 16:08

Permalink

छान लेख

छान लेख
  • Log in or register to post comments

Submitted by NAKSHATRA on Sat, 01/23/2021 - 08:28

Permalink

नेहमीप्रमाणे सुंदर लेख.....

खटावच्या विव्हींग मशीनचे कंट्रोल पॅनेल्स दगडी चाळीत गेले आणि खटाव बंद पडली. निव्वळ अप्रतिम काका....
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Mon, 02/01/2021 - 13:04

Permalink

व्वा, गोल साडी आणि खटाव वायल

व्वा, गोल साडी आणि खटाव वायल युगाचा सुंदर फेरफटका !
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com