Dyatlov Pass - एक जीवघेणे गूढ.
ही घटना आहे अत्यंत अनाकलनीय परिस्थीतीची, चक्रावून टाकणार्या प्रसंगांची, नऊ स्की ट्रेकर्स च्या भयाण मृत्यूची आणि ५३ वर्षांनंतरही न सुटलेल्या जीवघेण्या कोड्याची...
१ फेब्रूवारी १९५९ च्या रात्री रशियातल्या उरल पर्वतावर नक्की काय घडले ते आजपर्यंत गूढच आहे. तिथे मिळालेले पुरावे, त्यांवरून बांधलेले परिस्थीतीचे अंदाज आणि त्या निष्णात ट्रेकर्सनी त्या वेळी घेतलेले निर्णय हे गूढ आणखी वाढवतात.
उरल पॉलीटेक्नीक इन्स्टीट्यूट चे दहा अनुभवी क्रॉस कंट्री स्की ट्रेकर्स (तीन मुलींसह) २५ जानेवारी १९५९ ला रशियातील Ivdel शहरात पोहोचले. या मोहीमेमध्ये हे सर्व जण 'ग्रेड ३' या प्रकारच्या अत्यंत कठीण हवामानातून ट्रेक करत उत्तर उरल पर्वातामधून Vizhai व नंतर Otorten येथे पोहोचणार होते.
हे या मोहीमेतले सहभागी ट्रेकर..
Igor Dyatlov (गृप लीडर)
Yuri Krivonischenko
Yuri Doroshenko
Rustem Slobodin
Zinaida Kolmogorova
Nicolai Thibeaux-Brignolle
Lyudmila Dubinina
Alexander Zolotarev
Alexander Kolevatov
Yuri Yudin
दोनच दिवसानंतर Yuri Yudin आजारी पडली व तिला परतावे लागले.
Lyudmila बरोबर हसून निरोप घेणारी Yuri, शेजारी Dyatlov.
आता नऊ जणांची ही टीम बर्फाळ वातावरणात मार्गक्रमण करू लागली..
ट्रेकदरम्यानची दंगा मस्ती.
१२ फेब्रुवारी पर्यंत Vizhai या ठिकाणी पोहोचून गृप लीडर Dyatlov स्पोर्ट्स क्लबला टेलीग्राम पाठवणार असे आधीच ठरले होते. ही तारीख निघून गेली तरी कोणी फारसे गंभीर झाले नाही, अशा प्रकारच्या मोहीमेत काही दिवसांचा उशीर ही नित्याचीच बाब असते. निसर्गाचा लहरीपणा आणि त्यापुढे मानवाची हतबलता.
आणखी काही दिवसांनंतर नातेवाईकांनी मदत पथक पाठवून उशीर का झाला आणि हे सगळेजण नक्की कुठे आहेत आहे हे शोधण्याची मागणी केली. पहिले मदत पथक फक्त काही शिक्षक व स्वयंसेवक विद्यार्थ्यांचे होते, नंतर (बहुदा या घटनेमागचा गंभीरपणा लक्षात आल्यानंतर) विमाने आणि हेलीकॉप्टर सह पोलीस व आर्मी सहभागी झाले.
अथक प्रयत्नांनंतर २६ फेब्रुवारीला शोधपथकला कँपसाईट सापडली, ट्रेकर्सचा तंबू विदीर्ण अवस्थेत सापडला.
तंबूपासून ५०० मीटर अंतरापर्यंत पाऊलखुणा दिसत होत्या, पाऊलखुणांच्या आधारे एका मोठया पाईन वृक्षाजवळ शोधल्यानंतर तिथे जळालेली लाकडे सापडली आणि जवळच दोन मृतदेह मिळाले. Yuri Krivonischenko आणि Yuri Doroshenko. दोन्ही मृतदेहांवर फक्त हाफ पँट (Underclothes) होत्या आणि दोघांचेही बूट गायब होते.
तिथून तंबूच्या दिशेने ३०० मीटर अंतरावर गृप लीडर Igor Dyatlov मृतावस्थेत सापडला.
Igor Dyatlov पासून तंबूच्या दिशेने १८० मीटर अंतरावर Rustem Slobodin तर तिथून आणखी पुढे १५० मीटर अंतरावर Zinaida Kolmogorov चे अवशेष सापडले.
हे पाचही जण कडाक्याच्या थंडीमुळे गोठून मरण पावलेले होते. Rustem Slobodin ची कवटी फ्रॅक्चर झाली होती, मात्र मृत्यू गोठल्यामुळेच आला होता.
यानंतर बाकीचे मृतदेह सापडले ४ मे १९५९ ला, तब्बल ६७ दिवसांनी. एका ४ मीटर खोल घळईमध्ये, त्या पाईन वृक्षापासून कँपसाईटच्या अगदी विरूध्द दिशेने...
या चारहीजणांना मृत्यू अत्यंत वेदनादायी आणि भयाण पध्दतीने आला होता.
Nicolai Thibeaux-Brignolle - कवटीचा चक्काचूर झाल्याने व कडाक्याच्या थंडीने मृत्यू.
Lyudmila Dubinina - बरगड्या मोडल्याने व त्यातील कांही बरगड्या हृदयामध्ये शिरून अतीजास्त अंतर्गत रक्तस्त्रावामुळे मृत्यू. या २१ वर्षीय मुलीची जीभ, डोळे, वरच्या ओठाचे मांस आणि जबड्याचा आतला काही भाग गायब होता, हिच्या पायांभोवती Yuri Krivonischenko ची पँट गुंडाळलेली होती (ज्याचा मृतदेह सगळ्यात पहिला सापडला त्याची पँट) तसेच कपड्यांवर किरणोत्साराचे पुरावे सापडले.
Alexander Zolotarev - याचेही डोळे गायब होते बरगड्या मोडल्याने व कडाक्याच्या थंडीने गोठून मृत्यू. याच्या अंगावर Lyudmila चा कोट व हॅट सापडली तसेच याच्याही कपड्यांवर किरणोत्साराचे पुरावे सापडले. (याच्या आणि Lyudmila च्या जखमा सारख्या असल्या तरी त्यांचे स्वरूप खूप वेगळे होते, एकाच घटनेमुळे; उदा. घळईत पडणे. या जखमा झालेल्या नव्हत्या)
Alexander Kolevatov - फ्रॅक्चर झालेली मान, बाकी कोणत्याही मोठ्या जखमा नाहीत, कडाक्याच्या थंडीने गोठून मृत्यू.
सर्वात गूढ प्रकार म्हणजे, कांही मृतांचे केस विचित्र करड्या रंगाचे झाले होते, त्वचेचा रंग लालसर झाला होता आणि कांही जण शेवटी शेवटी दृष्टीहीन झाले होते.
हे सगळे पाहून चक्रावून गेलेल्या शोधपथकाने शक्य तितके पुरावे गोळा केले. त्यावरून निघालेले निष्कर्ष पुढील प्रमाणे.
१) रात्री ०९:३० च्या दरम्यान कोणत्यातरी अज्ञात कारणाने घाबरलेले सर्वजण अत्यंत घाईगडबडीत तंबू आतून फाडून बाहेर पडले व जंगलात पळाले. तंबूची दारे सोडवण्याइतका वेळ त्यांच्याकडे नव्हता.
जंगलात पळण्याचा मार्ग लाल रेषेत (२००४ साली घेतलेल्या फोटोवर १९५९ चा फोटो चिकटवलेला आहे)
तंबूची अवस्था - बर्फातून बाहेर काढल्यानंतरची.
२) तंबूच्या आत तयार केलेल्या कृत्रीम उष्णतेमुळे, एकतर कांहीजण कमी कपड्यात झोपायच्या तयारीत होते अथवा कपडे बदलत असताना कांहीतरी घडल्यामुळे पाईन वृक्षाचा आश्रय घेताना बरेच जण पूर्ण कपड्यांमध्ये नव्हते, बाहेरचे वातावरण पाहता आपण अशा हवेत (-25C ते -30C) फार काळ जगू शकणार नाही याची सर्वांना जाणीव होती, तरीही बूट, गरम कपडे व छोट्या सुर्याही बरोबर घेतल्या गेल्या नाहीत.
३) सर्वजण आपापल्या पायांवर चालत / पळत तंबूपासून निघाले, शरीरावरील सर्व जखमा तंबू सोडल्यानंतर झाल्या होत्या.
४) तंबू सोडल्यानंतर विस्कळीत झालेले हे सर्वजण ३०० / ४०० मीटर अंतरावर एकत्र आले, सर्वजण पाईन वृक्षाजवळ लपून राहिले नंतर त्यांनी लाकडे पेटवून उष्णता निर्माण करायचा प्रयत्न केला.
५) एक दोघांनी पाईन वृक्षावर चढून तंबूजवळ काय चालले आहे याचे निरीक्षण केले, झाडाच्या फांद्यांवर मानवी त्वचेचे पुरावे सापडले.
६) या सगळ्या घटनेदरम्यान सर्वजण मानसीक व शारिरीक दृष्ट्या व्यवस्थीत होते. लाकडे जाळून उष्णता तयार करणे, झाडावर चढून टेहळणी करणे, कमी कपडे घातलेल्या साथीदारांसाठी उपलब्ध कपड्यांची देवाण घेवाण करणे अथवा आपल्या मृत साथीदारांच्या कपड्यांच्या सहाय्याने थंडीचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करणे ही कांही उदाहरणे. यांवरून दृष्टीभ्रम, बुध्दीभ्रम या शक्यता निकालात निघतात.
७) Igor Dyatlov, Rustem Slobodin आणि Zinaida Kolmogorov हे तंबूत परत जाण्याच्या प्रयत्नात टप्प्याटप्याने गोठून मरण पावले.
८) Yuri Krivonischenko आणि Yuri Doroshenko यांचा कडाक्याच्या थंडीत गोठून मृत्यू झाला. यांचा मृत्यू झाल्याने वरील तिघांनी गरजेच्या वस्तूंसाठी तंबूकडे जाण्याचे ठरवले की तिघांची वाट पाहताना या दोघांचा मृत्यू झाला हे अस्पष्ट आहे.
९) वरील तिघेजण परत येत नाहीत याची खात्री पटल्यानंतर व दोन साथीदार मरण पावल्यानंतर, इतर चार जणांनी आपल्या मृत सहकार्यांच्या अंगावरील कपडे स्वत:साठी घेतले व मदत शोधण्यासाठी विरूध्द दिशेने जाण्यास सुरूवात केली.
१०) थोड्याच अंतरावर यां सर्वांनी स्वतःसाठी बर्फात एक जागा तयार केली व त्या घळईत उतरले, या जागेच्या तळात शरीराचा बर्फाशी संपर्क टाळण्यासाठी पाईन वृक्षाची लाकडे ठेवलेली आढळली.
११) या घळईत उतरताना / आणखी एखाद्या खोल घळईत उतरताना (बहुदा अपघात होवून) Nicolai मरण पावला, Dubinina चा ही अंतर्गत रक्तस्त्रावामुळे मृत्यू झाला, तिचा कोट आणि हॅट Zolotarev ने घेतले, थोड्याच वेळात त्याचाही जखमांमुळे व गोठल्यामुळे मृत्यू झाला.
१२) एकटा पडलेला,घाबरलेला व प्रचंड थंडीत गारठलेला Alexander Kolevatov दमून झोपी गेला - पुन्हा कधीही न उठण्यासाठी.
(मृतदेहांचे फोटो जालावर उपलब्ध आहेत पण अत्यंत वाईट अवस्थेत असल्याने इथे देत नाही)
कांही अनुत्तरीत प्रश्न
(मिपाकरांनी उत्तरे शोधली तरी हरकत नाही.)
१) मृतांचे केस विचित्र करड्या रंगाचे होणे, त्वचेचा रंग लालसर होणे आणि कांही जण शेवटी शेवटी दृष्टीहीन झाले याचे कारण काय असावे..? (कोणी शास्त्रज्ञ मदत करू शकेल काय..)
२) तंबूत परत येण्याच्या प्रयत्नात टप्प्याटप्याने मरण पावलेल्या तिघांचे शव हिमवृष्टीमुळे झाकले गेलेले होते, मात्र त्याच पठारावर त्यांच्या पाऊलखुणा स्पष्ट दिसत होत्या, हे कसे शक्य आहे..?
३) Lyudmila Dubinina च्या चेहर्याची अमानवीय अवस्था (जीभ, डोळे, वरच्या ओठांचे मांस आणि जबड्याचा आतला काही भाग गायब होणे) कशामुळे झाली असावी..? तसेच तिच्या पोस्टमॉर्टम मध्ये घशातल्या स्नायूंबद्दल काहीच का लिहिले नाहीये..?
४) फक्त ४ मीटर खोल कोसळयाने इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या जखमा होणे शक्य आहे का..?
५) कवटी आणि बरगड्यांचे फ्रॅक्चर्स हे कोणत्याही मानवी ताकतीपेक्षा जास्त दबावामुळे झाले, तो दबाव नक्की कशाचा असावा..?
६) तिथल्या आदिवासी लोकांचा या सर्वांमध्ये कांही हात आहे का..?
७) शोधपथकाला तिथे अन्य कोणत्याही मानवी / प्राण्यांच्या वावराचे पुरावे सापडले नाहीत तरीही तिथे या टीमच्या नसलेल्या कांही वस्तू सापडल्या, हे कशामुळे..?
८) Kolevatov ची नाहीशी झालेली डायरी व एक कॅमेरा शोधपथकाला सापडले होते का..? असल्यास ते कुठे आहे..?
९) त्या पर्वतावर दुरून कांही जणांनी विचित्र लालसर प्रकाश पाहिला, त्या प्रकाशाचा आणि लालसर त्वचेचा कांही संबंध आहे का..?
१०) किरणोत्साराचे अंश कोठून आले..?
तिथे मिळालेले पुरावे व त्यावरून निघालेले निष्कर्ष शोधतपासाच्या दृष्टीने अत्यंत वेगवेगळे दिशा दाखवतात, नक्की काय झाले हे गूढच आहे अजून.
रशीयातील Yekaterinburg येथे 'उरल स्टेट टेक्नीकल युनीव्हर्सीटी' च्या मदतीने Dyatlov Foundation स्थापन झाले आहे, फाऊंडेशनने दुर्दैवी ट्रेकर्सच्या आठवणी म्युझीयम मध्ये जतन केलेल्या आहेत व सरकारकडे जुन्या कागदपत्रांच्या तपासणीसाठी पाठपुरावा करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
मेमोरीयल.
If I had a chance to ask God just one question, it would be,"What really happened to my friends that night?"
Yuri Yudin च्या या प्रश्नामधील आक्रोश आजही अनुत्तरीतच आहे. :-(
शक्य झाले तर "पार्ट २ - कॉन्स्पीरसी थिअरीज" नाहीतर इथेच शेवट.
***डिस्क्लेमर्स***
ट्रेकर्सची नावे मुद्दाम इंग्रजीत लिहिली आहेत - अजाणतेपणेही मृतांच्या नावाचा चुकीचा उच्चार होवू नये म्हणून.
हे कोडे ५३ वर्षांनंतर आजही अनुत्तरीत आहे. नक्की काय झाले असावे याचा अंदाज बाधून कोणाला चर्चा करायची असल्यास स्वागत आहे, एखादा नवीन मुद्दा असल्यासही स्वागत.
सर्व माहिती व फोटो आंतरजालावरून, साभार.
(अशा घटनांची लेखमाला करावी असा विचार आहे, पुढचा भाग "एव्हरेस्ट ला जाताना झालेले अपघात व मृत्यू" वाचकांचा होरा काय..?)
प्रतिक्रिया
31 May 2012 - 5:37 am | स्पंदना
वाचुन थरथराट झाला. अन अक्कल अतर अजिबातच चालत नाही आहे. खुपच इंटरेस्टींग आहे.
पुढेल भागाची प्रतिक्षा, अन जाणकारांच्या प्रतिक्रिया वाचण्याची उत्सुकता.
31 May 2012 - 5:42 am | शिल्पा ब
अरे बापरे!!
ज्या अनोळखी वस्तु सापडल्या त्या काय होत्या? म्हणजे मानवनिर्मीत की नैसर्गिक?
31 May 2012 - 5:53 am | मोदक
मानवनिर्मीत होत्या..
कोटाचे तुकडे, बुटाचे कांही भाग अशा वस्तू होत्या, त्या वस्तू दुर्दैवी ट्रेकर्सच्या नव्हत्या पण कदाचित पहिल्या शोधपथकातून गेलेल्या लोकांच्या असाव्यात असा अंदाज आहे, पण त्याला पुष्टी देणारे कोणतेही पुरावे सापडले नाहीत.
Metal Scrap पण सापडले.. तिथून थोडे लांब. त्याचा कांही संबंध आहे की नाही याचीही माहिती नाही. :-(
1 Jun 2012 - 9:47 am | अमितसांगली
जर त्यांना मारण्याचा कोणी प्रयत्न केला असता तर त्यांनी पाउलखूणा नष्ट केल्या असत्या....
31 May 2012 - 5:44 am | अत्रुप्त आत्मा
खरच गूढ आणी अतर्क्य आहे हे सगळं,सगळा मृत्यूचा खेळ हदरवुन टाकणारा आहे. प्राणी हल्ल्याचे पुरावे मिळाले नसले,तरि तोही संभव आहेच.केस त्वचेचा बदललेला रंग हे प्रकार तश्या अवस्थेतल्या मृत शरिराचे पुढचे विघटन वाटतात.
31 May 2012 - 6:26 am | रेवती
हा भाग वाचला ते ठीक आहे पण असलं काही भयानक मी तरी वाचणार नाही.
31 May 2012 - 7:10 am | टवाळ कार्टा
रौसवेल बद्दल पण एक भाग होउन जाउदे
31 May 2012 - 7:55 am | ५० फक्त
मस्त लिहिलं आहेस, याबद्दल पुर्वी कधी ऐकलेलं वा वाचलेलं नव्हतं.
अवांतर - श्री. यकुंकडे तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं असु शकतील. संपर्क साध.
31 May 2012 - 1:38 pm | संजय क्षीरसागर
:)
31 May 2012 - 8:06 am | टुकुल
नविनच विषय आणि आधी कधी न ऐकलेली घटना मस्त जुळुन आली आहे आणि चांगल लिहिलेल हि आहे. मधेच तंबु फाडुन पळायला अस काय झाल असेल? एखाद जनावर (साप, विंचु) आल तरी तंबुतुन फक्त बाहेर पडण पुरेस आहे, एव्हढ घाबरुन दुर पळायला काय कारण असेल?
<<अशा घटनांची लेखमाला करावी असा विचार आहे
विचार पक्का करुन टाका :-)
--टुकुल
31 May 2012 - 8:46 am | प्रचेतस
छान लिहिलंस.
शीतयुद्धाचा तो काळ. रशियाच्या साम्यवादी पकडीखालील सैन्याचे काहीतरी प्रयोग चालू असावेत. (कदाचित आण्विक प्रयोग- मृतांच्या कपड्यांवरील किरणोत्सारांचा अंश )ह्या लोकांनी नको ते, नको त्या वेळी पाहिले असावे ज्याची परीणती त्यांच्या मृत्युत व्हावी. नेमके काय झाले ते पोलादी पडद्याआड कधीच दडून गेले असावे.
31 May 2012 - 12:14 pm | शिल्पा ब
स्वारी.
31 May 2012 - 10:13 am | शिल्पा ब
संभाव्य आहे.. अन वर लेखात कुठेतरी म्हंटलंय की लोकांना दुरवर डोंगरावर कसलातरी लाल प्रकाश दिसला म्हणुन.तो कदाचित रशियन सरकारने केलेल्या चाचणीचा असु शकतो.
31 May 2012 - 10:17 pm | अर्धवटराव
असेच म्हणतो.
अर्धवटराव
31 May 2012 - 10:35 pm | पैसा
लेख छान आहे. पुढचा भाग वाचायला नक्कीच आवडेल. पण काहीतरी अमानवी वगैरे गोष्टींपेक्षा वल्ली म्हणतोय ती शक्यता असू शकेल.
31 May 2012 - 9:30 am | जेनी...
अतिशय ह्रुदयद्रावक घटना आहे . प्रतिक्रिया काय द्यावी नेमकी हेच कळत नाहिय .
पूढचे भाग कदाचित वाचु शकणार नाहि .
क्षमस्व :(
31 May 2012 - 10:08 am | कवटी
मोदकराव,
फारच छान लिहिलय....
लेखमालेच विचार स्तुत्य आहे.
विशेष म्हणजे उगाच आपले एखाद्या फेपरातली बातमी इकडे डकवायची आणि कुत्र्या समोर हाडूक टाकल्यासारखे ' हे वाचा अन करा चर्चा' असला प्रकार तुम्ही केला नाहीत हे आवडले.
पुढचे भाग वाचण्यास उत्सुक!
31 May 2012 - 10:10 am | शिल्पा ब
<<विशेष म्हणजे उगाच आपले एखाद्या फेपरातली बातमी इकडे डकवायची आणि कुत्र्या समोर हाडूक टाकल्यासारखे ' हे वाचा अन करा चर्चा' असला प्रकार तुम्ही केला नाहीत हे आवडले.
फिस्सकन हसु आलं उपमा वाचुन :)
31 May 2012 - 10:08 am | मृत्युन्जय
नविन काहितरी वाचले. खरेच थरारक. असेच नवनविन काहितरी घेउन येत रहा रे बाबा. पुलेशु,
या बद्दल असलेली इतर काही मते असतील तर आम्हाला जरुर सांग.
31 May 2012 - 10:25 am | बॅटमॅन
विंट्रेस्टिंग!!!!
31 May 2012 - 11:09 am | उदय के'सागर
बाप रे.... सुन्नच झालो वाचुन ज्या पद्धतीने त्यांचे मृतदेह आढळले...
बाकि छानच लिहीलय तुम्ही थोडक्यात पण परीणामकारक...
(हे ऐकायला खुप अघोरी आणि क्रूर वाटेल पण अश्या गूढ सत्य-कथा वाचायला खुप आवडतं !!!)
अशा घटनांची लेखमाला करावी असा विचार आहे, पुढचा भाग "एव्हरेस्ट ला जाताना झालेले अपघात व मृत्यू" वाचकांचा होरा काय..? >>>> अगदी अगदी येऊ द्या... प्लीज....!!!
31 May 2012 - 11:36 am | jaypal
उद्य शी संपुर्ण सहमत
31 May 2012 - 11:34 am | सूड
छान लिहीलंय.
31 May 2012 - 11:42 am | मस्त कलंदर
नवीन माहिती कळाली. पुढील भागांच्या प्रतिक्षेत!
31 May 2012 - 12:00 pm | गवि
अत्यंत थरारक..
एव्हरेस्टवरील मालिकेची उत्कंठेने वाट पाहात आहे.
31 May 2012 - 12:02 pm | राजघराणं
पुढील भागाच्या प्रतिक्षेत
31 May 2012 - 12:24 pm | बिपिन कार्यकर्ते
बाप रे! थरकाप उडवणारी घटना.
31 May 2012 - 12:39 pm | जातीवंत भटका
याच झाडाखाली पहिले दोन मृतदेह मिळाले.
31 May 2012 - 10:14 pm | अर्धवटराव
तु तिथे पण भटकंती करायच्या विचारात आहेस होय? जात असशील तर सांग... मी पण येतो सोबतीला. जाताना मिपावरचे काहि उद्बोधक धागे रशियन (आणि बायनरी ) भाषेत ट्रांस्लेट करुन घेऊन जाऊ...म्हणजे "ते" जे काहि जीवघेणं वगैरे असेल त्याला घाबरवुन पळवता येईल ;)
अर्धवटराव
31 May 2012 - 12:49 pm | परिकथेतील राजकुमार
पहिल्यांदाच हा थरार वाचतो आहे.
'छान लिहिले आहे' असे तरी कसे म्हणावे ?
इथे काही प्रश्नांची जमेल तशी शोधलेली उत्तरे वाचायला मिळाली.
31 May 2012 - 1:04 pm | मोदक
धन्स परा..
मेन प्रॉब्लेम म्हणजे त्यावेळच्या सरकारने बर्याच गोष्टी लपवल्या आहेत, त्यामुळे सध्या अत्यंत वेगवेगळी माहिती उपलब्ध आहे.
त्यातल्या त्यात पडताळून लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.
1 Jun 2012 - 1:17 pm | जातीवंत भटका
इथे आहे
http://www.youtube.com/watch?v=m5KmbuSrqEk&feature=endscreen&NR=1
5 Jun 2012 - 12:08 am | शिल्पा ब
याचा संबंध UFO अन एलियन यांच्याशी लावताना बघुन अंमळ गंमत वाटली.
एलियन, समांतर पोर्टल अन खरोखरच हे सगळं पाहीलेलं आहे असं गृहीत धरुन केलेले भाषण गंमतीदार वाटले.
या क्रुर घटनेशी दुसरा काहीही संबंध असु शकतो. सत्य कल्पितापेक्षा भयंकर असु शकते म्हणतात!
31 May 2012 - 1:04 pm | अमृत
वाचून अंगावर काटा आला. लिखाणाची शैली आवडली. अजून येऊ देत.
वर म्हटल्याप्रमाणे कदाचित या दुर्दैवी लोकांनी नको ते पाहीलं असणार आणि त्यची परिणीती म्हणजे रशियन सैनिकांनी त्यांचा केलेला खून (?) पण तरी एक शंका आहे जर या गटाने काही पाहीले असते तर त्यांचे मृतदेह शक्यतोवर एक्मेकांजवळ अन् जिथून त्यांनी ती सैनिकी घटना पाहिली तिथे मिळायला हवे होते. जेणेकरून जसेच सैनिकांच्या ही गोष्ट ध्यानात आली त्यांनी लगेच या गटाला मारून टाकले बंदूक वा इतर श्स्त्रे न वापरता जेणेकरून कुणाला संशय येऊ नये. सोबतच त्यांच्या अंगावर कपडेसुद्धा सापडायला हवे होते कारण इअतक्या कडाक्याच्या थंडीत जर हे सगळे काही लपून बघायाला गेलेत तर नक्कीच योग्य खबरदारी त्यांनी घेतली असती. अजून एक शंका जर सैनिकांनी पाठलाग करून एक एक करून त्यांना मारले तर पाइन वृक्षाखाली शेकोटी पेटविण्याचे कारण काय त्याऐवजी शक्य तितके दूर पळून जायला हवे होते.
(अर्थातच हे आपले अकलेचे तारे.)
अमृत
31 May 2012 - 10:20 pm | अर्धवटराव
यातले बरेचसे "पुरावे" मुद्दाम तयार केलेले असणार... घटनेला "कॉन्स्परसी थेअरी टच" द्यायला म्हणुन...
अर्धवटराव
31 May 2012 - 1:08 pm | प्रीत-मोहर
पुलेशु. एवढेच म्हण्ते.
31 May 2012 - 1:31 pm | गोंधळी
बापरे ..........खुपच थरारक अनुभव ......
31 May 2012 - 1:39 pm | गवि
किरणोत्साराचा पुरावा ही बरीच जनरल कन्सेप्ट आहे. वेगवेगळ्या प्रदेशात अनेक नागरिकांच्या शरीरामधे किरणोत्साराचे काही परिणाम टेस्ट केल्यास सापडतात. ती किरणोत्सार करणारी घटना या मोहिमेदरम्यानच तिथे जवळपास घडली असं म्हणावं तर किरणोत्साराचे अंश सर्वांच्या शरीरावर मिळायला हवे होते (आणि आजुबाजूच्या मातीत, वृक्षांमधे अनेक वर्षे टिकून राहिलेले आढळायला हवे होते.) काहींच्याच मिळणं हे न समजण्यासारखं आहे.
फार म्हणजे फारच वर्षं होऊन गेली आहेत मधे. आता काहीही शोधणं म्हणजे निव्वळ तर्कवितर्क.
तरी यांचे मृतदेह तरी मिळाले. असे कित्येकजण आहेत की ते जे मोहिमेवर /विमानप्रवासाला / जहाजावर गेले ते गेलेच..
31 May 2012 - 3:09 pm | मोहनराव
भयानक आहे हे... तुम्ही लिहाच पुढचे भाग.. कॉन्स्पीरसी थिअरीज वाचायला खुप आवडतात.
पण नेमके काय झाले असेल बरे? काही कळायला मार्ग नाही. :(
31 May 2012 - 3:24 pm | आबा
इन्टरेस्टींग !
31 May 2012 - 3:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नेमक काय घडलं असावं हे सांगता येत नाही. केवळ अंदाज बांधता येतात.
वर्णन वाचतांना डिस्कव्हरीवरच्या आय शुडन्ट बी अलाइव्ह या कार्यक्रमाची आठवण झाली.
-दिलीप बिरुटे
31 May 2012 - 5:56 pm | तिमा
तिथे अचानक परग्रहावरचे एलियन्स येऊन त्यांची सँपल्स घेऊन गेले असतील का ?
31 May 2012 - 5:56 pm | स्वच्छंदी_मनोज
ह्या बद्दल पहील्यांदाच ऐकतो आहे.. ह्या विशयीची काहीतरी नवीन माहीती दिल्याबद्दल धन्यवाद.
जसे सागरी जहाजांच्या कॅप्टनना लॉगबूक बाळगणे आणी दररोज लिहीणे कंपल्सरी असते. तसे काही या मोहीमेत नसावे काय? असल्यास तशे लॉगबूक सापडले काय? अर्थात वर वल्ली म्हनतात तसे शितयुद्धाच्या काळातील साम्यवादी रशियाने तसे काही पुरावे मागे ठेवल्याची शक्यता कमीच.. आणी मिळाले त्यापेक्षा लपवलेले पुरावेच अधीक असण्याची शक्यता...
अजून अशा काही घटनांवर लेख लिहा...जसे की 1986 K2 Disaster (ह्याच्यावरच बहूदा Vertical Limit) सिनेमा बेतलेला आहे...
31 May 2012 - 10:01 pm | मोदक
डायर्या होत्या.. कांही सापडल्या, कांही नाही. कॅमेरेपण होते.
पण त्यांच्या सहाय्याने माहिती इतकीच मिळते की त्या रात्रीपर्यंत सर्वजण ठीक होते, चांगल्या मनस्थितीत होते. रात्री ०९:३० नंतर नक्की काय झाले ते कधीच कळाले नाही. :-(
त्या रात्री कांही लिहिण्याइतका वेळ असता तर ते सगळे जण Gear Up झाले असते, थंडीचे कपडे, बूट, खाद्यपदार्थ, हत्यारे, स्कीज वगैरे घेवून पळाले असते.
31 May 2012 - 9:03 pm | स्मिता.
या घटनेबद्दल पहिल्यांदाच वाचले, वाचतांना मनाचा थरकाप उडाला.
अशी लेखमाला करायला हरकत नाही. वाचायला मजा येत नाही पण जगात काय-काय घडतं हे तरी कळतं.
31 May 2012 - 10:28 pm | भरत कुलकर्णी
फारच भयानक
31 May 2012 - 10:56 pm | श्रीरंग_जोशी
थरारक पण मनाला चटका लावून जाणारी घटना...
लेखनशैली आवडली... पुढील लेखनाच्या प्रतिक्षेत...!
31 May 2012 - 11:37 pm | सुनील
एखादी थरार कथा वाचल्यासारखे वाटतेय. लेखमालेचा विचार उत्तम. ताबडतोब अमलात आणावा, ही विनंती!
अवांतर - बर्फाळ प्रदेशात अशा अनाकलनीय घटना घडत असाव्यात म्हणूनच कदाचित हिमालयात "यती" चे अस्तित्व असल्याचे कल्पिले जाते.
1 Jun 2012 - 12:00 am | छोटा डॉन
असल्या अचाट घटनांची उत्तरे शोधणे हे आमच्या आवाक्यातले काम नाही
>>एखादी थरार कथा वाचल्यासारखे वाटतेय. लेखमालेचा विचार उत्तम. ताबडतोब अमलात आणावा, ही विनंती!
+१, हेच म्हणतो.
लेखमालेचा विचार पक्का करावा ही आग्रहाची विनंती
- छोटा डॉन
1 Jun 2012 - 9:55 am | प्यारे१
लेखमाला लिहाच्च.
एवढं राक्षसी ताकदीचं काय होतं ज्यानं बरगड्या तुटल्या, हृदयात घुसल्या?
वाईट मरण आलं ह्या लोकांना. :(
1 Jun 2012 - 10:54 am | दिपक
>>>लेखमाला लिहाच्च.
प्रचंड अनुमोदन.
भयानक आहे सगळं. वाचताना पुढे काय झालं असेल ह्याचं जबरदस्त दडपण आलेलं. "truth is stranger than fiction" ह्या वाक्याची आठवण झाली.
1 Jun 2012 - 11:33 am | अत्रुप्त आत्मा
+४
1 Jun 2012 - 12:06 pm | कवितानागेश
यातले सत्य कधी बाहेर येइल असे वाटत नाही. :(
रशियन्स......
2 Jun 2012 - 9:54 pm | सुहास..
लय भयानक होत ...आधी वाचल होते या विषयी ..अजुन लिही ...
रशियन अर्काव्हर्स क्लब
पुणे
3 Jun 2012 - 5:30 pm | विजय_आंग्रे
अमेरीका आणि रशिया या दोघामध्ये सुरु असलेली अवकाशात व चंद्रावर प्रथम कोण जाते या मधली चढाओढ या काळात जोर पकडत होती. १९५५ नंतर या भागात रशियाने अवकाशात उपग्रह व मानवी कॅप्सुल वाहुन नेता येऊ शकतील अश्या अनेक मोठ्या रॉकेटचे परिक्षण केले होते. आणि त्यातील बरेचसे प्रयत्न अयशस्वीही झाले होते आणि त्यामध्ये ते रॉकेट हवेत उडण्याआधीच लाँचपॅडवरच नष्ट झालेत, आणि यात अनेक रशियन वैज्ञानिक व सैन्यातील अधिकारीही मारले गेले होते, यातील काही घटना पुढे जवळ-जवळ चाळीस वर्षे गुप्त ठेवण्यात आल्या होत्या, आणि त्यातील काही आजही गुप्त आहेत. यापैकीच एकाद्या असफल परिक्षणात झालेल्या स्फोटाने ते गिर्यारोहक घाबरुन वरिल अपघात घडण्याची शक्यता आहे.
4 Jun 2012 - 6:11 pm | वपाडाव
Vertical Limit हा सिनेमा पाहिला होता तेव्हा थोडीशी धांदरली होती. पण हे असलं काही अकल्पित आहे.
"सिडनी शेल्डन" जिवंत असता तर त्यालाच विचारले असते.
5 Jun 2012 - 1:36 pm | Maharani
भयानकच आहे हे.
त्यांचा camera नंतर मिळाला होता का site वर? पहिले दोन फोटो ट्रेक दरम्यानचे दिसताहेत.
लेखमाला वाचायला आवडेल.
8 Jun 2012 - 12:38 am | मोदक
ह्म्म..
त्यातूनच मिळालेले फोटो आहेत.
हा एक फोटो अत्यंत गूढ समजला जातो. नक्की काय आहे तेच कळत नाही. (आता हा चुकून फ्लॅश उडालेला फोटो नसावा म्हणजे मिळवले..)
10 Apr 2015 - 3:56 pm | शशिका॑त गराडे
मन सुन्न झाले .........
7 Dec 2016 - 2:35 pm | अमरप्रेम
एखादा बर्फाळ प्रदेशातला राक्षसी ताकदीचा प्राणी तंबूमध्ये घुसला असल्यामुळे सर्वजण घाई घाईत बाहेर पडले आणि नंतर त्या प्राण्याने केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडले, हि शक्यता नाकारता येत नाही. पण तरीही किरणोत्सर्गाचा प्रश्न अनुत्तरीतच राहतो.
6 Jan 2017 - 2:32 am | रुपी
काय भयानक आहे! वाचताना वाईट वाटले, पण काहीतरी नवीन माहिती मिळाली..
30 Jan 2021 - 11:16 am | रुपी
या घटनेबद्दल हा लेख वाचूनच समजले होते. आत्ताच National Geographic वर एक लेख वाचला, ज्यात स्वित्झर्लंड मध्ये संशोधकांनी यातील काही उत्तरे कदाचित शोधली असावीत असे लिहिले आहे. ही लिंक:
https://api.nationalgeographic.com/distribution/public/amp/science/2021/01/has-science-solved-history-greatest-adventure-mystery-dyatlov
2 Feb 2021 - 3:01 am | डाम्बिस बोका
https://arstechnica.com/science/2021/01/9-russian-adventurers-mysterious...