http://www.misalpav.com/node/20841
पासून पुढे
त्या रविवारी पुणे विद्यापीठातील आयुका ही खगोलशास्त्राच्या नामांकीत संस्थेत दाखल झाले. तिथे स्वागतकक्षात श्री. अरविंद परांजपे यांना भेटले. त्यांनी तिथल्या सर्व औपचारिकता सांगितल्या, तसेच निधीचा दूरध्वनी क्रमांक दिला. ती आणि मी असे दोघी मिळून आम्ही हा प्रोजेक्ट करणार होतो. नंतर ग्रंथालयात जाऊन कार्ड बनवून घेतले. तिथल्या वातावरणात खूप उत्साही वाटत असे. ग्रंथालयात एक से एक पुस्तके वाचण्यात दिवस कसा संपला, ते कळलेच नाही.
मग आम्ही हवेतच तरंगत (बसमधून हो.....;)) घरी गेलो. लगोलग फर्ग्युसन कॉलेजमधल्या निधीला फोन केला.
निधी: आपण येत्या रविवारी आयुकात भेटूया, पण आपण एकमेकींना ओळखणार कसे?
मी: आपण निळ्या रंगाचे कपडे घालून येवू, ओके?
तिला कल्पना आवड्ली.
रविवारी मी आणि निधी भेट्लो. आयुकात इतर कोणी मुली नसल्याने आम्ही लगेच एकमेकींना ओळ्खले. हाय वगैरे झाल्यावर परांजपे सरांना एकत्र जाऊन भेट्लो. त्यांनी ऑकल्टेशन (पिधान) हा विषय प्रोजेक्टसाठी दिला. आम्ही तासन तास ग्रंथालयात बसून पुस्तके वाचत असायचो, नोट्स काढायचो. संध्याकाळी ५-५.३० वाजता तेथून बाहेर पडायचो. मग कुठे चहा प्यायचो, कधी नाष्टा करायचो. आमची चांगलीच गट्टी जमली होती.
आतापर्यंत आमच्याकडे भरपूर माहिती गोळा झाली होती. पिधान ही ग्रहणासारखीच क्रिया असते. फक्त यात छोटासा तारा किंवा ग्रह दुसर्या तार्याने किंवा ग्रहाने झाकला जातो.
मग आमची प्रत्यक्ष पिधान पाहण्याची सुरुवात झाली. ऑक्टोंबरनंतर आकाश निरभ्र असते. तेव्हा आकाशदर्शन केले जाते. आम्ही सांगितलेल्या दिवशी संध्याकाळी आयुकात पोचत असू. तिथल्या दुर्बिणीतून आकाशदर्शन म्हणजे एक पर्वणीच असायची. त्या दुर्बिणीतून मंगळ, बुध, गुरु व शनि खुप विलोभनीय दिसायचे. चक्क आम्ही झोपाळूदेखील रात्री १-२ (कधी कधी जास्तच..) वाजेपर्यंत जागे असायचो. जे काही निरीक्षण केले जायचे ते डिजीट्ली रेकॉर्ड होत असे. त्याची कॉपी तसेच नोट्स सर आम्हांला देत. नंतर तिथेच गेस्ट हाऊस मधे आराम करून आम्ही सकाळी घर गाठायचो. सकाळी पुन्हा ११ ते ५ कॉलेज. लेक्चरला मात्र आमच्यावर निद्रादेवी प्रसन्न असायची. नंतर प्रॅक्टीकल करून घरी जायचो. तरीही उत्साह दांडगा होता. कधी कधी घरी जाम बोलणी बसायची. आम्ही घरचे पाहुणे झालो होतो ना. पण अण्णा(वडिल) आमची बाजू सांभाळायचे.
अधूनमधून आयुकात असलेल्या लेक्चरला जाऊन बसायचो. तिथे क्वेस्सार, पल्सार, ब्लॅक होल वगैरे बरेचसे ऐकून यायचो. तो काळ म्हणजे आम्ही अंतरिक्षात असल्यासारखा वाटायचा.
जानेवारी फेब्रुवारी मधे प्रोजेक्टवर शेवटचा हात फिरवायचा होता. तेवढ्यात कॉलेजच्या सरांनी सांगितले, संगणकावर प्रोजेक्ट कुणीही टाईप करेल. तुम्ही स्वहस्ते तुमचा प्रोजेक्ट लिहून आणा आणि इंग्रजीतूनच परिक्षकांसमोर सादर करा.
झाले......आमचे धाबे चांगलेच दणाणले. हाताने लिहीणे आम्हाला मान्य होते, पण इंग्रजीतून समजावून सांगणे म्हणजे अवघड होते. ;)
एक चांगला शाईपेन आणून व्यवस्थित १०० पानी उपक्रम लिहून काढला. सर्व मुद्दे सोप्या भाषेत लिहीले, जेणेकरुन काहीही विचारले तरी सांगता येइल. शेजारच्या, कॉलेजच्या मैत्रिणी जमवून त्यांच्यासमोर प्रोजेक्ट्च्या सादरीकरणाच्या रंगीत तालमी करत असे.
आता एकदाचा तो दिवस उजाड्ला. सादरीकरणाच्या दिवशी जे काही संदर्भासाठी नोट्स काढ्ल्या होत्या ते सर्व, मुख्य प्रोजेक्ट (हाताने लिहिलेला), त्याची एक झेरॉक्स कॉपी अशी आयुधे घेऊन सरांसमोर दाखल झाले. एक बाहेरचे शिक्षक आणि एक कॉलेजमधले असे दोन परिक्षक बसले होते. भरपूर सरावाने आत्मविश्वास होता, पण धड्धड होत होती.
पटापट सर्व सरांसमोर ठेवले. एकाच प्रश्नावर सर्व उपक्रम परिक्षकांना एका दमात सांगून टाकला. माझी तयारी बघून कोणीही मला मधे प्रश्न विचारला नाही. बाहेर आले तेव्हा जाणवले हातपाय किती लटपटत होते.
............काही दिवसांनी.....
परीक्षेचे निकाल लागले. माझ्या प्रोजेक्ट्मधे मला इतर सर्व विषयांपेक्षा जास्त गुण मिळाले होते. ते ९२ गुण पाहून आमचे घोडे (आकाश) गंगेत न्हाले.
समाप्त.
श्री. अरविंद परांजपे सर व आयुकाचे खुप आभार.
प्रतिक्रिया
28 Feb 2012 - 1:23 pm | पियुशा
छान ! आवडेश :)
28 Feb 2012 - 1:38 pm | चिमी
खरच ते प्रोजेक्ट्चे दिवस फार डेन्जर असतात. :-(
तुझा लेख वाचुन मला माझे प्रोजेक्ट्चे दिवस आठवले.
28 Feb 2012 - 1:44 pm | मुक्त विहारि
केलेल्या कष्टाचे चीज झाले.....
http://full2dhamaal.wordpress.com/
28 Feb 2012 - 1:45 pm | साबु
..........तिथल्या दुर्बिणीतून आकाशदर्शन म्हणजे एक पर्वणीच असायची. त्या दुर्बिणीतून मंगळ, बुध, गुरु व शनि खुप विलोभनीय दिसायचे.
सरस....
मजा केलीत...
28 Feb 2012 - 1:53 pm | पिंगू
मला माझ्या चुलीत गेलेल्या प्रोजेक्टची आठवण झाली...
- पिंगू
28 Feb 2012 - 2:12 pm | मोदक
मग ती मुलायमप्रतीत उतरून आम्हालाही समजू दे.. :-)
28 Feb 2012 - 3:10 pm | स्वातीविशु
सर्वांना मनापासून धन्यवाद. :)