अनिकेत, २७ वर्षाचा इंजिनिअर...तीन वर्षापूर्वी एका चांगल्या कंपनीत नोकरीवर रुजू झाला होता. छोटस स्वतःच घर घेतलं, लग्नही झाल. पण अचानक आर्थिक मंदीमुळे नोकरीवर कुऱ्हाड कोसळली. अनिकेतला हा धक्का सहन झाला नाही व तो व्यसनाच्या आहारी गेला. कुटुंबीयांनी खूप समजावले पण काही उपयोग झाला नाही. शेवटी पालक वैतागून गावाकडे निघून आले नि बायकोही माहेरी निघून गेली.
निखील, वय वर्ष २०.एक हुशार व अभ्यासू विद्यार्थी. बारावीत चांगले गुण मिळवून एका चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. पहिल्यांदाच शिक्षणासाठी घरापासून दूर राहिला होता. चुकीच्या संगतीमुळे व्यसनाच्या आहारी गेला. त्यातच तो पहिल्या वर्षी नापास झाला. घरी पालकांना कसे तोंड दाखवू या विचाराने त्याने आत्महत्या करून आपले जीवन संपविले.
वरील सर्व घटना व्यसनामुळे किती भयंकर परिस्थिती ओढवू शकते हे स्पष्ट करतात. व्यसन वाईट असते, त्यामुळे माणसाचा तोल जातो, स्वतासः सर्वांनाच मनस्ताप सहन करावा लागतो, आयुष्याची राखरांगोळी होते हे माहित असूनही त्यापासून कोणी सुटका का करून घेऊ शकत नाही ? काहीजण निराशेच्या भावनेतून, अपयशाला घाबरून, ताणतणाव दूर करण्यासाठी तर कोणी Relax होण्यासाठी म्हणून हा मार्ग निवडतात. तरुण पिढी आपण किती बिनधास्त व आधुनिक आहोत, प्रतीष्टेचे लक्षण म्हणून याला सुरुवात करतात व कधी आयुष्य बरबाद होते हे त्यांनाच समजत नाही. व्यसनांमुळे संकटे किंवा दुख कमी होत नसून ते अधिकच किचकट होत जाते, याचा कोणी विचारच करत नाही.
मध्यंतरी, बऱ्याच शहरामध्ये रेव्ह पार्टीचे पेव फुटले होते. चांगल्या सुशिक्षित घरातील मुले-मुलीही तेथे नशीली पदार्थांचे सेवन व विक्षिप्तपणे नाचत होते. डान्सबार मध्ये तरी संपूर्ण तरुण पिढीच बरबाद होते कि काय अशी परिस्थिती आली होती. तरुण पिढीमध्ये तर हे प्रमाण खूपच चिंताजनक आहे. आजकाल कॉलेजमध्ये किंवा ऑफिस शेजारी कॅन्टीनपेक्षा पानाची टपरी जोरात चालू असते. सुट्टीच्या दिवशी तरी दारूच्या दुकानासमोर प्रचंड मोठी रांगच असते. रात्रभर अमली पदार्थांचे सेवन करीत अश्लील कार्यक्रम बघणे हे तर होस्टेलमध्ये सर्रास सुरु असते.
हे प्रगतीचे कि अधोगतीचे लक्षण आहे .... यावर काही उपाय करता येईल काय ....
सर्वप्रथम पालकांनी संवेदनशील होण्याची गरज आहे. आपला मुलगा बाहेर काय करतो, त्याचे मित्र कसे आहेत, सार्वजनिक ठिकाणी त्याची वर्तणूक कशी असते याची माहिती त्याच्या नकळत ठेवावी. जर चुकून व्यसनाच्या आहारी गेला असेल तर स्वतावरचा ताबा ढळू न देता त्याच्यावर संताप न करिता त्याचे समुपदेशन करावे. व्यसनमुक्ती केंद्रात न्यावे. पुन्हा चांगल्या मार्गावर येण्यासाठी त्याला धैर्य व प्रोत्साहन द्या.
मित्रानो, हे वयच असत ज्यात नकळत आपली पाऊले चुकीच्या दिशेने पडतात. काही बाह्य आकर्षणाच्या आपण आहारी जातो. पण आपणही थोडस मनावर नियंत्रण मिळवायला शिका. अशा संगतीपासून जाणीवपूर्वक स्वताला लांब ठेवा व सर्वात महत्वाचे असे काही वाटत असेल तर चांगल्या मित्रांशी किंवा पालकांशी शेअर करा. आपले जीवन शेवटी आपल्यालाच फुलवायचे आहे.
अमित सतीश उंडे, सांगली......
प्रतिक्रिया
26 Feb 2012 - 11:50 pm | पिवळा डांबिस
सर्वप्रथम पालकांनी संवेदनशील होण्याची गरज आहे.
आयला हे बरं आहे!!!
हे २० आणि २७ वर्षांचे घोडे व्यसनाधीन झाले याची जबाबदारी पण त्यांच्या पालकांवरच?
हे १८ वर्षांवरचे कायद्याने सज्ञान आहेत ना, मग स्वीकारू दे की त्यांना स्वतःला याचीही जबाबदारी!!!!
हे कसलं नसतं व्हिक्टिमायझेशन?
27 Feb 2012 - 1:21 pm | अमितसांगली
तुमचे बरोबर आहे. पण या वयात संगतीने/प्रेमभंग/अपयश किवा fashion च्या नावाखाली मुले याच्या आहारी जातात. त्यासाठीच मुले व पालक यांच्यात सुसंवाद हवा.
26 Feb 2012 - 11:50 pm | मोदक
>>>हे प्रगतीचे कि अधोगतीचे लक्षण आहे .... यावर काही उपाय करता येईल काय ....
हे प्रगतीचे कि अधोगतीचे लक्षण आहे - याचे बेंचमार्क प्रत्येकाने आपआपले ठरवलेले असतात, त्यानुसार प्रगती / अधोगतीची व्याख्या बदलते.
व्यसनांच्या आहारी गेलेल्यांसाठी उपाय - विश्रांतवाडी पुणे येथे 'मुक्तांगण' व्यसनमुक्ती केंद्र आहे. तिथे आपलेपणाने सिगरेट, दारू, ड्रग्ज ते इंटरनेट अशा सर्व प्रकारच्या व्यसनांवर उपचार केला जातो. पण या संपूर्ण प्रोसेस मध्ये रूग्णाची व्यसन सोडायची इच्छाशक्ती खूप महत्वाची असते.
मी आत्तापर्यंत चार मित्रांना तिथे घेवून गेलो आहे (OPD), दोघा जणांची व्यसने संपूर्णपणे सुटली (साधारणपणे २ महिन्यात), सध्या एक जण औषधे घेत आहे. (एक जण कांही आठवड्यातच पुन्हा व्यसनाकडे वळला आहे :-()
मी मुक्तांगणशी कोणत्याही प्रकारे संबंधीत नाही. तरीही कोणाला माझी काही मदत होणार असल्यास खरड / व्यनी केला तरी चालेल.
27 Feb 2012 - 1:25 pm | अमितसांगली
माझेही बरेच मित्र आहेत. मलाही त्यांना यापासून परावृत्त करायचे आहे. धन्यवाद....
27 Feb 2012 - 1:26 pm | प्रचेतस
प्रकाटाआ
27 Feb 2012 - 5:04 pm | मोदक
माझा मेल आयडी व फोन नंबर व्यनी केला आहे.
27 Feb 2012 - 12:56 am | सुनील
लेखामागची तळमळ समजली परंतु सरसकटीकरण पटले नाही.
अगदी नियमित मद्यप्राशन वा धूम्रपान करणार्यांची संख्या किती आणि त्यातील "व्यसनाधीन" म्हणता येतील अशांचे प्रमाण किती? जे काही थोडेफार "व्यसनाधीन" असतील त्यांच्या साठी AA किंवा वर मोदक यांनी म्हटल्याप्रमाणे मुक्तांगण इ. आहेतच. पण सरसकट सगळ्यां पिणार्यांना व्यसनाधीन म्हणणे योग्य नाही.
मी स्वतः शुक्रवार - शनिवार रात्री तसेच रविवार दुपारी मद्य अगदी नियमितपणे घेतो. (हे टंकतानादेखिल हाती बियरचा प्याला आहे :)) पण म्हणून काही मी स्वतःला व्यसनाधीन म्हणवून घेणार नाही आणि कुणी म्हटलेले ऐकून घेणार नाही!! :)
27 Feb 2012 - 1:41 pm | गवि
धूम्रपानाबद्दल नाही पण मद्यपानाबद्दल सहमत. मी डॉ. अवचटांना अन्य कारणाने भेटलो होतो तेव्हा हा प्रश्न मी विचारला होता की असंख्य लोक प्रसंगोपात्त पितात पण तितक्या संख्येने "अॅडिक्ट" (अल्कोहोलिक) होत नाहीत, असं का?
तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की हा शारिरिक दोष आहे.. अमुक प्रमाणात अल्कोहोल शरीरात गेल्यावर समाधान होऊन "आता बास" असं सांगणारी यंत्रणा सदोष असते किंवा होते अशा लोकांबाबतीत अधिकाधिक आणि सतत पिणे / तेवढ्याच "फील" साठी अधिक पिणे असं चक्र चालू होतं. ज्यांच्या बाबत असा इंबॅलन्स नाही ते वेळोवेळी पिऊनही त्यांच्यामधे "क्रेव्हिंग" येत नाही.
अॅडिक्ट आहोत का याची थोडी कल्पना येण्यासाठी खाली दिलेले प्रश्न स्वतःला विचारलेले उपयोगी पडतील.. हो उत्तर म्हणजे अल्कोहोलिक असण्याकडे कल.
१. दारु सोडण्याची इच्छा होते पण सोडता येत नाही का?
२. अनेकदा दारु सोडण्याचा प्रयत्न केला आहे का?
३. दारुमुळे शारिरिक त्रास होतो का?
४ . दारुमुळे होणार्या शारिरिक / मानसिक त्रासाविषयी इतरांशी बोलणं आपण टाळतो का? (समोरचा आपल्या पिण्यावर घसरेल या भीतीने)
५. पिण्यासाठी कारण शोधत असतो का?
६. एकही पार्टी / बाहेर जेवण / मित्रांची भेट ही दारुशिवाय होऊच शकत नाही का?
७. दारु पिऊन झाल्यावर अपराधी वाटतं का? (ही सर्वात मोठी खूण)
८. दारु कितीही प्यायलो तरी आपण पूर्ण कंट्रोलमधे असतो असं वाटतं का?
९. जिथे दारु न मिळण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी जाताना "स्टॉक" घेऊन जातो का?
१०. ड्राय डे वर लक्ष ठेवून "स्टॉक" घेऊन ठेवतो का?
११. कामावर कधी पिऊन आलो का?
१२. घरचे किंवा ऑफिसातले लोक यांच्याशी "पिण्या"वरुन कधी संबंध बिघडले आहेत का?
१३. किती काळ आपण न पिता राहिलो होतो / आहोत याची नोंद सतत ठेवली जाते आणि इतरांना सांगितली जाते का?
असे अनेक आहेत...
27 Feb 2012 - 3:43 pm | प्यारे१
अशा प्रकारच्या प्रत्येक गोष्टीला आपण व्यसन म्हणू शकतो जी गोष्ट न केल्यानं आपल्याला चैन पडत नाही अथवा अस्वस्थ वाटतं ...
वरच्या प्रश्नांमध्ये दारु ऐवजी सिगारेट, चहा, मिसरी, तंबाखू, नेट सर्फिंग, नेटफ्लर्टींग, अश्लील साहित्य वाचणं, पाहणं , हस्तमैथुन इ. अनेक विचित्र समजल्या गेलेल्या तसेच समाजमान्यता म्हणून रुढ झालेल्या अनेक गोष्टी समाविष्ट होतात असं मला वाटतं ... व्यायाम, अभ्यास, जप इ.इ.चं देखील व्यसनच पण पॉझिटीव्ह अर्थानं असावं का असाही प्रश्न पडतोच.
यासंदर्भात डॉ. आनंद नाडकर्णींचं मुक्तिपत्रे हे अतिशय सुंदर पुस्तक आहे. सेल्फ हेल्प पठडीतलं पुस्तक आहे. मद्यपी नसलेल्या व्यक्तींनीही वाचावंच असं....
27 Feb 2012 - 3:43 pm | गवि
अगदी अगदी रे प्यारे..अग्रीड..
सर्व व्यसनंच.. फरक फक्त अॅडिक्टिव्ह पॉवरचा असतो. तंबाखूची अॅडिक्टिव्ह पॉवर भयानक वाटणार्या एलएसडी किंवा अन्य ड्रग्जच्या अॅडिक्टिव्ह पॉवरपेक्षा बरीच जास्त असते.. भांगेमधे ती खूप कमी असते..
एका उमेदीच्या काळात भ्रष्टाचाराविरुद्ध तुफान लढा देऊ गेलेल्या रिटायर्ड अधिकार्याला नंतर योगासनांचं व्यसन लागलं होतं (ऑब्सेशन). ते दिवसाचे बारा-चौदा तास योगासनंच करायचे. बाथरुममधेही.. इतर दैनंदिन व्यवहार ठप्प झाले तेव्हा त्यांना डी अॅडिक्शनचे मानसिक उपचार करावेच लागले.
ज्याचा आरोग्यावर घातक परिणाम जास्त होतो अशा सवयींना वेगळं ठरवून त्यांना "वाईट व्यसन" असं नाव द्यायला हरकत नाही.. कुठेतरी "ग्रेड" द्यायलाच पाहिजे तुलनात्मक..
27 Feb 2012 - 7:43 am | अत्रुप्त आत्मा
निकोटिन अॅनॉनिमस
अल्कोहोलिक अॅनॉनिमस
नार्कोटिक्स अॅनॉनिमस....
यांचा पुण्यातला पत्ता-नेहेरु स्टेडियम क्षेत्रीय कार्यालय अवार...टिळक रोड पुणे...
प्रत्यक्ष भेट द्या आणी एक व्यसनी माणुस दुसर्या व्यसनी माणसाला स्वतःचे अनुभव सांगुन कसे सुधारतो ?...ते पहा... जे कुठेही जमत नाही,तेच इथे जमते... :-)
27 Feb 2012 - 8:38 am | कपिलमुनी
;)
27 Feb 2012 - 8:46 pm | सोत्रि
निव्वळ दारूच्या व्यसनाधिनतेबद्दल बोलायचे झाले तर भ्रष्ट पद्धतीने दारु पिण्याबद्दल लिहीलेला हा लेख अधिक माहिती टाकू शकेल.
बाकी गविंचा खालचा प्रतिसाद अधिक बोलका आहे.
- (व्यसनाधीन नसलेला) सोकाजी
27 Feb 2012 - 3:12 pm | सर्वसाक्षी
व्यसन म्हणजे काय ? वा व्यसनी कुणाला म्हणावे?
या लेखातील उदाहरणे अगदी टोकाची व अपवादात्मक आहेत.
शिक्षणानिमित्त मुलगा बाहेर जात असेल तर त्याला प्रथम 'आता तुझे निर्णय घ्यायला तू मुखत्यार आहेस, तेव्हा जबाबदारीने वाग" हे सांगितले पाहिजे.
काय बरे काय वाईट आणि काय व्यसने लागु शकतात याची कल्पना देणे योग्य. मात्र अति गाफिल वा अति दक्ष असे दोन्ही प्रकार वाईट. मुळात अनेकदा कुतुहल ही व्यसनाची पहिली पायरी असू शकते. 'एकदा करुन पाहिले पाहिजे' या भावनेतुन आणि मग मित्रांच्या दडपणामुळे कमकुवत मुले व्यसनाला पटकन बळी पडतात. तेव्हा कुतुहल शमविणे उत्तम. आणि वयात आलेल्या मुलाला पिऊ नकोस असा सल्ला न देणे वाईट. त्यापेक्षा वाटेल तेव्हा वाटॅल तिथे वाटेल त्यांच्याबरोबर वाटेल ती दारु पिऊ नये असे सांगावे. एखाददा मस्तपैकी मुलाबरोबर ग्लास भिडवावा. यात उपरोध वगैरे नाही तर हे माझे प्रामाणिक मत आहे.
मुलाला बापाने स्वखुशीने गाडी शिकवली नाही तर तो रात्री चोरुन गाडी बाहेर काढणार वा मित्राच्या गाडीवर शिकायचा प्रयत्न करणार आणि हे अधिक धोकादायक. त्यापेक्षा मुलाचे पाय पोचायला लागले की बापाने स्वतःच 'जबाबदार ड्रायव्हिंग' आपल्या मुलाला शिकवावे, ते अधिक योग्य. " गाडी पळवण्यापेक्षा गाडी हुकमी थांबवता येणे म्हणजे उत्तम ड्रायव्हिंग" हे मुलाला गाडी स्वतः शिकविताना अधिक प्रभावी रित्या समजावता येते.
मात्र आपल्या उदाहरणात मुलाला व्यसनाने ग्रासले आहे हे आई-वडीलाच्या लक्षात येऊ नये हे खटकते. मुलगा कितीही दूर असला तरी त्याचे बदललेले वागणे बोलणे आई वडीलांना सहज समजु शकते. अर्थात व्यसन सोडवण्यापेक्षा लागु न देणे बरे.
27 Feb 2012 - 3:39 pm | संपत
व्यसन म्हणजे काय हे देखील ठरवले पाहिजे.. माझ्यामते अशी कुठशीही सवय जिच्यामुळे आपले नुकसान होत आहे हे लक्षात येऊनही सोडता येऊ नये. काही व्यसने ही तुलनेने सोडण्यासाठी सोपी असतात तर काही कठीण. बहुतेक व्यसने ही वास्तवापासून सुटका करून घेण्यासाठी सुरु होतात. मला स्वत:ला अवांतर वाचनाचे व्यसन कॉलेज मध्ये असताना लागले होते ज्यामुळे माझे भरपूर नुकसानही झाले. व्यसन सोडण्याची सर्वात पहिली पायरी म्हणजे आपल्या सद्य अवस्थेची जबाबदारी आपण घेणे( आई बाप, पोरगी, आरक्षण, शिक्षणव्यवस्था, राजकारणी ह्यांच्यावर न टाकता)
27 Feb 2012 - 3:49 pm | गवि
परफेक्ट..
व्यसनांबाबत आणखी एक भयंकर सत्य आहे.. विशेषत: दारु, तंबाखू अशा शारिरिक गरज निर्माण करणार्या व्यसनांबद्दल..
एकदा व्यसनाधीन झालेला मनुष्य हा "क्युअर" कधीच होत नाही.. किती काळ तो त्यापासून दूर राहिला हेच पहायचं असतं. ("क्युअर" आणि "रिमिशन" मधला फरक)
दहा वर्षं सिगरेट सोडली आणि अजूनही हात लावला नाही अशी उदाहरणं असतात पण फार फार विरळा..
अगदी लाँग टर्म सोडणार्यांनीही तितके महिने किंवा वर्षं निव्वळ "कंट्रोल"च केलेला असतो. मनातून इच्छा राहतेच. दुबळे पडलो की पुन्हा ताबा घ्यायला...