माझ जकार्ता ( एक आत्मचरित्रपर प्रवासवर्णन )

kolhapuri's picture
kolhapuri in जनातलं, मनातलं
31 Oct 2007 - 3:47 pm

माझ जकार्ता ( एक आत्मचरित्रपर प्रवासवर्णन )
- मिश्टर मिनेश भूभू

मध्ये एका आद्य वगैरे संकेतस्थळावर एक मनुष्य केनिया वगैरे देशांवर लिहिण्याच्या निमित्ताने गौरवपर आत्मचरित्रच लिहित होते. आमचाही तसाच प्रयत्न.

तुला दोन महिन्याच्या कामाला जकार्ताला जायचय अस
साहेबाने फर्मावल्यावर मी म्हनलो बर आहे. तसही मी
बर्‍याच देशात फिरलो असलो तरी या भागात कधी गेलो
नव्हतो. आणि मला फिरण्याची तर खूपच आवड. माझा
स्वभावही बोलका, मनमिळावू. पण जकार्ताशी संबंध
आला नव्हता कधी. आणि आला तो मित्रांना तिकडचे टॉम याम
सूप करून देण्यापुरता. म्हणजे मी नव्हतो खात, पण
दुसर्‍यांना आवडत असेल तर मला आवडत अस मायेने करून
घालायला. माझ्या आधीच्या ऑफिसमधले लोक अजूनही
माझ्या मायाळू स्वभावाची आठवण काढतात व ढसाढसा रडतात.

मग विमानात चाळीसच प्रवासी होते. तर सात बायका आणि तेहतीस
पुरुष. तर माझा स्वभावच सर्वात मिसळण्याचा, मग मी जमेल
त्या सर्वांशी ओळख मैत्री करून घेतली. मंगला,
जुली, केतकी, अबोली, पुष्पा, रेखा, हेमा एवढ्यांशी
मैत्री होईपर्यंत जकार्ता आले मग बाकीचे राहून गेले.
या सगळ्या नंतर माझ्या जीवलग मैत्रिणी झाल्या हे
सांगायला नकोच. माझ्या या प्रवासातले लोक अजूनही
माझ्या मायाळू स्वभावाची आठवण काढतात व ढसाढसा रडतात.

मग मी जकार्ता एअरपोर्टला बाहेर आलो. तर समोर समीर
उभा, मुद्दाम मला घ्यायला आला होता. हा माझा नंतर
जिवलग मित्र झाला हे सांगायला नकोच. त्याच्या हातात
माझ्या नावाची पाटी बघुन मी त्याला ओळखल. इथल्या
कंपनीतला एकमेव भारतीय म्हणून मी त्याला मेल पाठवली होती, एवढीच आमची ओळख पण तरी घ्यायला आला.
मग मी विचारले का बर आला
तर तो म्हणाला १८तुझा एवढा छान स्वभाव आहे की मला राहवलाच नाही १९
मग मी म्हणालो अरे पण मी तर फक्त इमेल पाठवली तर तुला कस कळल की माझा स्वभाव एवढा मायाळू वगैरे.

तर तो म्हणे की अरे ते तूच त्या मेलमध्ये लिहिलयस की पाच सहा वेळा.
मग म्हटल बरोबर, पण ते मी आपले माझ्याबद्दल थोडी माहिती असावी म्हनून लिहिले होते. माझ्या आधीच्या
ऑफिसमधले लोक मात्र अजूनही माझ्या मायाळू
स्वभावाची आठवण काढतात व ढसाढसा रडतात.

मग मी विचारले की घरी कोण कोण असते?
बायको आणि मुलगी चार वर्षाची.
तर हे ऐकुन बायको व मुलगी दोघीही चार वर्षाच्या कशा या प्रश्नाच बी माझ्या मनात रुजल आणि एका मित्राची
आठवन झाली पन मग ते प्रश्नबी अंकुरण्यापुर्वीच
अरे वा वा अस म्हनत समीरला आग्रह करून त्याच्या घरी गेलो.
तर मग त्याची मुलगी पिंकी लगेच मला बिलगली.
तशी सगळीच लहान मुल मला चिकटतात. पिंकीला पाठुंगळीला घेतले आणि कोमलवहिनींबरोबर कणीक मळू लागलो.
एकत्र कणीक मळयला खूप मजा येते. नॉर्थ
झुंबिलीमध्ये प्रियकर प्रेयसी अशी कणीक एकत्र
मळतात. पण फिजेस्फ्रिव्हाकियामध्ये मात्र
पुरुषमानूस असा सारखा बायकी गोष्टीत कडमडतांना
दिसला तर त्याचीच कणीक तिंबतात. तिथल्या माझ्या आधीच्या ऑफिसमधले लोक मात्र अजूनही माझ्या मायाळू स्वभावाची आठवण काढतात व ढसाढसा रडतात.

पिंकीला उतरून दिले आनि समीरकडे पाठवल बाहेरच्या खोलीत. मग कोमूला म्हटले तुझ्यासाठी खास सीडी, डिंकाचे लाडू आणि नाडीचे बंडल आणले आहे. त्या सीडी
ऐकत आपन झुंबिलीमध्ये करतात तशा सप्तकोनी चपात्या लाटू. मग ती तशीच उभी लाटने हातात घेउन. मग मीच लाटने धरले आणि चपात्या
लाटल्या. मी वहिनीला म्हनालो, तुम्ही हात स्वच्छ धूत जा हो स्वयंपाक करतांना. वहिनी म्हणे आजपर्यंत माझा नवरा सुद्धा मला अस म्हणाला नाही. मी म्हणालो पण आपल्या माणसाने असे करावे याचे वाईट वाटले असे त्याम्ना म्हणालो. माजि हि आपल्या मानसाची हमखास गोळी एकदम लागू पडली.

भाउजी, वहिनी आर्तपणे म्हणाल्या.
तुम्ही भाउजी म्हणालात यातच सर्व आले मी पन एक डायलॉग चिकटवला. तसही मध्येच थोड लागट नायतर एकदम इमोशनल बोलून बघतो मी. मला आवडत. माझ्या आधीच्या ऑफिसमधले लोक मात्र अजूनही माझ्या या मायाळू स्वभावाची आठवण काढतात
व ढसाढसा रडतात.

मग समीर आनि वहिनी म्हने बाहेर जायचे का. तर मि म्हने कि नको तुम्ही जाऊन या तोपर्यंत मी भाज्या निवडतो आनि तुझ्या पायजाम्यात, वहिनीच्या परकरात नव्या नाड्या ओवून ठेवतो. ज़िथे जाईन तिथे काम करने हा माझा स्वभावच आहे. नंतर जकार्तात कोणीही नवा माणूस आला की पायजामा, परकरात नाडी घालायला माझ्याकडेच हक्काने येई. तर वहिनि म्हने नको मी पन थांबते. मग वहिनींची शेजारीण दोनेतेल्ला आली. तिला अस्थम्याचा खूप त्रास होतो म्हणे. त्यावर त्या दोघी चर्चा करत होत्या. यावर मी अर्थातच इतर सर्व विषयाप्रमाने अगदी अधिकारवाणीने बोलू शकतो. मग मिही माझ्याजवळचे काही अनुभव व
उपाय सांगितले. त्या म्हणे तुम्हाला कसे माहित, तर मी म्हने की असेच तुमच्यासारख्या मैत्रिणीकडुन ऐकुन.

मग दोनेतेल्लाचे केस लांबसडक, पण तिचा नवरा मात्र दिवसभर हातगाडीवर उकडलेला मका विकायचा. मग मीच तिचे केस रिठा, आवळा, शिकेकाईने छान धुवून दिले. तर मला अशा बायल्या गोष्टीत फार फार म्हणजे फारच इंटरेस्ट. मग मि परत येईपर्यंत ते कामच मागे लागले माझ्या. कुठुन कुठुन कोणा कोणाच्या बायका घर शोधत यायच्या.

तर मग बाकी जकार्ताला खूप काय पाहिले. पण ते सर्व माहिती इंटरनेटवर सापडेल. मग मला अजूनही कधी कधी जकार्ताच्या त्या ट्रिपची आठवण येते. माझ्या जकार्ताचे लोक मात्र अजूनही माझ्या मायाळू स्वभावाची आठवण काढतात व ढसाढसा रडतात.

प्रवासविडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

धनंजय's picture

31 Oct 2007 - 4:59 pm | धनंजय

मूळ केनियाट्रिप न वाचता ती कशी असेल तेही चित्र उभे केले.

हाहाहा

प्रियाली's picture

31 Oct 2007 - 5:25 pm | प्रियाली

रडले हो ढसाढसा तुमचे प्रवासवर्णन वाचून. कित्ती कित्ती मायाळू तुम्ही.

:)))))))))

हे जे काही आहे ते वाचताना जाम हसायला आले. नाडी हा प्रकार अमेरिकेत मिळतो का ते माहित नाही (स्ट्रिंग्ज मिळतात विविध जाडीच्या पण खास भारतीय नाडी फक्त रेडीमेड कपड्यांतच दिसते.) कोणा अमेरिकन-मराठी सदस्यांना माहित असल्यास कळवावे नाहीतर सगळे कपडे कोल्हापुरींकडे पाठवण्याचा बेत आहे.

टग्या's picture

2 Nov 2007 - 2:02 am | टग्या (not verified)

नाडी हा प्रकार अमेरिकेत मिळतो का ते माहित नाही

कधीतरी कोण्याशा डॉलर ष्टोरात बघितल्यासारखा वाटतो.

स्वाती दिनेश's picture

31 Oct 2007 - 5:30 pm | स्वाती दिनेश

धमाल आहे तुमचे प्रवासवर्णन कम आत्मचरित्र!
आवडले,
स्वाती

आता मिसळप्रेमी तुमच्या लेखाळू प्रयत्नांची आठवण काढतात व ढसाढसा रडतात!! :-(

तुम्हाला वर्गणी काढून जगप्रवासाला पाठावावे व तुमच्याकडून असे ढसाढसा रडवणारे लेखन मिळवावे ही मिसळपावमंडळींना विनंती करतो. :-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Oct 2007 - 5:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आम्हीबी आपल्या मायाळू स्वभावाची आठवण काढून ढसाढसा रडलो !
याच पालूपदाला वाचून वाचून मोकळेपणाने हसलो ! :)))

अवांतर :) आपलं नाव वाचून ओ सात दिन मधल्या पद्मिनी कोल्हापूरीची आठवण झाली !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विकास's picture

2 Nov 2007 - 7:46 pm | विकास

लेख लई आवडला!

अवांतर :) आपलं नाव वाचून ओ सात दिन मधल्या पद्मिनी कोल्हापूरीची आठवण झाली !

आणि त्याच चित्रपटातील "नाडा" ची पण आठवण झाली :-)

लबाड बोका's picture

31 Oct 2007 - 6:08 pm | लबाड बोका

लेख छान आहे भरपुर रडलो

तुमचे नाव आंग्ल (रोमन) लिपीत पाहुन त्याहुन जास्त रडलो

नाव मराठित लिव्हायला जाकार्तावाल्यांनी काय बंदी केली का वो? का नाव मराठीत लिव्हले कि रडाया येत?

बोका

प्रमोद देव's picture

31 Oct 2007 - 7:33 pm | प्रमोद देव

वेगळी धाटणी आणि मजेशीर कथन ह्यामुळे मजा आली.

प्राजु's picture

31 Oct 2007 - 8:08 pm | प्राजु

रडून रडून पूर आला मिसळपाववर....

पण आपले हे लेखन आवडले.

(न रडणारी) प्राजु

आजानुकर्ण's picture

31 Oct 2007 - 8:20 pm | आजानुकर्ण

फारच मायाळू बॉ तुम्ही..

(रडका) आजानुकर्ण

देवदत्त's picture

31 Oct 2007 - 9:13 pm | देवदत्त

सुरूवातीला लेखाच्या परिच्छेदाची मांडणी बघून मला ही कविता आहे असे वाटले. नंतर कळले काय ते..

तुम्ही मायाळू आहात हे फार जाणवत आहे...
अश्रूंचे पाट वाहत आहेत.
तात्या, हॉटेलातून पाणी बाहेर जायला नीट मार्ग आहे ना?

अवांतरः अरे हो... मायाळू नावाची भाजीही असते का हो?
लहानपणी फास्टर फेणेच्या पुस्तकात वाचल्याचे आठवते.

सर्किट's picture

31 Oct 2007 - 10:02 pm | सर्किट (not verified)

नंतर जकार्तात कोणीही नवा माणूस आला की पायजामा, परकरात नाडी घालायला माझ्याकडेच हक्काने येई.

ऑफिसात असताना वाचले, ह्याचा नंतर पश्चात्ताप झाला, कारण आजूबाजूच्या क्युबिकल्समधले लोक मला वेड्याच्या इस्पितळात घालण्यासाठी निधी गोळा करू लागलेले आहेत. (नाही, म्हणजे तसा मीही मायाळू वगैरे आहे! पण ते कृतघ्न लोक ढसाढसा रडतच नाहीत.)

फारच सुंदर प्रवास वर्णन !

आद्य वगैरे संकेतस्थळावर आखातातील देश वगैरे वाचून मला एकदा अशीच उबळ आली होती. पण मी ती आवरली.

आज माझी स्वप्नपूर्ती आपण केल्याबद्दल शतशः आभारी आहे.

- (कृतज्ञ) सर्किट

बेसनलाडू's picture

1 Nov 2007 - 1:29 pm | बेसनलाडू

नंतर जकार्तात कोणीही नवा माणूस आला की पायजामा, परकरात नाडी घालायला माझ्याकडेच हक्काने येई.

ऑफिसात असताना वाचले, ह्याचा नंतर पश्चात्ताप झाला, कारण आजूबाजूच्या क्युबिकल्समधले लोक मला वेड्याच्या इस्पितळात घालण्यासाठी निधी गोळा करू लागलेले आहेत.

सहमत आहे. भन्नाट लेखन!!! हहपुवा!!!
(लोटपोट)बेसनलाडू

सुवर्णमयी's picture

31 Oct 2007 - 11:05 pm | सुवर्णमयी

वर्णन आवडले! मस्त

माझ्या आधीच्या ऑफिसमधले लोक अजूनही
माझ्या मायाळू स्वभावाची आठवण काढतात व ढसाढसा रडतात.

पिंकीला पाठुंगळीला घेतले आणि कोमलवहिनींबरोबर कणीक मळू लागलो.

एकत्र कणीक मळयला खूप मजा येते. नॉर्थ
झुंबिलीमध्ये प्रियकर प्रेयसी अशी कणीक एकत्र
मळतात. पण फिजेस्फ्रिव्हाकियामध्ये मात्र
पुरुषमानूस असा सारखा बायकी गोष्टीत कडमडतांना
दिसला तर त्याचीच कणीक तिंबतात.

तर मि म्हने कि नको तुम्ही जाऊन या तोपर्यंत मी भाज्या निवडतो आनि तुझ्या पायजाम्यात, वहिनीच्या परकरात नव्या नाड्या ओवून ठेवतो.

माझ्या जकार्ताचे लोक मात्र अजूनही माझ्या मायाळू स्वभावाची आठवण काढतात व ढसाढसा रडतात.

मस्त आणि झकास लेखन!

अरे बाबा कोल्हापुरी, तुझे पाय कुठायत? धरायचे आहेत बाबा एकदा! :)

आणि हे आद्य संकेतस्थळ कुठलं म्हणालास? :)

आपला,
(कोल्हापुरीचा फ्यॅन!) तात्या.

kolhapuri's picture

1 Nov 2007 - 6:05 pm | kolhapuri

sarv matbbar lonla avadala bharun pavalo...
tye mharhati livayache jara gandalay pudhachya yelela livato
an ayadi bi marathi karun gheto.

टग्या's picture

1 Nov 2007 - 8:28 pm | टग्या (not verified)

प्रवासवर्णन वाचून खरे तर हसूच येत होते, पण आजूबाजूचा रडूचा महापूर बघून नेमके हसावे की रडावे, नक्की कळेना, त्यामुळे काहीच केले नाही. इतके पण प्रलयंकारी नका हो रडवू, नाहीतर तमाम मिसळपावकर बुडून मरायचे! (पुण्यातल्या पानशेतच्या पुराच्या वेळी माझा जन्म नव्हता झाला, पण त्या पुराच्या ऐकलेल्या वर्णनांची आठवण ताजी झाली.)

केनयाच्या प्रवासवर्णनाबद्दल धनंजयरावांशी सहमत. मूळ लेख वाचलेला नाही, पण तो कसा असेल याबाबत कुतूहल मात्र नक्की जागे झाले.

(लेख आवडला, हे सांगायची गरज नसावी.)

- टग्या.

अवांतर:

१. तुमची आधीची नेमकी किती ऑफिसे हो?
२. सीडी, डिंकाचे लाडू आणि नाड्यांच्या बंडलाचे काँबिनेशन भारी! पैकी डिंकाच्या लाडवांचे प्रयोजन काय? आणि तुम्हाला कसे कळले? (तुमच्या मायाळू स्वभावाबद्दल समीरला कळणे स्वाभाविक आहे, कारण ते जगजाहीर आहे. पण तुमच्या अंतर्ज्ञानाचे रहस्य कळले नाही.)
३. 'अश्रू ढाळण्या'मधला 'ढाळ' नेमका कुठून आला ते आज हा लेख वाचून पक्के समजले.

विसोबा खेचर's picture

3 Nov 2007 - 8:42 am | विसोबा खेचर

३. 'अश्रू ढाळण्या'मधला 'ढाळ' नेमका कुठून आला ते आज हा लेख वाचून पक्के समजले.

हे सहीच! :)

टग्यादादा जिंदाबाद..

तात्या.

ध्रुव's picture

2 Nov 2007 - 12:28 pm | ध्रुव

अप्रतिम. झकास जमल आहे. येउद्या अजून..... :)

ध्रुव
सद्ध्याचा पत्ता - http://www.flickr.com/photos/dhruva

गुंडोपंत's picture

2 Nov 2007 - 5:46 pm | गुंडोपंत

कोल्हापुर्‍या... तू म्हणजे कै च्या कैच आहेस!
लैच मजा आली वाचायला... !!

अजून येवू दे असे...

आपला
ढाळोपंत