पुर्व-प्रकाशित
जळ्ळा मेला जन्म पुरूषाचा
हे वाक्य डिक्या ने दुसर्या(भरलेल्या) ग्लासाच्या पहिल्या घोटानंतर इतक्या आवेशात उच्चारले की आसपासची टेबलं हादरली ! चणे-फुटाण्याच्या वाट्या वाहुन गेल्या, मद्यावरील टेबलप्रेमी...आपल हे...टेबलावरील मद्यप्रेमी मंडळीमध्ये खळबळ माजली, वेटर लोकांनी किचनच्या दिशेन धुम ठोकली आणि खुद्द मॅनेजर पंख्यावर जावुन बसला. मित्रांनो, ही अतिशयोक्ती नाही, डिक्या अगदी कॉलेजच्या दिवसांपासुन अश्याच स्फोटकतेने वाक्ये उच्चारतो की त्याच्या या उच्चारण्यासमोर, संसदेतील नारे बाजी, " जब तक सुरज चाँद रहेगा" किंवा ...चंद्ररांवाचा विजय असो असल्या घोषणा फिक्या पडतील. खर तर, छानस, दिनकर कमलाकर करमरकर असे नावात बरेचशे कर असणार्या माझ्या या आद्य मित्राच्या सवयी मला माहीत आहेत. मी ते वाक्य , माझ्या बरोबर त्या दिवशी घडलेल्या प्रसंगामुळे सहज बोलुन गेलो होतो. पण अश्या कित्येक वाक्यांच घोषवाक्य बनविणार्या माझ्या या परममित्रामुळे मला चार-चौघांत कधी थोबाड रंगवुन घ्यावे लागेल सांगता येत नाही. लांबचं कशाला ? त्याच्या घरातील च उदाहरण घ्या ना !
मी त्या दिवशी त्याच्या घरात फुकटचा चहा आणी पोहे खात बसलो होतो. ( सकाळी-सकाळी असे काही फुकट गिळायला मिळणे म्हणजे काय मजा असते म्हणुन सांगु wink ). वहिनींच्या हातचे, मऊशार वाटाणे घातलेले पोहे घाई- घाईत घशात कोंबत होतो. एक वाक्य वर्तमान पत्रातल्या " आजचा विनोद " या सदरामध्ये आलेले होते. ( खर तर आजचा विनोद हे सदर वाचण्यापेक्षा " आजचे राशिभविष्य " हे सदर जास्त विनोदी असते असे माझे मत आहे. ' तडजोडी कराव्या लागतील', उत्साह वाढेल, मनोबल वाढेल, आरोग्याच्या तक्रारी संभवतील, प्रवास घडेल, वडील-धार्यांचा आदर करा, पाउस पडेल, छत्री न्यायला विसरु नका, खरेदी कराल. काय ? बसचे तिकीट का? ही आणि अशीच काही वाक्ये आलटुन-पालटुन तर असतात बारा बुलेट्समध्ये.....असो ! ) मी ते सहजच डिक्याला वाचायला दिले, ते वाक्य वाचुन डिक्या, त्याच्या नेहमीच्या मोड मध्ये गेला आणि त्याच्या त्या टिपीकल आवेशात त्याने ते वाक्य उच्चारले, ते वाक्य असे होते. " माझी बायको जरा सायको आहे !! " आमच्या ( क्षमाशील, दयावान आणि कनवाळु ) वहिनी त्यावेळी किचन मध्ये होत्या. त्या बाहेर आल्या !! वहिनींचा चेहरा आणि जीभ बाहेर असलेला काली-मातेचा चेहरा यात कमालीचे साम्य दिसत होते आणि त्यानंतर माझ्या समोर जो द्रक्-श्राव्य प्रसंग चालु होता, तो पाहुन मला पाच प्रश्न पडले.
१) लाटणे या आयुधाची निर्मिती का आणि कश्याप्रकारे झाली असावी ?
२) चपाती लाटण्याचे लोखंडी ऑटोमेटीक यंत्र न वापरुन पुरुषजात स्वता वर उपकार करीत आहे का ?
३) महिला सबलीकरण म्हणजे नेमकं काय ?
४) वहिनी आधी धोबी घाटावर कामाला होत्या का ?
५) मी आधी पोहे संपवु, पाणी पिवु की मित्राला वाचवु ?
नको तिथे आमचे थोबाड घालायची आम्हाला सवय आहे, त्याच सवयीने आम्हाला उद्युक्त केले आणि आम्ही उरलेसुरले पोहे मुठीत धरुन धशात कोंबले ( हावरट ! ) आणि वहिनींनीं आवरण्यासाठी गेलो . पण " अहो वहिनी, तो तर केवळ थट्टा.... " येव्हढेच आम्ही बोलु शकलो, कारण आमच्या पोटात एक जोरदार गुद्दा बसला ( गव्हाबरोबर किडे ! ) ज्या वायुवेगाने आम्ही तोंडात पोहे कोंबले होते, जे की घशाखाली अजुन शिरायचे बाकी होते, तेच पोहे स्निग्ध पदार्थरुपी. फुSSSर्रर्रर्र असा आवाज करीत, उलट दिशेने त्याच वेगाने बाहेर पडले, नुसते बाहेर पडले असते तर ठीक होते,पण त्याची नेमकी फवारणी , जेथे आजवर केवळ पावडर, लिपस्टिक, लाली, आय लायनर, टिकली आणि ईतर मेक-अप करण्याच्या साहित्याचे साम्राज्य होते अश्या ठिकाणी झाली. ते पाहुन डिक्याला त्या अवघड परिस्थितीत ही हसायला आले. त्यामुळे वहिनींचा मोर्चा तिकडे वळला, आम्ही ही सोनेरी संधी साधुन दरवाजाच्या मिळेल त्या बोळातुन स्वताचा उंदीर केला. त्यानंतर आम्हाला पुष्पगुच्छ ( अर्थातच वहिनींच्या नकळत ) घेऊन डिक्याला इस्पितळात भेटायला जावे लागले. ( खर तर चक्राकार पुष्पगुच्छच नेणार होतो ). त्याची ईजिप्तशियन ममी झाली होती. फरक इतकाच होता की ममी ला तपकिरी रंगाच्या पट्ट्या असतात आणि याला पांढर्या ! ममी चे हृदय चालु नसते, याचे होते ( वर आम्ही वहिनींनी विषेशणे का दिली आहेत ते समजले असेलच !)
वरील घटनें नंतर आम्हाला त्याच्या घरात प्रवेश बंदी झाली, पण मेन विल बी ऑलवेज मेन, आमचे भेटणे कधीच बंद झाले नाही. म्हणजे त्याचे असे होते की आमच्या वहिनी ( पुन्हा एकदा क्षमाशील, दयावान आणि कनवाळु ) महिना-पंधरा दिवसांकाठी, एका दिवसापुरत्या एकट्याच ( डिक्याने आधी तिथे ही तोंड काळे केले असणार म्हणुन एकट्याच ) माहेरी मुक्कामी असत. तेव्हा डिक्या मला फोन करुन बोलवुन घेई, त्या दिवशी तो त्याचा स्वातंत्र्य-दिन आणि मी माझा फुकट-दारु दिन साजरा करीत असु, अश्याच एका दिवशी आमचा हा संवाद चालु होता .
मी (अगदीच रडवेल्या स्वरात) : रिमझिम पाऊस पडे सारखा, यमुनेला ही पुर चढे !
डिक्या : रिमझिम पावसामुळे यमुनेला कुठुन पुर येणार रे ?
मी : डिक्या, मी आधीच वैतागलो आहे, जरा मुड ठिक व्हावा म्हणुन ओळी गुणगुणतो आहे तर तु अजुन माझं डोक खा !
डिक्या : अरे पण येव्हढ वैतागायला झालय तरी काय ?
मी : जळ्ळा मेला पुरुषाचा जन्म !! अरे एक दिवस असा येतोच पंधरा दिवसांमधुन, सगळ काही ताळ्-तंत्रच बिघडलेले असते.
डिक्या : म्हणजे ?
मी : त्या दिवसाची सुरुवात सकाळी उठल्यापासुन होते, उठण्यावरुन आठवले, की कळायला लागल्यापासुन, आता काय कळायला लागल्यापासुन ? हे विचारु नकोस, तर कळायला लागल्यापासुन बाप लाथ घालुन झोपेतुन उठवायचा, तिकडे कॉलेजात मित्रमंड्ळी लाथा घालायची, हल्ली आता आमची ही ( पक्षी : शशिकला, ललिता पवार, बिंदु आणि अर्चनापुरण सिंग यांचे बेमालुम मिश्रण ) नव्याची नवलाई संपल्यापासुन लाथा घालुन उठवते, तरीही कामावर उशीर होतो, मग तिकडे मॅनेजर लाथा घालतो. पुलंनी सांगीतल्याप्रमाणे माझ्या शरीराचा तो भाग लाथा खाण्यासाठीच निर्माण झाला आहे की काय इतपत शंका येते आहे...असो.....ते लाथापुराण पुन्हा कधीतरी...तर त्या दिवशाची सुरुवातच लाथा खाण्यापासुन होते. चहा बनवायला घ्यावा तर आधी लायटर च चालत नाही, मग घरात माचिस नसते, मग खाली जावुन माचिस आणावी लागते, तिथे तो दुकानदार सुट्ट्या पैशासाठी डोके खावुन घेतो, मग आपण वर आलो की बायको त्याच लायटर ने गॅस चालु करुन दाखवते, हे झाल की आपण चहा ठेवतो, नेमकी साखर कमी असते. मग आपण पुन्हा खाली, मग दुकानदार पुन्हा 'सगळ एकदाच न्यायला काय होते' म्हणुन प्रवचन देतो. ती साखर घेवुन आपण वर आलो की गॅस संपतो.
मग आपण (किमान आजतरी) दाढी करावी म्हणुन ब्रश हातात घ्यावा, तर क्रीम संपलेले असते,दुकानदारा कडे जायची हिम्मत ही संपलेली असते, मग नुसतीच साबणाने करावी लागते, त्यात घाई केल्यामुळे दहा ठिकाणी कापल्या जाते. कापले गेल्यामुळे आग-आग होते मग त्या आगीमुळे जाहीरातीत दाखवितात तसा नाच करीत दाढी घोटावी लागते. पावसाळ्याचे दिवस असतात म्हणुन आपल्याला पाणी गरम हवे असते, नेमक गिझरच बटण दाबायाला जावे तेव्हा लाईट जाते, मग बसा बोंबलत !! अर्धा तास वाट पाहुन ही लाईट येत नाही, म्हणुन आपण गार पाणी अंगावर घेतो, नेमकं त्याच वेळेला फोन वाजतो, आपण दुर्लक्ष करावे तर घरातन कोणीतरी " अहो , मॅनेजर चा आहे " म्हणुन सांगत, अर्जेन्सी असेल म्हणुन टॉवेल लावुन बाहेत यावे लागते, त्याने अजुन कुडकडते ! तिकडे फोनवर मॅनेजर कधी नव्हे ते मिटिंग-निमीत्त आज जरा लवकर या म्हणुन विनंतीवजा धमकी देतो, मग परत दिंडी आत मध्ये ! कसे बसे तयार व्हावे तर नाष्टाच तयार नसतो. मग आंघोळीला जाताना असलेल्या कडकडीत उन पडलेल्या वातावरणाला बदलायची घाई होते, पाऊस सुरु होतो , मग शुज काढा, जाकिट, ती रेन-कोटची पॅन्ट वर कान टोपी, हेल्मेट, पाठीला बॅग असा जामानिम्यासकट, उपाशी पोटी पार्किंग ला यावे लागते.
मनाशी वाटत चला किमान येथुन तरी नीट शी सुरुवात होईल दिवसाची ! पण जळ्ळा मेला पुरुषाचा जन्म !! आपली बाईक काल रात्री मेव्हण्याने / भावाने / मित्राने / मित्राच्या मित्राने नेलेली असते, त्यामुळे पेट्रोलचा खेळ-खंडोबा झालेला असतो. उरल्या-सुरल्या पेट्रोल मध्ये किमान पंपापर्यंत तरी बाईक जाईल असे आपल्याला वाटते, म्हणुन चोक मारत-मारत बाईक रेटावी तर नेमके पंप यायच्या थोडे आधी खतम, हे करे पर्यंत पावुस संपुन,छान पैंकी उन पडलेले असते. आत त्या लवाजम्यासकट बाईक ढकलत गाडी पंपापर्यंत न्यायची असते, तो राकेश शर्मा, नील भुजबळ की अजुन कोण ? ते काय ते अंगात स्पेस्-सुट गेले असतील अंतराळात, त्यांना म्हणा जरा अंगात तो जामानिमा असताना जरा पंपापर्यंत गाडी ढकलत जावुन दाखवा म्हणावं, बर आपण गाडी ढकलत असताना रिकामा असलेला तो पंप आपण गाडी नेईपर्यंत पंपावर फुल्ल गर्दी !! मग पुन्हा चलबिचल, त्यात उन्हातुन आलेली मंडळी आपल्या त्या वस्त्रप्रावरणां मुळे ईतर मंडळी " कुण्या गावाच आलं पाखरु" अश्या नजरेने बघत असतात, कामवर असाही त्यामुळे उशीर व्हायचा ते होतोच.
डिक्या : आणी जर समजा पेट्रोल नाही संपले तर.
मी : डिक्या ! जर हे नाही झाल तर, नेमकी पाऊस संपुन गेलेल्या वाटेवर आपली बाईक पंचर होते, जळ्ळा मेला जन्म पुरुषाचा !! नेमके पंचरचे दुकान दुर असते, मग पुन्हा , राकेश शर्मा, निळुभाऊ भुजबळ ! नेमके त्या रस्त्यावरचे पंचरचे दुकान ठावुक नसते. बर कसबस तिथवर गेलो की पंचरवाल्याकडे ही गर्दी, मग आपला नंबर लागला की कळते की ट्युबच गेली आहे ! मग ट्युब बदलण्याचा कार्यक्रम हाती घेतल्या जातो, तुला वाटले सोप्प असेल नाही का हे !! पण जळ्ळा मेला जन्म पुरुषाचा, नेमकी त्या ट्युबची किंमत आणि आपल्या पाकिटात असलेली रोख रक्कम या मध्ये केवळ काही रुपड्यांचा फरक असतो, पंचरवाल्याला कन्व्हिंस करायला जावे तर तो " क्या मिलता है साब अपुन को ईसमें " अस म्हणत एखाद्या स्कुटीवाली समोर आपली उरली-सुरली काढतो. मग आणखी दोन शोध सुरु होतात. पहिला म्हणजे एटीमचा आणि दुसरा म्हणजे तिथवर पोहोचण्याचा !आधी एक-दोन रिक्षावाल्यांकडुन अपमान झाल्यावर एखादा रिक्षावाला तिथवर येण्याकरिता भक्कम आकारणी चा आ़कडा मागतो. येव्हढे करुन ही एटीएम ला पोहोचावे तर, तिथे नेमक्या हजाराच्या नोटा असता , आणि आपल्या कडे बॅलन्स त्या पेक्षा कमी, मग शोधा पुन्हा एटीएम !!
या सगळ्या अग्नि-दिव्यातुन पार पडत, आपण ऑफिसमध्ये पोचावे तर आधी पार्किंगलाच जागा मिळत नाही ,मिळाल्यावर मॅनेजर फोन करतो आणि फोनवरच पंचनामा सुरु करतो ( त्याच्यासमोर सर्व कलिग्स असतात. विषेशता स्त्री कलिग्स !! ) आणी तसाच, म्हणजे त्या जामानिम्या सकट प्रेझेन्टेशन-रुपी दुसर्या पंचनाम्याला सुरुवात करतो. वाटत आता तरी आजचा दिवस संपेल, पण जळ्ला मेला जन्म पुरुषाचा दिवसभरातुन जे ब्रेक्स मिळतात, त्यात ही पंचारती चालुच असते. दिवसभर मर-मर करुन जे टास्क संपवायचे असते ते संपत नाही. संपले तरी त्यात ढोबळ चुका रहातात, मग जाताना मॅनेजर आपणच कसे बॉस आहोत हे दाखवुन देतो. झाल एकदाच ! एक योगा-योगाने , लाथा खात, दुर्दैवी दिवस असा संपतो मात्र त्याच्या खाणा-खुणा महिनाभर सतावत असतात. आजचा ही दिवस असाच काहीसा पण संपला असे म्हणावयास हरकत नाही.
डिक्या : मित्रा आय अॅम सॉरी पण संपला असे वाटत नाही !
मी : का रे ?
डिक्या : अरे माझ्या आता लक्षात आले की मी आज वॉलेटच आणलेले नाही.
मी : क्काय ? डिक्या माझ्या अकाऊंट मध्ये इथल्या पापडाचे पैसे देण्याइतपत पण बॅलन्स नाही..
.
.
.
.
मित्रांनो मला इथच थांबावे लागेल, डिक्याने नुकतच हॉटेलच्या मॅनेजर ला बोलावुन घेतल आहे.
.
.
.
या हॉटेलमध्ये नुकतेच दोन बलदंड बॉक्सर ठेवण्यात आले आहेत याची आम्हाला अजिबात कल्पना नव्हती.
.
.
.
.
.
मार खावुन, भांडे घासुन झाल्यावर भेटुयात आता, जळ्ळा मेला ................
प्रतिक्रिया
13 Feb 2012 - 4:54 pm | पक पक पक
मार खावुन, भांडे घासुन झाल्यावर भेटुयात आता, जळ्ळा मेला ................
काय हो प्रचारफेर्या संपल्या वाट्त ..? ;) एक्दम नव्या जोमाने कामाला लागलात. :bigsmile:
मस्त झाला आहे हा फार्स.
13 Feb 2012 - 5:12 pm | वपाडाव
हे घे... लेमन पॉवर आहे यात...
सोबत स्क्रबरसुद्धा लागेलच...
13 Feb 2012 - 5:16 pm | चौकटराजा
सुहास राव , काय बोलू ? अरे भाउ लेख फारच म्हण्जे " लैच भारी " . प्यी येल प्लस वपु " म्हंजे कसे असेल . तसा आहे. पण राव. पुर्षाचा जन्मच
बरा... मी नै पुढच्या जन्मी नारी होणार बुवा ! गाडीतल्या पेट्रोलनं , दाढीतल्या साबणानं , .....अंघोळीतील विनाकारण कोमट झालेल्या पाण्यानं एकाच दिवशी धोका दिला तरी चालेल. लाटण्याचा मार खाईन , आमटीतल्या मीठाचा मारा खाईन, ..सकाळ संध्याकाळ पोळीचा चुरा खाईन ....
पण मला बाप्याचाच जन्म हवा...... कोणते व्रत करावे त्याची सुहासराव कहाणी सांगा नं ...... आट पाट नगर होते तिथे चौकटराजा नावाचा एकाक्ष राजा दास्य करीत होता..........
लेखन सीमा.
आता मी माझा उंदीर कराव हे बरे !
13 Feb 2012 - 5:26 pm | चिगो
"पुरुषांच्या समस्या आणि व्यथा" हा कार्यक्रम सुरु क्रावा का "सुहास..."भाऊंना कौंसिलर घेऊन ?
फर्मास लेख, मित्रा.. आवडेश. ते गाडी ढकलण्याबद्दल पुरेपुर पटलं मला, त्यातला त्यात जर स्कूटर पंचर झाली तर जो आट लागतो ना जीवाला.. देवा रे...
13 Feb 2012 - 5:47 pm | पक पक पक
"सुहास..." कि 'सुहास..'
13 Feb 2012 - 5:41 pm | परिकथेतील राजकुमार
एकदम तडातड पॉपकॉर्नी लेख रे.
13 Feb 2012 - 6:07 pm | मी-सौरभ
आ व डे श
13 Feb 2012 - 6:10 pm | असुर
भारी!!!!!!!!! आवडलाच येक्दम!!! :-)
आत्ता या क्षणी 'युयुत्सु' असा एक शब्द आठवून गेला. ;-)
धोक्याचा इशारा: धागाकर्त्याने पाशवी शक्तींपासून सावध रहावे.
-असुर
13 Feb 2012 - 6:16 pm | स्वाती२
आवडले. :)
13 Feb 2012 - 6:44 pm | तर्री
अर्थात रा.प.चि.क
13 Feb 2012 - 6:55 pm | शुचि
चकलीसारखा खुसखुशीत :)
13 Feb 2012 - 8:37 pm | रेवती
हम्म....
वाईट्ट रे वाईट्ट!
13 Feb 2012 - 8:57 pm | मराठे
लै भारीए !
13 Feb 2012 - 9:21 pm | पाषाणभेद
बाजूला व्हा रे सारे, सुहास सुटलाय आता!
13 Feb 2012 - 9:30 pm | पैसा
आम्ही तुमच्या दु:खात सहानुभूती दाखवण्यापुरते सहभागी आहोत!!
13 Feb 2012 - 10:42 pm | बिपिन कार्यकर्ते
मस्त! मजा आली वाचताना!
14 Feb 2012 - 12:25 pm | आदिजोशी
च्यायला लोकांना चेष्टा सुचतेय इथे. इतक्या गंभीर विषयावर तितकीच गंभीर चर्चा अपेक्षीत आहे. आमच्याबद्दल सहानुभुती दाखवता येत नसेल तर किमान जखमेवर मीठ तरी चोळू नका.
14 Feb 2012 - 1:49 pm | पक पक पक
कॉलींग वपाडाव,
कॉलींग वपाडाव,
:bigsmile: वप्या एक व्हीम केक अन स्क्रोच ब्राइट इकडे पण पाठ्वुन दे बाबा .... ;)
14 Feb 2012 - 2:38 pm | छोटा डॉन
साक्षात अॅडीसारख्या प्रस्थापित आणि उ.न.क.चा संस्थापक अध्यक्ष म्हणुन प्रसिद्ध पावलेल्या पुरुषालाही त्याच्यावरच्या सर्व ओझ्याचे बोज बाजुला सारुन हिमतीने २ शब्द लिहण्याची हिंमत देण्याचे स्फुलिंग पेटवले गेले हेच ह्या लेखाचे यश आहे. ;)
शाब्बास रे सुहाश्या !
- छोटा डॉन
14 Feb 2012 - 3:38 pm | प्यारे१
+२७.५
14 Feb 2012 - 2:27 pm | गणपा
एकदम कुरकुरीत =))
तुफ्फान जमलाय रे वाश्या.
14 Feb 2012 - 3:39 pm | प्यारे१
पुनर्वाचनाचा प्रत्यय आला....