प्राजक्त फुलला दारी

जागु's picture
जागु in जनातलं, मनातलं
7 Feb 2012 - 2:15 pm

प्राजक्ताचे नाव काढताच डोळ्यासमोर येतो तो प्राजक्ताचा सडा त्याचा मंद
सुगंध. प्राजक्ताच्या फुलाच रुपडंही अगदी सुंदर, केशरी रंगाचे देठ ह्याचे
खास आकर्षण. प्राजक्त साधारण जुलै, ऑगस्टमध्ये बहरून येतो. असेच एक
प्राजक्ताचे झाड माझ्या लहानपणी माझ्या माहेरच्या अंगणात होते. पावसाला सुरुवात झाली की काही दिवसांतच हा प्राजक्त बहरून यायचा. सकाळी छोट्या
असणार्‍या कळ्या संध्याकाळी टपोर्‍या झालेल्या पाहताना मला खूप मजा
वाटायची.

ह्या टपोर्‍या कळ्या अंधारातच गुपचुप फुलायच्या आणि सकाळी थेट
अंगणात त्यांचा सडा पडलेला दिसायचा. सकाळी उठून हा सडा पाहण्यासाठी
अंगणात जायचे. ओल्या जमिनीवर मंद सुगंध दरवळणारी ती केशरी-पांढरी फुले
पाहून मन उल्हसित व्हायच. मग परडी भरून ही फुले गोळा करायची.

Prajakt.JPG

ही गोळा करता करता अजून एक छंद असायचा म्हणजे झाड हालवून प्राजक्ताच्या फुलांचा
पाऊस अंगावर घ्यायचा. त्या कधी दवाने तर कधी पावसाने भिजलेल्या फुलांचा
मऊ, गार स्पर्श मायेचा पाझर घालायचा. ह्या प्राजक्ताच्या फुलांच्या
पावसातील आनंद म्हणजे टप टप टप टप पडती प्राजक्ताची फुले ह्या
बालगीताच्या ओळी सार्थकी लावायच्या.

प्रत्येक सीझनला प्राजक्ताची फुले यायला लागली की आवर्जून प्राजक्ताचे
हार बनवून ते देवांच्या तसबिरींना घालायचे. बर हार बनवायचे ते पण
वेगवेगळ्या पद्धतीने. एका लाइनमध्ये सगळी फुले, एक पाकळ्याना पाकळ्या व
देठांना देठ चिकटवून म्हणजे कमळासारखा आकार येतो दोन फुलांचा मिळून तर एक
कष्टाचा प्रकार होता तो म्हणजे देठ काढून नुसत्या फुलांचा हार. हा हार
अगदी भरगच्च व गुबगुबीत दिसे. पूजेसाठी हार घालून झाले की उरलेल्या
फुलांची ओटीवर रांगोळी काढायची. हे झाले माझे बालपणाचे दिवस.

लग्न झाले आणि सासरी आले. माझ्या सासर्‍यांनी नवीनच जागा घेतली होती. त्या जागेत एक छोटं प्राजक्ताच कलम लावल होत. अगदी अंगणातच. २-३ वर्षातच ते मोठ्ठ होऊन त्याचा सडा पडायला लागला. परत माझे बालपणीचे दिवस आठवले.
मग आता ह्या सड्याचा आनंद तर उपभोगायलाच हवा. पण पुर्वी सारखा वेळ आता
मिळत नाही म्हणून सकाळी मी चहा घेऊन अंगणातल्या लादीवर बसून कपातला चहा
संपेपर्यंत गवतात पाय सोडून हिरव्यागार गवतावर पांढरा-केशरी प्राजक्ताचा
सडा आणि त्याचा मंद सुगंध अनुभवते. ही अनुभवलेली पाच मिनिटे माझ्यासाठी
दिवसभराचा उत्साह निर्माण करतात.

Prajakt1.JPG

आता बालपणी एवढा रांगोळी वगैरे काढण्यापर्यंत वेळ नसतो. पण प्राजक्ताची
फुले पाहिली की राहवत नाही. मग सुट्टीच्या दिवशी परडी भरून फुल गोळा करते
आणि सासूबाईंना त्याचे हार बनवून देते वेळ असेल तर स्वतःही घालते. रात्री
शतपावली करताना नवीन उमलणाऱ्या फुलांचा पुन्हा सुगंध भरभरून घेते. त्याने
रात्रही अगदी सुगंधी होऊन जाते.

ह्या फुलांच आणि माझं नातही अस आहे की माझं लग्न झाल आणि माझ्या
मिस्टरांनी त्यांच्या पराग ह्या नावाला मिळत जुळत म्हणून माझ नावही
प्राजक्ताच ठेवल. आमच एकत्र कुटुंब आहे. माझ्या जाऊबाई रोज ही फुले
देवपूजेसाठी गोळा करतात. माझी मुलगी श्रावणी २ वर्षांची असताना एक दिवस
लवकर उठली होती आणि तिने पाहील की तिची काकी फुल गोळा करतेय. तेंव्हा ती
जोरात ओरडली ए काकी ती माझ्या आईची फुले आहेत तू गोळा नको करुस. एक क्षण
मला काही कळले नाही. नंतर मला आणि सगळ्यांना समजल की आम्ही रोज
प्राजक्ताची फुल म्हणून उल्लेख करतो त्याचा अर्थ माझ्या मुलीने माझीच
फुले असा घेतला होता. दुसर्‍या अर्थाने तिच प्राजक्ताच फुल आहे.

असा हा माझ्या अंगणात बहरणारा प्राजक्त. ह्याचे नि माझे मला काही
ऋणानुबंध आहेत अस वाटत. हे माझे प्राजक्ताच्या फुलांवरचे प्रेम म्हणून का
कोण जाणे पण जरी फुलांचा बहर ओसरला, त्यांचा हंगाम गेला तरी अगदी
उन्हाळ्यातही ७-८ तरी फुलांचा सडा आमची मैत्री निभावण्यासाठी, माझे मन
प्रसन्न करण्यासाठी अंगणात पडतो.

छायाचित्रणअनुभव

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

7 Feb 2012 - 2:27 pm | अत्रुप्त आत्मा

---^---

काय म्हणु या लेखाला..?
अनुभव..जिवंत काव्य...?
की फक्त...प्राजक्ताचा सडा...

मुकेपणा गहिरेपणा हळुवारपणा
मानवी मनाचे अनेक रंग जपणारा,खुलवणारा
खराखुरा निसर्गसुंदर...प्राजक्ताचा सडा...

लहानपणची अठवण,तारुण्यातली सहजता
आयुष्यभराची सुखद ठेव
म्हणजे दुसरे काय..? प्राजक्ताचा सडा...

गणेशा's picture

7 Feb 2012 - 2:33 pm | गणेशा

थोडेशे आमचे ही लिहावेसे वाटते
अवांतर :
आणि अजुन आवडण्यास कारण वेगळे ही आहे ..

पारिजातकाची ही फुले माझ्याही खुप आवडीची आहे..
त्यामुळे त्या संबंधीचे सर्व काही मला आवडते..
माझ्या जुन्या घरी बाग होती.. आता नविन घरी नाही.. पुढे अंगणात थोडी जागा आहे, तेथे पारिजातकाचे झाड लावायचे आहे.. पण खुप दिवस झाले रोप च मिळत नाहि .. वाईट वाटते..
मध्ये त्याच्या बिया आणल्या होत्या वटेश्वर मंदिरात गेलो होतो सासवड ला तेंव्हा.. पण त्या आल्या नाही ...

पारिजातकाच्या झाडामुळे.. फुलांच्या गुणधर्मामुळे माझ्या घराचे नाव पण " पारिजात " ठेवले आहे ... माझय आवडणार्या कवितेत बर्याच दा या पारिजाताचा उल्लेख आपोआप येतो आणि त्या सुगंधीत ओळींनी मन प्रसन्न होत जाते..

आणि मला आवडणार्‍या वाक्यात सर्वात आवडते वाक्य पण या फुलांमुळेच आहे ..

वाक्य (आठवले तसे):
"पारिजातकाचे आयुष्य मिळाले तरी चालेल , पण लयलुट करायची ती सुगंधाचीच " - व.पु. काळे

बाकी

लिहित रहा... वाचत आहे...

अन्या दातार's picture

7 Feb 2012 - 2:39 pm | अन्या दातार

मस्त लेखन. पारिजातकाच्या फुलांचा सडा फोटोत का होईना, पण पाहिल्यावर काय प्रसन्न वाटले. सुंदर. जागुतै, हेवा वाटतो तुझा. :)

बिपिन कार्यकर्ते's picture

7 Feb 2012 - 2:50 pm | बिपिन कार्यकर्ते

जागुताई, प्राजक्ताच्या झाडाशी निगडीत, खूप आतल्या, खूप जुन्या, काही आठवणी वर आल्या!

प्राजक्ताचं फूल हे अतिशय सुंदर दिसतं. केवळ दोनच रंग. त्यातला एक तर पांढराच. दुसरा नाजूक केशरी. तरीही हे फूल अतिशय प्रसन्न दिसतं आणि प्रसन्न करून जातं!

सकाळी मी चहा घेऊन अंगणातल्या लादीवर बसून कपातला चहा
संपेपर्यंत गवतात पाय सोडून हिरव्यागार गवतावर पांढरा-केशरी प्राजक्ताचा
सडा आणि त्याचा मंद सुगंध अनुभवते.

तुझा प्रच्चंड हेवा वाटला बघ! :)

गणपा's picture

7 Feb 2012 - 2:55 pm | गणपा

तुझा प्रच्चंड हेवा वाटला बघ!

थोडा बदल करुन म्हणतो.
नेहमीच तुझा प्रच्चंड हेवा वाटतो बघ!

सुहास झेले's picture

7 Feb 2012 - 5:49 pm | सुहास झेले

ह्येच म्हणतो जागुतै :) :)

अत्रुप्त आत्मा तुमचा प्रतिसाद प्राजक्ताच्या फुलासारखाच आहे. धन्स.

गणेशा नर्सरीत पाहीलत का ? मिळेल नर्सरीमध्ये प्राजक्ताचे रोप.

अन्या धन्यवाद.

गणेशा's picture

7 Feb 2012 - 3:21 pm | गणेशा

पाहिले ना...
नाहि मिळाले ..
आत्ता मध्ये पौड .. पवना भागाल भेट दिली होती ...
तेथे बर्याचश्या नर्सरी ला पुरवठा करणारी रोपे पिकवली जातात, ५-६ फुलांची झाडे आणली ( नाइलाजाने गच्चीवर ठेवायला) ..
पण पारिजातकाचे झाड काही मि़ळाले नाही.. चाफा होते.. अजुन वेगवेगळी होती.. पण नेमके हे नव्हते.
जगताप नर्सरी ने मात्र तेथुन विक्री करत नाहित म्हणुन एंट्री ही दिली नाहि ...

प्रयत्न चालु आहे ...

बाकी कुंडीत झाडे लावण्यापेक्षा, गच्चीच्या एका भागात माती पसरवुन आपण त्यात झाडे(लहान फुलांची) लावु शकतो का ?
असल्यास थोडे सजेशन्स माहिती सांगितल्यास मंडल आभारी आहे ...

जागु,
मस्त फोटो..त्यहुन मस्त लेख अन त्याहुनही सुंदर प्राजक्ताचा सडा.....

_____/\_____

पारिजातकाचा सडा पडलेला फोटो मस्त.......
प्राजक्ताचा पाऊस पाडताना आणि त्यात भिजतानाची आठवण ताजी झाली......

स्मिता.'s picture

7 Feb 2012 - 3:21 pm | स्मिता.

जागुताई, अगं काय सांगु... हा लेख वाचून खूप सार्‍या भावना अचानक दाटून आल्या. लेख आवडला हे वेगळं सांगायला नकोच.

माझ्या लहानपणी (ज्या वयातलं आता सगळं अंधुकच आठवतं) आमच्या अंगणात एक पारिजातकाचं झाड होतं. मलाही त्याचा सुगंध खूप आवडायचा. सकाळी आजी पुजेकरता फुलं गोळा करायची तेव्हा ते झाड हलवून टपटप पडणारी फुलं अंगावर झेलायला मजा यायची.
रोज सकाळी उठायचे तेव्हा आधीच फुलांचा सडा पडलेला सगळीची, सगळीची सगली फुलं झाडावर कधी पाहिलीच नव्हती. एकदा माझी आत्या भल्या पहाटे आली तेव्हा मी पण उठले होते आणि तेव्हा एकदाच सगळी फुलं झाडावरच असलेला प्राजक्त पाहिला होता. आकाशातल्या चांदण्या त्या झाडावर आल्यासारख्या वाटत होत्या. त्या वयातलं आता काही जास्त आठवत नाही पण ते चांदण्या ल्यायलेलं झाड मात्र अजूनही आठवतंय :)

गणेशा's picture

7 Feb 2012 - 3:30 pm | गणेशा

" चांदण्या ल्यायलेलं झाड " हि संकल्पना जास्त आवडली...

अश्याच पाना फुलांच्या प्रितीत दरवळेले काही क्षण आठवताना लिहिलेले हे काव्य ह्या संकल्पने मुळे येथे द्यावेशे वाटले..
(कविता तश्या आता कमी झालेत.. पण कधी तरी अश्या आठवणी आल्यावर छान वाटते)

आकाशमिठीत गर्द
रात्र ओली शृंगारलेली
नभवेलीवर शुभ्रांकित
निशिगंधीत चांदणं

निशब्द ओठांवरती
पारिजात धुंद
स्वप्नमेघ पालवत
निशिगंधीत चांदणं

ओझरत्या दवबिंदूंमध्ये
कातरलेला चंद्र
शहारलेल्या अंगणी
निशिगंधीत चांदणं

नभी चंदेरी आरास
नीर दर्पण शोभीवंत
झावळीतून शिंपलेले
निशिगंधीत चांदणं

चंद्रसावलीचा प्रदेश
शब्दांध वार्‍याचा झोत
क्षितिजापल्याड झेपावलेले
निशिगंधीत चांदणं

-

पक पक पक's picture

7 Feb 2012 - 3:42 pm | पक पक पक

वा !! गणेशा खुप सुंदर.......

प्रचेतस's picture

7 Feb 2012 - 9:51 pm | प्रचेतस

सुंदर काव्य रे मित्रा.

सुहास..'s picture

8 Feb 2012 - 12:15 pm | सुहास..

गणेशा आणि जागुताई .....सुप्परलाईक !!

घाल घाल पिंगा वार्‍या ,माझ्या परसात
माहेरच्या सुवासाची ,कर बरसात

कविता आठ्वली का स्मिता तुम्हाला.... ? :)

बिपिन कार्यकर्ते's picture

7 Feb 2012 - 3:48 pm | बिपिन कार्यकर्ते

चांदण्या ल्यायलेलं झाड

अतिशय सुंदर आणि चपखल उपमा! वा! ती फुलं दिसतातही चांदणीसारखीच!

उदय के'सागर's picture

7 Feb 2012 - 3:30 pm | उदय के'सागर

खुप आनंद वाटला हे सगळं वाचुन आणि फोटोज पाहुन... धन्यवाद...

माझाहि एक 'प्राजक्तं' अनुभव ... :)

मी लहान असतांना (चवथी-पाचवीत असेन)आई बरोबर काकुच्या माहेरी-भुसावळला गेलो होतो, काकु बाळांतपणासाठी माहेरी होती (तिला मुलगी झाली होती -माला क्युट्शी चुलत बहीण :) )... तर तिच्या घरी गेल्यापासुन का कोणास ठाउक पण मला जाम बोर होत होतं, कोणी ओळखिचं नाहि विशेष, घर नविन,शिवाय माझ्या वयाचंहि तिथे कोणिच नव्हतं.. त्यात अता इथे ३-४ दिवस रहायचं ह्याचं अजुनच टेन्शन आलं होतं... मग असंच त्या मोठ्या घरात फिरत फिरत मी मागच्या दारात गेलो, दार लोटलेलंच होतं, उघडुन बघतो तर काय ... अंगणभर प्राजक्ताचा सडा :) ( व्वा आज एवढ्या वर्षांनंतरहि अगदी लख्खं आठवतोय तो दिवस आणि ते चित्रं. ) ...मग काय! क्षणात माझी उदासिनता पळाली.. एकदम फ्रेश वाटलं.... :) पुढचे ३-४ दिवस कसे गेले कळलच नाहि ... मी आणि ते झाड.. खुपच छान गट्टी जमली आमची (झाड मोठ्ठं अस्ल्याने मस्तं चढुनहि बसयचो) :)

सुरेश भटांनी किती सुदंर ओळी लिहील्या आहेत... खुप काहि सांगुन जातात ह्या ओळी....

सख्या तुला भेटतील माझे
तुझ्या घरी सूर ओळखीचे
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा
अबोल हा पारिजात आहे

प्राजक्ता पवार's picture

7 Feb 2012 - 3:34 pm | प्राजक्ता पवार

जागु , छान लिहलं आहेस ,
मनात अनेक जुन्या आठवणी जाग्या झाल्या :)

स्मिता क्या बात है !

मनराव, पकपकपक, कार्यकर्ते धन्यवाद.

गणेशा तुम्ही कुठे राहता ?
गच्चीत छोटी झाडे लावू शकता. हल्ली खुप ठिकाणी गच्चीवर माती टाकून झाडे लावतात. फक्त झाडे मोठी लावू नका नाहीतर मुळे आत शिरण्याची भिती असते. शिवाय गच्चीत लिकेज तर नाही ना हे पण पहा.

श्रावण मोडक's picture

7 Feb 2012 - 3:40 pm | श्रावण मोडक

प्राजक्ताचा प्राजक्तसडा! :)

गणेशा सुंदर कविता.

प्राजक्ता धन्स.

उदय हा प्राजक्तच असा आहे की ज्याला ज्याला ह्याचा सहवास लाभतो त्यावर तो आपल्या खुणा साठवून ठेवतो.

मला माझ्या गावी मी स्वतः लावलेल्या पारिजातकाच्या झाडाची आठवण आली. रात्री पारिजातकाच्या झाडाखाली बसून त्याचा सुवास श्वासात भरुन घेण्याइतका आनंद दुसरा कोणता नाही! पण काही दुर्दैवी माणसांनी त्याची फुलं खुप वेळ टिकत नाही म्हणून त्याला नावं ठेवली. काहींनी तर आपल्या घराची भिंत त्या पारिजातकापर्यंत वाढवली आणि आता त्याची मुळं घरात येतात म्हणुन ते काढावं लागेल म्हणून मला बजावायला लागले आहेत :(

५० फक्त's picture

7 Feb 2012 - 4:11 pm | ५० फक्त

फार दुख-या आठवणी आहेत पारिजातकाच्या, प्ण राहवत नाही म्हणुन प्रतिसाद देतो आहे, माझ्या जन्मापासुन ज्या ज्या घरात राहिलोय त्याच्या अंगणात पारिजातक होता, अन प्रत्येक घर सोडताना त्याच्याच गळ्यात पडुन रडलोय.

इरसाल's picture

7 Feb 2012 - 4:11 pm | इरसाल

लहानपण कोकणात गेले असल्यामुळे पारिजातकाचा सडा आणि धुन्द करणारा सुगंध अनुभवलेला आहे.पाटी पूजनाच्या दिवशी माझ्याच पाटीवर सगळ्यात जास्त पारिजातकाची फुले राहत हे आठवले.

पारिजातक नेहमीच सत्यभामा आणि रुक्मिणीची आठवण करून देतो.

प्यारे१'s picture

7 Feb 2012 - 4:21 pm | प्यारे१

प्राजक्त पहिल्यापासूनच मांगल्याचं प्रतिक वाटत आलाय. परवाचं (म्हणजे परवाचं) स्पावड्याचं माझा गाव मधलं प्राजक्ताचं स्वस्तिक पण मन प्रसन्न करतं. शुभ्र पांढर्‍या पाकळ्या आणि सात्विक केशरी रंग असलेलं हे फूल म्हणजे खरंच देवत्वाची प्रचीति आणतं जाणवून देतं. थोडा आणखी वेळ देवासमोर टिकायला पाहिजेत राव हे... खूपच नाजूक नि लगेच कोमेजणारं असतं.

५०, प्राजक्त म्हणजे आठवणींचा सडाच आहे.

इरसाल, प्यारे धन्यवाद.

दिपक's picture

7 Feb 2012 - 4:35 pm | दिपक

आवडतं फुल कोणतं असं कुणी विचारलं की मी लगेच पारिजातकाच नाव घेतो. अत्यंत आवडत्या फुलावर हा सुंदर लेख वाचुन लहाणपणीचे दिवस आठवले. आजही रात्री रस्त्यावरुन चालताना अचानक पारिजाताकाचा सुवास येतो आणि ते सगळं डोळ्यासमोर येतं. मग थोडा वेळ तिथेच घुटमळतो तो सुंगध भरभरुन घेण्यासाठी.

लेख खुप आवडला जागुताई. गणेशाची कविताही छान.

काय सुंदर सडा पडला आहे.. आहा. सुगंधही भासला नाकात पाहता-वाचताना..

जियो..

रेवती's picture

7 Feb 2012 - 8:51 pm | रेवती

अगदी सुगंधी लेखन.

पैसा's picture

7 Feb 2012 - 9:02 pm | पैसा

खूप आठवणी जाग्या झाल्या. मी लहान असताना भाड्याच्या घराच्या अंगणात प्राजक्ताची एक फांदी लावली होती, फांदी जीव धरत नाही असं म्हणतात, पण ती जगली, वाढली आणि मोठी होऊन घराला शोभा आणत राहिली. ते घर आम्ही नंतर सोडलं, पण अजून कधी तिथे गेले, तर मी त्या प्राजक्ताला भेटून येते.

दुसरा प्राजक्त माझ्या आजीने आमच्या आजोबांच्या घरी लावलेला. घराबरोबर तोही गेला. हे लिहिताना डोळे भरून येताहेत पण....

प्रचेतस's picture

7 Feb 2012 - 9:21 pm | प्रचेतस

प्राजक्ताच्या फुलांसारखच सुंदर, टवटवीत लिखाण.

मयुरपिंपळे's picture

7 Feb 2012 - 9:39 pm | मयुरपिंपळे


ह्या छायाचित्रा चे फोटोग्राफाईर आहेत पिंट्या ..

अंजली पुरोहीत यांचे आभार
आणि तुमचेही आभार.

किसन शिंदे's picture

7 Feb 2012 - 10:12 pm | किसन शिंदे

मस्त, अतिशय सुंदर लेख!

वरील २ ही फोटो दिसत नसल्याने निराशा झाली.
पिकासा वरुन देत जा कि वो फोटो

वपाडाव's picture

8 Feb 2012 - 12:19 am | वपाडाव

काहीतरी पंचावन्न....
बरोबर नै का रे सौर्‍या....

मनराव's picture

8 Feb 2012 - 9:41 am | मनराव

आक्षी बरूबर........

सानिकास्वप्निल's picture

7 Feb 2012 - 10:48 pm | सानिकास्वप्निल

खुपचं सुंदर लेखन :)

प्राजक्ताचा सडा पाहिला आणि लहानपणी आईला प्राजक्ताच्या फुलांची माळ करायला मदत करणारा माझा मीच दिसायला लागलो.

लेखन , फोटो सगळंच छान !!

सुंदर लेख आणि फोटो देखील. जागु तुमचा हेवा वाटतो खरच.

चतुरंग's picture

8 Feb 2012 - 2:38 am | चतुरंग

माझ्या मावशीच्या घरी प्राजक्ताचं झाड होतं. रोज सकाळी अंगणात जाऊन पडलेली फुलं गोळा करायला मजा यायची.
झाड हलवलं की दवाचा आणि फुलांचा सडा, फार मस्त वाटतं, सगळा दिवस अतिशय सुगंधी जातो!!

(पारिजातकप्रेमी) चतुरंग

मीनल's picture

8 Feb 2012 - 3:08 am | मीनल

प्राजक्ताच्या फुलासाराखेच सुंदर लेखन. मंद सुवास मागे दरवळत ठेवणारे सुवासिक!!! नाजूक फुलासारख्या नाजूक आठवणींचे !!!

मदनबाण's picture

8 Feb 2012 - 2:01 pm | मदनबाण

हेच म्हणतो... :)

चित्रा's picture

8 Feb 2012 - 9:57 am | चित्रा

अपेक्षा नसताना एकदम फुलांचा ओलसर गार शिडकावा झाल्यासारखे झाले.

झाड हालवून प्राजक्ताच्या फुलांचा
पाऊस अंगावर घ्यायचा. त्या कधी दवाने तर कधी पावसाने भिजलेल्या फुलांचा
मऊ, गार स्पर्श मायेचा पाझर घालायचा.

+१.
धन्यवाद.

विसोबा खेचर's picture

8 Feb 2012 - 11:10 am | विसोबा खेचर

सुमनताईंच्या गाण्यातील अप्रतिम ओळी आठवल्या..

'परसात पारिजातकाचा सडा पडे
कधी फुलं वेचायाला नेशील तू गडे'

सुंदर फोटू..

(हळवा) तात्या.

जाई.'s picture

8 Feb 2012 - 11:27 am | जाई.

पारिजातकासारखाच सुगंधी लेख :)

सगळ्यांचे मनापासून आभार. जे फोटो दिसत नाहीत त्यासाठी मी वेगळे फोटो कलादालन विभागात काही दिवसांनी टाकेन.

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Feb 2012 - 11:37 am | बिपिन कार्यकर्ते

काय ते एवढंसं फूल प्राजक्ताचं... पण बघता बघता सगळ्यांनाच हलवून गेलं! बहुतेकांच्या मनात घर करून बसलंय! सुखद आश्चर्य वाटतंय!

स्मिता.'s picture

8 Feb 2012 - 2:27 pm | स्मिता.

काल रात्री झोपण्याआधी पुन्हा एकदा या धाग्यावरून नजर टाकली तेव्हा अगदी हाच विचार मनात आला. प्राजक्ताच्या झाडाला एवढ्या सगळ्या लोकांच्या भावविश्वात स्थान असलेलं बघून सुखद आश्चर्य वाटलं :)

जागु's picture

8 Feb 2012 - 11:44 am | जागु

कार्यकर्ते खरच अगदी सगळ्यांनाच ह्या प्राजक्ताच्या फुलांनी हळव्या आठवणींचा ठेवा दिला आहे.

ऑफिस मधे धागा उघडल्यावर लगेच लक्षात आले कि हा धागा घरी जावुन निवांत वाचुन अनुभवण्यासारखा आहे. धागा, त्यातील फोटोज आणि प्रतिसाद सुंदर आहेत.

माझी आणी प्राजक्ताची तशी धावती भेट झाल्याचे आठवत आहे पण ठिकाणे लक्षात येत नाहीत. पण नवीन घेतलेल्या जागेत माझ्या हाताने प्राजक्ताच झाड लावायची इच्छा खुप दिवसा पासुन आहे, बघु कधी पुर्ण होते :-)

--टुकुल

<<माझ्या हाताने प्राजक्ताच झाड लावायची इच्छा खुप दिवसा पासुन आहे, बघु कधी पुर्ण होते >>
पारिजातकाच्या झाडाला प्रचंड बिया येतात. झाड जसं फुलांनी बहरत तसचं बियांनी सुद्धा! एखादी चांगली टपोरी बी सहज उगवते. स्वतः बी उगत घालून झालेलं झाड पाहण्याचा नवनिर्मितीचा आनंद अमाप असतो. अर्थात जवळपास कुठे पारिजातकाचं झाड असेल तरच हे होऊ शकतं. नाही तर नर्सरी आहेच.
मी परेल मध्ये बारावीला असताना मे महिन्यात कुठल्याशा क्लास मध्ये जात होतो. मधल्या सुटीत मी बाजूच्याच एका बागेत जाऊन वाचत बसत असे. तिथेच एक पारिजातकाचं झाड होतं. प्रचंड आवडत होतं मला. बागेतून दोन टपोर्‍या बिया गोळा केल्या नि एका दुधाच्या पिशवीत माती भरून उगत घातल्या. एक बी उगवली. चार पानांचं नुकतच लावलेलं ते इवलसं रोपटं यष्टीतून साडे चारशे किलोमीटरचा प्रवास करत कोल्हापूरला पोहोचलं! घरामागच्या परड्यात एक फूटभर खोल खड्ड्यात खत-मातीचं मिश्रणात त्या रोपट्याचं नव घर वसवलं. रोपट जगलं, वाढलं. पुढच्याच वर्षी झाडाखाली छान सडा पडू लागला. आज मुंबईत असताना त्या झाडाची एक अनामिक ओढ लागून राहते. अंधारू लागताच पारिजातकाचा सुगंध घरात दरवळू लागतो. सकाळी मुद्दामच लहान मुलासारखा झाडाखाली उभा राहून झाड गदागदा हालवून त्या पुष्प वर्षावाचा आनंद घेतो. सार्‍या इलाख्यात असं लाख मोलाचं झाड फक्त माझाकडेच आहे! घरात एखादा पाहूणा वस्तीला असला कि रात्रिच्या सुगंधा बद्दल विचारतो नि मी छाती फुगवून सांगतो, "मी लावलेल्या पारिजातकाचा सुगंध आहे तो!"

रम्या (एकदम खास मित्राला बोलतोय अस वाटतय :-) ), मस्त माहीती दिली आणी आपल्या हातुन लावलेल्या झाडाचा अनुभव पण मस्तच.

--टुकुल

वपाडाव's picture

9 Feb 2012 - 3:27 pm | वपाडाव

बाकी सगळं मस्तच आहे पण हे काय??

मी परेल मध्ये बारावीला असताना मे महिन्यात कुठल्याशा क्लास मध्ये जात होतो. मधल्या सुटीत मी बाजूच्याच एका बागेत जाऊन वाचत बसत असे.

कुछ स्पेलिंग मिस्टेक नही लगता क्या?
सकाळपासुन आम्हीच भेटलो काय !!

प्रश्न असा आहे की आपला प्रश्न नेमका काय आहे?

वपाडाव's picture

9 Feb 2012 - 4:32 pm | वपाडाव

ज्यांनाकळवुन घ्यायचाय त्यांना कळाला असावा प्रश्न...
अवांतर :: तुला स्वाक्षरी बदलण्यासाठी तंबी मिळाली की काय रे संपादकांकडुन, की उगाच....

सविता००१'s picture

8 Feb 2012 - 1:35 pm | सविता००१

शब्दच संपलेत सांगण्यासाठी की हा लेख खूप खूप छान आहे आणि प्राजक्त तर इतका सुंदर आहे की बास... एवढच सांगते की तू खूप नशीबवान आहेस.

जागुतै, खूप प्रसन्न वाटलं बघ!
खूप खूप धन्यवाद!

राघव

मदनबाण, स्मिता, सविता, राघव धन्यवाद.

sneharani's picture

9 Feb 2012 - 10:11 am | sneharani

फोटो अन् प्रतिसाद सुध्दा प्राजक्तासारखे सुंदर!!
:)

जागु's picture

9 Feb 2012 - 11:12 am | जागु

रम्या खरा आनंद अनुभवता.

स्नेहा धन्यवाद.

श्यामल's picture

9 Feb 2012 - 11:37 am | श्यामल

सुंदर लेख आणि सुंदर फोटो. जागु, तुझा खरंच हेवा वाटतो गं.

मिरची's picture

9 Feb 2012 - 3:47 pm | मिरची

वाचूनच इतक प्रसन्न वाटल कि काय सांगु? गॅलरीत लावता येउ शकतो का प्राजक्त? कुंडीमध्ये? कोणी सांगु शकेल का कॄपया?

मिरची कुंडीत जास्तीत जास्त एक ते दोन वर्ष कारण हे झाड मोठ होत.

मिरची's picture

9 Feb 2012 - 4:14 pm | मिरची

हो का? :( .....धन्यवाद......

हारुन शेख's picture

10 Feb 2012 - 12:43 pm | हारुन शेख

याला 'प्राजक्त फुलांचे स्तोत्र' म्हणावेसे वाटते !!

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------