आप के हसीन रुख.. (येथे ऐका)
यमन रागाच्या पार्श्वभूमीवरचं नय्यरसाहेबांचं रफिसाहेबांनी गायलेलं एक शांत, तरल, सुरेख गाणं..
गिटारने दिलेली लय आणि पियानोचे सुंदर तुकडे. मोजका वाद्यमेळ. तरीही नय्यरसाहेबांची अत्यंत अनोखी आणि प्रतिभाशाली धून आणि रफिसाहेबांचा रसाळ, सुरीला आवाज या अवघ्या दोन भक्कम बाजुंमुळे गाण्याचं सोनं झालं आहे. किंचित ठाय असलेली 'एक-दो,एक-दो' ही खास नय्यर ठेवणीतली लय आणि त्या लयीचा अक्षरश: गालावरून मोरपीस फिरावं इतकाच आटोपशीर, संयत आघात. काय बोलावं नय्यरसाहेबांच्या चिरतरूण प्रतिभेबद्दल..?!
'खुली लटोकी छाव में खिला खिला ये रूप है..'
'रूप है..' शब्दावरचा शुद्ध गंधार कायच्या काय सुरीला. तानपुर्यातल्या गंधाराची आठवण करून देणारा..!
'घटा से जैसे छन रही सुबह सुबह की धूप है..'
या ओळीतून उलगडत जाणार्या यमनबद्दल काय बोलावं महाराजा..? ही अत्यंत स्वाभाविक आणि नैसर्गिक अशी यमनची स्वरसंगती. परंतु तेवढीच ताजी व नवी वाटणारी!
'घटा', 'से', 'जैसे', 'छन', 'रही' हे शब्द फक्त कसे पडले आहेत ते पाहा म्हणजे नय्यरसाहेबांनी 'लय' ही गोष्ट किती पचवली होती हे लक्षात येईल. पुढे 'जिधर नजर मुडी..' तली तोड आणि त्यानंतरचा पॉज..! नय्यरसाहेबांच्या प्रतिभेला मी शब्दात कसं बांधू..?!
गाण्याच्या चित्रीकरणातली माला सिन्हा आम्हाला विशेष पसंत नाही, परंतु तनुजावर आम्ही प्रेम करतो.. ऐन जवानीत काय दिसायची तनुजा! व्वा.. वा..!
आणि अगदी कोवळ्या तरूण वयातला धर्मा मांडवकर काय सुरेख दिसतो.. अगदी हँडसम...! 'त्याला फारसा अभिनय येत नाही', 'नाचता येत नाही..' असे त्याच्यावर आरोप केले जातात. परंतु आम्हाला मात्र या गाण्यातला लाजराबुजरा आणि शोलेत टाकीवर चढून बसंती आणि मौसीला पटवणारा बिनधास्त बेधडक धर्मा मांडवकर अत्यंत प्रिय आहे! :)
एकंदरीत गाणं ऐकून तृप्ती होते, जीव शांत होतो.
हल्ली मात्र आमची रसिकताच लाचार झाली आहे त्यामुळे आम्ही 'मुन्नी बदनाम', 'शीला की जवानी.' यासारख्या अत्यंत फालतू आणि 'कोलावरी..' सारख्या अत्यंत सामान्य गाण्यावरच समाधान मानतो..!
चालायचंच.. कालाय तस्मै नम:
रफीसाहेबांना आणि नय्यरसाहेबांना मात्र मानाचा मुजरा..!
-- तात्या अभ्यंकर.
प्रतिक्रिया
2 Jan 2012 - 10:03 pm | अन्या दातार
तात्या बॅक अगेन!
हे तर माझे अत्यंत आवडत्या गाण्यांपैकी एक. ओपींची कमाल काय आहे हे दाखवणारे हे एक मास्टरपीस गाणे.
A Perfect harmony असे याचे वर्णन करता येईल.
तात्यांनी दिलेल्या माहितीवरुन ओपींना शास्त्रीय संगीत येत नव्हते यावर विश्वास ठेवणे खरंच मुश्कील आहे. असेच दुसरे गाणे म्हणजे छोटासा बालमा.....
(ओपी - रफी फॅन) अन्या.
3 Jan 2012 - 12:28 am | चिंतामणी
तात्यांनी दिलेल्या माहितीवरुन ओपींना शास्त्रीय संगीत येत नव्हते यावर विश्वास ठेवणे खरंच मुश्कील आहे. पण ते स्वतःच तसे सांगत असत म्हणून विश्वास ठेवायचा.
या विषयावर त्यांना पत्रकाराने छेडले होते. त्याने विचारले की "नैयरसाब आप हमेशा कहते है की आपने शास्त्रीय संगीत की तालीम नही ली. फिर मुझे बताओ ये "छोटासा बालमा" जैसी रचना आपने कैसी की?
त्यावर नैयरसाहेब म्हणाले की "मै संगीत बहूत सुनता हूं. आशाजी की पिताजी का एक मशहूर स्टेज साँग है.
मैंने वो सुना है और उसकाही इसेत्माल किया है". ते नाट्य गीत म्हणजे दिनानाथ मंगेशकरांनी म्हणलेले (सं. सन्यस्तखड्ग या नाटकातील स्वा. सावरकर रचीत "सुकतातची जगी या"
(हे गाणे पं. वसंतराव देशपाण्डे यांच्या आवाजात येथे ऐका.)
(हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीताच्या "गोल्डन एरा"चा दिवाणा) चिंतामणी
2 Jan 2012 - 10:46 pm | प्रशांत
लेख आवडला...
अवांतर : तात्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... :)
2 Jan 2012 - 10:53 pm | पक पक पक
छान छान ,लेख आवडला.....
2 Jan 2012 - 11:13 pm | चिंतामणी
वेलकम बॅक.
सध्या तुम्हाला ऑनलाईन असलेले बघत होतो. सकाळी "काहीतरी लिहा" अशी खरड टाकणार होतो. पण नेट रूसले. आणि नंतर कामामुळे ऑनलाईन जमलेच नाही.
नेहमीप्रमाणेच छान.
:) :-) :smile:
(अवांतर- तात्या विलायत खॉं साहेबांचा "यमन" ऐकला असेलच ना?)
(यमनचा दिवाना) चिंतामणी
2 Jan 2012 - 11:49 pm | अत्रुप्त आत्मा
लै झक्कास हो तात्यानु...! आमला बी ब्लॅक अँड व्हाइट मधला धम्मू त्याच्या निरागस चेहेर्यामुळे नेहेमीच अवडत आलेला आहे... आणी पुढे रंगीन मधे तर काय?त्यानी जी धमाल/कमाल केली त्याला तोड नाही...तो अमचा खराखुरा ही मॅन आहे... नय्यरसाहेब,रफी बरोबरच धरमला बी आमचा सलाम.. :-)
2 Jan 2012 - 11:56 pm | चिंतामणी
आमला बी ब्लॅक अँड व्हाइट मधला धम्मू त्याच्या निरागस चेहेर्यामुळे नेहेमीच अवडत आलेला आहे...
हा निरागस चेहर्याचा ब्लॅक अँड व्हाइट मधला धम्मू का? ;) ;-) :wink:
3 Jan 2012 - 10:12 am | श्रावण मोडक
धम्मू हा शब्द अगदी धन्नोशी मिळताजुळता आहे की. ;)
3 Jan 2012 - 3:23 pm | धमाल मुलगा
मला दीर्घ उकार आहे, धन्नोला काना आणि मात्रा आहे. ;)
-धमायक प्रभु.
3 Jan 2012 - 5:07 pm | श्रावण मोडक
वास्तवात तुला काना-मात्रा आणि धन्नोला उकार हवा. ;)
3 Jan 2012 - 12:14 am | मिसळलेला काव्यप्रेमी
हेच खरे!!
3 Jan 2012 - 2:12 am | स्मिता.
परवाच हे गाणे ऐकले होते. गाण्याबद्दल तात्यांनी लिहिलंय तिथे पुढे मी काय लिहिणार...
शब्दाचा गाण्यातला कॉन्टेक्स्ट लक्षात घेवून त्यानुसार त्या शब्दावर हवा तसा जोर देणे आणि तसा मूड आवाजात आणणे हे रफीसाहेबांसारखं क्वचितच कुणाला जमलं असावं.
3 Jan 2012 - 2:34 am | शिल्पा ब
गाणं आवडीचं आहेच. रफीसारखा गायक अजुनतरी कोणी झाला नाही हे आमचं मत सगळ्यांवर लादु इच्छितो.
3 Jan 2012 - 10:08 am | मराठी_माणूस
मस्त गाण्याची आठवण. धन्यवाद.
हे खरे रोमँटीक गाणे.
दुसर्या कडव्यातील "शबाब आप का " मधील "का" वर घेतलेली मस्त जागा.
कमीत कमी वाद्यात निर्माण केलेला अत्यंत तरल परीणाम. हे गाणे आपल्याला एका वेगळ्याच जगात घेउन जात
(अवांतर : ह्या गाण्याची एक अशीही आठवण वाचलेली. ओपी ने हे गाणे गुरुदत्तला ऐकवले आणि दुसर्या दिवशी तो गुरुदत्तकडे गेला, तिथे घराच्या बाहेर त्याला अब्रार अल्वी भेट्ला , त्याने ओपीला सांगीतले की गुरुदत्त गेला . ओपी म्हणाला "कुठे गेला, कालच तर भेटला होता , तेंव्हा काही म्हणाला नाही , मग कुठे गेला " . जेंव्हा त्याला कळले की गुरुदत्त हे जग सोडुन गेला तेंव्हा त्याला प्रचंड धक्का बसला)
3 Jan 2012 - 10:59 am | सुहास झेले
मस्त हो तात्या.....
रफीसाहेबांना आणि नय्यरसाहेबांना मात्र मानाचा मुजरा..!!!
3 Jan 2012 - 7:55 pm | तिमा
वा तात्या, गाणं तर सुंदरच आणि लेख पण छान.
माला सिन्हा तुम्हाला आवडत नसली तरी तिने या गाण्यात चेहेर्यावरचे भाव चांगले दाखवले आहेत.
तसेच धर्मा मलाही आवडत असला तरी, तो पियानो वाजवताना पोळ्या लाटल्याची अॅक्शन करतोय असे आपले आम्हाला वाटते.
ओ.पी.का जवाब नही!
4 Jan 2012 - 10:26 am | मराठी_माणूस
तो पियानो वाजवताना पोळ्या लाटल्याची अॅक्शन करतोय
हे बाकी खरे आहे.
ऋषीकपूर व्यतरीक्त जवळजवळ सर्वच अभिनेत्यांचे पडद्यावरचे वाद्य वादान हे हास्यास्पदच.
5 Jan 2012 - 5:55 pm | तिमा
ऋषीकपूर व्यतरीक्त जवळजवळ सर्वच अभिनेत्यांचे पडद्यावरचे वाद्य वादान हे हास्यास्पदच.
या वाक्याला दिलीपकुमार अपवाद आहे. 'कोहिनूर' सिनेमात त्याने सतारीवर फिरवलेली बोटे पहा. त्यासाठी त्याने खास मेहनत घेतली होती.
4 Jan 2012 - 1:38 pm | विसोबा खेचर
ति मा - धर्मा पियानो वाजवताना पोळ्या लाटल्यासारखे करतो आहे हे आपले म्हणणे मलाही पटते..
असो..
सर्व प्रतिसादी रसिक वाचकवरांचा मी ऋणी आहे. वाचनमात्रांचेही औपचारीक आभार मानतो..
तात्या.
4 Jan 2012 - 9:41 pm | पैसा
आणि तितकीच छान ओळख!
5 Jan 2012 - 10:42 am | राघव
अत्यंत तरल. :)
अंजाननं लिहिलेल्या चांगल्या गाण्यापैकी एक.
अर्थात् रफीसाहेब-नय्यरसाहेब हे गणितच मुळात भारी!
त्यात तनुजा आत्यंतिक सुंदर दिसलीये!
धन्यवाद तात्यानु!
राघव