दिग्गजांची ओळख :- छत्रपती शिवाजी

मन's picture
मन in जनातलं, मनातलं
4 Dec 2011 - 2:03 am

दुसर्‍या एका स्थळावर एका चर्चेत शिवाजी महाराजांबद्द्ल काही बोलणे सुरु असताना एका प्रतिसादात शिवाजी महाराजांचा एक प्रोफाइलच तयार झाला. त्यांच्या बद्दल लघुनिबंध म्हणता येइलसा किंवा संक्षिप्त परिचय म्हणता येइल असा तो आहे. ह्यावरून एक कल्पना सुचली ती अशी की जागतिक इतिहासात महत्वाच्या ठरलेल्या इतरही दिग्गजांची अशीच तोंडओळख करून देता येइल.
अर्थातच मराठी अस्मितेचे प्रसाम्राज्याचेसत्तेचे संस्थापक ठरलेल्या शिवबाशिवाय दुसरे कुठलेच नाव शुभारंभ करण्यासाठी समोर आले नाही.

संभाजी ब्रिगेड्-दादोजी-रामदास्-तुकाराम-छत्रपती आणि "खरे" छत्रपती, जातीच्या चष्म्यातून व धर्माच्या चष्म्यातून प्रचंड चर्चून झालेले आहेत जालावर वगैरे. खुद्द मिसळपावावर त्याचे काही धागे आहेत.
मला वरच्या परिच्छेदातल्या कुठल्या बाजूला ते होते हे सांगण्यापेक्षा प्रशासक* म्हणून्,नेतृत्वगुण** असणारी व्यक्ती म्हणून व मुत्सद्दी म्हणून शिवाजी नावाची व्यक्ती कशी होती हे बघण्यात जास्त रस आहे, त्या अंगाने मी माहिती गाळून घेत असतो.

*उत्तम प्रशासक म्हणजे जो राज्यशकट व्यवस्थित चालवू शकतो तो:- फक्त पाचेक वर्षाच्या कारकिर्दितला शेरशाह सूरी, प्रदीर्घ काळ राज्य केलेला अकबर्,माधराव पेशवे,मलिक अंबर्,आकण्णा-मादण्णा द्वयी,केमाल अतातुर्क(पाशा?) हे सर्व उत्तम राज्यकर्ते/प्रशासक होत.त्यांनी उपलब्ध राज्ये उत्त्तम चालवली, जनतेला न नागवताही महसूल रचना चांगली ठेवली.राज्यांतर्गत कायदा व सुव्यवस्था,व्यापार उदीम वाढवला. दळणवळण वाढवले. थोडक्यात infrastructure.

तर **उत्तम योद्धे/नेते/सेनापती म्हणजे ग्रीसपासून भारतापर्यंत चालून येणारा Alexander, आख्खे युरोप व अरब जगत हादरवून टाकू पाहणारा Napoeleon, बलाढ्य ब्रिटिशांविरुद्ध दुर्बळ भासणार्‍या स्कॉटिशांत नवप्राण फुंकून नवा लढा उभारणारा Brave Heart चित्रपटाचा नायक William Wallace, बलाढ्य रोमन सत्ता अतिप्राचीन काळात युरोपच्या मोठ्या भूभागावर दृढमूल करणारा Julious Ceasar, रोमनांना त्याकाळात सर्वात यशस्वी टक्कर देणारा कार्थेज येथील आफ्रिकन Hannibal,भारताचा पहिला ज्ञात ऐतिहासिक सम्राट चंद्रगुप्त, मरठा सत्ता दिल्लीपर्यंत पोचवणारा पहिला बाजीराव , पूर्व भारतात शक्तीशाली मुघलांशी तुटपुण्ज्या मनुष्यबळाने झुंजणारा लोकनायक आसामातला बडफुकन, अफगाणचा संस्थापक म्हणवला जाणारा व पानिपतातला मराठ्यांना पुरून उरलेला अब्दाली, कल्पनातीत वेगाने हल्ले करत आपल्या कैकपट आकाराची साम्राज्येची साम्राज्ये सतत पादाक्रांत करत सुटलेला मंगोल राजा तेमुजिन् (चंगीझ् खान), जगातील सर्वात मोठ्या राज्यांपैकी एक असणार्‍या राज्याचा प्रमुख तैमूर, वाळवंटात भटकणारे व क्षुल्लक अरबांना घेउन थेट हजार वर्षापासून स्थापित असलेल्या रोमन व पारशी अशा दिग्गज्,अनुभवी राज्यांचा एका सपाट्यात पराभव करून मध्यपूर्वेतून कायमचे पुसून टाकणारा अरबांचा प्रथम खलिफा अबु बक्र हे सगळे आणि ह्यासम.झपाट्याने मैदान मारणे, प्रतिकूल परिस्थितीही पालटवणे, विषम लढाईत थोडेसेच सैन्य जवळ असताना चमत्कार वाटावेत असे अतर्क्य विजय मिळवणे हे सर्व ह्या योद्ध्यांनी केले आहे.

व्यापाराचा मुखवटा घेउन , विकलांग होइस्तोवर आपल्याला इजा होते आहे हेच आपल्या सावजाला समजू न देता आख्ख्या जगातील २५% लोकसंख्येवर लोखंडी पकड मिळ्वणारी ईस्ट इंडिया कंपनी, लढायात टिपू व मराठ्यांकडून वारंवार मार खाउनही आपले राज्य नुसते टिकवणाराच नव्हे तर भविष्यात वाढवणारा म्हणूनही हैद्राबादचा निजाम, चंद्रगुप्तासमवेत मौर्य सत्तेची पायाभरणी व नंतर सत्ता दृढ्मूल करणारा चाणक्य,सध्याचे अदृश्य अमेरिकन साम्राज्य हे धूर्त्,मुत्सद्दी,कुटील, धोरणी म्हणून उंच वाटतात.

लवकरच ह्यातील जमतील तेव्हढ्यांची एक एक प्रोफाइल, लघुनिबंध लिहिण्याच्या मी तयारित आहे.
कुठल्याही एखाद्या घटनेचा फार मोठा तपशील किंवा रसभरित वर्णने मला जमणार नाहित. पण कारकिर्दिचा धावता आढावा/तोंडओळख संक्षिप्त रुपाने सगळ्यांसमोर ठेवायची इच्छा आहे. ह्या अनुषंगाने लेखात आपणही भर घातलित तर मला बरेच वाटेल.

हां, तर कुठं होतो? वरती उल्लेख केलेल्या (योद्धे,प्रशासक व मुत्सद्दी अशा) तीनही प्रकारांत शिवाजी महाराजांचे नाव सहज बसते. त्यांच्या ह्या गुणांबद्दल मला कुतूहल आहे.

भाग 0 :-
पुणे,सुपे, चाकण इंदापूर असा एक प्रांत शहाजींना जहागीर म्हणून मिळाला. आधीच्या बंडाची किंमत म्हणून त्यांना मूळ स्थानापासून दूर बेंगलोर ला ठेवण्यात आले. जहागिरीच्या देखभालीसाठी पत्नी जिजाउ व पुत्र शिवाजी ह्यांना पुण्यातच राहण्याची परवानगी मिळाली. यापूर्वी शहाजीने निजामशहा-मुघल्-आदिलशहा ह्या सर्वांची काही काळ चाकरी केल्यानंतर थेट स्वतंत्र राज्यच बाल-निजामशहाच्या नावाने स्थापायचा प्रयत्न केला, त्यात दैवाचे फासे अनुकूल पडले नाहित. आदिलशहा-मुघल ह्यांच्या संयुक्त फौजांपुढे शहाजीचे बंड शमले.
शहाजी तिकडे दूरदेशी बेंगलोरात आपले पुत्र एकोजी व थोरले चिरंजीव संभाजी ह्यांच्यासमवेत तर पुण्यात जिजाउ व शिवबा असे राहू लागले.

भाग १:-
काही जणांना वाटते की शिवाजी महाराजांनी थेट वीसेक वर्षाच्या वयापासून स्वातंत्र्य घोषित केले आणि अखेरपर्यंत सलग स्वतंत्र राहिले; पण वस्तुस्थिती तशी नाही.
अगदि सुरुवातीच्या काळात सुरुवातीला आपण आदिलशहाचेच चाकर आहोत असे नाटक करत त्यांनी सुरुवातीचे तोरणा,पुरंदर व इतर आसपासचे पुणे जिल्ह्यातले किल्ले घेतले.हे १६५०ते १६५५-१६५६ पर्यंत चालले. नंतर आदिलशाहीशी उघड उघड भांडण मांडून अंगावर चालून आलेल्या अफजल खानाचा नायनाट केला.(नोव्हे १६५९) नंतरच्या दोनेक महिन्यात झपाझप स्वराज्याचा विस्तार वाढवत आजच्या पुणे जिल्ह्याच्या बाहेर पडून थेट दक्षिणेला कोल्हापूर्,सातारा,सांगली ह्याबाजूला विस्तार केला.थेट कर्नाटकात गदग व आदिलशहाची राजधानी विजापूरवरच हल्ल्याचा प्रयत्न केला. सोबतच कोकण किनारपट्टीवर अंमल वाढवायला सुरुवात केली.किनार्‍यावर आंग्रे बहुदा आधीपासूनच होते. त्यांच्यासोबत इतर सत्तांविरुद्ध आघाडी उभी केली.
धडाधड एकामागोमाग एक किल्ले घेतले, कित्येक नवीन उभे केले.
इथवर मुघलांशी फक्त काही किरकोळ चकमकी होत्या. एकदा तर चक्क दिल्लीच्या सुलतान शहाजहान ह्याच्यावतीने दख्खनचा सुभेदार म्हणून औरंगजेब दक्षिणेत कारभार पहात होता तेव्हा "आम्ही आदिलशहाचा मुलूख घेत आहोत, तुमची मेहेरनजर असावी" अशा आशयाचा संदेश पाठवत त्याला खुश करून टाकले होते. व काहिच दिवसात शहाजहानला हटवून दिल्ली काबीज करायला निघण्याच्या तयारित व्यस्त आहे असे बघून हळूच मुघलांची रसद व दारूगोळा लुटला! त्याचे लक्ष दिल्लीकडे असल्याने त्यानेही पुढे भांडण वाढवले नाही. व मुघलांशी थेट संघर्ष टळला. काही महिन्यात औरंगजेबाने जाउन दिल्ली काबीज केली.शहाजहानला कैद केले. सत्तेचा दावेदार व थोरला भाउ दाराशुकोह व मुराद ह्यांना क्रूर पद्धतीने ठार केले. ह्या भीतीने उरलेला भाउ शुजा हा भूमिगत झाला.
औरंगजेब दिल्लीचा सम्राट बनला. आलमगीर म्हणवून घेउ लागला.

भाग२:-
काही काळ गेला. तिकडे आलमगीर जरा स्थिरस्थावर होउ लागला. इकडे शिवबाने पुण्याबाहेर अंमल वाढवलेला होताच. हा वाढता अंमल दख्खनवर वर्चस्वासाठी झगडणार्‍या मुघलांनाही धोकादायक वाटला. त्यांनी शाहिस्तेखानाला प्रचंड फौज देउन पाठवले. तो थेट पुण्यातच अजस्त्र, लाखभर सैन्यानिशी तळ देउन बसला. अगदि ह्याच वेळेस तिकडे सिद्दी जौहरने पस्तीसेक हजाराची फौज घेउन महाराजांना पन्हाळ्यावर कोंडून ठेवले होते. शिवबा कधीही पकडला जाइल अशी स्थिती आली. तिकडे पुणे अजगर गिळतच होता. आता?
सुप्रसिद्ध शिवा-न्हावी, पावनखींड्-बाजीप्रभू वगैरे प्रसंगानंतर राजे सुटले, निसटले.(जुलै १६६०). पण अफाट अशी मुघल फौज अजूनही शिवबाच्या भागात होतीच. नंतर दोन अडीच वर्षे उंबरखिंडित लढाया वगैरे करुन काही शाहिस्ता निर्णायक परास्त होइना. एप्रिल १६६३ मध्ये शाहिस्तेखान्-लाल म्हाल्-तुटलेली बोटे प्रसंगानंतर पुणे अजगर मिठितून सुटले. पुन्हा शिवबाचा अंमला वाढू लागला. गेलेला प्रभाव त्याने शिताफीने परत मिळवला होता.पुण्याला झालेल्या नुकसानीची किंमत मुघलांची पश्चिमेतील आर्थिक राजधानी आणि भरभराटीचे शहर सुरत लुटून्,सहज फस्त करून वसूल केली.(जानेवारी १६६४) त्याद्वारे मिळालेल्या पैशातून ह्यावेळेस मोठा फौजफाटा उभारणे सुरु केले. प्रथमच स्वराज्याची फौज तीस्-चाळिस हजाराच्या पुढे गेली.
म्हणजे, इतकी कमी फौज असतानाही स्वराज्याच्या वाढीचे प्रयत्न इतका काळ सुरु होते.

भाग३:-
ह्या प्रकाराने बेचैन व क्रुद्ध झालेल्या मुघलांनी १६६५ च्या उन्हाळ्यात अजून मोठ्या फुअजेसह धुरंधर्,धोरणी,मुत्सद्दी अशा मिर्झाराजे जयसिंगास पुण्यावर पाठवले.दोन्-पाच महिन्यातच शिवबाला त्याने जेरीस आणून जून १६६५ मध्ये तह करायला लावला.तहमध्ये फार मोठा मुलूख, जवळपास ६६% स्वराज्याचा भूभाग गमवावा लागला. इथेच turning point आहे.

भाग ४:-
१६६६ च्या प्रारंभी शिवाजीराजास थेट मुघल दरबारात हजर रहावे लागले. जवळपास त्यांना राजपुतांप्रमाणेच पूर्ण मुघल सरदार सरदार बनवायचाच मुघलांचा प्रयत्न होता. त्यानंतर ते कैद झाले.१६६६ च्या हिवाळ्यात निसटले.पण निसटून आल्यावरही त्यांनी दिलगिरीचे पत्र औरंगजेबाला पाठवले. मुघलांचा सरदार म्हणून रहायचे नाटक करणे धूर्तपणे सुरु केले.अगदि जंजिर्‍यावर मोहिम सुरु असताना ती अर्धवट सोडली, व कारण सांगताना हे सांगितले की "सिद्दीही बादशहाचे चाकर, आम्हीही. अधिक भांडणे का करावीत? आम्ही मोहिम थांबवीत आहोत." (खरे कारण युद्धशास्त्रीय द्रुष्ट्या नफा-तोट्याचे व हानी-फायद्याचे गणित होते. )

भाग ४.५ :-
हा तथाकथित "सरदारकीचा", "चाकरीचा" व "शांततेचा काळ" चारेक वर्षे चालला. ह्यात त्यांनी सातत्याने स्वराज्याची घडी बसवली. कायदा-सुव्य्वस्था प्रस्थापित केली. संपर्काचे जाळे उभारले.हेर दूर दूरवर पेरून ठेवले. लोकसंग्रह अजूनच वाढवला. योग्य त्या कहाण्या पसरवल्या. जनतेचा विश्वास अधिक भक्कम करून घेतला.घोड्यांना दाणा-पाणी मिळून ते चुस्त झाले. कुणाच्याच डोळ्यावर येउ न देता अलगद फौजफाटा वाढवला. आतल्या आत लहान लहान दौरे करून पुढील गोष्टींची आखणी करण्यास सुरुवात केली.वरवर बघता सगळे कसे शांत शांत होते. खरिप्-रबी पिके घेउन शेतकरी झोपतात असे दिसत होते. पण हेच शेतकरी लष्करातही मोठ्या प्रमाणात भरती होताहेत हे अजून कळले नव्हते. शिवबाचे राज्य दिसायला इवलेसे होते. अफझल खान-शाहिस्ता ह्यांना पराभूत केल्यावर जो काही विस्तार होता तो मिर्झांनी गिळून टाकलेला. निव्वळ १०-१२ किल्ले हाताशी असणारा एक क्षुल्लक मुघल सरदार अशी मुघलांनी ह्यांच्याबद्दल समजूत करून घेतली.
शांत शांत्..निवांत निवांत असा महाराष्ट्र होता. आणि अचानक..........

भाग ५ climax :-
एकाएकी १६७० च्या सुरुवातीला मराठ्यांनी मुघलांविरुद्ध जोरदार आघाडी उघडली.एकाच वेळी वेगवेगळ्या मुघल ठाण्यांवर व्यूहात्मक(strategic,planned,organised) हल्ले सुरु केले. तिकडे तान्हाजीने पराक्रमाची शर्थ करत एका रात्रीत्,एका झेपेत कोंढाणा कमावला. तिकडे खुद्द शिवबा पुन्हा सुरतेवर चालून गेला. अधिक लूट घेउन आला. लूट घेउन येताना झालेल्या वणी-दिंडोरीच्या लढाईत खुल्या मैदानात मुघलांना जोरदार चोप दिला. संपत्ती मिळाल्याने पुन्हा अधिक लॉजिस्टिक्स घेउन उरलेली मोहिम धडाक्यात सुरु ठेवली. २/३ गेलेले स्वराज्य परत मिळवलेच उलट मुघलांचा प्रदेशही नव्याने जिंकायला सुरुवात केलीं. कोकणावर अंमल होता. त्याच्या वरती उत्तरेला नाशिक येते.तिथलेही छोटे मोठे किल्ले घेतले व साल्हेरची कारवाई सुरु केली. आता त्यांनी उघड उघड पुनश्च मुघलांशी भांडण घेतले होते. हे सर्व करण्यास एकाच माणसात एकाच वेळी उत्तम प्रशासक,धूर्त राजकारणी, शूर/धडाडीचा सेनापती व भूभागाची,भूगोलाची व समाजकारणाची व स्वतःच्या बलस्थानांची उत्तम जाण, माण्साची पारख ह्यातला प्रत्येक गुण अत्युच्च पातळिचा असणे आवश्यक होते.आणि त्यांच्याकडे होते!

आता एक स्वतंत्र राजा म्हणून त्यांचे नाव आख्ख्या दक्षिण आशियात गाजू लागले. ते लवकरच वाढत्या मराठा सत्तेसह जगभरात जाणार होते.
त्यांच्या ह्या १६७० च्या मोहिमेतला एक अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे साल्हेर-मुल्हेर चे प्रकरण.
बर्‍याचदा अफझल्-शाहिस्तेखान्-मिर्झा-सिद्दी जौहर्-आग्रा-कोंढाणा-तानाजी ही प्रकरणे आपल्याला स्वतंत्र, वेगवेगळी,सुटीसुटी म्हणून ठावूक असतात. पण त्यांचा कालानुक्रम व त्यामागची पार्श्वभूमी व तेव्हाची मराठा सत्तेची मानसिकता ठाउक नसते. म्हणून एखाद्या विषिष्ट घटनेचे वर्णन न करता मराठी सत्तेची पावले कशी पडत होती ते सांगायचा प्रयत्न केला आहे.

संस्कृतीइतिहासलेख

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

4 Dec 2011 - 9:03 am | प्रचेतस

अतिशय उत्तम माहिती मनोबा.
शिवचरित्राची थोडक्या शब्दात छान ओळख करून दिली आहे.
क्लायमेक्स बद्दल अजून थोडेसे सांगावेसे वाटते.
महाराजांचा राज्याभिषेक हा मराठी इतिहासातला सर्वात अभिमानाचा क्षण. ४०० वर्षांचे मांडलिकत्व झुगारून देऊन स्वतंत्र मराठी राज्याची मुहुर्तमेढ रोवली गेली.
राज्याभिषेकानंतरच्या द़क्षिण दिग्विजयाचा उल्लेख लेखात आला असता तर अधिक उचित झाले असते.
गोवळकोंड्याच्या कुतुबशाहाशी मैत्री, जिंजीचा बळकट किल्ला जिंकणे, दक्षिणेतले अजून प्रदेश घेणे याचा नंतरच्या काळात मराठेशाही टिकून राहाण्याच्या दृष्टीने फारच उपयोग झाला.
संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर दिशाहीन झालेल्या मराठी साम्राज्याला राजाराम महाराजांनी दक्षिणेतल्या ताब्यात असलेल्या प्रदेशाच्या सहाय्याने यशस्वीपणे सावरले.

अन्या दातार's picture

4 Dec 2011 - 9:23 am | अन्या दातार

प्रयत्न. आणखी येऊदेत.

अशोक पतिल's picture

4 Dec 2011 - 1:10 pm | अशोक पतिल

खूप छान लिहीलेत. या रोपट्याचे मोठ्या साम्राज्यात रुपातर करणार्‍या थोरल्या बाजीराव पेशवे हे ही असेच एक धूरधर व्यक्तिमत्व ! अशीच इतिहासाची समग्र माहीती येवू द्या .

प्रभाकर पेठकर's picture

4 Dec 2011 - 2:12 pm | प्रभाकर पेठकर

समग्र शिवाजी वाचूनही मनाची भूक भागत नाही. धावते शिवदर्शन नुसतेच भूक चाळविणारे आहे. ह्यातून लेखकाचा व्यासंग जबरदस्त असल्याच्या आभासा व्यतिरिक्त वाचकाच्या हाती काही लागत नाही. राजांचे व्यक्तीमत्व कुठेही तपशिलात जाणवत नाही. अनेकदा वाचलेल्या महाराजांच्या बाबत असे घडते तर लेखात उल्लेखिलेल्या इतर अनेक दिग्गजांबाबत तर काही वाचनच नाहीए. त्यांचा कार्यप्रवास मनास कसा भिडावा??

त्यापेक्षा एक-एक दिग्गजास ४-५ क्रमशः लेखांनी सन्मानावे म्हणजे त्यांचा तपशीलवार कर्तॄत्वपट डोळ्यांसमोर उभा राहिल.

धन्यवाद.

गणपा's picture

5 Dec 2011 - 1:39 pm | गणपा

समग्र शिवाजी वाचूनही मनाची भूक भागत नाही.

सहमत.
पण मग काही प्रगल्भ उचभ्रु* मंडळी म्हणतात की किती तो जुनाच इतिहास कुरवाळत बसणार आहात. स्वतः काही नवा इतिहास घडवा की.

आम्ही असल्या मंडळींना तोग्यत्या जागी मारतोच म्हणा.

बाकी मनोबा लेख आवडला हो.
छाव्याची वाट पहातोय.

* द्विरुक्ती आहे याची कल्पना आहे. ;)

मन१'s picture

5 Dec 2011 - 11:27 am | मन१

वल्ली...
सर्वात महत्वाचा भागच राहिला की मूळ लेखात.एका दीर्घ प्रतिसादाचा लेख केल्याचा हा परिणाम असावा. एक लेख साल्हेर मुल्हेर च्या लढाईवर, किल्ला कसा जिंकला ह्यावर होता. नेमके त्या घटनेअपर्यंतची मराठा सत्तेची पावले म्हणून इथे टाकले.
असो. पण तुझ्याही प्रतिसादातून शिल्लक भाग व्यवस्थित सामावला जातो आहे.

अन्या,अशोक,
आवर्जून प्रतिसाद दिलेलं पाहून बरं वाटलं.

पेठकर काका:-
लेखनदोष मान्य आहे. "नवशिक्या "/"धडपड्या" म्हणून सूट मिळावी ही इच्छा आहे.
शिवाजी ह्या विषयावर छापील साहित्यात व जालावर आधीच प्रचंड उपलब्ध आहे. आता होतं कसं, की ज्यांना मस्त दीर्घ वाचता येतं, सवड नि आवड आहे, ते श्रीमान योगी,राजा शिव छत्रपती, "छावा" मधून दिसणरे पिता शिवाजी, "संभाजी" मधून दिसणारे संस्थापक शिवाजी , ह्या सगळ्या कादंबर्‍या किंवा "गरूड झेप ", "रायगडाला जेव्हा जाग येते","जाणता राजा" ही नाटके, किंवा एकेका घटनेवर बनलेले मराठी चित्रपट किंवा इतर अगणि लिहित साहित्य("रियासत" वगैरे) काय मिळेल ते* वाचतात. त्यातील प्रभावी असे काही सुटे सुटे लक्षात राहते . एक शृंखला अशी उभी मनात उभी राहणे होत नाही.
माझे स्वतःचे तरी असेच होते. म्हणून हे असे लिहून काढले. ज्यांना ग्रंथ वाचणे शक्य झालेले नाही त्यांना नुसते पानभर दर्शन दिल्याने अजून वाटवेसे वाटले तर चांगलेच आहे की.

दुसरे म्हणजे मला सणार्‍या वेळेच्या मर्यादा व विशेषतः जाल उपलब्धी. सध्या तरी मनात आहे की झरझर जमेल तसं इथे उतरवून काढावं. व पुन्हा भविष्यात जसं जमेल तसं अधिक dig down/drill down करत आपण म्हणता तसे थोडे व्यवस्थित भाग लिहावेत. कळसापासून सुरु करून पायपर्यंत जाणं मला इथे शक्य दिसतं आहे.पण उलट नाही.

माझा वाचनव्यासंग लै भारी आहे अशा गमजा मारायची मी तरी हिम्मत करणार नाही.आपन म्हणता तसा तो निव्वळ आभासच असावा.

मागील फार दिवसपासून तपशिलात लिहायचा प्रयत्न करूनही जमले नाही. म्हणून एकपानी लेखावर आलोय.

*बखरी ,पत्रे,शिलालेख वगैरे वाचणारे अत्यल्पसंख्य सल्याने त्यांचा उल्लेख केला नाही.

प्रभाकर पेठकर's picture

5 Dec 2011 - 1:12 pm | प्रभाकर पेठकर

धन्यवाद श्री. मन१,

पुन्हा भविष्यात जसं जमेल तसं अधिक dig down/drill down करत आपण म्हणता तसे थोडे व्यवस्थित भाग लिहावेत.

पुढील लेखनासाठी शुभेच्छा....!