रिक्षा

अविनाश ओगले's picture
अविनाश ओगले in जे न देखे रवी...
11 Jul 2008 - 9:33 pm

रिक्षा

फळांनी लगडलेल्या झाडासारखी दिसणारी
दप्तरांनी लगडलेली एक रिक्षा
रोज सकाळी माझ्या दारासमोर थांबते.
एका विशिष्ट आवाजात हॉर्न वाजतो
आणि शाळेची तयारी करत असलेल्या
माझ्या मुलाची एकदम धावपळ होते.
घाईघाईत घातलेला युनिफॉर्म,
अर्धवट बांधलेली बुटाची लेस, विस्कटलेले केस
अशा अवतारात
भलं मोठं दप्तर, डबा, वॉटरबॅग सारं सांभाळत
तो रिक्षाकडे धावतो, त्याचंही दप्तर रिक्षाला लटकतं.
रिक्षातले त्याचे मित्र त्याला टप्पल मारतात,
तो त्यांना वेडावून दाखवतो, रिक्षा निघून जाते.
मग मी निवांतपणे पेपर उघडतो...
अपघात, खून, मारामार्‍या, भ्रष्टाचार, बलात्कार, झुंडशाही,
दगडफेक, रास्तारोको, जाळपोळ, लाचलुचपत, रोगराई, प्रदूषण,
बॉम्बस्फोट, दंगली, विषबाधा, वासनाकांड, अधांतरी सरकार
इत्यादींच्या रोजच्याच बातम्या पुन्हा पुन्हा वाचतो.
माझ्या देशाचं काळवंडलेलं भविष्य भेडसावत राहतं मला.

डोळ्यासमोर तरळत राहते दप्तरांनी लगडलेली रिक्षा
आणि रिक्षातल्या मुलांचे ते निष्पाप, निरागस, गोड चेहरे...
या रिक्षात बसून ही मुलं नेमकी कुठं चालली आहेत?

-अविनाश ओगले

कवितावाङ्मयप्रतिभा

प्रतिक्रिया

llपुण्याचे पेशवेll's picture

11 Jul 2008 - 9:37 pm | llपुण्याचे पेशवेll

रिक्षात बसून अर्थातच उज्वल्ल भवितव्याकडे. जेव्हा देशातली सर्व मुले अशी शाळेत जायला लागतील तेव्हा कदाचित या गुन्ह्यांचे प्रमाण थोडेफार कमी होईल असे वाटते. एका पालकाची चिंता मुलाच्या आणि देशाच्या भवितव्याबद्दलची, आपण उत्तमपणे व्यक्त केली आहे.
पुण्याचे पेशवे

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Jul 2008 - 9:39 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रश्न कठीण आहे पण तेवढाच महत्त्वाचाही! आणि परीकथेत एकाच क्षणात सुई टोचलीत वास्तवाची!!

बेसनलाडू's picture

11 Jul 2008 - 10:41 pm | बेसनलाडू

कविता आवडली.
(वास्तविक)बेसनलाडू

स्वाती फडणीस's picture

11 Jul 2008 - 10:57 pm | स्वाती फडणीस

ह्म्म..

धनंजय's picture

12 Jul 2008 - 2:36 am | धनंजय

छान कल्पना. गंभीर विचार.

> डोळ्यासमोर तरळत राहते दप्तरांनी लगडलेली रिक्षा
> आणि रिक्षातल्या मुलांचे ते निष्पाप, निरागस, गोड चेहरे...
या दोन ओळी खोडल्यात तर शेवटच्या ओळीचा हिसका मला तरी अधिक बसला असता. या दोन ओळींमध्ये नवे काही नाही, मुलांच्या रिक्षेचे ते हृद्य चित्र आधीच मनावर प्रभावी शब्दांनी बिंबवले आहे - या दोन ओळींनी काही नवीन भावना मला तरी जाणवत नाही. पण "भेडसावणे" प्रतिमेत व्यत्यय आणून शेवटच्या ओळीचा हादरा कमी करतात.

प्राजु's picture

12 Jul 2008 - 2:31 am | प्राजु

विषय.... हम्म..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

12 Jul 2008 - 12:21 pm | विसोबा खेचर

डोळ्यासमोर तरळत राहते दप्तरांनी लगडलेली रिक्षा
आणि रिक्षातल्या मुलांचे ते निष्पाप, निरागस, गोड चेहरे...

क्षणात सुन्न झालो!

ओगलेसाहेब, आपल्या संवेदनशीलतेला सलाम..!

ऋषिकेश's picture

12 Jul 2008 - 9:12 pm | ऋषिकेश

या रिक्षात बसून ही मुलं नेमकी कुठं चालली आहेत?

काय बोलणार.. निरुत्तर करणारा प्रश्न!
अतिशय सुंदर कविता

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

चतुरंग's picture

12 Jul 2008 - 9:31 pm | चतुरंग

आपली घालमेल आपण कवितेतून व्यवस्थित मांडली आहे.
वास्तवात पोळून काढणार्‍या अशा काही प्रश्नांची उत्तरं अवघडच असतात.

चतुरंग

मुक्तसुनीत's picture

12 Jul 2008 - 9:50 pm | मुक्तसुनीत

कुठल्याही संवेदनक्षम व्यक्तिला स्पर्श करेल अशी कविता.

एक "यंग पेरेंट" या नात्याने असे प्रश्न सतावत असतातच. आपण आपल्या मुलांना कुठला वारसा देतो आहोत ? त्याना कुठल्या जगात आपण आणले आहे ? इतर काहीशे कोटींबरोबरचे त्यांचे या पृथ्वीवरचे अस्तित्व कसे असेल ?

हा सगळा मनोव्यापार गमतीशीर आहे खरा. मुले होणे ही आपली गरज ; त्यांचे संगोपन, वाढ नीट होणे ही आपलीच गरज, त्यांच्या व्यक्तिगत विकासाची आणि भविष्याची काळजी करणे ही देखील आपली मानसिक गरजच. आणि त्यांच्या व्यक्तिगत सुखदु:खांबरोबर , ते ज्या पीढीचे , काळाचे भाग बनणार त्यातील जग कसे असेल ? त्यांचा निभाव लागेल का ? याचा विचार करत बसणे हेदेखील आपल्याच मानसिक गरजेतून आलेले.

गडकर्‍यांनी या प्रवृत्तीचे एक वर्णन "चिंतातुर जंतु" असे केले आहे. कुणी म्हणतो , "आप मेला , जग बुडाला !" हे काही असले तरी इतराना आपापल्या काळज्यातून सुटका ही नाहीच !