स्टेट ऑफ द आर्ट - भाग १०

५० फक्त's picture
५० फक्त in जनातलं, मनातलं
11 Sep 2011 - 11:15 am

स्टेट ऑफ द आर्ट - भाग १०

जेवणं झाल्या झाल्या आम्ही म्हणजे मी, शकुताई आणि आत्या लगेच निघालो, मला जग्गनाथकाका आणि धाकट्याकडं पाहताना जरा विचित्रच वाटत होतं, निघताना सगळ्यांचेच डोळे पाणावले होते, पण वळसंगहुन ३ वाजता निघालो तरी पुण्यात पोहोचायला रात्रिचे १२ वाजणार हे निश्चित होतं. अर्ध्या तासात आत्याच्या गावाला आलो, फाट्यावर तिचा नातु आलाच होता तिला घ्यायला, त्यामुळं लगेच निघता आलं, उगाच आत घरापर्यंत जावं लागलं नाही. मग मात्र सुसाट निघालो, मोहोळ, मोडनिंब, टेंभुर्णी पार केलं तेंव्हा सात वाजले होते. शकुताई तर आधिच झोपली होती, मी मात्र माझी झोप जावी म्हणुन गाडी थांबवुन जरा तोंडावर पाणी मारलं, आणि बाजुच्याच एका हॉटेलमध्ये चहा घेतला परत निघालो.अन मग थेट माझ्या अन तिच्या दोघांच्या सासरी आलो. बिबवेवाडितल्या ब-यापैकि जुन्या इमारतींपैकी एक, तळमजल्याला प्लॅट त्यामुळं पार्किंग बाहेर रस्त्यावरच. पटकन वर घरात गेलो, बाहेर हॉल मध्ये आई बाबा अन नितिन बसलेले होते, अनु बहुधा आत झोपलेली होती. मला पाहिल्यावर लगेच नितिनने सुरु केलं ’ जिंकुन फड आला ग पहिलवान माझा’ यात विनोद होता की हेटाळणी हे समजुन घेण्याच्या अवस्थेत मी नव्हतो, तडक बेडरुममध्ये गेलो, अनु झोपलेली होती एक लेकरु कुशीत अन दुसरं पोटात घेउन. तिला उठवायचं जीवावर आलं हळूच तिच्या कपाळावर ओठ टेकवुन परत आलो. बाहेर शकुताईनं रिपोर्टिंग सुरु केलं होतं, नितिनला आधीच कळालेलं होतं ते त्यानं माझ्या सास-याला सांगितलेलं होतं पण आता शकुताई ’आंखो देखा हाल’ सांगत होती. शांतपणे जाउन बसलो तिथं अन मी पण ऐकु लागलो, आपलाच मुर्खपणा कुणीतरी रंगवुन सांगतंय तो ऐकायला वेगळंच वाटतं पण आता माझ्याबरोबर हेम्या होता म्हणुन मी न चिडता ऐकत होतो.

तिचं सांगुन झाल्यावर सगळ्यांनी माझ्याकडे पाहिलं, बहुधा माझ्याकडुन उत्तराची पेक्षा स्पष्टीकरणाची अपेक्षा होती, जे मी देउ शकत होतो पण सगळ्यांना पटणं अशक्य होतं. देवाच्या अन भुताच्या अनुभवात हे एक समान असतं, ज्याला अनुभव येतो तो थरारलेला असतो बाकीच्यांना फक्त थरथर दिसत असते. माझ्या शांत बसण्यानं टेन्शन वाढत होतं पण माझा नाईलाज होता’ नितिन, मी तुला समजावतो सगळं उद्या लंच टाईमला, आता मला खुप झोप येते आहे, चला झोपुया.’ असं म्हणुन तिथुन उठलो अन आत जाउन चादर घेउन आलो आणि तिथंच कोचवर झोपलो.

सकाळी सवयीप्रमाणे जाग आली, अनु आणि माझी लेक उठलेलीच होती, शाळेत जायची तयारी सुरु होती. मला उठलेलं पाहुन चिन्मया येउन गळ्यात पडली थोडे लाड लाड झाल्यावर शाळेला उशिर होतोय हे सांगुन घेउन गेली. माझ्या मनात विचार आला, आता आमच्या घरी असतो तर अशी पण अनुला तर शाळा नसतेच ती पण असंच.... असो, सासरे आले, त्यांनी शकुताईला चहा आणायला सांगितला, मग उठुन आवरलं अन चहा घेउन निघायचं ठरलं, जाताना लेकीला शाळेत सोडलं अन पुढं मी अन अनु घरी निघालो, वाटेत आरएल जवळ हेमंतच्या गाडीवर मिसळपाव खायला थांबलो, आमच्या लग्नाच्या आधीपासुन इथं भेटतोय आम्ही, इथं प्रेमाच्या गप्पा मारल्यात, भांडणं झालित अन चिन्मयाच्या आगमनाची बातमी पण मला अनुनं इथंच दिली होती, आज पुन्हा तेच सगळं रिपिट होत होतं. तिथं उतरल्यावर दोघंही थोडं भावुक झालो होतो. मग मला ऑफिसला जायचं असल्यानं अन घरात थोडं जास्तीचं काम करायचं असल्यानं लगेच घरी आलो. मस्त पैकी चहा केला अन गॅलरीत बसुन अनुबरोबर बोललो, मुलगा की मुलगी, नाव काय ठेवायचं, चिन्मयाला कसं सांगायचं, तिची मानसिक तयारी अशा ब-याच गोष्टी अनु सांगत होती, मी नुसताच ह्म्म हम्म करत होतो पण तेवढ्यानं सुद्धा ती आनंदत होती, हे म्हणजे सिस्टिमला अ‍ॅंटीव्हायरस व्हायरस मारत असताना पुढं स्क्रिनवर छान फुलांचा स्क्रिनसेव्हर रन होत असल्यासारखं होतं, बघणारा आनंदी असतो पण मागं आत बरिच उलथापालथ चाललेली असते.

तसंही नितिनकडं निरोप दिलेला होता त्यामुळं अर्धा तास उशीर चालणार होता, तरी त्यानंतर उशिर नको म्हणुन आवरुन निघालो, आता मी आणि बाजुच्या सीटवर हेम्या होता आणि स्क्रिनसेव्हर ऐवजी मला सापडलेल्या व्हायरसची लिस्ट दिसत होती. ऑफिसला नेउन नेटवर्कला जोडल्यावर काय होईल याची कल्पनाच करवत नव्हती. अगदी काही नाही ते बरंच काही सगळे विचार डोक्यात थैमान घालत होते. शेवटी ऑफिसच्या पार्किंगमध्ये गाडी लावुन वर निघालो, पोलिस स्टेशनला निघाल्यासारखं वाटत होतं. क्युबिकल मध्ये जाउन बसलो, बाकी सगळे कामाला लागलेले होते. मी आल्याचं दिसताच साहेबानं फोन केला अन आत बोलावलं, तोपर्यंत लॅपटॉप बाहेर काढुन ठेवला होताच, फक्त चालु केला, डाटा केबल लावायचं धाडस होईना, तसाच ठेवुन साहेबाकडं गेलो. मी दोन दिवस नसल्यानं कंपनीचं केवढं नुकसान झालं आहे त्याचा पाढा त्यानं वाचुन दाखवला, असं वाटायला लागलं की आज आलो नसतो तर संध्याकाळी कंपनीला टाळंच लागलं असतं का काय, मग सगळं ऐकुन झाल्यावर मला आणि अजुन एक दोघांना कम्युनिकेटरवर यायला सांगितलं अन माझी सुट्का झाली, साहेबानं अजुन एक दोन तास शिव्या घातलेल्या परवडल्या असत्या असं वाटायला लागलं. आता झक मारुन डाटा केबल लावणं भागच होतं. ऑफिसमध्ये आल्या आल्या पहिल्यांदा जे काम करायचो ते करायला आज हात थरथरत होते. पाच मिनिटं बसुन होतो, पुन्हा फोन वाजला, साहेबच होता अजुन ऑनलाइन का नाही झालो म्हणुन ओरडत होता. घाबरत घाबरत डाटाकेबल जोडली अन लॉगिन केलं, पहिलि दोन तीन मिनिटं काही झालं नाही, सगळं व्यवस्थित चालु झालं, कम्युनिकेटरवर साहेब अन बाकी एक दोघं होतेच. नमस्कार चमक्तार झाल्यावर कामाच्या चर्चा चालु झाल्या, मी सुट्टीवर जाण्यापुर्वी आम्हाला इन्फिकडुन त्यांच्या बॅंकिंग प्रोग्रामच्या एका तुकड्याचं बरंच मोठं काम मिळालं होतं.

जवळपास एक तास चर्चा चालु होती, आता त्या कामात मला गुंतवुन घ्यायचं होतं, साहेब बाहेर पडला आता आम्ही एकाच लेवलचे सगळे होतो, त्यामुळं थोडा टाइमपास चालु होता, दहा मिनिटात ते दोघं पण गेले मग मी एकटाच होतो, आणि हेम्यानं ऑनलाईन येवु नये असं वाटतानाच तो येत का नाही याची काळजी लागुन राहिली होती. लंच टाईम झाला तसं नित्या समोर येउन उभा राहिला’ चल खाली लगेच, बरंच बोलायचंय तुझ्याशी’, मलापण बोलायचं होतंय, एखादं टेन्शन उगाच डोक्यावर बाळगण्यापेक्षा एक दोघांबरोबर शेअर केलं की बरं असतं, सगळीच कामाला लागतात. बाहेर आलो, मागं कलिंगात गेलो, नित्यानंच काहीतरी ऑर्डर दिली आणि माझ्यावर फायरिंग सुरु केलं, दहा मिनिटं बोलत होता, बोलणं सेम शकुताईसारखं, आता याची सवय तिला लागलिय का याला तिची सांगणं अवघड होतं. सगळं ऐकुन घेतलं,त्याला डायरेक्ट विचारलं’ नित्या, आपण क्लायंटचा डाटा विकायला सुरुवात केली तर किती पैसे मिळतील रे बाहेर?’ नित्याच्या हातातला सोलकढीचा ग्लास खाली पडला, आजुबाजुचं पब्लिक बघायला लागलं आमच्याकडं.’ ए भो..., काही कळतंय का तुला काय बोलतोस ते, आहे ती नोकरी घालवशील, तो आखाड का आघाड सोड इथल्या घराचे हफ्ते भरणं पण मुश्किल होईल.कोण सांगतं रे तुला असले धंदे, ये. भो...’ आता यात राग पण होता पण कुठंतरी त्याच्या मर्मावर बोट ठेवलं गेलं होतं. घर घेताना सुरुवातीला ४ लाख डाउन पेमेंट करणारा नित्या,लोन घेतल्यावर पुढच्या तीन वर्षात ७ लाख रुपये प्रिपेमेंट कसं करु शकतो हे मला अर्धवट सुटलेलं कोडं होतं.

तिथं जास्त तमाशा न करता आम्ही परत आलो, येताना नित्या सांगत होता, मागच्या महिन्यातच लेटर आलंय हेडऑफिसचं तिथुन होणा-या डाटाथेफ्ट टाळण्यासाठी सगळ्यांचे युएस्बि,सिडि/डिव्हिडि रायटर ब्लॉक करायचे आहेत, बहुतेक सगळी सॉफ्टवेअरपण मशीन लायसन्स वरुन सर्वर लायसन्सला ट्रान्सफर करायची आहेत. मी त्याच्याशी हेम्याबद्दल बोललो नव्हतो पण माझ्या एका वाक्यानं तो हादरला होता हे निश्चीत होतं, आता हे हेम्याचं प्रकरण त्याच्या गळ्यात आणि डोक्यात कसं उतरवायचं हे अवघड काम होतं. ऑफिसमध्ये माझ्या क्युबिकलमध्ये आलो आणि ते काम एकदम सोपं झालं, हेम्याची फाईल ओपन होती, त्यानं चौकशी सुरु केली होती.’ आलास का बे पुण्याला, प्रवास कसा झाला, घरी सगळे मजेत का,?’ म्हणजे हेम्या अजुन लोकल रेसिडेंटच होता रोमिंग सुरु केलेलं नव्हतं त्यानं अजुन तरी.एक खुर्ची ओढुन नित्याला बसवलं, आणि टाईप करायला सुरु केलं ’ आलो रे पुण्याला, मजेत झाला प्रवास आणि अजुन एक आनंदाची बातमि आहे, मी परत बाबा होणार आहे’ मध्ये एक दोन मिनिटं गेली’ आयला, लै भारी रे, भाड्या तुझं लग्न झालंय तु मोकळ्यानं बोल्तोस, मला कसलं भ्या होतं सुरेखानं हे सांगितल्यावर, कुनाला कळंल का सुरेखा कुनाला सांगल का, मंद्याला कळलं तर काय, बाबा लै म्हंजे लै भानगडी असत्यात त्यात’ जी अवस्था माझी पहिल्यांदा हा प्रकार पाहताना झाली होती त्यापेक्षा वाईट नित्याची झाली होती. माझे हात खुर्चीवर असताना वर्ड फाईल मध्ये वाक्यंच्या वाक्य टाईप होतात यानं त्याचं डोकंच भंजाळलं होतं,आणि पुन्हा हि नावं त्याला ऐकुन माहिती होती, त्यामुळं जे टाईप होतंय त्याचं पण टेन्शन त्याला येतंच होतं. सुन्न अवस्थेत तो बसुन होता. मी टाईप केलं’ चल रे मला जरा काम करायचं आहे, मी तुला परत बोलावतो मग बोलु आपण’ अगदी चॅटला जसं टाकतो तसंच. आता मला या प्रकाराची नशा लागली होती, सवय लागली होती का दुसरा उपाय नव्हता ते माहित नाही पण मी करत होतो हे निश्चित.

नित्या झपाटल्यासारखा उठला, मला उठवलं, त्याच्या सर्वर रुम मध्ये घेउन गेला, असिस्टंट पोरांना बाहेर काढलं अन मला समोर बसवुन म्हणाला’ जावईबापु ही काय भानगड आहे, समजावुन सांगा काय नविन कोड लिहलायस का काय आहे हे, शकुपण सांगत होती तु तिथं भ्रमिष्टासारखं करत होतास म्हणे बराच वेळ, मग ते फोनचं प्रकरण पण सांगितलं तिनं मला, काय आहे हे सगळं, मला कळु दे जरा’ मी जशी जशी स्टोरी त्याला सांगत गेलो तसं तसं त्याला सर्वर रुम मध्ये पण घाम फुटायला लागला, मी शेवटी एवढंच म्हणालो’ हेम्या कच्चा माल देतोय, आपण विकायचं बघु ८० माझे २० तुझे, चालेल.’ समोरच्याला न घाबरता आपण आपल्या कंडिशन टाकल्या की समोरचा दबुन राहतो या माझ्या ताकदीची जाणीव मला कालच झाली होती. आता जर नित्याला करु का, करता येइल का असं विचारलं असतं तर त्यानं मला नोकरीच सोडायला लावली असती पण २० टक्क्याची ऑफर टाळणं त्याला शक्य होईल असं मला तरी वाटत नव्हतं.

क्रमशः

स्टेट ऑफ द आर्ट - भाग ०१ - http://misalpav.com/node/17897
स्टेट ऑफ द आर्ट - भाग ०२ -http://misalpav.com/node/17909
स्टेट ऑफ द आर्ट - भाग ०३ -http://misalpav.com/node/17950
स्टेट ऑफ द आर्ट - भाग ०४ -- http://misalpav.com/node/18088
स्टेट ऑफ द आर्ट - भाग ०५ --http://misalpav.com/node/18139
स्टेट ऑफ द आर्ट - भाग ०६ --http://misalpav.com/node/18167
स्टेट ऑफ द आर्ट - भाग ०७ --http://misalpav.com/node/18265
स्टेट ऑफ द आर्ट - भाग ०८ -- http://misalpav.com/node/18387
स्टेट ऑफ द आर्ट - भाग ०९ - http://misalpav.com/node/18450

जीवनमानतंत्रप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

11 Sep 2011 - 11:27 am | प्रचेतस

बर्‍याच दिवसांनी हा भाग आला. आता शहरात येउन कथेने वेग चांगलाच वेग पकडलाय. आता येउ द्यात पुढचे भाग पटापट.
हेम्याचं भूत आता काय काय गोंधळ घालतं याची जाम उत्सुकता लागून राह्यलीय.

छान आहे !! लौकर लिहिण्याचा प्रयत्न करा ( ही विनंती)..लिंक तुटते ओ ...

नावातकायआहे's picture

11 Sep 2011 - 2:50 pm | नावातकायआहे

लौकर लिहा

धन्या's picture

11 Sep 2011 - 1:34 pm | धन्या

पन्नासराव, लवकरच पुढचा भाग टाका... कथा झक्कास पुढे सरकतीय !!!

आता नक्किच काहीतरी धमाल घडणार असं वाटतयं, पूढील भाग लवकर टाका राव. (हेम्याज डेज आऊट)

कौशी's picture

11 Sep 2011 - 11:28 pm | कौशी

आवडला...

स्पंदना's picture

12 Sep 2011 - 9:03 am | स्पंदना

ओक्के ? सो? आता या भुताच्या सहाय्यान पैसा कमवणार तर? गुड !

किसन शिंदे's picture

12 Sep 2011 - 9:14 am | किसन शिंदे

चला, आता हेम्याच्या घडामोडींना ऊत आपलं ते वेग येणार म्हणजे.

प्रभो's picture

12 Sep 2011 - 9:23 am | प्रभो

लवकर लवकर लिही रे..

बर्याच प्रतिक्षेनंतर आलेला भाग..
ऑफिस ला आल्याआल्याच वाचला...

मस्त झाला आहे हा भाग .

पण डाटा थेफ्ट करुन नायक पैसे मिळवणार ? जरा योग्य वाटले नाही..
मला वाटले हेम्या शेतमाला संबंधी बोलत होता ते ..

मी ऋचा's picture

13 Sep 2011 - 10:03 am | मी ऋचा

झक्कास हो भाऊ!

प्यारे१'s picture

13 Sep 2011 - 12:21 pm | प्यारे१

आता न थांबता पटापट येऊ द्या.

स्पा's picture

13 Sep 2011 - 12:37 pm | स्पा

असेच म्हणतोय..
भारी विन्त्रेष्ट वाटाय लागलाय ;)

उशीराबद्दल क्षमस्व, पुढचा भाग टाकला आहे http://misalpav.com/node/19383
अन या पुढचे भाग सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीत लवकर लवकर टाकेन अशी आशा आहे.