काही दिवसांपूर्वी संस्कृत भाषेत एक स्तोत्र रचले होते ते येथे देत आहे.
ओमित्येकाक्षरं ब्रह्म I निर्गुंणारंभमूलकम् I
पूर्णात्मरूपबोधाय I ओंकाराय नमोनम: II १ II
देव त्वं हि गणाधीश I कवीनां कविपुंगव I
ईशावास्य महामंत्रे I मनीषी कविरुच्यते II २ II
गणेशोऽपि गुणेशस्त्वं I विराट गणनायक I
सर्वसिद्धिफलस्वामिन् I ऋद्धिसिद्धिविनायक II ३ II
मगलाचरणं नित्यं I वैदिकानां परम्परा I
कार्यादौ स्तुवते त्वां च I ऋषयो मूलकारणम् II ४ II
भयं कृतान्तकालस्य I एकदन्ताग्रविग्रहात् I
विघ्नान्तकाय शान्ताय I प्रणवाय नमोनम: II ५ II
ज्ञानाग्निनर्तनालोके I धृवं विश्वार्तिनाशनम् I
मूलमध्याग्रपश्यन्तौ I सूक्ष्मोन्मेषाक्षिणौ तव II ६ II
वक्रतुण्डेन देवेश I वक्रताखण्डनं कुरु I
सर्वलोकापराधास्ते I लंबोदरसमाहिता: II ७ II
स्निह्यासि त्वमनीशांश I मोदकेषु गजानन I
प्रमोदकाभिधानं ते I काव्यशास्त्रविनोदक II ८ II
अनाद्यनंततत्त्वाय I विमलज्ञानमूर्तये I
मूर्तामूर्त समर्थाय I गणाधिपतये नम: II ९ II
अवात्मजगदाकारं I पाहि त्वं शरणागतान् I
समाधिमग्न सिद्धेभ्यो I देहि ब्रह्मात्मदर्शनम् II १० II
जहि संदेहमूलं च I सूक्ष्माहंकारकारणम् I
निर्वैरवृत्तिगंधेन I पुनीश्व हृदयं मम II ११ II
अक्षराणां अकारस्त्वं I आराध्यं ज्ञानिनां प्रभो I
विदुषां वेदसारस्त्वं I मन्दानां भक्तवस्तल II १२ II
क्षमाशीलमुदारं च I अघशैलाग्रभंजकम् I
मधुवाक्सुमनैरत्र I वन्दे त्वां ब्रह्मणस्पतिम् II १३ II
रमन्ते कवयो यत्र I योगिनां परमं पदम् I
गणेशपादपद्मेषु I भृंगोऽहं रसलोलुप: II १४ II
प्रीतया रचितं स्तोत्रं I यत्नकामांग चेतसा
प्रमादोन्मादमोदाय I क्षमस्व परमेश्वर II १५ II
मन्देन भक्तिभावेन I वन्दितो गणनायक: I
कल्याणं कामये नित्यं I मंगलं सत्यमेव च II १६ II
इति श्री गणेशस्तोत्रं संपूर्णम् I
ॐ तत् सत् ब्रह्मार्पणमस्तु II
--अशोक गोडबोले, पनवेल.
प्रतिक्रिया
1 Oct 2007 - 12:05 am | विसोबा खेचर
गोडबोलेसाहेब,
आपल्यासारखा संस्कृत विद्वान इथे आहे ही मिसळपावकरता अभिमानाची गोष्ट आहे. अजूनही लिहा.
जी मंडळी 'आपली' होती ती इथे राहिली, जी 'आपली' नव्हती ती येथून चार आठ दिवसातच मन उडाल्यामुळे निघून गेली ते बरेच झाले!
तात्या.
6 Oct 2007 - 1:16 am | प्राजु
संस्कृतमधून काव्य निर्मिती करणारे माझ्या परिचयात आपणच पहिले आहात. आपलं काव्य आवडलं.. खूप शिकायला मिळेल आपल्याकडून.....
- प्राजु.
12 Nov 2007 - 10:21 am | पुष्कर
श्रीमान् अशोक महोदय:,
भवता रचितमिदम् स्तोत्रम् अतीव मधुरम्| भवतः रचनायाम् पदलालित्यमपि सुंदरमस्ति|
अधुना वयम् भवत: संस्कॄतभाषायाम् रचितानि काव्यान्यपि पठितुमिच्छाम:|
भवतः,
संस्कृतकाव्याभिलाषी -शंतनु:
12 Nov 2007 - 11:46 pm | सर्किट (not verified)
वा ! पदलालित्य विशेष आवडले.
अवांतरः पद म्हणजे पावले, ह्या पासूनच पद म्हणजे दोन ओळींची कविता/कडवे हे आले असल्याने, येथे पदलालित्याला श्लेष म्हणावे की नाही ?
अति अवांतर खोडसाळपणा: "अधुना वयम भवतः", म्हणजे "आताशा वय झाले.." का ? ;-)
- सर्किट
12 Nov 2007 - 3:31 pm | स्वाती राजेश
काव्य छान केले आहे.
आपल्या सारखे इथे संस्कृत पंडित असले तर भरपूर शिकायला मिळेल.
13 Nov 2007 - 3:23 am | धनंजय
या बाबतीत काही शंका मी गोडबोले सरांना विचारल्या होत्या (संदेश पुढे दिला आहे). कार्यबाहुल्यामुळे म्हणा, त्यांचे उत्तर आले नाही. येथील दुसर्या कोणाला त्यांचे निरसन करता आले तर आभार मानेन.
(गोडबोले सरांना माझा संदेश. माझे काही टंकनदोष सुधारून.)
-------------------------------------------------------------------
विषय: स्तोत्रातले काही शब्दप्रयोग कळले नाहीत
दिनांक: सोम, 2007-10-01 18:40
गोडबोले सर,
तुमच्या गणेश स्तोत्रात काही शंका होत्या त्या येथे विचारतो आहे. घाईघाईत बहुतेक काहीतरी नीट वाचले नाही, असे असेल, पण तरी समजावून द्याल, अशी आशा आहे.
> देव त्वं हि गणाधीश I कवीनां कविपुंगव I
> ईशावास्य महामंत्रे I मनीषी कविरुच्यते II २ II
इथे जर "तूच गणाधीश आहेस, कविपुंगव आहेस" असे म्हणायचे असेल तर बिनासंबोधनाची प्रथमा विभक्ती लागेल असे वाटते. कारण सर्वच संबोधने लावलीत तर "त्वम् हि" चे अन्वयार्थ वाक्य काय ते कळत नाही. पुढे "उच्यते" चा अन्वय/संदर्भ लागत नाही. "तू म्हटला जातोस" असा काही अर्थ असेल तर "उच्यसे" अपेक्षित असेल असे वाटते. 'तुला "कवि" असे त्या मंत्रात कोणीतरी म्हणतो' असे कर्तरि असेल तर 'उच्यते'तील कर्मणि ठीक नाही वाटत.
> भयं कृतान्तकालस्य I एकदन्ताग्रविग्रहात् I
> विघ्नान्तकाय शान्ताय I प्रणवाय नमोनम: II ५ II
अर्थ "कृतान्तकालाचे भय" तर "कृतान्तकालात्" असे हवे. भयकारक जे काही असते ते अपादान असते. शिवाय पहिल्या भागात एक क्रियापद कुठेतरी दडले आहे, ते चटकन लक्षात येत नाही आहे. "विघ्नान्तकाय शान्ताय प्रणवाय नमोनम: ।" हे स्वयंपूर्ण वाक्य आहे, त्यातले "नमः" आदल्या भागाला लागू नाही असे वाटते.
ज्ञानाग्निनर्तनालोके I धृवं विश्वार्तिनाशनम् I
मूलमध्याग्रपश्यन्तौ I सूक्ष्मोन्मेषाक्षिणौ तव II ६ II
"आलोक" मुळे "नाशन" होते आहे का, की माझा अर्थ चुकला? जर "आलोक" "नाशना"चे कारण असेल तर ते केवळ "भावलक्षण" नाही. तसे असता "आलोके" इथे सति सप्तमी तितकी पटत नाही. "गोषु दुग्धासु गतः" वगैरे पुस्तकात शिकवलेल्या सति सप्तमीच्या उदाहरणांत एकीकडे गाई दुहल्या जात आहेत आणि त्याच काळात तो गेला, असा अर्थ कळतो. गाई दुहल्याचे कारण असेल तर "गवां दोहनात् गतः", किंवा "गाः दोग्धुम् गतः" असे प्रयोग होतील असे वाटते.
> वक्रतुण्डेन देवेश I वक्रताखण्डनं कुरु I
वा! वा! छान.
> स्निह्यासि
टंकनदोष?
> अवात्मजगदाकारं
टंकनदोष? या द्वितीया विभक्तीचा वाक्यात अन्वय लागत नाही.
अक्षराणां अकारस्त्वं I आराध्यं ज्ञानिनां प्रभो I
विदुषां वेदसारस्त्वं I मन्दानां भक्तवस्तल II १२ II
"प्रभो" चे संबोधन ठीकच आहे. "अकारः त्वम्" येथे बिगरसंबोधनाची प्रथमा ठीक आहे. तसेच "वत्सल" इथे हाकेपेक्षा वेगळे संदेशन होते आहे - तू 'अमुक अमुक' परिस्थितीत वत्सल आहे' असे मला वाटते. हा अर्थ चुकला का? कारण तसा अर्थ असला तर "अकारः"सारखीच बिगरसंबोधनाची प्रथमा अपेक्षित आहे. 'अमुक अमुक' परिस्थिती म्हटली कारण ती परिस्थिती नीट समजली नाही. सर्व मंदांसाठी "भक्तवत्सल" आहे का? मग मंदानाम् अशी षष्ठी का? का मंदलोकांत त्याला "भक्तवत्सल" असे नाव आहे? "मंद-भक्तांचा" वत्सल आहेस असे म्हणायचे आहे का? तसे म्हणायचे असल्यास "भक्त-वत्सल" असा समास पहिले करता येत नाही - समर्थः पदविधि:. असो, हे नीट समजले नसल्यामुळे मला शंका निर्माण झाल्या असतील.
> गणेशपादपद्मेषु I भृंगोऽहं रसलोलुप: II १४ II
दोनच पाय :-) "पद्मयो:" पाहिजे असे वाटते. छंद टिकवण्यासाठी काही वेगळ्या रूपकाची/शब्दाची सोय करावी लागेल.
> प्रीतया रचितं स्तोत्रं I यत्नकामांग चेतसा
> प्रमादोन्मादमोदाय I क्षमस्व परमेश्वर II १५ II
अर्थात त्याला सर्वच अर्पित वस्तू प्रिय आहेत :-)
प्रीतया - टंकनदोष? "प्रीत्या" म्हटले तर छंदोभंग होतो, वेगळी शब्दयोजना करावी.
"प्रमादोन्मादमोदाय" या समासाची फोड कळली नाही, आणि चतुर्थी विभक्तीचा अन्वय लागत नाही.
प्रमादोन्मादमोद - हे बहुव्रीही की तत्पुरुष? तत्पुरुष असले तर उत्तरपदप्रधान असते. म्हणजे कुठल्यातरी प्रकारच्या "मोदा"विषयी कवी क्षमा मागतो आहे. प्रमादाच्या उन्मादाचा मोद कवीला होतो आहे हे पटत नाही. "मोदाच्या उन्मादामुळे प्रमाद" होतो आहे त्याबद्दल बहुधा कवी क्षमा मागतो आहे. असे असल्यास "प्रमाद" हे पद सर्वात शेवटचे, उत्तरपद असे, यायला पाहिजे.
संस्कृतात तुमचा अधिकार दांडगा आहे, त्यामुळे माझ्या शंका "लहानाच्या तोंडीचा मोठा घास" अशा धर्तीचे दोषदर्शन मानू नका. किंवा "लहानाच्या तोंडीचा" असेच मानून चिरचिर्या लहान मुलाला लाडाने समजावून सांगतात तसे मला समजावून सांगा.
नम्र,
धनंजय
6 Jul 2008 - 12:46 pm | अशोक गोडबोले
प्रिय धनंजय,
सप्रेम नमस्कार.
आपन माझे स्तोत्र वाचून एवढ्या आत्मीयतेने मला प्रश्न विचारलेत म्हणून मला खूप आनंद झाला. आपली शंकारत्नमाला मला आवडली. माझ्याकडे संगणक नसल्यामुळे लवकर उत्तर देऊ शकलो नाही तसेच आपले पत्र विस्मृतीत गेले होते म्हणून क्षमस्व.
मी संस्कृत भाषेचा पंडित नाही पण संस्कृतप्रेमी व अभ्यासक आहे. 'निरंकुशा: कवय:' असे जरी म्हटले असले एखादा अपवादात्मक अपाणिनीय प्रयोग वगळता संस्कृतकाव्य हे व्याकरणशुद्धच असले पाहिजे असेच माझे मत आहे. काव्याचा अर्थ नीट समजण्यासाठी काव्यचरणांचा योग्य अन्वय लावणे गरजेचे आहे. असो!
आपल्या शंकांकडे वळू.
१) देव त्वं हि गणाधीश I कवीनां कविपुंगव I
ईशावास्य महामंत्रे I मनीषी कविरुच्यते
अन्वय - 'हे कवीनां कविपुंगव, गणाधीश देव, त्वं हि कविर्मनीषी' इति ईशावास्य-महामंत्रे उच्यते 'ऋषिणा वा ऋषिभि:' असा अन्वय आहे.
संदर्भ - १) 'कविर्मनीषी' - ईशावास्योपनिषद्
२) त्वं हि कविर्मनीषी - भाष्य-पाद ९ वा गणेशस्वरूपचिकित्सा.
२) भयं कृतान्तकालस्य I एकदन्ताग्रविग्रहात् I
विघ्नान्तकाय शान्ताय I प्रणवाय नमोनम:
अन्वय - कृतान्तकालस्य एकदन्ताग्रविग्रहात् भयं विद्यते - असा येथे अन्वय आहे. कृतान्तकालाचे भय अशी कल्पनाच नाही. शुकस्य मार्जारात् भयं प्रमाणे कृतान्तकालाला एकदन्ताग्रविग्रहाचे भय असा विचार मांडलेला आहे. आणि अशा एकदन्ताग्रविग्रह - विघ्नात्नकाय, शान्ताय प्रणवाय नमोनम: असा अन्वय आहे. भामहाने अशा प्रकारच्या अन्वयास विशेषणपूर्णकरनामान्वयवृत्ति: असे म्हटले आहे.
३) ज्ञानाग्निनर्तनालोके I धृवं विश्वार्तिनाशनम् I
मूलमध्याग्रपश्यन्तौ I सूक्ष्मोन्मेषाक्षिणौ तव
येथे सतिसप्तमीचा प्रयोग मुळातच नाही.
(हे देव,) तव मूलमध्याग्रपश्यन्तौ सूक्ष्मोन्मेषाक्षिणौ ज्ञानाग्निनर्तनालोके विश्वार्तिनाशनम् ध्रुवं इति सत्यं अवलोकयत: असा अन्वय आहे. ज्ञानरूपी ज्वालांच्या नर्तनाच्या तेजस्वी प्रकाशात विश्वाची दु:खे निश्चित नष्ट होतात हे सत्य उत्पत्तिस्थितिलयावस्था बघणारे तुझे सूक्ष्मज्ञाननेत्र बघतात..
४) अवात्मजगदारं हा टंकनदोष आहे. अनात्मजगदाकारं असे हवे.
संदर्भ - अनात्मजगदाकारं प्रकृतिविलासमेव विद्धि I - श्रीभाष्य -
अन्वय - त्वं अनात्मजगदाकारं पाहि I त्व शरणागतान् पाहि I तथा च
समाधिमग्नासिदेभ्यो ब्रह्मात्मदर्शनं देहि II
५) अक्षराणां अकारस्त्वं I आराध्यं ज्ञानिनां प्रभो I
विदुषां वेदसारस्त्वं I मन्दानां भक्तवस्तल
ह्या श्लोकाचा अर्थ थोडा क्लिष्ट आहे हे प्रांजळपणे कबूल करतो.
अन्वय - हे भक्तवत्सल प्रभो, त्वं अक्षराणां अकार:, ज्ञानिनां
तथा च मन्दानां आराध्यं = आराध्यदैवतं, विदुषांच वेदसार : -------
आराध्यं - संदर्भ "आराध्यं मन्दानां" - भारवी
आराध्यं - आराध्यदैवतं इत्यर्थ: अत्र विशेषणपदलाघवविलास: I
६) गणेशपादपद्मेषु हे 'गुरुचरणारविन्देषु' प्रमाणे आदरार्थी बहुवचन वापरले आहे. त्यामुळे पादपद्मयो: असे लिहिण्याचे कारण नाही.
सम्यगादरभावप्रकटीकर्तृं बहुवचनप्रयोग: 'समुरावित्थेर्णङशित्' - वार्तिक - कात्यायन
७) प्रमादोन्मादमोदाय -
येथे समासविग्रह पुढीलप्रमाणे -
प्रमादात् उद्भूत: उन्माद: प्रमादोन्माद: = मध्यमपदलोपी
प्रमादोन्माद: मोदस्वरूप: प्रमादोन्मादमोद: =
असा रूपककर्मधारय करतात.
संदर्भ १) समासचक्रविवरण - श्री दातारशास्त्री.
२) तसेच स्वरूपकर्मधारयत्रभेदा: - शब्देन्दुशेखर भाष्य.
माझ्या अल्पमतीनुसार मी शंकासमाधान करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या पाणिनीच्या सूत्रांच्या माध्यमातून सिद्ध केलेल्या संस्कृत व्याकरणाचा (देववाणी भाग १ ले. श्री नवरे) मी इंग्रजी अनुवाद करीत आहे. आपण प्रश्न विचारल्यामुळे पूर्वाभ्यासाची थोडी उजळणी झाली. मी केकावलीचा संस्कृत अनुवाद केला आहे व मेघदूताचाही समश्लोकी अनुवाद केला आहे. जमेल तसे पुन्हा लिहीन.
आपणास शुभेच्छा.
आपला हितैषी,
अशोक गोडबोले.
6 Jul 2008 - 7:44 pm | धनंजय
मोठ्या आपुलकीने केलेत आहे, धन्यवाद.
थोड्या सवडीने सविस्तर उत्तर देतो.
13 Nov 2007 - 3:21 pm | सागर
गोडबोलेसाहेब,
सर्वप्रथम संस्कृत रचना केल्याबद्दल आपले अभिनंदन...
संस्कृत भाषेत आजच्या काळात कोणी काव्य करु शकतो हीच मुळी मोठी गोष्ट आहे
माझ्यासारखे संस्कृत भक्त अनेक आहेत हो या जगात, पण लिहायचे म्हटले की डोक्याची मंडई होऊन जाते
असो...अशाच संस्कृत मधे रचना करीत रहा
आजच्या काळात तुमच्यासारख्या विद्वान रचनाकारांची खूप गरज आहे. तुमच्यासारखे जिज्ञासू संस्कृत अभ्यासक आज खूपच दुर्मिळ होऊ लागले आहेत. शाळेत संस्कृत शिकून झाले की आज-कालची पोरे इंग्रजीत फाडफाड बोलायच्या प्रेमात पडतात. देवांच्या भाषेचा विचार कोण करतो हल्ली?
कालाय तस्मै: नमः नि काय?
(संस्कृत भाषा व्यवहारात जागतिक होण्याची स्वप्ने पाहणारा) सागर
6 Jul 2008 - 11:56 am | लिंबू टिंबू
काका, संस्क्लुत भाषा मला समजत नाही, पण तुमचे श्तोत्ल आवद्ले. मी पण घली लोज शुभंकलोती म्हंतो, पण त्याचा पेक्षा हे श्तोत्ल छान आहे.
6 Jul 2008 - 7:53 pm | यशोधरा
संस्कृतात लिहू शकता? भाग्यवान आहात! स्तोत्र, त्यावरील विचारलेले प्रश्न, शंकानिरसन, सारेच उत्तम! शिकायला मिळाले. धन्यवाद.
6 Jul 2008 - 8:05 pm | मदनबाण
व्वा गजाननावर स्तोत्र रचल्याबद्दल आपले अभिनंदन.....
(स्वानंदवासी गजाननाचा भक्त)
मदनबाण.....