शिल्लकेला जीव जर का आणखी

धनंजय's picture
धनंजय in जे न देखे रवी...
21 Jul 2011 - 11:13 pm

शिल्लकेला जीव जर का आणखी
- - - - -
शिल्लकेला जीव जर का आणखी
ढंग जगण्याचा ठरवला आणखी
-
उष्णता नरकामध्ये ती काय-शी
जाळ दुखर्‍या अंतरीचा आणखी
-
रागरुसवे खूप त्यांचे पाहिले
आज त्यावर कळस झाला आणखी
-
का निरोप्या पत्र देता निरखतो?
तोंडचा संदेश का बा आणखी?
-
जीवघेण्या ग्रहदशा कित्येकशा
कोसळे आकाश तेव्हा आणखी
-
शायरावर गुदरल्या सार्‍या बला
एक मृत्यू राहिलेला आणखी
- - - - -
(ग़ालिबाच्या ज्या गझलेचा हा सैलसर अनुवाद आहे, ती खाली दिलेली आहे.)
-
कोई दिन गर ज़िंदगानी और है
अपनें जी में हमने ठानी और है
-
आतश-ए-दोज़ख में, यह गर्मी कहाँ
सोज़-ए-ग़महा-ए-निहानी और है
-
बारहा देखी हैं उनकी रंजिशें
पर कुछ अबके सरगिरानी और है
-
दे के ख़त, मुँह देखता है नामःबर
कुछ तो पैग़ाम-ए-ज़बानी और है
-
क़ाते-ए-आमार, हैं अक्सर नुजूम
वह बला-ए-आसमानी और है
-
हो चुकीं 'ग़ालिब' बलाएँ सब तमाम
एक मर्ग-ए-नागहानी और है
- - - - -
काही शब्दार्थ :
आतश-ए-दोज़ख - नरकाचा अग्नी
सोज़-ए-ग़महा-ए-निहानी - आंतरिक दु:खाची आग
बारहा - बहुधा
सरगिरानी - अतिशय क्रोध
नामःबर - पत्रवाहक
क़ाते-ए-आमार - आयुष्य कातरणारे
नुजूम - तारे/नक्षत्रे
मर्ग-ए-नागहानी - शेवटी (एकदाचा) मृत्यू

कवितागझल

प्रतिक्रिया

मनिष's picture

22 Jul 2011 - 9:47 am | मनिष

ग़ालिब एक शिवधनुष्य आहे. अनुवादात "आणखी" घेऊन काव्य जपलेय, पण मला एकून कविता ओढून-ताणून आणलेली वाटली. इथे अर्थ वेगळाच ध्वनित झालाय असे वाटते -

का निरोप्या पत्र देता निरखतो?
तोंडचा संदेश का बा आणखी?

तसेच "शिल्लकेला" हा अगदीच ओढून-ताणून बसवला आहे असे वाटते.

श्रावण मोडक's picture

22 Jul 2011 - 10:18 am | श्रावण मोडक

उत्तम प्रयत्न. पण थोडी खोट राहतेच.
अनुवाद किंवा भावानुवाद करताना धनंजय बऱ्याचदा जाळ्यात सापडतो. पूर्वीही तीन-चार वेळेस हा अनुभव आला आहे.
मनिष यांनी म्हटल्याप्रमाणे 'शिल्लक' या शब्दाचा वापर ओघात येत नाही. मुळात येथे जीव शिल्लक असणे हे कितपत बसते ही शंका आहे. अजून काही जगणं बाकी असेल तर... असा काहीसा मूळ शब्दरचनेचा आशय असावा.
'उष्णता नरकामध्ये' या शब्दांच्या योजनेमध्येही कसर राहते. 'गर्मी' या शब्दातील जाळ 'उष्णता'मध्ये नाही. 'जाळ' दुसऱ्या ओळीत घेतल्याने पहिल्या ओळीत दुसरा काही शब्द येतोय हे समजू शकते. पण 'उष्णता'मध्ये ती आग नाही. 'और' आणि 'आणखी' ही जोडीच कितपत योग्य आहे असा प्रश्न या द्विपदीने निर्माण होतो.
'पैगाम-ए-जबानी' आणि 'तोंडचा संदेश' येथेही गडबड. पत्र आणि निरोप (जो सामान्यपणे तोंडीच असतो) हे तिथं नेमकं सापडत नाही.
रागरुसवे खूप त्यांचे पाहिले
आज त्यावर कळस झाला आणखी - खूप आवडला.
जीवघेण्या ग्रहदशा कित्येकशा
कोसळे आकाश तेव्हा आणखी - हाही आवडला.

ऋषिकेश's picture

22 Jul 2011 - 10:06 am | ऋषिकेश

गालिबचे शिवधनुष्य बघता केलेला अनुवाद आवडला

सहज's picture

22 Jul 2011 - 10:08 am | सहज

मुळ गझलेतले काही शब्दांचे अर्थ व काही प्रस्तावना, ह्या गझलेचे विशेष संदर्भ इ लेख जास्त आवडला असता.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

22 Jul 2011 - 12:01 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

बापरे गालिब?
भयंकर अवघड काम आहे हे!!
एकतर उर्दु भाषेचा गोडवा मराठीत साधणे (इथे कोणती भाषा श्रेष्ठ हा भाग नाहीच, तर दोन्ही भाषांवर तुमचे किती प्रभुत्व आहे हा भाग आहे!) त्यात गालिबला समजून घेऊन, तोच अर्थ कायम ठेवून, मराठी गझलेचे व्याकरण साधणे!!
कोणी काहीही म्हणो, मुळात असा प्रयत्न करणे हेच मुळी मला धाडसाचे वाटते.
गझल उत्तमच जमली आहे. गालिबशी तुलना करणे मुर्खपणाचे ठरेल, पण आपला प्रयत्न मनापासून आवडला.
विषेशतः

क़ाते-ए-आमार, हैं अक्सर नुजूम
वह बला-ए-आसमानी और है

याचे मराठीत

जीवघेण्या ग्रहदशा कित्येकशा
कोसळे आकाश तेव्हा आणखी

हे जे झाले आहे, ते वाखाणण्याजोगेच आहे.
अर्थात वरील गझलेला अजूनही पॉलीश करता आले असते, पण 'हे ही नसे थोडके'!!!
पू. ले. शु.

जयंत कुलकर्णी's picture

22 Jul 2011 - 1:10 pm | जयंत कुलकर्णी

एक प्रयत्न. भाषांतराचा नाही !

कोई दिन गर ज़िंदगानी और है
अपनें जी में हमने ठानी और है

असेल अजून आयूष्य कदाचित थोडे
पण आमच्या मनात काही वेगळेच आहे...
(आयूष्य संपवायचे ?.....)

आतश-ए-दोज़ख में, यह गर्मी कहाँ
सोज़-ए-ग़महा-ए-निहानी और है

या नरकातल्या चितेत नाही ती उब थोडी,
माझ्या आंतरिक दु:खाची बातच काही और आहे
(ती नरकातील अग्नीपेक्षा जास्त दाहक आहे )

बारहा देखी हैं उनकी रंजिशें
पर कुछ अबके सरगिरानी और है

त्यांची चिडचिड बर्‍या वेळा बघितली आहे
पण यावेळचा राग काही आगळाच आहे....

दे के ख़त, मुँह देखता है नामःबर
कुछ तो पैग़ाम-ए-ज़बानी और है

पत्र हातात देतांना माझ्याकडे तो बघत आहे
बहुदा त्याला मला अजून काही सांगायचे आहे.....

क़ाते-ए-आमार, हैं अक्सर नुजूम
वह बला-ए-आसमानी और है

आमच्या नशिबात ग्रह तार्‍यांचा जुलूमच आहे,
पण ही स्वर्गीय संकटे काही विचित्रच आहेत.

हो चुकीं 'ग़ालिब' बलाएँ सब तमाम
एक मर्ग-ए-नागहानी और है

हे “गालिब” सगळी संकटे आता टळली आहेत,
नशिबाने फक्त आता एकच बाकी आहे.....
(मृत्यू)

पल्लवी's picture

22 Jul 2011 - 2:55 pm | पल्लवी

धनंजय, अनुवाद / भावार्थ नाही आवडला.. :(
वर मोडक म्हणतात तसे थोडी ओढाताण वाटली शब्दांची.

असो. माझा एक प्रयत्न. मी गालिब वाचलेला नाही, तसेच मला उर्दूचाही गंध नाही.
तुम्हीच दिलेले शब्दार्थ वाचुन हा एक टुक्का..

**************************************************************************

असतील जिन्दगीचे, दीस बाकी अजुन काही.
ढंग माझ्या जिण्याचे, ठरविले मी अजुन काही !

नरकातल्या आगीची, झळ नाही तेवढीशी,
ही आग ह्या मनीची, जाळिते अजुन काही !

पाहिले खुप त्यांचे , रुसवे आणिक फुगवे,
आजचे चिडणे परंतु, बोलले अजुन काही !

देउन पत्र त्यांचे, तो निरोप्या थबकला,
जणु धाडिला त्याकरवी, संदेश अजुन काही !

तारका अन ग्रहांचा, छ्ळ तसा नित्य चाले,
अस्मानी संकटांचा, मारा अजुन काही !

संकटे सारी आता, सरली जरी परंतु,
त्या मरण यातनांचे, भय आहे अजुन काही !

आनंदयात्री's picture

22 Jul 2011 - 10:09 pm | आनंदयात्री

छान पल्लवी, नव्या शब्दांनी काव्यात अजून रंगत आली.

धनंजयांचा मूळ प्रयत्नही आवडला, लगे रहो, मला वाटते कदाचित यासाठीच संस्करण महत्वाचे असावे, अजुन एक संस्करण या (मराठी) कवितेला छान पॉलिश करेल.

प्राजु's picture

22 Jul 2011 - 7:19 pm | प्राजु

बरीच ओढाताण झालेली आहे.

शिल्लकेला यातून काहीही अर्थ निघत नाहीये. तसेच नरकातला अग्नी याला उष्णता हा शब्द अजिबात योग्य नाहीये. स्वैर अनुवाद करताना त्यातला अर्थ लोकांपर्यन्त पोहोचवण्याच्या दृष्टीने योग्य ते शब्द वापरावे .. "केवळ शब्दान्चा अनुवाद " असू नये असे माझे मत आहे.

का निरोप्या पत्र देता निरखतो?
तोंडचा संदेश का बा आणखी?

या ओळींमध्ये 'तोंड' च्या जागी काहीतरी चांगले लिहिता आले असते. एकूणच हा शेर आणखी चांगला करता आला असता.

पु ले शु.

रेवती's picture

22 Jul 2011 - 7:57 pm | रेवती

अनुवाद वाचून काही समजले नव्हते.
पल्लवीच्या अनुवादाने समजले.
'शिल्लकेला' हा शब्द खटकला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Jul 2011 - 8:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अनुवाद वाचतांना पाहिजे तशी मजा आली नाही. पण

रागरुसवे खूप त्यांचे पाहिले
आज त्यावर कळस झाला आणखी

आणि

शायरावर गुदरल्या सार्‍या बला
एक मृत्यू राहिलेला आणखी

या ओळी मात्र खास वाटल्या......!

-दिलीप बिरुटे

सर्वांचे आभार मानतो. मराठीतली माझी कविता तोकडी असेल, पण मूळ कविता वाचण्याचा तरी आनंद मिळालाच असेल. :-)
- - -
@सहज : मूळ गझलेतले शब्दार्थ खाली दिलेले आहेत. मूळ गझलेबद्दल शब्दांपेक्षा, आणि शायराच्या नावावेगळा असा कुठलाच संदर्भ माझ्यापाशी नाही.
- - -

"उष्णता" शब्दाबद्दल अनेकांनी दिलेला सल्ला पटला.

- - -
निरोप्याबाबत कडवे अनेकांना पटलेले नाही. श्रावण मोडक यांनी समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण मला त्यांचे म्हणणे समजलेले नाही. पत्र हे लेखीच असते. तोंडचे हे तोंडचेच असते. हा फरक स्पष्ट नाही काय? शिवाय तोंड म्हणजे चेहरा असा अर्थही मराठीत आहे. (हिंदीतही "मुंह"चे हे दुहेरी अर्थ आहेत.)
प्राजु म्हणतात की "तोंड" शब्द आवडलेला नाही. का बरे? "मुख" हा शब्द मी मनात आणला होता, पण मला तो पटला नाही.
मनिष म्हणतात की या द्विपदीतून मुळातल्यापेक्षा वेगळा अर्थ येतो आहे. याबबत त्यांनी अधिक सांगावे.

- - -
"शिल्लकेला" हा शब्द प्रमाणबोलीत अप्रचलित आहे, याची नोंद घेतलेली आहे.

माझ्या घरगुती बोलीत हा शब्द वापरात आहे. (आजवर मला वाटत असे, की ही अर्थछटा घराबाहेरच्या बोलींमध्येही येत असेल. परंतु घराबाहेर हा शब्द मी पहिल्यांदाच वापरत आहे, आणि वर अनेक लोकांनी सांगितल्यामुळे नोंद घेतली आहे.)

"शिल्लकेला" म्हणजे विशेषकरून हिशोब करून शिल्लक अशी अर्थछटा माझ्या घरगुती बोलीत येते. शिल्लक म्हणजे कुठलेही उरलेले.

गंमत म्हणून माझ्या घरगुती बोलीत या दोन शब्दांतल्या अर्थछटा सांगणारा पुढचा परिच्छेद बघा :

: बाबारे सगळा पगार नाटका-सिनेमावर खर्च केलास? पगारातले काय शिल्लक राहिले आहे तुझ्याकडे?
: पैसे शिल्लक राहिलेले नाहीत. पण शिल्लकेला आनंद आणि आठवणी आहेत.

या विशिष्ट कडव्यात माझ्या मनात तरी ओढाताण नव्हती, असे सांगू इच्छितो. आणि जोवर माझ्या मनातून माझ्या बोलीतील हा शब्द अप्रमाण म्हणून मनापासून बाजूला सरत नाही*, तोवर तोच शब्द ठेवणे प्रशस्त आहे. (माझ्या बोलीतले शब्द अप्रमाण म्हणून मनापासून ओळखण्याचा अनुभव मला आहे. घरगुती बोलीत "प्रष्ण" म्हणतो, पण घराबाहेरच्या वापरात मी आपोआप "प्रश्न" म्हणतो. या ठिकाणी प्रमाणाला अनुसरायचे म्हणजे अर्थछटा हरवू द्यायची. हे करण्यास माझे मन होत नाही. उलट प्रमाणबोलीत वापरामुळे माझ्या बोलीतले अर्थछटेचे बारकावे रुळावे, असा प्रयत्न करायचा धीटपणा माझ्यात पाहिजे.)

शिलकीत आहे पण अपुरे आहे असा भाव आहे असे वाटते.