''पनिशमेन्ट! आता तुला नाऽऽ पनिशमेन्टच मिळणार!!'' आर्या चित्कारली. तिच्या आवाजात विजयाची झाक होती.
''पण मी काहीच केलं नाही!'' हर्षचा स्वर जरा रडवेला वाटत होता.
'' नो, नो.... तूच तर माझा हेअरबॅन्ड वाकवत होतास... मी म्हटलं होतं तुला तो मोडेल म्हणून...''
''ए, मी काय तो जास्त नाही वाकवला...''
''पण मोडला बघ हेअरबॅन्ड.... आता तुला पनिशमेन्ट!!''
आजी आतल्या खोलीतून वर्तमानपत्र वाचता वाचता आपल्या दोन्ही नातवंडांचे संवाद ऐकत होती.
आर्या आणि हर्षमधील भांडणे तिला काही नवीन नव्हती. दर पंधरा-वीस मिनिटांनी ह्या आते-मामे भावंडांची आपापसात कधी मुद्द्याने तर कधी गुद्द्याने बातचीत चालू असे. आर्या साडेपाच वर्षांची तर हर्ष चार वर्षांचा. आर्या सारखी ताईगिरी करायला जाणार, तर हर्ष थोडा वेळ तिचे ऐकणार आणि मग तिला धुडकावून लावणार हेही ठरलेले. एकमेकांना ढकलणे, केस ओढणे वगैरे प्रकार हाताबाहेर जायच्या आधीच मग आजी तिचा ठेवणीतला दटावणीचा स्वर काढत असे...
''आर्या... हर्ष... माझं लक्ष आहे हां!''
आजीचा तो सूर ऐकता क्षणी दोन्ही भावंडे काही क्षण गप्प बसत. मग थोडा वेळ एकमेकांना वेडावून दाखविणे, त्यावर खदखदून हसणे आणि भांडण विसरून जाणे हेही नेहमीचेच.
आजीला एरवी त्यांना शिक्षा द्यायची वेळच येत नसे. पण काल दुपारी त्यांनी केलेले उपद्व्याप पाहिल्यावर मात्र कायम नातवंडांचे लाड करणार्या आजीने कधी नव्हे तो शिक्षेचे फर्मान सोडले होते! दोन्ही मुलांनी कारभारच तसा केला होता. आजी दुपारी डोकं दुखत असल्यामुळे गोळी घेऊन झोपली होती. आजोबांनाही बैठकीच्या खोलीत डुलकी लागली होती. हाती आलेल्या संधीचा नामी फायदा घेत दोन्ही मुलांनी ''फार उकडतंय.... आपण पाण्यात खेळू,'' म्हणत स्वतः भिजत बेडरूम आणि बाल्कनीतही पाणी ओतून ठेवले होते. बेडरूममधील गालिचा, कोपर्यातील सामान, बाल्कनीतील सामान त्यांच्या ह्या खेळात पार भिजून गेले होते.
आजीने झोपेतून उठल्यावर नातवंडांचा हा उद्योग पाहिला आणि कधी नव्हे तो तिचाही पारा चढला.
''आज तुम्हाला दोघांना पनिशमेन्ट! बेडरूम आणि बाल्कनी ही काय पाण्यात खेळायची जागा आहे का? बघा, हे सामान खराब झालं ना आता... ते सुकवायचं म्हणजे मलाच दुप्पट काम पडणार आहे!! ते काही नाही, आता तुम्ही बाथरुममध्येच बसायचं... चुपचाप... दार उघडं ठेवायचंय... तो घड्याळातला मोठा काटा सहावर येईपर्यंत बाथरुममध्येच थांबायचं.... हाताची घडी-तोंडावर बोट!'' आजीने कडक शब्दांत फर्मान सोडलं होतं. आजोबाही आजीचा चढलेला पारा बघून काही बोलले नव्हते.
तशी जास्त वेळाची शिक्षा नव्हती ती! जेमतेम अर्धा तास दोन खोडकर मुलांना बाथरुममध्ये वेळ काढायला लागणार होता. पण आर्या - हर्षसाठी आजीचे असे रागावणे आणि पनिशमेन्ट देणेच विरळे होते.
बाथरुममध्ये आर्या तिचं लहान स्टूल घेऊन आली. त्यावर आळीपाळीने बसत दोघेही घड्याळाचा मोठा काटा सहावर कधी येतोय ह्याची वाट बघत बसले होते. त्या अर्ध्या तासात त्यांना दोनदा तहान लागली, एकदा आजोबांनी आणि दोनदा शेजारील इमारतीतील मुलांनी हाक मारल्यासारखे वाटले ती गोष्ट वेगळीच! पण अर्ध्या तासाच्या 'पनिशमेन्ट' नंतर आजीने बाहेर यायला सांगितल्यावर दोघांनाही खूप 'हुश्श' वाटले होते. नंतर आजीच्या पदरात तोंड खुपसून तिच्या हाताला लोंबकळताना, आपण खोडी काढली, चुकीचे वागलो की आजी 'पनिशमेन्ट' देते हेही कळले होते.
संध्याकाळी मग आजीने साजूक तुपातला मऊ मऊ शिरा करून नातवंडांना खायला घातला. मुलांचे आईवडील घरी आल्यावर ''मी मुलांना अगोदरच पनिशमेन्ट दिली आहे, आता तुम्ही त्यांना वेगळे रागावू नका,'' म्हणून बजावून सांगितले. दिवसभर दंगा करकरून थकून गेलेली मुले रात्री बघता बघता पेंगुळली व झटकन झोपूनही गेली.
आजीने 'पनिशमेन्ट' दिल्यापासून आर्याला शिक्षेची 'पॉवर' कळली होती. आज हर्षने तिचा हेअरबॅन्ड मोडल्यावर तिला ही पॉवर अजमावण्याची हुकुमी संधी चालून आली होती.
''मी आता तुला पनिशमेन्ट करणार आहे! तू माझा टू हंड्रेड रुपीज चा हेअरबॅन्ड मोडलास!'' हेअरबॅन्डचे तुकडे एकमेकांवर आपटून त्यांचा नाद निर्माण करायच्या प्रयत्नांत असलेल्या हर्षला आर्याने ठणकावले.
(आर्याने परवाच शेजारच्या कॉलेजवयीन स्नेहाताईच्या तोंडी 'टू हंड्रेड रुपीज' ही रक्कम ऐकल्यापासून तिला ह्या शब्दाचे व आकड्याचे कमालीचे आकर्षण वाटू लागले होते. जी जी वस्तू छान असेल ती ती 'टू हंड्रेड रुपीज' ची आहे हे तिचे मत!)
''ह्यँ... तो हेअरबॅन्ड टू हन्ड्रेड रुपीजचा नव्हताच मुळी! तो फोर हंड्रेडचा होता. फोर, फोर!'' (हे हर्षचे आपल्या दोन्ही हातांची चार बोटे आर्यासमोर नाचवत काढलेले उद्गार!)
''ठीक आहे, मग तू पनिशमेन्टला तयार हो. आज तू घड्याळाचा मोठा काटा सहावर येईपर्यंत बाल्कनीतच थांबायचंस!'' आर्याने मोठ्या बहिणीच्या थाटात हर्षला ठासून सांगितले.
खरं तर आजीला आर्याचा आविर्भाव पाहून जाम हसू येत होते. जवळपास आजीच्या बोलण्याचीच हुबेहूब नक्कल करत होती ती! आजीने पुढे काय घडतंय ते पाहायचं ठरवलं आणि वर्तमानपत्राच्या आडून हळूच नातवंडांकडे लक्ष देत राहिली.
ठरल्याप्रमाणे हर्ष बाल्कनीत जाऊन उभा राहिला. समोर गुलमोहर, आंबा आणि जांभळाची मस्त डेरेदार झाडे होती. झाडांच्या काही फांद्या बाल्कनीला अगदी खेटून वार्याच्या झोक्यासरशी डोलत होत्या. फांद्यांवर येणारे पक्षी, बाल्कनीतून दिसणारे समोरचे पटांगण बघत हर्षचा वेळ तर मस्त मजेत चालला होता.
इकडे घरात आर्याचा जीव काही समोर पसरलेल्या खेळण्यांमध्ये लागत नव्हता.
मुकाट उठून ती आपले छोटेसे स्टूल बाल्कनीत घेऊन गेली.
''हर्ष, तुझे पाय दुखू लागले तर तू ह्या स्टूलवर बस हांऽ!'' हर्षने मान डोलवली. तो बाल्कनीच्या कठड्यावर सरपटणार्या अळीकडे बघण्यात गुंगला होता.
जरा वेळ झाल्यावर आर्याने घड्याळाकडे बघितले. अजून मोठा काटा सहावर आला नव्हता.
''आजी, हर्षला बाल्कनीत तहान लागेल नं?" आजीच्या उत्तराची वाट न बघता आर्याने पाण्याने भरलेले फुलपात्र थोडे हिंदकळत बाल्कनीत नेऊन ठेवले.
''हर्ष, तहान लागली तर हे पाणी ठेवलंय हं तुझ्यासाठी!''
हर्षचा फक्त मान डोलवून होकार.
थोड्या वेळाने आर्याने पुन्हा घड्याळ पाहिले.
''आजी, मोठा काटा सहावर यायला किती वेळ आहे गं?''
आर्याला आता हर्षशिवाय करमत नव्हते. आजीने ''वीस मिनिटे'' असे उत्तर दिल्यावर ती उठून किचनमध्ये गेली. प्लॅस्टिकच्या एका छोट्या बरणीत बिस्किटे ठेवली होती, ती बरणी उचलून हर्षला बाल्कनीत ''भूक लागली तर खा हं!'' म्हणून देऊन आली.
आर्याची ती निरागस घालमेल पाहून आजीला आता तर फारच हसू येत होते. तरीही ती काही न बोलता हळूच नातवंडांच्या हालचालीवर लक्ष ठेवून होती.
अशीच काही मिनिटे गेली. आर्याने गुपचूप बेडरूमच्या कोपर्यात गुंडाळलेली चटई आणि आवडती पिसांची उशी उचलली व ते सारे फरपटत बाल्कनीत घेऊन गेली. ''हर्ष, तुला झोप आली तर मी इथं चटई पसरून ठेवतेय हं!'' असे म्हणत तिने बाल्कनीत चटई अंथरली व त्यावर आपली उशी ठेवून दिली. हर्ष तोंडातून ट्रकचे ''ड्रर्रर्र डुर्रर्र'' आवाज काढत बाल्कनीच्या कठड्याला लोंबकळत होता.
आर्याचा पाय खरे तर बाल्कनीतून निघत नव्हता. पण घड्याळाकडे तिच्याखेरीज कोण लक्ष देणार?!!
घरात येऊन तिने मग घड्याळासमोरच मुक्काम ठोकला. बार्बीचे केस विंचरून झाले, खेळण्यातील पोनीच्या झुबकेदार शेपटीची वेणी घालून झाली, पसरलेली कलर बुक्स नीट ठेवून झाली....
''आज्जीऽऽ...'' आर्याचा कंटाळलेला स्वर.
''झाली बरं का वेळ आर्या... घड्याळाचा काटा आलाय सहावर आता!''
आर्याला कोण तो आनंद झाला! तिने हर्षला दिलेली 'पनिशमेन्ट' पूर्ण झाली होती. उड्या मारत मारतच ती बाल्कनीत पोचली. हर्ष तिच्या स्टूलवर आरामात बसला होता. आर्याने त्याला थोडेसे ढकलून स्वतःला बसायला स्टूलवर जागा करून घेतली. मग हर्षच्या गळ्यात हात टाकून उद्गारली, ''पनिशमेन्ट संपलीऽऽऽ!!! चल ना हर्ष, आता काय खेळायचं?''
-- अरुंधती
प्रतिक्रिया
24 Jun 2011 - 3:24 pm | माझीही शॅम्पेन
खूपच तरल आणि निरागस आणि प्रचंड आवडल :)
24 Jun 2011 - 3:27 pm | स्वैर परी
आवडलं :)
24 Jun 2011 - 3:35 pm | किसन शिंदे
लहान मुलांच मोठं भावनाविश्व तुम्ही अतिशय सुंदरतेने उलगडून दाखवलतं.
24 Jun 2011 - 3:40 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
खुप आवडलं!!
लहान मुलांना त्यांच्या विश्वात खेळतांना पाहण्यासारखा दुसरा आनंद नाही.
24 Jun 2011 - 3:51 pm | मुलूखावेगळी
खुपच मस्त!!!
वाचताना चित्रच डोळ्यांसमोर आले.
सुंदर लिहिलेय.
24 Jun 2011 - 3:55 pm | कच्चा पापड पक्क...
24 Jun 2011 - 4:15 pm | छोटा डॉन
झकास हो अरुंधतीताई.
मस्त झाला आहे लेख, खुप आवडला :)
- छोटा डॉन
24 Jun 2011 - 4:15 pm | छोटा डॉन
झकास हो अरुंधतीताई.
मस्त झाला आहे लेख, खुप आवडला :)
- छोटा डॉन
24 Jun 2011 - 4:18 pm | तिमा
फारच छान कथा. खूपच आवडली. आमच्यासारख्या आजोबा-आजींना तर ती घरातीलच वाटेल.
अशाच लिहित रहा.
24 Jun 2011 - 4:19 pm | मृत्युन्जय
मस्त लिहलय हो अरुंधतीतै. सहज सोप्पे साधे पण सुंदर.
24 Jun 2011 - 4:21 pm | गणपा
आवडलं. :)
24 Jun 2011 - 4:25 pm | प्रास
अरुंधतीताई, मस्त मजा आली वाचताना.
लई भारी!
24 Jun 2011 - 5:27 pm | विसुनाना
खरेतर कथा वाचून व्यथित झालो.
पनिशमेंट नक्की कुणाला झाली? असा प्रश्न पडला.
{कथेतील आजी आता पुन्हा कधी 'पनिशमेंट' देणार नाही + करून घेणार नाही असे वाटते.
आजीने पनिशमेंट देणे म्हणजे 'दुधावरची साय' (संदर्भ : बालभारती) करपण्यासारखे आहे.}
24 Jun 2011 - 5:36 pm | प्रमोद्_पुणे
कथा आवडली.
25 Jun 2011 - 1:34 am | आत्मशून्य
.
25 Jun 2011 - 2:46 am | शिल्पा ब
छोट्या चिमण्यांना खेळताना बघणे यासारखा आनंद नाही. खूप छान लिहिलाय तो प्रसंग.
25 Jun 2011 - 3:45 am | अभिज्ञ
मस्तच.
फारच छान लिहिलेय.
अभिज्ञ.
25 Jun 2011 - 4:27 am | रेवती
मस्त गोष्ट!
भावाऐवजी बहिणीलाच वाट पहायची शिक्षा झाली.;)
परवाच माझे बाबा माझ्या ३ वर्षाच्या भाचीला रागावताना माझ्या मुलाबद्दलही बोलले तर ती ठमाकाकू रागावून आजोबांना म्हणाली की दादाला काही म्हणू नका तो माझा फ्रेंड आहे आणि मी तिची सिस्टर आहे. ;) सगळेजण हसताना पाहून आपण काहीतरी ग्रेट बोललो आहोत असे तिला वाटले.
25 Jun 2011 - 5:26 am | चतुरंग
शब्दांचे आणि कृतींचे नेमके अर्थ न समजता मुले काही करु जातात आणि त्यातून मोठ्यांनाच नकळत काही समजले तर मोलाचे ठरते. पनिशमेंट नेमकी कोणाला झाली? मुले क्षणस्थ असतात. त्या त्या वेळी जे समोर येईल त्यात लगेच गुंतून जाणे मग आधीच्या गोष्टीचा लगेच विसर पडणे. निरागसता हा त्यांचा स्वभाव असतो.
आई-बाबांनी शिक्षा करणे आणि आजी-आजोबांनी करणे यातला फरक आणि गांभीर्य मात्र त्यांनाही उमजते!
-चतुरंग
25 Jun 2011 - 6:57 am | ५० फक्त
खुप खुप खुप छान, ब-याच दिवसांनी खुप छान आठवणी जाग्या झाल्या आणि एकदम छान वाटलं. अरुंधतीतै खुप खुप धन्यवाद.
25 Jun 2011 - 1:13 pm | बिपिन कार्यकर्ते
छान! :)
25 Jun 2011 - 7:54 pm | पिवळा डांबिस
आवडलं!
25 Jun 2011 - 8:20 pm | स्वाती दिनेश
पनिशमेंट आवडली,
स्वाती
26 Jun 2011 - 3:58 am | स्मिता.
लहान मुलांचं भावविश्व मस्त चितारलंय. खरंच किती निरागस असतात लहान मुलं!
'पनिशमेन्ट' आवडली.
26 Jun 2011 - 10:35 am | अर्धवट
खरंच मस्त..
अरुंधतीताई.. छान आणि तरल लिहीलय
26 Jun 2011 - 7:30 pm | अरुंधती
प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद!! :-)
26 Jun 2011 - 8:14 pm | पल्लवी
ओघवता झालाय लेख.. मजा आली.. :)
27 Jun 2011 - 12:26 am | निल्या१
खूपच छान लेख. अगदी डोळ्यापुढे चित्र उभे राहिले. वर्णनाची हतोटी व बालमनाचा हळवेपणा छान साधला आहे.
27 Jun 2011 - 5:19 pm | गणेशा
निरागस घालमेल
किति सुंदर चित्र तुम्ही समोर ठेवले ..
एकदम स्वताच्या त्या निरागस काळात घेवुन गेले हे लिखान ...
27 Jun 2011 - 6:58 pm | धमाल मुलगा
केवळ सुंदर!
छान चित्र उभं राहिलं डोळ्यापुढं.
निरागस लेकरांचं भावविश्व छान उभं केलंय. आणि त्या चिमुरडीची घालमेल तर मस्तच चितारलीये.
आवडलं एकदम. :)
29 Jun 2011 - 1:13 pm | RUPALI POYEKAR
खुपच छान