हिरव्यागर्द झाडीत, जुन्या चबुतऱ्यावर
उन्ह पाऊस झेलीत, उभी आहे दगडी छत्री
पायथ्यात विसावलेल्या कोण जाणे कुणाची
महानिद्रा सांभाळीत, वखवटातात जीवनाच्या
तिच्या आजुबाजुला, निर्मितीचा नंगा नाच
चालू आहे अव्याहत, मरणाच्या एकटेपणावर
हिरवे काळे बुळबुळीत लिंपण लावीत
जीवनाने पाय रोवले आहेत छत्रीच्या माथ्यावर
उडणारे पक्षी मधूनच कधी टेकतात
अस्वस्थ माना वळवून शोधतात
शोधतात मागे राहिलेल्या कुणाला
तळात छत्रीचा कुणीतरी, नेहमीसाठी जवळ.
हंबरत येवून एखादी गाय पळभर
विसावते छत्रीच्या दगडी चबुतऱ्याशी
घासून मान थोडी शमवते रुखरुख
तो शांत आतमधे, नाही कसलीच बोच
कॅमेरा रोखून कोणी प्रवासी घेतो फ़ोटो
खांबाशी रेलत्या हसऱ्या फ़टाकडीचे
तिच्या कमनीय गोलाई्च्या निकटतेत
जीवनाच्या उबेने छत्री काळवंडलेली
छत्रीच्या आडोशाला विसावतात दोघे
हळूच कुरवाळत तो तिच्या हातांना
इतक्यात नजर तिची शिलालेखावर
वाचते खाली निजलेल्याचा मृत्युलेख
ई॑ऽईऽऽ कुठे आणलेस तू मला, चल निघू
किळस झटकून दोघे दूर पळतात
मरण जपत जीवनाशी नाते तोडलेली
छत्री तशीच स्तब्ध, अचल, थिजलेली.
पावसाळ्यात मरणाच्या पायथ्यामधून
तरारतो हिरवा कोंभ, सृजनाचा उद्धट
वाढतोही भराभरा जाड पाऊले रोवित
गतकाळाच्या छाताडाला रेलून धक्के देत
छत्री हादरते, भेगाळते, खचाया लागते
कालनिद्रेची शय्या जीवनाने ग्रासलेली.
जपलेल्या त्या कोणाच्या काळजीने
काळवंडतो छत्रीचा कोडेला पांढरा चेहरा
म्हणतात ना वर, देर आहे, अंधेर नाही
येतात यमदूत देवासारखे अचानक
छाटून त्या कृर वृक्षाच्या तंगड्या
लोळवतात त्याला मृत्युच्या ठायी.
आगांतुक कलेवराची राख आणि काही काड्या
लोळण घेतात सुंदर लिंपलेल्या छत्रीच्या पायाशी
जीवनाचे मरण बघून हलकेच हसते छत्री
आणि होते स्तब्ध, अचल, जीवनरहीत, शांत,........
प्रतिक्रिया
13 Jun 2011 - 8:52 am | पाषाणभेद
अरूणकाका, कविता छानच आहे. तुमचं हळवं मन त्यातून दिसते आहे.
"पावसाळ्यात मरणाच्या पायथ्यामधून
तरारतो हिरवा कोंभ, सृजनाचा उद्धट....."
तो हिरवा कोंभ त्या छत्रीवर जन्मतो, वाढतो, जगतो. एका मरणाच्या ठिकाणी एक जीव जन्म घेतो यात केवढे मोठे नाट्य आहे खरे तर. पण तुम्हाला तो जीव अनाठायी वाटतो.
त्या छोट्या वृक्षाला तोडणारे तुम्हाला (नायकाला ) यमदुतासारखे न वाटता देवदूतासारखे वाटतात.
प्रेत्येक रसीकाला हे पटेलच असे नाही.
अर्थात कविता तुम्ही लिहीली म्हणून तुमचेच योग्य आहे.
13 Jun 2011 - 1:40 pm | अरुण मनोहर
पाभा, धन्यवाद. जे न देखे रवि,... म्हणतात ना? नेहमी जग एकाच दृष्टीतून पहाते. कधी त्या छ्त्रीच्या कोनातून विचार करून बघा,..
13 Jun 2011 - 10:14 am | धन्या
कवितेची शैली ईतकी ओघवती आहे की असं वाटतं ती निर्जीव छत्रीच जिवंत होऊन आपलं मनोगत सांगते आहे असं वाटतं.
आणि हो, तुमचं निरिक्षणही अचूक आहे... "त्यांचं" तिथे येणं, फोटो काढणं, ते "ई॑ऽईऽऽ"...
एकदम झकास !!!
- धनाजीराव वाकडे
13 Jun 2011 - 11:26 am | विदेश
मरण जपत जीवनाशी नाते तोडलेली
छत्री तशीच स्तब्ध, अचल, थिजलेली.
कविता आवडली.
13 Jun 2011 - 11:51 am | मिसळलेला काव्यप्रेमी
__/\__
13 Jun 2011 - 11:54 am | टारझन
कवितेबद्दल कळत नाही .. पण शिर्षक महा अश्लिल वाटले :)
13 Jun 2011 - 1:41 pm | अरुण मनोहर
मला पण कळले नाही, काय अश्लील आहे ते. थोडा प्रकाश टाकल्यास बरे. (की अश्लीलाला प्रकाशाचे वावडे असते?)
13 Jun 2011 - 8:10 pm | पैसा
छत्रीच्या दृष्टीकोनातून नव्या झाडाच्या रूपातलं जीवन हेच छत्रीचं मरण आहे.. कविता छान जमलीय.