स्टेट ऑफ द आर्ट - भाग २
दुपारी पंचायत ऒफिसमधलं काम झालं, नकाशे, सात-बारा घेउन झाल्यावर तलाठी का कोण आणि मोजणि करणारे दोन -तीन जण यांना सोबत घेउन निघालो. भर दुपारी उन्हात चालायचं माझ्याकडनं झालं नसतंच म्हणुन शेवटी जेंव्हा आखाडावर पोचलो, तेंव्हा मी झाडाखाली बसायचं ठरवलं, तलाठी पण बसले माझ्याबरोबर. आखाडाचे बांध कधी बांधुन घेतलेले नाहीत त्यामुळं इथं मोजणीला जवळपास निम्मं गाव आलं आहे. मी आपला, लॅपटॉप उघडुन हिशोब करत बसलो होतो, किती एकर जमीन, काय भाव आहे, मला किती मिळतील, कर्जाचं प्रिपेमेंट किती होईल. तेवढ्यात तलाठी जवळ आले. ’तु कुठं असतोस म्हणे आता, पुण्यात हिंजवडीला का?’ पुणे आणि आय्टि म्हणजे हिंजवडी हे एक पक्कं समीकरण झालंय आता. ’ नाही माझं ऑफिस कर्वे रोडला आहे, शारदा सेंटर’ मी तुटक उत्तर दिलं. ’ हां ते देशपांडॆनं बांधलेलं की, माहित आहे ती जागा कशी मिळवली त्यांनी ते’ इति तलाठी साहेब. पुढचा प्रश्न ऐकुन मात्र मी हादरलो एकदम ’ तुमच्या या लॅपटॉप मध्ये ते सविता का कविताभाभी तसलं नाही का काही?, काय आहे अजुन एक तास तरी जाणार ह्या गवतातुन मोजणी करायला, काय करणार इथं बसुन.’ आयला ही असली मागणी होईल असली मी अपेक्षाच केली नव्हती.’ नाही, नाही ओ, तसलं काही नाही माझ्याकडे, त्याला इंटरनेट लागतंय, इथं कुठलं कनेकश्न?’, पण तलाठी तो तलाठीच होता, त्यानं खिशान हात घालुन टाटा फोटॉन काढलं आणि म्हणाला ’असलं कसलं ओ तुम्ही आय्टि वालं माझा भाचा तर नुस्तं एमेस्सिआय्टि झालाय तरी पण ते पिडिफ आणुन देतंय आणि तुमच्याकडं नाही, काय उपयोग तुमचा. जाउ दे हे लावा, गावात टावर झाल्यापासुन एकदम फुल्ल स्पिड चालतंय हे’
हे प्रकरण चालु करुन दिलं की तलाठी जरा आमच्याबाजुनं वळॆल या शहरी समजुतीनं मी त्याचं फोटॉन घेतलं, तलाठ्यानं त्याच्या खिशातुन एक डायरी काढली, तिच्या एक पानावर युजर आयडि व दुस-याच पानावर पासवर्ड होता, आणि खरंच लगेच नेट सुरु झालं, मी क्रोम चालु करुन लॅपटॉप त्यांच्याकडे दिला, तसा तलाठी म्हणाले ’ खालीच ठेवा, आधीच हवा गरम, मग हे पण गरम होणार आणि बघणार पण गरमच, आणि किती चालेल बॅटरी का मध्येच खल्लास होतीय.?’ ’ चालेल एक दिड तास तरी’ मी म्हणालो. तसं तलाठ्यांनी सुरु केलं, सरकारनं संगणक प्रशिक्षण देउन एक प्रकाराने सोयच करुन ठेवली आहे. मग थोडा मोकळा वेळ होता म्हणुन मोजणी चालु होती तिकडं गेलो. इंजिनियरींगच्या पहिल्या वर्षाला कंपलसरी मोजमापाला गेलो होतो त्यानंतर टेप, फुट, मीटर या काहीतरी मोजायच्या गोष्टी आहेत हे विसरलोच होतो, घर घेताना यामुळं केवढा घोळ झाला होता, स्के.फुट च्या ऐवजी स्के. मीटर चे हिशोब केले होते. १५-२० मिनिटं उन्हात फिरलो, आता उन्हं सहन होईना म्हणुन परत येत होतो तोच तलाठ्यांचा आवाज आला, जरा जोरातच ’ ओ, माडके आय्टिवाले, हे काय झालंय बघा एकदम, काय काय आलंय बघा एकदम.’ मी पळायलाच लागलो, कारण इथं सर्व्हरला जोडलेलं नसल्यानं दोन दिवसात अॅंटीव्हायरस आणि मालवेअर अपडेट झालेले नव्हते आणि आज यानं काहीतरी साईट उघडुन राडे केलेले असणार नक्की. त्यापेक्षा माझ्याकडे होत्या त्या पिपिटी दाखवलेल्या परवडल्या असत्या, असं वाटायला लागलं.
झाडाखाली आलो, ठोके वाढलेले उन्हातनं आणि गरम शेतातुन पळत येउन, त्यातच हे नविन टेन्शन. पाह्तो तो काय, ७-८ वर्ड, १०-१२ एक्सेल, ४-६ आयई आणि एक डिबगिंग विंडो ओपन झाली होती. हे पाहुन मी पण भंजाळलो जाम, आणखी एक घोळ झाला होता माझी सॅलरी स्लिप ओपन झाली होती पिदिएफ रिडर मध्ये आणि तिच सगळ्यात वर होती, तलाठी बहुधा तिच वाचत असणार, आणि पैसे म्हणलं की याचं डोकं नको तिथं चालायला सुरु होणार होतं. मग पटापट सगळं बंद केलं, पण ऑफिसचं कम्युनिकेटर काही केल्या बंद होईना, अगदी अल्ट+कंट्रोल+डिलीट करुन केलं तरी. पहिल्यांदा फोटॉन बंद करुन नेट बंद केलं मग विंडोज बंद केलं, पुन्हा सुरु होतंय का ते पाहिलं तर सुरु होताना नेहमीपेक्षा जास्त व्हायब्रेशन जाणवले. विंडोज सुरु व्ह्यायला नेहमीपेक्षा दुप्पट वेळ लागला आणि प्रचंड स्लो झाला होता लॅपटॉप. राईट क्लिक करुन रिफ्रेश करावं म्हणलं तर मोजुन १ मिनिट काही झालंच नाही.
तलाठ्यांकडं जरा रागानं पाहात मी पुन्हा सगळं बंद केलं आणि म्हणालो ’ या असल्या साईटमुळंच हे प्रॉब्लेम येतात सगळीकडं’ ’ असेल असेल, पण आमच्या घरी तर आम्ही सगळा पिक्चर पाह्तोय की एकदा पण काय होत नाही असलं’ तलाठी उत्तरले. पण तेवढ्यात बाकी सगळी मंडळी परत आल्यानं विषय तिथंच थांबला, मोजणी कारकुन, शेजारी आणि मंद्या सगळे परत आले. मोजणी कारकुनांनी कसले कसले नकाशे, उतारे आणि जुनी कागदपत्रं तलाठ्याला दाखवली आणि ते दोघं बोलत बोलत एका बाजुला गेले. मंद्यानं मला बाजुला बोलावलं आणि म्हणाला’ बरं केलंस, त्या भाड्याला इथंच बसवुन ठेवलंस, १५००० दिलंत मोजण्याला, तु ५००० दे त्यातले, मागचा भरत्याचा माळ १२-१४ फुट आत नेलाय उत्तर पुर्वेला, असं पण भरत्या गेल्यापासुन टॅंकर तिथुनच ये जा करत होते, टायरच्या निशाण्या दाखवल्या आणि नोटा दाखवल्या की गप्प झाला तो मोजण्या.’ मला जरा हसुच आलं, हे टायरच्या निशाण्यांचं लॉजिक जर पुण्यात पार्किंगला लावता आलं असतं तर मी आख्या पार्किंगमधुन माझी गाडी फिरवली असती टायरला पेंट लावुन.
मग तलाठ्यानं जो द्यायचा होता तो फायनल मोजमापाचा कागद दिला, मंद्या आणि तो त्याच्या गाडीतुन गेले आणि आम्ही बाकीचे घरी आलो. आता संध्याकाळी बैठक बसेपर्यंत निवांत होतो, म्हणुन खोलीत जाउन लॅपटॉप लावला चार्जिंगला आणि सुरु केला. सुरु लगेच झालं सगळं पण हात सुद्धा लावला नाही तोच ५-८ वर्ड फाईल ओपन झाल्या, सगळ्या रिकाम्या. मग त्यानंतर २-३ एक्सेल आणि शेवटी कमांड विंडो. पुन्हा अल्ट+कंट्रोल+डिलीट , पण पुन्हा तेच. विचार केला, तलाठ्यांनं जाम भारी लफडं केलेलं दिसतंय, तेंव्हा हे परवा पुण्यात गेल्यावर द्यावं नित्याकडं, फक्त ऑफिसच्या सिस्टिमला जोडण्यापुर्वी काहीतरी करावं लागेल, नाहीतर नसती पंचाईत.
स्टेट ऑफ द आर्ट - भाग ०१ - http://misalpav.com/node/17897
प्रतिक्रिया
5 May 2011 - 8:44 pm | किसन शिंदे
दुपारीच वाचलयं तुमच्या ब्लोगवर.....ते तलाठी जरा अवलीच वाटतंय.;)
बाकी लेखन मस्तच..
खाली क्रमश विसरलात काय? :(
5 May 2011 - 8:51 pm | स्पा
हर्षद ब्याक.....
दोन्ही भाग वाचले, हि सत्यकथा आहे का विचारायचा भानगडीत पडणार नाही...
पण कथा रंगतेय हे मात्र नक्की..
निरीक्षण झकास...
तलाठी अवली दिसतोय :)
5 May 2011 - 8:57 pm | ज्ञानेश...
सुरूवात तर बढिया.. पुढे वाचण्यास उत्सुक आहे.
(अवांतर- संगणक-आंतरजालाची ही 'ज्ञानगंगा' हल्ली खरोखर खेड्यापाड्यात पोचली आहे. ;))
5 May 2011 - 10:22 pm | रेवती
वाचतिये.
लेखनाचा वेग चांगला आहे.
5 May 2011 - 10:35 pm | प्रीत-मोहर
मस्त हर्षददा :)
पुभाप्र
5 May 2011 - 11:46 pm | पुष्करिणी
अनपेक्षित काहीतरी कलाटणी मिळणार असं वाटतय आता, पुढचा भाग लौकर टाका.
6 May 2011 - 1:52 am | इंटरनेटस्नेही
मस्त!
-
सवितास्नेही, इंट्या.
6 May 2011 - 7:13 am | स्पंदना
पुढ!
पण काही म्हणा तलाठी मामा तुअमच्या पेक्षा एक्ष्पर्ट निघाले , तुमची सिस्टीम जाम करुन ठेवली त्यान, वर सॅलरी स्लिप ही उघडु शकला तो.
6 May 2011 - 8:27 am | विंजिनेर
फुडं?
6 May 2011 - 8:57 am | प्रचेतस
पुढच्या भागाविषयीची उत्सुकता प्रचंड वाढतीय इतकेच म्हणतोय.
पटापट येउ दे आता.
6 May 2011 - 10:29 am | मुलूखावेगळी
+१
6 May 2011 - 10:57 am | रामदास
मोमेंटम पण पहील्या भागाइतकाच कायम राहील्याने उत्सुकता वाढत जाते आहे..
6 May 2011 - 2:02 pm | RUPALI POYEKAR
मस्तच
8 May 2011 - 8:06 pm | विनायक बेलापुरे
त्यांना गावच्या भानगडी कुणाच्याही आधी कळतात. ब्रिटीश काळापासून तलाठी-गावकामगाराचा आख्ख्या गाववर वचक असायचा. कलेक्टरपासून प्रांत सर्कल सगळ्याना जपून वागायला लागते त्यांच्याशी कारण जमिनीची सर्व ओरिजनल कागद्पत्रांचा कस्टोडियन तोच असतो.
हर्षदराव मस्त ..... पुढचं वाचायला जाम उत्सुक .... कारण अता तलठी अण्णांच्या व्हायरसची धमाल होणार हाफिसात ....
9 May 2011 - 8:11 am | ५० फक्त
पुढचा भाग टाकला आहे, -- http://misalpav.com/node/17950