स्पेशल फीचर...

गवि's picture
गवि in जनातलं, मनातलं
21 Apr 2011 - 12:11 pm

स्थळ : यशचं घर.

(बाहेरच्या खोलीत सोफ्यावर बाबा मुडपून आडवारलेले. यश हातात मोबाईल घेऊन घराच्या दाराबाहेर उभा. मोबाईलवर नजर अखंड खिळलेली आहे. एका हाताने मोबाईलची खूप फास्ट बटनं दाबत आणि मधेच त्यावरचा काहीतरी मजकूर वाचून खुदकन हसत तो उभा असतो. एक मोकळा हात सतत अस्वस्थपणे स्वत:चे खिसे चाचपत असतो. घराच्या किल्लीसाठी..पण मोबाईल वरची नजर मात्र एक क्षणही हटत नाही.)

यश (स्वत:शी) : किल्ली कुठे गेली च्या मायला..(विचित्र टोन मध्ये मोठ्यांदा) पड्ली बिडली की क्कॉय…?!?

(तेवढ्यात खिशातून खण्णकन किल्ली खाली पडते. तरीही मोबाईल वरची नजर न हटवता गुडघे वाकवून यश खाली वाकतो आणि हाताने जमीन चाचपून किल्ली शोधायला लागतो. फोनचं मॅग्नेटिझम सतत जाणवतंय. किल्ली हाताला लागते. ती उचलून तो दार उघडतो. समोरच बाबा झोपलेले असतात. कोचावर टी.व्ही.बघता बघता.)

यश (बाबांकडे बघून): आयला..रात्री डबलबेडवर एकटे असतात तरी झोपत नाहीत आणि दुपारी मात्र कोचावर मात्र एकदम पितामह भीष्म..(शरपंजरी पडल्यासारखी पोज घेतो. मग हातात रिमोट घेऊन टीव्हीकडे बघायला लागतो.)

(टीव्ही चालूच..त्यातून आवाज येतो..:ब्रेक के बाद हम हाजीर है हमारे एक्सक्लुजीव्ह फीचर के साथ. बारा मुंह का रावण. …(फेड..) क्या रावण के सचमुच सिर्फ दस मुंह थे? (फेड) कैसे बदलता होगा करवट दस मुखोंवाला रावण… )

यश (बाबा त्याचवेळी "करवट" बदलतात. यश आळीपाळीने टी.व्ही. आणि बाबांकडे पहात आ करून उभा. जोरात ओरडून.): आयचा घो..

(टी.व्ही. चा आवाज फेड)

बाबा (दचकून उठत): अं..काय म्हणालास रे?

यश: काय नाय..तुम्हालाच हाक मारत होतो..हे काय बघत बसता हो दुपारचे..(चेहरा मॉडेल पोरीप्रमाणे निर्विकार करून रॅम्पवर चालल्याची एक्शन करत..) ते एफ टी.व्ही. का नाय लावत हो बाबा..

बाबा: एफ टी.व्ही. लावून काय करायचं रे? कुत्र्यासारखी जीभ बाहेर काढून त्या फटाकड्यांना मार्क देत बसायचे? तू करतोस तसं? (अतिशयोक्त नक्कल करतात.."फ़ाईव्ह..शिट.. एट.." जीभ बाहेर काढून "वीस..")

यश: ओ बाबा..आता तीस वर्षांचा झालो मी..मला आता तरी सगळ्या फीलींग येऊ द्या ना..

बाबा: तीस वर्षाचे झालात ना?

यश: हम्म..

बाबा: सगळ्या फीलींग येताहेत ना..

यश: (आनंदित चेहरा करून डोळे मिटून) हम्म हम्म हम्म..

बाबा: मग लग्न करा ना..फीलींग्ज जायच्या आत..

यश: (चेहरा पडतो) ..गेली फीलींग्ज आयला..(पॉज घेऊन..)
यश: बाबा..आत्ता इथे एक मुलगी येणार आहे माझ्याकडे.. नाटकाच्या प्रॅक्टिसला.

बाबा: (आनंदित) मुलगी ?..! क्या बात है..करा..करा.. नीट करा प्रॅक्टिस…(चिडवण्याच्या टोनमध्ये) दोन पात्रांचंच नाटक ठेवलंयस प्रॅक्टिससाठी हे बरं केलंस हां..

यश: (वैतागून) बाबा..

बाबा: ओके ओके..(टोन बदलून) दोन पात्रांचंच आहे ते बरं झालं..म्हणजे डिस्टर्ब नको.

यश: बाबा, खोचकपणा बास करा..मैत्रीण आहे ती ग्रुपमधली. आपली पोझिशन आहे ग्रुप मध्ये..सगळे मानतात आपल्याला तिथे..म्हणून येतेय..

बाबा: काय मानतात रे तुला सगळे तिथे?

यश: डायरेक्टर म्हणून गाइडन्स घेतात.. त्यांच्यात सिनियर आहे मी बाबा…कॉलेजात नाव आहे आपलं..

बाबा: (उपरोध) तुला कॉलेज सोडून दहा वर्षं झाली तरी कॉलेजात नाव आहे तुझं अजून..क्या बात..क्या बात..!! मग बरोबर आहे…खूपच सिनियर असणार रे तू..

यश: बाबा..आता तो विषय नकोय. ती येणार आहे..तेवढंच सांगायचं होतं. (पॉज) आम्हाला थोडा शांत वेळ द्या जरा. फिरायला जाणार आहे का तुम्ही?

बाबा: नाही बाबा..आता घराबाहेर नको वरात काढू माझी. मी बसतो कोप-यात गप्प..चालू दे प्रॅक्टिस तुमची..
यश: मग…..काढू का खंबा बाबा?

बाबा: आहे का तुझ्याकडे? कपाटात तर दिसत नाहीये…

यश: बाबा..तुम्ही एकट्याने कशाला हो कपाट शोधायला गेलेलात ? कमी करा जरा ड्रिंक्स..कमी करा..

बाबा: घ्या..आम्ही तुम्हाला सांगायची वाक्य तुम्हीच आमच्यावर फेका आता.

यश: मग नको ना तुम्हाला आत्ता?

बाबा:(चेहरा पडतो..) कंपनी हवी असेल तुला तर एक स्मॉल घेईन.

यश:(मुद्दाम वाईट हसत..बॅग मधून बाटली काढत..) गझल लावू का?

बाबा: नको..

यश: मग गुत्ता गाणी लावू का? म्हणजे (पिळवटलेल्या चेह-याने) दिली की ये आरीजू थी कोई दिलरुबा मिले..

बाबा: नको नको..बस इथे..मला तुझ्याशी बोलायचंय..
यश: माझ्याशी बोलायचंय ?? (बाटलीकडे बघत नाटकीपणे ) हे रम..सॉरी.. हे राम..! सिरीयस दिसतंय काहीतरी..(दोन ग्लास भरतो..)

बाबा: रम.. बरोबर बोललास..हेच बघ एक्झाम्पल..आपण सर्वात स्वस्त रम आणून पितो..जरा भारीतली व्हिस्की सुद्द्धा आणू शकत नाही. त्याविषयीच बोलायचंय मला.

बाबा:(एकदम गंभीर होत..) गंमत जाऊ दे..हे बघ…आपण तसे दोघेच असल्यामुळे आपला जास्त काही खर्च नाही. आई आता नाहीच..त्यामुळे तिचाही खर्च तसा काही नाही. पण तरी माझी पेन्शन आत्ताच्या दिवसांत खूपच जेमतेम पुरतेय…इमर्जन्सीला आपल्याकडे काही शिल्लक नाही..

यश: (अस्वस्थ)..मग पॉईन्ट काय आहे..?

बाबा: तुला आता स्टेडी इन्कमचा काहीतरी विचार करायला हवा ना?

यश: बाबा काय हो..पहिल्याच पेगला उतरवताय? मला मिळालाय ना "सांजवेळ"चा मोठा प्रोजेक्ट.

बाबा: हो.पण तेवढी एकाच सिरीयल आहे तुझ्याकडे. आणि प्रोजेक्ट मोठा असला तरी तुझा रोल आहे का मोठा? नाहीच..

यश: बाबा.आय नो..मला करीअरमध्ये इतरांपेक्षा थोडा उशीर झालाय..पण आता एक तरी प्रोजेक्ट आलाय ना माझ्याकडे..मला जरा तरी वेळ द्या..

बाबा:हे बघ..थोडा स्पष्ट विचार कर..लग्न काय चाळीसाव्या वर्षी करणार आहेस का?

यश: (संतापून) ओक्के..लग्नावरच आलात ना शेवटी..तेच बोलायचं होतं ना? सगळ्यांच बूर्झ्वा मिडल क्लाससारखी तुमचीही नजर लग्न आणि नोकरी यांवर..लाईफ कधी जगायचं ओ बाबा?
बाबा: (घोट घेत) नोकरी आणि लग्न केल्यानंतर..त्यातच जगण्याचं सुख आहे राजा. बूर्झ्वा वगैरे काय आहे त्यात?

यश: मी सुद्धा काहीतरी कमावतोयच ना? एकदा गेलो की हजाराची नोट तरी खिशात घेऊनच येतो ना?

बाबा: म्हणजे रोजंदारी.. आणि तीही महिन्यातून आठ दहा दिवसच.. मग त्यापेक्षा रोजगार हमी योजनेत नाव घाल. नियमित तरी मिळतील चार पैसे..

यश: बाबा..कुचकटपणा बास..मला लीड रोल मिळेलच ना कधी ना कधी..तुम्ही मला इन्स्पिरेशन द्याल की अजून डिस्करेज कराल..आं?
बाबा: हे बघ..हे आता खूप झालं. तुझं खूप ऐकलं, आता माझं ऐक. आज दुपारी तळेकर आले होते.

यश: (दीर्घ) ओ…क्के….नाऊ दॅट एक्स्प्लेन्स की तुम्ही कपाटात बाटली कशाला शोधत होतात..पुढे बोला..काय ऑफर आहे यंदा तळेकरांची (स्वत:कडे इशारा करत) या अकुशल कामगारासाठी ??
बाबा: ते तुला सध्या डेटा एन्ट्रीसाठी घ्यायला तयार आहेत. नंतर हळू हळू त्यांच्याकडचं सगळंच ट्रेनिंग देतील असं म्हणाले.

यश: तळेकर नेहमीच ऑफरला उदार असतात बाबा..पण आता कंपनी ते स्वत: चालवत नाहीत..कंपनी त्यांचा मुलगा चालवतो..तिथे गेलो की ठेवेल मला वेटिंग करत केबिनबाहेर.. जस्ट टू शो की मी कसा बेकार निकम्मा आहे..मग प्रश्न विचारेल फालतू काहीतरी..एक्सपीरीयन्स आहे का? पोस्ट ग्रॅज्युएशन आहे का?..म्हणजे माझ्याकडून प्रत्येक प्रश्नाला "नाही..नाही" येणार..ते तो ऐकणार..सुखीसमाधानी होणार..आणि मग उपकार केल्यासारखी देणार नोकरी….तुम्हीच सांगा ना काही मजा आहे का असल्या नोकरीत? काही शान आहे का? आणि जॉब डेटा एन्ट्रीचाच ना? सर्वात गाळातला जॉब ऑफर करतायत बाबा ते..
बाबा: तळेकर आणि त्याचा मुलगाही त्यातले नाहीयेत. उगीच काहीतरी कारण सांगून टाळतोयस तू..

यश: ओ बाबा..तुम्हाला लाज आणण्यासाठी ते अशा ऑफर करतात.. आणि तुम्हाला कळत नाही? … (संतापून पॉज..मग परत वळून अभिनय करत.) बिच्चारे तुम्ही रिटायर्ड.. तुमचा मुलगा बेकार तुंबडी..त्याची लायकी डेटा एन्ट्री करण्याचीच..त्यांचा मुलगा बघा कसा माझ्याच वयात कंपनीचा डायरेक्टर..कर्तबगार.. (अभिनय बंद करून खरेच चिडून) ..बापाच्या जिवावर.. आय शॉट.. कंपनी तरी कसली..? व्हेलवेट मॅन्युफॅक्चरिंग..डिक्लायनिंग धंदा आहे हो तो..
बाबा: डिक्लायनिंग धंदा..?? तुला सगळ्या धंद्यांची इतकी माहिती आहे तर डिक्लायनिंग नसलेला एक कुठलाही धंदा तू स्वत: का नाही रे करत? तू आत्ता जे करतोयस त्यापेक्षा कुठलीही लाईन चांगलीच आहे.. जाणार आहेस का तेवढं सांग.

यश: आमचा कचरा करण्यात काय तुम्हाला एवढा आनंद मिळतो कोण जाणे..(जणू धाडस गोळा करण्यासाठी उरलेला ग्लास एका दमात रिकामा करतो..) ओके.. (दीर्घ श्वास..पॉज).. मी स्पष्टच सांगतो. मी जाणार नाही. मी नोकरी करून माझं लाईफ झिजवून झिजवून विकणार नाही..मी मला जे हवं ते करणार..

बाबा: म्हणजे काय?

यश: (नाटकी आवाजात) आयुष्य जगणं बाबा..आयुष्य जगणं..जाऊ दे..यु वोन्ट अंडरस्टँड..
बाबा डोक्याला हात लावतात..मागे टेकून दीर्घ श्वास सोडतात..(श्वासाचा आवाज मोठा एम्प्लीफाईड.. श्वासाचा आवाज विरत जातो तसे लाईट मंद होऊन ब्लॅक आउट..)

थोडा वेळ गेल्याचं दाखवणारा ब्लॅक आउट. लाईट येतात. सीन तसाच. फक्त अजून दोन पेग गेल्याची चिन्हे..दोघेही सुस्तपणे बसल्या जागीच कलंडलेले..यशच्या हातात रिकामा ग्लास झुलतोय. नजर शून्यात..तोंडावर टी.व्ही चा भगभगता लाईट आणि बारीक आवाजात टी.व्ही चा ट्रॅक.
दारात ईशा येऊन उभी राहते. बेल वाजवते.

(यशचा चेहरा एकदम आनंदाने उजळतो..तो पटकन ग्लास आणि बाटली सोफ्याखाली सरकवतो. )
यश (हलक्या आवाजात): बाबा..ती आली वाटतं….ग्लास लपवा..उदबत्ती लावा एखादी..

(यश चेह-यावरचा आनंद लपवत दाराकडे लगबगीने जाऊन दार उघडतो. ईशा अत्यंत आकर्षक. पूर्ण काळ्या ड्रेसमध्ये. )

यश: ओह ईशा..वेलकम वेलकम..वाटच बघत होतो.

ईशा: हाय यश..(आत पाऊल टाकते.. तेवढ्यात टी.व्हीतून उत्तेजित बातमीदाराचा मोठ्ठा आवाज येतो. "अभी अभी हुआ है नोईडा यौन उत्पीडन कांड में एक सनसनीखेज खुलासा. ..देखते रहिये हमारी अगली पेशकश..रिक्षा में लैंगिक शिक्षा.. " ..आवाज किंचित फेड..ईशा व्हिजीबली ऑकवर्ड…)

यश (चिडून): बंद करा हो बाबा टी.व्ही…

बाबा: थांब..मी चॅनल बदलतो. (रिमोटचं बटन दाबतात..)

यश: बाबा..ही ईशा..ईशा हे बाबा..

ईशा: नमस्ते काका..

बाबा: ..नमस्ते नमस्ते..प्रॅक्टिस चालू आहे का तुमची नाटकाची…करा करा हो प्रॅक्टिस नीट..मी आपला बसतो इथे गप्प..की जाऊ बाहेर..?

यश: बरं होईल जरावेळ गेलात तर..

ईशा: नाही नाही काका.. असं काय म्हणताय..उलट तुम्ही थांबा..आमच्या डिस्कशनमध्ये भाग घ्या..ऑनेस्ट ओपीनियन द्या..आणि आम्ही नाटकाची प्रॅक्टिस वगैरे काही करत नाहीच आहोत..यंदाच्या राज्यनाट्यसाठी आमच्या ग्रुपला नवीन नाटक आणायचंय. म्हणून आम्ही नवी कोरी स्टोरीलाईन शोधायला बसणार आहोत..

(ईशा जमिनीवर बसते.)

यश: ए..खाली काय बसतेस..इथे बस ना वर अशी.

ईशा (न उठता ) ए.. इथेच खाली बसूया ना मस्तपैकी रीलॅक्समधे..(अचानक बसल्या जागेवरून सोफ्या खालची बाटली पहात..चोरी पकडल्याच्या टोनमधे.. ) ओ हो…..तुम्ही आधीपासूनच रीलॅक्स होण्याची सोय केली आहे वाटतं..

यश: अं..हो..आम्ही जरा बसलो होतो..टाईमपास करत..(फॉर्मल टोन..) तू ही घेणार का..ड्रिंक्स??

ईशा (बाबांकडे बघत): काकांना प्रोब्लेम नसेल तर आय डोन्ट माईंड अ ड्रिंक ऑर टू..

बाबा (थोडेसे चकित..सावरून..): अरे अरे..हे काय विचारणं झालं का.. घे घे..एन्जॉय..

(ईशाची नजर यशकडे वळताच बाबांचा चेहरा नाराज..एक टक ईशाकडे बघत राहतात.)

यश: पण जीन, वाईन वगैरे नाहीये..रम आहे फक्त..ती पण कडक..

ईशा: मी कधीच रम नाही घेतली. आम्हाला मुलींना असली कडक ड्रिंक्स घ्यायचा चान्स कधीच येत नाही. आवडेल मला ट्राय करायला.

(बाबा आणखी नाराज..यश ईशाच्या हातातली बाटली घेतो. टेबलावरून घेऊन अजून एक ग्लास भरतो.)

यश:(ग्लास भरत) ओ बाबा..आमच्या ग्रुपमधल्या पोरी अशाच बिंदास आहेत..दे नो हाऊ टू लिव्ह लाईफ..(पुन्हा त्याच नाटकी टोनमधे) आयुष्य जगणं बाबा..आयुष्य जगणं..जाऊ दे..यु वोन्ट अंडरस्टँड..
(यश ईशाच्या हातात ग्लास देतो..)

यश: (ईशाकडे पहात) सॉरी यार..मला लक्षात नाही आलं की यू विल आल्सो जॉईन अस इन ड्रिंक्स..नायतर मस्त चीज पकोडे बनवून ठेवले असते. आम्ही दोघे आपले बॅचलरसारखे तसेच मारतो घोट किंवा डब्यातले दाणे घेतो खायला याच्यासोबत.
बाबा: (उपरोधाने आणि मोठ्या आवाजात..) बाय द वे आपण खरोखरच बॅचलर आहात हो साहेब..विसरू नका..लग्न व्हायचंय आपलं..

(यश बाबांना चोरून हाताने बास बास..तो विषय नको.. अशा खुणा करतो..)

ईशा: सो..यु कॅन स्टिल ऑर्डर समथिंग..मागव ना काहीतरी.. मांचुरियन वगैरे..

यश: डन..(मोबाईलवरून फोन लावतो..)हां..झिन लाय चायनीज काय? हां..दोन गोबी मांचुरियन आणि एक चिकन मांचुरियन पार्सल..दोन ट्रिपल शेझवान राईस..एकशे तीन नंबर मधे पाठवा ..वसंतविलास बिल्डींग..ग्राउंड फ्लोअरलाच आहे.

(बाबा फोन चालू असतानाच एकीकडे लपवून खिशातून पैशाचं पाकीट काढून नोटा मोजतात आणि हुश्श करून परत आत ठेवतात)
टी.व्ही. मधून आवाज: "अभी अभी हमारे पास आयी है आज की सबसे बडी खबर जो है मुंबईसे. मुंबईके गिरगाम चौपाटी इलाके में हथियारोंसे लैस चार युवक अंदाधुंद फायरिंग करते हुये रस्ते में घूम रहे है. जैसे ही हमें इस बारे में ज्यादा जानकारी मिलेगी हम आपतक खबर पहुंचाते रहेंगे..अब वक्त है एक छोटेसे ब्रेक का..ब्रेक के बाद हम हाजीर होंगे इसी सिलसिलेमें और खबरें लेकर.."

यश: आयचा घो..(जीभ चावून) सॉरी..चौपाटीच्या इथे? म्हणजे आयला आपल्या रस्त्यावर पण येतील..पाच मिनिटं पण नाय लागणार त्यांना इथे पोचायला.

बाबा: त्या चायनीजवाल्याला सांग की रस्त्यात जरा जपून ये बाबा.
यश: घाबरता कसले हो बाबा. असल्या गोष्टी इथे होतच असतात. (स्टाईलमध्ये गातो) "ये मुंबई शहर हादसों का शहर है.." (धिचक्यांव..तोंडाने बंदुकीचा आवाज काढतो आणि मोठा घोट मारून ग्लास संपवतो.)

यश ईशाजवळ खाली बसतो.
ईशा: (मोबाईल फोनवरून बोलतेय) "आपल्या इकडे ठीक आहे ना सगळं? …. हो.. मी सेफ आहे एकदम…. …. … यश म्हणून डायरेक्टर आहे आमच्या नाटकाचा त्याच्या घरी आहे. नो नो..मी सगळं शांत झाल्याशिवाय इथून बाहेर पडत नाहीये..ओक्के? कीप इन टच..हो हो.. आणि ते अफवा पसरू नयेत म्हणून फोन जाम करतात. तसलं काही झालं तरी काळजी करू नको. मी सेफ आहे इथे. …उम.. (दबक्या आवाजात) कमऑन आई. यशचे बाबापण आहेत इथे घरी..डोन्ट वरी..चल बाय.. "

यश: सो कॅन वी स्टार्ट?

ईशा: (घोट घेत.) शुअर.. (तोंड वाकडं. खाकरून..) किती स्ट्रॉंन्ग आहे ही.. पण छान आहे..घसा मोकळा होईल मस्त.

यश: एकदम नवीन स्टोरी लाईनसाठी माझ्या डोक्यात गे रिलेशनशिपची थीम होती.

ईशा: कमॉन यश..दॅट गे थिंग हॅज लॉस्ट इट्स फिझ..गॅसबबल निघून गेल्यावर पेप्सी लागते तसा झालाय तो विषय. सगळेच चॅनल त्यांचे डिस्कशन वाले प्रोग्रॅम हॉट व्हावेत म्हणून हे गे आणि लेस्बियन विषय सारखे सारखे चघळायला घेतात.
यश: (चेहरा किंचित पडलेला) मग तुझ्या डोक्यात काय आहे नवीन?

ईशा: (मोठा घोट घेऊन) ..माझ्या मनात आहे स्त्री आणि पुरुष हे नॉर्मल नातंच. पण त्यातली गुंतागुंत दाखवणारी कथा घ्यावी असं वाटतं. म्हणजे त्या नात्यातले पदर, चढाओढ… पॉवर गेम्ज यु नो..लिव्ह इन रिलेशनशिप आणि लग्नाची चर्चा करणारा विषय..

यश: (उपहास..) घ्या..कित्ती कित्ती नवीन आहे गं तुझा विषय..तू इतकी बूर्ज्वा असशील असं वाटलं नव्हतं. तुमची पोरींची लिमिट हीच..येऊन जाऊन लव्ह आणि रोमान्स..रिलेशनशिप म्हणे.. (आवाज जास्त चढा. दारू चढायला लागलेली जाणवतेय.)

ईशा: बघितलंस. मी एक स्त्री आहे. तुझ्या थीमला माझा साधा विरोधही तुला किती दुखावून गेला. कारण तू एक पुरुष आहेस.

यश: नो..नो. खूप पोरी बघूनच सांगतोय. पोरींनी नुसती एक्टिंग करावी हिरोईन बनून. सुंदर दिसावं वगैरे.. त्यापलीकडे जाऊन विचारबिचार करणारी कोणी दिसतच नाही च्यायला…
म्हणून हे मत झालंय असं..(उत्तेजित.. ओरडतोय..)

बाबा: यश..कंट्रोल प्लीज..

यश: (शांत होत..) सॉरी..(तिन्ही ग्लास परत भरतो..बाबा आणि ईशाला देत.) एक बॉटम्ज अप करुया?

बाबा: मला नको बाबा बॉटम्ज अप बिप. मला लागेल ठसका आणि तुला काम पडेल मग.

यश: (ईशाकडे बघून) ईशा..बॉटम्ज अप..

(दोघे आपापले ग्लास तोंडाला लावून एका दमात रिकामे करतात. मग डोळे गच्च आवळून स्ट्रॉंन्ग टेस्ट सहन केल्यासारखा चेहरा करून एकदम हसतात. थोडा ठसका.)

बाबा: (जड आवाजात..) बास आता. तिसरा की चौथा लार्ज आहे हा तुमचा..? मला वाटतं तुझा चौथा आणि तिचा तिसरा.

यश: हेच..हेच.. बुरसट जगणं तुमचं. मोजून पिता..टिपिकल मिडीऑकर..(गातो) गिनकर पिऊं मैं जाम तो होता नही नशा..मेरा अलग हिसाब है..सच बोलता हूं मैं..

बाबा: तुम्हा पोरांना असलेला हा एक मोठा प्रॉब्लेम. मागच्या जनरेशनला तुच्छ समजायचं. मिडीऑकर म्हणे. अरे मध्यम मार्गात राहूनच तुला जन्माला घातला आणि मोठा केला. मिडीऑकर नोकरी सोडून तुझ्या त्या सो कॉल्ड बेफाम जगण्याच्या मार्गावर गेलो असतो तर भिकेला लागला असतास लहानपणीच.

यश: कोणी सांगितलं तुम्हाला मला जन्माला घालायला? तिथेच तुम्ही अडकवून घेतलंत ना स्वत:ला त्या चौकटीत..

बाबा: (उपहास) चुकलं रे बाबा जन्माला घातला तुला ते..माफ कर जमलं तर..

ईशा: (थोडी हसून) यश..काका.. टेक इट ईझी.. कूल इट प्लीज..

यश: (उखडून) तुला काय जातंय गं सांगायला..कूल इट म्हणून? आजपर्यंत तुम्ही स्त्रियांनी केलंय काय? पुरुषांत भांडणं होण्यासाठी कारण तुम्हीच असता आणि नंतर शांत करायला जाण्याचं नाटक करता. एन्जॉय करत असाल ना तुम्ही? मजा येतेय ना?

बाबा: यश तुला चढलीय. इथे एक मुलगी आहे आणि तू वाट्टेल तसं बरळतोयस.

ईशा: (आवाज किंचित जड..) नाही काका. ऐकू द्या मला त्याला काय म्हणायाचंय ते.

यश: (झटपट दोन ग्लास भरून एक ईशापुढे ठेवतो आणि एकाचा स्वत: मोठ्ठा घोट घेतो.) बाबा..मला एकट्यालाच चढलीय असं म्हणायचंय का तुम्हाला? म्हणजे तुम्हाला अजिबातच चढलेली नाही ना? आणि ही तर मुलगी आहे..सायंटीफिक फॅक्ट सांगतो ऐका. बायकांच्या अंगात मसलचं प्रमाण कमी असतं आणि चरबीचं जास्त. म्हणून त्यांना कमी अल्कोहोलमधेच खूप नशा होते…माहित्येय? ओ बाबा..मला एकट्याला नाही..आपल्या तिघांनाही चढलेली आहे. सो आय एम नॉट गिल्टी अलोन.. (पुन्हा मोठ्ठा घोट)

ईशा: आय अग्री..मी पण बरीच हाय झालेय.

(बेल वाजते..)

यश: आलं पार्सल.. मांचुरियन इज नॉकिंग एट द डोअर (दाराकडे जात) ..बाबा पैसे आहेत का सुटे?

बाबा: (खिशात हात घालतात)

(यश दार उघडतो. दारातली व्यक्ती दिसत नाही. पण यश व्हीजिबली घाबरलेला. ईशा आणि बाबा दाराकडे बघतात आणि खूप दचकतात. अर्थात कोणीतरी बंदूकधारी दारात आलेला असतो. जमल्यास त्याची बंदूकयुक्त लांब सावली… नुसताच आवाज येतो.."पीनेको पानी दे दो जरा भाई..")

यश: (टेबलाकडे येऊन जार घेऊन लटपटत्या हाताने ग्लास भरतो आणि दारातून बाहेर देतो. पाणी पिण्याचा प्लोप प्लोप ऑडिबल आवाज. मग एकदम गोळ्यांच्या फैरीचा सतत आवाज. यश उभ्या उभ्या कोसळतो. अर्धवट उभे राहू पाहणारे बाबा आणि ईशाही कोसळतात. ..टी.व्ही.चा आवाज आणि प्रकाश तीव्र होतो. "छोटेसे ब्रेक के बाद हमारा ये रोंगटे खडे कर देनेवाला स्पेशल फीचर जारी रहेगा.. "बंदूक की गोली..खून की होली.. मुंबई ने खेली.. " किंचित धडपड आणि लांब श्वास सोडल्याच्या आवाजासोबत एकदम मोठा ब्लॅकआउट. )
—————-

थोडा मोठा पॉज. किरकोळ स्टेज बदलासाठी..

—————-

स्थळ: स्वर्ग..
(सत्य जग सोडून आल्यामुळे इथून पुढे पात्रांची डायलॉग डिलिव्हरी थोडी नाट्यमय. लांब पॅरेग्राफसदृशभाष्य वगैरे. तीन खुर्च्या रांगेत ठेवलेल्या समोर एक सरकारी असावे तसे टेबल. त्यावर थोड्या फायली आणि एक कॉम्प्युटर..नुसता मॉनिटर दिसावा..ईशा, बाबा आणि यश उभे..तिथे टीव्ही आहेच. त्याचा तसाच फक्त उजेड आणि आवाज. मधेच आवाज मोठा.. )

ब्रेक के बाद हम हाजीर है अपनी खास पेशकश लेके..स्वर्ग की सीढी या पाताल का जीना.. जी..हां..हिमालय में हुई है एक हैरतअंगेज खोज..मिल गयी है स्वर्ग की सीढी..

यश: च्यायला इथे पण टीव्ही?

बाबा: इकडचा स्वर्गातला स्पेशल प्रोग्राम दिसतोय.
(एक पांढरा शर्ट घातलेला साधा कारकून वाटावा असा मनुष्य प्रवेश करतो. )
कारकून: नाही नाही. हा तुमचाच चॅनल आहे. मनुष्य जगात काय चालू आहे त्याच्या रिपोर्टिंगसाठी ऑन ड्यूटी कोणाकोणाला किती पाठवणार…? म्हणून इथे अपलिंक करून घेतलेत चॅनल.

यश:आयला पृथ्वीवरचा टी.व्ही चॅनेल..? अहो पण तिथे तर "खून की होली मुंबईने खेली" असं काहीतरी चालू होतं..

कारकून:(हसून) होय हो..सिग्नल इथपर्यंत पोचायलाच दोन दिवस लागतात. हा जुना प्रोग्राम आहे.
यश: ओ साहेब.. आम्ही यमराजांसाठी वेट करतोय. खूप वेळ झाला.

कारकून: बसून घ्या जरावेळ अजून. गोखलेसाहेब येतील. वेळ झाली आहे त्यांची यायची.

यश: गोखलेसाहेब? आम्ही समजतोय की ते स्वर्ग, नरक की परत गिरगाव ते ठरवण्यासाठी यमधर्म येणार आहेत.

कारकून:(हसतो) अहो साहेब. यमराज ही पोस्ट झाली. सध्या गोखलेसाहेब आलेत त्या पोस्टवर बदलून. तसे यमराज केडरचे बरेच ऑफिसर आहेत हो इथे. एकट्याने थोड्याच निपटणार आहेत सगळ्या केसेस?

यश: आपलं नाव?

कारकून: मी गुप्ते.. चित्रगुप्त म्हणून काम करतो इथे. लक्षात ठेवा. काही अडचण आली तर आम्ही आहोतच इथे..हे हे हे..

यश: हे हे हे.. बरं..

कारकून (गुप्ते): तुम्ही बसा इथेच..
यश: ओके.. थँक्स गुप्तेसाहेब.

(तिघेही खुर्च्यांवर गोल अरेंजमेंट करून बसतात.)

गुप्ते: आले..गोखले साहेब आले..

(मागोमाग एक टिपिकल आयएएस टाईप क्रीमलेयर उच्च सरकारी अधिका-यासारखा सफारी शर्ट घातलेला गोरा घारा मनुष्य प्रवेश करतो.. टेबला मागे जाऊन बसतो.)

यश: नमस्ते सर..

गोखले: बसा बसा..(पी.सी. चा स्क्रीन बघत राहतात. पॉज)

गुप्ते: सर..हे तिघे फर्स्ट रिपोर्टिंगसाठी आलेत.

गोखले: (वर न पाहता) तिघे एकत्र? फॅमिली सुसाईड केस काय?

गुप्ते: नो सर. ती टेररिस्ट कॅटॅगरी सुरु झालीय ना नवीन त्यात एन्ट्री केलीय यांची.

गोखले: अच्छा..(स्क्रीनकडे रोखून बघत..बटणं दाबत..) पण यांना नव्हतं हो उचलायचं.. गुप्ते.. काय कारभार चाललाय हा? इथे आल्यापासून बघतोय..तुमच्या सेक्शनमध्ये पाचशेच्यावर चुका झाल्यात उचलताना. लहान पोरंही आणली आहेत उचलून. कोणी आणलं यांना?

गुप्ते: सॉरी सर..मी बघतो कोण होता ड्यूटीवर ते.

गोखले: आजच्या आज मेमो ठोका कोण आहे त्याला…

गुप्ते: (खालमानेने) येस सर.

गोखले: (तिघांना) आता नीट ऐका. आम्ही हे ब्रीफिंग इथे आलेल्या सर्व आत्म्यांना देतो. यू आर ऑलरेडी डेड. तुमची मनुष्य जन्मातली नावं काहीही असली तरी ती तुम्ही मागे सोडून आला आहात. आता तुम्ही तुमच्या मूळ रूपात आला आहात. आमच्या मूळ रेकॉर्डप्रमाणे यश हा मुळात पुरुष आहे.. ईशा ही आमच्या रेकॉर्डमध्ये प्रकृति आहे.. आणि तुम्ही (बाबांकडे निर्देश करत) सनातन आहात. पुरुष प्रकृती सनातन अशा मूळ आत्म्यांच्या कॅटेगरीज आहेत. तुम्हाला आता स्वतंत्र नाव किंवा स्वतंत्र अस्तित्व नाही.

(यश, ईशा आणि बाबा आ करून ऐकत आहेत)

गोखले: आता इथली प्रोसेस तुम्हाला सांगतो. ठरवून दिलेल्या कोट्याइतके जीव आम्ही परत जगात पाठवतो. कोटा सिस्टीम फक्त माणसांना आहे. बाकीच्या प्राण्यांचा लोकसंख्येचा बॅलन्स चांगला असल्यामुळे त्यांना आम्ही इथे होल्ड करून ठेवत नाही. माणसांना मात्र इथे थांबवून ठेवावं लागतं. कारण तिकडे कॅन्सरसारखी ग्रोथ चाललीय माणसांची. परत पाठवण्याचा कोटा संपला की उरलेल्यांना इकडे ठेवतो. इकडे सगळेजण आत्मरूपात राहतात..फिजिकल एक्झीस्टन्स नसतो. त्यामुळे फूड वगैरे रिसोर्सेस शिवाय इथे कितीही काळ होल्ड करता येतं सर्वांना. पुन्हा पुढचा कोटा मिळेपर्यंत नरकातच ठेवतो त्यांना. परत जाण्यासाठी वेटिंग लिस्ट मोठी आहे.

ईशा: (शंकित) सगळ्यांनाच नरकात ठेवता? आणि स्वर्ग?

गोखले: (थोडे हसून) स्वर्ग ही नुसती एक कल्पना आहे हो..माणूस जिवंत असताना त्याला जगणं सुसह्य व्हावं म्हणून तिथेच त्यांनी बनवलेली. इथे येऊन सगळ्यांनाच थोडा धक्का बसतो स्वर्ग नाही हे कळल्यावर. कारण स्वर्ग हवा म्हणून खूप व्रतं वगैरे केलेली असतात ना जगताना.

बाबा: पण नरक..म्हणजे इथेही हाल अपेष्टाच ना?

गोखले: नाही हो..बघा तर एकदा नरकात फिरून..एकदम खास काही अट्रॅक्षन नाही इथे. पण वाईटही नाही तसा. मुंबईचे न तुम्ही? मग आवडेल तुम्हाला इथे.

यश: आणि ते शिक्षा वगैरे देतात नरकात असं आम्ही ऐकलेलं ते..??

गोखले: अहो कसली शिक्षा द्यायची आणि कोणाकोणाला? कोटींनी माणसं जमली आहेत इथे..सगळ्यांना शिक्षा देत बसायला इथे मॅनपॉवर नको? तुम्ही मरून आलेले लोक लॉजिक खालीच विसरून येता काय?…(पॉज) बरं आता प्रोसिजर प्रमाणे तुम्ही तिघेही मला तुमची परत जायची इच्छा आहे का ते सांगा.

यश, बाबा,ईशा: हो..

गोखले: मग मला तुमचं एक स्टेटमेंट लागेल. तुम्ही तिघेही मला तोंडी स्टेटमेंट ऑफ इंटरेस्ट द्या. तुम्हाला परत का जायचं आहे ते जस्टीफाय करा? ..हो आणि एक गोष्ट..तुम्ही आपल्या जगात जिवंत असताना खोटं बोलू शकायचात कारण मेंदूची यंत्रणा तुमच्याकडे होती. आता तुम्हाला लपवून किंवा खोटं बोलताच येणार नाही. त्यामुळे बोलताना घाबरू नका शब्द का दाबून टाकता येत नाहीयेत म्हणून…

यश: मी पहिल्यांदा बोलणार. पुरुष नेहमीच अग्रेसिव्ह असतो. म्हणून मी पहिल्यांदा बोलणार. न बोललेलं सगळं आता मी बिंदास बोलणार. मला नाटक, सिनेमा अभिनय यांच्यामध्ये खूप उंच जायचंय. माझं लाईफ मिशन आहे ते. त्यासाठी मला परत जायचंय….आणि शिवाय.. ईशा…. सॉरी..प्रकृति.. तुला सांगतो. मला तू पहिल्यांदा दिसलीस तेव्हापासून हवी होतीस. मादी म्हणून हवी होतीस. मला मादी म्हणून तुझ्यापासून माझ्यासारख्याच खूप क्रिएटिव्ह मानवांची निर्मिती करायची आहे.

बाबा: अरे हे काय गलिच्छ बोलतोयस? लग्न कर तिच्याशी. लाईफलाँग कमिटमेंट आहे ती बाळा.

यश: (गोखलेसाहेबांकडे बघून) बघा सर…या जित्याची खोड मेला तरी जात नाही. मला नोकरी लग्न अशा लाईफलाँग कमिटमेंटमध्ये अडकवून तो मलाही त्याच्या सनातन कम्युनिटीत कन्व्हर्ट करून घेणार होता. हा स्वत: ही सुरुवातीला साला नुसता पुरूषच होता माझ्यासारखा. आधी स्वत: बाटला आणि मलाही बाटवत होता हळूहळू. बरं झालं..मेलो आणि सुटलो. मला आता फक्त प्रकृतीसोबत खाली पाठवा. सनातनला ठेवा इथेच.
ईशा: माझं नाव घेतलंय त्यानं तर मी बोलू का थोडं आता? (क्षणभर पॉज..यशकडे बघत) ..पुरुष..गंमत बघ.. तुला मी मादी म्हणून हवी आहे.. आणि मला मात्र तू नर म्हणूनच नकोयस. कदाचित सनातन म्हणतो तसा लग्नासाठी तू चालशील मला.

यश: व्हॉट?

ईशा: येस. क्रिएटिव्ह माणूस काय फक्त तू एकटाच जन्माला घालू शकतोस…? आणि म्हणून तुला मादी हवी? मी म्हणजे फक्त गर्भाशय? माझी त्यात काहीच क्रिएटिव्हिटी नाही? माझे गुण घेऊन क्रिएटिव्ह बाळ तयार होऊ शकत नाही? मादी अग्रेसिव्ह नसते म्हणून तिला क्रिएटीव्हिटी किंवा इच्छा नसतात असा अर्थ नाही होत. तिलाही नरच हवा असतो. पण सर्वात जास्त लायक नर..जंगलच्या कायद्यात तो आपोआप मिळतो. माणसांच्या जगात मिळतोच असं नाही. प्रेमबीम करतात ना माणसं..

यश: सो..? मी नर म्हणून लायक नाही?

ईशा: (फप्प करून राग येईल असे हसत आणि हसू दाबत..) छे..अजिबात नाही..आपल्या जगात श्रेष्ठ असण्यासाठी लागणारी कुठली गोष्ट आहे रे तुझ्यात? बघू जरा तुझी ताकद? (पुढे झुकून त्याचा दंड हातात घेत..) आता काय बघणार म्हणा.. पण जिवंत होतास तेव्हा खरंच होती का ताकद तुझ्या दंडात..आले होते ते अतिरेकी तेव्हा काही उपयोग झाला? वाचवलंस मला? (यशचा पाय चाचपत..छद्मी हसून..) ते जाऊ दे.. पळून जाण्याइतकी तरी ताकद होती तुझ्या पायात?

यश: (आणखी डाऊन. पण चिडत चाललेला..)

ईशा: ओके..ती ताकद जाऊ दे. जे काही हवं ते मिळवणारा नर आहेस तू? आपल्या त्या माणसांच्या जगात जे काही हवं ते मिळवायला पैसा आधी लागायचा. त्या पैशातच खूप शक्ती होती. होतास का तू पैसेवाला शक्तिशाली नरपुरुष?

यश: (असह्य होऊन) स्टॉप इट यू बिच..
ईशा: बिच नाही..प्रकृति म्हणतात मला…मुखवटा काढल्यावर लगेच ऐकवत नाहीये ना मी म्हणते ते?..माणूस म्हणून जीव होता माझ्यात तेव्हा "गुड गर्ल" इमेजमध्ये होते ना..असलं काही बोलायची नाही मी. सबमिसिव्ह होते. तेव्हा छान वाटायचे ना मी तुला?? ..तुझ्यासारख्या प्रत्येक नराला जास्तीत जास्त माद्या हव्या असतात. आणि बॅडलक असं की जास्तीत जास्त माद्यांशी जास्तीत जास्त सेक्स करण्याला ताकद समजलं जातं त्या तिथल्या जगात. आत्ता मी माझ्या मूळ रूपात आहे म्हणून मला माझ्या सगळ्या गरजा समजताहेत. मी एकदा ईशा किंवा आणखी कोणीतरी बनून जगायला लागले की तू आणि सनातन मिळून मला हळूहळू पुन्हा एक बाई बनवून टाकाल. मग मी विसरून जाईन सगळं. मी आत्ताच सांगते मला परत जगायचंय ते सर्वात उच्च प्रतीची संतती निर्माण करण्यासाठी. मला सर्वोत्कृष्ट नर पाहिजे. हा (यशकडे निर्देश) नको. हा नुसती नाटकं टी.व्ही सिरियल्स जन्माला घालत बसेल. मला मनुष्य जातीचीच निर्मिती करायची आहे. ..

गोखले: प्रकृति.. झालं तुमचं बोलून?

ईशा: नो सर.. अजून एक..मादी म्हणून माझ्या गरजा मी जरी खूप स्पष्ट सांगितल्या तरी तुम्ही जर मला मनुष्य जन्म दिलात तर तिथे मी फक्त मादी म्हणून जगू शकत नाही.. जसा हा पुरुष फक्त एक नर म्हणून जगू शकत नाही. मनुष्य हा फक्त प्राणी नाहीये सर..तो अजूनही खूप काही आहे. माणूस म्हणून जगताना रीप्रॉडक्शन शिवायही ज्या खूप सुंदर गोष्टी करायच्या असतात त्या काय फक्त पुरुषाने? मी मादी आहे म्हणून माणूसपणाच्या सगळ्या गोष्टींमध्ये मला जागा नाही? हे मला नको. मी ही सर्वोच्च चित्रकार होऊ शकते..माझ्या कथेवरही यशस्वी नाटक बनू शकतं. हा पुरुष म्हणजे काही सर्वव्यापी नव्हे..मला आयुष्यात सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. खूप आनंदात जगायचंय.. प्रकृति म्हणजे जन्म, समृद्धी, भरभराट आणि नाश सुद्धा.. आणि भरभराट म्हणजे अगदी भरपूर पैसा सुद्धा..मला श्रीमंतीत आयुष्य जगायचंय..याच्या यू.के. यू.एस. मधल्या मित्रांसारखं..मला एक संपूर्ण मनुष्य म्हणून संपूर्ण आयुष्य जगण्यासाठी परत जायचंय..
गोखले: …गुप्ते.. रेकॉर्ड करताय ना?

गुप्ते: हो सर..

गोखले: नीट लक्ष द्या आणि ज्याचं स्टेटमेंट त्याच्याच फाईलला जोडा बरोबर…पूर्वी एकदा घोळ घालून सगळी घाण करून ठेवली आहे तुम्ही. ओके..(यशकडे निर्देश) तुम्ही बोला..आणि आता एकेक करून बोला.. सगळे एकदम नको.

यश: काय बोलू..हा सनातन माझ्यासोबत पुन्हा जगायला आला तर मला कधीच मनासारखं जगू देणार नाही.

गोखले: (इन्टरेस्ट वाटायला लागल्या प्रमाणे..) सॉरी टू इंटरप्ट पुरुष.. मनासारखं म्हणजे कसं ?
बाबा: (उसळून) म्हणजे दमडी न कमावता नाटक सिनेमाच्या नादाला लागून भणंगासारखं उंडारायचं. सगळ्या मजा हव्यात पण जबाबदारी कसलीच नको.

गोखले: (बाबांना थांबवत..यशकडे निर्देश)थांबा..त्यांना बोलू द्या..

यश: हा सनातन असं सगळं बकतोय कारण मला अजून स्वत:ला सिद्ध करायला वेळच मिळाला नाहीये.

बाबा: घ्या.. वेळ नाही मिळाला म्हणे.. तीस वर्षं उलटली होती आपली मेलात तेव्हा.

यश: (संतापून ओरडून..) मी वर्षांत मोजत नाहीये माझा काळ गोखलेसाहेब..(स्वप्नाळू टोन) एक दिवस मी स्वत:चं नाटक मोठ्या स्टेजवर आणीन..त्याला कितीही दिवस लागले तरी चालतील. पूर्ण लाईफ गेली त्यात तरी चालेल साली..(एकदम सिरीयस) मला सगळेच फालतू समजतात हे मला कळतं. मला कॉलेजची चार पोरं मान देत असली तरी माझी जगातली इमेज एक उल्लू बेकारतुंबडी भणंग आणि या (बाबांकडे निर्देश) बापावरचं बांडगूळ अशीच आहे. हे मला माहीत आहे. नीट माहीत आहे. (भावना तीव्र होऊन रडण्याचा टोन) हक्काने मागत होतो बाबांचे पैसे. वाटलं की ती एक हक्काची जागा आहे आपल्याला. कारण नाटकाचा डायरेक्टर बनायचं माझं स्वप्न माझ्या रक्तात गेलं होतं. ..
बाबा: (यशचं बोलणं थांबवत..थोडे भावनाशील) अरे इतकं होतं मनात नाटकाचं वेड तर त्यासाठी पैसा उभा करायला तरी नोकरी करायची. एकीकडे नोकरी लग्न करूनही हे करता आलं असतं ना?

यश: नो..(ओरडून) नो..मी सुद्धा जग बघत होतो. एम आय मेड आउट ऑफ स्टोन? …(पॉज) मला दिसत होते माझे सगळे मित्र जे खूप पुढे निघून गेले जगण्याच्या रेसमध्ये. ही प्रकृती आत्ता मला खिजवण्यासाठी म्हणाली ना..ते मित्र.. ते यूएस. यूके. ला राहतात. तुमच्याइथे स्वर्ग नाही गोखले साहेब..पण तिथे ते माझे मित्र स्वर्गाहून सुंदर महाल बांधून राहताहेत. त्यांनी स्वत:ची स्टेबिलीटी मिळवली. पण त्यातल्या एकानेही आपलं खूप खूप खोल रक्तात असलेलं स्वप्न पूर्ण केलं नाहीये. पूर्ण करणं सोडा, त्याचा पाठलाग सुद्धा केलेला नाहीये. त्यांना आज सगळे यशस्वी म्हणून समजतात. पण स्वप्न मारून यशस्वी झालेत ते. …ओ बाबा..तुम्हीही मारलीत तुमची स्वप्नं बाबा..चित्रं काढायचात तेव्हा रात्रभर झोपायचा नाहीत. मी बघितलंय लहानपणी. पण त्यात पैसा मिळत नाही ना..मला वाढवायचं, आईला सांभाळायचं म्हणून जीव घेतलात ना तुमच्यातल्या चित्रकाराचा..? कशाला केलंत लग्न? चित्रं काढायची बंद केलीत..नंतर संसार केलातही..पण तशी पेंटिंगवाली रात्र जगलात परत कधी ?

(बाबा किंचित स्तब्ध..निरुत्तर..भावनाशील.. पॉज)
यश: ओ गोखले साहेब..मला पैसा नको..घर नको..काही नको..लाईफ लाँग सिक्युरिटी मिळेल त्याने..पण मला इतकं लाँग लाईफसुद्धा नको. ज्या क्षणी माझं मला स्वत:ला समाधान देणारं सर्वोच्च नाटक स्टेजवर संपेल..आणि लोक उभे राहून टाळ्या वाजवतील..तो एक क्षण मला बास आहे. त्या एका क्षणापुरता मी त्या सर्व स्वर्गीय महालांच्या मालकांपेक्षाही श्रीमंत असेन. सतत चालू राहणा-या थोड्या थोड्या सुखाची हाव मला नाही..सर्वोच्च सुखाचा एकच क्षण हवाय मला. बस त्यासाठी मला परत पाठवा.

गोखले: सनातन..आपल्याला काय म्हणायचंय?

बाबा ऊर्फ सनातन: (सावरून) या दोन्ही पोरांनी खूप नाटकी शब्दात खूप बोलून दाखवलं. पण सर..यातल्या कुठल्याच रीतीने आयुष्य पूर्ण जगून पलीकडे जाता येत नाही. ही पोरं भाबडी आहेत..एकदम आदर्शवादी..हा माझा मुलगा होता..आणि तो मला नेहमी सायंटीफिक भाषेत गोष्टी समजवायचा..मला..स्वत:च्या बापाला..आता मी सांगतो सायंटीफिक भाषेत. या पुरुष आणि प्रकृतिमध्ये अणुपेक्षाही जास्त एनर्जी आहे. अणुभट्टीत स्फोट होऊ नये म्हणून ग्राफाईट रॉड ठेवतात. त्यामुळे जास्तीची उर्जा शोषली जाते आणि विनाश टळतो. याला शहाणपणा म्हणतात. सबुरी म्हणतात. जी अनुभवानेच आलेली असते. अशाच एखाद्या होऊन गेलेल्या स्फोटांनंतर आलेली असते. इलेक्ट्रोन आणि प्रोटोन कितीही आवेगाने एकमेकांना आकर्षित करत असले तरी न्यूट्रोन्स तिथेही असतात. त्याशिवाय अणुला गाभा नसता मिळाला..आणि तो अस्तित्वातच नसता आला. जगाचं अस्तित्व टिकून राहिलं तरच पुरुष आणि प्रकृति आहेत. आणि ते अस्तित्व टिकावं म्हणून लागणारी संहिता..कायदे..श्रद्धा..सबुरी..अनुभव..सगळं म्हणजे मी आहे..सनातन..या दोन शक्तींना कंट्रोल करून सतत टिकवून ठेवण्यासाठी मला जिवंत राहिलंच पाहिजे. कोण जाणे नाही कंट्रोल केला तर माझा पोरगा त्याची अनिवार उर्जा बाहेर काढायला म्हणून त्या आमच्यावर गोळ्या झाडणा-यांतला एक बनायचा.
(स्तब्ध शांतता)

गोखले: ठीक आहे. अजून कोणाला काही बोलायचंय का?

(यश,बाबा आणि ईशा स्तब्ध..निरुत्तर)

गोखले: (यश,बाबा आणि ईशाकडे बघून..) आपण जरा बाहेर थांबा..

(गोखले आणि गुप्ते दोघेच शिल्लक)

गोखले: ओके..गुप्ते..यांना सध्या ट्रांझिट ब्लॉक "ए" मध्ये ठेवा. एररवाली केस असल्यामुळे यांचा निकाल लगेच लावायला पाहिजे. नाहीतर ऑडिटमध्ये प्रॉब्लेम येतील नंतर.
गुप्ते: कुठे टाकू यांना मग? एकत्रच पाठवू का रिटर्न?

गोखले: अजून बॉडीज उचलल्या नसतील तर आहेत त्याच शरीरात परत पाठवून द्या. एकदम अर्जंट.. हे तिघे एकमेकांना इतके परफेक्ट मॅच आहेत की त्यांच्या पोझिशन बदलायची गरज नाही. हे तिघे एकत्र असले की परफेक्ट बॅलन्स होईलच.
गुप्ते: बॅलन्स? कसा होईल बॅलन्स सर ? हे दोघे तर एकदम मिसमॅच दिसतात. तो पोरगा असा नाटकवेडा आणि पोरगी तर एकदम डिमांडिंग..

गोखले: गुप्ते, नीट बघा ना..हा पोरगा खूप स्वप्नाळू आहे आणि त्याच्यात धमकही आहे. ती पोरगी पण टोकाची एम्बीशियस आहे..पण तिच्या इच्छा मटेरिआलीस्टिक आहेत. ती त्या पोराला त्याचं स्वप्नही पूर्ण करू देईल आणि त्याला उध्वस्त फकीर होण्यापासूनही वाचवेल. आता तो नुसतीच स्वप्नं बघतोय. ही त्याच्या आयुष्यात आली की तिला जिंकण्यासाठी तो आपला जीव ओतून खरंच बनवेल सर्वात सुंदर नाटक..आणि त्याच्या वेड्या स्वप्नांसोबत राहून ती पोरगीही थोडी स्वप्नाळू होईल..दोघेही सांभाळतील एकमेकांना. आणि कुठे घसरलेच तर सनातन आहेच..अडचण आली की तो दाखवेल त्यांना जगण्याचे कायदे..रूल्स..(हसतात)
गुप्ते: ओके सर..

गोखले: वेळ घालवू नका आता जास्त..त्यांना आहेत तसे लगेच परत पाठवून द्या. आणि आपल्या पुढच्या प्रोसेसमध्ये असा रूल घाला की कोणालाही उचलताना पुरुष, प्रकृती आणि सनातन हा बॅलन्स बिघडणार नाही याची जितकी शक्य होईल तितकी काळजी घ्या. एक सनातन घरातून उचलताना नवीन सनातन तयार झाला आहे याची खात्री करून घ्या. या यशला सनातन व्हायला अजून खूपच वर्षं लागतील. तेव्हा त्याच्या बापाला एक्सटेन्शन द्या. त्याची गरज आहे घरात.

गुप्ते: यस सर.

गोखले: आणि परत पाठवण्यापूर्वी जेव्हा त्यांची मेमरी इरेज कराल तेव्हा तो पोरगा आणि पोरगी यांचं एकमेकांशी जमेल असं सेटिंग करता येतंय का बघा. मेमरीरायटर घेतलाय बजेट काढून त्याचा उपयोग करत जा जरा अशा केसेस मध्ये…

गुप्ते: यस सर..

गोखले: (पी.सी. स्क्रीनकडे जाऊन.) हं..पुढचे कोण आहेत ते? (स्क्रीनवर वाचत..). मिस्टर एंड मिसेस सुरवसे. यांचं काय आहे?

गुप्ते; कपल सुसाईड.

गोखले: वय पासष्ट आणि साठ..आणि कपल सुसाईड? गुप्ते.. (चिडून)..बघा पुन्हा दोन सनातन उचललेत एकत्र.. आता कोण आवरणार त्यांच्या घरातल्या पुरुष आणि प्रकृतीला..?
(ब्लॅक आउट हळू हळू सुरु..)

गुप्ते: सॉरी सर..

गोखले: सॉरी काय सॉरी…. बोलवा आत त्यांना..
(ब्लॅक आउट)
………………
..अंधारात सायरनचे आवाज.. अम्ब्युलंस आणि पोलीस दोन्हीचे सायरन..अंधारातच एका पोराचा नुकताच फुटलेला घाबरलेला एक्सायटेड धापा टाकत आवाज "साब इन लोग ने हमारे हॉटेलसे खाना ऑर्डर किया था.. मैं पार्सल लेके इनके घर गया तो दरवाजा खुला था और ये तीन लोग जमीन पर खून में पडे हुए दिखे.."….सायरनचा साउंड इफेक्ट..परत परत..

पॉज..काही काळ गेल्याचं दाखवण्याइतका..

…………………

(रिकामे स्टेज उजळते. पाचेक सेकंदांनी गोखले प्रवेश करतात. मागोमाग गुप्ते. )

गोखले: काय झालं हो त्या पुरुष प्रकृती सनातनवाल्या केसचं..

गुप्ते: केली क्लोज सर.

गोखले: गुड..पण काय झालं काय त्यांचं पुढे. केस रेकॉर्ड बघू जरा.

गुप्ते: सर..रेकॉर्ड आहे त्यांच्या फोल्डर मध्ये. पण ते कशाला बघताय..टी.व्ही. वर दिवसभर तेच चाललंय. (टी.व्ही.कडे निर्देश) ही बघा लेटेस्ट दोन दिवसांपूर्वीची न्यूज..
गोखले: बघू जरा..आवाज वाढवा.

(दोघे टी.व्ही.कडे बघू लागतात. टी.व्ही. चा आवाज मोठा..खास "न्यूजवाल्या" आवाजात) जी हां.. हम आप को दिखा रहे है वो हैरतअन्गेज तस्वीरें जो दिखाती है एक बाप, बेटा और बहू की कहानी जो गोलीयों की बौछार में भी जिंदा बच गये. यश और ईशा नाम के एक दंपती और उनके वृद्ध पिता पर कल रात आतंकीयोंने अंदाधुंद गोलियां चलायी. लेकीन जख्मी और बेहोश हालत में भी इन तीनों ने दी मौत को मात.. और उन्हे बचाया एक चायनीज हॉटेलवाले डिलिव्हरी ब्वायने.. अभी ये तीनो जांबाज आयईएम अस्पताल में दाखिल है. बताया जाता है की उनकी हालत नाजूक है. इसी सिलसिले में और खबर लेके हम हाजीर होंगे इस ब्रेक के बाद.. देखते रहिये हमारा फीचर "जेको राखे साईयां मार सके ना कोय". ब्रेकपर जाने से पहले हम आप को बता दें की आज रात आठ बजे इसी घटना पर आधारित स्पेशल फीचर देखना मत भूलिये. "क्या है यश और ईशा के रिश्ते की सच्चाई? क्या वे असल में पती-पत्नी है?" हमारे खास संवाददाताने किया हुआ सनसनीखेज खुलासा. देखिये हमारी एक्सक्लुझिव्ह पेशकश "पिता, पती, और वो..!!" रात आठ बजे सिर्फ आपतक पर..

(गुप्ते आणि गोखले गुंग झाल्यासारखे, आश्चर्याने नव्हे, आ करून एकटक एडीक्ट असल्याप्रमाणे टी.व्ही.कडे पहात आहेत. आवाज फेड होत होत फायनल काळोख..)

नाट्यभाषावाङ्मयआस्वाद

प्रतिक्रिया

किसन शिंदे's picture

21 Apr 2011 - 12:54 pm | किसन शिंदे

हुश्श, दमलो बुवा.... ;)

ईशा: हाय यश..(आत पाऊल टाकते.. तेवढ्यात टी.व्हीतून उत्तेजित बातमीदाराचा मोठ्ठा आवाज येतो. "अभी अभी हुआ है नोईडा यौन उत्पीडन कांड में एक सनसनीखेज खुलासा. ..देखते रहिये हमारी अगली पेशकश..रिक्षा में लैंगिक शिक्षा.. " ..आवाज किंचित फेड..ईशा व्हिजीबली ऑकवर्ड…) :D :D :D :D

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

21 Apr 2011 - 12:55 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

व्वाह!! गवि!! पुर्ण वेळ खिळवून ठेवलत!
काय लिहीलय!!
टोटल फिदा!!
__/\__

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

21 Apr 2011 - 12:57 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

दोन दोन वेळा तेच तेच कसे आले हे???
पण तरी असुदे.
गवि परत एकदा तुम्हाला __/\__ हो!!

प्रास's picture

21 Apr 2011 - 5:26 pm | प्रास

मजा आली. एका दमात समजून घेऊन वाचणे खरोखरच कठीण आहे पण जमलेय.

तुमच्या ब्लॉग वर आधी ही एकांकिका वाचलेली पण पुनःप्रत्ययाचा आनंदही काही औरच असतोय हेच खरं :-)

तुमच्या ब्लॉग वर आधी ही एकांकिका वाचलेली पण पुनःप्रत्ययाचा आनंदही काही औरच असतोय हेच खरं

ऐसाईच्च बोल्ताय.

वपाडाव's picture

21 Apr 2011 - 6:34 pm | वपाडाव

दैवदयेनं तुमचा ब्लॉग या पुर्वी वाचला नाहीये..
म्हणुन सगळं कसं ताजं-ताजं पैल्या धारेचं वाट्टंय...

चान... सुरेख... पन लै टैम लागला...
अन थकवा बी...२ ग्लुकोजचे ग्लास रिचवले...

गवि's picture

25 Apr 2011 - 3:31 pm | गवि

दैवदयेनं तुमचा ब्लॉग या पुर्वी वाचला नाहीये..

वाचलात वपाडाव.. न वाचाल तर वाचाल ;)

म्हणुन सगळं कसं ताजं-ताजं पैल्या धारेचं वाट्टंय...

हे रम.. .. आपलं .. हे राम.. ;)

चान... सुरेख... पन लै टैम लागला...
अन थकवा बी...२ ग्लुकोजचे ग्लास रिचवले...

अयायाया.. ग्लुकोज "चढवायला" नाही ना लागले.. क्षमा करा हो.. आता बरे आहात ना? ;)

चढवणे-उतरविणे ह्या मुलभुत कला आहेत...
त्याकरिता कुणाचीही गरज भासत / सहाय्य लागत नाही....

स्मिता.'s picture

21 Apr 2011 - 6:46 pm | स्मिता.

बरीच मोठी नाटिका आहे पण मस्त जमून आलीये.
लिहितानाचा वेग आणि इफेक्टस् इतके हुबेहूब मांडले आहेत की हे सर्व समोर स्टेजवर बघतेय असं वाटलं.
मस्तच... आणखी येऊ द्या असंच.

नाटक छानच!
यशने हे सादर केलं तरी हिट्ट होइल.

पिंगू's picture

22 Apr 2011 - 3:14 am | पिंगू

नाटक हिट्ट आहे रे गवि..

- पिंगू

अन्या दातार's picture

22 Apr 2011 - 3:30 am | अन्या दातार

शॉल्लीट हो गवि! काय भारी सुचतं हो तुम्हाला, मस्त आहे.

रामदास's picture

22 Apr 2011 - 8:55 am | रामदास

टप्पा पडल्यावर अपेक्षीत उंची मिळाली नाही.अ गुड डिलीव्हरी .ओव्हरऑल.
अणुभट्टीत स्फोट होऊ नये म्हणून ग्राफाईट रॉड ठेवतात. त्यामुळे जास्तीची उर्जा शोषली जाते आणि विनाश टळतो. याला शहाणपणा म्हणतात. सबुरी म्हणतात. जी अनुभवानेच आलेली असते
हे खास आवडलं .

हेहे :)

पर्फेक्ट पकडलेत रामदासकाका.

एक प्रयोग करुन पाहात होतो.

मलाही वाटलं तसंच, तुम्ही म्हणताय तसंच.

धन्यु..

सविता००१'s picture

22 Apr 2011 - 9:56 am | सविता००१

लई भारी आहे

स्पा's picture

22 Apr 2011 - 10:00 am | स्पा

वा गवि तुस्सी छा गये

सुहास झेले's picture

22 Apr 2011 - 10:54 am | सुहास झेले

अप्रतिम.... !!

मस्त जमून आलंय स्पेशल फीचर...

गवि, तुमच्या ब्लॉगवर वाचलेलं आहे, तरी पुन्हा वाचायला मजा वाटली. मस्त एक्दम.

आम्हाला मुलींना असली कडक ड्रिंक्स घ्यायचा चान्स कधीच येत नाही. आवडेल मला ट्राय करायला.

(बाबा आणखी नाराज.

बाबा नाराज...उगाच शेअरिन्ग करायला आलि.....

RUPALI POYEKAR's picture

25 Apr 2011 - 5:04 pm | RUPALI POYEKAR

छान जमलय हो