'ट्रेसी चॅपमन'

प्रास's picture
प्रास in जनातलं, मनातलं
3 Mar 2011 - 11:41 pm

खूप वर्षांपूर्वी टीव्ही वर पाहिलेला एक 'ग्रॅमी अ‍ॅवॉर्ड'चा प्रोग्राम अचानक आठवला. वय लहान, अगम्य भाषा, शब्द फक्त दोन समजतायत, 'फास्ट कार' पण लक्षात राहतेय केवळ अप्रतीम संगीत आणि एक जबरदस्त आवाज....

हे ऐकताना अगदी मोहून गेल्यागत झालेलं....

गायिका होती 'ट्रेसी चॅपमन' आणि गाणं होतं "फास्ट कार".

संपूर्ण व्हिडिओ मध्ये एक गंभीर बाई, कुठलाही भडकपणा न करता आपल्या संगीतात ऐकणार्‍याला झुलवत ठेवतेय असं काहीसं जे तेव्हा जाणवलेलं ती भावना आजही कमी झालेली नाही....

तुम्हाला काय वाटतं....?

http://www.youtube.com/watch?v=Orv_F2HV4gk

ट्रेसी मूळची क्लीव्हलँडची. एकट्या आईने वाढवलेली. गरीबीतही तिची संगीताची आवड तिच्या आईने जोपासली. शाळेत खास वर्गासाठी ती निवडली गेली आणि तिच्या प्रतिभेला एक चांगली वाट मिळाली. शिक्षणाचं महत्त्व जाणणार्‍या ट्रेसीने ट्रफ्ट विद्यापीठातून कला शाखेत पदवी मिळवली. याच विद्यापीठाने पुढे तिच्या सांगितिक आणि सामाजिक योगदानासाठी मानद डॉक्टरेट दिली.

वयाच्या आठव्या वर्षापासूनच ट्रेसी गाणी लिहायला लागली. ट्रेसीची सर्व गाणी तिने स्वत:च लिहिलेली आहेत आणि संगीतही तिचेच आहे. ती स्वत: गिटार फार छान वाजवते. तिच्यातली गीतकार सामान्यांच्या जीवनातील अनुभवांना कवितेचे रूप देते तर तिच्यातली संगीतकार त्या कवितेला गाणं बनवते जे जनसामान्यांच क्रांती-गीतच बनून जातं.

ट्रेसी चं "Talkin' about a Revolution" हे गाणं खरोखर क्रांतीचं 'अ‍ॅन्थम' बनण्याइतकं सुंदर आहे.

जरूर ऐका....

http://www.youtube.com/watch?v=7rZbvi6Tj6E&feature=related

ट्रेसी चापमन एक जबरदस्त कवयित्री आहे. ती अत्यंत संवेदनशील व्यक्ती आहे. प्रेमाच्या नात्यातील चढ-उतार यांची तिला जाणीव आहे. प्रेमीजन कधी काही कारणांनी दूर जातात आणि काही काळाने पुन्हा जवळही येतात. अशांच्या भावभावनांच्या कल्लोळांचे विचार ती इथे किती हळूवारपणे व्यक्त करते ते "Baby can I hold you" या तिच्या अत्यंत लोकप्रिय गाण्यातच ऐका.

http://www.youtube.com/watch?v=kjRo_CHSdt0&feature=related

तसेच काहीसे विचारही इथे "Give me one reason" या गाण्यात ऐकण्यासारखे आहेत.

http://www.youtube.com/watch?v=y2kEx5BLoC4&feature=related

ट्रेसी मधली कवयित्री वाढत्या वयाची मुलं असलेल्या आईच्या भावना "Sing for you" या गाण्यात फार छान व्यक्त करते. यातले शब्द आणि त्याबरोबरचं ते डू डू डू.... फारच सुंदर परीणाम करून जातं तेव्हा जरा इथेही कान द्या.......

http://www.youtube.com/watch?v=90oKvAhO25A&feature=related

समाजामधल्या अपप्रवृत्तीन्च्याविरुद्ध ती स्वत:च्या गाण्यांमधून आणि कवितांमधून आवाज उठवते. तिच्या शब्दांनाच अशा वेळी धार येते आणि कोणत्याही वाद्य-संगीताशिवाय तिचा आवाज या अपप्रवृत्तींवर घाव घालू लागतो.

याचं मूर्तीमंत उदाहरण तिचं "Behind the wall" हे गाणं आहे. यातील शब्द न शब्द समाजातील घरगुती हिंसेच्या (Domestic violence) प्रवृत्तीवर आसूड ओढू लागतो.

ऐकाच........

http://www.youtube.com/watch?v=1iUoqTaowaI&feature=related

समाज कुठेही असला तरी त्यातील स्त्रियांची स्थिती काही फार वेगळी नसते, मग तुम्ही भारतात असलात, युरोपात असलात किंवा अमेरिकेत.... ट्रेसी आपल्या एका गाण्यात हेच अधोरेखित करते.

कधीही केव्हाही स्त्रीकडे तिची स्वत:ची अशी एकच गोष्ट असते आणि ती म्हणजे तिचा आत्मा! या आत्म्यावर तिच्याशिवाय इतर कोणाचाही अधिकार नसतो. पण ती स्वत:च हे विसरते आणि जीवनातील अनुभवांचे टक्के-टोणपे खाल्यानंतर तिला पुन्हा हे ज्ञान होते. अशी स्त्री आपल्या मुलीला मात्र आधीच याची जाणीव करून देते आणि ज्या अनुभवांतून तिला जावं लागलेलं असतंय त्यापासून जाणीवपूर्वक दूर ठेवायचा प्रयत्न करते. हे सर्व सांगताना ट्रेसीचे शब्द आणि संगीत अगदी काळजाला हात घालतात.

http://www.youtube.com/watch?v=CoNtYC_XDC8&feature=related

सॅन फ्रॅन्सिस्को मध्ये राहणारी ट्रेसी आजही अनेक ठिकाणी सामाजिक कार्यांसाठी आपले कार्यक्रम करते. मात्र तिने आपले व्यावसायिक आणि खाजगी आयुष्य यांची सरमिसळ केलेली नाही. ट्रेसीसारखे कलाकार आपल्या शब्दांनी आणि सूरांनी आपलं जीवन खरंच खूप समृद्ध करत असतात. ट्रेसीची गाणी ऐकल्यावर तुम्ही नक्कीच माझ्याशी सहमत असाल याची खात्री आहे.

कलासंगीतआस्वाद

प्रतिक्रिया

आत्मशून्य's picture

3 Mar 2011 - 11:43 pm | आत्मशून्य

.

ट्रेसी चापमन एक जबरदस्त कवयित्री आहे. ती अत्यंत संवेदनशील व्यक्ती आहे. एका आईचे आपल्या लहानग्या बाळाप्रति असलेले विचार ती इथे किती हळूवारपणे व्यक्त करते ते "Baby can I hold you" या तिच्या अत्यंत लोकप्रिय गाण्यातच ऐका.

http://www.youtube.com/watch?v=kjRo_CHSdt0&feature=related

तसंच एका आईच्या हृदयातील आपल्या बाळाच्या भवितव्याबद्दलचे विचारही इथे "Give me one reason" या गाण्यात ऐकण्यासारखे आहेत.

http://www.youtube.com/watch?v=y2kEx5BLoC4&feature=related

बाळाबद्दल?????

नक्की गाणे ऐकले आहे का? की अजूनही "Baby" ह्या शब्दाशिवाय काही कळत नाही?
Tracy Chapman छानच गाते, पण इंग्लिश गाण्यात Baby हे बाळासाठीच वापरतात असे नाही.

गोगोल's picture

4 Mar 2011 - 12:30 am | गोगोल

प्रास यांचे लेख छान असतात. पण यावेळी लिरीक्स टँजट गेलेले आहे. ही गाणी बाळाबद्द्ल नसून प्रियकराबद्दल आहेत. बाळाच्या भवितव्याचा तर काहीच सम्बध नाही.

मेघवेडा's picture

4 Mar 2011 - 1:39 am | मेघवेडा

ही गाणी बाळाबद्द्ल नसून प्रियकराबद्दल आहेत. बाळाच्या भवितव्याचा तर काहीच सम्बध नाही.

+ २. हेच गाणं बॉयझोननी केलं होतं ना? ते ऐकून नि बघून तर हे गाणं बाळाबद्दल असेल असं अजिबात वाटत नाही! :) रोनान कीटिंगनं बॉयझोनमधून बाहेर पडल्यावर पुन्हा एकट्यानं हे गाणं केलं होतं. तसंच हे गाणं डॅरियसनंही परफॉर्म केलं होतं एकदा कुठंतरी.. व्हिडिओ मिळत नाहीये पण माझ्याकडे एम्पी३ आहे. इतकी वर्षं ऐकतो आहे हे गाणं पण कधीच वाटलं नाही की एखाद्या आईनं बाळासाठी म्हटलेलं गाणं आहे हे! नसावंच.. :)

बाकी ट्रेसीचं वुड यू चेंज अतिशय आवडतं. छान अर्थपूर्ण गाणं आहे! :)

प्रास's picture

4 Mar 2011 - 2:06 pm | प्रास

येस्स... एकदम मान्य.... माझा काहीतरी जाम गोंधळ झालेला खरा.... कदाचित डोक्यात झालेल्या गाण्यांच्या गर्दीने विचार भरकटवले म्हणा ना.... नव्याने लिखाण करून लेख सुधारलाय.... आशा आहे बदल आवडेल....

चुकांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून निश्चित प्रयत्न करेन.....

जाता जाता संपादक मंडळाचेही आभार..... त्यांनी संपादनाची सोय उपलब्ध करून दिली नसती तर असे बदल करणेही शक्य झाले नसते.....

पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद!

मुक्तसुनीत's picture

4 Mar 2011 - 12:32 am | मुक्तसुनीत

लेख अतिशय आवडला. पाश्चात्य संगीतातल्या मर्माची ओळख अशा पद्धतीने करून देणारे लिखाण आपल्या भाषेत विरळा आहे. असेच आणखी संगीतकारांबद्दल लिहिलेत तर आनंद होईल.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

7 Mar 2011 - 10:43 pm | निनाद मुक्काम प...

तेच म्हणतो मी

वेदनयन's picture

4 Mar 2011 - 1:34 am | वेदनयन

अगणीत पारायणे केलित आजपर्यंत...

हटके आवाज, कसलाही डामडौल नाही, सर्व गाणी स्वतः लिहिलेली, आणी प्रत्येक गाणं म्हणजे एक सुरेख कविता... क्या बात है!!!

गवि's picture

4 Mar 2011 - 6:48 am | गवि

Great..

Drivin in your car, speed so fast felt like I was drunk
City lights they lie before us..n your arm felt nice wrapped 'round my shoulder..

Got a feeling that I belong.. Highly high..
Got a feeling I could, be someone..be someone..

...

Youve got a fast car.
Is it fast enough so you can fly away..
You got to make a decision.
Leave tonight or live n die this way..

Thanks for reminding beautiful song..

इन्द्र्राज पवार's picture

8 Mar 2011 - 10:37 am | इन्द्र्राज पवार

"...मात्र तिने आपले व्यावसायिक आणि खाजगी आयुष्य यांची सरमिसळ केलेली नाही. ..."

~ इतक्या सुंदर लेखातील हे खटकलेले वाक्य, ज्याचे लेखाच्या मूळ उद्देशाशी काहीही घेणेदेणे नाही, नसते. ट्रेसीने गायलेली गाणी (अन् त्यातही त्यातील शब्द...) याचाच अनुभव इतका हृदयस्पर्शी आहे की रसिकाला मग तिच्या (तिच्याच काय, पण अशा प्रत्येक मनस्वी कलाकाराच्या) खाजगी आयुष्यात डोकावून पाहाण्याची किंचितही गरज नसते.

मागे एकदा (अन्यत्र) अशीच एक चर्चा चालू होती आणि चर्चाविषय होते पंडित रविशंकर. त्यांच्या कलेविषयी भरभरून भाग घेणारे बोलत असतानाच एकाने अकारण तिथे "नोरा" चा विषय काढून सगळ्या चर्चेला अकारण वेगळे वळण दिले आणि पंडितजी खाजगी आयुष्यात कसे चुकले वगैरे वगैरे. अशी कित्येक उदाहरणे आहेत.

असो. तुम्हास एवढ्यासाठीच हे सांगत आहे की, तुम्ही पाश्च्यात संगीत परंपरेची जी लेखमाला प्रभावीपणे इथे देत आहात ती केवळ "संगीत" वर्तुळातच राहावी.....(ही अपेक्षा आहे, आग्रह नव्हे.)

इन्द्रा

आभारी आहे इन्द्राजी!

तुमच्या अपेक्षेचा मान राखण्याचा पूर्ण प्रयत्न करेन याची खात्री बाळगा.

मात्र हे वाक्य इथे येण्यामागची भूमिका थोडी स्पष्ट करू इच्छितो.

कलाकाराच्या आयुष्यात संगीत हा महत्त्वाचा भाग असतोच पण त्याबरोबरच त्याच्या आयुष्यातील इतर घटनांचा त्याच्या सांगितिक कामगिरीवर काय परीणाम होतो वा झाल्यासारखा वाटतो असा विषय जेव्हा समोर येतो तेव्हा कलाकाराला त्याच्या सांगितिक कार्यापुरताच मर्यादित राखल्यास तो आपल्याला पूर्णपणे जाणून घेता येत नाही, येणार नाही अशी माझी भावना आहे. बर्‍याच कलाकारांच्या खाजगी आयुष्यातील घटना त्यांच्या कलेमध्ये प्रतिबिंबित झालेल्या असतात आणि त्या गोष्टींबाबतची चर्चा त्या कलाकृतीकडे पाहण्याचा एक निराळाच दृष्टीकोण आपल्याला देऊन जाते. अशावेळी कलाकाराच्या सांगितिक आयुष्याच्या बरोबरीने त्याच्या खाजगी आयुष्याचीही चर्चा होणे काही प्रमाणात अपरीहार्य असते आणि याच संदर्भात वरील लेखामध्ये ट्रेसीच्या बाबतीत सदर उल्लेख आलेला आहे याची कृपया नोंद घ्यावी ही विनंति.

आपले मनमोकळे प्रतिसाद माझ्या लेखनातील गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक आहेतच तेव्हा पुन्हा एकदा प्रतिसादाबद्दल धन्यवाद!