णमर्स्कार्स फोक्स ,
"अल्बम " ! हा शब्द वाचल्यावर किंवा आठवल्यावर कोणाच्या मनात जर फोटोंचा अल्बम सोडुन जर आजकालचे ऑडियो-विडियो अल्बम येत असतील तर .. तर काही नाही हा ज्याच्या त्याच्या विचारसरणीचा प्रश्न आहे ( उगाच जड जड डायलॉग्ज ने कशाला सुरुवात करा ? )
प्रत्येकाला बर्याचदा असं वाटत असावं , हा काळ जर इथेच थांबवता आला तर ? ही वेळ सरु च नये ! अर्थात ह्या आपल्या सुखी काळातल्या इच्छा असतात. उगाच जोराची लागलीये आणि कधी ऑफिसात किंवा घरी जाऊन मोकळा होतोय त्या वेळी " हा काळ असात अनंत युगे निरंतन चालत रहावा , मी ह्याच अवस्थेत ह्या पायावरुन त्या पायावर भार देत , कपाळाचा घाम पुसत , इकडे तिकडे बघत कधी कधी इच्छा नसताना स्माईल करत उभा रहावं " असं निश्चित कोणाला वाटणार नाही. सांगण्याचा मुद्दा असा , आपल्या आयुष्यात बर्याचदा चांगल्या गोष्टी घडतात. आपण त्या वेळी खुप आनंदात असतो. पण तो आनंद असा त्या ठिकाणी गोठुन रहात नाही. आपण ते क्षण कैद करतो ते आपल्या कॅमेर्यात. आता तर मोबाईल मधे ही कॅमेरे आल्याने त्याचं एवढं महत्व राहिलेलं नाहीये .
पण हे असं नव्हतं . पुर्वीच्या काळी , जास्त लांब कशाला जाता , दहाएक वर्षांपुर्वीच पब्लिक फोटो स्टुडियो मधे जाऊन फोटो काढायचे. फोटो स्टुडियो म्हंटलं की लगेच बायकांची त्यांची सर्वांत स्पेषल साडी घालनं , फेयर अँड लव्हली , लिप्सस्टिक , नथनी , इयर रिंग्ज ( भल्या त्या दिसेनात का त्या फोटोत ) ,एटुझेड ज्वेलरी , बांगड्यांपासुन चपलांपर्यंत , सगळी जैय्यत तयारी असायची. पुरुष वर्ग तेवढा उत्साही नसावा हे मला आमचा अल्बम पाहिल्यावर कळते. असेल तोच ड्युटीवर जायचा ड्रेस , त्याकाळी आलेली बेल बॉटम फॅशन ची पँट, हेयरस्टाईल वगैरे म्हणजे काय ? सगळ्यांची एकाच मोल्ड मधुन काढलेली केशभुषा, लहान पोरं असतील तर त्यांना डोळे भर फासलेलं काजळ , हातात त्या काळ्या-पांढर्या बांगड्या ( बांगड्याच असतात का हो त्या ? आठवत नाही ) , नजर लागु नये म्हणुन चार ठिकाणी लावलेलं काजळ , शर्ट बर्याचदा असतो , पण खाली चड्डी / पँट असेल की नाही ह्याची काही गॅरेंटी नाही. आज्जी -अजोबा किंवा सिनियर सिटिझन असतील तर मग आज्जी च्या कपाळावर भलं मोठं कुंकु , आजोबांना पगडी किंवा फेटा , हातात छडी हवीच , बांडीस , धोतर आणि असे ऐटित बसुन मग ते फोटो काढणार . कमी बजेट असलेल्या फॅमिली एकाच फ्रेम मधे कोंबुन कोंबुन बसवल्या जायच्या.
बर्याचदा माझा वेळ जात नसला की मी आमचा अल्बम उघडुन बघतो. त्यात सगळे नातेवाईक असे एका ठिकाणी असतात. तसे नातेवाईक घरी आले की माझ्या कपाळावर आठ्या पडतात हे प्रांजळपणे नमुद करतो. त्याला तसं कारणंही आहे म्हणा. मी जास्त कोण्या नातेवाईकाकडे एक तर कधी राहिलो नाही , आणि बरेच दिवस ये जा नसल्याने त्यांच्या विषयी म्हणावा तसा भावनिक जिव्हाळाही नाही. पण अल्बम मधले ते मला आवडतात . अल्बमचं स्वरुपही काळाच्या ओघात खुपसं बदललेलं आहे. एका पानावर एक फोटु बसणारे , एका पानावर दोन फोटु बसणारे ,प्लास्टिक कोट मधे फोटो ठेवायचे बुकलेट सारखे अल्बम मागे पडलेत आता तर मोठे मोठे .. स्पायरल वाईंडिंग असणारे अल्बम आलेत. संगणक युगात तर आता त्याचीही गरज नाही हे वेगळं सांगायची गरज नाही. ऑनलाईन अल्बम पर्यंत येउन पोचलोय . माध्यमं बदलली तरी भावना त्याच राहिल्यात.
बी.आर. चोप्राच्या महाभारतात अँकरिंग करणारा तो " मै समय हुं " , स्वत:चीच लाल करत स्वतःच्याच हजारो डेफिनिशन्स देतो तेंव्हा मला मोठी मौज वाटे . "मै समय हुं .. मै अनंत हु .. अनादी हु .. युगे युगे चलने वाला मै .. ना भगवान श्रीक्रिष्ण के लिये रुका ना पांडवों के लीये , ...." ( असो विषयांतर नको ) वेळ कधीच थांबत नसतो . पण अल्बम ती वेळ आपल्याला पुन्हा पुन्हा जगायचं एक माध्यम आहे. अल्बम कितीही वेळा पहा कधी बोर होत नाही . अल्बम कधीच जुणा होत नसतो , त्याला तर वयंच नसतं म्हणा. उलट अल्बम जेवढा जुणा होतो तितका त्याला पाहिले असता आपल्याला जास्त आनंद भेटतो. आपण लहाणपणी कसे दिसायचो ? हे आपल्याला डोळे मिटल्यावर आठवणार आहे काय ? अल्बम बघा, त्या फोटो बरोबर अजुनही बरंचसं काही आठवेल . अल्बम मधले फोटो हे फक्त फोटो नसतात. ते आठवणींचे ऑफसेट्स असतात. प्रत्येक फोटो बरोबर काही ना काही गोष्ट नक्कीच जुळलेली असते. फॅमिली सोबत अल्बम घेऊन बसलं की बघा २ - ४ तास कसे निघुन जातात . पाहुणे घरी आले की मी हटकुन अल्बम काढायचो . दुपारी महिलावर्ग कामं आटोपुन झोपायच्या तयारीत असायचा. पण मी अल्बम काढला की त्यांच्या झोपा कूठल्या कुठे उडुन जात . आणि संपुर्ण दुपार गप्पा टप्पा , जुण्या आठवणी , त्यांचे अनंत किस्से , कोण कोणाला काय म्हणालं होतं , मग त्याचं कसं झालं होतं , पासुन ते फोटो काढण्या आधी आपण काय केलं नी काय नाही पासुन सगळ्या गोष्टींची पुन्हा एकदा पुणरावृत्ती होते आणि त्याची कोणालाही हरकत नसते , कारण सर्वांना ते हवंच असतं .
अल्बम मधले सर्वात जास्त प्रिय असतात ते स्वतः चे फोटो. तेंव्हा मी कसा होतो ? तेंव्हा माझ्या डोक्यावर केस होते , कसे धारदार डोळे होते इत्यादी विचार बुढौंच्या मनात येतात , तर कधी काळी मी देखील यौवनात होते असं आजीबाईंना वाटत असणार. तोच एखादा नागवा फोटु दाखवुन सगळे जण आमच्यासारख्यांवर हसुनही घेतात. पण त्यावेळी तात्पुरतं खजिल व्हायचं असतं :) हो ! एक गोष्ट नक्की , अल्बम हा "स्वत:चा" असेल तरंच प्रिय असतो. दुसर्याचा अल्बम म्हणजे कहर असतो . अगदी पुलंच्या शत्रुपक्षाची आठवण व्हावी इतका . :)
मी कधी एकटा असलो की नेहमी अल्बम चाळतो . एकेक फोटो पुन्हा पुन्हा बघतो . आणि आठवणींत रमुन जातो. आता ते प्लास्टिक बुकलेट्स चे अल्बम बघायची गरज नाही. स्कॅन करुन लॅपटॉप वरंच उपलब्ध असल्याने ते हवे तिथे बघता येतात. मजा येते. काल रात्रीच अल्बम चाळता चाळता लेख लिहीणार होतो पण डोळा कधी लागला ते कळलंच नाही .
जर मला जग सोडताना एखादी गोष्ट बरोबर नेता आली , तर नि:संकोचपणे ती "अल्बम"च असेल .
प्रतिक्रिया
2 Mar 2011 - 12:32 pm | अविनाशकुलकर्णी
मी कधी एकटा असलो की नेहमी अल्बम चाळतो . एकेक फोटो पुन्हा पुन्हा बघतो . आणि आठवणींत रमुन जातो. आता ते प्लास्टिक बुकलेट्स चे अल्बम बघायची गरज नाही.
-------------------------------------------------------------
दादा ...हे जरा रुचले नाहि..
अल्बम कंप्यु वर बघण्या पेक्षा..सोफ्यावर लेटुन पाने उलटत बघण्याची मजा निराळी आहे
2 Mar 2011 - 1:06 pm | टारझन
ह्या विषयी कधीच असहमती नाही , पण खाली लॅपटॉप वर फोटो पहाण्याचे कारण स्पष्ट केल्या गेले आहे. :)
3 Mar 2011 - 9:05 pm | मुक्तसुनीत
लेख आवडला. :)
2 Mar 2011 - 12:34 pm | पियुशा
टारया स्वत सुधरवा शुधलेखन ;)
साढी,
चपालांपर्यंत ,
अल्मब
अल्मम
2 Mar 2011 - 12:38 pm | स्वैर परी
खरे आहे! अल्बम पाहताना त्यातल्या प्रत्येक फोटो बद्दल चर्चा होते. अगदी इत्यंभूत महिती मिळत असते.. न मागता! आपण तेव्हा कसे दिसायचो, कुठल्या प्रकारचे कपडे घालायचो, ई. सगळं काही मंद मंद आठवत राहते!
दुर्दैवाने आमच्या घरचा अल्बम मागच्या वर्षी कुठेतरी हरवला आहे. :( पण मनात अजुनही ते सगळे फोटो स्कॅन्ड आहेत! :)
2 Mar 2011 - 12:43 pm | छोटा डॉन
काय टारबा, एकदम नॉस्टलॅजिक ( फाफललो हा शब्द लिहताना, गंडलो असण्याची शक्यता आहे ) झालात काय ?
लेख मस्तच, नेहमीप्रमाणे, तुमचे राखिव कुरणचे हे, आठवणींचे !
बाकी जास्त जुने कशाला हो ?
आपले कॉलेजातले आणि आजचे फोटो पहा की, जमिन-आस्मानाचा फरक आहे, सर्वच बाबतीत.
बाकी ते लॅपटॉपपेक्षा अजुनही मला बांधणीच्या अल्बममध्ये शिस्तशीर लावलेले फोटो आवडतात.
- छोटा डॉन
2 Mar 2011 - 12:48 pm | टारझन
आपल्या दोघांचेही नॉस्टॅल्जिक गुरु एकंच म्हणजे आणंदयात्री असल्याने आपल्या फ्रिक्वेंस्या जुळतात इतकंच =))
अगदी बरोबर आहे डाणराव . . ह्या अल्बमचा अवाकाच एवढा मोठा आहे की काय लिहीणार काय सोडणार ? कालच कॉलेजातल्या मित्रांबरोबरचे फोटो , ट्रिप चे फोटो , शेवटचा पेपर सुटल्यावर एकसाथ आनंदाने ओरडत काढलेले फोटो , आण्णाच्या टपरीवर च्या -वडापाव खातानाचे फोटो .. आहो सगळंच बाहेर येतंय बघा .. काय सांगणार.
एकदम सहमत आहे बघा .. पण अलिकडच्या काळात ते रोल वाले कॅमेरे दिसत नाहीत हो ... आणि डिजीकॅमचे फोटो ही लॅपटॉप वर येतात ना .. कोणी डेव्हलप करुन फोटु प्रिंट काढा , अल्बम बनवा असे करत नाही. जुणे फोटो मात्र त्या शिस्तशीर लावलेल्या प्लास्टिक च्या कोटिंग केलेल्या अल्बम मधे च पहायला मजा येते. ( लॅपटॉप वर झुम वगैरे करुन बघता येतं )
2 Mar 2011 - 12:54 pm | परिकथेतील राजकुमार
टार्या अॅट हिज बेस्ट !
मस्त लिहिले आहेस रे टारबा. खरेतर मुद्दाम वगैरे कधी फोटोंचा अल्बम काढून पाहात बसणे होत नाही, पण अचानक कधी हाताला लागला तर मग वेळ कसा जातो कळत नाही. सध्या तरी अल्बम म्हणजे फेसबुकातील अल्बम येवढेच आठवते.
बाकी तुझा हा लेख वाचुन पुन्हा एकदा तुझ्या लायसन्सवाल्या फोटोची आठवण जागी झाली ;)
2 Mar 2011 - 12:59 pm | छोटा डॉन
>>बाकी तुझा हा लेख वाचुन पुन्हा एकदा तुझ्या लायसन्सवाल्या फोटोची आठवण जागी झाली
+१, सहमत बॉस !!!
परवा टार्या नवे लायसन काढायचे बोलत होता, ते आता मिळाले असावे नव्या फोटोसहीत, म्हणुन आता हा सेंटी झाला असावा असा अंदाज आहे ;)
- छोटा डॉन
2 Mar 2011 - 1:02 pm | टारझन
खरंय मित्र हो ... तो फोटो पाहुन आजही काळजाला घरे पडतात . मुडदा बसवला त्या पाकिटमाराच्या .... बाकी ऐवज गेल्याचं दु:ख नाही हो .. माझं ते लायसन्स गेलं त्याच्यात !!
-(एकेकाळचा अंडरवेट) स्पाम
2 Mar 2011 - 1:55 pm | ब्रिटिश टिंग्या
>>(एकेकाळचा अंडरवेट) स्पाम
या ऐवजी एकेकाळचा सखाराम गटणे हे कसे वाटते?
"तो" फोटो बघितलेले लोकं बाडिस असतीलच! :)
2 Mar 2011 - 2:58 pm | टारझन
माननिय श्री ब्रिटिष टिंग्या हे कधीच कोनाच्या लेखनावर चांगली किंवा वाईट प्रतिक्रीया देत नाहीत , परंतु एखाद्यावर वैयक्तिक टिका करुन त्यांचे माणसिक खच्चिकरण करण्यात हे महाशय नेहमीच आघाडीवर राहिले आहेत. प्रशासनाने त्यांना वेळीच 'तांबी' द्यावी आणि त्यांची 'अडचण' काय आहे हे चेक करावे.
- टिंग्या से बदला लुंगा
2 Mar 2011 - 3:57 pm | सुहास..
माननिय श्री ब्रिटिष टिंग्या हे कधीच कोनाच्या लेखनावर चांगली किंवा वाईट प्रतिक्रीया देत नाहीत , परंतु एखाद्यावर वैयक्तिक टिका करुन त्यांचे माणसिक खच्चिकरण करण्यात हे महाशय नेहमीच आघाडीवर राहिले आहेत. >>>
प्रचंड सहमत !!
पण आपले काय ठरले आहे , तु टिंग्याच्या खोड्या काढायच्या नाहीत आणि पुप्या माझ्या खोड्या काढणार नाही ;)
प्रशासनाने त्यांना वेळीच 'तांबी' द्यावी आणि त्यांची 'अडचण' काय आहे हे चेक करावे. >>>
हॅ हॅ हॅ , ते नेहमीच 'अडचणीत' असतात (म्हणुन दर कट्ट्याला टांग देतात, यांचे नाव बदलुन ब्रिटीश टांग्या =)) करावे अशी मी प्रशासनाला विनंती करीत आहे. )
असो ..(कशाला असो ..तो टिंग्या हे वाचल्यावर गप्प बसणार आहे का ? :( )
टारबा , लेख आवडला हे वेगळे सांगावे असे काही नाही , तरी पण आवडला , शेवटचा परिच्छेद (शब्द नीट वाचावा) मात्र वाचुन उगाच वृत्त (का काय ते ? ) मार खातय असे वाटले ..
टार्याच्या चेपुवरच्या अल्बम चा फॅन (आवरा)
3 Mar 2011 - 11:24 am | llपुण्याचे पेशवेll
सुहाशाशी सहमत आहे. हलकट टिंग्याला काय नेमकी अडचण आहे कळत नाही.
अवांतरः टार्या लेख लई भारी.
2 Mar 2011 - 12:58 pm | नगरीनिरंजन
>>जर मला जग सोडताना एखादी गोष्ट बरोबर नेता आली , तर नि:संकोचपणे ती "अल्बम"च असेल
पटलं!
2 Mar 2011 - 5:52 pm | वपाडाव
यैच बोल्ने के लिये आया था !!!
टारोबा यॅट हिज ब्येश
2 Mar 2011 - 1:05 pm | प्रीत-मोहर
.
2 Mar 2011 - 1:09 pm | यशोधरा
मस्त लिहिलेस टार्या. :)
2 Mar 2011 - 1:14 pm | पर्नल नेने मराठे
+१
2 Mar 2011 - 3:23 pm | लवंगी
ए१
2 Mar 2011 - 1:15 pm | अवलिया
या टार्याकडून शिका लेको लेखन कसे असावे ते !!
शुद्धलेखन फाट्यावर मारत मनातल्या भावना व्यक्त करणारा अस्सल लेखक !!!
जियो ! !!!!!
2 Mar 2011 - 1:19 pm | टारझन
धन्यवाद नाना , आपल्या प्रतिसादामुळे एक वेगळाच हुरुप आला :)
शुद्धलेखणाचे म्हणाल तर एकदा उपक्रमावर मला एका श्रेष्ठींनी "छाण" हा शब्द "छान " असा लिहीतात असे अनमोल मार्गदर्शन केले होते ;)
2 Mar 2011 - 3:58 pm | मृगनयनी
मस्त! अल्बम!
किन्चित भावनाप्रधान आणि बराचसा हृदयस्पर्शी लेख!- अल्बम! :)
_________
मला आप्ला मागच्या वर्षीचा "धुळवडी"चा अल्बम' आठवला! लै भारी होता.. "त्या" अल्बम मधली माणसे आता पुन्हा अशी एकत्र दिसणे... केवळ अशक्य! ;) ;) ;)... आपण दोघे सोडून! ;) ;)
2 Mar 2011 - 1:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
या टार्याकडून शिका लेको लेखन कसे असावे ते !!
शुद्धलेखन फाट्यावर मारत मनातल्या भावना व्यक्त करणारा अस्सल लेखक !!!
सहमत आहे. अल्बम आवडला. जुने फोटो पाहतांना कितीतरी वेळ जातो
आणि कितीतरी आठवणी ऐलतटावर पैलतटावर हिंदळू लागतात.
बाकी, स्वल्पविराम आणि पूर्णविरामात कोणताच भेद ठेवला नाही
आणि तेच या लेखनाचे खास अलंकार आहेत असे वाटले.
[प्रतिसाद लिहून एका उपप्रतिसादाला निमंत्रण आम्ही दिलेच आहे. ;) ]
-दिलीप बिरुटे
2 Mar 2011 - 1:33 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
मस्त आहे लेख....
2 Mar 2011 - 1:34 pm | गणेशा
अतिशय सुंदर लिहिले आहे ..
मनापासुन आवडले ..
लिहित रहा .. वाचत आहे
2 Mar 2011 - 2:20 pm | पाषाणभेद
एकदम सहमत. छान आठवणी आहेत.
2 Mar 2011 - 1:34 pm | मुलूखावेगळी
वा टार्या हार्टटची लेख आहे.
मला पण माझे लहान्पणीचे फोटो फार आवडतात.आणि मेकअप केलेले, भरतनाट्यम पोझ मधले :)
ह्या मुळे १ गोष्ट आठवली.
१दा मी रोड्वरुन जात होते तर १ टपरी स्टुडिओ च्या बाहेर १ माणुस पांढरा पडदा हातात धरुन उभा होता आनि ज्याचा फोटु काढायचा तो पोझ देउन उभा आनि कॅमेरा वाला रेडी होत होता.
तर ते बघुन मी तिथेच उभी राहिले. गंमत म्हनुन . ज्याचा फोटो काढायचा तो अस्वस्थ झाला.तरी मी हलेना.
मग माझ्या मैत्रिणीनी मला ओढत पुढे नेले. नंतर किती दिवस मला त्याचे हसु यायचे
2 Mar 2011 - 5:51 pm | वपाडाव
त्या बिचार्याला रडवेलं करुन आपण हसत होता.
अवांतर : मैत्रिणींना तुम्हाला ओढुन नेण्याची काय गरज? वजन जास्त आहे का? एकट्या हलु शकत नाय?
2 Mar 2011 - 10:07 pm | मुलूखावेगळी
तुमची वॉशिंग मशीण चोरीला गेलेली आहे का डोकं? फालतु प्रश्न विचारणे टाळा.
2 Mar 2011 - 1:49 pm | स्पंदना
शेवटच्या पॅरा पर्यंत एकदम झकास. पण शेवट करताना मात्र एकदम निबंध टाइप झाला भौ! का हो? नेहमी सारख नाही वाटल.
बाकि ती काजळा बिजळाची वर्णन एकदम सह्ही. मी पाहिलेला अन सगळ्यात न आवडलेला अल्बम हा एका नवश्रीमंताचा होता. गाढवान आई मेल्यावर सारेजण रडतानाचे फोटो काढले होते. अन वर सार्यांना दाखवायची हौस काय गड्याला? खर सांगतीय, माझ्या सासुबाईंना विचार पाहिजे तर.
या दिजिटल न मात्र कॅमेरा म्हणजे एक खेळण करुन सोडलय. परवाच अक्षय ओरडत होता भाराभार फोटो काढतेस कुठ आहेत दाखव! काय बी नाय सापडल, पण घरात असलेले अजुन वेळ न मिळाल्यान अल्बम्च्या बाजुला पाकिटापाकिटातुन पडलेले फोटो मात्र जाम मजा देउन जातात.
या फोटोत मला आवडतात ते बोर न्हाणाचे फोटो. त्या बोरांच्या थंड स्पर्शान उत्सव मुर्ती कायम रडवेली झालेली असते.
लग्नाचे काय सगळे सारखेच!
बर्याच आठवणी जागृत करुन गेला हा लेख आज. धन्यवाद लेखक महाशय.
2 Mar 2011 - 2:54 pm | टारझन
आहो नेमकं त्यावेळी मी आमच्या प्राडॉ आणि कोदांची खरडवही एकदम उगडली त्यामुळे असेल कदाचित :) नाही तर मी फार वेगळं लिहीतो हो :)
बाकी मयताच्या फोटु चा अल्बम ?" अरे बापरे .. =)) लग्नातल्या अल्बम विषयी आमची णो कमेंट. तो विषय आमच्या लेखातुनही गाळल्या गेला आहे.
धन्यवाद अपर्णा.
2 Mar 2011 - 1:56 pm | बिपिन कार्यकर्ते
एक नंबर लेख! खूपच आवडला. नॉस्टॅल्जिक!
2 Mar 2011 - 4:33 pm | पैसा
सहमत!
2 Mar 2011 - 2:05 pm | आत्मशून्य
आयपॅड हातात धरून सोफ्यावर लेटून अल्बम चाळते रहाणे म्हणजे तर वीरंगूळाच........
2 Mar 2011 - 2:05 pm | ५० फक्त
मी कॉलेज मध्ये लावणि केली होती, तिचा फोटो आज पर्यंत मि़ळाला नाही. तो सोडुन अल्बम काढुन बसणं हा दर दोन- तिन महिन्याचा कार्यक्रम आहे. अर्थात अल्बम लग्नापुर्विचे पाहायला फार मजा येते, मग ... जाउदे जास्त लिहित नाही.
असो, टा-या छान लिहिलं आहेस हो आठवणित रमला आहेस. तुझे चेपुवरचे घराचे फोटो पण छान आहेत. अभिनंदन.
2 Mar 2011 - 2:12 pm | मदनबाण
छाण लेख...
उगाचच... डोळ्यात काजळ घातलेला आणि गालावर नजर लागु णये म्हणुन काजळाचे ठिपके लावलेला टारु ईमॅजिण करुन पाहिला !!! ;)
2 Mar 2011 - 2:28 pm | प्रीत-मोहर
हाहाहा
2 Mar 2011 - 2:48 pm | प्यारे१
>>>गालावर नजर लागु णये म्हणुन काजळाचे ठिपके लावलेला टारु
तुला चुना म्हणायचंय का???
टारुचे लेखण चाण असते आणि आजही आहे हे वेगळं सांगायला हवं का???
2 Mar 2011 - 2:55 pm | टारझन
आमच्या गालांवर काजळंही चुण्यासारखं स्पष्ट दिसायचं बोला आता :)
- डांब्रे१
प्यारे१ से प्यार लुंगा
2 Mar 2011 - 3:15 pm | प्यारे१
प्रामानिक परतिक्रियेने ड्वाले पानावले.
आणि हो...
आमच्यात ३७७ चालत न्हाय. दुसर्या कुनाकडनं घ्या...प्यार.
2 Mar 2011 - 2:27 pm | हरिप्रिया_
जर मला जग सोडताना एखादी गोष्ट बरोबर नेता आली , तर नि:संकोचपणे ती "अल्बम"च असेल ....
एकदम खर...
:)
मस्त लिहिता तुम्ही....
2 Mar 2011 - 3:32 pm | असुर
मस्त लेख!! अवांतर करावसं वाटत नाहीये यातच सगळं आलं! :-)
--असुर
2 Mar 2011 - 3:57 pm | ज्ञानेश...
"माध्यमं बदलली तरी भावना त्याच राहिल्यात.."
"आपण ते क्षण कैद करतो ते आपल्या कॅमेर्यात.."
"आणि बरेच दिवस ये जा नसल्याने त्यांच्या विषयी म्हणावा तसा भावनिक जिव्हाळाही नाही.."
"अल्बम मधले फोटो हे फक्त फोटो नसतात. ते आठवणींचे ऑफसेट्स असतात.."
"मी कधी एकटा असलो की नेहमी अल्बम चाळतो . एकेक फोटो पुन्हा पुन्हा बघतो . आणि आठवणींत रमुन जातो..."
"जर मला जग सोडताना एखादी गोष्ट बरोबर नेता आली , तर नि:संकोचपणे ती "अल्बम"च असेल .."
ही असली वाक्ये टारूच्या लेखणीतून स्रवलेली पाहून अंमळ काळजी वाटली.
हा प्रशांतचा प्रगल्भतेच्या प्रवासाचा प्रारंभ तर नव्हे? अशी दुष्ट शंका मनात आली.
(ठळक शब्दामुळे जरा दिलासा मिळाला.)
3 Mar 2011 - 3:08 pm | भडकमकर मास्तर
सहमत...
टारोबाने दवणे सरांचा क्लास लावलाय का?
आता फ़क्त कविता येऊद्यात
2 Mar 2011 - 4:29 pm | स्पा
टारोबा लेख फर्मास जमलाय
2 Mar 2011 - 5:02 pm | मितभाषी
हेच बोल्तो.
2 Mar 2011 - 4:46 pm | नितिन थत्ते
भारी लेख.
आवड्ला.
2 Mar 2011 - 4:49 pm | अमोल केळकर
मस्त. अल्बम आवडला :)
अमोल
2 Mar 2011 - 5:22 pm | कच्ची कैरी
आम्हा भाऊ-बहिणींच्या लाहाणपणीच्या फोटोंचे अल्बम डोळ्यांसमोर आलेत .बाकी मला कुणाच्याही लग्नाचे फोटो पाहायला जास्त आवडते कारण ते खूप हास्यास्पद असतात असे मला वाटते -नवरीच्या हातात कळशी देऊन काढलेले फोटो किन्वा नवरी कॅलेंडर्वर आपल्या लग्नाच्या तारखेवर बोट ठेवुन काढाते तो फोटो किंवा समोर जेवणाच्या पंगती बसत आणि उठत असतांना ज्या वर्-वधुस कुणी जेवायला पुसत नाही म्हणुन त्यांचे ते मलुल झालेल्या चेहर्यांचे फोटो किंवा गुलाबजाम वाढणारा अजुन परत का आला नाही ?असा प्रश्न चेहर्यावर असलेल्या माणसांचे फोटो किंवा बिदाईच्या वेळी रडु येत नसतांनाही डोळे पुसणार्या मावशी किंवा वर्-वधुच्या दोघ खुर्च्यांमध्ये आपले मुंडके ठेवुन बळजबरी फोटोत घुसणारी लहान मुल किंवा एखाद्या रुसलेल्या जावायाला उगाच स्टे़जवर चढवुन काढलेले फोटो ....लग्नाच्या फोटोंवर तर एखादा मोठा लेखच होईल .
ते असो पण तुमचा अल्बम मस्त हं!आता गावी गेल्यावर नेहमीप्रमाणेच मीही आमचा अल्बम बघणार (ज्यातल्या एका फोटोत मी भोकाड पसरुन रडत आहे :(
2 Mar 2011 - 6:37 pm | घाटावरचे भट
णेहेमीप्रमाणे छाण लेख!!
2 Mar 2011 - 7:05 pm | प्राजक्ता पवार
मस्तं लेख .आवडला.
अल्बम बघणे हा आमचाही आवडता छंद आहे :)
2 Mar 2011 - 7:15 pm | रेवती
चांगलं लिहिलयस पण जरा तो 'अडचण' हा शब्द वापरला नाहीस तरी चालेल.
आजकाल मनापासून काही वाचू लिहू म्हटले तरी तसं होत नाही.
सगळे लक्ष या टार्याने वापरलेले चावट शब्द शोधणे, तक्रारी निस्तरणे यातच जातो......कळ्ळं का मेल्या!
2 Mar 2011 - 7:29 pm | परिकथेतील राजकुमार
परत झाली का टार्याविषयी तक्रारी यायला सुरुवात ?
चला 'टारझन ह्यांचे खाते का उडाले' असा लेख लिहायला घ्यायला पाहिजे म्हणजे. ;)
2 Mar 2011 - 10:36 pm | रेवती
अगदी कळीचा नारद आहेस हो परा!
3 Mar 2011 - 2:58 pm | परिकथेतील राजकुमार
मी निरागस आहे. नारद नाही.
2 Mar 2011 - 8:00 pm | टारझन
आयला , हे बरंय राव !! आंधळा दळतो नी टार्या बोलणी खातो ते उगीच नाही ! अडचण हा शब्द मी प्रथम वापरलेला नाही. पण तुम्ही म्हणताय म्हणुन खरोखर जरी असेल तरी अडचण हा शब्द चुकुन पण वापरणार नाही !!
सॉरी !!
बाकी तक्रार कोणत्या भ्याडा ने केली ते सांगा. . कोणाला वैयक्तिक उद्देशुन लिहीलेलं नसताना , अश्लिल हेतु ने लिहीलेलं नसताना कोण नरसोट्या / टी तक्रार करते आहे ? हक्क काय ? माझ्या वर असे हिण आरोप लावणार्यांविरुद्ध माझी हीच तक्रार समजावी.
ज्याला कोणाला प्रॉब्लेम असेल तर खरडवहीत येऊन बोलावे , निस्ताण केल्या जाईल . संपादकांना त्रास देण्याची गरज नाही.
2 Mar 2011 - 8:12 pm | वेताळ
आवडला........
2 Mar 2011 - 8:37 pm | प्राजु
काय रे एकदम नॉस्टॅल्जिक!!! :)
अल्बम मधले फोटो हे फक्त फोटो नसतात. ते आठवणींचे ऑफसेट्स असतात.
हे वाक्य एकदम आवडून गेलं.. तुझ्या भाषेत काळजाला भिडलं.. (खरंखरं हं!!) :)
2 Mar 2011 - 9:29 pm | प्राची
मस्त लेख टारूभाऊ..
मागच्या आठवड्यापासून आमच्या वर्गात आपल्या लहानपणीचे फोटो आणून ग्रूपमध्ये दाखवण्याचं फ्याड आलय.मजा येतेय एकेकाचे फोटू बघून.
2 Mar 2011 - 11:58 pm | इंटरनेटस्नेही
अतिशय सुंदर लेख. अॅज फार अॅज क्वालिटी इज कन्सर्न्ड, अगदी व्यावसायिक (प्रोफेशनल) झाला आहे. जबरी.. विषय पण छान निवडला आहे, राव!
जियो टार्या, जियो!
3 Mar 2011 - 2:00 am | वेदनयन
एखादा ल्हाणपणाचा (तुझ्या) फोटो टाकायचा ना टार्या...
पण मला भलताच डावट आला - तु कोणाला आयडी भाडयाने तर दिला नाही. असले नको लिहित जाऊरे फारसे (मिपावर बरेच आहेत असले लिहिणारे). तु आपले टार्या ष्टाईल लिहित जा गुमान... १४ फेप्रुवारी सारखे...
बाकी लेख छानच हे सां.न.ल.
3 Mar 2011 - 3:39 am | कौशी
अजुन लिहा आणि वाचायला आवडेल...
3 Mar 2011 - 10:35 am | sneharani
मस्त लेखन! सूंदर लिहलय!
:)
3 Mar 2011 - 11:01 am | इन्द्र्राज पवार
"....अल्बम हा "स्वत:चा" असेल तरंच प्रिय असतो. दुसर्याचा अल्बम म्हणजे कहर असतो ...."
~ १००% सहमत.
यातही हा दुसर्याचा अल्बम म्हणजे 'अरे, आलास.....बैस, कॉफी होईपर्यंत माझा आणि मिनीचा हा अल्ब्म बघ....लग्नानंतर आम्ही थायलंडला गेलो होतो हे तुला माहीत आहेच की.....तिथले हे फोटो बर्रर्र का...!" अशी तुपात तळलेली, साखरेत घोळलेली सूचना असली की विनातक्रार समजून घ्यावे की कॉफी आपल्याला चांगलीच चटका देणार.....! मग पुढे "हा डॉल्फिन मास्सा हं....मिने तू सांग ह्याला मी किती जवळ गेलो होतो....(मला वाटले, हा येडीयुराप्पा मधुचंद्राची गोष्ट सांगतो की काय, पण मिनीताई म्हणाल्या, "अरे, धाडसाने हा लेकमधील डॉल्फिनजवळ गेला होता...त्यावेळी किनई..." ~ इ. इ.
२> "जर मला जग सोडताना एखादी गोष्ट बरोबर नेता आली , तर नि:संकोचपणे ती "अल्बम"च असेल ..."
~ धिस डिझर्व्हस् ५ स्टार अप्लॉड...रीअली ! श्री. ह.मो.मराठे यांची आठवण झाली.
इन्द्रा
3 Mar 2011 - 11:01 am | विजुभाऊ
टार्या भारी ल्हिल्यस्की तू.
इतके नोष्टाल्जीक ल्हीशील असे वाट्ले न्व्हते
3 Mar 2011 - 1:33 pm | नरेशकुमार
लेख काही ठिकानी ठिक, काही ठिकानी बरा वाटला.
तुझ्यासारख्या णवोदित लेखकाला प्रोत्साहन/उत्तेजन मिळावे म्हनुन प्रतिक्रिया देत आहे.
केवळ तु आहेस म्हनुन बरं का !
लायटली.
3 Mar 2011 - 2:08 pm | जयवी
एकदम शेंटी लेख टार्या !! मस्त लिहिलं आहेस.
जुन्या फोटोंचे अल्बम चाळणे हा सगळ्यात चांगला टाईम पास आहे. मी तर माझ्याफोटोंसारेखेच बाकींच्याचेही फोटो अगदी मन लावून बघते :)
3 Mar 2011 - 5:07 pm | निखिल देशपांडे
टारोबा तुमच्या टिपीकल स्टाईलने लिहिलेला लेख..
अर्थातच आवडला...
तुझा लायसंन्स वरचा फोटो पण आठवला :-)
आणि नेहमी प्रमाणे "इतके छान लिहिता येत असताना हा... " हा विचार मनात येउनच गेला. असो!!!
3 Mar 2011 - 10:38 pm | बिपिन कार्यकर्ते
.--. .-.. ..- ... .----
3 Mar 2011 - 11:07 pm | निनाद मुक्काम प...
तुझ्या नशिबी अंकांचा पाऊस पडून नखशिखांत चिंब भिजण्याचे सौख्य नाही
''बल्लवाचार्य कुठे आहात आपण ?
''आणी आदरणीय ....
बिका शेख आता आमच्या अजून काय खुलासा करणे ?
3 Mar 2011 - 5:18 pm | माझीही शॅम्पेन
लेख फर्मास पण..
आल्बम मुळे आपण काही सेंटी वैइगरे होत नाही , आजही आल्बम ने दुसर्याणा विशेषत: पाहुण्यना त्रास देणारे लोक आम्ही आमच्या शत्रू पक्षातच गणतो..
पक्का पु. ल. प्रेमी
3 Mar 2011 - 5:39 pm | चित्रा
छान लेख, खूप आवडला..
3 Mar 2011 - 6:43 pm | प्रास
..... मजा आली......
टारझन किंवा खविस या नावाच्या लेखकांना न साजेसे सौम्य नि हृद्य लिखाण आपल्याकडून झाले याचा आनन्दही वाटला......
3 Mar 2011 - 8:53 pm | कानडाऊ योगेशु
टार्याने काळाची पण वेळ आणली.. ;)
4 Mar 2011 - 3:33 am | पिवळा डांबिस
लेख आवडला!
पण खरं सांगायचं तर आम्ही अलिकडे जुने फॅमिली अल्बम उघडायचे टाळतो...
कारण त्यातली बरीचशी लोकं या जगातून निघून गेलेली आणि उरलेली अगदी उंबरठ्यावर उभी!
गळ्यात हमखास वियोगाची कडवट चव!
:(
4 Mar 2011 - 8:25 am | गोगोल
वाचून का कोण जाणे खूप वाईट वाटल.
4 Mar 2011 - 9:05 am | प्यारे१
टचकन पाणी आले डोळ्यात. जगाचे रहाट्गाडगे आहे काका, सूर्योदय सूर्यास्त होतच राहणार.
कालपरवापर्यंत अगदी चान चान आरोग्य प्रकृति असणारे पटकन सोडून जातात तेव्हा काय बोलावे तेच कळत नाही.
4 Mar 2011 - 12:07 pm | टारझन
अनावधाना ने चुकीची कळ प्रेस झाल्याबद्दल क्षमस्व !
बायपास : सॉर्ट करुन का ठेवत नाहीत ?
सर्व वाचकांचे हार्दिक आभार मानतो . काहींनी टिपीकल टारु शैली म्हंटलंय तर काहींनी मस्तीखोर लेख लिहा म्हणुन सुचवलंय , पण माझी "टिपीकल" शैली मला अद्याप ठाऊक नाही. लेख लिहीण्या आधी काय शब्द लिहीणार आहे , माहीत नसते . तसंच सांगुन षटकार मारणारे हर्षल गिब्ज सुद्धा आम्ही नाहीत. त्यामुळे जो तुटका मुटका लेख संभाळुन घेतलाय त्या बद्दल सर्व मायबाप मिपाकरांचे आभार.
प्रा.डॉ. बिरुटे ह्यांचे विषेश आभार, ते आम्हाला शुद्धलेखणाचे पुस्तक देणार आहेत , त्यानंतर त्यांना आमच्या शुद्धलेखनात त्रुटी आढळणार नाहीत ह्याची काळजी नक्की घेउ.
धन्यवाद ,
टारझन
5 Mar 2011 - 10:47 pm | क्रान्ति
टारू, खूप छान लिहिलंस रे!