विश्वचषकाचे उर्मटशिरोमणी - पुष्प दुसरे - इम्रान खान

मृत्युन्जय's picture
मृत्युन्जय in क्रिडा जगत
16 Feb 2011 - 6:00 pm

आंतरराष्ट्रीय राजकारणात उर्मटपणाचा सगळा ठेका अमेरिकेने घेतला आहे. तसा क्रिकेटमध्ये तो ऑस्ट्रेलिया कडे आहे. त्यांचे एकजात सगळेच खेळाडु उर्मट आहेत. अ‍ॅडम गिलख्रिस्ट सारखा एखादा सन्माननीय अपवाद वगळता बाकीच्यांचे सभ्यतेशी तसे वाकडेच आहे. उर्मटपणा तसा थोड्याफार फरकाने सगळ्याच देशाच्या खेळाडुंमध्येही दिसतो. तसे आपले श्रीशांत (याच्या नुसत्या नावातच 'शांत'ता आहे) आणि सरदार तरी काय कमी उद्धट आहेत का? पण ऑस्ट्रेलियाची गोष्टच वेगळी त्यांचा उर्मटपणा त्यांच्या देहबोलीतुन देखील जाणवतो. त्यासाठी त्यांना तोड उचकटायची किंवा हातवारे करायची गरज नसते.

ही लेखमाला विश्वचषकातल्या ७ महाउर्मट खेळाडुंना समर्पित आहे. काही नावे कदाचित अनपेक्षित असतील, काही नावे अपेक्षित असुनदेखील इथे दिसणार नाहीत. नाइलाज आहे. सध्या क्रिकेटमध्ये उर्मट खेळाडुंची संख्या बरीच आहे. पण हे जे ७ उर्मट उद्धट खेळाडु आहेत त्यांनी मैदानावर देखील करामत केली आहे. त्यामुळे त्यांची नावे इथे आहेत. ७ फक्त ७. बाकी लोग हमे माफ करे.

*************************************************************

इम्रान खान


नावः इम्रान खान नियाझी, वयः ५९ वर्षे (आजमितीला), राहता: पाकिस्तान, व्यवसाय: अशक्याला शक्य करुन दाखवणे (निवृत्त)

Statistics is like a bikini. what it reveals is suggestive, but what it conceals is vital. हे वाक्य इम्रान खानपेक्षा जास्त कोणालाही सुट होत नाही. १७५ एकदिवसीय सामन्यात २६.६१ च्या सरासरीने १८२ बळी आणि १ शतक आणि १९ अर्धशतकांच्या सहाय्याने ३५०० + धावा. शिवाय ८८ कसोटी सामन्यात ६ शतकं आणि १८ अर्धशतकांच्या सहाय्याने ३५०० + धावा आणि २२.८१ च्या सरासरीने ३६४ बळी ही आकडेवारी या माणसाला कपिल देव, रिचर्ड हॅडली, इयान बोथम या त्रिकुटाबरोबर एक चांडाळ चौकडी बनवण्यासाठी पुरेशी आहे. यात विश्वचषकातल्या १८ सामन्यांमधुन ३५ च्या सरासरीने ६६६ धावा (सैतानाचा आकडा. हादेखील तसा एक सैतानच होता म्हणा) आणि १९.३४ च्या सरासरीने ३४ बळी ही कामगिरी समाविष्ट आहे. काय म्हणता? या आकडेवारीमधुन असे वाटतय ना की एक अष्टपैलु म्हणुन त्या काळात इम्रान खान चांगलाच होता पण एक गोलंदाज म्हणुन काही विशेष नव्हता. २८ सामन्यांमध्ये केवळ ३४ बळी म्हणजे काही विशेष नाही. नाही का? पण मग यातुन १९८३ चा एक आख्खा विश्वचषक वजा करा. कारण या विश्वचषकातल्या ७ सामन्यांमध्ये इम्रान खेळला पण केवळ एक फलंदाज म्हणुन. दुखापतीमुळे तो या स्पर्धेत गोलंदाजीच करु शकला नाही. आता इम्रान ची कामगिरी अजुन खुलुन दिसते आहे ना. म्हणुनच म्हणले Statistics is like a bikini.

इम्रान खान नावाच्या वादळाचा जन्म लाहोरमधल्या एका उच्च मध्यमवर्गीय घरात झाला. क्रिकेटचे बाळकडु त्याला घरातच मिळाले त्याचे २ चुलत भाउ व्यावसायिक क्रिकेट खेळायचे. त्यापैकी माजिद खान तर पाकिस्तानचा कर्णधारच होता. पठाणी रुबाब, ६ फूटापेक्षा जास्त उंची, श्रीमंती राहणीमान, इंग्लंड मध्ये शिक्षण घेतल्यामुळे आलेले साहेबी उच्चार आणि आचार आणि जबरदस्त व्यक्तिमत्व यामुळे तो लवकरच तरुणींच्या गळ्यातला ताईत बनला. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हटल्यावर थोडा उर्मटपणा तर अंगी येणारचा. वेळोवेळी त्याने तो दाखवुनही दिला. अ‍ॅलन लँब आणि ग्रॅहम गूच ला त्याने जाहीरपणे असभ्य, उर्मट आणि वर्णद्वेषी म्हणुन संबोधले. हा उर्मटपणा, हा अ‍ॅरोगन्सच त्याला भविष्यात उपयोगी पडला, त्यालाही आणि पाकिस्तानलाही.

१९७१ ला तो इंग्लंड विरुद्ध पहिली कसोटी खेळला. या सामन्यात त्याला गोलंदाजी तर दिली गेलीच नाही. फलंदाजी करताना देखील तो केवळ ५ धावा करु शकला. या सामन्यानंतर त्याच्या संघसहकार्‍यांनी स्पष्टपणे सांगितले की त्याला पाकिस्तानी संघात स्थान मिळणे अशक्य आहे. पण तो इम्रान खान होता. अशक्य ते शक्य करुन दाखवण्याची त्याला सवय होती, आवड होती. तो परत आला आणि त्याच सहकार्‍यांच्या डोक्यावर मिर्‍या वाटुन पाकिस्तानच्या क्रिकेट इतिहासातला सगळ्यात वलयांकित खेळाडु बनला.

इम्रान खान १९७५ ते १९९२ सगळे विश्वचषक खेळला. निवृती घेउन घेउन खेळला. त्यातला सगळ्यात संस्मरणीय जरी १९९२चा विश्वचषक असला तरी त्याने सगळेच विश्वचषक गाजवले.

पहिल्या विश्वचषकात पाकिस्तानचा संघच फारसे काही करु शकला नाही. पण इम्रान खानने त्याची चुणुक दाखवले. २ सामन्यांत त्याने १७ षटकांमध्ये ६१ धावांच्या मोबदल्यात ५ बळी मिळवले. म्हणजे प्रत्येक १२ धावांमागे १ बळी. त्यात त्याने ग्रेग चॅपेल, रॉडनी मार्श, वर्णपुरा आणि डिसिल्वाला तंबुचा रस्ता दाखवला. वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात त्याला का बसवले होते देव जाणे. पण तो सामना पाकिस्तान केवळ एका विकेटने हारला. इम्रान खान असला असता कदाचित तर हे झाले नसते.

१९७९ चा विश्वचषक सुद्धा त्याच्यासाठी काही खास संस्मरणीय नव्हता. ४ सामन्यात त्याने ५० हुन कमी धावा केल्या आणि अवघे ५ बळी मिळवले. पण त्यातही ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्यात त्याने १३ धावांवर सलामीवीर डार्लिंगला तंबुचा रस्ता दाखवला आणि नंतर राइटला बाद करुन संघाच्या विजयात हातभार लावला. पाकिस्तानचे मालिकेतले आव्हान मात्र परत एकदा लवकर संपुष्टात आले.

१९८३ च्या विश्वचषकाच्या आधी मात्र इम्रान खानची धूम होती. वेस्ट इंडिजला रोखु शकणारा खेळाडु म्हणुन टाइम मॅगेझिनने त्याची भलामण केली होती. वर्षाची सुरुवात तर त्याने जबरदस्तच केली होती. भारताविरुद्ध त्याने मालिकेत १४ पेक्षा कमीच्या सरासरीने ४० बळी घेतले. गावसकर, कपिल देव, अमरनाथ सकट सगळे जण त्याच्यासमोर ढेपाळले. या माणसामुळे गावसकरचे कर्णधारपद गेले. तसे त्याने बर्‍याच जणांचे करीयर बरबाद केले आहे. हा गावसकर होता म्हणुन वाचला. १९८३ चा विश्वचषक इम्रान खानला प्रसिद्धीच्या नविन शिखरांवर घेउन जाणार होता. पाकिस्तानच्या आशा त्याच्यावर केंद्रीत झाल्या होत्या. पण हाय रे दैवा, इम्रान खान पायाच्या दुखापतीमुळे १९८३ च्या विश्वचषकात एकाही सामन्यात गोलंदाजी नाही करु शकला.

पण... पण तो इम्रान खान होता. हार मानना उसकी फितरत नही थी. गोलंदाजीची कसर त्याने फलंदाजीत भरुन काढली. ७ सामन्यांत ७१ च्या सरासरीने त्याने २८३ धावा काढल्या. यात १ शतक आणि २ अर्धशतकं होती. ३ ही वेळा तो नाबाद राहिला. श्रीलंकेविरुद्ध त्याने ३३ चेंडुत त्याने ६ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने ५६ धाव काढल्या. पण त्यात काही विशेष नाही कारण त्या सामन्यात झहीर अब्बास आणि मोहसिन खान यांनीसुद्धा लंकेला झोडपुन काढले होते. पुढच्याच सामन्यात मात्र लंका वचपा काढण्यासाठी उतरली. अवघ्या ४३ धावांत मोहसिन खान, झहीर अब्बास, मन्सूर अख्तर आणि जावेद मियांदाद परतले होते. धावगती ४ पेक्षा कमे होती. आणि त्यानंतर इम्रान खान मैदानात उतरला. १३३ चेंडुत त्याने ११ चौकारांच्या सहाय्याने १०२ धावा काढल्या. त्याच्या एकदिवसीय कारकीर्दीतले एकमेव शतक त्याने विश्वचषकात काढले जेव्हा पाकिस्तान अडचणीत होते तेव्हा. पाकिस्तानने २३५ धावा केल्या आणि हा सामनाही खिशात घातला. नंतर न्युझीलंड विरुद्धही त्याने ७४ चेंडुत नाबाद ७९ धावा काढल्या. पाकिस्तानने हाही सामना जिंकला. नंतर उपांत्यफेरीच्या सामन्यात मात्र इम्रान पार अपयशी ठरला आणि पाकिस्तान वेस्ट इंडिज कडुन हारले. पाकिस्तानच्या विजयाची नाळ जणु इम्रान खान च्या खेळाशी जोडली गेली होती.

१९८३ साली झालेल्या दुखापतीमुळे इम्रान खान नंतर २ -३ वर्षे गोलंदाजी नाही करु शकला. पण नियतीशी झुंज द्यायची त्याला सवयच होती. त्याने पुनरागमन केले आणि त्याच झोकात केले. जणु मधली २-३ वर्षे काही झालेच नव्हते. तो नंतर इतका भरात आला की १९८७ चा विश्वचषक त्याचाच होता. सबकुछ इम्रान. ७ सामन्यात त्याने १४ च्या सरासरीने सव्वदोनशे धावांच्या मोबदल्यात १७ बळी मिळवले आणि १५० च्या आसपास धावा सुद्ध काढल्या. उपांत्य सामन्यापुर्वी त्याने रिचर्ड्स, लॅम्ब, गूच, हार्पर अश्या रथी महारथींना तंबूचा रस्ता दाखवला होता. बहुतेक सामन्यांमध्ये त्याने सलामीवीरांना परत पाठवले. तरी या ६ पैकी १ सामन्यात तो दुखापतीमुळे गोलंदाजी करुच शकला नाही आणि एका सामन्यात त्याल षटक अर्धवट टाकुनच परतावे लागले. पण तो जेव्हा जेव्हा गोलंदाजीला आला तेव्हा तेव्हा त्याने समोरच्या संघाच्या फलंदाजी कंबरडे मोडले. उपांत्य सामन्यात पाकिस्तानचा सामना ऑस्ट्रेलियाशी झाला. मार्श, बून, जोन्स बॉर्डर च्या हल्ल्यामुळे पाकिस्तानी गोलंदाजीचे कंबरडे मोडले. एकटा इम्रान खान या तडाख्यातुन सुटला. त्याने १० षटकात ३५ धावा देत मोक्याच्या क्षणी ३ बळी टिपले. त्यामुळे ३०० कडे वाटचाल करत असलेल्या ऑस्ट्रेलियाला २६७ वर समाधान मानावे लागले. त्याला प्रत्युत्तर देताना पाकिस्तानची अवस्था ३-३८ झाली होती. परत एकदा इम्रान खान मदतीला धावून आला. जावेद मियांदादच्या साथीने त्याने ११२ धावा काढल्या त्यात त्याचा वाटा ५८ धावांचा. पण अखेर मियांदाद आणि इम्रान खान परतले आणि पाकिस्तान अवघ्या १८ धावांनी हारले.

या विश्वचषकानंतर इम्रान खानने क्रिकेटला रामराम ठोकला आणि पाकिस्तानी क्रिकेटमध्ये एक पोकळी निर्माण झाली. अखेर खुद्द राष्ट्रप्रमुखाच्या झिया उल हकच्या विनंतीने इम्रान खान परतला आणि १९९२ च्या विश्वचषकामध्ये त्याने पाकिस्तानचे नेतृत्व केले. He was a borne leader. नेतृत्व गुण त्याच्यात जात्याच होते. आधिकारीक वृत्ती होती. त्याने मरगळलेल्या पाकिस्तानी संघात नवे प्राण फुंकले. खेळाडुंची अजिबात गय नाही केली. त्याकाळात त्याचे अनेकांशी वाजले. पण जिथे त्याला खुद्द राष्ट्रप्रमुखाची साथ होती तिथे तो कोणाची काय पत्रास ठेवणार? त्याने एक नव्या दमाचा संघ बनवला आणि तो विश्वचषकात उतरला. पण इम्रान खान बहुधा देवाचा (अल्लाहचा म्हणुयात वाटल्यास) नावडता खेळाडु होता. साखळीतल्या पहिल्या ४ सामन्यांपैकी २ सामने त्याला दुखापतीमुळे मुकायला लागले. पहिल्या चारातले २ पाकिस्तान हारला आणि एका सामन्यात इंग्लंड कडुन वरूणराजाच्या कृपेने हारता हारता वाचला. यानंतर इम्रान खानने त्याच्या सहकार्‍यांना "play like cornered tigers" हा मंत्र दिला. एका मुलाखतीत तो म्हटला होता "I have told boys to play like cornered tigers. You have nothing to lose from hereon. But if you play like tigers, I don't mind whether we win or lose". इम्रान स्वतः असाही एक सिंहच होता. त्याला सहकार्यांनी प्रेमाने "Lion of Lahore" ही उपाधी दिली होती. नंतर खरोखरच पाकिस्तानच्या संघात अभूतपुर्व बदल झाला. त्यांनी उरलेले तीनही सामने जिंकले. अंतिम सामन्याच्या आधी इम्रान खानची कामगिरी काही अभूतपुर्व नव्हती त्याने सव्वाशेच्या आसपास धावा काढल्या होत्या आणि केवळ ६ बळी मिळवले होते. पण त्याचे केवळ संघात असणेच पाकिस्तान साठी महत्वाचे होते. अंतिम सामन्यात मात्र त्याने सर्व कसर भरुन काढली. स्वतः ३ क्रमांकावर फलंदाजीला येउन त्याने विकेट न गमावता धावफलक हलता ठेवला. ९ धावावर गूचने त्याचा झेल सोडला आणि जणू विश्वचषकाला तिलंजली दिली. आउट होण्यापुर्वी इम्रान खानने संयमी ७२ धावा केल्या. नंतर अक्रम, मुश्ताक आणि आकिब जावेदने ठराविक अंतराने बळी घेतले. मात्र शेवटचा बळी घेण्याचा मान जणु इम्रान खानचाच होता. आणि तेच योग्य होते. तो कप त्याचाच होता शेवटी. इलिंगवर्थचा बळी घेत इम्रान खानने आपल्या विश्वचषकीय कारकीर्दीची यशस्वी सांगता केली.

नियती इम्रान खानवर अनेकवेळा रुष्ट झाली. सुरुवातीलाच सहकार्‍यांनी खिल्ली उडवुन त्याला संघाबाहेर काढले. मग दुखापतीमुळे १९८३ ते १९८५ अशी आयुष्यातली सोनेरी वर्षे वाया गेली. मग १९८७ च्या विश्वचषकाचा घास जणू तोंडातुन काढुन घेतला. पण इम्रान खान झगडत राहिला. तो वारंवार परत येत राहिला. तो स्वत:च एकदा म्हणाला होता "The more the pressure, the stronger I got". त्याने ते सिद्ध केले. टीकाकारांच्या, विरोधकांच्या इतकेच काय नियतीच्याही मनात नसताना त्याने प्रमुख खेळाडुंच्या दुखापतींनी ग्रासलेल्या, संघभावनेचा अभाव असलेल्या, अंतर्गत राजकारणाने पोखरलेल्या आणि औदासिन्याने पछाडलेल्या पाकिस्तानी संघाला या सर्वांच्या नाकावर टिच्चुन विश्वचषक जिंकवुन दिला. नियतीला आव्हान देण्याचे औद्धत्य असलेला इम्रान खान निसंशय विश्वचषकातला आमचा दुसरा उर्मटशिरोमणी आहे. हे दुसरे पुष्प शत्रुराष्ट्राच्या नागरिकाच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण करु शकणार्‍या इम्रान खानला सादर समर्पित.

क्रिकेट

प्रतिक्रिया

स्वाती दिनेश's picture

16 Feb 2011 - 7:11 pm | स्वाती दिनेश

दुसरा उर्मटही आवडला.
इम्रान ह्या सातात कुठेतरी असणार आहे असे मनातून वाटत होतेच..
स्वाती

पैसा's picture

16 Feb 2011 - 8:46 pm | पैसा

इम्रान आजही राजकारणात उतरून अशक्य ते शक्य करू पाहतोच आहे! शत्रूच्या देशातही लोकप्रियता मिळवणार्‍या थोड्या भाग्यवंतांपैकी एक, मला नेहमीच आवडतो.

१९८३ च्या ज्या टेस्ट सीरिजबद्दल तुम्ही लिहिलं आहे, त्यातही गावस्करने मला वाटतं एक शतक आणि ३ अर्धशतकं काढली होती. त्या काळात पाकिस्तानातल्या मॅचमधे भारताकडून एकटा गावस्कर आणि पाकिस्तानकडून १३ जण खेळतात असं म्हटलं जायचं. खुद्द इम्राननेही "मी पाहिलेला सर्वात "कॉम्पॅक्ट" फलंदाज म्हणून सनीची भलावण केली होती.

आपल्याला आजवर फक्त दोनच पाकडे आवडले. एक वसिम अक्रम आणि दुसरा अर्थातच इमरान खान.

लहानपणापासूनच 'पाकिस्तान म्हणजे आपलं शत्रूराष्ट्र' असं शिकवलं गेलेलं असताना 'बाबा, काका या इमरानची का सारखी स्तुती करतात?' असा प्रश्न मला पडायचा.

पण पुढे कळत गेलं चांगलं क्रिकेट जो खेळतो त्याला देशाच्या सीमा बांधून ठेवत नस्तात नि त्याचा धर्मही एकच असतो - क्रिकेट!

उत्तम लेख रे मृत्युंजया! बाकी हा प्रतिसाद इथं लिहिण्याचं कारण हे की वरील प्रतिसादातील "पाकिस्तानातल्या मॅचमधे भारताकडून एकटा गावस्कर आणि पाकिस्तानकडून १३ जण खेळतात असं म्हटलं जायचं. " या वाक्यावरून मला माईक गॅटींग-शकूर राणा चा प्रसंग आठवला.. मग जावेद अख्तरचं डोकं खाजवणं आठवलं.. नि मग नुसता हास्यकल्लोळ!!

आपल्याला आजवर फक्त दोनच पाकडे आवडले. एक वसिम अक्रम आणि दुसरा अर्थातच इमरान खान.
अगदी अगदी. झालंच तर हो-नाही करता करता मी त्यात इंझमामचेही नाव घालेन :)
(अक्रमभक्त)बेसनलाडू

हे पुष्पही छान झाले आहे. पुढील पुष्पे वाचण्यासाठी उत्सुक आहे.
(वाचनोत्सुक)बेसनलाडू

एकदम मस्त ..
इम्रान खान ने पाकिस्तानला विश्वकप जिंकुन दिल्या नंतर एका वर्षांनी क्रिकेट पाहयला लागलो होतो.. विश्वविजेते पाकिस्थान हे शब्द अजिबात आवडत नव्हते .... परंतु तरीही इम्रान खान बद्दल आपले पण वाटत होते .. असे वाटत होते .. कपिल च्या बरोबर हा आपल्या संघात हवा होता ... मज्जा आली असती ..

इम्रान खानचा प्रवास मात्र मला माहित नव्हता .. खरेच खुप खडतर होता.. मानसिक खच्चिकरण होण्याऐवजी ज्या त्वेशाने तो पुन्हा परत आला ते जबरदस्त ...एकदम आवडले ..

तुमचा दुसरा उर्मट शिलेदार ही आवडला ...
नावडत्या जिंकलेल्या संघातील आवडता प्लेअर ....
------

अवांतर : सचिन (विश्वकप २००३ /१९९६) याचा पण या लिस्ट मधेय नंबर असावा असे वाटते .. पण उर्मट हि उपाधी त्याला नसावीच .. त्याच्या बॅटला असेल तर काही हरकत नाहि ...
सचिन विरुद्ध शोएब असताना पाकिस्तानला चारलेली धुळ , जखमी असतानाही शतकाजवळ पोहचलेला सचिन .. खरेच काय मॅच होत्या त्या २००३ च्या.. लाजवाब ...

इन्द्र्राज पवार's picture

16 Feb 2011 - 10:07 pm | इन्द्र्राज पवार

मृत्युन्जय....तुम्ही हा लेख जरी 'इम्रान खान' याच्यासाठी लिहिला असला (जो सुरेखच आहे, आणि त्याच्या एकूण क्रिकेट कारकिर्दीला न्याय देणारा असला तरी...) तरी माझ्यामते त्याच्या विश्वकप विजेतेपदाला खर्‍या अर्थाने कुणी योगदान दिले असले तर ते उपांत्य सामन्यातील 'इंझमान-उल-हक' च्या स्वप्नवत वाटणार्‍या तुफानी खेळीने. [मुळात पाकिस्तान केवळ 'वरूणराजा'च्या कृपाप्रसादाने सेमि-फायनलमध्ये प्रवेश करू शकले होते. लीगच्या शेवटच्या सामन्यात इंग्लंडविरूध्द त्यांच्या धावा झाल्या होत्या ~ सर्वबाद फक्त ७४....आणि इंग्लंड १ बाद २४ असताना धो-धो पडलेल्या पावसाने तो सामना अक्षरशः वाहून गेला, आणि 'अल्लामिया' ने पाकला १ गुण आयता बहाल केला...आणि हाच १ गुण ऑस्ट्रेलियाच्या बाद फेरीतील प्रवेशामधील अडथळा ठरला.....थोडेसे आणखीन अवांतर इथे ~ याच पावसाने उपान्त्य फेरीतून साऊथ आफ्रिकेलाही 'हकनाक' बाद केले होते. १३ चेंडूत २२ धावा असे लक्ष्य असताना, पावसाने लावलेल्या हजेरीमुळे पुढे सामना सुरू झाला त्यावेळी 'रिव्हाईज्ड टार्गेट' झाले "एक चेंडू आणि २१ धावा...." सामन्याचा निकाल तिथेच लागला आणि इंग्लंड फायनलमध्ये....आणि असा हास्यास्पद प्रकार पुढील काळात कधीही घडला नाही ; त्यातूनच आज अस्तित्वात असलेला 'डकवर्थ-लुईस' नियम आला.....असो)

तुम्हाला आठवत असेलच की त्या सीझनमध्ये न्यूझिलंड संघाने मार्टिन क्रोच्या कप्तानपदाखाली अशी काही भरारी मारली होती...जणू काही विश्वचषकाचे ते संभाव्य विजेते वाटत होते (पुढे मार्टिन क्रो यालाच Man of the Series चा पुरस्कार मिळाला होता. उपांत्य फेरीतील क्रो ची प्रथम फलंदाजी करताना त्याची ती ९१ धावाची खेळी आणि त्यावेळी पर्वताएवढा वाटणारा २६२ धावाचा आकडा पाहताना सर्वाना त्यांच्या विजेतेपदाची आणि अंतिम फेरीतील प्रवेशाची खात्री पटलीच होती. त्यातही आमीर, रमीझ राजा, सलीम मलिक, इम्रान तंबूत परतले होते....आणि जावेद १०० चेंडू खेळूनही कसाबसा ४० पर्यंत येऊन थांबला होता...अशावेळी अजून 'बटाटा' न झालेले इंझमाम उल हक नावाचे पाकिस्तानचे नवे फाईंड तिथे आले आणि त्याने एका हाती ४८ चेंडूत ६० धावाचा पाऊस पाडून पाकिस्तानला स्वप्नवत वाटणारा विजय मिळवून दिला होता. अर्थात दुसरीकडे शांत राहून त्याला मार्गदर्शन करणारा सज्जड जावेदही होता, ज्याने १२५ चेंडूत नाबाद ५७ धावा काढल्या होत्या....(एक योगायोग म्हणजे जावेद मियाँदादने अंतिम सामन्यातही १२५ चेंडूत ५८ धावा काढून संघाचा धावफलक सशक्त केला होता. इथे इंझीने ४६ मध्ये ४२ धावा केल्या.)

साखळीतील ८ पैकी ७ सामने जिंकून रुबाबात असलेल्या त्यास्पर्धेतील न्यूझिलंडचा शेवट मात्र एका फलंदाजाच्या तुफानी खेळीने केला; तोही घरच्याच मैदानावर.....[आजतागायत न्यूझिलंड विश्वचषक जिंकू शकलेले नाही].

अंतिम सामन्याबद्दल तुम्ही लिहिलेले आहेच .....पण त्याचे श्रेय मात्र उपांत्य फेरीतील त्या अशक्य वाटणार्‍या विजयाकडे जाईल.

इन्द्रा

मृत्युन्जय's picture

16 Feb 2011 - 10:36 pm | मृत्युन्जय

नक्कीच. किंबहुना असे म्हटले जाते की इम्रान खान केवळ जावेद मियांदाद आणि इन्झी च्या खेळाच्या बळावर यशस्वी झाला. अर्थात असा नकारार्थी सुर लावणारे थोडेच जण आहेत. तसेच म्हणायचे झाल्यास इम्रान खान जावेद मियांदाद आणि इन्झी यांच्याबरोबरच वासिम, वकार यांच्यामुळे यशस्वी झाला असे पण म्हणता येइल. लोक तसे म्हणत नाहीत कारण मग एक सर्वोत्तम टीम तयार करण्याचे श्रेय इम्रान खानकडे जाते.

मलाही इन्झी आणि जावेद मियांदाद बद्दल लिहायची खुप इच्छा झाली होती. खासकरुन जावेद मियांदाद बद्दल. पण मग ते मकीसारखे झाले असते. ती कशी इतरांचे धागे हेक करते (असा तिच्यावर आरोप होतो) तसा हा धागा मग जावेद मियांदाद ने हॅक केला असता. मला ते नको होते. त्यामुळे इंझी आणि जावेद मियांदाद यांना वगळले. या दोघांचेहे योगदान असामान्य होते. जावेद मियांदाद इनिंग अँकर करायचा तर इंझी धावगती भन्नाट वाढवायचा.

जावेद मियांदादपेक्षा या लेखमालिकेसाठी इम्रान खानला पसंती देण्याचे एक कारण त्याची विजिगिषु वृत्ती आणि एक अष्टपैलु कर्णधार म्हणुन कामगिरी. बाकी दोघेही सारखेच उर्मट होते. :)

निशदे's picture

16 Feb 2011 - 10:54 pm | निशदे

कडक चालू आहे लेखमाला.......येऊ द्यात पुढचे....
:)

मृत्यंजय धन्स
विश्व चषक जिंकण्याचे संपूर्ण श्रेय हे इम्रान खान ह्यास जाते .
इम्रान खान चे राजकारण आल्यावर पहिल्या निवडणुकी साठी निधी जमवायला युके मध्ये एका जाहीर सभारंभात त्याने मस्त भाषण ठोकले .त्यात त्याने विश्व चषक स्पर्ध्धेसाठी केलेल्या तयारीचे सविस्तर वर्णन आहे .
त्याचा शेवटचा विश्व चषक म्हणून कि काय त्याच्याकडे संघ निवडायचे सर्वाधिकार आले .( सिलेक्तर होते .पण ह्याच्या हातात सूत्र होती .) तशी ती त्याने आधीच घेतली होती .वासिम आणि वकार हे जगातील माझ्या मत्ते सर्वत्तोम गोलंदाजांची जोडी इम्रान खान ह्याने शोधली .(अगदी अनाहूत पणे हे हिरे त्याला गवसले .) त्यांना स्वताच्या तालमीत तयार केले .अर्थात इनस्विंग हे त्याचे मुख्य अस्त्र पण त्याचे शागीर्द त्याच्या दोन कदम पुढे जाऊन स्विंग गोलंदाज बनले.
इमरान ने मुख्य स्पर्ध्धेच्या एक वर्षा आधीपासून संघ जमावाला सुरवात केली .
गोलंदाजी त्यांची मजबूत होती .
त्याला मधल्या फळीसाठी फलंदाज हवा होता .एका सरावाच्या वेळी (कोणी ते नावात आठवत नाही .) सांगितले '' एक मोटा लडका हे लेकीन . गेंद पे नजर अच्छी हे''.त्याला लगेच पाचारण करायला इम्रान ने सांगितले .
प्रथम दर्शनी इम्रान म्हणाला '' ये क्या बेटिंग करेगा ''
पण सरावात त्याने चेंडू भिरकवायला सुरवात केली आणि संघात जागा पक्की केली .(त्याआधी तो अगदीच प्राथमिक स्तरावर खेळायचा .पण त्याच्याकडे सरावासाठी एक वर्ष होते .)
इंझी मुळे निवडसमितील एक सदस्य आणि इमरान मध्ये राडा झाला .पण इम्रान हट्टाला पेटला म्हणून इंझी संघात येऊ शकला .
डावपेच ते एक संघभावना निर्माण करण्यात इम्रान यशस्वी झाला .
त्याचा इनस्विंग म्हणजे इंगळी डसावी तसा होता .
कुठे तरी वाचले होते .
पहिल्यांदा सचिन जेव्हा पाकिस्तानात मध्ये इम्रान चा इनस्विंग खेळला तेव्हा त्याचे पहिले बोल होते '' एक फुट आत घुसला ''

अर्थात त्याच्या बहराच्या काळात तो भलताच उद्दाम होता .
एका कसोटी सामन्यात तो भारतीय संघाला म्हणाला '' कशाला सैन्य /पैसा वाया घालवायचा .आज जो जितेगा काश्मीर उसगा हो जायेगा .
हा किस्सा त्याने भारतात एका शो दरम्यान सांगितला .व अनेक पाकिस्तानी कलीग फुशारकी मारून हा किस्सा मला ऐकवतात .
(माझ्या कडे आता वीरूने सचिनचा सांगितलेला किस्सा आहे '' .बाप ...)

मृत्युन्जय's picture

17 Feb 2011 - 10:22 am | मृत्युन्जय

वासिम आणि वकार हे जगातील माझ्या मत्ते सर्वत्तोम गोलंदाजांची जोडी इम्रान खान ह्याने शोधली .(अगदी अनाहूत पणे हे हिरे त्याला गवसले .) त्यांना स्वताच्या तालमीत तयार केले .

एकदम बरोबर. किंबहुना जेव्हा वासिम अक्रमने पदार्पण केले तेव्हा त्याला आंतरराष्ट्रीय सामन्याचा तर सोडाच, देशांतर्गत स्पर्धेचा सुद्धा फारसा अनुभव नव्हता. त्यामुळे तो प्रत्येक षटका आधी इम्रान खान कडे सल्ला मागायचा की चेंडु कसा टाकावा. त्याच्याकडे प्रतिभा तर मुळात होतीच, इम्रान खानच्या सल्ल्याबर्हुकुम तो व्यवस्थित गोलंदाजी करु शकायचा. सुरुवातीचे काही दिवस गोलंदाजी त्याची आनि डोके इम्रानचे होते. नंतर अर्थातच वासिम अक्रम महान गोलंदाज झाला. मला तर त्याचाअ प्रचंड तिटकारा होता. त्याला आम्ही "वासिम अक्रम पुरता चक्रम" म्हणायचो. इम्रान खानला सुद्धा एक मित्र "इम्रान खान संडास घाण" म्हणायचा. त्या वयात त्या दोघांबद्दलही प्रचंड तिटकारा होता.

वासिम अक्रम आणि वकार बद्दल बोलताना एकदा इम्रान म्हणाला होता की वासिम अक्रम वकार पेक्षा कितीतरी आधिक गुणवान गोलंदाज आहे परंतु वकारकडे प्रचंड विजिगिषु वृत्ती आहे तो कधीही हार मानत नाही, त्याच्याकडे किलर इंस्टिंक्ट आहे जे वासिम कडे कमी आहे.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

16 Feb 2011 - 11:56 pm | निनाद मुक्काम प...

अब किसकी बारी

अप्पा जोगळेकर's picture

17 Feb 2011 - 12:01 am | अप्पा जोगळेकर

कडक लेखमाला आहे. पाकड्या असुनही इम्रान खान कायमच आवडला. फक्त एकदाच डोक्यात गेला होता. 'सचिन तेंडुलकर मॅच विनर नाही' हे त्याचे आचरट विधान अजूनही लक्षात आहे.

निखिल देशपांडे's picture

17 Feb 2011 - 10:39 am | निखिल देशपांडे

इम्रान खान असणार असे पहिला भाग वाचत असतानाच वाटले होतेच..
इम्रानला पाहिल्याचे आठवते ते फक्त १९९२ च्या वर्ल्डकप मधलेच..
मस्त लेख रे..

मुलूखावेगळी's picture

17 Feb 2011 - 1:45 pm | मुलूखावेगळी

छान लिहिलेस.
आवडलं :)

गवि's picture

17 Feb 2011 - 1:57 pm | गवि

अतिशय इंटरेस्टिंग लेखमालिका..संग्रहणीय एकदम..

एकदम समयोचित आणि डीटेलवार्..तरी मुद्द्याला धरुन.

आवड्या रे मृत्युंजय.. लगे रहो.

पुढची वाट पाहतोय.

अत्रुप्त आत्मा's picture

19 Mar 2014 - 6:17 pm | अत्रुप्त आत्मा

ह्यो बी लेख तुफ्फान!