अख्खा मसूर आणि दीड (शहाणे) आम्ही!

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in जनातलं, मनातलं
14 Feb 2011 - 12:24 am

सातारा रस्त्यावरच्या "अख्खा मसूर'वर बऱ्याच दिवसांपासून डोळा होता. कधीतरी त्याचं नाव कुणाकडून तरी ऐकलं होतं. तिथं जायचं डोक्‍यात होतं, पण योग येत नव्हता. तसा मी फारसा हॉटेलप्रेमी नाही. आहारात चवीपेक्षाही "उदरभरण नोहे' हा मंत्र जपणाऱ्या अंतू बर्व्याचेच आम्ही अनुयायी. त्यामुळं अमक्‍या हॉटेलात तमकी डिश चांगली मिळते वगैरे तपशील माझ्या गावी नसतात. कुणी सांगितलं आणि सहज जमलं, तर मी ठरवून एखाद्या हॉटेलाकडे वाट वाकडी करतो. नाहीतर कुठेही हादडायला आपल्याला चालतं.
तर सांगण्याचा मुद्दा काय, की काल त्या "अख्खा मसूर' म्हणून प्रसिद्ध असलेल्या हॉटेलात गेलो होतो. सिटीप्राईडच्या अगदी समोर असलेलं हे हॉटेल. "अख्खा मसूर' म्हणजे तिथे मसूराचे बहुविध पदार्थ मिळत असावेत, अगदी चटण्या आणि कोशिंबिरीही मसूर घालूनच करत असावेत, असा आपला माझा समज. तशी चौकशीही एकाकडे केली होती. पण प्रत्यक्षात तिथे "अख्खा मसूर' ही एकच डिश मिळते, हे प्रत्यक्ष गेल्यावरच कळलं. तिथेच आम्ही निम्मे खचलो. मुळात त्या हॉटेलचं नाव "अख्खा मसूर' नसून "जगात भारी कोल्हापुरी' असं असल्याचा साक्षात्कारही तिथे गेल्यावरच झाला. आत जाऊन उत्साहानं मेनू कार्ड बघितलं, तर तिथे मसुराशी संबंधित फक्त "अख्खा मसूर' ही एकच डिश असल्याचं लक्षात आलं. ती मागविण्यावाचून पर्याय नव्हता. मग त्यासोबत रोटी मागवली.
रोटी एकाच प्रकारची होती. "व्हीट' वगैरे भानगड नव्हती. तरीपण ती करण्याची प्रक्रिया मनस्वीला दाखवण्याची संधी साधता आली. "अख्खा मसूर'ची चव चाखल्यावर आपण घरात मसुराची उसळ यापेक्षा उत्कृष्ट बनवतो, हे लक्षात आलं. रोटी आल्यावर पदरी पडलं आणि पवित्र झालं या भावनेनं समोर ठेवलेलं हादडायला सुरुवात केली. त्याआधी सभोवार एकदा बघून घेतलं. सगळी टेबल भरली होती आणि लोकही अतिशय प्रेमाने तो अख्खा मसूर रिचवत होते. इतर कसे खातात, हे बघून खाणं बऱ्याचदा श्रेयस्कर असतं. मागे एकदा पुण्यात नवीन असताना मी कॅंपमधल्या "नाझ'मध्ये बन-मस्का उत्तम मिळतो, असं ऐकून तिथे खायला गेलो होतो. ऑर्डर दिल्यानंतर वेटरनं "चहा हवाय काय,' असं प्रेमानं विचारलं. मी "नको' म्हणून गुर्मीत सांगितलं. त्यानं एक भलामोठा पाव समोर आणून ठेवला. हा "बन' असावा असा समज करून घेऊन मी हरी-हरी करत पुढच्या "मस्का'च्या डिशची प्रतीक्षा करत बसलो. तो काहीच आणीना, तेव्हा "बन-मस्का' म्हणजे मस्का लावलेला पाव असावा, असा साक्षात्कार मला झाला आणि मग निमूट चहा मागवून मी स्वतःचा पचका वडा करून घेत तो बन घशाखाली घातला.
या वेळी असं काही होऊ नये म्हणून ही काळजी घ्यावी लागली. सगळे जण मसुरावर ताव मारत होते. आम्ही देखील ते मसूर घाशाखाली घातले. चव बरी होती, पण त्यात 70 रुपये देण्यासारखं काही नव्हतं. बायको-मुलीला घेऊन जाऊनही जेवणाचं बिल 230 रुपये येणं एवढाच काय तो माझ्या दृष्टीनं "प्लस पॉइंट' होता.
फक्त मिसळपावाची, फक्त मस्तानीची, फक्त वडा-पावची हॉटेलं ऐकली, पाहिली होती. फक्त चहाच्या "अमृततुल्य'मध्येही हल्ली क्रीम रोल, पॅटीस, सामोसे वगैरे मिळतात. या "अख्ख्या मसूरा'त त्या भाजीशिवाय दुसरी कुठलीही भाजी निषिद्ध होती. "खायचा तर हा अख्खा मसूरच खा. नाहीतर अख्खे तसेच घरी परत जा,' अशी संचालकांची भूमिका असावी.
अख्खे 230 रुपये मोजून मसुराची उसळ आणि रोटी खाल्ल्यानंतर पुन्हा कुठल्या तरी हॉटेलात व्यवस्थित जेवण करायचं, असं आश्‍वासन हर्षदा आणि मनस्वीला दिल्यानंतरच मी अख्खाच्या अख्खा घरी येऊ शकलो!
...

मुक्तकअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

योगप्रभू's picture

14 Feb 2011 - 3:36 am | योगप्रभू

अभिजित भाऊ,
पुण्यात तुम्हाला ऑथेंटिक अख्खा मसूर मिळणार नाही.
रत्नांग्रीला जाताना सातार्‍याला थांबलात तर ढाब्यांवर मिळेल.
कराडला विमानतळ रोडला शिवराज नावाचा ढाबा आहे. तो अख्ख्या मसुरासाठीच प्रसिद्ध आहे.
पण मी खाल्लेला अफलातून 'अख्खा मसूर' म्हणजे चिपळूणवरुन आपण कराडकडे येताना घाट चढून वर आलो की लगेचच एक ढाबा आहे. बहुतेक ट्रकवाले इथे थांबतात. झणझणीत डिश आणि गरम रोट्या. हाण सख्याहरी..

(बाय द वे तुमी आमास्नी वळिखलत का? :))

निवांत पोपट's picture

14 Feb 2011 - 7:29 pm | निवांत पोपट

शिवराज मध्ये अख्खा मसुर चांगला मिळतोच. मग तुम्हाला रफिकभाईचा फाइव्ह स्टार धाबा पण नक्कीच माहीत असणार.

मसूराची उसळ हाटेलात जाऊन खायची हा विचारच आधी पचवावा लागेल.
वडापाव, भेळ, पाणीपुरीच्या गाड्यांवर फक्त तेवढच मिळालं तर चालतं पण जेवायला गेल्यावर प्रत्येकाला आपापल्या बर्‍यापैकी आवडीची डीश मिळावी अशी अपेक्षा असते. पुण्यात पुर्वी असं असल्याचं आठ्वत नाही. हे कोल्हापुरी मनुष्याचं हाटेल असावं. तिकडे तशी पद्ध्त असावी.
अवांतर: या प्रतिक्रियेशी कोदांचा संबंध नाही हे आधीच सांगतीये.

गोगोल's picture

14 Feb 2011 - 7:59 am | गोगोल

कोदा चा एव्ह्ढा धसका घेतलाय का? :p

कोदांचा धसका नाही घेतला. कुठंही कोल्हापूरचा उल्लेख आला कि कारण नसताना त्या बिचार्‍यावर दोन चार वार होतात.
तसे होवू नये म्हणून स्पष्टीकरण दिले. असो.

जेवायला गेल्यावर प्रत्येकाला आपापल्या बर्‍यापैकी आवडीची डीश मिळावी अशी अपेक्षा असते. पुण्यात पुर्वी असं असल्याचं आठ्वत नाही. हे कोल्हापुरी मनुष्याचं हाटेल असावं. तिकडे तशी पद्ध्त असावी.

अहो ते मुद्दाम अख्खा मसुर खायचा म्हणून गेले आणि वर रडतायत की मसुराची उसळ खायला लागली म्हणून. यात कोल्हापूरी मनुष्याचा (कोल्हापूरात याला माणसाचा असे म्हणतात) काय दोष?

आधी चौकशी तर करायची काय आहे हा प्रकार ते? आणि दुसरे पदार्थ मिळत असतीलच की. एका फॅमिली ला २३० म्हणजे काही फार नाही. पुण्यात कुठल्याही 'प्युअर वेज' (अगदी समर्थ ते सदगुरू) मध्ये जेवायले गेलो तरी नक्कीच ज्यास्त पैसे पडतील.
आपापल्या आवडीचे मिळणे ही पुण्यातली पद्धत आहे. म्हणजे चायनीज ते पंजाबी एकाच ठिकाणी. ऑथेंटिक असा काही प्रकार नाही.

- ओंकार.

हा हा, पण असे तुमच्या एकुलत्या दिडशहाणेगीरीवर का भागवताय? आम्हालातरी पुरी मेजवानी द्या.

विसुनाना's picture

14 Feb 2011 - 12:11 pm | विसुनाना

ही डिश इस्लामपूर / पेठ वडगाव भागात रामक्र ४ (एनेच फोर) वर प्रथमतः प्रसिद्धी पावली.
कोल्हापूर ते सातारा या भागातील खवैय्ये बहाद्दर रात्री खास 'गाडी काढून' ही डिश खायला ५०-६० किमी अंतर काटून जात/येत. कोल्हापुरात काही नवी टूम निघाली की तिचा भलताच पाठपुरावा होतो हे निरीक्षण आहे.
तद्नंतर हळूहळू अख्खा मसूर देणारी अनेक हाटेल -कम- धाबे कोल्हापूर -सांगली-सातारा जिल्ह्यात एनेच फोरवर उदयास आले.
स्टार गुटखा व स्टार उद्योग समूहाने (संजय घोडावतप्रणित) काढलेल्या हायवे कँटीन मध्ये आता 'जगात भारी कोल्हापुरी' या ब्रँडखाली अख्खा मसूर मिळतो. कोल्हापुरी नॉन-व्हेजची 'व्हेज चव' हवी असलेल्यांनी ही कल्पना उचलून धरली आहे.(मसूरात प्रथिनेही मोठ्या प्रमाणावर असतात.)

कांदा-टोमॅटो - लसणीची ताजी पेस्ट अंमळ जास्तच घातलेली घट्ट, झणझणीत (तिखट) अख्ख्या मसुराची उसळ जर घरात करता येत असेल तर अख्खा मसूर खायला हाटेलात जावे लागू नये.

कांदा-टोमॅटो - लसणीची ताजी पेस्ट अंमळ जास्तच घातलेली घट्ट, झणझणीत (तिखट) अख्ख्या मसुराची उसळ जर घरात करता येत असेल तर अख्खा मसूर खायला हाटेलात जावे लागू नये.

अगदी सहमत. आणि थोड्या प्रयत्नाने हा पदार्थ घरी बनवता येऊ शकतो.

llपुण्याचे पेशवेll's picture

15 Feb 2011 - 1:13 pm | llपुण्याचे पेशवेll

अगदी सहमत. आणि थोड्या प्रयत्नाने हा पदार्थ घरी बनवता येऊ शकतो.
१०० टक्के सहमत आहे. हल्ली ब्रँड कोल्हापूर झाल्यामुळे त्याच्या नावाखाली काहीही खपवायचे प्रकार चालू आहेत.
कोल्हापूरी मिसळ या प्रकारात अशीच भयाण निराशा आमच्या पदरी पडली आहे. त्यापेक्षा आम्हाला पुण्यातली पोहे घातलेली मिसळ फारच आवडते. त्यातही श्री उपाहार गृह वाल्याचे सँपल फार भारी असते.

मुलूखावेगळी's picture

14 Feb 2011 - 12:14 pm | मुलूखावेगळी

मला तर नाझ चा चहा आनि मस्कापाव आवडला बॉ.

या "अख्ख्या मसूरा'त त्या भाजीशिवाय दुसरी कुठलीही भाजी निषिद्ध होती. "खायचा तर हा अख्खा मसूरच खा. नाहीतर अख्खे तसेच घरी परत जा,' अशी संचालकांची भूमिका असावी.

खायचे तर नाहीतर खाउन मरा सारखेच ना.
@ योगप्रभु
पुण्यात आर्यन एफ. सी. रोड्वर आहे त्या हाटेलात अख्खा मसूर मिळतो आनि चांगला आहे हो.
बहुतेक डाल मखनी मधे हीच दाळ असावी.

आखा मसूर म्हणजे नक्की काय?

ती भाजी असते का अजून काही?
रेसिपी देण्याची विनंती, हिकरच्या बल्लावाचार्यांना करत आहे (फोतुन्सकट)

अरे ते कडधान्य आहे.
गुगलवर मिळेल बघायला.

आजानुकर्ण's picture

15 Feb 2011 - 12:05 pm | आजानुकर्ण

मसूर म्हणजे काय असा प्रश्न विचारलात, म्हणजे कोणत्याच हॉस्टेलच्या मेसशी तुमचा संबंध आला नसावा. टम्म फुगलेल्या ढेकणासारखे दिसणारे हे एक कडधान्य आहे. मेसमध्ये आठवड्यातून ७ वेळा जी आमटी ताटात येते ती मसूराची असते असे खुशाल समजावे.

मृत्युन्जय's picture

15 Feb 2011 - 6:14 pm | मृत्युन्जय

+ १

मसूर म्हणजे काय असा प्रश्न विचारलात, म्हणजे कोणत्याच हॉस्टेलच्या मेसशी तुमचा संबंध आला नसावा.

अगदी! 'काली दाल' या नावाने जो एक भयानक प्रकार मेसमधल्या ताटात वाढून येतो, तो म्हणजे मसूर. ('दाल मे कुछ काला है' या म्हणीचा लॉजिकल अतिरेक म्हणजे काली दाल.)

मेसमध्ये आठवड्यातून ७ वेळा जी आमटी ताटात येते ती मसूराची असते असे खुशाल समजावे.

बरोबर. त्याचप्रमाणे, मेसमध्ये आठवड्यातून ७ वेळा जी भाजी ताटात येते, ती बटाट्याची असते असेही खुशाल समजावे.

(पण आठवड्यातून ७ वेळा मसूर हे जरा अतिशयोक्त वाटते. आमच्या मेसमध्ये 'काली दाल'इतकाच राजमाही तिटकारा येईपर्यंत मिळत असे.)

टम्म फुगलेल्या ढेकणासारखे दिसणारे हे एक कडधान्य आहे.

बरोबर. नेमक्या याच कारणास्तव ते मेसमध्ये वारंवार वापरले जात असावे.

बाकी, मसूर हा प्रकार बरा बनवता येत नसावा असे नसावे. पण बरे बनवण्याचे आणि मेससंस्कृतीचे वाकडे सनातन आहे.

छोटा डॉन's picture

18 Feb 2011 - 10:06 am | छोटा डॉन

>> मेसमध्ये आठवड्यातून ७ वेळा जी भाजी ताटात येते, ती बटाट्याची असते असेही खुशाल समजावे.

ह्या वाक्यामध्ये 'बटाटा' च्या ऐवजी 'भोपळा / बटाटा + भोपळा मिक्स ' अशी नैमित्तिक सुधारणा सुचवतो.
बाकी सर्व सहमत.

बाकी पुण्यात अशी 'पेश्शॅलिटी' असलेली असंख्य 'अस्सल भिकार' दुकानं ( तेच ते , हाटेलं ) आहेत.
पुण्यातच नव्हे तर आख्ख्या महाराष्ट्रात हे लोण पसरत आहे.
कधी पुणे-सोलापुर हायवेने गेलात ( आता ह्या मार्गाला 'हाय-वे' म्हणणे हा विनोदच आहे, पण असो ) तर तुम्हाला कोल्हापुर पेश्शलच्या धर्तीवर सोलापुर पेश्शल 'शेंगा चटणी + दही, धपाटे, पिठलं' इत्यादी सेवा देणारी एकाहुन एक भिकार दुकानं मिळतील ...

असो.

- छोटा डॉन

शिल्पा ब's picture

14 Feb 2011 - 12:25 pm | शिल्पा ब

लेखनशैली आवडली...बाकी मेनू वाचून नाही पटला तर सरळ उठून दुसऱ्या हाटेलात जायचं...

गौरव व्यवहारे's picture

14 Feb 2011 - 2:13 pm | गौरव व्यवहारे

चांगल झाले सांगितले, मी पण विचार करत होतो तिकडे जाण्याचा, आता फारशा अपेक्षा न ठेवता तिथे जाइन मग भ्रमनिरास नाही होणार..

ramjya's picture

14 Feb 2011 - 7:54 pm | ramjya

मी तावरे कौलणीत राहत होतो(भापकर पम्पा शेजारी).....अक्खा मसूर आणी सोल्कढी ची आठवण झाली.....तसेच पन्चमी,साई सागर ,नैवेद्यम आणी तिरन्गा होटेल समोरील cold coffee आठ्वली....मानकर चौपाटी आणी बरेच काही....

गवि's picture

15 Feb 2011 - 12:55 pm | गवि

ते कोल्हापूरकडे जाताना साधारण कराडपासून पुढे अनेक ठिकाणी अख्खे मसूर असं लिहिलेलं असतं ते हे होय?

मला वाटायचं की पेण अलिबागकडे जाताना कडवे वाल, तसे तिकडे मसूर फेमस असावेत.

आठेक वर्षं सांगली कोल्हापूर भागात राहूनही मसूर फेमस असल्याचं ऐकलं नव्हतं. आताशाच झाला असावा.

इतका फेमस झाला आहे तर माझा आपला असा एक अंदाज आहे की झणझणीत मटण मसाला / गरम मसाला वगैरे सारखा काही घटक घालून ती उसळ बनवत असावेत. आता खाल्लीच पाहिजे.

अभिजीत भौ
पुण्यात उगाचच फेमस असलेल्या अनेक गोष्टी आहेत.
तिरम्गाची बिर्याणी हे तेलकट प्रकरण का फेमस आहे हे कधी कळालेच नाही.
बिर्याणी ही फक्त तेलातच बनवायची असते असा तिथे गैरसमज असावा.
पुण्यातले असेच एक प्रकरण म्हणजे "अमृततुल्य" . त्या दोन चमचे चहात पुणेकरांचे चहापान कसे होते कोण जाणे?

योगप्रभू's picture

15 Feb 2011 - 9:12 pm | योगप्रभू

विजुभाऊ,
एखाद्या ठिकाणची चव नाही आवडली म्हणून लगेच शहरावर टिपूर ठेऊ नये. तिरंगाची बिर्याणी नाही आवडली तर एसपी'जची बिर्याणी ट्राय करा. दुर्गाज बिर्याणी खाऊन बघा. अस्सल हैदराबादी खायची असेल तर कॅम्पात गोवळकोंडा हॉटेलमध्ये चक्कर टाका.
पुण्यात अमृततुल्य चहा सगळीकडेच चांगला मिळतो असे नाही. अप्रतिम चहासाठी मोजकी ठिकाणे लक्षात ठेवावी लागतात. त्यातले एक ट्राय करुन बघा. कमला नेहरु पार्क गेट ते शेजारचे दत्तमंदिर या पट्ट्यात एक चहाची गाडी आहे. तिथे चहा मोठ्या काचेच्या ग्लासमधून दिला जातो. पिऊन बघा. दोन चमचांचा हिशेब नक्की मागे पडेल बघा. :)

अख्खा मसूर साठी स्पेशल हॉटेल असतात हे आजच कळाले, हॉटेल मध्ये मात्र मी कधी खाल्ले नाही हे.

पर्वती इस्टेट मध्येच जॉब ला होतो तेंव्हा मात्र हे हॉटेल तेथे कोठे आहे हे माहित नव्हते .. नविन आहे काय ?

चिंतामणी's picture

15 Feb 2011 - 5:22 pm | चिंतामणी

अख्खा मसुर हा कोल्हापुर (आणि त्यानंतर शेजारच्या सांगली) जिल्ह्यात मशहूर प्रकार आहे. जशी कोल्हापुर ब्रँड मिसळीची, नॉनव्हेजची हॉटेल्स सर्वत्र निघाली आहेत तसे कोणीतरी "अख्खा मसुर"चे पुण्यात हॉटेल चालू केले आणि त्यात हे महाशय जेवायला गेले एव्हढेच काय ते समजून घ्या.

पुण्याचे ब्रँडींग नाही चालू येथे.

बाकी पुण्याबद्दल म्हणाल तर मुंबईहून येणारे अनेकजण चितळ्यांकडून किलो-किलो बाकरवडी नेहमी नेतात हे बघून नेहमी कोडे पडते की मुंबईत बाकरवडी मिळत नाही का?????

शरदिनी's picture

16 Feb 2011 - 2:06 am | शरदिनी

मसूर ही एक कंटाळवाणी उसळ आहे..
अख्खा मसूर तर प्रचंड कंटाळवाणी आहे...

सुनील's picture

16 Feb 2011 - 2:11 am | सुनील

मसूर ही एक कंटाळवाणी उसळ आहे..

माझ्या मते, मसूर हे एक कडधान्य आहे. त्याची उसळ करता येते, हा भाग वेगळा!

प्रतिसाद काव्यात असता तरी चालला असता!

आपला अभिजित's picture

16 Feb 2011 - 11:17 pm | आपला अभिजित

अख्ख्या मसूरावरचे २५ अख्खे प्रतिसाद पाहून उचंबळून आलं.
असो.
मसूराविषयी बरेच जण तज्ज्ञ दिसतात. हॉटेलिंग या विषयात मी अगदीच कच्चा असल्याने वादविवादात सपशेल माघार.
पण `फुगलेल्या ढेकणासारखा' हे मसूराचं वर्णन ऐकून अक्षरश: फुटलो!

असो. मी पुण्याविषयी काही टिप्पणी केली नव्हती. पण तथाकथित खवय्यांनी डोक्यावर चढवून ठेवलेल्या हॉटेलांविषयी राग मात्र नक्कीच आहे आणि राहील.

धन्यवाद!

चिंतामणी's picture

16 Feb 2011 - 11:30 pm | चिंतामणी

मी पुण्याविषयी काही टिप्पणी केली नव्हती.

कोण म्हणाले तु टिप्पणी केली आहेस म्हणून?

पण तथाकथित खवय्यांनी डोक्यावर चढवून ठेवलेल्या हॉटेलांविषयी राग मात्र नक्कीच आहे आणि राहील.

तथाकथित खवय्यांची आणि त्यांनी चढवून ठेवलेल्या हॉटेलांची देणार का?

म्हणजे ती सोडुन दुसरीकडे जाईन म्हणतो. ;)