निरोप - तंबुला जसा दिसला!

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जनातलं, मनातलं
13 Feb 2011 - 11:51 am

तो दिमाखात उभा होता- हजारो राहुट्यांच्या मध्यभागी आपला धवल रेशमी अंगरखा फ़डफ़डवित. तुफ़ानांपासून खाविंदांना महफ़ूस ठेवित. खणखणीत आवाजात जणू निसर्गाला बजावित- खबरदार! खाविंद आराम फ़र्मा रहे है. त्यांना परेशान करण्याची गुस्ताखी करू नका. मुद्दाम ठेंगण्या बनवलेल्या दारात, रेशमी कनातींवरची फ़ारसी नक्षीदार अक्षरे आत शिरणाऱ्या कनिजांना आगाह करीत होती- मान तुकवून कुर्निसात करीत खानबहाद्दूरांना सामोरे जा. माथ्यावर लहरणारे हिरवेगार निशाण उंच मानेने बयां करीत होते- अल्लाह परवरदिगारची मर्जी ह्या तंबूच्या मालकावर आहे. त्या हिरव्या झेंड्यावरचा चांद आणि तारा कधीच मावळत नव्हता.

जिथे जाईल तिथे आपले अस्तित्व आवामवर थोपत तंबू रुबाबात खडा असायचा.
त्याचे अंगअंग खानाच्या रणभेरींच्या भेदक पुकाऱ्यांनी थरारून जायचे.
सैनिकांच्या विजयी जल्लोशाने धागा धागा पुलकीत होण्याची त्याला आदत झाली होती.
रणधुमाळीच्या गर्दीत, जखमी सैनिकांचे विव्हळणे कानाआड करायला तो शिकला होता.
आजुबाजुला चाललेला मौतचा नंगा नाच त्याला आवडू देखील लागला होता.
दुश्मनला ही मौत बहाल करणारा मौत का फ़रीश्ता म्हणजे त्याचा खाविंद असल्यामुळे कदाचित तंबू स्वत:ला दिग्गज समजू लागला असावा.

दिवसभरच्या जंगमधे थकून भागून आल्यावर रात्री खानाला आसरा देण्याचे खुषनसीब तंबूला लाभले होते. लोडाला टेकून खान गुडगुडी ओढीत धुराचे लोट सोडायचा. तेव्हा त्या नशील्या सुगंधी नशेने तंबू मोहरून जायचा. यावेळीस कधी त्याला खाली चाललेला नृत्य गायनाचा बहारदार जलसा पहायला मिळायचा. झोपाळलेल्या तंबुला तरतरी देणारा तो मौका असे.
अशा वेळी तंबू आपल्या हजार डोळ्यांनी ती ऐयाषी भोगायचा.

खानाच्या चढत्या कमानीचे असे वेगवेगळे क्षण जरी तंबूने मनसोक्त उपभोगले होते, तरी जेव्हा त्या मनहुस रात्री तंबुला गिळून टाकायच्या, तेव्हा मात्र तंबू मनही मन स्वत: जमिनदोस्त होण्याची तमन्ना करायचा. जिंकलेल्या गावातून खानाच्या पित्त्यांनी कोणी रुपवती ओढून आणलेली असायची. रडून सुकलेल्या चेहऱ्याने ती थरारत्या वेलीसारखी जेमतेम उभी असायची. पुढे काय वाढून ठेवले असेल त्याची कल्पना तिला आली असणारच. नवरा, बाप, किंवा मुलगा नुकताच खानाच्या सैनिकांनी कतल केला असणार. त्याचे दाह थंड होण्याच्या आधीच खानाची हवस तिला जाळायला इथे घेऊन आली असायची. मासूम जनानांशी खानाचे ही बदसलुकी तंबूला बघवत नसे. पण चारी बाजुंनी रोखलेले आपले हजारो डोळे काही केल्या तो बंद करू शकत नसे. जंगमधे दुष्मनची बेरहम कतल करणे, त्याचे तुकडेतुकडे करून गिधाडांना खिलवणे, अगदी त्यांच्या रक्ताने स्वत:ला रंगवून घेणे, खानाचे असे सगळे सैतानी खेल तंबूने शेकडो वेळा पाहिले होते. जिंकलेल्या गावांची जाळपोळ, लुटालुट बघून तंबूचे हजारो डोळे निर्ढावले होते. दुष्मनला चारो खाने नेस्तनाबूद करणे हीच जंगची फ़तेह असते. विजयाचा असा जश्न रास्तच आहे. पण इस्लामचे हुकूम धाब्यावर बसवून बेबस औरतोंके साथ जानवर जैसा सलूक तंबूच्या पचनी पडला नव्हता. त्याच्याच शामियान्यात हवसचा हैदोस बघण्याचे त्याच्या नशिबात होते. खाविंदांच्या विरश्रीवर तंबू कुर्बान होता. पण रोज रात्री चुरगळून बाहेर फ़ेकल्या जाणाऱ्या कळ्या पाहून खानाच्या गळ्याभोवती आपले दोर करकचून आवळता यावे अशी खुदाकडे मन्नत मागत होता.

आत चाललेल्या मसलतींत तंबूने ऐकले होते, की कोणी मरहट्टा बागी सरदार खानाला भेटायला, सुलह करायला येत होता. हा पहाडोंका चुहा बघण्यासाठी तंबू देखील बेताब झाला होता. खानाचे सरदार जरी खानासमोर मोठमोठ्या वल्गना करीत होते, तरी मनातून ते सगळे ह्या पहाडी चुह्याला चळचळा कापत होते, हे तंबूने पाहीले होते. ह्या मरहट्ट्याला पहाण्याची उत्सुकता त्याच्या पराक्रमाच्या गोष्टी ऐकल्यामुळे तर होतीच. खानाकडून जिंकलेल्या देशातील जनानांबरोबर ह्या सरदाराचा सलूक एकदम साफ़ होता अशा गप्पा देखील तंबूने ऐकल्या होत्या. रोज रात्रीच्या खानाच्या हवसकुंडात होरपळलेल्या तंबूला हा कोणता असा मरहट्टी फ़रीश्ता आहे हे स्वत:च्या डोळ्यांनी पहायचे होते.

आणि तो दिवस उगवला. खान लोडाला टेकून बसला होता. तंबूने श्वास रोकून आपली सगळी फ़डफ़ड थांबविली होती. ठेंगण्या दारातून ताठ मानेने मरहट्टी सरदाराने प्रवेश केला. त्याचे राजबिंडे रूप, तरतरीत सरळ नाक, पाणीदार मोत्यांसारखे डोळे! जरावेळ तंबू त्या खोल डोळ्यात बुडून गेला. इतक्यात खानाने स्वागतासाठी उठतांना लोडाखालचा जंबीया हळूच मुठ्ठीत छुपविल्याचे तंबूने पाहीले. दोस्तीचा हात बढवित येणाऱ्या दुष्मनाशी असा दगा! तंबू खामोष झाला. त्या खुबसुरत मरहट्टी योध्याने तंबूला भारावून टाकले. हा चिमुकला वीर लवकरच खानाच्या जंबीयाने हलाल होणार. तंबूने जरी श्वास रोखून सगळी हालचाल थांबविली होती, तरी त्याची काहीच गरज नव्हती. बाहेर वारा देखील मेल्यागत पडला होता. एरवी माथ्यावर लहरणाऱ्या अल्लाच्या चांदताऱ्यांनी देखील मलूल हिरव्या कापडात मुंह छुपविले होते.

खानाने आपल्या अवाढव्य मिठीत पहाडी चुह्याला आवळले. उजव्या हातातील नंगा जंबीया क्षणभर चमकला. त्याची पाशवी धार तंबूने पाहीली, कदाचित त्याआधीच मरहट्टी सरदाराने पाहीली असावी. काय होते ते कळायच्या आधीच तंबूने, आणि आतील बाहेरील सगळ्यांनीच खानाची ह्रदय चिरणारी किंचाळी ऐकली. “दगा दगा” खड्या तलवारी हातात घेऊन काळे कभिन्न हबशी आत झेपावले. पण उशीर झाला होता. एक मरहट्टी सरदार देखील आत घुसला. त्याने खानाला आणि इतर सैनिकांशी झुंज दिली. वाघनखे त्वरेने म्यान करीत राजे- हो! तंबूने देखील आता ह्या खुदाई फ़रिश्त्याला राजे म्हणून संबोधले- राजे चपळाईने तलवार उपसून येणाऱ्या एकेकाला उडवित घुडस्वार होउन दिसेनासे झाले. घोड्याच्या टापाने उडणाऱ्या धुळीत तंबूचे द्वार माखून गे्ले. त्यातली बरीचशी धूळ आत शेवटचे श्वास मोजणाऱ्या खानाच्या रक्तावर बसली.

जनानांवरील अत्याचारानंतर धाय मोकलून गाळलेले त्यांचे आसू तंबुच्या अंगअंगात आजवर चुभत होते. राजेंनी उडविलेल्या धुळीचे कण त्यावर बसून ती चुभन शांत होत होती. तंबूवरील निशाण पुन्हा हळुहळु हलायला लागले होते. परवरदिगारच जणू दरिंद्याला सजा केल्यानंतर फ़रीश्त्याला निरोप देत असावा.

*******

कथामुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

नरेशकुमार's picture

13 Feb 2011 - 12:20 pm | नरेशकुमार

मस्त आवडले.
चित्रा सहीत अजुन आवडले असते.

पैसा's picture

13 Feb 2011 - 12:24 pm | पैसा

भाषा, वर्णन आणि शेवट एकूण छान जमलाय.

५० फक्त's picture

13 Feb 2011 - 1:12 pm | ५० फक्त

अरुण मनोहरजी, आपल्याला नमस्कार,

अतिशय छान लिहिलं आहेत, प्रिंटआऊट काढुन ठेवतो आहे, लेक मोठा झाला की त्याला इतिहास सांगण्यासाठी फार उपयोगी पडेल.

हर्षद.

प्रास's picture

13 Feb 2011 - 1:21 pm | प्रास

सुंदर संकल्पना आणि सुंदर लिखाण......

पुलेप्र......

स्वाती२'s picture

13 Feb 2011 - 4:56 pm | स्वाती२

सुरेख!

दादा बापट's picture

13 Feb 2011 - 9:04 pm | दादा बापट

कौतुक करायला शब्द नाहीत

स्पंदना's picture

14 Feb 2011 - 10:45 am | स्पंदना

शिवाजी महाराज की जय!!

अवलिया's picture

14 Feb 2011 - 7:58 pm | अवलिया

मस्त !!

प्राजु's picture

15 Feb 2011 - 3:10 am | प्राजु

क्या बात है!! सुपर्ब!!
भाषा, शैली, शब्द, सगळंच अंगावर रोमांच उभे करून गेलं.
_____/\_____

दंडवत तुम्हाला.
शिवाजी महाराज की जय!!

आवांतर : याची प्रिंटाअऊट काढून कुणीतरी ब्रिगेड'वाल्यांना द्या दे.. आणि लेखकाचे नाव ठळक अक्षरात लिहा त्यात. :)

नगरीनिरंजन's picture

15 Feb 2011 - 3:17 am | नगरीनिरंजन

मस्त!