गंध मायेचे..

मेघवेडा's picture
मेघवेडा in जे न देखे रवी...
10 Feb 2011 - 4:46 am

रामप्रहरी माय न्हाणी चेतवी, हो धूम्रसंधी
मायमायेनेच होई धूरही इतका सुगंधी!

गाय गोठ्यातून घाली साद, सत्वर माय धावे
वासरा गोंजारूनी मग कौतुकाने सोडी दावे

गोमयाने नटविते जमिनीस माय प्रेमभावे
स्पर्श तो मांगल्यदायी भूमिलाही ओढ लावे

देवचाफ़ा, मोगरा, जास्वंद, प्राजक्ता; अनंता
वाही सादर रोज माय, घे सुगंधा भाग्यवंता

माय घाली नित्य फ़ेरे अंगणी वॄंदावनाला
गंध मायेच्याच मायेचाच येतो मंजिरीला

परसदारी बांव निर्मळ, माय म्हणते माय तीतें
थेंबही त्या पाझराचा तृप्त करितो लेकरांतें

एक क्षणही माय नसता, पोरक्या त्या चार भिंती
गंध मायेचे, घराच्या घरपणाचे बंध होती

बोरकरांच्या ’खूप या वाड्यास दारे’ या कवितेने आणखी नुकत्याच पाहिलेल्या ’गंध’ या मराठी चित्रपटाने हे लिहिण्याची प्रेरणा दिली. छंदबद्ध काव्य लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. हे लिहिण्यास मला सारखं प्रोत्साहित करणार्‍या आणि योग्य सूचना देऊन अनमोल सहकार्य करणार्‍या यशोधरा आणि नंदन यांचे खूप धन्यवाद. :)

शांतरसकवितावाङ्मय

प्रतिक्रिया

असुर's picture

10 Feb 2011 - 5:19 am | असुर

मेव्या!!!
वेड्या, काय लिहीलं आहेस रे! मायेचा श्लेष आवडलाच एकदम!!! फार्फार सुंदर!!!!

गोमयाने नटविते जमिनीस माय प्रेमभावे
स्पर्श तो मांगल्यदायी भूमिलाही ओढ लावे
मला सर्वाधिक आवडलेल्या ओळी! आणि तो 'गोमय' शब्द, खूप दिवसांनी वाचला! आणि गंध रिप्रेझेंट करणारा याहून छान आणि नादमय शब्द नाही आठवला मग!!

आणि मायेबद्दल काय बोलू?? उगाच फार आठवणी जाग्या करु नकोस रे, जीव जायचा अशाने एक दिवस!!

--असुर

प्रकाश१११'s picture

10 Feb 2011 - 5:29 am | प्रकाश१११

गाय गोठ्यातून घाली साद, सत्वर माय धावे
वासरा गोंजारूनी मग कौतुकाने सोडी दावे

गोमयाने नटविते जमिनीस माय प्रेमभावे
स्पर्श तो मांगल्यदायी भूमिलाही ओढ लावे

प्रचंड मस्त लिहिलेस मित्रा

सुरेख!!
पहाटेच वातावरण!! अगदी चित्रदर्शी कविता. सुंदर!!

दैत्य's picture

10 Feb 2011 - 6:17 am | दैत्य

मेव्या, फारच सुंदर लिहिलं आहेस !

मदनबाण's picture

10 Feb 2011 - 7:03 am | मदनबाण

सुंदर... :)

यशोधरा's picture

10 Feb 2011 - 8:55 am | यशोधरा

वा, वा मेव्या, सुंदर!

llपुण्याचे पेशवेll's picture

10 Feb 2011 - 9:24 am | llपुण्याचे पेशवेll

मेव्या मस्तं कविता रे.. फारच छान.

शिंच्या , फार सुरेख लिहिलेंस हो

एक क्षणही माय नसता, पोरक्या त्या चार भिंती
गंध मायेचे, घराच्या घरपणाचे बंध होती

शेवट पण फार सुरेख . :)

एक क्षणही माय नसता, पोरक्या त्या चार भिंती
गंध मायेचे, घराच्या घरपणाचे बंध होती

हे फार आवडलं..

कविता सुंदर !

(अशाच कविता ) लिहित रहा !

अवलिया's picture

10 Feb 2011 - 2:47 pm | अवलिया

मस्त रे !!!

नंदन's picture

10 Feb 2011 - 3:19 pm | नंदन

सुरेख आणि चित्रदर्शी कविता. असुर्‍या म्हणतो त्याप्रमाणे गोमय, श्लेष हे सारंच आवडलं. शेवटचं कडवंही खासच.

अवांतर: मदत - किंवा खरं तर सूचनाच - एक दोन शब्दांपुरतीच. बाकी सर्व श्रेय कवी मेघवेडा यांचेच :)

यशोधरा's picture

10 Feb 2011 - 3:22 pm | यशोधरा

मदत - किंवा खरं तर सूचनाच - एक दोन शब्दांपुरतीच. बाकी सर्व श्रेय कवी मेघवेडा यांचेच

अगदी.

sneharani's picture

10 Feb 2011 - 3:22 pm | sneharani

मेव्या मस्त कविता! :)

वाह सुरेख !!!

छंदबद्ध काव्य लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे.

काव्य वाचुन अस वाटल नाही.
जियो मेरे मेवे. :)

कवितानागेश's picture

10 Feb 2011 - 3:56 pm | कवितानागेश

मस्त लिहिलयंस रे.

प्राजक्ता पवार's picture

10 Feb 2011 - 4:07 pm | प्राजक्ता पवार

छान लिहलं आहेस . कविता आवडली.

माय घाली नित्य फ़ेरे अंगणी वॄंदावनाला
गंध मायेच्याच मायेचाच येतो मंजिरीला

मस्तच रे.......असच लिहित रहा

गणेशा's picture

10 Feb 2011 - 4:56 pm | गणेशा

शब्द न शब्द आवडला .. मस्त कविता

विशेष करुन खालील दोन कडवी जास्त आवडली.

परसदारी बांव निर्मळ, माय म्हणते माय तीतें
थेंबही त्या पाझराचा तृप्त करितो लेकरांतें

एक क्षणही माय नसता, पोरक्या त्या चार भिंती
गंध मायेचे, घराच्या घरपणाचे बंध होती

---------

अवांतर : बांव या शब्दाचा अर्थ मला माहित नाही . प्लीज सांगता का ?

मनराव's picture

10 Feb 2011 - 4:58 pm | मनराव

माझ्या अंदाजे........"विहिर".........

जाणकारांनी प्रकाश टाकावा.............

गणेशा's picture

10 Feb 2011 - 7:36 pm | गणेशा

धन्यवाद मित्रा

छान कविता.
धागा उघडण्याआधी हेच शब्द अपेक्षिले होते.

मितान's picture

10 Feb 2011 - 7:47 pm | मितान

सुंदर !

मेव्या, फार फार सुंदर उतरली आहे पहाट :)

मस्त कलंदर's picture

10 Feb 2011 - 8:20 pm | मस्त कलंदर

ओळ न् ओळ आवडली..
असाच लिहित रहा...

पैसा's picture

10 Feb 2011 - 9:49 pm | पैसा

फर सुंदर!

रमताराम's picture

10 Feb 2011 - 10:45 pm | रमताराम

मेव्या लेका झक्कास जमलीये बर्का. मझा आला.

सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद. :)

नगरीनिरंजन's picture

11 Feb 2011 - 3:44 pm | नगरीनिरंजन

मस्त रे!

छान लिहिले आहेस रे.. येऊ देत अजून!! :)

राघव

पुष्करिणी's picture

28 Feb 2011 - 8:50 pm | पुष्करिणी

सुंदर,

माय घाली नित्य फ़ेरे अंगणी वॄंदावनाला
गंध मायेच्याच मायेचाच येतो मंजिरीला

ह्या पंक्ती विशेष आवडल्या