एक पाषाणी मंदिरे :
गिरिशिल्पे तयार करतांना कलाकाराच्या मनात विचार आला असणार कीं, "अरे, मी डोंगर कोरून मंदिर तयार करतो, दगड घेऊन मूर्तीही बनवतो. मग एक मोठा दगड घेऊन मंदिर का बनवता येणार नाही ? " काम अवघड तर होतेच पण जास्त "चॅलेंजिंगही " होते. तयार मूर्ती, हस्त, तरंग, एके ठिकाणी करून दुसरीकडे मंदिरात बसवणे सोपे होते. आता छिन्नीचा पहिला घाव घालावयाच्या आधी पीठ, भिंत, शिखर आतील व बाहेरील मूर्तीकाम सगळे, सगळे काही एकाच्या नव्हे, सगळ्या कारागीरांच्या मनावर बिंबण्याची गरज होती.आणि हे किती काळा करिता ? वर्ष-दोन वर्षांकरिता ? लक्षात घ्या, वेरुळ्चे कैलास मंदिर हे एकपाषाणी मंदिर घडवावयाला कलाकारांच्या काही पिढ्या लागल्या ! आज संगणकाच्या युगात 3D नकाशा काढणे व त्याच्या अनेक प्रति करणे सोपे आहे पण पंधराशे वर्षांपूर्वी याला चमत्कारच म्हणावयास पाहिजे.
एक पाषाणी मंदिरे सगळ्या भारतात आढळतात. कांगडा जिल्हा (मस्त्रूर), मध्य प्रदेश (धामणूर), तिरुनेलवेली (कगमुविल), वेरूळ (कैलास व छोटा कैलास), महाबलीपुरमधील रथ याची साक्ष देतात. वेरूळ्चे कैलास व रथ एवढ्यांचीच माहिती आपण येथे बघू.
कैलास :
जगामधील ही अशी एकमेव वास्तू आहे. डोंगराच्या दरडीपासून काटकोन करून ६३ मीटर लांबीचे दोन चर खणण्यात आले. आतल्या टोकांना जोडणारा ४५ मीटर लांबीचा चर खणून ६३मी.x 45 मी x ३० मी. उंच (किंवा खोल म्हणा) असा एक महाप्रचंड खड्डा तयार झाला. त्यात होता ५० मी. लांबीचा (पूर्व-पश्चिम), ३३ मी.रुंद व २९ मी. उंच शिलाखंड. कैलास निर्माण करण्यासाठी समोर होता पट्टडकल येथील विरुपाक्ष मंदिराचा आराखडा. चला तर, लावा शिड्या व करा सुरवात शिखरापासून. प्रथम जेव्हा ऐकले की या मंदिराची सुरवात शिखरापासून झाली तेव्हा फार आश्चर्य वाटले होते. पण नंतर जेव्हा या विषयावरील वाचनाला सुरवात केली तेव्हा कळले की सर्वच गिरिशिल्पात सुरवात वरूनच करतात. फोडलेले दगड फेकण्यापासून साफसफाई करण्यास, केलेल्या कामाचे सिंहावलोकन; जास्त योग्य शब्द विहंगावलोकन, करावयास हीच योग्य पद्धत.
वेरुळमध्ये हिन्दु गिरिशिल्पांचा बौद्ध लेण्याशी असणारा निकटचा संबंध प्रकर्षाने प्रचीतीस येतो. चापाकार विधान गाळण्यात आले (महायान काळात बुद्धांनीही तेच केले). सर्वात बाहेर एक ओवरी, आत मंडप, मंडपाच्या तीनही अंगाला चौरस दालने (नंतरच्या काळात चौकटी), चौकटींमध्ये प्रचंड शिल्पपट्ट व मागील भिंतीच्या मधल्या दालनात गाभारा. कैलास हे एकपाषाणी शिल्प असल्याने येथे आतील व बाहेरील दोन्ही बाजूच्या सजावटीला वाव होता. प्रथम इमारतेच्या वैधानिक बाजूबद्दल थोडे. याची शैली द्राविड.
वर सांगितल्या प्रमाणे ज्या शीलाखंडातून मंदिर बनवण्यात आले त्याच्यापेक्षा वेगळ्या अशा आठ मी.चौरस अशा खंडातून नंदीमंडप तयार केला. नंदीमंडपाच्या दोन्ही बाजूंना दोन मोठे ऐरावत व त्यांच्या शेजारी सुबक असे ध्वजस्तंभ उभे आहेत. आणि हो, या भागात न आढळणारे गोपुर, साधे, लहान व शाला पद्धतीचे ! गोपूर, नंदीमंडप व मुख्य मंदिर दुमजली आहेत.नंदीमंडप व मंदिर यांचा पहिला मजला भरीव असल्याने त्याला एकमजली पीठ म्हणावयास हरकत नाही. वरचे मजले एकमेकांना पुलांनी जोडले आहेत. चौरस गाभारा, अंतराळ व चौरस मंडप ही मुख्य अंगे. तीन बाजूंना अर्धमंडप, गाभार्याभोवती प्रदक्षिणा मार्ग व ५ उपमंदिरे आहेत.मंडपात चार खांबांचा एक असे चार गट आहेत. त्यांना अनुसरून भिंतीत अर्धस्तंभही आहेत. गाभार्यात स्तंभ नाहीत.
पीठ किंवा तळमजला हा सर्वात प्रेक्षणीय भाग. जमिनी लगतचा कुंभपट्ट इत्यादी थरांच्यावर एक चांगला रुंद पट्टा आहे. तळमजल्याची
भितच म्हणा; त्यावर हत्ती, सिंह यांच्या पूर्णाकृती मूर्ती पूर्ण उठावात कोरल्या आहेत. त्यावर पट्ट, कुंभ, कपोत. त्यावर येते दुसर्या मजल्याची भिंत. भिंतीवर अर्धस्तंभ मालिका व देवकोष्ट आहेत. माथ्यावर कूटशालाहार असून वर द्राविड पद्धतीचे विमान व त्यावर अष्टकोनी शिखर आहे.
राष्ट्रकूट राजा कृष्ण (इ.स.७५७ ते ७८३ ) याच्या कालात सुरवात झालेया या मंदिराचे काम १०० वर्षे चालले होते. या वेळी द्राविड शैली महाराष्ट्रात प्रचलित नव्हती. तेव्हा ही स्फूर्ती व कौशल्य दक्षिणेतल्या कांचीकडून आले असावे काय ? मंदिराच्या आतील भागावर चुन्याचे विलेपन होते व त्यावर रंगकाम केलेले होते. कैलास सारखेच वेरुळ येथील "छोटे कैलास" ही त्याचीच एक लहान (व कनिष्ट दर्जाची) एक पाषाणी प्रतिकृती.
कैलास येथील मूर्तीकामाबद्दल येथे लिहित नाही. कलेच्या बाबतीत तुलना अप्रस्तुत असते. पण तरीही स्वत:चे वैयक्तिक मत असतेच की नाही ? येथील मूर्तीकाम जिवंत व रसरशित आहे. तुलना जर दुसर्या प्रसिद्ध दिलवाड्याच्या संगमरवरी मूर्तींशी केली तर संगमरवरी मूर्ती निर्जीव वाटतात. एकच उदाहरण देतो : रावण कैलास पर्वत उचलत आहे या शिल्पात शंकर तिकडे दुर्लक्ष करत आहे, बेफिकिरच आहे म्हणा ना. तर पार्वती मात्र स्त्रीसुलभ भीरूपणाने, घाबरून शंकराला बिलगली आहे. हे भाव शिल्पात प्रगट करणे काय सोपे आहे ?
महाबलिपुरम येथील "रथ"
चेन्नाईच्या दक्षिणेला साधारणत: ६० कि.मी. समुद्राकाठी महाबलिपुरम (मामल्लपुरम-महामल्लपुरम) येथे पल्लव राजवटीतील नरसिंहवर्मनने
खोदलेली सहा एकपाषाणी मंदिरे आहेत. याशिवाय, मंदिरे, गिरिशिल्पे, डोंगराच्या उतारावर केलेले शिल्पकाम वगैरे पहावयास किमान दोन दिवस लागतील. आणखी एक आकर्षण म्हणजे आजही तेथे शिल्पकार मूर्ती घडवत असतात.अगदी बाजारात. तुम्हाला पूर्वी कसे काम करत असावेत याची कल्पना येऊ शकते.दोन समुहात हे रथ असून दक्षिण समुहात चार, मध्ये एक व पश्चिमेस एक असे सहा रथ आहेत. द्रौपदी,धर्मराज,अर्जुन व पिडारी हे "कूट" पद्धतीचे रथ आहेत. म्हणजे त्यांची विधाने चौरस आहेत व त्यांना अनुसरून छपरे चारी बाजूंनी उतरती आहेत. भीम आणि गणेश रथ आयताकार विधानाचे व दोहो बाजूला उतरत जाणारी छप्परे असलेले आहेत.त्यांच्या कण्यावर बारीक कळसांची ओळ आहे. चित्रात आपण दोनही पद्धती पाहू शकता. रथ, एक-दोन-तिमजली आहेत. नकुल-सहदेव हा चाप पद्धतीचा रथ आहे व त्याचे छप्पर गजपृष्ठाकार आहे. स्तंभ अष्टकोनी, काहिसे निमुळते असून त्यावर कुंभ आहेत, पायाशी गजमूर्ती कोरलेल्या आहेत. द्रौपदी व धर्मराज या रथात दुर्गा व स्कंद यांच्या मूर्ती आहेत, इतरत्र नाहीत. असे वाटते की या रथांची कामे पूर्ण झालेली नाहीत.
कांगडा जिल्ह्यातील मस्रूर येथे नागरी शैलीतील एकपाषाणी मंदिरे नवव्या शतकात कोरली असून जास्त सौंदर्यदृष्टी ठेवून केलेली आहेत.
पडझड फार झाली आहे. इतर देवी मंदिरांच्या तुलनेत दुर्लक्षित आहेत.
काही छायाचित्रे दिली आहेत. जालावर भरपूर माहिती मिळू शकेल.
(१) यात तुम्हाला डोंगरात खणलेले चर व शीलाखंडातील मंदिर पहाता येते. गज, विजयस्तंभ, विमान, शिखर आदी वरून फोटो काढला असल्याने नीट दिसते.
(२) रावण कैलास उचलताना.
(३) महाबलिपुरम येथील रथ. कूटशाला, गजपृष्ट, इत्यादी प्रकार लक्षात येतील.
गजपृष्ट
शरद
प्रतिक्रिया
31 Jan 2011 - 11:44 am | पाषाणभेद
छान ओळख करून देत आहेत शरदराव तुम्ही.
पुर्वीची वास्तूशैली आताच्या काळापेक्षा कितीतरी विकसीत होती असे राहून राहून वाटते.
31 Jan 2011 - 11:49 am | कच्ची कैरी
यातील काही ठिकाणी मी गेलेले आहे पण फोटो नव्हते माझ्याजवळ ,धन्यवाद!
31 Jan 2011 - 11:49 am | प्रचेतस
खूपच सुरेख माहिती.
31 Jan 2011 - 11:55 am | डावखुरा
ऊत्तम माहिती...
शरदकाका पुलेशु...
पुढील भागाच्या प्रतिक्षेत..
31 Jan 2011 - 11:55 am | डावखुरा
ऊत्तम माहिती...
शरदकाका पुलेशु...
पुढील भागाच्या प्रतिक्षेत..
31 Jan 2011 - 11:57 am | llपुण्याचे पेशवेll
मस्तं ओळख करून दिलीत.
31 Jan 2011 - 12:00 pm | यशोधरा
मस्त.
31 Jan 2011 - 12:05 pm | स्पंदना
शेवटी जे कांग्रा जिल्ह्यातल शिल्प आहे ते अर्धवट आहे का? पण त्यात एक्पाषाण अगदी सह्ही जाणवत.
कैलास ची आख्याइका नाही उल्लेखली तुम्ही, म्हणजे हे मंदिर वरुन का खोदायला सुरुवात केली ते?
बाकि फोटोज अन माहिती अतिशय रोचक.
31 Jan 2011 - 12:43 pm | ५० फक्त
श्री. शरद,
आपल्या लेखामालेतल्या या पुष्पाबद्दल अतिशय धन्यवाद.
हर्षद.
31 Jan 2011 - 2:11 pm | मनराव
उत्तम माहिती.............
31 Jan 2011 - 2:32 pm | नन्दादीप
उत्तम माहिती.............फारच छान...
31 Jan 2011 - 8:18 pm | स्वाती२
नेहमी प्रमाणेच माहितीपूर्ण लेख! धन्यवाद!
31 Jan 2011 - 8:27 pm | यशोधरा
हेच म्हणते
6 Feb 2011 - 3:16 am | शहराजाद
उत्तम माहिती
6 Feb 2011 - 12:03 pm | अवलिया
सुरेख लेखमाला चालू आहे