भारतातील देवळे -२
(देवळे ह्या इमारती आहेत. आज ह्या इमारतींच्या प्रमुख भागांची,जोते(पीठ), दरवाजा, भिंत आणि छप्पर यांची माहिती घेऊं)
देवळांची उत्क्रांती कशी झाली याचा मागोवा घेण्याआधी सुरवातीला काय होते ते बघू. देवळाच्या अत्यंत गरजेच्या गोष्टी तीन.मूर्तीकरता जागा म्हणजे गाभारा. लोकांना (म्हणजे भक्तांना/पुजाऱ्याला) जागा, त्याला मंडप म्हणू आणि प्रदक्षिणॆकरिता जागा. कोणत्याही इमारतीला भिंती,दरवाजा व छप्पर लागणारच. लहान-मोठा आकार व सुशोभन हे नंतर.
सुरवात तिगवा येथील कंकाली मंदिरापासून करू. फोटो पहा. भिंती दगडाच्या, साध्या दिसतात.; गाभाऱ्यावर आणि मंडपावर सपाट छप्पर आहे. प्रदक्षिणा मार्ग इमारतीच्या बाहेर व तो आच्छादित नाही. आच्छादित असेल तर त्याला "सांधार" म्हणतात, नसेल तर "निरंधार". येथे निरंधार. आत थोडे सुशोभन केले आहे.गंगा यमुना यांच्या मूर्ती आहेत.आकारही तसा लहानच म्हणावयास हरकत नाही. ही झाली सुरवात.
देवळांचे दोन प्रकार. पहिला उघड्यावरील देवळॆ. दुसरा प्रकार म्हणजे डोंगर कोरून केलेली गिरिशिल्पे. काल गणनेने गिरिशिल्पे आधीची.पण आपण त्यांचा विचार नंतर करू.
देऊळ म्हणजे इमारतच. तर आता या ठिकाणीच इमारतींच्या भागांचा विचार करू. पाया किंवा जोते, दार, भिंती, छप्पर ही महत्वाची अंगे. खालची फरशी सगळीकडे सारखीच, दगडाची.
पीठ :
पीठ म्हणजे जोते. इमारतीच्या मजबूतीसाठी जोते पाहिजेच. शिवाय ते जमीनीपासून उंचही पाहिजे. तेवढेही पुरेसे वाटले नाही तर त्याच्यावर उपपीठ किंवा चौथरा. पीठ/उपपीठ जर प्रशस्त असेल तर देवळाभोवती प्रदक्षीणेला जागा मिळते. पीठ/उपपीठ उंच असल्यास त्याच्या थरामध्ये निरनिराळ्या प्राण्यांच्या आकृती/शिल्पपट्ट दाखवता येतात. उदा. खाली हती,त्यावर घोडे वगैरे.
पाया मजबूत असला की इमारतीला मजबूती मिळते हे झालेच पण पावसाळ्यात साचलेल्या पाण्यापासून बचाव व मंदिर लांबवरून दिसते हेही महत्वाचे फ़ायदे..
निरनिराळ्या कालखंडातील पीठाची छायाचित्रे देत आहे.
पीठ १
पीठ २
पीठ दिसते पण सजावट नाही.
उपपीठ
उपपीठ लहान आहे पण सजवले आहे. आपणास याहून उंच उपपीठे (छान सजवलेली) पहावयास मीळतील.
द्वारशाखा :
द्वारशाखा म्हणजे प्रवेश करावयाची जागा.कडी-कोयंडा-कुलुप लावून बंद करावयाचा घराचा दरवाजा नव्हे. बऱ्याच ठिकाणी बंद करावयाचा दरवाजा नसतोच. द्वारशाखा समोरून तसेच बाजूंनीही असातात. चौकट एक असते किंवा अनेक. काही वेळा चौकट नसतेही. दोन बाजूंच्या भिंतीच ते काम करतात. चौकट (किंवा चौकटी) करावयास व सुशोभनास सोप्या. दोनही बाजूला गंगा-यमुना किंवा द्वारपाल उभे केले की एकदम उठाव येतो. रुंदी व उंची आटोपशीर असल्याने नाजूक कोरीव कामास आदर्श. देवळात प्रवेश करण्या आधीच तुमचे मन उल्हसित होऊन जाते. या पुढे जेंव्हा कुठल्याही देवळाला भेट द्याल तेंव्हा दारापाशी थांबा.दोन्ही बाजूचे द्वारपाल बघा. चौकट एक आहे की अनेक आहेत, त्यांवर वेल-पताकांचे न्क्षीकाम आहे की लहान मूर्ती आहेत, वरपर्यंत एकच थर आहे की अनेक, अनेक असतील तर त्यांत काही योजना दिसते का, वरची गणेशपट्टी दरवाजाच्या किती बाहेर गेली आहे, त्यावरील कोरीव काम कसे आहे, वर कीर्तिमुख वगैरे काय काय आहे हे सर्व बघून मगच आत पाऊल टाका.( फ़ोटो काढावयाची सुरवात येथून होते.घरच्या माणसांचे/मित्रांचे छान फ़ोटो येथेच येतात.जास्त वेळ थांबणार असाल तर उन्हाचा अंदाज घेऊन फ़ोटो केंव्हा काढावयाचे तेही ठरवा.)
येथे काही द्वारशाखांची छायाचित्रे देत आहे. ती एका कालखंडातील नसली तरी सुरवातीपासून दरवाजे कसे नटवले जात याची कल्पना येईल.
मकरतोरणांकित, पण फार सजावट नाही. पापनाथ मंदिर
कडेला मूर्ती आल्या. वरची पट्टीही प्रेक्षणीय
भिंत :
इमारतीचा दुसरा भाग भिंत. खोली बंदिस्त करणे ही महत्वाची गोष्ट. पण आणखी दोन उपयोग म्हणजे सुशोभन आणि छपराला आधार देणे. तिगवाच्या देवळाच्या भिंती साध्या आहेत. छपराला आधार देणे हे महत्वाचे काम. पण पुढे सुशोभन एवढे महत्वाचे झाले की हळेबिड-बेलूर येथील देवळांच्या भिंती दिसतच नाहित. दिसतात मूर्ती, मूर्ती आणि परत मूर्तीच. हां,भिंती छपराला आधार देतात, पण जणू नाइलाजाने. अंगभर दागिने घालून,रेशमी शालू नेसून, सुहास्य वदनाने पाहुण्यांचे स्वागत करणाऱ्या वधूमातेने थोडा वेळ नवर्याबरोबर कन्यादानाला बसावे तसे! लक्षात राहते ती पहिली प्रतिमा, दुसरी नव्हे. खरे म्हणजे या भिंती चांगल्या जाडजूड असतात. मोठे वजन पेलण्याकरताच त्यांची योजना असते. शिवाय सुरवातीच्या गिरिशिल्पात, थोडक्यात गुहेत, गेल्यावर जसे गार व काळोखलेले वाटेल तसे वाटावे हीही एक मनोकामना होती.( प्राग-ऐतिहासिक काळात उघड्यापेक्षा गुहेत माणसाला जास्त सुरक्षित वाटत असावे. त्याचा तर हा परिणाम नाही ना?) . माणूस नवे निर्माण करतांना " जूने जाऊ द्या मरणालागूनी" असे फ़ार वेळी म्हणत नाही. मागच्यातले चांगले घेऊन त्यात भर घातली जाते. मग ते शास्त्र असो, कला असो, सामाजिक नीतीनियम असोत. अजूनही घरातील देवघर भगभगित उजेडात नसते व तेथे विजेच्या दिव्यापेक्षा समई-पणती जास्त बरी वाटते. असो. या भिंतीना आतील व विशेषत: बाहेरच्या बाजूंनी नटवतांना निरनिराळ्या पद्धती वापरण्यात येतात. रथ, थर, देवादिकांच्या मूर्ती, रामायण-महाभारतातील कथा, रुपके, फ़ुले-वेली, मिथूने, जे जे कलाकाराला योग्य वाटेल, त्याचा उपयोग केला गेला आहे. नंतरच्या काळात या भिंती शक्यतो एका सरळ रेषेत येत नाहीत ना इकडे लक्ष दिले गेले. बघणाऱ्याची नजर सावकाशपणे फ़िरेल, त्याला छायाप्रकाशाचा खेळ बघावयाला वेळ मिळेल याची काळजी घेतली गेली. काही छायाचित्रे पहा.
रथ. भिंतीतून पुढे आलेले खांब. काही वेळा यांत व मूर्तींमध्ये भिंतच सापडत नाही.
छप्पर :
हा इमारतीचा भाग केवळ शिल्पीच्या आवाक्यातला नव्हता. आता गरज होती वास्तूशास्त्रज्ञाची. (Architect & Engineer). खऱ्या अडचणींना इथे सुरवात झाली. हा महत्वाचा भाग अनेक शैलींमुळेही जास्त जागा घेणारा आहे. त्याची चर्चा पुढील भागात करू.
पहिल्या भागात व या भागात दिलेल्या काही माहितीची चित्रे बघा. जर आणखी एखाद्या विशेष गोष्टीबद्दल
विचारावे वाटले तर संकोच नको.
शरद
प्रतिक्रिया
10 Jan 2011 - 6:52 pm | गणपा
मस्त माहिती शरदभौ.
चौथ चित्रं पाहुन शाळेतल्या 'चित्रकलेचा इतिहास' या पुस्तकातल कोणार्कचं सुर्यमंदिर आठवलं
11 Jan 2011 - 12:37 am | डावखुरा
फारच छान लेखमाला चाल्लीय..
अतिशय काटेकोर विवेचन देत आहात..वाचण्यास उत्सुकता वाटत आहे...
मला शंका आहे.. :१] देवी आणि देव यांचे मंदिरात काही वेगळेपण असते का?
२]पुर्वी मंदिर बांधताना दिशेला महत्व दिले गेले होते का?
३]मंदिराचा काही विशिष्ट आकार ठर्लेला असतो का किंवा प्रमाण?
उदा.गाभार्याच्या चौरसाचे मोजमाप अथवा रेशिओ/प्रपोर्शन...
धन्यवाद..
पुलेशु..
10 Jan 2011 - 9:39 pm | यशोधरा
वा! सुरेख. चित्रे अतिशय आवडली. सुरेख कलाकृती आहेत, त्या साकारणार्या कलाकारांना सलाम!
लेखमालेमुळे खूप उत्तम माहिती मिळते आहे. धन्यवाद.
11 Jan 2011 - 8:15 am | सहज
>निरनिराळ्या कालखंडातील पीठाची छायाचित्रे देत आहे.
वरील फोटोतील मंदीरे कोणत्या काळातील आहेत? तसेच ही मंदीरे बनवायला किती कालावधी लागायचा याचा काही उल्लेख कोणत्या ग्रंथात, शीलालेखात आहे काय?
जशी शास्त्रीय संगीताची "घराणी" असतात तशी भारतात मंदीरे बनवणारी घराणी, विशिष्ट शहरे, कारागीर प्रसिद्ध होते काय? त्याविषयी माहीती वाचायला आवडेल. आजच्या काळात बनलेली काही भव्य मंदीरांविषयी काही?
11 Jan 2011 - 12:19 pm | अवलिया
वाचत आहे...
11 Jan 2011 - 12:26 pm | डावखुरा
मंदिराची घराणे नाहीत तर त्यांच्या शैली आहेत..
मुघल शैली,हेमाडपंथी,राजपुत..ई.(चु,भु,दे,घे.) शरद काका प्रकाश टाकतीलच..
पुन्हा त्याच्या जोत्यांच्या आकारानुसार सप्तरथ्,पंचरथ असे प्रकार आहेत..
11 Jan 2011 - 6:35 pm | स्वतन्त्र
दक्षिणेकडील मंदिरांमध्ये,त्यांची प्रवेशद्वारे ज्यांना गोपूर म्हणतात,मूळ मंदिरापेक्षा मोठं का असतं ?
विविध देवांच्या मंदिरांच्या स्थापत्यात फरक असतो का व असल्यास तो का असतो.उदा.खंडोबाची महारष्ट्रातील बहुतेक मंदिरे एकाच स्थापत्यकलेचा नमुना दर्शवतात.
12 Jan 2011 - 7:50 am | शरद
श्री. लालसा ; दिशेला महत्व दिलेले दिसत नाही. आकार प्रांतानुसार (उदा. केरळ) व शैलीनुसार (उदा. होयसाळ) बदलू शकतो. हे शैली या लेखात थोडे विस्ताराने येईलच. आपण म्हणता त्याप्रमाणे प्रमाण ठरालेले नाही.
श्री.सहज : फोटो बघितल्यावर ढोबळ फरक लक्षात यावा. आता सविस्तर माहिती देणे अवघड नसले तरी लेखाच्या लांबीवर त्याचा परिणाम होईल. जालावर आपणास ही सर्व माहिती सहज उपलब्ध आहे.(pun unintented)द्वार साधे आहे की सुशोभित आहे यावरून सुरवातीचे-नंतरचे हे लक्षात येते. या पुढील फोटोंबरोबर कोठले देऊळ ते देतो म्हणजे शोध सोपा होईल.
श्री. स्वतंत्र : गोपूर म्हणजे जमिनीवर उतरलेले शिखरच. ते जमिनीवरच बांधावयाचे असल्याने (भिंतींवर नाही) काम सोपे होते व स्थपतीला वाव जास्त मिळतो. गोपूराकडे द्वार म्हणूनही पहाता येतेच.
पीठांचे फोतो देतांना चूक झाली. आज आणखी एक फोटो बघा.
तेलीका मंदिर, मध्य प्रदेश.
शरद