भारतातील मंदिरे-६
नागर व द्राविड शैली
संगीतात घराणी असतात; ग्वाल्हेर, किराणा, जयपूर वगैरे. म्हणजे काय हो ? शेवटी सगळेजण सारेगम हे सूर व बांधलेले रागच गातात ना ? काय होते, संगीतात सौंदर्य निरनिराळ्या प्रकाराने कलाकाराला भावते.कोणाला सूरात तर कोणाला तालात, कोणाला संथ, विलंबित आलापीत तर कोणाला आक्रमक दृत तानेत, या सौंदर्याची भुरळ पडते. तो संगीतातील या भागाला जास्त मह्त्व देतो. मग घराणी जन्मास येतात. मग रसिकही ग्वाल्हेर गायकीत सुलभ, सरलता, किराण्यात स्वराचा गोडवा तर जयपूर गायकीत विद्वत्ता शोधू लागेतो. सगळ्याच गायकीत स्वराची सच्चाई व तालाचा पक्केपणा गृहित धरलेला असतोच. पण फरक असतोच. हे सर्व कलांत दिसून येते; चित्रकलेत, नृत्यातही. मग मंदिर बांधणीतही हे आढळणारच की. त्यांना म्हणावयाचे शैली. प्रमुख दोन, नागर व द्राविड. केरळ व कर्नाटकच्या थोड्या भागातील वेसर शैलीत गोलाकार देवळाचा प्रकार आढळतो पण तो तसा गौणच. आता एका शैलीतील सर्व मंदिरे सारखी नसतात. एकाच घराण्यातील उ.अ. करीमखॉ, गंगूबाई हनगळ व पं. भीमसेन यांचे गाणे स्वतंत्रच. तसेच नागर शैलीतील राजस्थानातील व ओरीसातील मंदिर वेगळेच. त्यामुळे या दोन शैलींमध्येही उपशैल्या उपजल्याच. गंमत म्हणजे गायनात जशी घराण्यांची नावे स्थानावरून पडली, ग्वाल्हेर, किराना, जयपूर, वगैरे तेच येथेही घडले. राजस्थान-गुजराथ शैलीची मंदिरे निराळी व ओरिसातली निराळी; दोन्हीही नागर शैलीचीच बरे का. या शिवाय मंदिरे बांधतांना प्रचंड प्रमाणात पैसा पाहिजे. तो पुरवणार राजघराणे. तेंव्हा त्यांच्या नावाच्या उपशैल्या आल्या. वाकाटकांच्या काळात बांधली गेली ती मंदिरे वाकाटक शैलीची. होयसाळांच्या राजवटीतील शैली होयसाळ शैली. उत्तरेत चंदेल राजांनी पैसा पुरवला, मग खजुराहो येथील मंदिरे चंदेल शैलीची. ( विसाव्या शतकात बिर्लांनी अनेक शहरात मंदिरे उभी केली, ती "बिर्ला मंदिर" या नावानेच त्या गावात ओळखली जातात; म्हणूनच म्हटले आहे "धन मूलमिदं जगत " ) हां, प्रत्येकातला फरक दाखवता येतो पण नावे पडली ती अशीच. तुम्ही विचारलेत "नावात काय आहे ?" तर उत्तर देणे अवघड आहे.Rose is a rose is rose हे खरेच. पण प्रत्येक शैलीची वैशिष्टे माहीत असतील तर कोणार्कला काय पहावयाचे व बेलूरला काय हे तुम्ही जास्त डोळसपणाने ठरवू शकाल. गायनातला आनंद मिळवतांना गायकाच्या घराण्याचे नाव माहीत पाहिजे असे नाही. पण घराणे व त्याची वैशिष्टे माहीत असतील तर हा आनंद जरा वरच्या दर्जाचा असेल. असो. नमनाचे तेल थोडे जास्तच जळले.
आपण पाहिले की सुरवातीला मंदिर म्हणजे गाभारा, लहानसा मंडप व वर सपाट छप्पर. बांधणार्याला फारसा वाव नव्हता. जेंव्हा आकार वाढला, सजावटी, रुपके, स्तंभ वाढले तेंव्हा खरी मजा आली. आता कलाकाराला कल्पनेचे पंख फुटले. एक म्हणाला, " माझे मंदिर उंच असणार. त्याचे शिखर पाच कोसावरून दिसले पाहिजे." दुसरा म्हणाला, "उंचीला काय मह्त्व द्यावयाचे ? भक्त काय माकडासारखे वर चढून बसणार आहेत ? त्याच्या ऐवजी माझा मंडप दोन हजार भक्तांना पुरून उरेल. मंदिराच्या कल्याणमंडपात एक काय दोन लग्ने लावा." झाला दोन शैलींचा उगम. ओरिसा, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्थान, गुजराथ, थोडक्यात उत्तर भारताने हिमालय समोर ठेवून पहिली शैली स्विकारली; तिला म्हणावयाचे "नागर शैली ". दक्षिण भारताने दुसरी कल्पना स्विकारली, तिला म्हणावयाचे " द्राविड शैली". थोडे सुलभिकरण केले आहे, पण कळावयास सोपे. बाकी फरक पुढे बघणार आहोतच.
हेही खरेच कीं कुठे तरी या कल्पनांना प्रत्यक्ष रूप देवून सुरवात केली गेली असली पाहिजे. पट्टडकल, एहोळे, कर्नाटकातील विजापूर-गदगच्या जवळील गावे. इथे तुम्हाला या दोनही प्रकारची मंदिरे शेजारी शेजारी बांधलेली दिसतील. अगदी सातव्या शतकापासूनची. या दोनही शैलीतली मंदिरे आपण बघा. नागर शैलीची राजस्थान, मध्य प्रदेश, येथील नागर मंदिरे पाहिलीत तर पीठाबाहेर मंदिराचा संबंध उरतच नाही असे आढळेल. उलट द्राविड शैलीतील मंदिरांच्या बाहेरचे आवार कित्येक पटीत मोठे असते. उदा.: त्रिचनापल्लीचे श्रीरंगम हे विष्णुमंदिर आकाराने अगदी छोटे आहे. पण त्याला ७ आवरणे (प्राकार) आहेत, एकाबाहेर एक. सर्वात आतले लहानात लहान आहे ८५ मी.x ६३ मी. लांबरुंद, तर सर्वात बाहेरचे आहे ९६० मी.x ८५० मी. लांबरुंद. एकुण १४ गोपुरे आहेत. सर्वात बाहेरच्या दक्षिणेकडील गोपूराचे मोजमाप आहे ४५ मी. लांब व ३५ मी. रुंद. दरवाजा असलेला पहिला मजला आहे २० मी. उंच. गोपूर पुरे झाले असते तर उंची झाली असती १०५ ते ११० मी. चवथ्या प्राकारातला हजारी मंडप आहे १७५ मी. लांब व ५० मी. रुंद. हजारी मंडप नाव असले तरी तितके स्तंभ नाहीत; केवळ ९५३ आहेत ! द्राविड सौंदर्य कल्पना लक्षात आली ना ? ( तुम्हाला दाक्षिणात्य सिनेनट्या व या प्राकारात काही साम्य आढळले तर तो योगायोग समजावा; वास्तुशास्त्रात तसा काही उल्लेख मला दिसला नाही).
आपण मागे पाहिले की शिखर तयार होतांना भूमी (मजले) तयार होतातच. यावर निरनिराळ्या पद्धतीची सजावट केली जाते. मूर्ती, कलश, शाला, गवाक्षे, पट्ट,रथ यांनी भूमी सजवली जाते. नागर शैलीत ही सर्व एकावर एक, एका रेषेत येतात. भिंतीपासून तुमची नजर थेट आमलकापर्यंत पोचते. द्राविड शैलीत तसे नसते. प्रत्येक मजला पृथक पृथक नजरेस येतो. सहज लक्षात येणारा फरक.
तसे काही तांत्रिक भेदभाव आहेतच. पण ते लक्षात ठेवावयास पहिल्या लेखात दिलेले पारिभाषिक शब्द ध्यानात राहिले पाहिजेत व प्रत्यक्ष मंदिर बघतांना तेवढा वेळ देता आला पाहिजे. काही बघू. पण हा भाग तुम्ही सोडून दिलात तरी बिघडत नाही.
(१)छपराची जागा नागर मंदिरात त्रिकोणिकांनी घेतली आणि द्राविड मंदिरात मकरतोरणांनी.
(२) गाभारा, अर्धमंडप व मंडप यांच्या भिंतीचा मिळून जो एक सलग पट्टा तयार होतो त्यात अर्धस्तंभ, स्तंभ यांनी कवाडे करून त्यात मूर्ती बसवणे वा जाळी बसवणे द्राविड मंदिरात आढळते, नागर शैलीतील मंदिरात नाही. कोनाडे आहेत पण ते अर्धस्तंभांमुळे तयार झालेले नाहीत. नंतरच्या मंदिरात मूर्ती सरळ भिंतींवरच बसवल्या आहेत.
(३) नागर मंदिरात कणी,कुंभ अशा थरांची मांडणी दिसते,त्यावर कपोत, त्यावर भूमी व वर शिखर. द्राविड मंदिरात भिंतीच्या माथ्यवर कपोत, कपोतावर कूटशाला यांचे हार व त्यावर विमान व मग शिखर.
(४) प्रगत अवस्थेमध्ये दोनही शैलीतील स्तंभांमध्ये फरक असतो.
(५) दोन्ही शैलीत सौंदर्यकल्पना भिन्न आहेत. नागर शैलीत सर्व आखणी अशी असते की तुम्हाला वास्तु खूप उंच दिसावी तर द्राविड शैलीत विस्ताराला महत्व देण्यात आले. अनुक्रमे "ऊर्ध्ववृत्ती" व "समतलवृत्ती". द्राविड शैलीत प्रात्येक मजल्याच्या पृथक आविष्काराला महत्व दिलेले असते. नागर शैलीत तुमची नजर भिंतीपासून थेट आमलकाकडे खेचली जावी असा प्रयत्न असतो,
(६) असले फरक कितीही असले तरी एका गोष्टीत अजिबात भेद नाही. ती म्हणजे भक्त व देव यांची जवळीक. गाभारा-प्रदक्षिणामार्ग-मंडप सगळीकडे सारखेच, हा भारतीय मंदिराचा अविभाज्य भाग.
(अवांतर : भारतात हिंदु मंदिरात भक्त व देव एका पातळीवर असतात, तुम्ही देवाला "भेटू" शकता, गळामिठी घालू शकता पण ख्रिस्ती चर्चमध्ये येसू बर्याच वेळी भक्तापासून दूर, उंचावर असतो, तो "आकाशातल्या बापाचा" लेक म्हणून तर असे नाही ना ! )
आता थोडी माहिती "उपशैल्यां"बद्दल. वर सांगितले आहेच की निरनिराळ्या राजवटींनी, निरनिराळ्या काळांत, निनिराळ्या राज्यांत मंदिरे उभी केली व त्यांत काही बदल आढळले तर त्या मंदिरांना त्या राजवटींच्या उपशैलीची म्हणावयास सुरवात झाली. येथे मी सर्वांची माहिती देण्यास मला काहीच अडचण नाही पण वाचकांना कंटाळवाणे वाटावयाची शक्यताच जास्त. तेव्हा माहिती पुढीलप्रमाणे देतो. राजवट, प्रांत, काल, गाव व मंदिर. आपण आपल्या सोयीने जालावरून फोटो पहा, सविस्तर माहिती मिळवा.
नागर शैली :
तिसरे ते सहावे शतक... साधी, प्राथमिक पायरीची, प्रायोगिक मंदिरे. तिगवा, देवगड, भुमरा, नाचणा, मध्यप्रदेश. गोप..सौराष्ट्र एहोळे..कर्नाटक.
गुजराथ ..सोळंकी...दहावे ते बारावे शतक.. मोढेरा सूर्यमंदिर,... झालावाड जिल्हा सेजकपूर मंदिर. अबू..जैन मंदिरे.
मध्यभारत ... दहावे-अकरावे शतक... चंदेल..खजुराहो. भेडाघाट .. चौसष्ट योगिनी. ग्वाल्हेर (तेली मंदिर व सास-बहू)
ओरिसा ... तेरावे शतक ..गंग राजवट ...कोनार्कचे सूर्यमंदिर. भुवनेश्वर, पूरी
राजस्थान ... दहावे ते बारावे ...सोळंकी ...औसिया, जगत, चितोडगड.
" " ...तेरावे शतक आणि नंतर .. चितोड..कीर्तिस्तंभ,अबु पहाड,राणकपूर,
माळवा ...(राजस्थान-महाराष्ट्र)... परमार-यादव-शिलाहार वंश..अकरावे शतक आणि पुढे .. उदयपूर, देवास, रामगड, अंबरनाथ, वलसाणे (धुळे), सिन्नर, झोडगे (नाशिक)
महाराष्ट्र ... राष्ट्रकूट...आठवे शतक वेरुळ कैलास मंदिर,(द्राविड), पट्टडकल ..जैन मंदिर
कर्नाटक .. सातव्या शतकाच्या पुढे .. चालुक्य ..पट्टडकल, एहोळे, बदामी... पापनाथ, कुकनुर..नवलिंग समुह.
" " पुढे सहाशे वर्षे .. एका राजवटीचे नाव देण्याऐवजी "कर्नाट" उपशैली म्हणा ...कुकनूर, लक्कुडी, इट्टगी.
द्राविड शैली
कर्नाटक .. सातवे-आठवे शतक ..बदामी.पट्टडकल ..मालेगिती, विरुपाक्ष
वरंगळ ..काकतीय वंश ..बारावे-तेरावे शतक ..हनमकोंड, पालमपेट, वरंगळ,
होयसाळ वंश ..(द्राविड-नागर शैलींचे मिश्रण) ..बारावे-तेरावे शतक ...हळेबिड, बेलुर, सोमनाथपुर.
तामिळनाडू ..पल्लव वंश ..सहावे-आठवे शतक ..महाबलिपुरम, कांचीपुरम.
" " .. चोळ वंश ...दहावे-बारावे शतक .. तंजावर,गंगैकोंड,धारासुरम. या पाद्धतीची मंदिरे सतराव्या-अठराव्या शतकांपर्यंत चालू राहिली
तिरुवल्लर, श्रीरंगम, चिदंबरम, रामेश्वर, मदुरा, विजयनगर, ताडपत्री.
या लेखमालेतला हा शेवटचा लेख.बरेच काही राहून गेले आहे (उदा. हेमाडपंथी मंदिरे) याची मला कल्पना आहे. विसाव्या शतकात नवीन
पद्धतीने बांधली गेलेली मंदिरे, उदा. बिर्ला मंदिरे, अक्षरधाम इ. यांचीही माहिती येणे योग्य झाले असते. पण कोठेतरी थांबले पाहिजेच ना ?
(1) पट्टडकल :पापनाथ मंदिर. येथे नागर व द्राविड शैलीची मंदिरे शेजारी शेजारी दिसतात तसेच दोहोंची सांगड घातली तर कसे दिसेल तेही बघितले गेले. या फोटोत गाभार्याचे शिखर नागर तर शेजारचा मंडप लांबच लांब द्राविड पद्धतीचा. त्याचे छप्पर सपाट आहे. खालच्या नागर देवळात मंडपावर शिखर दिसत आहे.
(२) होयसाळ शैलीचे सोमनाथपुर येथील मंदिर. येथे नागर पद्धतीचे शिखर आहे पण एकूण ठसा बसकट, द्राविड पद्धतीचाच.
(३) खजुराहो येथील कंदरिया महादेव मंदिरात ऊर्धगामी रेषा आपली नजर थेट आमलकाकडे घेवून जातात.
शरद
णी
प्रतिक्रिया
5 Feb 2011 - 1:38 pm | आपला आभि
खरच खूप छान .. हाही लेख आवडला ..
आधीच्या लेखांच्या लिंक मिळाल्या तर बरे होईल ..
तुम्ही थांबू नका लिहित रहा ... पुढचा लेख वाचण्यास उत्सुक आहोत ..
इतिहास प्रेमी
आपला आभी
5 Feb 2011 - 5:15 pm | यशोधरा
सुरेख.
5 Feb 2011 - 5:46 pm | निनाद मुक्काम प...
अमूल्य माहितीचा खजिना
दिन सार्थकी लागला .
5 Feb 2011 - 6:50 pm | प्रचेतस
शरदराव, खूपच सुरेख आणि माहितीपर लेखमाला. पण याचा शेवट निदान हेमाडपंथी शैलीने व्हायलाच हवा. शेवटी आपल्या महाराष्ट्रातील मंदिरांचा इतिहास हेमाडपंथी शैलीशिवाय पूर्ण होउच शकत नाही.
तेव्हा अजून फक्त एक भाग जास्त टाकायचे मनावर घ्याच.
6 Feb 2011 - 2:22 am | स्वाती२
+१
सहमत!
6 Feb 2011 - 7:15 am | शरद
हेमाद्री वा हेमाडपंत हा देवगिरीकर यादवांच्या काळात ( १३ वे शतक) एक वरिष्ट अधिकारी होता. ह्या प्रकांड पंडिताच्या नावावर अनेक धार्मिक ग्रंथ आहेत. एका विशिष्ट घाटाच्या मंदिरांना हेमाडपंती म्हणावयाची पद्धत आहे. यात बांधणीकरिता चुन्याचा वापर केला जात नाही.ठराविक पद्धतीने दगडावर दगड ठेवून किंवा दगडांना खाचा घेवून हे बांधकाम केले जाते. या पद्धतीत पायाची आखणी ज्या आकाराची असेल, नेमकी त्याच आकाराची लहान आकृती शिखरावरील आमलकाची बैठक असते. पायाची आखणी अनेक कोनबद्ध असते. शिखराच्या छोट्या छोट्या प्रतिकृती खालपासून वरपर्यंत एकीवर एक प्रमाणशीर पद्धतीने बसवल्यामुळॆ लहान लहान शिखरे रचून मोठे शिखर तयार केले असे वाटते.ही शिखरे जागच्या जागी रहावीत म्हणून उपयोगात आणलेल्या दगडांवर नक्षीकाम करून उठाव आणतात.शिखरांमध्ये अनेक प्रकार असून अश्वथर, गजथर इत्यादी प्रकार प्रामुख्याने वापरतात. ही शिल्पपद्धती हेमाडपंताच्या नावाने प्रसिद्ध असली तरी अशा प्रकारची देवळे त्याच्या काळाच्या आधीपासून आढळतात.
हेमाद्रीचे नाव देवळे बांधावयाच्या पद्धतीवरून पडले आहे. त्यामुळे अशी देवळे नागर वा द्राविड या दोनही शैलीत बांधता येणेशक्य आहे.आणि आधी सांगितल्याप्रमाणे त्याच्या काळाच्या आधीही अशी देवळे बांधत होतेच. त्याचे स्वत:चे वास्तव देवगिरीला, महाराष्ट्रात असल्याने बरीच देवळे नागरी पद्धतीची आढळतात. विदर्भात, वर्हाडात, जयपुर-कोटली, अमदापूर,शिरपूर, मेहेकर,लोणार, धोत्रा, सातगाव (जि.बुलढाणा), निलंगे, नारायणपुर येथील देवळे बर्यापैकी स्थितीत आहेत. आंध्र प्रदेशातील देवळे या पद्धतीची आहेत पण त्यांचा संबंध हेमाद्रीशी जोडणे अवघड आहे. आपण जेंव्हा वेरुळ-घृष्णेश्वर बघावयाला औरंगाबादला जाता तेंव्हा एक दिवस काढून लोणारला अवष्य जा. उल्का निर्मीत सरोवर, देवळे, सिंदखेडराजा वगैरे एका दिवसात बघून होते.
आज एका पुस्तकाचा परिचय करून द्यावयाचा आहे. श्री. के.आ.पाध्ये यांनी "हेमाद्रि उर्फ हेमाडपंत यांचे चरित्र" नावाचे एक पुस्तक १९३१ साली प्रसिद्ध केले होते. वरदा प्रकाशनचे श्री.भावे यांनी २००८ ला त्याचे पुनर्मुद्रण करून एक महत्वाचे काम केले आहे. नानाविध माहितीचा खजिनाच या पुस्तकात आढळतो.हेमाद्रीचे चरित्र,त्याचे ग्रंथरचना,यादव घराण्याचा इतिहास,मोडीलिपी, महानुभाव वाङ्मय, हेमाडपंती देवळे,इत्यादी विविध भाग असून शिवाय ४ परिशिष्टेही आहेत. वाचनीय पुस्तक.
जालावर अनेक फोटो पहावयास मिळतील
शरद
6 Feb 2011 - 9:38 am | प्रचेतस
शरदराव माहितीबद्दल आभारी आहे. हेमाडपंथी शैली यादवकाळापुर्वीपासूनच महाराष्ट्रात अस्तिवात आहे. फक्त नक्की माहीत नव्हते. कारण हेमाद्रीपंडिताचा आणि आधीच्या मंदिरांचा न जुळणारा काळ. पण तुमच्या स्पष्टीकरणामुळे समाधान झाले. महाराष्ट्रात विविध किल्ल्यांच्या पायथ्याला शिलाहारकालीन भोज राजांनी विशेषतः झंझ राजाने मंदिरे बांधली. त्यात हरिश्चंद्रगडावरील हरिश्चंद्रेश्वर, त्याच्या पायथ्याच्या खिरेश्वरजवळील नागेश्वर, कुकडीकाठचे कुकडेश्वर, रतनवाडीचे अमृतेश्वर. ही सर्व ९/१० शतकातील हेमाडपंथी मंदिरे आहेत.
काही प्रकाशचित्रे पाहा.
रतनवाडीचा अमृतेश्वरः
7 Feb 2011 - 8:41 am | अवलिया
अतिशय सुरेख लेखमाला चालू आहे ... :)