शनिवारी संध्याकाळी भीमाश़ंकरला जायचा कार्यक्रम ठरतो व रविवारी आम्ही ६ जण चुलत, आते भावंडे सकाळी लवकरच निघतो. गाडी मंचर मार्गे घोडेगावला थांबते. मिसळीचा कार्यक्रम उरकला जातो. पुढे शिनोली गाव मागे टाकून डिंभे धरणापाशी येतो. घाट चधून वर जाताच डिंभे धरणाचा विस्तृत जलाशय डोळ्यांसमोर येतो. धरण सर्व बाजूंनी अजस्त्र पहाडांच्या कोंदणात बसलेले दिसते. धरण मागे टाकून पुढे जातो. वाटेत तळेघर, निगडाळे अशी गावे लागत जातात. व थोड्याच वेळात भीमाशंकराच्या सदाहरीत अरण्यात प्रवेश होतो. आता घाटमाथ्यावर आल्याची जाणीव व्हायला लागते. सुखद गार वारा सुटलेला असतो. भीमाशंकर गावात प्रवेश करतो. गाडी पार्कींगला लावली जाते. एस. टी स्टँडच्या मागेच कोकणकडा आहे. आधी कोकणकडा बघितला जातो व आम्ही भीमाशंकरच्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घ्यायला निघतो. भीमाशंकराचे मंदिर खोलवर आहे. पायर्या उतरून खाली जावे लागते. रविवार असल्याने गर्दी असते. रांगेत उभे राहतो. यथावकाश डाकिनी वनातल्या महादेवाचे दर्शन होते. भीमाशंकराचे मंदिर बहुत प्राचीन आहे. पेशव्यांनी याचा जीर्णोद्धार केला. अतिशय सुबक कोरीवकामाने हे हेमाडपंथी बांधणीचे मंदिर सजलेले आहे. मंदिरासमोरच चिमाजीअप्पांनी वसईच्या किल्ल्यातून जिंकून आणलेल्या घंटांपैकी एक अजस्त्र घंटा लावलेली दिसते. मंदिराभोवती पाण्याची २/३ कुंडे आहेत पण अस्वच्छ.
आता आमचे लक्ष्य असते ते गुप्त भीमाशंकर. हे भीमाशंकराचे मूळ स्थान मानले जाते. मंदिरापासून जवळजवळ १.५ ते २ किमीवर असून घनदाट जंगलात वसलेले आहे. भीमानदीचे मूळ उगम ज्योतिर्लिंगात आहे परंतु ती तिथून गुप्त होते असे मानले जाते. ती पुन्हा प्रकत होते ते गुप्त भीमाश़ंकरात असे म्हणतात. देवळाच्या पाठीमागूनच गुप्त भीमाशंकराला जायचा रस्ता आहे. थोडेसे खाली उतरताच घनदाट जंगलाला सुरुवात होते. भीमाश़ंकराच्या जंगलाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वसाधारणपणे घाटमाथ्यावर आढळणार्या खुरट्या झाडांपेक्षा इथले जंगल थोडे वेगळे आहे. इकडे अतिशय मोठमोठे वृक्ष आढळतात. अजस्त्र बुंधा, अतिशय उंच वाढत गेलेले झाड, वेड्यावाकड्या फांद्या यामुळे इथली वने शेकरूचे आश्रयस्थान बनले असल्यास नवल नाही.
आम्ही जंगलात चालतच असतो. वाटेत जागोजागी गुप्त भीमाशंकराच्या मार्गदर्शक पाट्या लावल्यात तसेच एकमेव ठळक वाट त्यामुळे वाट चुकण्याच्या संभव नाहीच. मध्येच सुतारप़क्ष्याची टोक टोक ऐकू येत असते. तांबट कुटुर्र...कुर्र अशी साद घालतो, क्षणात हुप्प्याचे किंचाळणे ऐकू येते, झाडावरून शेकरू थोडीशी झलक दाखवून पसार होते. बाजूलाच रानातल्या एका सर्वांगसुंदर पक्ष्याचे दर्शन होते. पॅराडाइज फ्लायकॅचर अर्थात स्वर्गीय नर्तक. हा लांब शेपटीचा पक्षी अतिशय देखणा आहे.
आता समोर एक छोटेसे मंदिर दिसते ते आहे सा़क्षीविनायकाचे. दर्शन घेउन पुढे जाताच एक तीव्र उतार आपल्याला थेट ओढ्यात घेउन जातो. तीच भीमानदी. ओढा ओलांडून पलीकडच्या बाजूने खाली जायला रस्ता आहे बरोबर ओढ्याच्या खाली एक छोटासा धबधबा दिसतो. त्याच्या खालीच पिंडीसदृश आकार नैसर्गिकरित्या तयार झालाय तेच गुप्त भीमाशंकर. तिथून आम्ही पलीकडच्या बाजूने जाण्यास निघतो. सुरुवातीला अतिशय तीव्र चढ चढून जातो. वाटेत ठिकठिकाणी झाडांवर एक प्रकारची बुरशी दिसते. हीच पावसाळ्यात अंधारात चकाकून निघत असते व सर्व जंगल प्रकाशमान होत असते. हा प्रकार पाहायला मात्र पावसाळ्याच्या रात्री इकडे यायची हिंमत दाखवायला लागते. परत तिकडून पाउण तासात आम्ही मंदिरापाशी येतो. पायर्यांवरील दुकानांतून विक्रीस ठेवलेला गरमागरम कढईतला ताजा खवा व कुंदा विकत घेतला जातो. पायर्या चढून परत पठारावर येतो. आता पुढचे लक्ष्य असते ते हनुमान तळे व त्यापुढील नागफणीचा कडा.
भीमाशंकराचे मंदिर-
गुप्त भीमाशंकरला जाताना-
गुप्त भीमाशंकर
एक झाड फुललेले
क्रमशः
प्रतिक्रिया
30 Jan 2011 - 11:12 am | नन्दादीप
मस्त फोटो आणि प्रवास वर्णन...
तुम्हाला शेकरू दिसले नाही का कुठे???
30 Jan 2011 - 11:15 am | प्रचेतस
पुसटसे दिसले. झाडावरून झर्रदिशी निघून गेले.
30 Jan 2011 - 3:34 pm | पियुशा
शेकरु म्हनजे काय?
बाकि फोटो मस्त!
30 Jan 2011 - 5:53 pm | नन्दादीप
शेकरू म्हणजे मोठी खार. ही खारूताई बहूतकरून भिमाशंकर च्याच जंगलात आढळते.
30 Jan 2011 - 6:08 pm | नन्दादीप
१.
२.
वरील चित्र जाला वरून घेतलेली आहेत...
(वि.सू. : प्रतिसाद कोणी उडवायच्या आत फोटो बघून घे पियुषा...)
31 Jan 2011 - 1:04 am | धनंजय
आता वरील एका चित्राचा पत्ता
https://lh5.googleusercontent.com/_okkXzoNantY/TUVZ9C1L8qI/AAAAAAAAAL8/E...
असा आहे.
यावरून कोणाला कळणार आहे की श्रेय कोणाला द्यावे.
तुम्ही हे चित्र जालावरून कुठूनतरी शोधले असेल ना? उदाहरणार्थ गूगलवर "shekru" चित्रे शोधून मला हे चित्र सापडले (वरती तुम्ही दिलेलेच):

आता याच्याखाली कोणाला श्रेय द्यायचे हे कळेल असा दुवा द्यायला तुमचा काय पैसा किंवा अभिमान खर्च होतो?
श्रेय आणि (c): अचिंत्य पाटील (दुवा)
वरील दोन शब्द एक दुवा टंकायला (कॉपी-पेस्ट) करायला मला काही सेकंद लागले. गूगल शोधापेक्षा पुष्कळ कमीच वेळ लागला.
हे जे कोण अचिंत्य पाटील आहेत, त्यांनी त्यांना श्रेय न-देण्याचा आपला हक्क असल्यासारखे हे जे काय ध्वनित होते आहे... श्रेय न-देणारी चित्रे काढून टाकल्यास मोठा जुलूम होतो आहे असे काहीतरी ध्वनित होते आहे.
श्रेय देण्यासारख्या मित्रपूर्ण, नैतिक आणि स्वस्त कृतीबद्दल तुम्हा-आम्हाला आकस का बरे वाटत असावा?
31 Jan 2011 - 12:45 pm | नन्दादीप
सारी शक्तिमान...जरा घाईत होतो.....पुन्यांदा अशी चूक व्हणार नाही. आनि आकस वगैरे काही नाही...मागे एकदा प्रयत्न केला होता...काय बी उपेग नाय झाला.....
30 Jan 2011 - 11:21 am | बबलु
९० मध्ये गेलो होतो (शाळेला सुट्टी लागल्यावर) त्याची आठवण झाली.
गुप्त भीमाशंकर ची पायवाट मस्त आहे. विहिर आहे का अजून ?
30 Jan 2011 - 11:44 am | प्रचेतस
विहीर अगदी सुरुवातीलाच आहे. मंदिरामागून जिथे पायवाट सुरु होते. त्याच्या शेजारीच.
30 Jan 2011 - 1:15 pm | गणपा
मस्त रे वल्ली.
९३ ते ९७ सलग पाच वर्षे पहिल्या श्रावणी सोमवारी आम्ही भिमाशंकरला चढुन जायचो. आमचा १३-१४ जणांचा ग्रुप असायचा. कर्जत पर्यंत ट्रेनने. मग कर्जतगते खांडस एस्टी. आणि मग खांडस वरुन ट्रेक चालु.
जुन्या आठवणी परत जाग्या केल्यास.
31 Jan 2011 - 11:12 am | प्रचेतस
कोकणातून भिमाशंकरला यायला पण तीन घाटवाटा आहेत.
खांडसवरून येणारी गणपती घाटाची सौम्य वाट, पदरगडावरून जाणारी शिडी घाटाची अवघड वाट,
रानशीळ घाट म्हणूनही अजून एक घाटवाट आहे.
30 Jan 2011 - 1:33 pm | इरसाल
मीही गेलो होतो मित्रमैत्रिणी बरोबर गणपा म्हणतोय त्या मार्गे कारण मी तेव्हा सुगवे (खांडस अगोदर २०/२२ किमी) इथे राहत होतो तिथून बस ने खांडस आणि खांडसहून पायी भीमाशंकर.५ ते साडे ५ तास लागले होते.आणि विशेष म्हणजे आमच्याबरोबरच्या मैत्रिणी उत्तर भारतीय असल्याने पूर्ण भीमाशंकरला पोहचेपर्यंत पाणीही प्यायल्या नव्हत्या म्हणे दर्शनापूर्वी पाणीही पिणार नाही.
30 Jan 2011 - 2:53 pm | कच्ची कैरी
फोटो बाघुन मलाही भीमाशंकरला जावेसे वाटत आहे ,बरेच एकुन आहे भीमाशंकरबद्दल पण कधी जाण्याची संधीच मिळाली नाही .
30 Jan 2011 - 4:32 pm | स्पा
एकदम सुंदर फोटो..
अजून हवे होते.....
31 Jan 2011 - 12:32 am | हेम
मस्त फोटो नि माहिती!. इथून भोरगिरी किल्ला किती लांब आहे? की पुढच्या भागांत आहे? लवकर टाक... शेकरू नि रात्री चमकणार्या बुरशीसाठी भीमाशंकर जंगल प्रसिद्ध!! मी शेकरु सावंतवाडीच्या नरेंद्र डोंगरावर व वासोटयाच्या जंगलात बघितलंय!.... बाकी एका वाईट्ट्ट तंगडतोडीची आठवण झाली. अहुपे घाट चढून कोंढवळ मार्गे भीमाशंकरात कोसळलेलो.!!
.. भीमाशंकरचा बस स्टँड वेगळ्या तालुक्यांत नि मंदिर वेगळ्या तालुक्यांत असा काहितरी लोच्या ऐकण्यात आहे. त्याबद्दल कुणाला काही माहित आहे कां?
31 Jan 2011 - 11:01 am | प्रचेतस
भोरगिरी भिमाशंकराच्या जवळच आहे पण तंगडतोड करावी लागते. राजगुरुनगर-वाडा-मंदोशी-भोरगिरी हाही भिमाशंकरला जाण्याचा गाडीमार्ग आहेच.
भीमाशंकरचा बस स्टँड आंबेगाव तालुक्यात आणि पायर्यांपासूनचा पुढचा भाग खेड तालुक्यात येतो.. त्यामुळे या दोन तालुक्यांच्या आमदारांत मंदिराच्या उत्पन्नावरून नेहमी भांडणे चालू असतात.. :)
31 Jan 2011 - 1:05 am | धनंजय
मस्त चित्रे!
31 Jan 2011 - 1:15 am | प्रियाली
पुढील भाग वाचण्यास उत्सुक.
.
डाकिनी वन? लय भारी नाव आहे. काही खास कारण आहे का या नावाचे?
मंदिरावरील मूर्ती आवडल्या. त्या कोणाच्या आहे? रुद्राक्षमाळा आणि कमंडलू घेतलेले हे योगी कोण? हे प्राचीन मंदिर कुणी बांधले ते माहित आहे का?
31 Jan 2011 - 11:08 am | प्रचेतस
>>डाकिनी वन? लय भारी नाव आहे. काही खास कारण आहे का या नावाचे?
भीमाश़ंकराच्या जंगलाला पुर्वी डाकिनी वन म्हणत. डाकिनी राक्षसीचा श़ंकराने तिथे वध केला अशी आख्यायिका आहे. बारा ज्योतिर्लिंग स्तोत्र तर प्रसिद्धच आहे.
सौराष्ट्रे सोमनाथं च, श्रीशैले मल्लिकार्जुनम् ।
उज्जयिन्यां महाकालं ॐ कारममलेश्वरम् ॥
परल्यां वैजनाथ च, डाकिन्यां भीमशंकरम् ।
सेतुबन्धे तु रामेशं, नागेशं दारुकावने ॥
वाराणस्यां तु विश्वेशं, त्र्यंबकं गौतमीतटे ।
हिमालये तु केदारं, घृष्णेचं च शिवालये ॥
ऐतानि ज्योतिर्लिंगानि, सायंप्रात: पठेन्नर ।
सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति ॥
>>मंदिरावरील मूर्ती आवडल्या. त्या कोणाच्या आहे? रुद्राक्षमाळा आणि कमंडलू घेतलेले हे योगी कोण? हे प्राचीन मंदिर कुणी बांधले ते माहित आहे का?
मंदिर कदाचित भोजकालीन किंवा यादवकालीन असावे. नंतर पेशव्यांनी याचा जिर्णोद्धार केला. कळसाचे काम नाना फडणीसांनी केले. मंदिर व मुर्तींबाबत कदाचित शरद अधिक प्रकाश टाकू शकतील.
31 Jan 2011 - 6:01 am | गुंडोपंत
झकास मस्तच जागा आहे ही.
मात्र जंगलाचा र्हास होतो आहे हे मात्र जाणवते आहे.
31 Jan 2011 - 7:15 am | शुचि
प्रवासवर्णन फारच छान झाले आहे. अगदी चित्रमय.
31 Jan 2011 - 12:50 pm | ५० फक्त
वल्ली, चित्रयम प्रवासवर्णन अतिशय सुंदर आणि छान झाले आहे. त्याबद्दल अतिशय धन्यवाद.
बरेच दिवस जायचं चाललं आहे पण होत नाही, पुढच्या महिन्यांत जमवलंच पाहिजे उन्हाच्या आधी.
31 Jan 2011 - 1:21 pm | परिकथेतील राजकुमार
वल्ली मस्त सुरुवात.
फोटू आणि वर्णन सुंदरच.
पु.भा.प्र.
अवांतर :- तुम्ही सगळे 'भटके' लोक पहिल्या थांब्याला मिसळ गिळल्याचा कायम उल्लेख करता पण त्याचे फोटू टाकायला का बरे विसरता ?
31 Jan 2011 - 1:24 pm | प्रचेतस
तुम्हाला इनो घेण्याची वेळ येउ नये म्हणून. :)
31 Jan 2011 - 4:22 pm | गणेशा
अरे वा मस्त फोटो ..
पुढच्या शनिवार- रविवार अष्टविनायक ला जाणार आहे ,
आणि भिमाशंकर ला पण ..
तुमच्या धाग्याचा नक्कीच फायदा होयील मला.
धन्यवाद
31 Jan 2011 - 5:10 pm | प्यारे१
बम बम भोले.
२००५ साली श्रावणात आम्हीही गेलो होतो. मस्त वातावरण आहे.
छान वाटते.
@ परा.
मिसळीचे फटु काढेपर्यंत 'कढ निघायला' हवा ना...????
31 Jan 2011 - 5:39 pm | स्वैर परी
एका उत्कृष्ट मंदिराचा नमुना आहे हे मंदिर. मन्दिराचे शिखर अगदी सुरेख रितीने कोरलेले आहे. शिखराचि ४ भागांत केलेली विभगणी थेट मन्दिराच्या पायापर्यन्त जपलेली आहे. तिथल्या परिसराला जत्रेच स्वरुप आले होते. आणि लोकांनी बेशिस्तीने फेकलेल्या कचर्याकडे पाहुन चीडही आली. :(
31 Jan 2011 - 7:42 pm | प्रसन्न केसकर
भीमाशंकरचे जंगल घ्या पाहुन आहे टिकुन तोवर. शेकरु पण घ्या पाहुन आहेत जिवंत तोवर. थोडेच दिवस उरलेत. तिथं विंडमिल प्रोजेक्ट सुरु झालाय आता.
14 Dec 2020 - 12:16 pm | NAKSHATRA
उत्कृष्ट