भीमाशंकर -भाग १- गुप्त भीमाशंकर
........पायर्या चढून परत पठारावर येतो. आता पुढचे लक्ष्य असते ते हनुमान तळे व त्यापुढील नागफणीचा कडा.
बस स्टँड पासून पायर्यांकडे जातांना एक रूंद वाट उजवीकडे वळते तीच वाट आपल्याला हनुमान तळ्यापाशी घेउन जाते. जवळजवळ दीड किलोमीटर लांबीची ही वाट अगदी सुरुवातीला झाडांमधून जाते व पुढे आपल्याला जंगलाचा र्हास स्पष्टपणे दिसतो. कदाचित सड्यासारख्या जमिनीमुळे पण इथे झाडे वाढली नसावीत. मधूनच एक हुप्प्या दात विचकून जाताना दिसला. आता हनुमान मंदिर दिसू लागले व थोड्याच वेळात हनुमान मंदिर व तिथल्या बांधीव तळ्यापाशी आलो. शेजारच्याच काही कुटीरांमध्ये साधुबुवा राहातात. मंदिर व तळे त्याच्या नावाला साजेसेच आहे. कारण इथे हनुमानाचे खूप वंशज आहेत. अगदी भरपूर संख्येने माकडे.
हनुमानाचे दर्शन घेतले. हनुमान मंदिराच्या मागच्या बाजूलाच नागफणीला घेउन जाणारी वाट आहे. नागफणी हे नागाच्या फड्यासारखा आकार असलेले भीमाशंकराचे सर्वोच्च शिखर. सुरुवातीला छोट्याश्या कातळावरून तिरपे जात एक दाट झाडीतून जाणारा तीव्र चढ लागला. तो चढून वरच्या टप्प्यावर गेलो. आता परत वर वर चढत वरच्या पठारावर पोहोचलो. आलीच नागफणी. नागफणीचा आकार खोगीरासारखा आहे. दोन बाजूंना उंचवटे व मध्ये निमुळता खोगीरासारखा भाग आणि पलीकडे तुटलेला कडा. आम्ही भरभरा उजव्या बाजूच्या उंचवट्याकडे गेलो. वरतून फारच जबरदस्त देखावा दिसतो. खाली पदरगड आपल्या खड्या कातळभिंती सावरून उभा असतो. त्यापाठीमागे पेठच्या कोथळीगडाचे मनोरम दर्शन होत असते. समोर तुंगी आपल्या त्रिकोणी शिखरानिशी सज्ज असतो तर उजवीकडे सिद्धांचा कसदार सिद्धगड आपण काकणभर अधिकच सरस आहोत हे सिद्ध करत असतो. स्वच्छ हवेत तर येथून दिसणारे दृश्य तर फारच सुरेख असते. आम्हाला मात्र धुकटामुळे अंधूक दृश्यांवरच समाधान मानावे लागले.
इतक्यात मधल्या खोगीरापाशी बसलेल्या बहिणी पळत वर येउ लागतात. वर येउन म्हणतात माकडे पाठीमागे लागली आहेत. त्यांच्यापाठोपाठच माकडांची (र्हीसस जात. ही तापट असते)एक मोठी टोळी येउन थडकते. म्होरक्या दात विचकत अंगावर येउ लागतो. कॅमेरा आधी सुरक्षित ठेवला जातो. आम्ही शांत राहूनही माकडे आक्रमक रूप दाखवून अंगावर येउ पाहतात. बहिणींचा धीर सुटू लागतो. शेवटी मी व माझा भाउ जवळचीच एक काठी हाती धरतो. आता माकडांचा म्होरक्या २ फूट मागे सरतो पण दात विचकणे व अंगावर चाल करणे अजून थांबलेले नाही. आता आम्ही काठी उगारतच मोठ्याने ओरडत त्याच्या अंगावर धाउन जातो. आम्हाला तसे करण्याशिवाय गत्यंतरच नाही कारण जायची वाट माकडांनी अडवलेली आहे व बाजूला सरळसोट कडा.
आता मात्र माकडे घाबरलीयत. आम्हालाही अवसान आलेले आहे. काठी उगारतच आम्ही पुढे जातो. माकडे आता मागे सरलीयत. म्होरक्या आता खूप लांब जाउन दात विचकून दाखवतोय. पण आता त्याच्यात हिंमत नाहीये. आम्ही उंचवटा उतरून खोगीरावर आलोय. आता माकडे गायबच झालीयत. त्यांनी पराभव मान्य केलेला दिसतोय. आमचे नागफणीचे दर्शनही झालेले असते व एक अविस्मरणीय अनुभवही पदरात पडलाय. परत तीव्र उतार उतरून आम्ही मंदिरापाशी येतोय. हातात अजूनही काठी आहे. मंदिरापही असलेल्या माकडांना आम्ही उगाचच काठी फिरवून त्यांना पळवून लावतोय. माकडे भितीने लांब पळतायेत. वरचा त्यांचा तो म्होरक्या कुठेही दिसत नाहीये.
तिथून निघालो व परत बस स्टँडपाशी आलो. मुंबई पॉइंटपाशी थोडा वेळ थांबून परत सिद्धगड पाहीला. गाडीत बसलो. भीमाशंकर सोडले. वाटेत घोडेगावला वाजता जेवण केले व रात्रीपावेतो पिंपरीत पोहोचलो.
हनुमान मंदिर-
हनुमान तळे व तेथील पुतळा माकडे दाखवतोय.
तीव्र चढ चढून वर येतांना
पदरगड
नागफणीचे टोक
मधला खोगीरासारखा भाग
वरून दिसणारे विहंगम दृश्य. याच जागी माकडे आली
भीमाश़ंकराचे सदाहरीत वन
परतीच्या वाटेवर मुंबई पॉईंट
समाप्त
प्रतिक्रिया
2 Feb 2011 - 11:07 am | कच्ची कैरी
माझ्या भीमाशंकरला जाण्याची इच्छा तुम्ही टाकलेल्या फोटोंमुळे व वर्णनामुळे प्रबळ होत चालली आहे .
2 Feb 2011 - 11:08 am | स्पा
मस्तच फोटू
2 Feb 2011 - 11:38 am | इन्द्र्राज पवार
दोन्ही भाग वाचल्यानंतर (तसेच फोटोंचाही आनंद घेतल्यानंतर...) भीमाशंकरची वारी,....अर्थात मित्रांसमवेत... करण्याचा निश्चय केला आहे, इतकेच म्हणू शकतो. माकडांचा "अग्रेसिव्ह" पणा हा नवखाच दिसतोय, कारण ज्या ज्या पर्यटनक्षेत्री आम्ही गेलो आहोत, त्या त्या ठिकाणी अशी फुटकळ माकडे इकडेतिकडे नाचत बागडत असतातच, पण अंगावर चालून येण्याचा प्रकार कुठे आढळला नाही. प्रवासी काहीतरी खायाला देणार इतपत त्या जमातीला जन्मजात असल्यासारखे ज्ञान असल्याने तेवढ्यापुरतेच ते जवळीकीला येतात असे दिसत्ये. पण श्री.वल्ली यानी उल्लेख केलेली ही 'र्हिसस' जात भीमाशंकर परिसरातच आढळत असावी असा कयास आहे.
"नागफणीचे टोक" हा फोटो अगदी मोहवून टाकणारा आहे. लकी मॅन मि.वल्ली.
इन्द्रा
2 Feb 2011 - 12:20 pm | प्रचेतस
या जातीची माकडे पर्यटनक्षेत्री, सह्याद्रीच्या कडेकपारीत प्रामुख्याने आढळतात. बहुतेक पर्यटऩक्षेत्री खायच्या विपुलतेने ही सहसा आक्रमक होत नाहीत. तरी बरेच वेळा दात विचकणे, पिशव्या हिसकावून घेणे हे प्रकार तर सर्रास करतात. आमच्याकडे तेव्हा खायचे काहीही नव्हते तसेच दुर्गम प्रदेशात असल्याने ही माकडे जास्त आक्रमक झाली असावीत.
त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरीवर जातांनाही ही माकडे उन्हाळ्यात पाण्यासाठी माणसांवर नेहमीच हल्ले करतात. आम्हालाही हा अनुभव तिथे आलेला आहे.
यांना पळवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे काठी घेउन जाणे. काठीला ही माकडे घाबरतात. फटाके वाजवणे हाही एक मार्ग होय पण तो वापरू नये. :)
2 Feb 2011 - 1:59 pm | परिकथेतील राजकुमार
सुरेख प्रवास वर्णन आणि फोटो.
हा भाग देखील आवडला.
2 Feb 2011 - 2:29 pm | ५० फक्त
श्री. वल्ली,
जबरदस्त झालाय भाग, ककै सारखेच वाटते आहे कधी एकदा जात्तो आहे असं वाटतंय.
अतिशय धन्यवाद.
हर्षद.
2 Feb 2011 - 5:42 pm | निनाद मुक्काम प...
ओघवत्या शैलीत सजलेले लेखन त्याच सोबत उत्तम चित्रे व त्यातील सदाहरित वन (वृत्त पत्रातील काही बातम्यानुसार हा शब्द काही वर्षात भीमा शंकर पुरता उरणार नाही .माणसाच्या हावरट पणा व हैव्यास पहिला तर त्या माकडांची कृती मला अगदीच शुल्लक वाटते .
बाकी ह्या माकडाच्या जात व त्याच्या स्वभावाचे वर्णन केल्यामुळे आगामी पर्यटन आगाऊ काळजी घेतील (काठी हातात घेतील .)
अश्या ठिकाणी फिरल्याने पर्यटन होतेच .पण मानसिक स्वास्थ्य सुध्धा लाभते .
असाच महारष्ट्र फिरत रहा. ( नि आम्हाला दाखवत जा )
2 Feb 2011 - 6:45 pm | नरेशकुमार
खुप रीस्की आहे हो, हे.
फोटो पाहून खुप भिती वाटली.
किति खोल दरि दिसते तुम्हि जिथे बसले होते तिथे बाजुला. (वरुन ६ व्या & ७ व्या फोटोत)
2 Feb 2011 - 7:58 pm | प्रचेतस
एव्हढेही काही रिस्की नाहीये. तुटलेला कडा जवळजवळ १५०० फूट तरी आहेच. अगदी सरळसोट. भिती बाळगण्याचे तसे काही कारण नाही. उगाच जास्त वाकून पाहू नये इतकेच.
2 Feb 2011 - 8:01 pm | गणेशा
मस्त एकदम
3 Feb 2011 - 4:20 am | विनायक बेलापुरे
फोटो सुद्धा छान आले आहेत.
अत्यंत निसर्गरम्य परिसर. पुन्हा पुन्हा जावेसे वाटेल असा.
27 Mar 2017 - 7:43 am | कंजूस
आता मे महिन्यात जाणार आहे खांडसमार्गे. त्यावेळी शेकरुंचा हैदोस असतो पायय्रांजवळच्या आंब्यांवर,उंबरांवर. पाऊस लागला की फळे पिकतात व ती शेकरू खात नाहीत. कच्ची खातात.त्या शोधात दूर आत रानात पांगतात. चमकणारी वनस्पती जुलैच्या अमावस्येला दिसते
29 Mar 2017 - 4:10 pm | प्रसाद गोडबोले
सुरेख लेखन वल्ली सर !
दोन वेळेला भीमाशंकरला जाणे झाले आहे , एकदा तर तंगडतोड सावळा ते भीमाशकर असा ३० एक किमीचा फुल्ल जंगल ट्रेक तेही भर पावसात केला आहे पण ह्या फोटोतील ठिकाणे अनोळखी वाटतात.
हे असे फोटो पाहुन सह्याद्री च्या परत परत प्रेमात पडायला होते !
14 Dec 2020 - 12:17 pm | NAKSHATRA
सुरेख प्रवास वर्णन आणि फोटो.
18 Dec 2020 - 10:48 pm | पॉइंट ब्लँक
सुरेख वर्णन. गुप्त भीमाशंकर, नागफणी हि ठीकाणे माहिती नव्हती आधी. धन्यवाद.
21 Dec 2020 - 5:11 pm | चौथा कोनाडा
अतिशय सुंदर वर्णन अन अप्रतिम प्रचि !
प्रचेतस
👌
दोन वर्षांपुर्वी आम्ही पतिपत्नींनी इथं केलेली अस्मरणीय भटकंती आठवली. दोन दिवस तिथल्याच ब्लू मरऑन रिसॉर्टला राहिलो होतो. लेखातील सर्व ठिकाणांना भेट दिली होती. पाहिली होती ! खुप धमाल आलेली. भोरगिरीच्या परिसरात देखील भटकलो होतो !
21 Dec 2020 - 6:49 pm | NAKSHATRA
सुरेख वर्णन