परंतु आज नीलकांताने मुखपृष्ठावर,
आज काही काळ मिसळपाववर भीमसेनांच्याच संबंधी धागे यावेत आणि
ज्यांना ज्यांना त्यांच्या विषयी लिहायचे असेल त्यांनी तसे लिहावे
असं म्हटल्यामुळे लिहायला बसलो आहे, परंतु खरं तर काहीच लिहायला सुचत नाही..सारा दिवस कसाबसा गेला परंतु आता रात्र मात्र अंगावर येऊ पाहाते आहे.
अक्षरश: ओक्साबोक्षी रडावसं वाटत आहे, पण धड रडूही येत नाही. गेल्या दोनचार दिसापूर्वी मीच त्यांच्याकरता मारे विमान वगैरे मागवलं होतं, अर्थात त्यांचा त्रास, अंथरुणातल्या हालअपेष्टा संपाव्यात म्हणून. परंतु वास्तव इतकं सोपं नसतं. आज जेव्हा खरोखरच विमान आलं आणि त्यांना तुकोबांच्या पंक्तित घेऊन गेलं तेव्हा त्या वास्तवातली प्रखरता जाणवली..!
नाही पचवू शकत आहे ते वास्तव. मीही सामान्यच..! ना त्यांच्यासारखा योगीसाधक, ना तुकोबांसारखा परब्रह्म कळलेला..!
अगदी १९८८-८९ पासूनच्या त्यांच्या आठवणी, त्यांचा सहवास, त्यांचा अत्यंत साधा सादगीभरा स्वभाव..सारं काही मनात रेंगाळत आहे..
प्रयत्न करतोय पण सूत्ररुपात नेमकेपणाने मांडता येत नाहीयेत त्या आठवणी या क्षणी..!
तसे अबोल होते ते..! पण कधी कधी आपणहून बोलायचे. ख्यालाबद्दल, गाण्याबद्दल, जुन्या गायकांबद्दल, त्यांच्या गायकीबद्दल भरभरून बोलायचे..
कधी कधी थट्टाही करायचे,
"काय अभ्यंकर, काय म्हणतंय तुमचं गाणं? काय रियाजवगैरे..?"
"छे हो अण्णा, मी कुठला गातोय? मी दगड आहे अजून.."
"तेही नसे थोडके..! तुम्ही दगड आहात हे स्वतःहून कबूल करताय, ही एक चांगली सांगितिक खूण आहे. परंतु काही लोकांना आपण दगड आहोत हेच कळत नाही, ही गोष्ट मात्र संगीताला घातक आहे..! दगड असण वाईट नाही परंतु आपण दगड आहोत हे न समजणं, हे मात्र घातक.. :)
असं अगदी नेमकं आणि मार्मिक बोलायचे..!
"वा..! काका हलवायाकडची जिलेबी का? तुम्ही अगदी न चुकता आणता बरं..!"
कधी असं कौतुक करायचे.. मग ते पंजाबात जलंधरला असताना तिथे कशी जिलेबी मिळायची ते सांगायचे.. :)
जलंधरलाच कडाक्याच्या थंडीत पहाटे उठून जोरबैठका आणि नंतर डायरेक्ट विहिरीत उडी मारून केलेली अंघोळ..!
आठवणीत रमून जायचे.
मग त्या बोलण्यात हाफिजअली यायचे, बिस्मिल्लाखा यायचे, सिद्धेश्वरीदेवी, रसूलनबाई यायच्या..!
कधी विदाऊट तिकिट रेल्वेप्रवासाची गोष्ट..
विदाऊट तिकिट रेल्वेप्रवासाला अण्णा 'फ्री पास होल्डर' असं गंमतीने म्हणत..! :)
कधी तंबोरा कसा लावावा, जवारी कशी काढावी, तंबोरा जवारदार कसा वाजला पाहिजे याचे धडे नेहरू सेन्टरच्या किंवा बिर्ला मातुश्रीच्या ग्रीनरूममध्ये मिळायचे..!
खूप आठवणी आहेत, पण वर म्हटल्याप्रमाणे आत्ता धड काही सुचत नाहीये..
पण ते सारं सूत्ररुपाने लिहायचं आहे एकदा..
क्षमा करा, तूर्तास इथेच थांबवतो या ओबधधोबड ओळी..
तात्या.
प्रतिक्रिया
24 Jan 2011 - 8:26 pm | रामदास
आपल्या मनाची कठीण अवस्था . चित्त सांगेल तेव्हा पुन्हा लिहा.
24 Jan 2011 - 8:49 pm | टारझन
-टारझन
25 Jan 2011 - 6:52 am | संदीप चित्रे
सहमत
25 Jan 2011 - 5:33 pm | स्वाती दिनेश
आपल्या मनाची कठीण अवस्था . चित्त सांगेल तेव्हा पुन्हा लिहा.
तात्या, रामदासांसारखेच म्हणावेसे वाटते.
स्वाती
25 Jan 2011 - 10:13 pm | धनंजय
तुमच्या भावना समजू शकतो. मन होईल तसे जरूर लिहा.
24 Jan 2011 - 8:30 pm | कच्ची कैरी
तुम्ही फारच नशीबवान आहात जे तुम्हाला पंडीतांसारख्या साधकाचा सहवास मिळाला बाकी आमच्यासारख्या सामान्य लोकांच्या नशीबी ते भाग्य कुठे ?
24 Jan 2011 - 8:31 pm | गणेशा
मनातील घालमेल स्पष्ट जाणवते आहे.
आपल्या दु:खात सहभागी आहे ...
25 Jan 2011 - 10:22 am | छोटा डॉन
+१
- छोटा डॉन
25 Jan 2011 - 3:11 pm | गणपा
अगदी असच म्हणतो.
24 Jan 2011 - 8:58 pm | प्राजु
घालमेल जाणवते आहे..
बी ब्रेव्ह तात्या!! वी ऑल हॅव टू बी.
24 Jan 2011 - 8:59 pm | आनंदयात्री
बातमी कळल्यावर वाईट वाटले. लहानपण आजोबांबरोबर भीमसेनांचे गाणे एकण्यात गेले.
तात्यांना फार वाईट वाटले असेल असे कल्पिले होतेच.
24 Jan 2011 - 9:12 pm | ऋषिकेश
काय बोलणार!?! अश्या वेळी शब्द फार तकलादू वाटतात हेच खरे :(
24 Jan 2011 - 9:17 pm | वाटाड्या...
अक्षरशः टाहो फोडावासा वाटतो...
आता तात्या..ती हलवायाकडची सा़जुक तुपातली जिलबी कुणासाठी नेणार....आणि ती आणल्याचं कौतुक तरी कोण करणार...??
24 Jan 2011 - 9:28 pm | तिमा
भीमसेनजी गेले ही साधी घटना नाही. काही माणसं आपण कायमची गृहितच धरलेली असतात. त्यातलेच एक अण्णा!
असा सूर, अशी तडफदार तान आता होणे नाही. सर्व भीमसेनप्रेमी कानसेनांसारखा मीही कासावीस झालो आहे.
24 Jan 2011 - 11:21 pm | शिल्पा ब
अगदी हेच म्हणेन.
24 Jan 2011 - 9:51 pm | गणेशा
शुन्य शब्दांत या
भावनांची झोळी
रक्तात उतरलेली
सांजसंध्या कोवळी
घनदाट आठवांचा
सैरभैर पसारा
अर्धओले मन
सावळभाव गहिरा
बधिर पावले ही
तिमिरात थबकली
अस्तित्वाची किनार
क्षितिजापार बुडाली
आपल्या आठवांची
पंक्ती आकाशी भिडलेली
ह्रद्यस्थ माझ्या जपलेली
तवअस्तित्वाची कोरीव लेणी...
स्पंदणांच्या हिंदोळ्यावरी
विचारांची अवखळ फ़ांदी
दु:खाच्या तरंगावरती
स्वप्नथेंबांची पालखी
निशब्द शांततेत साठलेले
काहुर मनातले अस्तव्यस्त
हरवलेल्या मार्गावरती
तुझी आशादायी मुर्ती...
- शब्दमेघ
24 Jan 2011 - 10:51 pm | निवेदिता-ताई
भारत रत्न भीमसेनजी जोशी
असा स्वरभास्कर पुन्हा होणे नाही .
माझी भावपूर्ण आदरांजली.
संगीत क्षेत्राने एक अनमोल हिरा गमावला आहे.
25 Jan 2011 - 12:05 am | कौशी
स्वरभास्कराला माझी भावपूर्ण आदरांजली.
25 Jan 2011 - 12:37 am | अर्धवटराव
. !!
( :( ) अर्धवटराव
25 Jan 2011 - 5:26 am | उल्हास
------------------------
25 Jan 2011 - 8:34 am | अवलिया
!!
25 Jan 2011 - 3:01 pm | स्पंदना
तात्या सांगु? 'मिले सुर मेरा तुम्हारा ' जेंव्हा जेंव्हा लागयच ना तेम्व्हा फक्त भिमसेन्जींचा आवाज ऐकण्या साठी कान आतुर व्हायचे माझे, त्या सार्या सुरावटीच्या कल्लोळात एखादा धबधबा कोसळावा तसा त्यांचा धिर गम्भीर आवाज वाटायचा अन एक निराळीच तृप्ती जाणवायची. बाकि त्याम्चे अभंग माझ्या विशेष आवडीचे. इव्हन त्यांचे ' भाग्यदा लक्ष्मी भारम्मा' सुद्धा बाकी सार्या भाग्यदा त विशेष आवडीच.
काय काय लिहाव? अन किती किती ऐकाव. तरी नशिबान आजच्या टेक्नॉलॉजी मुळे त्यांच्या स्वर संपदेला आपण पारखे नाही होणार.
From Remmitance" alt="" />
हे देहभान हरपुन गाण पहा!!
25 Jan 2011 - 2:20 pm | RUPALI POYEKAR
तात्या तुम्ही खुपच भाग्यवान आहात, तुमच्या वेदना कळ्तात, पण तुम्हाला एक विनंती आहे की आण्णाच्या आठवणी
तुम्ही आम्हाला सांगा. त्यांना तुमच्या आठवणींमध्ये जिवंत राहु दे
25 Jan 2011 - 2:32 pm | मिसंदीप
विसोबाजी,
आपण ज्याला ओबडधोबड ओळी म्हणत आहात , त्या आमच्यासाठी पंडीतजींच्या आठवणींना उजाळा देणार्या स्म्रुती माला आहेत.
तेव्हा आपणास अशी विनंती आहे की,आपण खरच खुप लिहा.
पंडीतजीं सारख्या एका स्वरभास्कराचे/स्वरविद्यापिठाचे गाणे तर अगदी भरभरुन ऐकले आहे , पण आपले त्याच्या सहवासातील असे अजुन काही क्षण आम्हाला वाचायला मिळाले तर खुप धन्य वाटेल.
25 Jan 2011 - 5:30 pm | रमेश आठवले
तात्यासहेब
आपल्या सविस्तर लेखाचि वाट पाहात आहे.