गिरिशिल्पे
ऊन-पाऊस व जंगली श्वापदांपासून बचाव करण्यासाठी मानवाने गुहेचा उपयोग केला. नंतर मैदानात घरे बांधावयास सुरवात केल्यावरही त्याने गुहा अजिबात सोडून दिली असे नाही. भारतात ऋषिमुनींनी,तपस्व्यांनी चिंतनाकरिता गुहाच योग्य मानली.तर ही गुहा चैत्य-विहार-मंदिरे बांधावयास चांगली आहे हे ध्यानात घेऊन त्यांनी इसविसन पूर्व ३००-४०० वर्षे आधी पासूनच असा वापर सुरू केला. पण नैसर्गिक गुहेला लांबी-रुंदी-उंची यांच्या मर्यादा असल्याने सुरवातीला त्या फ़क्त मोठ्या केल्या; त्यांना आयताकृती-चापाकृती आकार दिला.
गुहेत सुरवातीपासून सुशोभन केले. प्रथम चित्रे काढली, मग पाने-फ़ुले-वेलबुट्टी, व उथळ उठावाची चित्रे कोरली, रुपकांचा उपयोग केला, त्यानंतरचा भाग म्हणजे गुहेचे तोंड, मुखदर्शन, सुशोभित करणे व आत गाभारा, ओवऱ्या, मंडप,स्तंभ, मजले आदींची भर घालावयास सुरवात करणे. येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सुरवातीला लाकडी घरच डोळ्य़ासमोर होते. त्यामुळे लाकडी खांब, वासे यांचा उपयोग केला गेला. आज ह्या लाकडी वस्तु दिसत नाहीत पण त्यांच्या करता केलेल्या खोवणी वगैरे पहाता येतात. पुढे विटा, चुन्याचा गिलावा वगैरेचा उपयोग केला व शेवटी पत्थराचा.त्या नंतर पूर्ण उठाव व शेवटी मूर्ती. नुसती चित्रे काढलेल्या गुहा हजारो वर्षांपूर्वीच्या आहेत. कोरीव नक्षीकाम ते मूर्तीपर्यंत पोचावयाला ७००-८०० वर्षे लागली. किरकोळ अपवाद सोडले तर आठव्या शतकापासून गिरिशिल्पे निर्माण होणे बंद झाले. आपण जवळ जवळ एक हजार वर्षांचा इतिहास बघणार आहोत. (इ.स.पूर्व३०० ते इ.स.७००). तसेच हा लेख "मंदिरे" या लेखमालिकेतील असला तरी चैत्य-विहार यांचा विचार अपरिहार्य आहे.
गिरिशिल्पांची ओळख शास्त्रीय पद्धतीने करून घ्यावयाची तर ती (१) काल, (२) धर्म व (३) स्थळ (प्रदेश) या तीन प्रकरणात विभागून करून घेणे उचित. पण इतक्या खोलात न जाता थोडक्यात माहिती हा एकच निकष ठरवणॆ जास्त सोपे. शेवटी ही माहिती आनंद मिळवण्यासाठीच आहे.तर सुरवात करू या भारतातील पहिल्या सुशोभित गुहांपासून.
गुहेत आदीमानवाने काढलेली चित्रे आढळतात.जगभरातील अशा चित्रांप्रमाणे ही पशू, त्यांची शिकार अशा विषयांवर आहेत. सर्वात पुरातन कला म्हणून त्यांचे मह्त्व. भारतात अशा गुहा आसेतुहिमालय आढळतात.बिल्लासुरगम,वायनाड,भलदरिआ,घोडामांगर, सिंधनपुर,जोगिमार,मिर्ज़ापुर, रायगड,छोटा नागपुर, कर्नूल इत्यादी ठिकाणी अशी गुहाचित्रे आढळली आहेत. आजही महाराष्ट्र, मध्यप्रदेश, ओरिसा येथील आदिवासी काढत असलेली चित्रे या गुहाचित्रांशी नाळ टिकवून आहेत. पुढे दिलेले चित्र व वारली चित्रकला ताडून पहा.(१)
भारतातील गिरिशिल्पांचा अभ्यास करतांना एक गूढ गोष्ट समोर येते. अशोकानंतरच्या काळातील अनेक गुंफ़ा ज्ञात आहेत, या काळाच्या आधीच्या नाहीत. आणि या ज्ञात गुंफ़ा उच्च श्रेणीच्या आहेत. म्हणजे कोणत्याही कलेच्या आरंभी दिसून यावे असे "शिकावू", चुकत माकत केलेले, काम दिसून येत नाही. तुम्ही सुरवात केली आणि भाजे-कार्ले सारख्या श्रेष्ट दर्जाच्या कलाकृती निर्माण केल्यात हे उमगण्यास अवघड जाते.काही अभ्यासकांच्या मते याचा संबंध भारताबाहेर ईजिप्त,भुमध्य सागरानजिकचा आशियाचा भाग येथील गिरिशिल्पांशी जोडला पाहिजे.(नक्श-इ-रुस्तुम येथील शिल्पगृह). अशोकाच्या काळातील कलासंप्रदायावर इराणी कलासंप्रदायाची छाप पडली होती हे मान्य. पण स्तंभ व स्तंभशिरे सोडली तर येतील सर्व गिरिशिल्पे शंभर टक्के भारतीय आहेत. कोडे सुटण्यास अवघड आहे. गर्वाने म्हणावयाचे असेल तर म्हणा की भारतीय कलाकार एवढे श्रेष्ट होते की त्यांनी तेथील कल्पना उचलली आणि शंभर टक्के भारतीय बीजे त्यात रुजवली.न चुकता, न अडखळता ! असो. इतिहासात रुची असलेल्या सभासदांनी यावर झोत टाकावा.
तर आता सुरवात करू या इ.स.पूर्व २०० पासूनच्या गिरिशिल्पांपासून.योग्य दगड असलेली जागा सर्वत्र मिळेलच असे नाही. त्यामुळे महाराष्ट्र,ओरिसा, बिहार, आंध्र अशा मोजक्या जागीच ही कला बहरली.नागार्जुनी टेकड्या, सितामढी, राजगीर येथील शैलगृहे मौर्यकालीन. यात निरनिरळ्या प्रकारची विधाने आढळतात. सुरवातीला खोली कमी व रुंदी जास्त असे.
सुरवात झाली तेंव्हा प्रथम नैसर्गिक गुहा फोडून मोठी करावयाची; तीत देवाची व भक्तांच्या रहाण्याची सोय करावयाची एवढी माफक अपेक्षा असावी. नंतर भक्ती-वैराग्यात कलासक्ती आली. गुहेच्या प्रवेशापाशीच, मुखदर्शनापाशी इतक्या सुंदर कलारचना केल्या गेल्या की वाटावे येथेच थांबावे. (२) आत गेल्यावर मंदिरात असावेत असे स्तंभ. खाली पीठे, मध्ये नक्षीकाम, वर पुष्पाकार स्थंभशीर. कोरीव काम तर इतके नाजूक की स्तंभांच्या प्रचंड आकाराचा विसरच पडावा.
इथे "कलेकरता कला" हाच उद्देश, नाही तर खांब काय वरच्या डोंगराला आधार म्हणून पाहिजे होते ? वेरुळ. घारापूरी, बदामी, एहोळे येथील गुंफामधील स्तंभ प्रेक्षणीय आहेत. नंतर पहावयाच्या भिंतींवरील मूर्ती. पहिल्यांदी चित्रे होती पण लवकरच त्यांची जागा मूर्तींनी घेतली. देवळांसारखीच मुखदर्शना नंतर मंडप, अंतराळ व गाभारा (वा चैत्य) हा क्रम राखला गेला. काही ठिकाणी प्रदक्षिणा मार्गही. थोडक्यात ही गिरिशिल्पे म्हणजे वातानुकुलित देवळेच !
महाराष्ट्रात हे लोण पोचले. येथील दगड या कामाला फ़ार सोयिस्कर. भाजे (इ.स.पूर्व २०० ते १५०), कोंडाणे, घारापूरी,पितळ्खोरे, अजिंठा, बेडसे, नाशिक, जुन्नर,कान्हेरी, औरंगाबाद व कार्ले (इ.स.५० ते १००) ही त्यातील महत्वाची
" भारतातील लेण्यांपैकी ७५ % महाराष्ट्रात आहेत. "
ओरिसात हाथीगुंफ़ा, व्याघ्रगुंफ़ा, राणीगुंफ़ा या नोंद घेण्यासारख्या. इ.स.च्या सुरवातीला येथील कलाकार दक्षिणेला आंध्रमध्ये गेले.
उदयगिरी(मध्यभारत), वेरूळ(महाराष्ट्र], बदामी(कर्नाटक) व महाबलीपुरम(आंध्र) ही हिंदू-जैन गिरिशिल्पांची प्रमुख केंद्रे.ही सगळीच इ.स.च्या तिसऱ्या-चवथ्या शतकानंतरची आहेत.आठव्या शतकानंतर लेणी खोदणे बंद झाले.
मध्यप्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील उदयगिरी येतील गिरिशिल्पे म्हणजे मंदिरांच्या, डोंगरात कोरलेल्या, प्रतिकृतीच आहेत.तेथे एक गुंफ़ा एकपाषाणी मंदिरच आहे.
वेरुळच्या लेण्यांचे कालदृष्ट्या दोन भाग पडतात.पहिल्या भागातील लेणी बुद्ध विहारांसारखी(४) आहेत तर दुसऱ्या भागातील वेगवेगळ्या "मंदिर" कल्पनांचा आविष्कार.पहिला कालखंड इ.स.५०० च्या आसपास सुरू होतो तर दुसरा ७०० च्या. दोनही भागात चापाकर विधान टाळले आहे.सर्वात बाहेर ओसरी,आत मंडप,त्याच्या तीनही बाजूंना चौरस दालनाच्या ओळी व मागच्या भिंतीतील मधल्या दालनात गाभारा. हा आराखडा विहाराच्या पदविन्यासा सारखा आहे.
कर्नाटकातील गिरिशिल्पे बदामी,एहोळे येथे पहावयास मिळतात. मुख्य "विष्णू मंदिर" इ.स.५७८ मध्ये खोदून पुरे झाले.अतिशय प्रेक्षणीय वास्तू.
आंध्र-तामिळनाडूतही अनेक शैलगृहे आहेत. सुरवातीची बौद्ध व नंतरची हिंदू. विजयवाड्यानजीक "अनंतशायीगुडी" गुंफ़ा चार मजली आहे. डोंगराच्या उतारावर खोदकाम असल्याने एकामागे एक असे सरकून खोदले आहे असा भास होतो. (७)
इथे लक्षात घ्यावयाची एक गोष्ट म्हणजे अनेक मजली गुंफा करावयाची असेल तर पहिल्यांदी सर्वात वरचा मजला करावयाची, नंतर त्याच्या खालचा. जरा विचार केला तर याचे फायदे ध्यानात येतील. एकपाषाणी मंदिरे तयार करतांना हेच पद्धती वापरली आहे.
तामिळनाडूत चेन्नाई पासून अवघ्या ४० कि.मि. अंतरावर महाबलिपुरम (आता ममलापुर) येथे अप्रतीम शिल्पे पहावयास मिळतात. मंदिरे, एकपाषाण मंदिरे ( यांना "रथ" म्हणतात), गुहाशिल्प व डोंगराच्या उतारावरील कोरीव काम, सर्व काही एका ठिकाणी. तेथे बाजारात आजही कलाकार मूर्ती घडवतांना दिसतात. असे दृष्य फ़क्त येथे व ओरिसात पहावयास मिळाले.
या भागाचा एक उपविभाग म्हणजे एकपाषाण मंदिरे.पण वेरुळ येथील कैलास व महाबलीपुरम येथील रथ यांवर एक निराळाच लेख पाहिजे
किती लिहणार ? तांत्रिक माहिती कंटाळवाणी होते व आस्वाद घेण्याकरिता लिहावयाचे तर प्रत्येक स्थळावर दोन लेख होतील ! तेंव्हा असे लेख वाट दाखवण्यापुरते. पुस्तकांत व विशेषत: जालावर भरपूर माहिती व छायाचित्रे मिळतील. आज लेखात सर्व प्रांतांतील गिरिशिल्पे असलेली गावांची नावे दिली आहेत कारण तरुण सभासदांनी मनावर घेतले तर ५-७ मिनिटांत ते जालावरील चित्रे येथे डकवू शकतील.
(उशीरा संगणक हाताळावयास शिकलेल्या माझ्यासारख्याला फार वेळ लागतो !)
(१) आदमगड येथील शैलचित्र. प्राचिन गुहाचित्र, पण वारली लोककला याच्याशी नाळ जोडून आहे.
(२) लोमश लेणे. मौर्यकालीन लेणे. सुरवातीच्या काळात मुखदर्शनावर जोर होता.
(३) आंध्र प्रदेशमधील चार मजली लेणे, उंडवल्ले. डोंगराच्या उतारावर चार मजले असल्याने सरकवून बांधल्यासारखे वाटते की नाही ?
(४)महाबलीपुरम, हे गिरिशिल्प आहे, लेणे नाही, पण प्रेक्षणीय आहेव पलिकडे लेणेही दिसतेच.
(५) बदामी, कर्नाटक, लेण्याच्या दाराशीच प्रेक्षणीय शिवमूर्ती आहे !
आता काही महाराष्ट्रातील लेणी पहा. मुखदर्शन पहा, भले मोठे स्तंभ पहा (पाया, मधील चौकनी व गोल होत जाणारा भाग व स्तंभशीर्ष बघा, वरील पट्टेही ) व आतील चैत्य, मूर्ती वगैरे.
(६) भाजे
शरद
प्रतिक्रिया
24 Jan 2011 - 12:29 pm | स्पंदना
इतकी माहिती मिळते तुमच्या लिखाणातुन, शोधुन काढुन अभ्यासायच म्हंटल तर अतिशय अवघड होइल, पण तुमच लिखाण म्हणजे जणु पाटावर बसुन घास घास तुप भात खायला मिळावा तस, खरच कंटाळवाण नाही वाटत, लिहित रहा एव्हढा एकच आग्रह.
24 Jan 2011 - 12:38 pm | प्रचेतस
हाही लेख अप्रतिमच.
आमच्या मते कर्जतजवळचे कोंडाणे लेणे हे महाराष्ट्रातील आद्य लेणे होय. भाजे त्याच्यानंतरचे आहे. कोंडाणे लेण्यात झालेल्या चुका नंतरच्या बांधकामात सुधारल्या गेल्या. उदा. पावसाळ्यात वरून पडणार्या पाण्यामुळे झालेली झीज. नंतरच्या लेण्यांमध्ये पाणी वाहून जायलाही मार्ग काढण्यात आले.
लेणीमंदिरे मुख्यतः घाटवाटांवर वाटसरूंच्या मुक्कामासाठी व भिक्षूंच्या ध्यानधारणेसाठी निर्माण करण्यात आली. याकामी सातवाहनांच्या प्रबळ राजसत्तेबरोबरच इतर व्यापार्यांचेही अर्थसहाय्य मोलाचे ठरले.
नाशिकजवळच्या पांडवलेण्याचे काही फोटो. नाव जरी पांडवलेणे असले तरी ही लेणी खोदलीयत ती हिनयानपंथीय बौद्धांनी.
24 Jan 2011 - 9:01 pm | शरद
पांडवलेण्याचे फोटो मी शोधत होतो, चांगले मिळाले नव्हते. आपण दिलेत, धन्यवाद.
शरद
24 Jan 2011 - 11:47 pm | धनंजय
वर बादामीच्या नटराजाचे चित्र काही कारणास्तव दिसत नाही. ते येथे देत आहे :
25 Jan 2011 - 6:41 am | शरद
श्री. धनंजय यांनी लिहल्याप्रमाणे बदामीचे चित्र दिसत नव्हते; महाबलीपुरमचे दोनदा पडले. क्षमस्व. बदामीचे येथे देत आहे,
शरद
25 Jan 2011 - 9:16 am | सुधीर कांदळकर
सगळेच लेख आवडले. अचानक घबाड हाती लागल्यासारखे वाटले.
एकपाषाण मंदिरे ( यांना "रथ" म्हणतात),
कधीतरी कोणार्क मंदिराबद्दल वाचतांना वारंवार हे पंचरथ मंदीर आहे असे उल्लेख होते. पंचरथ म्हणजे काय? त्यात bada असाही शब्द आहे. त्याचा अर्थ काय आहे?
27 Jan 2011 - 12:12 pm | शरद
श्री. कांदळकर : पहिल्या लेखात जी तांत्रिक शब्दांची माहिती दिली आहे त्या प्रमाणे रथ म्हणजे " गाभार्याच्या बाहेरच्या भिंतीवर असणारे उभे पट्टे, हे एकापुढे एक सरकतात, क्षिप्त (बाहेर फेकलेले) असतात. या रथांच्या संख्येवरून मंदिराच्या विधानाला "त्रिरथ", "पंचरथ" अशी नावे देतात. हे रथ उंचीला कपोता(पागोळा, सज्जा)पर्यंत असतात किंवा काही वेळा आमलकापर्यंतही पोचतात. मालिकेतल्या दुस्र६या भागात थर दाखवणारे एक भुवनेश्वर येथील राजराणी मंदिराचे छायाचित्र दिली आहे. या संदर्भात आपण पंचरथ बघा. (व पंचरथ दाखवणारे छायाचित्रही मिळवून य़ेथे टाका !) पहिल्या भागात श्री. जयंत कुलकर्णी यांनी सिन्नर येथील गोंदेश्वर मंदिराची वित्रे दिली आहेत. त्यांचेही रथ बघा. Bada चा अर्थ वा संदर्भ लागला नाही. आपण जेथे वाचले तेथील एखादा परिच्छेद दिलात तर शोधावयाचा प्रयत्न करीन. व्यनि पाठवा.
महाबलीपुरम येथील एकपाषाणी देवळांनाही रथ म्हणतात. पण हे झाले स्थानिक नाव. त्यांची माहिती आपण पुढील लेखात बघणार आहोतच.
श्री. जयंत कुलकर्णी : गोंदेश्वर मंदिराची माहिती देण्यास उशीर झाला. क्षमस्व.मुख्य मंदिर, समोर अलग असा नंदीमंडप,चार उपदिशांना छोटी उपमंदिरे व सर्वांना वेढणारा प्राकार ( ८४ मी.x ८५ मी.) यादव-शिलाहार घराण्यांच्या काळातले( ११-१२ वे शतक ). साधारणत: मध्यभागी चौथर्यावर मंदिराची वास्तु आहे. आमलकाच्या जागचा घुमटाकार भाग सोडला तर सर्व वास्तू मूळ स्वरुपात आहे. भोवतालची मंदिरे,गणेश, नारायण,सूर्य व देवी यांची आहेत. त्यांची शिखरे मुख्य देवालयासारखी नसून त्रिरथ, पंचरथ पद्धतीची आहेत.छत, स्तंभ यावर कोरीव काम आहे. सर्व देवालयांत कक्षासने, अर्धस्तंभ यांसारखीचे नेहमीचे भाग आहेत.
शरद
26 Jan 2011 - 5:22 pm | अवलिया
मस्त लेखमाला चालू आहे...
26 Jan 2011 - 6:13 pm | यशोधरा
असेच म्हणते. वाचत आहेच. धन्यवाद.