"चित्रपटातील तानापिहिनिपाजा..." या पहिल्या भागाला प्रतिसाद देणार्या सर्वांचे (आणि तसेच तो वाचणार्यांचे, व खरडीतून तसे आवर्जुन कळविणार्यांचे) मनःपूर्वक आभार. आज इथे दुसरा भाग प्रकाशित करताना थेट "रंग...त्यांचे संकेत आणि चित्रपटात दिग्दर्शकाने कोणत्या भावनेने त्या रंगाचे केलेले प्रयोजन' यावर भर दिला आहे. विषयाची व्याप्ती मोठी आणि 'कला दिग्दर्शका'च्या नजरेतूनही ती एक महत्वाची बाब असल्याने काहीशी तांत्रिक महत्तेचीही आहे. त्यामुळे एखाद्या रंगासाठीही शेकडो चित्रपटांची उदाहरणे देता येतील, पण तसे केले तर पुढे या लेखासाठी असलेली शब्दमर्यादा प्रमाणाबाहेर वाढेल या भीतीपोटी केवळ पाचसहा चित्रपटच उदाहरणासाठी मी घेत आहे (शिवाय रंगाची उदाहरणे देताना त्या त्या चित्रपटातील त्या रंगाचा वापर केलेले काही फोटोही इथे देणे गरजेचे असल्याने परत "स्पेस" ची अडचण जाणवणारच). 'नॉर्थ बाय नॉर्थवेस्ट, फिडलर ऑन रूफ, बर्डस्, थॉमस क्राऊन अफेअर' या गाजलेल्या चित्रपटांचे ऑस्कर विजेते 'प्रॉडक्शन डिझायनर' रॉबर्ट बॉएल यांचे 'चित्रपटातील रंग' यावरील "रंग हे भावनेचे प्रतिक असल्याने पडद्यावरील रंग आहेत उपलब्ध म्हणून तिथे आले आहेत असे न समजता प्रसंग खुलविण्यासाठी त्या रंगाचा वापर का आणि कसा केला आहे याचा विचार केला तर शब्दांपेक्षा त्याचे सामर्थ्य जाणवते."
शाळा असो वा महाविद्यालयीन जीवन, लहान असो वा मोठा, ज्या ज्या वेळी "रंग" विषय नजरेसमोर येतो त्या त्या वेळी अगदी जगाचे व्यासपीठ जरी घेतले तरी सर्वत्र सर्वप्रथम "लाल" रंगाचा प्रामुख्याने विचार येतो. तसे पाहिले तरी रंगचक्रात प्रमुख RGB हेच तीन असून अन्य त्यांच्यापासून तयार होतात असे शास्त्र सांगते. त्यामुळे चित्रपटातील रंगमाहात्म्याची सुरूवातही 'लाल' पासूनच सुरू करणे क्रमप्राप्त आहे. लाल रंग हा भडक मानला/दिसला गेला असला तरी तो प्रेम आणि युद्धाचे प्रतीक आहे. तो जसा क्रौर्य हिंसा दाखवितो त्याचप्रमाणे प्रेमाची आत्यंतिकताही, म्हणूनच तो मदनची आतुरता आणि सैतानाचा पिपासूपणा दोघांसाठी महत्वाचा मानला गेला आहे. लाल रंग शारीरिक स्थितीचे आणि भावनेचे चढते स्पंदन दाखवितो, मग ती भावना संतापाची असेल वा प्रेमातील बेभानता असेल. 'लाल' लपाछपीचा खेळ करत नाही त्यामुळेही तो सर्वत्र थेट आणि उघडपणे पोहोचतो. (लाल आपुलकीचाही असल्याने खुद्द इथे मिसळपाव व्यवस्थापनानेही संस्थळ सजावटीमध्ये अत्यंत चाणाक्षपणे 'लाल' रंगाचा मुक्त वापर केल्याचे आढळते.)
माझ्या दृष्टीने "लाल" चा सर्वार्थाने उपयोग केला गेला तो 'अमेरिकन ब्युटी' या चित्रपटात. मध्यमवयीन पतीपत्नीमधील बेबनाव आणि त्यांची होणारी घुसमट, आपल्या मुलीच्या वर्गातील तिच्याच वयाच्या मैत्रिणीचे नायकाला "लोलिता" सम वाटणारे जबरदस्त शारीरिक आकर्षण, त्याच्या तितक्याच नैराश्येने ग्रासलेल्या मनी संताप वसलेल्या पत्नीचे आहे त्या परिस्थितीत जगण्याचा प्रयत्न....आणि हे त्या दोघांची घुसमट प्रकर्षाने येते चित्रपटात वापरला गेलेला लाल रंग. एक फ्रेम पत्नी सुरीने लाल गुलाब छाटत आहे. तिच्या मनाची घालमेल त्या लाल पाकळयातून उलगडत जाते. तर दुसर्या फ्रेममध्ये नायक (केव्हीन स्पेसी...ज्याला याच चित्रपटासाठी बेस्ट अॅक्टरचे ऑस्कर मिळाले होते) मुलीच्या मैत्रिणीसमवेत आपण शरीरसुख घेत आहे ही कल्पना नजरेसमोर आणून बेडवर लाल फुलांच्या पाकळ्या विखरत आहे हे दृष्य...टबमधील पाण्यावरही तोच लाल पाकळ्यांचा थर....तर प्रत्यक्ष दोघांची समोरासमोर गाठ पडते त्यावेळी शेजारील टेबलवर संकेत म्हणून पुन्हा लाल फुलांचा बुके ! लाल बंडखोरीचेही प्रतीक असल्याने खुद्द स्पेसीचीच मुलगी आपल्या प्रियकरासमवेत घर सोडून जाते त्यावेळी अंगावर ती जो स्वेटर चढविते तोदेखील लाल रंगाचाच. दिग्दर्शकाने जाणीवपूर्वक या चित्रपटाच्या पोस्टरवर लाल रंगाची जी उधळण केली होती ती याच हेतूसाठी.
दिग्दर्शक लाल रंग शक्तीचे आणि खुनशीपणाचेही प्रतीक दर्शविण्यासाठी वापरतो. "वर्किग गर्ल" या चित्रपटात एकाच ऑफिसमध्ये काम करणार्या दोन स्त्रिया 'तुझ्यापेक्षा मी किती शहाणी आहे..." हे दाखविण्याच्या प्रयत्नात असतात तर यातील कॅथेरिन झालेली सिगोर्नी वीव्हर ("एलियन"वाली) अगदी गिधाडासारखी आपल्या भक्ष्यावर टपून बसलेली दाखविताना तिला सतत लाल रंगाचाच टॉप घातलेला दाखविला आहे.
तर वर म्हटल्याप्रमाणे हा रंग चीड आणि नैराश्येमुळे आलेला पण दाबलेला संताप दाखविण्यासाठीही वापरला जातो. स्टीव्हन स्पिएलबर्गने "शिंडलर्स लिस्ट" या कृष्णधवल चित्रपटात मध्ये नाझी सैनिक क्राकोव्हच्या रस्त्यावरून ज्यू लोकाना (लहानापासून थोरापर्यंत) गुरासारखे हाकलत नेत आहेत असे दाखविताना फक्त एकच छोटी मुलगी लाल कोटात दाखविली आहे, तिला स्वतः ओस्कर शिंडलर बाजूला उभारून पाहताना दिसतो. काही दिवसानंतर शिंडलर आपल्या जर्मन अधिकारी मित्रासमवेत ज्या ठिकाणी नाझी भट्ट्यातून ज्यूंची प्रेते जाळली जात आहेत हे दृष्य पाहतो, त्यावेळी त्या अग्नीकुंडात टाकण्यासाठी काही प्रेत आणली जात आहेत तीत पुन्हा तोच रेड कोट त्याला दिसतो व तो नखशिखांत हादरतो...आणि त्याच क्षणी त्या ज्यू लोकांच्याबद्दल त्याच्या मनात कणव निर्माण होते. फार भावुक वाटते त्या लाल कोटातील त्या मुलीचे शव पाहताना.
बेस्ट आर्ट डायरेक्शनसाठी ऑस्कर मिळालेल्या वॉरेन बेट्टीचा 'डिक ट्रेसी' या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर आधारित चित्रपटात पात्रे आणि कथानकातील भडकपणा रोखठोकपणे दर्शविण्यासाठी लाल रंगच प्रामुख्याने वापरला गेल्याचे दिसते. मीटिंगसाठी नियोजीत टेबलच असे काही लालभडक आहे की मीटिंग सुरू होण्यापूर्वीच प्रेक्षकाला कळून चुकते की कोणते महारथी तिथे हजर असणार आहेत आणि कोणत्या विषयावरीच चर्चा तिथे होऊ घातली आहे.
टेनेसी विल्यम्स या प्रसिद्ध नाटककाराच्या 'कॅट ऑन अ हॉट टिन रूफ' या गाजलेल्या नाटकावर आधारित निघालेल्या चित्रपटात लाल रंगाचा वापर हे त्या नायिकेच्या [सासरच्या इस्टेटीबाबत चाललेला झगडा, दारुड्या नवर्याचा नाकर्तेपणा] मनातील संतापाची घुसमट दाखविण्यासाठी योजिला आहे.
तर गुन्हेगारी जगतातील एक (कु) प्रसिद्ध जोडपे "बॉनी अॅन्ड क्लाईड" या चित्रपटाचे हे लाल आणि काळ्या रंगातील पोस्टरच त्या चित्रपटाचे कथानक स्पष्ट करते.
तिच गोष्ट डेव्हीड लीनच्या जगप्रसिद्ध 'डॉक्टर झिवागो' चित्रपटाच्या पोस्टरची (अर्थात 'डॉ.झिवागो' मध्ये पांढरा आणि काळा रंगही फार मोठी भूमिका बजावतो, त्याविषयी त्या रंगाच्या ओळखीच्यावेळी उल्लेख येईलच.)
जगभर खास पौराणिक कथेच्या आवाक्याने तसेच आपल्या स्पेशल इफेक्ट्समुळे गाजलेला "Crouching Tiger and Hidden Dragon" हा चीनचा चित्रपट. यात लाल रंग येतो प्रेमाच्या प्रतीकासाठी. राजकन्या जेन आणि जंगलात लपून राहिलेला तिचा बंडखोर प्रियकर लो यांच्यातील प्रेम आणि दुरावा तरीही आसक्ती आणि ओढ दर्शविण्यासाठी दोघांनाही लाल रंगाचीच वस्त्रे देणे हे दिग्दर्शकाने लाल रंग हे ओढीचे प्रतीक मानून दिले आहेत हे स्पष्ट आहे.
लाल रंग अर्थातच समाजातील विषमता, घटनेतील उत्सुकता, भविष्याविषयीचे आडाखे, मनातील खळबळीचे अंदाज दर्शविण्यासाठीही विविध चित्रपटातून दाखविला जातो. त्यासाठी रेज, माल्कम एक्स, रेबेल विदाऊट अ कॉज, फिलाल्डेल्फिया, एज ऑफ इनोसंस, रोमिओ अॅण्ड ज्युलिएट ही काही उदाहरणे.
["लाल आख्यान" इथे थांबविणे गरजेचे आहे, कारण हा रंग जगभरातच अशा काही विविध अर्थानी 'लोकप्रिय' आहे की, या रंगाशिवाय जणू काही कोणती फ्रेम पूर्णच होऊ शकत नाही. शिवाय याच्या विविध शेड्सही असल्याने त्यांचा विचार केला तर हा एकच रंग चित्रपट दिग्दर्शक आणि कलादिग्दर्शक "कथेतील आत्यंतिकता" दाखविण्यासाठी प्रामुख्याने का वापरतात हे समजते; म्हणजेच याच रंगावर अनेक लेख होऊ शकतील. पण आत्ता पुढील भागात दोन वेगळ्या रंगांचा विचार करू या.]
(टीप : लेखाच्या स्वरूपाविषयी सूचना अवश्य कराव्यात. पुढील रंगाच्या विवेचनाच्यावेळी त्या उपयोगी पडतील.)
इन्द्रा
प्रतिक्रिया
13 Jan 2011 - 12:38 pm | नीधप
ह्म्म्म चांगले विवरण आहे. पण थोडं जास्त धावतं आहे.
बेसिक ओळख लेख असल्याने 'एकास एक' प्रकाराने केलेलं विवेचन ठिके पण ते तित्कं ढोबळ नसतं किंवा नसायला हवं याबद्दल थोडी टिप्पणी यायला हवी होती.
13 Jan 2011 - 1:27 pm | इन्द्र्राज पवार
"...पण थोडं जास्त धावतं आहे..."
~ हो, पटत्ये. पण प्रत्येक रंगाचे विवेचन करायचे डोक्यात असल्याने गतीही ठेवावी हा विचार आहे. तरीही हरकत नाही, मीच हा लेख वेगळ्या नजरेने परत वाचून बघतो म्हणजे तुमच्या सुचनेनुसार पुढील भागात आवश्यक ते बदलही करता येतील.
धन्यवाद...
इन्द्रा
13 Jan 2011 - 1:30 pm | टारझन
सांवरिया नामक तद्दन फालतु चित्रपटात असाच निळ्या कलर चा वापर करण्यात आला होता. पण त्यापेक्षा निलचित्रफित बरी ..
अवांतर : चि.प. सुरेख जमले आहे. भट्टी जमलीये.
13 Jan 2011 - 2:04 pm | इन्द्र्राज पवार
".....निळ्या कलर चा वापर करण्यात आला होता. ..."
~ थॅन्क्स टारझन. "सांवरिया" मधील "निळाई" बद्दल खुद्द संजय लिला भन्साळी यांची टीव्हीवर झालेली मुलाखत आठवते. संजयचे म्हणणे (थोडक्यात) असे की, पूर्ण चित्रपट 'इनडोअर' असल्याने ज्या शहरात हे कथानक घडते [तेही चार रात्रीचे] तेथील वातावरण हे सातत्याने उत्साही, खळखळते आणि प्रेमकहाणीसाठी यथायोग्य वाटावे म्हणून जाणीवपूर्वक निळ्या आणि हिरव्या रंगाचा प्राधान्याने वापर केला आहे. नीऑन साईन्स, वाहते पाणी, शांत रात्र या घटना 'निळाई' ने जास्त परिणामकारक ठरू शकतात. त्याचप्रमाणे 'सांवरिया' हे नाम हे कृष्णालाही उद्देश्यून वापरले जात असल्यानेही निळा रंगाच्या अनेकविध शेड्स त्या चित्रपटात दिसतात.
इन्द्रा
13 Jan 2011 - 3:43 pm | सहज
रात्रीत घडणारे बरेचसे कथानक, नाही म्हणले तरी नायक नायीकेच्या जीवनातील तसा निराशाजनक काळ यामुळे तो अंधारा निळा-काळा लुक मला तरी योग्य वाटला होता. त्यातील सेट मात्र फार कुरुप वाटले होते कदाचित पडद्यावर काहीतरी छान छान दिसणार याची सवय / अपेक्षा असल्यामुळेही असेल म्हणा. पण छोट्या नगरात डोळ्याला पसंत न पडणारे असे नेपथ्य बरेचदा दिसतेही.
कदाचित सिनेमा संगणकावर ते देखील डुप्लिकेट सिडीवर पाहीला असल्यास बराचसा सिनेमा पुरेशा स्पष्ट न दिसल्याने लोकांना ती रंगसंगती आवडली नसेलही.
सोनमचा ह्या सिनेमातील लुक/ डोळे (मेकअप) व तिचा मुड - सलमान बरोबरील दृश्यात सगळ्यात सुंदर व सलमान गेल्यावर एक भकासपणा, चिंता भन्साळी व सोनमने चांगला रंगवला आहे असे वाटले.
लाल रंग काही फ्रेम मधे इन्ग्लोरियस बास्टर्ड तसेच क्राउचिंग टायगर तसे अजुन काही चिनी सिनेमात चांगला घेतला आहे, बाकी बर्याच सिनेमात फारच भडक वाटतो, सुंदर वाटावा असा हा रंग फार कमी वेळा वापरला गेला आहे. सिक्थ सेन्स मधे देखील हा रंग वापरला होता असे वाटते.
13 Jan 2011 - 5:03 pm | इन्द्र्राज पवार
थॅन्क्स सहजराव....
१. संजय लीला भन्साळीच्या चित्रपटात रंगांचा जो भडकपणा ('देवदास' मध्येतर त्याने शांतारामबापूंच्या 'नवरंग'ला ही लाजवले आहे) प्रामुख्याने दिसतो तो त्याचा एक ट्रेड मार्क बनत चालला आहे. अमुक एक रंग अमुक एका कारणासाठी जाणीवपूर्वक वापरला आहे हे आपला प्रेक्षक हा 'बाळबोध' आहे असे समजून वापरला तर त्याची लज्जत कमी होते. 'सांवरिया' तील निळाई अती झाल्यानेच सर्वांच्याच नजरेत तो रंग आत्यंतिकपणे आला अन् मग दिग्दर्शकाला खुलासे करावे लागले. पण तरीही भंसाळी रंगांचा कथानकाच्या उठावासाठी उपयोग करतो हेही एक चांगले लक्षण आहेच बॉलिवूडचे.
२. इंग्लोरिअस बास्टर्ड आणि बॅबेल हे दोन चित्रपट लाल रंगासाठी माझ्य नजरेसमोर होतेच, पण पहिल्यात नाझी विषय असल्याने जो शिंडलर्स लिस्टमध्ये आल्यामुळे घेतला नाही, तर बॅबेलचा उल्लेख पुढील लेखात दुसर्या कारणासाठी येणार आहे.
"...सुंदर वाटावा असा हा रंग फार कमी वेळा वापरला गेला आहे. सिक्थ सेन्स मधे देखील हा रंग वापरला होता असे वाटते...."
~ होय. सिक्स्थ सेन्समधील सुंदर वाटणार्या त्या रेड शेडला सिनेमा टेक्निकच्या भाषेत "Anxious Red" अशी संज्ञा आहे. अशा नामांना मराठीत कोणते नाव द्यावे याबद्दल माझ्याच मनात गोंधळ असल्याने (कारण त्या छ्टेचा नेमका भाव तिथे पकडणे फार गरजेचे असते) काही मर्यादा येतातच. एकट्या रेड मध्येच Forceful, Bloody, Powerful, Defiant, Angry, Anxious, Lusty, Romantic अशा अनेकविध छटा येतात ~ चित्रपट कथानकाच्या अनुषंगाने ~ आता प्रत्येक कॉर्नरने अशा शेड्सवर लिहायचे म्हणजे प्रत्येकाची किमान ४-५ उदाहरणे....त्यामुळे केवळ एकाच रंगासाठी तीन ते चार लेख येणार अशी भीती वाटली आणि तसे लेख जर द्यायचेच ठरविले तर वाचकाच्या सहनशक्तीचा अंत पाहिल्यासारखे होणार, म्हणून स्वतःलाच मी काही मर्यादा घालून ठेवल्या आहेत; त्यामुळे तुम्ही वा अन्य अभ्यासू सुचवित असलेली उदाहरणे ही अशी प्रतिसादातूनच वाचणे क्रमप्राप्त आहे.
धन्यवाद
इन्द्रा
14 Jan 2011 - 10:04 am | नगरीनिरंजन
छान! वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कारणांनी वापरलेल्या लाल रंगाची उदाहरणे आवडली. विशेषतः शिंडलर्स लिस्ट आणि डिक ट्रेसीची उदाहरणे फारच आवडली.
मॅट्रिक्समध्येही मॉर्फिअस निओला खर्या जगातून मॅट्रिक्सबद्दल सांगायला मॅट्रिक्सच्या प्रोटोटाईपमध्ये घेऊन जातो तेव्हाही लाल कपड्यातली सुंदर स्त्री मॅट्रिक्सची एजंट दाखवली आहे. निसर्गात आकर्षक दिसणारी लाल रंगाची फळे विषारी असतात तसा काहीसा अर्थ त्यातून ध्वनित होतो.
13 Jan 2011 - 12:57 pm | गणपा
मागल्या लेखात डांबिस काका म्हणाला होता तसं मी पण चित्रपट पाहाताना कधी अश्या रंगसंगतींवर लक्षच दिल नव्हतं. इंद्रदा तुझ्यामुळे या चित्रपटांकडे आता एका वेगळ्या दृष्टिने पहातोय.
13 Jan 2011 - 12:58 pm | परिकथेतील राजकुमार
छान लेखन इंद्रदा. खुप नवनविन माहिती मिळते आहे.
लाल रंगाला 'एलिमेंट ऑफ फायर' म्हणले जाते. ह्या रंगाचा अजुन मुक्तहस्ते आणि योग्यप्रकारे वापर झालेले अजुन दोन चित्रपट म्हणजे :-
थ्री कलर्स - रेड
आणि
नुकताच आलेला 'रेड' :-
13 Jan 2011 - 1:29 pm | बिपिन कार्यकर्ते
उत्तम.
13 Jan 2011 - 1:34 pm | नंदन
उत्तम लेख, मालिकेच्या सुरुवातीचा लेख वाचून निर्माण झालेल्या अपेक्षा पूर्ण करणारा. मात्र नीधप यांनी म्हटलं तसं अधिक विस्ताराने यावर वाचायला आवडलं असतं.
--- सहमत.
अवांतर - अनेक तार्किक प्रयोगांमध्ये 'क्वालिया' ही संज्ञा वापरली जाते. एकाच वस्तुचे निरनिराळ्या व्यक्तींना वेगवेगळे होणारे आकलन किंवा त्यांच्या मनावर त्याचा पडणारा प्रभाव असं तिचं त्रोटक भाषांतर करता येईल. या संज्ञेची व्याख्या स्पष्ट करताना (उदा. १, २) किंवा एखाद्या व्यक्तीवर रंगांचा काय प्रभाव पडतो, हे प्रयोगाद्वारे जाणून घेण्याचा प्रयत्न करताना हमखास शास्त्रज्ञ ह्या सर्वात प्रभावी अशा लाल रंगाकडेच वळतात.
13 Jan 2011 - 1:35 pm | वेताळ
पण काही पिक्चर मध्ये एकदम काळाच रंग जास्त वापरतात.
13 Jan 2011 - 1:38 pm | स्पा
पवार साहेब.. खूपच सुंदर जमतेय लेखमाला
13 Jan 2011 - 1:50 pm | ढब्बू पैसा
तुमचा लेख खूप माहितीपूर्ण झालाय आणि त्याबद्दल खरंच अभिनंदन.
पण लिखाणात थोडासा कुठेतरी रूक्षपणा जाणवतो. पण इतके चित्रपट आणि इतकं बारकाईने विश्लेषण वाचून थक्क व्हायला होतंय.
रंगांचा इतका सुंदर वापर आणि त्याचं मस्त रसग्रहण. मजा येतेय वाचायला.
पुढचा भागही वाचण्यास उत्सुक ...
13 Jan 2011 - 2:46 pm | समीरसूर
पवारसाहेब,
छान जमून आलाय लेख (आणि आधीचा सुद्धा). खूप नवीन आणि चांगली माहिती मिळतेय. रंगावर होणारा चित्रपटीय विचार कळतोय नीट.
हा लेख चित्रपटातील रंग ब्रँडपेक्षा भावना पोहोचवण्यासाठी कसे उपयुक्त ठरतात यावर आहे.
अवांतरः
विशिष्ट रंगांचा वापर हा ब्रँड बनवण्यासाठी (ब्रँड क्रियेशन) आणि ठसवण्यासाठी (रजिस्टर) होत असतो हे सर्वश्रुत आहेच. उदाहरण द्यायचे झाले तर आयसीआयसीआय बँकेच्या जाहिराती किंवा त्यांचे फलक बघा, सगळ्यांमध्ये लाल रंग प्रामुख्याने आढळतो. स्टार प्लस हे चॅनल निळ्या रंगाचा किंवा त्या छटांचा जास्त वापर करत असे. आता त्यांचे ब्रँडींग बदलले आहे बहुधा. झी मराठी हे चॅनल हे खूप जास्त प्रमाणात लाल-पिवळा-केशरी या रंगांचा वापर करून आपल्या चॅनलचे वेगळेपण जपते. स्टार प्रवाह हे देखील निळ्या रंगाची पखरण करत असते. म्हणूनच स्टार प्रवाह आणि झी मराठी यातले दृष्य फरक (व्हिज्युअल) लगेच लक्षात येतात आणि याचा फायदा ब्रँड रजिस्टर होण्यासाठी होत असतो.
चित्रपट हे देखील तेवढ्या काळापुरते ब्रँड असतात. काही चित्रपट काळाची मर्यादा ओलांडून स्वतःचा ब्रँड कितीतरी वर्षांपर्यंत अबाधित ठेवतात. प्रियदर्शनच्या चित्रपटांमध्ये लाल रंग, प्रकाश-सावली असे बरेच प्रयोग केलेले दिसतात. अर्थात ते नेहमीच यशस्वी ठरतात असे नाही.
बाकी संजय लीला भंसाळी सारखे दिग्दर्शक चित्रपटाच्या फ्रेमला जास्त महत्व देतात आणि परिणामी त्यांचे चित्रपट बघणे ही एक शिक्षा होऊन बसते. तीच तर्हा विधू विनोद चोप्राची आणि 'सपने' बनवणार्या राजीव मेननची सुद्धा. 'करीब' आठवा. प्रत्येक फ्रेम सुंदर पण चित्रपटाचा गाभारा मोकळा होता. '१९४२ अ लव्ह स्टोरी' तिथेच फसला. मणिरत्नम नेमका तिथेच फसतो. 'दिल से' दिसायला सुंदर होता पण बघायला रटाळ होता. तिच कथा 'रावण', 'युवा' ची.
अर्थात ही माझी मते आहेत; बरोबर असतीलच असे नाही. पवारसाहेब आणि इतर जाणकार मंडळी चूक निदर्शनास आणून देतीलच.
--समीर
13 Jan 2011 - 11:45 pm | इन्द्र्राज पवार
समीर, नक्कीच तुम्ही म्हणता तसा एखादा विशिष्ट रंग "ब्रँड" बनविण्याच्या कामी अफलातून यशस्वी होतो. तुम्ही आयसीआयसीआय बॅन्केचे जे उदाहरण दिले आहे ते चपखल तर आहेच, पण जगभर 'पिवळ्यावर काळा' हा 'झेरॉक्स' चा ब्रॅण्ड झाला, तसे यश क्वचितच कुठल्या प्रॉड्क्टला लाभले असेल. तर लंडनची 'लाल ट्राम' ने जगभरातील सार्वजनिक वाहतुकीला कायमचा ब्रॅण्ड देऊन ठेवला आहे. लोगो किंवा सिम्बॉलपेक्षाही रंग किती प्रभावी ठरू शकतो याचीच ही उदाहरणे होत. 'कोकाकोला' या जगप्रसिद्ध ब्रॅण्डसाठीही कंपनीने लाल रंगाची मुक्त उधळण अशी काही केलेली दिसत्ये की, त्या जागी इतकी वर्षे लोटूनसुद्धा नवीन रंग आणण्याचे धाडस कंपनी करण्यास धजावत नाही.
संजय लीला भन्साळी, मणीरत्नम, प्रियदर्शन, करण जोहर, राजीव मेनन ही मंडळी खरेच कल्पक आहेत आणि या सर्वांना रंगाची ताकद माहिती आहे हे तर स्पष्टच आहे. एफटीआयआय ट्रेनिंगचा संजयने नक्कीच उपयोग केल्याचे जाणवते पण निर्माते आणि वितरक यांच्या असह्य अशा दडपणापोटी त्याच्या पठडीतील अनेक गुणी दिगदर्शकांना प्रसंगी नखे चावत बसावे लागते. सांवरियात तो अतिरेक झाला रंगसंगतीचा पण 'ब्लॅक' मध्ये तो बराचसा सावरलेला आहे. येऊ घातलेल्या सरहद्द गांधींच्या जीवनावर आधारित चित्रपटात त्याला रंगांचे प्रयोग करण्यासारखे वातावरण मिळेल अशीच चिन्हे आहेत.
धन्यवाद...!
इन्द्रा
13 Jan 2011 - 3:43 pm | डावखुरा
सखोल अभ्यासातुन आलेला एक उत्तम लेख..
ईंद्राकाका तोड नाही हो तुम्हाला...
पण फार आटोपता घेतलात लेख..
>>> लाल रंग अर्थातच समाजातील विषमता, घटनेतील उत्सुकता, भविष्याविषयीचे आडाखे, मनातील खळबळीचे अंदाज दर्शविण्यासाठीही विविध चित्रपटातून दाखविला जातो.
हे निरिक्षण मस्तच..
पण ह्या विषयाला अजुन न्याय द्यायला हवा...तुमच्यात ती क्षमता आहे..अजुन थोडे येउद्या ना लाल रंगावर..
13 Jan 2011 - 6:05 pm | सागर
इंद्रराज,
पुस्तकांबरोबर चित्रपटांतूनही तुम्ही छान रमता हे या सविस्तर लेखावरुन दिसून येते. सुंदर लेख
लेख आवडला हे वेगळे न सांगणे ;)
अजून वाचायला आवडेल. या धाग्यावर लक्ष ठेवून आहेच. :)
13 Jan 2011 - 7:34 pm | वाहीदा
http://www.youtube.com/watch?v=eFa-FuCkVU4
13 Jan 2011 - 8:24 pm | राजेश घासकडवी
लेखमाला वाचतो आहे. अनेक उदाहरणांमुळे एकाच रंगाच्या अर्थाच्या 'छटा' दिसत आहेत.
इंग्रजी चित्रपटांत लाल रंग हा अनेक वेळा सैतानाचं प्रतीक म्हणून वापरला जातो. दुष्ट, कारस्थानी व्यक्तींना लाल कपडे हमखास दिले जातात.
अमेरिकन ब्युटी मध्ये तो विशिष्ट जातीचा गुलाब हे स्वप्नाचं प्रतीक म्हणून वापरलं गेलं होतं. सायरेन्सच्या गाण्यांप्रमाणे एकाच वेळी आकर्षक व धोकादायक.
13 Jan 2011 - 8:28 pm | चिगो
चित्रपटांकडे पाहण्याचा एक नवा, वेगळा अँगल तुमच्या लेखांमुळे मिळत आहे..
लेखमाला "रंग"तदार होणार ह्यात शंका नाही...
लगे रहो, इंद्रादा...
13 Jan 2011 - 9:41 pm | संदीप चित्रे
नक्की कुठल्या कुठल्या विषयांचा तुझा अभ्यास आहे आणि तू माहितीपूर्ण लेख लिहू शकतोस?
'ज्युनियर रामदास इन मेकिंग' असं मानायला कुणाची हरकत नसावी !!
ह्यापेक्षा मोठी कॉम्प्लिमेंट आत्तातरी सुचत नाहीये !
13 Jan 2011 - 11:40 pm | डावखुरा
संदिपदा शी सहमत..
इंद्रा काकांचे लेख म्हणजे मेजवानी....
14 Jan 2011 - 2:39 pm | इन्द्र्राज पवार
थॅन्क्स संदीप....तुझा अशा स्वरूपाचा प्रतिसाद हेच मोठे कॉम्प्लिमेन्ट मानतो मी. तसा या विषयाचा ज्याला 'सखोल' म्हणतात असा अभ्यास बिलकुल नाही, पण आवड मात्र आहे. नेटवरील अनेक मित्रांसमवेत संबंधित साहित्य आणि मनोरंजन यावर अशा नित्य होत असलेल्या चर्चा आणि या क्षेत्रात चार पावसाळे काढलेले कुणी भेटले की अशा विषयावर त्याना बोलते केले तर तेही आपल्याकडील ज्ञानाची पोतडी सहजगत्या उघडी करतात, त्यामुळेही आवडीला एक विशिष्ट अशी दिशा देता येते, ते मी करतो, इतकेच. [अर्थात आवडही तितकीच महत्वाची आहे हेही खरे]
इन्द्रा
13 Jan 2011 - 11:49 pm | ५० फक्त
श्री. ईंद्रा, धन्यवाद एक अतिशय छान लेखमाला सुरु केल्याबद्दल. आता एका नव्या पद्धतीनं पिक्चर पाहावे लागतील.
अतिशय धन्यवाद पुन्हा एकदा.
हर्षद.
14 Jan 2011 - 4:16 am | निनाद
सुंदर लेखमाला! पण कृपया नुसतीच चित्रपट जंत्री नको. (मला तरी) विवेचन जास्त हवे असे वाटले.
चीनी चित्रपटांमध्ये लालरंगाचा चांगला वापर असतो. पण तो जाणीवपूर्वक नसून सवयीचा भाग म्हणून नकळतपणेही येत असावा असे वाटले. पण अर्थात प्रत्येक चित्रपट निराळा हे सांगणे नलगे!
14 Jan 2011 - 9:42 am | इन्द्र्राज पवार
"....पण कृपया नुसतीच चित्रपट जंत्री नको. ..."
~ थॅन्क्स निनाद....आणि होय, अशा सूचनांचे स्वागतच आहे, किंबहुना "लेखाचे स्वरूप कसे असावे" याबाबत मत व्यक्त करावे अशी लेखाच्या शेवटी मी विनंती केलीच आहे. तुमच्यासारखेच मत वर एकादोघांनी व्यक्त केले असल्याने इथून पुढील 'रंग' वर्णनासाठी ते उपयुक्त ठरेल.
चिनी चित्रपटातून 'लाल' रंगाचा मुक्त वापर असतो हे आपले निरिक्षण योग्यच आहे, पण त्यालाही एक सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे. चिनी परंपरेत "काळा, लाल, हिरवा, पांढरा आणि पिवळा" हे पाच प्रमुख रंग मानले जातात [त्यांच्या ड्रॅगनचे रंग पाहा...या पाच रंगांचेच मिश्रण असते] आणि हे पाच रंग अनुक्रमे त्यांच्या विश्वासानुसार "जल, अग्नी, काष्ट, धातू आणि माती" यांचे प्रतीक आहेत. आता "अग्नी" हा साहजिकच 'चीड, संताप, बंडखोरी, अन्यायाविरूध्द आवात, चेतना' यांची बाजू घेण्यास समर्थ मानला जात असल्याने आणि तो 'लाल' रंगातूनच प्रकर्षाने पुढे येत असल्याने या भावना व्यक्त करण्यासाठी निर्माण केलेल्या प्रत्येक कलाकृतीसाठी तोच वापरण्याकडे कलाकारांचा कल असते.
धन्यवाद.
इन्द्रा
19 Jan 2011 - 5:22 am | निनाद मुक्काम प...
भन्साळीला निळ्या रंगाची बाधा झाली नव्हति त्या काळात हम दिल दे चुके सनम त्याने काढला त्यात एश जेव्हा सलमान कडे जायला तयार होते तेव्हा ती लाल साडी घालते .( संजयच्या नुसार लाल साडी हे नव वधु च्या पोषाखाचे प्रतिक म्हणून मुद्दाहून वापरला आहे .
तिचा नवरा अजय तिची बिदाई तिच्या प्रियकराकडे स्वत जातीने करत असतो .)
19 Jan 2011 - 6:57 am | इन्द्र्राज पवार
"...लाल साडी हे नव वधु च्या पोषाखाचे प्रतिक ..."
~ योग्य निरिक्षण निनाद....शिवाय तुम्ही आणखीन् एका प्रतिकाच्या (या फ्रेममध्येच) नोंद केली असेल. अजयचा शुभ्र पांढरा पेहराव. पांढरा रंग स्वच्छ मनाचे प्रतिक आहे तसेच कोणत्याही घटनेकडे पाहताना त्यातून अंतीमतः चांगलेच कसे सिद्ध होईल असा विचार राखणारी व्यक्ती म्हणूनदेखील या रंगाकडे पाहिले जाते.
(अवांतर : अर्थात चित्रातील अन्य अतिथींचे कपडे काळे आहेत म्हणून त्यांचे स्वभाव 'तसे' असतील असा मात्र अर्थ होत नाही. कलर-सेन्सिटिव्ह दिग्दर्शक केवळ प्रमुख पात्रांच्याच हालचालीचा विचार करीत असतो.)
इन्द्रा
19 Jan 2011 - 9:12 am | ऋषिकेश
खरं मत सांगतो राग नसावा. पहिल्या लेखाने जागवलेली उत्सुकता या लेखात फारशी फिटली नाही. नीधप म्हणतात तसे आस्वादात्मक लिखाण न वाटता धावता आढावा वाटले. लिहिलंय ते उत्तम आहे पण तुमच्याकडून याहीपेक्षा रंगांचे अंतरंग उलगडवून दाखवणार्या लेखनाची अपेक्षा आहे. कमी उदा. घेतलीत तरी चालतील पण एकाच रंगाचे विविध अर्थ दाखवणारी तसेच त्या रंगांचा सृजनात्मक(की सृजनशील?) वापर दाखवणारी उदा. घ्यावीत असे सुचवतो.
बाकी, माझ्यामते लाल रंग हा एका भावनेपेक्षा कोणत्याही भावनेची आत्यंतिकता दाखवायला वापरला गेला आहे. उदा. प्रेम हे 'गुलाबी' असते मात्र त्याची तीव्रता वाढते तेव्हा ते 'लाल' होते. त्यामुळे अमेरिकन ब्युटीमधीत टोकाच्या भावना (इथे, टोकाची वासना) दाखवायला हा रंग चपखल बसला आहे.
पु.ले.शु.
अवांतरः
स्वतःची 'लाल' करणे ;) :- आमच्या हाफीसात आताच झालेल्या फोटोग्राफी स्पर्धेत "कलर्स ऑफ इंडीया" हा विषय होता. त्यात मी माझ्या पत्नीच्या चेहर्याचा (फक्त मिटलेले डोळे व कपाळ) पूर्ण कृष्ण धवल फोटोमधे केवळ कुंकु लाल ठेवले होते. कॅप्शन होते "In India there are no mere colours, there are Colour-codes". (आणि आश्चर्य!!!) छायाचित्राला प्रथम पारितोषिक मिळाले :)
20 Jan 2011 - 8:16 am | नीधप
"In India there are no mere colours, there are Colour-codes"<<<
कॅप्शन आवडले.
19 Jan 2011 - 10:59 am | चिंतातुर जंतू
चिनी चित्रपटांत लाल रंगाचा खूप वेगळा वापर पाहिलेला आहे. तो कम्युनिझमबद्दल उघडपणे टीका करता येत नाही, पण टीका करायची आहे अशा गरजेतून येताना दिसतो. कळीच्या प्रसंगांत चौकटीच्या एखाद्या कोपर्यात एखादी गोष्ट लाल असते. चाललेली गोष्ट ही साधी, कौटुंबिक वगैरे वाटू शकते - उदा: एका चित्रपटात नवरा-बायको देशाच्या दोन कोपर्यांत राहतात आणि अधूनमधून (वर्षातून एकदा वगैरे) एकमेकांना भेटू शकतात असे प्रसंग होते. त्यांच्यावर ही वेळ कम्युनिझममुळे आली होती. त्यांच्या भेटीच्या वेळी पार्श्वभूमीवर एखादीच गोष्ट लाल असे. बाकी गोष्ट प्रेमकथा म्हणता येईल अशी होती. पण तो लाल रंग परिस्थितीवरच्या टिप्पणीप्रमाणे येत असे.
19 Jan 2011 - 1:02 pm | स्पंदना
थोड रंगाबद्दलच विवरण वाढवा इन्द्राज दा! आणि तुम्ही इतक सुन्दर लिहित असताना जागेचा विचार नका करु. खरच आता पिक्चर पहाताना एक वेगळाच दृष्टीकोण डेव्हलप होइल. जे लिहिल आहे ते थोड उडत उडत उल्लेख केल्या सारख वाटल, थोड सखोल येउदे.
मारी प्रतिसाद मात्र अगदी सखोल असतात, पण लेख लिहिताना ही कंजुषी?
19 Jan 2011 - 6:17 pm | भडकमकर मास्तर
उदाहरणे मस्त आहेत...
पण त्यावर अजून लिहा...
आणि " लेख लांब / मोठा होईल" असली चिंता प्लीज करू नका...
पुढला लेख वाचायला उत्सुक
19 Jan 2011 - 7:02 pm | मदनबाण
वाचतोय... :)