'चित्रपट' हे असे एक माध्यम आहे की ज्याच्या जादूने जगातील सर्वच स्तरावरील लोक प्रभावित झालेले असतात. सुरूवातीच्या काळात दोन घटकांची करमणूक असे जरी चित्रपटाचे स्वरूप असले तरी कालानुरूप त्याला विविध तंत्राची जोड लाभली, नवनवीन कल्पना मूर्त स्वरूपात पडद्यावर मांडून त्यावर रसिकांची मते जाणून घ्यावीत असे या क्षेत्रातील दिग्गजांना वाटू लागले, वेळोवेळी नव्या प्रवाहाची त्यात भर पडत गेली आणि जगभर 'चित्रपट म्हणजे निव्वळ मनोरंजन’ नव्हे तर तो एक अभ्यासही होऊ लागला. अर्थात निर्विवादपणे 'हॉलीवूड' कडे याचे पितृत्व असल्याने तिथे या माध्यमात जे प्रयोग केले गेले ते सर्वच्या सर्व वा जसेच्या तसे जगातील अन्य ठिकाणाच्या चित्रपटनिर्मितीकडे गेले नाहीत तरीदेखील सर्वत्रच तंत्रज्ञानांमध्ये जी कमालीची सुपीकता आली आहे ती पाहता केवळ आहे कॅमेरा तर चला चित्रण करू या त्या दृष्याचे असे आता होत नाही तर अमुक एक दृश्य कोणत्या रेंजने घ्यावे, त्यासाठी बॅकड्रॉप काय हवा, रात्रीचे, दिवसाचे, गतीमानता, संकलन, विशेष परिणाम आदी बाजूही तंत्रदृष्ट्या सफाईदार आल्या की नाही हे कल्पक दिग्दर्शक जाणीवपूर्वक पाहतो. चित्रपटाचे प्रत्यक्ष चित्रीकरण सुरू होण्यापूर्वी शेकडो पानांचे आराखडे तयार होत जातात.
या संदर्भात कथनकातील काही "रंग" काय दर्शवितात हेही "हॉलीवूड" मध्ये कशा पध्दतीने पाहिले जातात याचा मागोवा उदाहरणासह घ्यावा असे मला वाटल्याने जे काही चित्रपट पडद्यावर, फिल्म क्लब्जमधून पाहिले, सीडी, डीव्हीडी, माध्यमाद्वारे पाहिले, ते पाहिल्यावर अमुक एक रंग तमुक एका फ्रेममध्ये दिग्दर्शकाने का वापरला असावा? असे विचार आल्यावर या संदर्भात अनेक जालीय मित्र व अधिकारी व्यक्तीं समवेत चर्चा आणि जेवढे मिळेल तेवढे साहित्य वा त्यावरील परिक्षणे वाचली व जे काही चित्र नजरेसमोर आले ते इथे मिपा सदस्यांसाठी शब्दबद्ध करीत आहे. ('लाईफ' या जगप्रसिद्ध मासिकाने संग्रहीत केलेला "लाईफ गोज् टु मूव्हिज" नावाचा एक मोठा आणि तितकाच देखणा ग्रंथराजही या लेखासाठी उपयुक्त ठरला आहे.) माझा असा दावा बिलकुल नाही की कथानकात मला रंगांच्या बाबतीत जे भावले नेमके तेच त्या दिग्दर्शकाला अभिप्रेत असेल, पण त्याने तो रंग जाणीवपूर्वक तिथे का वापरला असावा याची अटकळ मात्र मला बांधता आली, इतकेच. कदाचित इथल्या एखाद्या अभ्यासू वाचकाला तसे वाटणार नाही, पण तरीही 'रंगसंगती' हा चित्रपट निर्मितीतील कथानकाचा एक अविभाज्य घटक आहे हे मान्य व्हावे.
चारचौघात [जसे इथे मिपावर] आपण कालपरवा पाहिलेल्या चित्रपटाबद्दल आपुलकीने, भरभरून लिहितो, बोलतो. तसेच त्या अनुषंगाने मग अन्य चित्रपटांचा उल्लेख आला तर त्यातील कथानकाची पार्श्वभूमी, पात्रांचा अभिनय, शूटिंग, गतीमानता, आदी अंगावर खूप चर्चिले जाते पण क्वचितच असा एखादा चित्रपट असेल की ज्यावेळी आपल्या मते 'अमुक एका प्रसंगी त्या दिग्दर्शकाने तोच रंग फ्रेमसाठी का वापरला असेल? Significance of a particular color for a particular frame हे दिग्दर्शक का मानतो? रॉब मार्शलने 'शिकागो' चित्रपटात कॅथरिन झेटा-झोन आणि रेनी झ्वेलेगार यांच्या नृत्याच्यावेळी झगझगीत नारिंगी रंग आणि समोरासमोरील संवाद दृष्यासाठी दाट लाल रंगाची छ्टा वापरण्याचे काय कारण असू शकेल? तर स्टीव्हन स्पिएलबर्गने ऑस्कर विजेत्या "शिंडलर्स लिस्ट" या जवळपास तीन तासाच्या कृष्णधवल चित्रपटातील केवळ एकाच फ्रेममध्ये एका मुलीचा कोट 'लाल' रंगाचा का दाखविला असेल? तसेच "फिलाडेल्फिया" मध्ये एचआयव्ही पॉझिटीव्ह पेशंट टॉम हॅन्क्स भावुक होऊन बोलत असताना ती फ्रेम फिकट तपकिरी आणि नंतर लाल रंगाकडे झुकणारी असे करण्यामागे काय हेतू असेल त्या टीमचा? असे प्रश्न ज्यावेळी नजरेसमोर येऊ लागले त्यावेळी निव्वळ आहे सोय इस्टमनकलरची वा टेक्नीकलरची म्हणून काढला गेला रंगीत चित्रपट असे नसून चाणाक्ष दिग्दर्शक फ्रेम बोलकी करण्यासाठीही रंगाचा कुशलतेने वापर करू शकतो असे ध्यानात येऊ लागले.
आल्फ्रेड हिचकॉकच्या चित्रपटात अन्य कुठल्याही माध्यमापेक्षा त्याचा 'कॅमेरा' जास्त बोलतो असे मानले जाते ("नटोरिअस, सायको, रिअर विंडो, रेबेका"). चार्ली चॅप्लिन समाजजीवनातील बारकाव्यावर आणि हालचालीवर लक्ष केन्द्रीत करत असे, तर त्याच्याच पठडीतील वूडी अॅलनची पात्रे त्याचे कथानक 'बोलकी' करतात ("अॅनी हॉल", "हॅना अॅण्ड हर सिस्टर्स"). रॉबर्ट अल्ड्रिच गतीमानतेवर ("डर्टी डझन", 'ग्रीसम गॅन्ग", "फ्लाईट ऑफ दि फिनिक्स"), तर मार्टिन स्कोरसेसे ("टॅक्सी ड्रायव्हर", "रेजिंग बुल", "केप फीअर", "अॅव्हिएटर") मानसिकतेवर भर देतात. फ्रान्सिस फोर्ड कपोला अंधारावर भर देऊन प्रकाशाला सामोरे आणतात ("अॅपोकॅलिप्स नाऊ", "गॉडफादर ट्रीऑलॉजी"), इंग्मार बर्गमन, अकिरा कुरोसावा, त्रुफाँ, विट्टोरिया डी सिका हे अनुक्रमे स्वीडिश, जपान, फ्रान्स, इटलीचे (आणि आपले सत्यजीत रे) दिग्दर्शक जगभर गाजले ते कथेतील साध्यासुध्या वातावरणनिर्मितीमुळे [कुरोसावाच्या 'राशोमान' वर तर अन्य कुठल्याही भाषेतील चित्रपटापेक्षा जास्त लिहिले गेले आहे असे मानले जाते...या चित्रपटातील प्रमुख पात्र बाजूलाच, पण यातील धो-धो कोसळणारा 'पाऊस' हाच एक प्रमुख अभिनेता बनला आहे, आणि ही करामत त्या विलक्षण प्रतिभेच्या दिग्दर्शकाची....आज बरोबर ६१ वर्षे पूर्ण झालेल्या 'राशोमान' या चित्रपटावर स्वतंत्र लिहिणे गरजेचे आहे, पाहू या.]. डेव्हीड लीन ऐतिहासिक भव्यतेवर ("लॉरेन्स ऑफ अरेबिया", "ब्रिज ऑन दि रिव्हर क्वाय", "डॉक्टर झिव्हॅगो") तर स्टीव्हन स्पीएलबर्ग तंत्रावर आणि त्यातील गतीवर ("ई.टी.", "जॉज", "क्लोज एनकाऊन्टर्स ऑफ दि थर्ड काईंड", "इंडियाना जोन्स सीरीज") भर देत असत. यातील हिचकॉक याना तर भारतातील प्रेक्षक असो वा जगभरातील कुणीच कधी विसरू शकत नाही. त्यांची कारकिर्द बहरली त्यावेळी कृष्णधवलच निर्मिती होत असल्याने त्यांच्या एकूण ४४ बोलपटापैकी केवळ दहाबारा चित्रपटच रंगीत निघाले पण इतक्या कमी निर्मितीतही कथानकात रंगाचे महत्व कशाप्रकारे दर्शविता येते हे त्यांना फार प्रभावीपणे समजले होते. (त्याविषयी पुढे येईलच).
ही काही वानगीदाखल दिलेली दिग्दर्शकांची नावे असली तरी या आणि याच मुशीतील अन्य दिग्दर्शक [रिचर्ड ब्रूक्स ~ 'लॉर्ड जिम', फ्रेड झिनेमन ~ "मॅन फॉर ऑल सीझन्स", जॉर्ज स्टीव्हन्स ~ "प्लेस इन द सन", अॅलन पाकुला ~ "सोफी'ज चॉईस", सिडनी ल्यूमेट ~ "मर्डर ऑन दि ओरिएन्ट एक्स्प्रेस", रिचर्ड लेस्टर ~ "रॉबिन अॅण्ड मरिअन", जॉर्ज कुकर ~ "माय फेअर लेडी"......आदी] या प्रतिभावान दिग्दर्शकांनी 'रंगमहात्म्य' जाणले होते व त्या अनुषंगाने ते ते चित्रपट दिग्दर्शित करण्यात विशेष स्वारस्य दाखविले. अर्थात "मी अमुक एक कारणासाठी ही फ्रेम या रंगाची केली..." असे प्रत्येकवेळी कुणी सांगत बसत नाही तर त्या त्या वेळी दिलेल्या मुलाखतीमधून खुबींचे मर्म उघडले जाते. त्याच्या अनुषंगाने अभ्यास केल्यास रंग कथानकावर किती प्रकारे आणि कसा प्रभाव टाकू शकतो हे त्या चित्रपटांचा पुनश्च आनंद घेतल्यास समजू शकते.
[क्रमश:....]
प्रतिक्रिया
10 Jan 2011 - 3:22 pm | बिपिन कार्यकर्ते
उत्तम सुरूवात... अपेक्षा वाढल्या आहेत. पुढे लवकर येऊ दे.
10 Jan 2011 - 6:59 pm | अवलिया
असेच म्हणतो.. मस्त लेखमाला होणार यात शंका नाही.
10 Jan 2011 - 9:31 pm | विकास
पुलेशु! वाट पहात आहे.
10 Jan 2011 - 3:30 pm | स्पा
क्या बात हे इंद्र..
एकदम हटके विषय...
खरय.. प्रत्येक चित्रपटाचा स्वतःचा एक रंग असतो.. एक शेड असते, त्याने वातावरण निर्मिती अजून प्रभावशाली होते..
हि लेखमाला रंगणार हे निश्चित.
वाचतोय.. पुढचा भाग लवकर येउंद्यात
10 Jan 2011 - 3:33 pm | sagarparadkar
व्वा ... क्या बात है ...इंद्राची ही लेखमाला .. म्हणजे एक 'अभ्यासपूर्ण' मेजवानीच असणार हे नक्की !
पुढचे काही दिवस या वाचनामुळे फारच प्रसन्नतेत जातील. पुढील लेखनाची वाट पाहतोच आहे, पुलेशु.
10 Jan 2011 - 3:38 pm | ढब्बू पैसा
सुरवात (ट्रेलर) उत्तम आहे. ह्या लेखमालेकडून खूप अपेक्षा आहेत आणि इंद्राच्या अभ्यासाचा आवाका पाहता, अपेक्षा पूर्ण होतीलच ह्याची खात्री पण आहे!
पुलेशु :)
10 Jan 2011 - 3:40 pm | गणपा
मस्त सुरवात केली आहे..
या मालिकेतली पुढील पुष्पे वाचण्यास उत्सुक. :)
10 Jan 2011 - 3:46 pm | परिकथेतील राजकुमार
वाह !
बर्याच दिवसांनी इंद्रदाचे स्वतंत्र लेखन म्हणजे अगदी मेजवानी आणि संग्रहणीय असणार हे नक्की.
अल्पज्ञानाप्रमाणे भर घालीनच. मात्र क्रमशःचा मान ठेवुन सुद्धा एक प्रश्न पडला की चक्क चक्क इंद्रदा सारख्या अभ्यासकाकडून पहिल्या भागात 'माजिद माजिदीचा' उल्लेख कसा राहिला ? मग त्याचा 'बरान' असो वा 'चिल्ड्रन ऑफ हेवन' असो, ह्या चित्रपटांचा आणि त्यातील रंगांचा उल्लेख आल्याशिवाय पुढे सरकायचे कसे ?
10 Jan 2011 - 9:49 pm | अर्धवट
अगदी असेच म्हणतो..
10 Jan 2011 - 11:39 pm | इन्द्र्राज पवार
"....'माजिद माजिदीचा' उल्लेख कसा राहिला ?...."
~ प.रा. तुमच्या लक्षात एक बाब नक्कीच आली असेल की मी वर ज्या माध्यमातून चित्रपट पाहिले असे म्हटले आहे तीत "टीव्ही" चा उल्लेख नाही. माजिदींचे दोन्ही चित्रपट मी पाहिले ते 'वर्ल्ड मूव्हीज' या चॅनेलवर आणि त्याबद्दल भारावून गेलोही आहे, अगदी तुमच्यासारखाच. पण असे असले तरी "तांत्रिक" नजरेने एका कलाकृतीकडे पाहायचे झाल्यास तो चित्रपट पुन्हा पुन्हा [वेळप्रसंगी 'रीवाईंड' करून] पाहणे गरजेचे असते, जे टीव्हीच्याबाबतीत शक्य नाही. [शिवाय रंगमाहात्म्यसाठी याक्षणी तर नजरेसमोर हॉलीवूडच आहे, हेही एक कारण आहेच.]
पण वरील दोन चित्रपटांचा आणखीन एका अन्य लेखासाठी मी पुढे उपयोग करणार आहेच.
धन्यवाद.
इन्द्रा
11 Jan 2011 - 11:29 am | परिकथेतील राजकुमार
ओक्के सायर. वाट बघतोय.
रंगसंगतीवर लिहिताना शक्य झाल्यास 'द लायन किंग' , 'कुंग्-फु-पांडा' सारख्या अॅनिमेटेड चित्रपटात वापरण्यात आलेल्या रंगांचा खास उल्लेख करायला विसरु नका.
10 Jan 2011 - 3:59 pm | लतिका धुमाळे
Moulin Rouge.
Dierctor -- Baz Luhrman.
या चित्रपटात दिग्दर्शकाने केलेली रंगसंगती तर एखाद्या चित्रा (painting) सारखी आहे.
कथानकापेक्षा मला तिच जास्त आवडली होती. या चित्रपटातील रंगांबद्दल तुम्ही लिहाच्.संपूर्ण चित्रपट impressionist painters ची आठवण करून देतो.
पुढ्च्या भागांची वाट पहात आहे.
लतिका धुमाळे
10 Jan 2011 - 4:02 pm | स्पा
saw च्या सिरीज मधील स्तुदिओ लायटिंग सुद्धा भन्नाट आहे
10 Jan 2011 - 4:55 pm | नंदन
सुरुवात. पुढल्या भागांची वाट पाहतो. सध्या चिंजं आणि इंद्रा यांच्या लेखमालिकांमुळे चित्रपटविषयक लेखांची मेजवानी आहे म्हणायची :)
10 Jan 2011 - 9:26 pm | मेघना भुस्कुटे
असेच म्हणते!
न लांबता, सुयोग्य अंतरं घेत ही मालिका येऊ दे...
11 Jan 2011 - 11:34 am | दिपक
अगदी असेच.
10 Jan 2011 - 5:25 pm | ५० फक्त
पुन्हा एकदा अतिशय धन्यवाद इंद्र्राज, या लेखमालिकेसाठी अनेक उत्तम शुभेच्छा.
मला सखाराम गटण्यांप्रमाणे - मला तुमच्यासारखा व्यासंग करायचा आहे " असं म्हणावसं वाटतं आहे.
हर्षद.
10 Jan 2011 - 8:42 pm | डावखुरा
ईतक्या छान लेखसमुहाचा साक्षिदार होण्याचे भाग्य मला मिळते आहे..
त्या लेखाचे प्रणेते गणपा आणि लेखक ईंद्रा यांचे आभार..
रंगांचा उपयोग चित्रात असो किंवा चित्रपटात किंवा अन्यत्र कुठेही..
त्यासाठी रंगचक्राचा अभ्यास महत्वाचा ठरतो..रंगांची ही जाण काही वेळेस उपजत असते तर काही वेळेस शिकाउ..
पण यात नैसर्गिक बाबिंचा फार मोठं योगदान आहे...
पुर्वीच्या कृष्ण धवल चित्रपटांचे वैशिष्ट्य म्हणजे हे चित्रपट रंगहीन असुनही रंगाचा आभास यातुन होत असे याचा अभ्यास होउन तेच तंत्र चित्रात उतरावे यासाठी आमचे आचार्यजी आम्हाला कृष्णधवल चित्रपट अवश्य पहायचा आग्रह करायचे..
उदा.तसेच प्रसंगानुरुप म्हण्जे भय्पट असेल तर भडक, दु:खी रंगाचा वापर हा सामान्य पण पिकसो च्या थेअरी प्रमाणे ब्लु कलर वापरुनही हॉरर निर्माण होउ शकतो..
असो..
उत्तम विषयाला हात घातलात..
हे शिवधनुष्य पेलण्याची ताकद तुमच्यात आहे हे मागील (सॅम मानेकशॉ) व ईतर लेखांवरुन दिसते..
या अभ्यासपुर्ण लेखासाठी शुभेच्छा..
पुलेशु...
10 Jan 2011 - 5:57 pm | ramjya
पुढ्च्या भागांची वाट पहात आहे
10 Jan 2011 - 6:16 pm | स्वाती२
वाचतेय! :)
10 Jan 2011 - 6:56 pm | ऋषिकेश
लेखन विषय आवडला. काहि वेळा ठराविक रंग का असेल याचा स्वतःपुरता तरी अंदाज बांधता येतो - मात्र बर्याचदा तसा ये त नाही. आणि आपल्यापुरता अंदाज बांधणे आणि दिग्दर्शकाला तेच कारण अभिप्रेत असणे झाले म्हणजे तो प्रयोग सफल झालासा वाटते.
असो, फार 'मटेरीअल' हाती लागलं नसलं तरी प्रस्तावना करून देणारा हा 'टिझर' भाग आवडला.. आता विस्ताराने - चवीचवीने - मात्र हात कोरडे होणार नाही इतक्या वेगाने पुढचे भाग येऊ देत :)
10 Jan 2011 - 7:52 pm | चित्रा
उत्सुक आहे, पुढचे भाग वाचायला.
10 Jan 2011 - 8:02 pm | राजेश घासकडवी
उत्तम विषय. लेखमाला रंगणार यात शंका वाटत नाही.
मला चटकन आठवणारे चित्रपट म्हणजे 'Avatar'. यात परग्रहावर जणू स्वर्गच भासावं असं जंगल दाखवण्यासाठी निळा व हिरवा यांची लयलूट केलेली आहे. सिनेमा संपला तरी तो रंग डोळ्यावरून उतरत नाही. मानवी यानांमध्ये कठोर काळ्या पांढऱ्यांचा वापर आहे. हॅरी पॉटरच्या चित्रपटांत तो पुढच्या भागांमध्ये हळुहळू काळा करत नेलेला आहे.
काही सूचना/विनंत्या
- भिन्न संस्कृतींमध्ये रंगांना वेगवेगळे अर्थ असतात. उदाहरणार्थ पिकासोचा निळा हा दुःखी समजला जातो. भारतात तो अर्थ तितका प्रबळ नाही. असे फरक दिसतात का?
- नुसत्या रंगांविषयी लिहिण्याऐवजी पोत व कॉंट्रास्टविषयी देखील लिहा, कारण बहुतेक वेळा हे सर्व पूरक असतात.
10 Jan 2011 - 9:27 pm | मेघना भुस्कुटे
हॅरी पॉटर, संस्कृतीप्रमाणे बदलते अर्थ - अर्थछटा, पोत.... सगळ्याला अनुमोदन.
10 Jan 2011 - 8:06 pm | पुष्करिणी
लेखमालेचा ट्रेलर आवडला...पुढच्या लेखांच्या प्रतिक्षेत.
अलिकडचा रंगसंगती आणि कॅमेराचा उपयोग आवडलेला सिनेमा म्हणजे रावण ( कथानक अजिबात आवडलेलं नाही ).
मिर्च मसाला, टायटॅनिक पण या दॄष्टीनं आवडतात.
10 Jan 2011 - 8:21 pm | रामदास
नावाचा एक सिनेमा मी पाहीला होता .त्या सिनेमातले तुमसे मिलके दिलका... एक गाणं मी अनेकदा पाहीलं आहे ते त्यातल्या रंग संगतीसाठी .http://www.youtube.com/watch?v=zGdYEwsz6eA
"ताल" ची सगळी गाणी रंगसंगतीसाठी पाहीली.
10 Jan 2011 - 8:34 pm | नीधप
चांगला विषय निवडलात.
10 Jan 2011 - 9:07 pm | सुनील
चित्रपटाकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून पाहणारी लेखमाला होईल असे दिसते. पुढील भाग वाचण्याची उत्सुकता आहे.
10 Jan 2011 - 9:11 pm | शुचि
डायरी आणि पेन सरसावून बसले आहे.
10 Jan 2011 - 9:37 pm | आत्मशून्य
प्रतीक्रीया लवकरच
10 Jan 2011 - 9:41 pm | सुबक ठेंगणी
ऋषिकेशप्रमाणेच म्हणते ट्रेलर छान होतं.
दुसरा एक मला रंगांसाठी लक्षात राहिलेला चित्रपट म्हणजे मक्बूल. त्यातला हिरव्या, काळ्या रंगांनी तयार झालेलं गूढ खूप दिवस स्वप्नात येत होतं.
10 Jan 2011 - 9:47 pm | नीलकांत
पुढील भागांची उत्सुकतेने वाट बघतो आहे. ही मेजवानीच आहे म्हणायची आमच्यासाठी.
- नीलकांत
11 Jan 2011 - 12:21 am | पिवळा डांबिस
एका प्रसंगी त्या दिग्दर्शकाने तोच रंग फ्रेमसाठी का वापरला असेल?
नाही बुवा! मी कबूल करतो की माझ्या मनात नाही असा कधी विचार आला आजपर्यंत!
खरं तर हॉलिवूडचे चित्रपट पाहतांना कथानकातच मी इतका बुडून जातो की मग फ्रेममधले रंग नोटिस करायचं भानच रहात नाही मला!
मग चित्रपट पाहून झाल्यावर ही जर म्हणाली की "त्या मेरिल स्ट्रीपच्या त्या फॉर्मल ड्रेसचा रंग काय झकास होता नाही?" तर मग माझा "कोणता ड्रेस?" हा बावळट प्रश्न ठरलेला!!:)
माणसं व्हिजुअल, ऑडियो, किंवा कनेस्थेटिक असतात त्यावर हे रंगाचं नोटिस होणं न होणं अवलंबून असेल का?
असो.
लेखाचा विषय सुरेख आहे, प्रारंभिक मांडणीही उत्तम आहे!!!
पुढील भागांच्या प्रतीक्षेत!!
11 Jan 2011 - 6:48 am | नगरीनिरंजन
+१
असेच म्हणतो. चित्रपट पाहताना हे सगळं भान ठेवण्याची सवय या निमित्ताने करून घेता आली तर उत्तम होईल.
11 Jan 2011 - 12:21 am | चिंतातुर जंतू
चांगला विषय. पुढचे भाग वाचण्यास उत्सुक. एक दोन गोष्टी...
ल्यूमिए बंधूंमुळे फ्रान्स हा चित्रपट-माध्यमाचा उद्गाता समजला जातो. हॉलिवूडमध्ये विविध काळात विविध तंत्रं वा प्रयोग अर्थात झाले. तरीही या बाबतींत युरोप, दक्षिण अमेरिका, जपानसारख्या ठिकाणी जी प्रयोगशीलता आणि जे वैविध्य दिसतं ते हॉलिवूडच्या बड्या स्टुडिओंमध्ये तितकं दिसत नाही असं वाटतं. त्यामुळे हॉलिवूडचा विचार अवश्य करावा, पण फक्त त्यावरच भर देऊ नये असं सुचवेन.
वर घासकडवींनी म्हटल्याप्रमाणे रंगसंगतीचा संस्कृतीशी खूप संबंध असतो. साधं उदाहरणः मिपाचं जुनं रूप ऑफिसमध्ये पाहताना काहींना अधिक भडक वाटायचं. याचं कारण पाश्चिमात्य संस्कृतीत ते लाल-पिवळे रंग भडक वाटतात, पण भारत, दक्षिण अमेरिका किंवा आफ्रिकेत ते तसे वाटणार नाहीत. यामुळे चित्रपटांच्या निर्मितीत आणि रसग्रहणातही फरक पडतो. याचाही विचार करावा ही विनंती.
11 Jan 2011 - 1:24 am | इन्द्र्राज पवार
"....ल्यूमिए बंधूंमुळे..."
~ अर्थात चित्रपट वाटचालीचा हा इतिहास मला माहित आहेच तसेच लॅटिन अमेरिका, युरोप आणि जपान, इराणने विषयातील वैविध्यता प्रकर्षाने मांडून जरी तंत्रदृष्ट्या हॉलीवूडपेक्षा ते मागे असले तरी त्यांचे सादरीकरण किती सक्षम असते हे वेळोवेळी दाखविले आहे, आजही दाखवित आहेतच. पण 'रंगमाहात्म्य' या विषयासाठी हॉलीवूड निवडण्याचे कारण केवळ त्यासंदर्भात असलेली चित्रपटांची सहज उपलब्धता. मी मूळ लेखात म्हटल्याप्रमाणे 'मी जे चित्रपट पाहिले' त्या मर्यादेतच माझे अनुभव शब्दात मांडू शकतो. नाही म्हटले तरी माझा हॉलीवूडव्यतिरिक्त जगातील अन्य भाषांतील चित्रपटांचा थोडासा अभ्यास असला तरी त्यातील काही अपवाद वगळता सारेच चित्रपट मी 'प्रत्यक्ष' पडद्यावर पाहिले नसल्याने त्यांच्याविषयी मी अधिकारवाणीने मत प्रदर्शित करू शकत नाहे, इतकेच मला म्हणायचे होते.
इन्द्रा
11 Jan 2011 - 11:01 am | निनाद
सुरेख विषय आणि चांगले विवेचन इंद्रराज. या विषयावर बहुदा पहिल्यांदाच इतक्या सखोल दृष्टीकोनातून मराठीत, जालावर लिहिले असावे.
तरीही या बाबतींत युरोप, दक्षिण अमेरिका, जपानसारख्या ठिकाणी जी प्रयोगशीलता आणि जे वैविध्य दिसतं ते हॉलिवूडच्या बड्या स्टुडिओंमध्ये तितकं दिसत नाही असं वाटतं. या वाक्याशी १००% सहमत! कथाबीजा पासून ते सादरीकरण सर्व बाबतीत हे वैविध्य जाणवत राहतं.
चिंजंच्या उर्वरित प्रतिसादाशीही सहमती आहेच.
इंद्रराज पुढील भागाच्या प्रतिक्षेत आहेच.
11 Jan 2011 - 12:25 am | चिंतामणी
आणखी येउ द्या.
11 Jan 2011 - 12:26 am | मेघवेडा
उत्तम विषय. पुढील भागांच्या प्रतीक्षेत.
11 Jan 2011 - 12:55 am | धनंजय
मागे एक चिनी चित्रपट बघितला होता "हीरो". त्यात चित्रणातील रंगसंगतीचा प्रभावी (किंवा अतिरेकी) वापर केला होता, ते आठवते.
या आयएमडीबी दुव्यावर त्यातील काही चित्रफिती बघता येतील.
लेख/मालिका उत्साहाने वाचत आहे.
11 Jan 2011 - 1:26 am | क्रेमर
छान सुरूवात. लेखमालेचा विषय रोचक आहे.
11 Jan 2011 - 5:16 am | फारएन्ड
चित्रपटांविषयी आणखी माहिती होईल ही लेखमाला वाचून.
ट्रॅफिक या चित्रपटात अमेरिका व मेक्सिको चे शूटिंग करताना मेक्सिकोतील शॉट्स पिवळ्या रंगात दाखवले आहेत ते आठवले. लेखाचा उद्देश बॅकग्राउंड मधली, कलाकारांच्या पोशाखातील रंगसंगती असा आहे आणि सगळी फ्रेम पिवळ्या रंगात दाखवणे (बहुधा वेगळा फिल्टर वापरून) हे जरा वेगळे आहे हे माहीत आहे, पण काही दिग्दर्शक रंगांचा असाही वापर करतात. चित्रपटात पुढे पुढे केवळ त्या पिवळ्या रंगावरून सुद्धा हे मेक्सिकोत घडत आहे हे आपल्याला कळते.
11 Jan 2011 - 11:23 am | इन्द्र्राज पवार
"ट्रॅफिक...." एक जबरदस्त सादरीकरण "ड्रग" विषयावर, अमेरिकेचीच काय पण सार्या जगाच्या डोकेदुखीचा विषय....आणि निर्मिती अशी काही ताकदीची आहे की, आपल्याला असे सातत्याने वाटत राहाते की, झेव्हिएर रॉड्रिग्ज या अधिकार्यासमवेत आपणच त्या जीपमध्ये आहोत. त्यातील रंगसंगतीही परिणामकारक अशी आहे की, 'ट्रॅफिक' च्या काळया धंद्याचे उग्र स्वरूप सातत्याने जाणवते....नव्हे भाजते.
इन्द्रा
11 Jan 2011 - 5:49 am | सहज
रोचक विषय, उत्कंठा वाढवणारी सुरवात!
इतके उत्सुक वाचक आता लेखमाला रंगणार!! :-)
11 Jan 2011 - 1:37 pm | मृत्युन्जय
इंद्रा सुरुवात तर झक्कास झाली आहे. तुच लिहितो आहेस म्हणजे लेखमाला फर्मास होणार यात काही वाद नाही.
आतापर्यंतची सगळी उदाहरणे तु इंग्रजी चित्रपटांची दिली आहेस. हिंदी चित्रपट कदाचित निर्मितीमुल्यात एवढे सरस नसतील किंवा एवढ्या काटेकोरपणे रंगसंगती किंवा रंगयोजना / प्रकाशयोजना बघत नसतीलही. पण काही चित्रपटातला रंगांचा वापर खुपच परिणामकारक आहे. उदा.: मुघल - ए - आझम. हा चित्रपट जेव्हा रंगीत करण्यात आला तेव्हा त्यातली मजा खर्या अर्थाने कळाली. पण कृष्णधवलपटात देखील ती काही गाण्यात फार प्रकर्षाने जाणवली होती.
असाच अजुन एक चित्रपट म्हणजे जोधा अकबर. मला चित्रपट आवडला नाही. पण या बाबतीत सुंदरच होता.
तसेच रंगसंगतीमध्ये फसलेले काही हिंदी चित्रपटसुद्धा आहेत. उदाहरणार्थः सावरिया. या चित्रपटातला निळा आणि काळा रंग अगदी डोळ्यात जातो. चित्रपट पुर्ण फसला त्यामुळे (तो एरवी पण बकवास होता ही गोष्ट वेगळी)
11 Jan 2011 - 11:32 am | स्पा
अगदी सहमत....