मैत्र! (१)

श्रावण मोडक's picture
श्रावण मोडक in जनातलं, मनातलं
4 Jun 2008 - 2:45 pm

तो आणि मी...
आम्हा दोघांचं मैत्र केव्हापासूचं?
मला तरी सांगता येणार नाही...
मीही तुमच्यासारखाच...
त्याच्या प्रेमात पडलेला...
वेगवेगळ्या रुपात तो भेटतो... तुम्हाला तसाच मलाही...
लहानपणापासून भेटत आलाय...
तो... पाऊस...
---
गावची माती लाल. त्यामुळं तिथल्या पावसाच्या आठवणी त्या लाल रंगाशिवाय कधीच पूर्ण होऊ शकणार नाहीत. तेव्हा गावाचं कॉंक्रिटचं जंगल झालेलं नव्हतं. त्यामुळं आम्ही रहायचो त्या पेठांमधल्या वाड्यांमध्ये पावसाळ्यात तळी साचू शकायची. ही तळी स्वच्छ असायची. त्यांचा लाल रंगच त्यांच्या स्वच्छतेची खात्री द्यायचा. तळी म्हणजे माझ्या तेव्हाच्या - सहा-सात वर्षे - वयाच्या आकाराला साजेशी तळी. शेजाऱ्यांच्या आवारात असलेलं चिकूचं झाड अर्धं आमच्या आवारात आलेलं होतं. ते बरोबर माझ्या घराच्या दारासमोर यायचं. तिथं एका शेजाऱ्यांचीच चारचाकी लावलेली असायची. तिच्यापुढं एक रिक्षा. या दोन्ही गाड्यांच्या चाकांचे पट्टे तयार झालेले असायचे त्या पावसाळ्याच्या दिवसात. त्या पट्ट्यांमधून दुपारी आलेला पाऊस पाणी ठेवून जायचा. पावसाचा जोरही अगदी मध्यम असायचा. त्यामुळं पाणी साचायचं ते केवळ त्या चाकांच्या पट्ट्यांपुरतं आणि शेजारी घराच्या भिंतीना लागून फुलझाडांसाठी केलेल्या वाफ्यांमधल्या तळ्यांपुरतं. ते पट्टे वाहून जाणार नाहीत याची तो आम्हा मुलांसाठी खबरदारी घेत असावा. त्या पट्ट्यांच्या नद्या आमच्या कागदी नावा फिरण्यासाठी पुरायच्या. त्या नद्यांमधून शेजारी तळ्यांपर्यंत वाट काढून नावा तिथून चालवत न्यायच्या. या खेळात आम्ही इतके गर्क होऊन जायचो की, कपड्यांना मातीचा लाल रंग कधी लागला, आपले हात-पाय आणि बहुतेकदा तोंडही त्या रंगानं कसं माखून गेलंय हे कळायचं तेव्हा आईचं ओरडणं खावं लागलेलं असायचं. तेव्हाच्या पावसाची आज लक्षात राहिलेली आठवण ही एवढीच. अगदी निरागसपणे घर करून बसलेली. तिला मनातून काढणं शक्य झालेलं नाही हे मात्र खरं.
अर्थात हे दिवस होते अगदी प्राथमिक शाळेतले. नंतरच्या वर्षांमध्ये गावाच्या परिसरातील खेड्यांना सायकलींवरून भेटी देण्याचा एक छंद आम्हा तिघा-चौघांना जडलेला होता. हे एक गाव मनात घर करून बसलंय ते तिथल्या आंब्याच्या झाडांमुळं. मोसमात तिथं जाऊन जमिनीपर्यंत रेंगाळत आलेल्या फांद्यांना लागलेल्या कैऱ्या तेव्हा अक्षरशः झोपून खाल्ल्या आहेत, तशा परत कधीही चाखायला मिळाल्या नाहीत. एकदा ते कळल्यानंतर किमान तीन वर्षं दर उन्हाळ्यात तो कार्यक्रम एकदा तरी केलाच आहे. अशाच एका दिवशी हा भेटला, भर रस्त्यात. जाताना एक टेकडी लागायची. रस्ता टेकडीवरून गेला असल्यानं ती चढती त्या भागात प्रसिद्ध. त्या चढावरच त्या दिवशी वळवानं आम्हाला गाठलं. त्या टेकडीवर कुठंही कसलाही आडोसा नव्हता. एकही झाड नव्हतं. त्यामुळं भर रस्त्यात थांबून आम्ही त्याच्याकडून झोडपून घेतलं होतं. दुपारी साडेबाराची वेळ असावी. घरापासून साधारण दहा मैल अंतरावर होतो. जिथं जायचं होतं ते गाव आणखी दोन मैलांवर होतं. पाऊस असा तोंडावर येत होता की चढावर पुढं सरकणं मुश्कील झालं होतं. सायकलींना स्टॅंड लावला तरी त्या पडायच्या. चाक मागं सरकू नये म्हणून कुलपं घालून त्या धरून ठेवल्या होत्या तिघांनीही. पावसानं जराही दयामाया न दाखवता झोडपलं असलं तरी सुदैवानं वारं नव्हतं. अन्यथा आमची पंचाईतच होती.
दुपारी पावसाकडून झोडपून घेतल्यानंतरही कैऱ्यांच्या मेजवानीचा उत्साह कायम होता. तो उरकून संध्याकाळी पाच-साडेपाचला घरी आलो ते फटके खाण्याच्या तयारीतच. पोटभर शाब्दिक फटके खाल्ले आणि मान खाली घालून अभ्यासाला लागलो (हो तेव्हा सुटीतही ठराविक अभ्यास करावा लागायचाच) तेव्हा पुन्हा एकदा वाकुल्या दाखवत पाऊस बरसून गेला होता. संध्याकाळ अशीच वाया घालवून...
त्या गावातला आणखी एक पाऊस आठवतोय. तेव्हा मी चौदा-पंधरा वर्षांचा असावा. आठवतंय त्यानुसार तेव्हा तो सलग चार दिवस कोसळत होता. शाळांना सुट्या वगैरे तर मिळाल्या होत्याच, पण त्या दिवसांकडं नंतर मागं वळून पाहिलं तेव्हा जनजीवन ठप्प होणं म्हणजे काय हे मला समजलं होतं. ते तीन दिवस आम्ही घरांतून बाहेर पडलो नव्हतो. दूध घरात नसणं म्हणजे काय याचा अनुभव तेव्हाच मिळाला. तीच गोष्ट भाज्यांची. भाजी खरेदी रोजचीरोज करण्याचे ते दिवस होते. त्या पावसानं घरांची दारं उघडण्याची फुरसतही तेव्हा दिली नव्हती. असं म्हणतात की, गावात शतकातील सर्वाधिक पावसाचा विक्रम तेव्हा झाला होता. मला आठवतं त्यानुसार आमच्या शाळेच्या ग्राऊंडवर चौथ्या दिवशी संध्याकाळी पाऊस पूर्ण थांबल्यावर आम्ही गेलो तेव्हा सगळा चिखल झालेला होता. पुढं तीन-चार दिवस चांगला सूर्यप्रकाश पडेपर्यंत तिथं खेळणं अशक्य झालं होतं.
---
श्रावणातला एक सुरेख पाऊस मला भेटला होता सापुताऱ्यात. व्यवस्थापनाशी संघर्ष करून बदली ओढवून घेतली होती. पण त्यातही एक माज अनुभवत होतो. वयानुसार असणारी झिंगही होती. वर्षाकाठी मिळणाऱ्या चारापैकी एक सुटी १५ ऑगस्टची. नव्यानं त्या गावात आलो होतो. नवे सवंगडी भेटले होते. सुटी म्हटल्यावर सापुतारा असा कार्यक्रम ठरला. सकाळी साडेआठच्या सुमारासच टप्पा-टप्पा करत गाडी निघाली. सापुतारा गाठेपर्यंत पावसानं आम्हाला गाठलं होतं. मग काय घाट येण्याचीच काय ती प्रतिक्षा होती. घाट सुरू झाला तसा गाडीचा वेग कमी झाला आणि सारं टोळकं खाली उतरलं. भर पावसात फेर धरून घाटात आम्ही किती वेळ रिंगण करून नाचत होतो याचं भान कोणालाही नव्हतं. तसं नाचत, चालत, पळत, कडेच्या झाडांवर काही मिळतं का ते पहातच आमची एन्जॉयमेंट सुरू होती. पाय थकल्यासारखे वाटले की गाडीत बसायचं आणि पुन्हा उतरायचं. घाट उतरायला त्यादिवशी आम्ही जो वेळ घेतला तो आमच्या गाडीच्या चालकाच्या लेखी विक्रम होता. आम्हाला त्याची फिकीर नव्हती. पाऊसच तसा होता. एक तर घाट, त्यात झाडोरा छानपैकी होता. मधूनच सूर्याला डोकं बाहेर काढता येत होतं. आणि श्रावणातला तो उन-पावसाचा खेळ. बेधुंद करून टाकणारा. कसं ते ठाऊक नाही, पण त्यादिवशी कुणीतरी गाडीत झाकीरच्या काही कॅसेट ठेवल्या होत्या. घाटाच्या ऐन मध्यावर नकळतच त्यापैकी एक कोणीतरी लावली आणि स्पिकरचा आवाज मोठा केला. तबल्यावर वेगवेगळे बोल काढणाऱ्या सुरावटी निनादू लागल्या आणि पावसाचा आनंद द्विगुणीत होऊन गेला. त्या बोलांच्या तालावर एका टोळक्यानं आदिवासींच्या नृत्याची एक झलक पेश केली तेव्हा आम्हा इतरांच्या अंगावर रोमांच फुलले होते. टाळ्यांनी त्या सुरावटीत केव्हा सूर मिळवला हे कळलंदेखील नाही. त्या अशा उत्स्फुर्त नाचाला वन्समोअर मिळाला होता त्यादिवशी. आजही श्रावणातल्या एखाद्या पावसात तो पाऊस डोळ्यांपुढं फेर धरतो. रपरप करीत कोसळणारी एखादी सर. मग सुरेख उन्हाची सोनेरी उधळण. पुन्हा थोडं अंतर गेलं की रपरप करीत बरसात आणि पुन्हा सोनेरी उन्हाचा एक पट्टा. कानात तबल्याच्या त्या सुरावटी घुमू लागतात आणि त्या आठवणी मन जागं करून जातात पुन्हा एकदा.
---
पावसाची रुपं अनेक. प्रत्येकाला वेगवेगळ्या वेळी भेटणारी. आणि अगदी हमखास भेटणारीच. कधी प्रेमळ, कधी हसरा-खेळकर, कधी संतापलेला, तर कधी नुसताच कंटाळवाणा. कधी रौद्ररूप घेऊनही तो येतो. त्यातलाच हा एक प्रसंग. दीड वर्षं झाली त्या आठवणीला. ऐन पावसाळ्यातच हा दौरा होता नर्मदाकाठचा. आम्ही सारे संध्याकाळच्या सुमारास नर्मदेच्या एका उपनदीच्या किनाऱ्यावर उतरलो. मोटरबोट होती पुढच्या प्रवासाला. पन्नास-एक मंडळी बसतील अशा त्या बोटीत आम्ही होतो पंचवीस जण. बोटीचा प्रवास सुरू झाला तेव्हा ढग नव्हते. पण बोटीनं दहा एक मिनिटांनी नर्मदेच्या विशाल पात्रात प्रवेश केला तेव्हा काळोखून गेलं होतं. आणि आमची बोट पूर्वेच्या दिशेला प्रवाहाच्या विरोधात वळवली तेव्हाच पाऊस कोसळू लागला. इंजिनाच्या टोकाला मी आणि आणखी दोन-तीन मित्र बसलो होतो. दुसऱ्या टोकाला बरोबरची मंडळी. प्रवास साधारण दीडेक तासांचा होता. साडेसहाच्या सुमारास आम्ही नर्मदेत प्रवेश केला होता. आठपर्यंत इच्छित गावी पोचायचं होतं. पण...
पाऊस... नर्मदेच्या पात्राची रुंदी त्यावेळी काही नाही म्हटलं तरी पाऊण-एक किलोमीटर सहज असावी. खोली किमान शंभर मीटर. या आकड्यांची कल्पना असणारे बोटीत मोजकेच होते. पण ती चर्चा झालीच सुरू आणि हळुहळू गांभीर्याची जाणीव एकेकाच्या डोक्यावर स्वार होऊ लागली. काहींच्याबाबत तिचं रुपांतर पाहता-पाहता भीतीमध्ये झालं. इतक्या रुंदीच्या पात्रावर वाऱ्याला भयंकर वेग प्राप्त होत असतो. तसा तो झाला होता. बोटीला वरून घातलेल्या आवरणाला काहीही अर्थ राहिला नव्हता. पावसाचे टप्पोरे थेंब बोटीच्या एका बाजूकडून आत प्रवेश करू लागले होते. अंधाराचं साम्राज्य तर केव्हाच पसरलं होतं. बोटीच्या उजवीकडून वाकून बाहेर पाहिलं की, थोड्या अंतरावर डोंगराची कड तेवढी दिसायची. आणि ती हरेक दर्शनासोबत भीतीमध्ये पुरेशी वाढ करून जायची. कारण तितकं अंतर किनारा दूर आहे याची जाणीव ती कड करून द्यायची.
बोटीच्या दुसऱ्या टोकावरून मला कोणीतरी हाक मारल्यासारखं वाटलं. या टोकाकडून कसाबसा मार्ग काढत मी चार पावलं पुढं टाकली. 'बोट अगदी डोंगराच्या कडेनं घ्यायला सांगा,' मला निरोप मिळाला. मी मागं नावाड्याकडं आलो. त्याला निरोप सांगितला. त्यानं मान डोलावली. मी त्याच्या बाजूनं मागं पाहिलं. दूरवर कुठं तरी डोंगरात उंचीवर एखादा दिवा चमकल्याचा भास झाला. पाऊस थांबतोय की काय असं मला उगाचच वाटून गेलं. पण ती केवळ वादळापूर्वीची शांतता होती. पाचेक मिनिटं गेली असावीत. एव्हाना आम्ही कसंबसं बोटीचं आवरण एका बाजूनं बांधण्यात यशस्वी झालो होतो. आत भरू लागलेलं पाणी काढून टाकण्यासाठी एकावेळी चार-पाच जणांचे प्रयत्न सुरू होते. आणि पावसानं सुसाट मारा सुरू केला. आपण पावसात झोडपले जातोय इतकंच आमच्या ध्यानी येत होतं. बोटीचं इंजिन सुरू होतं. त्यामुळं ओरडल्याशिवाय कुणाचंच बोलणं कळत नव्हतं. थोडा वेळ गेला असाच हेलकावे खाण्यात आणि पाऊस कधी कमी होणार आहे याच्या अटकळी बांधण्यात. मी सहज दक्षिणेच्या दिशेला वळून पाहिलं. मला धक्काच बसला. बोट तर डोंगरापासून पुन्हा पात्रात आतमध्ये आली होती. वाऱ्याचा तडाखा जाणवण्याचं कारण आता कुठं मला उमगू लागलं. नावाडी आणि माझ्यात केवळ चारेक फुटांचं अंतर होतं. तिथं बोटीवरचं आवरण नसल्यानं पावसात भिजावं लागणार होतं, पण एवीतेवी आता आतमध्ये कपडे ओले झालेच होते. माझेच नव्हे तर बहुतेक साऱ्यांचेच. गेलो त्याच्याकडं. तो उभा राहून बॅटरीचा झोत डोंगराकडं टाकत होता. मी एक क्षणभर थांबलो. त्यानं सहकाऱ्याला हाक दिली आणि हळुवार सुकाणू वळवून बोट डोंगराच्या दिशेला वळवली. आता पावसाचा तडाखा बोटीला एका कडेवरून बसू लागला. हेलकावे वाढले होते. सहा-सात मिनिटांनी बोट डोंगराच्या कडेला लागली. नावाडी आणि त्याच्या सहकाऱ्यानं त्या किर्र अंधारात जंगलात उडी मारून बोटीवरून दोर घेतला आणि ती बांधून घातली.
'इथंच थांबावं लागेल,' नावाडी. त्याच्या शब्दाबाहेर जाण्याची हिंमत कोणाचीही नव्हती. कारण तिथं बांधलेल्या अवस्थेतही बोटीची होत असलेली हालचाल पुरेशी बोलकी होती. त्यामुळं प्रवाशांनी मौनच धारण केलं होतं. इंजिन बंद झाल्यानं आता पावसाचा आवाज नीट कळू लागला. धुंवाधार पाऊस सुरू होता. नदीच्या पात्रावर पडणाऱ्या थेंबांचाही नाद कर्कश्श वाटू लागला होता एव्हाना. त्यात भर होती ती वाऱ्याच्या गोंगाटाची. सरळसोट किलोमीटरभर रुंदीचा पट्टा त्याला फिरायला मिळाला होता. त्यामुळं त्याच्या उन्मादाला थांगच नव्हता. निघाल्यापासून अवघ्या पाऊण तासात हे नाट्य आम्ही अनुभवत होतो. आणि मग पुढं आमच्यासमोर काहीही पर्याय राहिला नाही. रात्रीच्या किर्र अंधारात आपण कुठं आहोत याचा नेमका अंदाज आम्हाला येतही नव्हता. आला तरी आमच्यातील अनेकांच्या लेखी तो प्रदेशच अनोळखी असल्यानं फारसा उपयोगही झाला नसता. वेळ घालवण्यासाठी आणि धीर निर्माण करण्यासाठी बोटीमध्ये उंच आवाजात गाणी सुरू झाली होती. मां रेवा हे गाणं त्यादिवशी पूर्ण ऐकलं. त्याचा आविष्कार वेगळाच होता. बाहेरच्या पावसाची त्याला साथ होती. अत्यंत उग्र अशी. मला नेमकं का ते सांगता येणार नाही, पण त्यादिवशी मां रेवा ही नर्मदेची प्रार्थना त्या सुरात सूर मिसळत मी प्रथमच गायलो. सुमारे दीड तास आम्ही तिथं तसे टांगलेल्या स्थितीत होतो. चोहीकडे अंधार होता. बोट बांधताना बोटीच्या नाकासमोर असणारा डोंगर मध्येच केव्हातरी बोटीच्या कडेला आला होता. बोट कशी हालते आहे हे समजलं की अंगावर काटा यायचा. जिथं बोट होती तिथंच पाणी किमान दहाएक मीटर खोल होतं. त्या अंधारात डोंगरावर दिसायच्या त्या झाडांच्या सावल्याच. दोन्ही बाजूला किमान मैलभर अंतरावर तरी वस्ती नव्हती हे मात्र माझ्यासह काहींच्या लक्षात आलं होतं. त्यामुळं चिंताही दाटून आली होती.
गाण्यांच्या भरातच केव्हा तरी बोटीचे हेलकावे आता कमी झाले आहेत हे जाणवलं. पावणेनऊनंतर केव्हा तरी पाऊस ओसरला. वारं थांबण्याची चिन्हं नव्हती. पण पाऊस थांबलाय म्हणजे वारंही थांबेल असं म्हणत नावाड्यानं बोट पुन्हा पात्रात आणली आणि आम्ही चिंब भिजलेल्या स्थितीत पुढचा प्रवास सुरू केला... अनेक निःश्वास त्यावेळी त्या वाऱ्याच्या गोंगाटातही स्पष्ट ऐकू येत होते.
त्या भर पावसात बोट पुन्हा पात्रात मध्ये घेण्याचं कारण पुढं एका दौऱ्यात मला समजलं. अशा पावसात वाऱ्याचा वेग असताना एकूणच बोटीचं सुकाणू चालवणं अवघड असतंच. त्यात अशा ठिकाणी पात्रात अनेकदा अर्धवट बुडालेल्या डोंगरांची टोकं वर आलेली असतात. त्यामुळं बोट पात्राच्या मध्यावरूनच नेणं केव्हाही श्रेयस्कर. नावाड्याचं हे म्हणणं त्याच्या नौकानयनशास्त्राला धरून आहे. पण मी अनेकदा विचार करतो, अशा पावसात पुन्हा सापडलो आणि बोट पात्राच्या मध्यावर असेल तर... आत्ता हे लिहितानाही अंगावर काटा आला आहे.
(पूर्वार्ध)

वाङ्मयअनुभव

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

4 Jun 2008 - 2:56 pm | आनंदयात्री

शेवटच्या कथेचा पगडा मनावर असल्याने थरारक असेच शिर्षक टाईपले गेले.
भीती म्हणजे काय ते अनुभवले असेल नाई !

बाकी आधीचे लिखाण सुंदरच, पहिला पाउस तर आला आता वाट पहायची श्रावणाची !

यशोधरा's picture

4 Jun 2008 - 10:01 pm | यशोधरा

नर्मदामैय्याचा अनुभव थरारकच आहे!!

संदीप चित्रे's picture

5 Jun 2008 - 1:36 am | संदीप चित्रे

खूप ऐकलंय त्याबद्दल ...
असं काही वाचलं की लगेच जाणावतं we take life for granted

प्राजु's picture

5 Jun 2008 - 12:33 pm | प्राजु

दोन्ही भाग छान आहेत. विलक्षण अनुभव..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

रमताराम's picture

1 Jun 2013 - 12:34 pm | रमताराम

वस्तुनिष्ठ, विचारप्रधान, चळवळ्या श्रावण सार्‍यांनाच भेटलाय. त्याचे ते व्यक्तिमत्त्व सार्‍यांच्या परिचयाचे. पण सार्‍या वणवण प्रवासातही अशा सुंदर, उग्रभीषण अनुभवांची नोंद घेत जाणारा श्रावण भेटण्याचे भाग्य फारच थोड्या सहकार्‍यांना/मित्रांना लाभले असावे.
भाग २