पावसाला त्याच्यासारखं उंच होऊन उराउरी भेटल्याचा अनुभव एकदा मिळून गेला तो अगदी अपघातानंच. सातपुड्यात फिरायला गेलो होतो. गाव उंचावर होतं. उंचावर म्हणजे संध्याकाळी गावातल्या माझ्या स्नेह्यांच्या घरी जाण्यासाठी मला डोंगर चढायलाच दहा मिनिटं लागली होती. त्यात एकदा पाय घसरून पडता-पडता वाचलो होतो. संध्याकाळी पाऊस नव्हता. त्यानं दुपारी त्याची हजेरी पुरेशा प्रमाणात लावलेली होती. दिवस जुलैचे. म्हणजे पावसाचा अगदी भरात येण्याचा काळ होता. तरीही संध्याकाळी त्यानं उसंत घेतल्यानं मीही थोडा सुखावलो होतो. आधीच्या चार दिवसात त्यानं भिजवून काढलं होतं. आजचा दिवस काय तो कोरड्या कपड्यानिशी चालण्याचा होता.
सकाळी सहाच्या सुमारास जाग आली आणि मी घराचं दार उघडून बाहेर आलो. पाहतो तो काय रात्री केव्हा तरी मी झोपी गेल्यानंतर पावसाची रिपरीप सुरू झाली होती ती थांबलीच नव्हती. घराच्या मागल्या बाजूला पाहिलं. बोडख्या डोंगरावर ढग होते आणि धाराही होत्या. मी तसाच तिथं घुसलो. धुक्यात शिरल्यासारखा अनुभव घेत असतानाच पावसाचे थेंबही अंगभर खेळू लागले. हे थेंब अंगाला बिलगतच खाली उतरत होते. घरंगळतच म्हणा ना. काही क्षणात मी चिंब भिजून गेलो. समोरचं चारेक फुटांवरचंही काही दिसत नव्हतं. फार पुढं जाण्याची भीती वाटू लागली होती. दिसेनासं झालं खरोखरच आणि कुठं दिशा चुकली तर... ही जाणीव जबाबदारीचं भान देऊन गेली. तिथंच थांबलो. पाचेक मिनिटं इकडंतिकडं केलं आणि आलेल्या दिशेनं माघारी वळून डोंगर उतरू लागलो. काही पावलांतच त्या दाट धुक्यातून बाहेर येत विरळ धुक्यात प्रवेश केला. घर दिसू लागलं. धीर आला. डोंगरानं आपल्याला कितीही उंची दिली तरी हे मन आपली खरी उंची केव्हाही आणि कुठंही जाणवून देऊ शकतं एवढं आभाळज्ञान पावसाशी झालेल्या त्या उराउरी भेटीनं दिलं त्यादिवशी.
---
मनात घर करून बसलेली ही पावसाची एक आठवण मात्र आताशा सारखी मनात रुंजी घालत असते. कारण ठाऊक नाही. तेव्हा मी नोकरी सोडली होती. एक नवा प्रकल्प ड़ोक्यात घेतला होता आणि त्या आवेशातच नोकरीला रामराम केला होता. नोकरी सोडण्याची तारीखही भन्नाट. १ एप्रिल. ३१ मार्चला राजीनामा हातात ठेवला होता व्यवस्थापनाच्या. त्याच दिवशी हट्ट धरून रिलीव्ह झालो. एप्रिल महिना प्रकल्पाच्या आखणीत गेला आणि मेच्या पहिल्या आठवड्याच डोळे खाडकन उघडले. हे तर जमण्यासारखं नाही... डोळे उघडले तसा एक हादरा बसला जोरदार. मनाला आणि त्यामुळंच आत्मविश्वासालाही. तशाच स्थितीत दिवस जात होते. मेचा तिसरा आठवडा असावा. सुन्न मनस्थितीत त्याआधीची आठेक वर्षं आठवू लागलो. घरापासून दूर असलेली. दूर राहण्याचं निमित्त नोकरीचंच. पण वयाच्या सतराव्या वर्षापासूनची ती आठ वर्षं होती. हाती शिक्षण काहीही नव्हतं. नोकरी सुटली होती. पुढचं सारं अंधुक होतं. त्या दिवशी संध्याकाळी असाच खिन्न होऊन बसलो होतो. हाती प्रभाकर पेंढारकरांचं 'रारंगढांग' होतं. त्या काळात बऱ्यापैकी गाजत असलेली 'ही शुभ्र फुलांची ज्वाला' ही कॅसेट तेव्हा मी सारखी ऐकायचो. तीच सुरू होती. साडेसातचा सुमार असावा. पद्मजाच्या आवाजात,
पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली, दुःखाच्या मंद सुराने
सुरू होतं. आणि एकदम हवा कुंद झाली. पाहता-पाहता खोलीच्या छतावर पावसाची टपटप ऐकू येऊ लागली. इकडं हे गाणं आणि बाहेर कुंद हवा. खोलीत मी एकटा. मनाची घालमेल सुरू झाली. भविष्याची चिंता होतीच, शिवाय नोकरी सोडल्यानंतर घरी रहायला न जाण्यातली एक टोचणीही असावी. घरच्यांपासून निर्माण झालेला दुरावा खाऊ लागला असावा. मनसोक्त रडावंसं वाटत होतं, पण काही केल्या रडू फुटत नव्हतं. पुस्तकातील तो कडा मनाच्या दाराशी येऊन बसल्यासारखा झाला होता. "'आपण' 'रडायचं'", हा प्रश्न तिथं कोणीही नसलं तरी माझ्या मनाच्याच एका बाजूला पडला होता आणि दुसरी बाजू तिच्यापुढं कमकुवत होत गेली. पाऊसही असा की, धड कोसळत नव्हता किंवा हलक्या सरींमधून येऊन दिलासाही देत नव्हता. मध्यम रिपरिप. कशाचंही काहीही सुचेनासं झालं होतं त्या पावसानं. मनात द्वंद्व. बाहेर ही स्थिती. त्या द्वंद्वामध्ये असतानाच पाऊस थांबला हे मात्र समजून आलं नाही. द्वंद्वाचा फैसला काय झाला ते आठवत नाही. आठवतं ते इतकंच की डोळे कोरडेच राहिले. बहुदा मन आणखी कंगोरेदार होऊन गेलं असावं...
---
या पावसानं कायमची हुरहूर लावलेली त्याची आणि माझी ही भेट तशी अलीकडची. दुपारची वेळ होती. आम्हा दोघांना एका परिचितांकडं जायचं होतं. दोघंही एका मध्यवर्ती ठिकाणी आधी भेटलो होतो. गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींनी एक प्रकारचं अंतर दोघांनाही जाणवत होतं. त्यामुळं दोघंही मौनाची भाषांतरं करीत होतो. बोलायचं खूप होतं. कुणी आधी बोलावं हाही प्रश्न असण्याची शक्यता नव्हती. काय आधी बोलायचं हाच बहुदा पेच असावा. त्या परिचितांच्या घराचा निम्मा रस्ता कापला आणि अचानक काळोखून आलं. काही क्षणांत गाडीसमोरचं आठ-दहा फुटांवरचं दिसेनासंही होऊन गेलं.
आडोसा पाहण्याचीही संधी न देता पावसानं बरसायला सुरवात केली. दुपारी दीड ते तीन. दीड तास तो कोसळत होता. सरींच्या पहिल्या काही वर्षावामध्येच नखशिखांत भिजून आम्ही दोघंही एका इमारतीच्या कंपाऊंडमध्ये पारिजातकाच्या झाडाखाली उभे होतो. हे झाड दोस्त म्हणून कधी आयुष्यात येईल असं वाटलं नव्हतं. त्या दिवशी त्या भूमिकेत होतं. तिथं जाऊन उभे राहिलो आणि काही क्षणातच एक पान-फूल घरंगळत खाली आलं आणि तिच्या कपाळावरील केसांवर विसावलं. तिच्या ते ध्यानीही नव्हतं. मी हळूवारपणे ते तिथून काढलं आणि ओंजळीत धरून तिच्यापुढं केलं. तेवढा क्षण पुरेसा होता. दोघांनाही. नंतर रंगले ते माफीनामे... कोसळणाऱ्या पावसाच्या गतीनंच. तो थांबला तेव्हा तिथून निघण्याचं भानही राहिलं नव्हतं इतकं आम्ही बोलू लागलो होतो. पाऊस येण्याच्या आधीचा सुमारे एक तास ओढून-ताणून केलेल्या संवादात गेला होता. पावसात भिजल्यानंतर काय चमत्कार झाला कोणास ठाऊक? पावसाच्या कोसळणाऱ्या सरींसारखेच शब्दही कोसळत होते एकमेकांवर. रागावणारे, चिडवणारे, प्रेमही व्यक्त करणारे. मध्येच सांभाळून घेण्याची भाषा करणारे. त्या सरीही तशाच होत्या. आम्ही उभे होतो त्या पारिजातकाच्या झाडांमधून वाट काढत येऊन भिडत होत्या आम्हाला... कधी समजावणीची भाषा करीत, झाडाला वाऱ्यानं हलवलं की अगदी रागावत, तर कधी प्रेमात आल्यासारख्या...
तो दिवसच तसा होता. तिला सोडून नंतर घरी गेलो. घराचा सारा परिसर कोरडा होता. कपडे बदलले आणि ऑफिस गाठलं. तिथंही सारं वातावरण कोरडं ठाक. दुपारचा पाऊस शहराच्या एका भागातच कोसळला होता. संध्याकाळी तो ऑफिसच्या भागांत हजेरी लावून गेला. पण ती हजेरी अगदी श्रावणातल्या सरींसारखी. मधूनच उन्हाचे सोनेरी कवडसे चमकत आणि एखादी छोटीशी पण मनमुराद कोसळणारी सर. साडेपाच ते संध्याकाळी सात हा खेळ सुरू होता. त्यावेळी दाटून आलेल्या तिच्या आठवणी मात्र 'हुई है शाम तो आखोंमे बस गया फिर तू,' अशी कातरता आणणाऱ्या होत्या...
माझ्यासोबत पावसात भिजायचं होतं तिला. ती आणि मी एकत्र असताना एरवी कधीही तो आला नाही. ऐन पावसाळ्यात मी तिच्या गावी असायचो तेव्हाही त्यानं हुलकावणी दिलेली होती. ती तिच्या कामात किंवा मग मी कुठंतरी कामानिमित्तानं जवळपासच्या एखाद्या गावात. त्यामुळं पाऊस, ती आणि मी हे त्रैराशीक कधी जुळलंच नाही. ती सोबत असताना तो आला तो फक्त त्यादिवशीच... पण तो निरोपाचाच दिवस ठरला...
---
सरत्या उन्हाळ्यातील संध्याकाळ असावी. आपण एकटंच असावं. हवा स्वच्छ असावी. अशातच काही कारणानं एखाद्या जुन्या आठवणीनं मनात काहूर निर्माण करावं. बेचैन मनाला आवर घालण्यासाठी एखादं असंच हुरहूर लावणारं पुस्तक हाती घ्यावं. शेजारी छानशा गाण्यांची सुरावट असावी. एखादा पेग भरून घ्यावा. वाचनात गर्क व्हावं. दीड-दोन तास कसे गेले ते कळू नये. साडेसहाच्या सुमारास बाहेर पहावं तर एकदम अंधारून आलेलं दिसावं. हवा कुंद झालेली असावी. हातातल्या पुस्तकातलं वातावरणही आता त्याच सुरावटी छेडत असावं. भरून आलेलं आभाळ बाहेर, तसंच मनातही, अशा स्थितीत असतानाच अचानक गुलाम अलींचे सूर कानी पडू लागावेत...
ले चला जान मेरी रुठके जाना तेरा
ऐसे आनेसे तो बेहतर था न आना तेरा...
आता ध्यानी येऊ लागतं की, बरसात दोन स्तरांवर होणार आहे. बाहेरच्या टपटपीसोबत प्रवास करताना मनातही कितीतरी काळापासून दाटून असलेले सारे कढ उसळ्या मारू लागावेत. इतका वेळ आवरून ठेवलेला एखादा थेंब नकळतच डोळ्यांतून ओघळावा. गालांवरून ओठांपाशी यावा आपली खारट चव घेऊन. बाहेर नजर जावी तर धारा लागलेल्या असाव्यात. ढग गडगडत असावेत. कंठाच्या उंबरठ्याशी रोखून धरलेला हुंदका उसळून बाहेर फुटावा... आणि मग बाहेरच्या गडगडाटात मनातून उसळून-उसळून येणारे हुंदक्यांचे आवाज विरून जावेत...
'मी मला आक्रंदताना पाहिले' अशी ही अवस्था अर्धापाऊण तास असते. ती संपते तेव्हा आपण डोळे पुसतो. दार उघडून बाहेर येतो. टपटप थांबलेली असते. नशिबात असेल तर मृदगंध आपला कब्जा घेतो. अंगणात एखादं झाड असेल आणि वाऱ्याची झुळूक आली तर पाना-फुला-झाडांवरून पडणारे थेंब आपल्या अंगांगांवर उतरतात. एक बारीकशी शिरशिरी येते. रोमांच फुलतात आठवणींचे. सभोवार मोकळं असेल तर वर नजर जाते. सारं आकाश स्वच्छ असतं. शेकडो चांदण्या लुकलुकू लागलेल्या असतात...
आणि अचानक ध्यानी येतं, इथं आत मनातही आता सारं कसं निरभ्र झालेलं असतं... आशेच्या शेकडो चांदण्या मनातही लुकलुकू लागलेल्या असतात...
(पूर्ण)
प्रतिक्रिया
4 Jun 2008 - 3:08 pm | आनंदयात्री
यु मेड माय डे श्रावणभाई !
ग्रेट वन इंडीड बॉस्स ... काय बोलु ? काय लिहु ?
खुपच छान लिहलय .. (जे पण वाक्य आठवतय ते वापरुन गुळ्गुळीत झालेले :( )
>>जाऊन उभे राहिलो आणि काही क्षणातच एक पान-फूल घरंगळत खाली आलं आणि तिच्या कपाळावरील केसांवर विसावलं. >>तिच्या ते ध्यानीही नव्हतं. मी हळूवारपणे ते तिथून काढलं आणि ओंजळीत धरून तिच्यापुढं केलं.
>>ती सोबत असताना तो आला तो फक्त त्यादिवशीच... पण तो निरोपाचाच दिवस ठरला...>>
>>इतका वेळ आवरून ठेवलेला एखादा थेंब नकळतच डोळ्यांतून ओघळावा. गालांवरून ओठांपाशी यावा आपली खारट चव >>घेऊन.
कोणकोणती वाक्य सौंदर्यस्थळं म्हणुन टाकु बॉस्स, हा लेखच एक सौंदर्यस्थळ आहे.
जियो श्रावणभाय .. और भी लिख्खो !
4 Jun 2008 - 4:05 pm | राजे (not verified)
छान !
कोणकोणती वाक्य सौंदर्यस्थळं म्हणुन टाकु बॉस्स, हा लेखच एक सौंदर्यस्थळ आहे.
सहमत.
राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
4 Jun 2008 - 3:27 pm | अरुण मनोहर
पावसाची किती रुपे! पावसाचे किती नाट्य! सगळे छोट्याशा लेखात पकडायचे कठीण काम खूप परिणामकारक केले आहेस श्रावणभाऊ.
क्या बात है!
4 Jun 2008 - 3:54 pm | ऋचा
शब्दच खुंटलेत.
काय बोलु ह्या सुंदर कथेवर ????
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
4 Jun 2008 - 4:31 pm | प्रभाकर पेठकर
श्री. श्रावण मोडक,
'श्रावण' नावातून पावसाचे एवढे 'धो-धो' वर्णन निसर्ग नियमांना धरून नाही. पण एक वेगळा 'श्रावण' मनाला भिडला. मन चिंब झालं. तुमच्या संवेदनशीलतेला .........सलाम.
4 Jun 2008 - 4:52 pm | विसोबा खेचर
हेच म्हणतो!
तात्या.
4 Jun 2008 - 4:56 pm | मन
झालोय वाचुन.
मस्त वर्षावर्णन आहे!
आपलाच,
मनोबा
(खर्र नावः-ऋषिकेश खोपटिकर)
4 Jun 2008 - 8:16 pm | अमोल केळकर
प्रतिसाद -झाला असेल थोडा ओला
पाठविला आणी नेमका पाऊस आला
वाचायच्याआधी पुसुन घे त्याला
पण जपुन, कारण त्यात आहे मैत्रिचा ओलावा__
(आपल्या सर्वांचा मित्र) केळकर
अवांतर ( एका SMS वरुन साभार)
4 Jun 2008 - 9:16 pm | स्वाती दिनेश
पावसाचे तुमच्याशी असलेले मैत्र अगदी तरलतेने मांडले आहेत,फार सुंदर!
स्वाती
4 Jun 2008 - 10:04 pm | यशोधरा
एकदम मस्त लिहिलय, खूप खूप आवडलं.
4 Jun 2008 - 11:16 pm | भाग्यश्री
भयंकर आवडले दोन्ही लेख !!
http://bhagyashreee.blogspot.com/
5 Jun 2008 - 1:15 am | बिपिन कार्यकर्ते
दोन्ही लेख छानच, खूप आवडले. तुमचे आधीचे लिखाणही आवडले आहे.
बिपिन.
5 Jun 2008 - 4:07 pm | श्रावण मोडक
या पानावरील सर्व मिपाकर आणि पहिल्या भागातील (आनंदयात्री, यशोधरा यांच्यासह) संदिप चित्रे व प्राजू... प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
पेठकरकाका (चालेल ना?) : तुमच्या मार्मीक टिपणीबद्दल काय लिहू?
5 Jun 2008 - 4:34 pm | फक्त संदीप
अगदी हरवून गेलो,भिजुन गेलो तुमच्या सारखे -तुमच्या सोबत
मनाला भिड्ला श्रावण
वरील सर्व मतांशी सहमत ........ मनापासुन
आपला
संदीप ....भिजलेला.................... >:D<