नात्यात असली एकमेकाच्या, तरी गोत्यात आणतात
मला नेहेमी प्रश्न पडतो, माणसं अशी का वागतात?
लहानगे भांडतात, क्षणात विसरुन एक होतात
मोठेपणीच हेवेदावे, मनात धरुन का ठेवतात?
वयानं मोठी होताना, विचारानं लहानंच राहतात
सुशिक्षित होताना, सुसंस्कृत व्हायचं का विसरतात?
परक्यांना जवळ करतात, कारण मोठी ठरतात
कळत नसणार का त्यांना, आपल्यांत खोटी ठरतात?
मानभावी वागत जातात, संभावित जगत जातात,
त्याचा अर्थ असा नव्हता, असं कसं म्हणत राहतात?
वर्षामागे वर्षे जातात, प्रेमाचे बंध विरुन जातात
मनामधे मरत मरत अशी कशी झुरुन जातात?
कुणाची गरज नाही, तेच मग ठरवून ठेवतात
इकडे तिकडे चौकशी कशी बरं करत रहातात?
दारातही मरणाच्या सल मनात धरुन ठेवतात
धावा करायच्या वेळी, दावा कसा उभा करतात?
मरणातूनही शिकत नाहीत, मग कधी शिकतात?
मला नेहेमी प्रश्न पडतो, माणसं अशी का वागतात?
चतुरंग
प्रतिक्रिया
31 May 2008 - 12:58 am | धनंजय
हळवे भाव व्यक्त करणारी कविता.
31 May 2008 - 7:28 am | मदनबाण
असेच म्हणतो.....
मदनबाण.....
2 Jun 2008 - 7:15 pm | मन
खुपच आवडली कविता.
आपलाच,
मनोबा
31 May 2008 - 1:07 am | मुक्तसुनीत
चतुरंग यांच्या कवितेमधे काही मुक्तचिंतनपर लिखाणाची बीजे आहेत. कवितेत त्या विचारांना बसविताना त्यांना पुरेसा न्याय दिला गेला नाही असे मला वाटले. माणसामाणसांमधले संबंध , त्या संबंधांमधे कधी दिसणारी अतार्किकता या बाबत एक उत्तम लेख ते लिहू शकतील. कवितेची बांधणी, गोळीबंदपणा, मुख्य म्हणजे , काव्यगुण या बाबतीमधे थोडा अपुरेपणा जाणवला.
31 May 2008 - 1:52 am | बेसनलाडू
कविता बव्हंशी गद्याळ झाल्याने हेच विचार गद्य लेखनातून अधिक प्रभावीपणे मांडता आले असते, असे वाटून गेले. चूभूद्याघ्या
(वाचक)बेसनलाडू
31 May 2008 - 3:02 am | विकास
आपल्या कविता आवडतातच, पण ही फार आवडली.
वपु काळ्यांचे या अर्थाचे वाक्य आठवले: बहुतांशी माणसे ही तीन शब्दांसाठी जगतात - लोक कायं म्हणतील?
तसेच म्हणावेसे वाटतात की भावनाप्रधान/हळवी माणसे आपल्या कवितेतील तीन शब्दांचे प्रश्नार्थक वाक्य, कधीकधी झुरत जगतात...
31 May 2008 - 5:50 am | चित्रा
कायमचा प्रश्न. कविता आवडली.
31 May 2008 - 6:59 am | विसोबा खेचर
वयानं मोठी होताना, विचारानं लहानंच राहतात
सुशिक्षित होताना, सुसंस्कृत व्हायचं का विसरतात?
हम्म, अगदी खरं!
दारातही मरणाच्या सल मनात धरुन ठेवतात
धावा करायच्या वेळी, दावा कसा उभा करतात?
या ओळी सर्वात सुंदर!
फार बोलकी कविता केली आहेस रे रंगा!
उद्या कदाचित या जगात अगदी प्रत्येक रोगावर जालीम आणि हमखास गुण येणारं औषध सापडेल, परंतु माणसाच्या स्वभावाला मात्र औषध सापडणं केवळ अशक्य आहे! :)
असो.. सुरेख कविता!
तात्या.
31 May 2008 - 7:22 am | विसोबा खेचर
रंगा,
एक सांगायचं विसरलो. तुझी कविता मला आवडली परंतु मुक्तराव म्हणतात त्याप्रमाणे यावर एखाद्या चांगला मुक्तचिंतनपर लेखही नक्कीच होऊ शकेल. तुला लिहावासा वाटला तर अवश्य लिही...
आपला,
(गद्य) तात्या.
31 May 2008 - 7:35 am | वरदा
खूप छान लिहिलेय
दारातही मरणाच्या सल मनात धरुन ठेवतात
धावा करायच्या वेळी, दावा कसा उभा करतात?
अगदी खरं...एक आई मरत असताना तिच्याशी भांडून तिला न भेटणारी तिची सख्खी लेक पाहिलेय मी...अगदी हाच प्रश्न पडला होता की इतकी निष्ठुर कशी असु शकतात माणसं......
31 May 2008 - 9:11 am | यशोधरा
छान लिहिलय. एकदम आवडलं. ह्या ओळी
वयानं मोठी होताना, विचारानं लहानंच राहतात
सुशिक्षित होताना, सुसंस्कृत व्हायचं का विसरतात?
दारातही मरणाच्या सल मनात धरुन ठेवतात
धावा करायच्या वेळी, दावा कसा उभा करतात?
खासच!!
31 May 2008 - 9:25 am | पिवळा डांबिस
दारातही मरणाच्या सल मनात धरुन ठेवतात
धावा करायच्या वेळी, दावा कसा उभा करतात?
आम्ही तर मरणशय्येवर असतांना म्हणू,
"केले झाले क्षमुनी सगळे, तोडी संसारपाशा"
माणसं सल का धरतात? आम्हांला वाटते की, कारण माणसं अप्रामाणिक असतात, स्वतःशी आणि इतरांशीही!!
आमचं आपलं मत!!
कविता झकासच झालीय!!
चतुरंगजी, बक अप!!
31 May 2008 - 9:29 am | कोलबेर
31 May 2008 - 9:35 am | वरदा
अगदी बरोबर काका
31 May 2008 - 11:52 am | राजे (not verified)
;;)
राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
2 Jun 2008 - 7:07 pm | चतुरंग
जवळच्या व्यक्तीचे ३० मे २००८ रोजी अकाली निधन झाले. ती बातमी ऐकून, आजूबाजूच्या नात्यातल्या माणसांचे विचार ऐकून, आमच्या सर्वांतल्या नातेसंबंधांच्या कित्येक वर्षांच्या आठवणींचा पट मनात उलगडत गेला आणि त्यावेळी मनात उठलेले काहूर शब्दबद्ध करण्याखेरीज इलाज नव्हता.
वरील कविता ही जवळ जवळ एकटाकी (किंवा एककळफलकी म्हणूयात) अशी लिहिली गेली. मनातून सांडणारे विचार तसेच उतरत गेले. नंतर वाचताना काही ठिकाणी गद्याचा आभास होतोय असे वाटले पण त्यात संपादन करुन नैसर्गिकता हरवायची भीती वाटली. त्यामुळे तसेच ठेवले.
आपल्या सर्वांच्या प्रतिक्रियांमागचा आशय समजला. ह्यावर काही गद्यही लिहिता आले तर विचार करुन ठेवीनच.
सर्व आस्वादकांचे आभार.
चतुरंग
2 Jun 2008 - 7:39 pm | अभिज्ञ
अतिशय सुंदर कविता.
++१
अभिज्ञ
2 Jun 2008 - 7:45 pm | स्वाती दिनेश
कविता ,कवितेतला विचार आवडला.ती कशी लिहिली गेली हे सांगितलेत त्यामुळे वेगळ्याच दृष्टीने वाचता आली.
वयानं मोठी होताना, विचारानं लहानंच राहतात
सुशिक्षित होताना, सुसंस्कृत व्हायचं का विसरतात?
दारातही मरणाच्या सल मनात धरुन ठेवतात
धावा करायच्या वेळी, दावा कसा उभा करतात?
विशेष भावल्या.
स्वाती
27 Mar 2020 - 8:10 pm | उत्खनक
नुकत्याच झालेल्या काही घटनांमुळे आणिक भेदून जातेय... :-(