आज सकाळी गुगल वरच्या लोगोने माझं लक्ष वेधलं. रोझा पार्क्स ने एका छोट्याश्या कृतीने कित्येकांच्या जीवनात फार मोठा बदल घडवून आणला. त्याला आज ५५ वर्ष झाली. बर्याच जणांना रोझा पार्क्स हे नावही माहित नसेल कदाचित, (मी अमेरिकेत येण्यापूर्वी मला तरी माहित नव्हतं) म्हणून हा प्रपंच.
-------------------------
रोझा पार्क्स
(जन्म: ४ फेब्रुवारी १९१३ मृत्यू: २४ ऑक्टोबर २००५)
रोझा लुईस हे तिचं पाळण्यातलं नाव. अगदी सामान्य गरीब घरात रोझाचा जन्म झाला. रोझा जेमतेम दोन वर्षांची असताना तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. तिची आई छोट्या रोझाला व तिच्या भावाला घेऊन तिच्या आजोबांच्या कडे राहायला लागली. तिची आई लेओना शिक्षिका असल्यामुळे ११ वर्षांपर्यंत रोझाचं शिक्षण घरातच झालं. नंतर ती मुलींसाठी असलेली मोन्टगमरी औद्योगिकी शाळेत जाऊ लागली. तिथे मिळालेल्या शिक्षणाचा तिच्या विचारांवर पगडा होता. ह्याच विचारांमुळे तिचं पुढचं आयुष्य असामान्य झालं.
रोझाने पुढील शिक्षण घेण्यासाठी कॉलेजमध्ये नाव घातले पण लवकरच तिच्या आजीची देखभाल करण्यासाठी तिला कॉलेज सोडावे लागले. नंतर ती तिच्या आईची काळजी घेत तिच्याजवळ राहात होती. तिथेच रेमंड पार्क्स नावाच्या तरुणाशी तिचं लग्न झालं. रेमंडचं त्या गावात एक छोटं सलून होतं. त्या काळी अमेरिकेत कृष्णवर्णी लोकांना आजच्यासारखे समान हक्क नव्हते. लहानपणापासून मिळालेली अन्यायपूर्ण वागणूक, जागोजागी झालेला अपमान आणि पदोपदी जाणवणारा कृष्णवर्णीय लोकांबद्धलचा तिरस्कार रोझाला फार अस्वस्थ करत असे. रोझा आणि रेमंड दोघेही "राष्ट्रीय कृष्णवर्णीय प्रगती मंडळ" (National Association for the Advancement of Colored People, NAACP) चे कार्यकर्ते होते.
रोझा एका दुकानात शिवणकाम करून घर चालवायला मदत करत असे. दररोज बसने प्रवास करून ती कामावर जात असे.
त्या काळी कृष्णवर्णी लोकाना बसण्यासाठी बसमध्ये फक्त पाठीमागे काही बाक असत. बसचे भाडे भरण्याचा डबा पुढे ड्रायव्हरच्या शेजारी ठेवलेला असे. अश्या वेळी जर एखादा गोरा माणूस अगोदरच बसमध्ये पुढे बसलेला असेल तर कृष्णवर्णीयांना प्रथम भाडे भरून, बस मधून उतरून, पुन्हा मागच्या दाराने बस मध्ये चढावे लागे. बरेचदा काही ड्रायव्हर त्यांना मागच्या दाराने चढण्याआधीच बसचे दार बंद करून बस पुढे घेऊन जात. जर बसमध्ये जास्त गोरी लोकं असतील तर ड्रायव्हर कृष्णवर्णीयांना उठवून त्यांची जागा गोर्यांना देत असे.
१ डिसेंबर १९५५ च्या दिवशी, कामावरून दमून भागून रोझा बसने घरी परतत होती. ड्रायव्हरने काही गोर्या लोकांना जागा व्हावी म्हणून तिला व आणखी ३ कृष्णवर्णी लोकांना उठायला सांगितले. बाकीचे ३ जण निमुटपणे उठले पण रोझाने उठायला ठाम नकार दिला. पोलिसांनी रोझाला पकडून जेल मध्ये टाकले. त्या संध्याकाळी जामीना वर तिची सुटका झाली. पण इथून कृष्णवर्णीयांच्या लढ्याला एक जबरदस्त वळण लाभलं. तिने जे केलं ते फार विचारपूर्वक वगैरे केलं नव्हतं, पण त्या क्षणी ती स्वत:च्या हक्कासाठी ठाम राहिली. तिला दररोज होणाऱ्या अपमानाचा व मिळणाऱ्या अमानवी वागणुकीचा संताप आला होता. बसमध्ये उठण्यास नकार देणारी ती पहिलीच व्यक्ती नव्हती, पण जेव्हा ती घटना तिच्या बाबतीत घडली, तेव्हा तिने तो लढा तिथेच संपवला नाही. तत्कालीन कृष्णवर्णी नेत्यांना तिच्यामध्ये एक नवं निष्कलंक नेतृत्व दिसू लागलं.
बसेस वर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करणारी जवळ जवळ ३५००० हेन्डबिलं छापून वाटण्यात आली. जोपर्यंत कृष्णवर्णीयांना बस मध्ये प्रवास करण्याचे समान हक्क मिळत नाहीत तोवर हे आंदोलन चालू ठेवण्याचं हे आवाहन होतं. आणि त्या आवाहनाला भरपूर प्रतिसाद मिळाला. हे आंदोलन ३८१ दिवस चाललं! एका वर्षापेक्षा जास्त दिवस कित्येक कृष्णवर्णीय बसची वात पाहात थांबत आणि बस येऊन उभी राहिली की तिच्यात चढण्यास नकार देऊन चालू लागत. कित्येक लोकांना दररोज मैलोनमैल चालावे लागे. पण आंदोलनात खंड पडला नाही.
अर्थात हे सगळं सुरळीत प्रमाणे झालं नाही. कितीतरी हिंसा, जाळपोळ झाली. दरम्यान मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर नावाच्या नव्या नेत्याचा उगम झाला. कित्येक घरांना, कृष्णवर्णी चर्चना बॉम्बने उडवण्यात आलं (यात मार्टिन ल्युथर किंग यांचं घरही होतं).
१३ नोव्हेंबर १९५६ रोजी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने अशा बसमध्ये मिळणाऱ्या विभक्त वागणुकीला अन्याय्य ठरवलं. पुढच्याच महिन्यात सर्व बसेस मधून काळ्या व गोर्या लोकांसाठी असणारे सगळे फलक काढून टाकण्यात आले व बसवरील बहिष्कार सम्पुष्टात आला.
प्रतिक्रिया
2 Dec 2010 - 12:26 am | बेसनलाडू
प्रेरणादायक माहिती. गूगलच्या मुखपृष्ठावरचे ते डूडल पाहून आणि तुमची माहिती वाचूनच हे कळले; तोवर माहीत नव्हते.
(अनभिज्ञ)बेसनलाडू
2 Dec 2010 - 12:31 am | रेवती
छान माहिती!
लेख आवडला.
2 Dec 2010 - 12:41 am | प्रियाली
अमेरिकन शाळेत ज्यांची मुले आहेत त्यांना रोझा पार्क्स माहित आहे. प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून तिची शाळेत ओळख होतेच. या सोबत, फ्रेडरिक डग्लस या गुलामाची कहाणीही अतिशय प्रेरणादायी आहे. रुबी ब्रिजेस हॉल या लहानग्या मुलीने वर्णद्वेषाशी दिलेल्या लढ्याची माहिती उपक्रमावर येथे सापडेल. रोझा पार्क्सच्या माहितीबद्दल धन्यवाद.
मागे कोणीतरी म्हणालं होतं की गांधींसोबत गांधीवाद संपला. :)
2 Dec 2010 - 12:49 am | विकास
समयोचीत लेखाबद्दल धन्यवाद! आज गुगल आणि सीएनएन बघताना डोक्यात आले होते.
दरम्यान मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर नावाच्या नव्या नेत्याचा उगम झाला.
मला वाटते रोझा पार्कमुळेच मार्टीन ल्यूथर किंग हा कृष्णवर्णीय नेता म्हणून जन्माला आला. एखाद्या लहान ठिणगीने भडका उडू शकतो तशी रोझापार्क ही एक वर्णद्वेषी अमेरिकेतील ठिणगी होती. तिच्या एका कृतीचे पर्यवसन कायद्याने असमानता नष्ट होण्यात झाले.
2 Dec 2010 - 12:52 am | मुक्तसुनीत
समयोचित लेखाबद्दल धन्यवाद!
असेच म्हणतो. उत्तम माहितीपूर्ण लिखाण.
3 Dec 2010 - 2:44 am | आमोद शिंदे
समयोचित लेखाबद्दल धन्यवाद!
2 Dec 2010 - 1:07 am | शुचि
लेख छानच. आज सकाळीच लक्ष वेधलं गेलं होतं. असंच प्रेरणादायी नेतृत्व मार्टीन ल्युथर किंग हे. त्यांच्या "आय हॅव्ह अ ड्रीम" मधील हे वाक्य -
I have a dream that my four children will one day live in a nation where they will not be judged by the color of their skin but by the content of their character.
2 Dec 2010 - 6:18 am | शिल्पा ब
हि आणि रुबीची माहिती आधी होतीच...आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद..
बाकी आपल्याकडे इतक्या सामान्य व्यक्तीने असे काही केल्याचे आठवत नाही.. आपल्याला गांधीच हवा आणि आता नवीन गांधी कुठून आणणार?...असमानता आपल्याकडे होती...आता कायद्याने नाही...म्हणजे असं म्हणायचं कारण आरक्षण आहेच.
2 Dec 2010 - 9:13 pm | विकास
बाकी आपल्याकडे इतक्या सामान्य व्यक्तीने असे काही केल्याचे आठवत नाही..
आपल्याकडील चळवळी चालू करणारे सामान्यच होते, फक्त ते स्वतःला कधी तसे समजत सामान्य राहीले नाहीत. त्यात अनेक जण येतील ज्यांच्या ठिणग्यांनी पुढचा इतिहास घडला गेला - आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर, स्त्री शि़क्षणासंदर्भात सावित्रीबाई फुले (म. फुले पण अर्थातच), डॉ. आंबेडकर (चवदार तळे), टिळकांना तर काय ब्रिटीशांविरुद्धच्या असंतोषाचे जनक म्हणले गेले, भगूर नावाच्या खेड्यातील सावरकर, अजून एका खेड्यातील दरीद्री कुटूंबात जन्माला आलेले आणि साहेबाकडे कारकुनी करता येईल म्हणून शिक्षणाची संधी मिळालेले गोपाळ कृष्ण गोखले, नुसता देश स्वतंत्र होऊन फायदा नाही म्हणणारे डॉ. हेगडेवार, त्यांच्या विरुद्ध विचारसरणीचे कॉ. डांगे... असे अजून अनेक असतील जे सामान्यच कुटूंबातील होते. "और उसके मुंहमे थी चांदीकी चमची" असे यातील कोणीच नव्हते.
हे केवळ मराठी झाले आणि ते देखील केवळ स्वातंत्र्य चळवळीशी संदर्भातील. असे अनेक आहेत भाषिक आहेत... स्वामी विवेकानंद हे सामान्य घरातीलच होते. अमेरिकेला आलेले असताना कुठल्या अवस्थेतून गेले हे माहीत असेलच. तरी देखील जिद्द सोडली नाही...
गांधीजींच्या बाबतीत, "उचललेस तू मीठ मुठभर, साम्राज्याचा खचला पाया" असे कवीमनाने म्हणले जाते आणि त्यात काही अंशी तथ्य देखील आहे. त्याचा जेंव्हा "ऑल्सो" कडून "ओन्ली" म्हणण्याकडे वापर होतो तेंव्हा सगळे बिघडते. पण त्याला कारण गांधीजी नाहीत...
2 Dec 2010 - 10:38 pm | मराठे
+१
अगदी बरोबर. खरं म्हणजे असं काही केलं की सामान्य व्यक्तीच असामान्य बनून जाते. मग ती रोझा पार्क्स असो, सावरकर असो, गांधी असो वा अगदी अलिकडले शहिद सतिश शेट्टी असोत.
2 Dec 2010 - 10:47 pm | विकास
अगदी अलिकडले शहिद सतिश शेट्टी असोत.
अगदी योग्य उदाहरण! पुन्हा धन्यवाद. :-)
3 Dec 2010 - 3:11 am | शिल्पा ब
याची कल्पना आहे...तुम्हाला माझे म्हणणे नीट समजले नाही किंवा मला ते नीट मांडता आले नाही...
आपल्याकडील स्वातंत्र्यसैनिकांना त्यांना काय करायचेय हे माहिती होते, ध्येय होते...
रोझा पार्ककडे हे नव्हते...मार्टिन लुथर किंग यांच्याकडे होते हा फरक आहे...आता हेच अजून विस्तृत सांगायचे तर एक मोठ्ठा इंद्रप्रतिसाद होईल.
2 Dec 2010 - 10:35 am | दिपक
धन्यवाद उत्तम माहितीपुर्ण लेखाबद्दल.
2 Dec 2010 - 2:09 pm | स्पंदना
रोचक!
धन्यवाद मराठे.
2 Dec 2010 - 2:16 pm | यशोधरा
लेख आवडला. माहितीबद्दल धन्यवाद.
2 Dec 2010 - 3:17 pm | गणेशा
माहिती बद्दल धन्यवाद
छान सांगितले आहे तुम्ही
2 Dec 2010 - 3:42 pm | प्राजक्ता पवार
माहितीबद्दल धन्यवाद. :)
2 Dec 2010 - 4:07 pm | मदनबाण
सुंदर लेखन आणि छान माहिती...
असेच मस्त लेखन करत रहा. :)
2 Dec 2010 - 7:53 pm | पैसा
असे लेख आणखी लिहा.
2 Dec 2010 - 7:13 pm | विलासराव
छान माहिती.
लेख आवडला.
3 Dec 2010 - 7:03 am | नंदन
लेख. समयोचित आणि माहितीपूर्ण.