चिंच दिसली की लहानपण डोळ्यासमोरुन गेल्याशिवाय राहत नाही. ही चिंच पाहून तोंडाला पाणी सुटणार नाही असे फार क्वचीतच आढळतील. मी लहान असताना भरपुर चिंचा खायचे. शेताच्या बांधावर जाऊन झाडावर दगड माडून चिंचा पाडायच्या आणि तिथेच झाडाखाली बसुन घरुन पुडीत बांधून आणलेला मिठ मसाला लावुन खायचा हे उद्योग बर्याचदा चालायचे. असे खाउन मन नाही भरायच तेंव्हा त्याच चिंचा घरी नेउन परत त्याची चटनी बनवायची आणि खायची. गोबोळी चिंचा शोधायलाही मजा यायची. चिंच हलवायला खास माणूस यायचा तेंव्हा मग त्या पिकलेल्या चिंचेत एखादी गाबोळी चिंच मिळाली की खुप आनंद व्हायचा. पिकलेल्या चिंचा आई-आजी घरात ठेवायच्या आणि संध्याकाळी फोडत बसायच्या आणि फोडून त्याचे जाड्या मिठात मिसळून गोळे करायच्या तेंव्हा त्यातही जाउन हात मारायचे. मग मात्र आई ओरडायची. अग किती चिंचा खातेस ? जास्त आंबट खाउ नकोस, आत्ता मजा वाटते खायला वय झाल की त्रास होईल. आणि आता तेवढ वय न होताही खरच मला संधीवाताचा त्रास होतो मधुन मधुन आणि आईचे ते शब्द आठवतात. पण आईला आता हे सांगण्याची हिंमत होत नाही. आई अजुनही ह्या चिंचा फोडत असते वय झालय तरी पण मी वय न होताही चिंचा खाण बंद केलय. (दु:खी बाहुली). फक्त जेवणातल्या काही पदार्थात तेही खुप कमी प्रमाणात चिंच घालते.
ह्यात चिंचेचा दोष काहीच नाही. माझ्या हट्टिपणाचा आणि कंट्रोलही नही होताचा आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक बरा नाही हे आई हजारवेळा सांगुनही मी तिच्यापासुन चोरून खायचे कधी कधी.
ह्या फुलांवरून हेही आठवत की चिंचा पाडून झाल्या की एखाद महिन्यातच लगेच दुसरी फुले येतात मग ती फुले आणि झाडाचा कोवळा पालाही मी खायचे. आणि झाडाला नुकतीच पकडलेली चिंच तर मला खुपच आवडायची.
हे पाहुन तुमच्याही काही लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या असतील त्या आपण शेअर करुया.
प्रतिक्रिया
11 Nov 2010 - 4:14 pm | यकु
चिंचा पाहुन तोंडाला पाणी सुटलं आणि डोक्यात आठवणी जाग्या झाल्या.
मला नवीनच चिंचेवर चढता येऊ लागलं होतं तेव्हा दिवसच्या दिवस मी त्या झाडावरच घालवायचो ! नेहमी नेहमी मीठ सोबत न्यावं लागू नये म्हणून कागदात मीठ बांधून ते चिंचेच्या ढोलीत ठेऊन द्यायचे ;-)
मग पाऊस पडला की ते भीजणार!
11 Nov 2010 - 4:58 pm | बिपिन कार्यकर्ते
चिंचा नाही खाल्ल्या फारशा... पण लहानपणी आरे कॉलनीत कैर्या भरपूर खाल्ल्या आहेत. विशेषतः मे महिन्याच्या सुट्टीत.
<भला मोठा सुस्कारा सोडणारी बाहुली>
11 Nov 2010 - 5:11 pm | Nile
चालायचंच, कुणाला चिंचाची ओढ लागते तर कुणाला कैर्यांची.*
बाकी शाळेतले चिंचा पाडायचे दिवस आठवले, खाण्यापेक्षा देण्यात मजा असायची हे कशाला सांगा? ;-)
*वाचीव नालीज.
11 Nov 2010 - 5:07 pm | स्वाती दिनेश
तों पा सु असे काय विचारतेस जागु? तों पा तर सु च पण त्याबरोबर अनेक आठवणी ताज्या झाल्या.
आमच्या अंगणात भलेमोठे चिंचेचे, आंब्याचे आणि जांभळाचीही झाडे होती.. तसेच गुंजेचे,आवळीचेही होते... ती सगळी डोळ्यासमोरुन तरळली...
स्वाती
11 Nov 2010 - 5:09 pm | मनि२७
मी शाळेत असतांना खूप चिंचा खाल्ल्या आहेत....
शाळेबाहेरच मिळायच्या मस्त अर्धवट पिकलेल्या....
मस्त लागायच्या :-)
आज पण आठवला कि तो. पा. सुटत ;-)
11 Nov 2010 - 5:58 pm | पिंगू
शाळेत असताना चिंचा, बोरे, कैर्या खाऊन कित्ती मज्जा केली होती...
- (चन्यामन्याप्रेमी) पिंगू
11 Nov 2010 - 6:40 pm | रेवती
आईग्ग! अनेक आठवणी आहेत.
आमच्याकडे चिंचेचं झाड नव्हतं पण दोन मैत्रिणींकडे होतं.
चिंचा पाडायला माणूस येणार हे आधीपासून माहित असल्यामुळे त्या अठवड्यात त्यांच्याशी न भांडता चिंचेची वसूली केली जात असे. मीही भरपूर आंबट चिंबट प्रकार लहानपणी खाल्लेत. आता मात्र चिंचेची चटणी खाल्ली कि डाव्या पायाची टाच दुखते हा नेहमीचा अनुभव!:(
11 Nov 2010 - 6:42 pm | चित्रा
हे चिंचेचे झाड दिसे मज चिनारवृक्षापरी. :)
चिंचा भयंकर आवडत असत.
मी चिंचोके धुवून ठेवून देत असे, किती चिंचा खाल्ल्या त्याचे पुरावे म्हणून!
छोटेखानी लेख मस्तच आहे.
जागुताई, चित्रे जरा मोठी देत जा.
नॉस्टॅल्जिक, भाबडे नसावे अशी काही हल्ली टूम आली आहे. मला नाही पटत. जे आठवते आहे ते तसे लिहावे.
11 Nov 2010 - 6:52 pm | रेवती
मी चिंचोके धुवून ठेवून देत असे, किती चिंचा खाल्ल्या त्याचे पुरावे म्हणून!
हा हा हा! मस्त!
11 Nov 2010 - 7:42 pm | पैसा
हे चिंचोके चुलीत भाजून खात होतो नंतर. मस्त तुरट लागतात!
12 Nov 2010 - 7:22 am | नगरीनिरंजन
मला चिंचांपेक्षा भाजलेले चिंचोकेच जास्त आवडायचे.
12 Nov 2010 - 8:33 am | चित्रा
चिंचेची कोवळी पाने.
नंतर विलायती चिंचाही विकायला आल्या, पण त्यांना चव फारशी नसायची. त्या गंमत म्हणून ठीक होत्या. खायला आपली नेहमीच्या चिंचाची बुटुकेच छान लागतात.
11 Nov 2010 - 6:50 pm | गणेशा
आमच्या दातार कॉलनी मध्ये मोठे चिंचेचे झाड होते .. भरपुर चिंचा खाल्ल्या आहेत .. आणि त्या झाडाचे मालकांकडुन शिव्या पण.. .. त्यांच्या एका गड्याने आमच्या एका मित्राला पकडुन बाथरुम मध्ये कोंडले होते चिंचा पाडतो म्हणुन ..
सर्व आठवणी जाग्या झाल्या ..
11 Nov 2010 - 9:02 pm | धनंजय
थोड्याच चिंचा, बराच पाला खाल्ल्याची आठवण आली.
चिंचेची फुले क्वचितच खाल्लेली आहेत. नाजूक-नखरेल-मस्त असतात.
11 Nov 2010 - 9:14 pm | प्राजु
फार फार आवडायची चिंच.
शाळेजवळ लाल कच्च्य्या चिंचा मिळायच्या त्या घरी नेऊन आईला त्याची चटणी करायला लावयचे.
गाभूळलेल्या चिंचा फोडताना , एका बाजूला मी चिंच, गूळ, तीखट ,मीठ असं ठेचून त्यांची गोळी करायचे आणि मग आम्ही भावंडं त्या गोळ्या काडीला लावून खात बसायचो...
खूप मस्त वाटलं.. आठवणी एकदम "ट्टॉक्क" आवाज करून जाग्या झाल्या! :)
11 Nov 2010 - 9:35 pm | बहुगुणी
आमच्या घरी चिंचेची दोन, जांभळाची दोन आणि पेरूची ७-८ झाडं होती. आलटून पालटून त्यांवर सूरपारंब्या खेळायचो, आणि ज्याच्यावर/जिच्यावर राज्य असेल तो/ती इतरांना शिवण्यासाठी इतर फांद्यावर चढला/चढली की आपण झाडाच्या तळाशी रिंगणात ठेवलेल्या काठीवर (सूरावर) सरळ उडी मारून पाय ठेवायचा, आणि परत राज्य चढवून त्यांना पिदवायचं!
हा खेळ चालायचा जांभळावर आधिकप्रमाणात, कारण वेगात उंचावर चढणं किंवा ऊंचावरून उतरणं हे जांभळावर सहज शक्य असायचं, पेरूच्या फांद्या एकतर तुटायच्या किंवा उंचीला कमी पडायच्या, आणि चिंचेच्या फांद्या नको तिथे ओरबाडून काढायच्या!
एकदा धाकट्या बंधूराजांनी रेकॉर्ड मोडायचं म्हणून जांभळाच्या झाडाच्या तीस एक फूटांवरच्या फांदीवरून मधल्या दोन एक-फांद्यांवर टारझनसारखं लटकत थेट सूरावर उडी ठोकली, आणि तळातल्या शेवटच्या फांदीवर हाताची पकड बसायच्या आधी दात आपटला आणि तोंड भरून रक्त घेऊन हे महाराज खाली पोहोचले. तसा रक्ताळलेला चेहेरा घेऊनही 'जितं मया' म्हणत म्हणत याचा थयथयाट चालू होता! अर्थात्, नंतर वडिलधार्यांच्या शिव्या खाऊन आमचं सूरपारंब्या महिनाभरासाठी बंद झालं हे वेगळे सांगणे न लगे!
Speaking of चिंचा, (सागरगोट्यांसारखे) चिंचोके घासून त्यांनी एक-मेकाला दिलेले चटके आठवले.
12 Nov 2010 - 1:42 am | सुनील
लहानपणी चिंचेची झाडे जवळपास नव्हती म्हणून झाडावरच्या ताज्या चिंचा खाण्याचे भाग्य मिळाले नाही.
पण राय-आवळा, कैर्या आणि लाल गुलमोहराची फुले (त्याला आम्ही राजा-राणी म्हणत असू), भरपूर खाल्ली आहेत!
12 Nov 2010 - 12:54 pm | गणेशा
गुलमोहराच्या फुलामध्ये राजा -राणी आणि एक वेगळे फुल पण असायचे त्याला आम्ही कोंबडा म्हणायचो ..
आठवले
12 Nov 2010 - 8:04 am | नरेशकुमार
तो.पा.सुटल.
12 Nov 2010 - 12:52 pm | चिगो
मी आणि माझा भाऊ (मी जनरली त्याच्या पट्टेवाल्याच्या रोलमधेच असायचो ;-)) चिंचेचे तिखटमीठ लावलेले गोळे काडीत खोचून आईसकँडी सारखे चोखत बसायचो.. नंतर कॉलेजमधे गर्ल्स हॉस्टेलच्या कंपाऊंडमधे चिंचेचे झाड होते, त्यावर चढून चिंचा पाडल्या आहेत..
अवांतर : चटके द्यायला आम्ही रिठ्याच्या बिया वापरायचो..
12 Nov 2010 - 9:47 pm | जागु
सगळ्यांच्या आठवणी मस्त आहेत.