फिश् पॉंड ( जमल एकदाच )
आम्ही लहान असताना शाळेत दोन मुलांच्या मधे एक मुलगी किंवा उलटे ( उलटे म्हणजे तसे उलटे नाही हो वाइस वर्सा सारखे उलटे ) बसवायचे. कधी कधी मज्जा यायची पण कधी कधी जेव्हा शेजारचा मुलगा मूलीना हेट करणारा असायचा तेव्हा चांगली जुन्पय्चि. मग बदला घ्यायला एकमेकाना द्वेष पत्रे ( इकडे खरडी पाठवतात म्हणे ) पाठवायचो. ज्या वयात प्रेम पत्रे पाठवायची त्या वयात आम्ही जास्तीत जास्त त्रास कसा देता येईल हे बघायचो. प्रेम पत्रे पाठवणारे नग सुद्धा होते पण त्यांच्या बद्दल नंतर कधी तरी. त्यातून मग दुसर्याचा अगदी कमित कमी शब्दात अपमान करण्याचे नवे नवे प्रकार शोधले जायचे. कधी कधी फक्त एखादा शब्द तर कधी ईडियट स्टुपिड बावळट असे अपषब्द ( सभ्य भाषेत ज्याला शिव्या म्हणतात ते ) लिहायचो. नंतर अशा भरपूर शिव्या एकत्र करून त्याचा शोर्टफॉर्म करायची फॅशन आली. "यमुनाबाईचा गडू" ही त्यातलीच एक शिवी. त्याचा अर्थ नंतर कधीतरी सांगेन पण इथली शब्दभांडार संपन्न जनता पाहता आधीच माहीत असण्याची शक्यता जास्त! . हळुहळू लोकांची प्रतिभाशक्ति जागृत व्हायला लागली आणि लोक कविता / चारोळ्या करायचे. कुठून चोरायचे काय माहीत पण त्या कविता असायच्या भारी. आता वाटते ते सगळे कागद जपून ठेवायला हवे होते. ( इथे उपयोगी पडले असते. ह.घ्या) त्यातलीच एक कविता, वर्गातल्या सुंदर मूलीना पाठवायचो ती,
स्वतःला समजते डॅश्डॅश्डॅश ची मधुबाला
आहे तर खरी चिंचेचा पाला.
आणि एक
हे चींचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी
दिसशि तू (काहीतरी शब्द) म्हातारी.
मूलाना शक्यतो काहीतरी बावळट नालायक असेच मिळायचे पत्रात. कधी कधी एखाद्या गाण्यात मुलाचे नाव टाकून प्रयत्न केला जायचा पण ते सगळे इतके लक्षात नाही आता. वर्गातल्या अतिशय धन्द्रत मुलाला गोविंदा म्हणून चिडवायचो. भांडण पण व्हायच आणि थोड्या दिवसानी समझोता पण. आता तस होत नाही. वय वाढल, अक्कल वाढली आणि अहंकरदेखील. आता भांडण झाल तर मनात कायमची अढी तयार होते.
आणि अशा वाईट चारोळ्याना आम्ही फिश् पॉंड म्हणायचो ते सांगायचच राहील..
झुंज़ पिक्चर मधल कोण होतीस तू काय झालिस तू या गाण्यावर मधल्या सुट्टीत छान जुगलबंदी व्हायची.. तेव्हा बर्याच गोष्टी कळायच्या नाहीत पण फक्त मोठ्या मोठ्या आवाजात "कसा वाया गेलास तू" ओरडायचे एवढेच माहीत होते. तो आधीचा निरागसपणा दुर्मिळ होत चाललाय..( जरा जास्तच होतय का? )तर असो डोक्याला शॉट लावून घेण्यापेक्षा आपण जरा मजा करूया. तुम्हीपण शाळेत असे काही उद्योग केले असतील तर ते शेअर करूयात. तेवढीच चार घटका निखळ करमणूक.
( मिपावर पहिलाच प्रयत्न आहे लिहायचा, चुकभूल द्याविघ्यावी. )
प्रतिक्रिया
30 Oct 2010 - 11:01 am | utkarsh shah
छान जमलेय. अजुन सांगायला हरकत नाही.
वाट पाहतोय...
30 Oct 2010 - 2:35 pm | निवेदिता-ताई
छान लिहीलय............
यमुनाबाईचा गडू" .........माहित आहेच...
बहुतेक सगळ्यांना माहित असेलच.
आम्च्या बाई तर म्हणायच्या..कित्ती बोलता ग तुम्ही...खापराचे तोंड असते तर फ़ुटून गेले असते..
आणी भांडणे म्हणाल तर सारखीच..पण लगेच कट्टीची बट्टीही होत असे.चिंचा-बोरे चिमणीच्या दाताने दिली जायची. हो आंणी भांड्ण झाली की एक मध्यस्त असायचा...तिला विचार बोलणार आहेस का??
मग ती तिकडून म्हणणार ’मग आधी का भांडलीस, आली की नाही बोलायला..
सांगावे तेवढे थोडेच. फिश् पॉंड तर नेहमीच मिळायचे-दिले जायचे.
कॊलेजच्या स्नेहसंमेलनात तो एक खास कार्यक्रम असायचा ,मग कुणाला किती मिळाले फिश् पॉंड यावर पुढचे दोन-चार दिवस चर्चा चालायची.
30 Oct 2010 - 2:39 pm | sneharani
मग निवेदिता-ताई सांगा की फिश पाँड!
30 Oct 2010 - 6:16 pm | निवेदिता-ताई
तुझा फोटो पाठव म्हणजे देते फिश पाँड तुलाच....हा हा हा
31 Oct 2010 - 12:28 am | रमणरमा
धन्यवाद!! चला कोणीतरी भेटले मला यमुनाबैचा गडू माहीत असलेल! आमच्या संस्कृतच्या बाई तर चक्क वर्गात झोपायच्या आणि कधी कधी संथ आवाजात घोरयच्या पण. इतकी मजा यायची त्या तासाला... आमची कुजबूज सुरू व्हायची आणि थोड्या वेळाने गोंगाट! बाईंची झोपमोड झाली की त्या एक मोठी जांभई देत उठायच्या आणि एकदम हेल काढून "अरे बाळानो झोपु द्या रे पाच मिनिट! " नंतर आम्हाला शिकवायला नसल्या आणि शाळेत कुठे दिसल्या की बाळा म्हणूनच बोलवयच्या :)
31 Oct 2010 - 12:38 am | सुहास..
बॉसी !!
" या झोपडीत माझ्या "
द्या जरा आठवणी काढुन ..........
1 Nov 2010 - 3:41 pm | गणेशा
छान वाटले वाचुन..
" यमुनाबाईचा गडू" आठवला आणि हा शब्द आपण इतक्यादा वाजवलाय तरी विसरलो कसा हेच वाटले ..
माझी बहिन पण मला सारखी "यमुनाबाईचा गडू " बोलायची ते पण आठवले ..
अजुन लिहा .. वाचत आहे
बाकी तो आधीचा निरागसपणा दुर्मिळ होत चाललाय हे खरे आहे .. पण तितकेच वाईट
1 Nov 2010 - 3:44 pm | धमाल मुलगा
>>यमुनाबाईचा गडू
काय काय आठवणी जाग्या झाल्या. :D
असो. ह्या धाग्याचंच शिर्षक असलेला एक धागा पुर्वी स्वातीताईनं चालू केला होता त्यावर घातलेल धुडगुस आठवला. :)
2 Nov 2010 - 12:16 pm | रमणरमा
हो ती कविता आधी वाचली होती ढक्लपत्रात!!
1 Nov 2010 - 3:53 pm | गणेशा
दुसरी का तिसरी असेन ..
मराठी गणित आणि शास्त्र या विषयात नापास होणारा मी 'ढ' विद्यार्थी होतो. (बाकी २ विषयात नंतर मास्टरकी झाली पण मराठी अजुन सुधारलेच नाही.. शुद्धलेखनामुळे अजुनही नेटवरील वाचक्-पोलीस अजुन शिक्षा करतात)
असो .. 'ढ' असल्याने मागे बसणे, मोठ्याने बोलने आलेच ..
पण कवितेच्या वेळेस बाई बोलायच्या माझ्या मागे म्हणा, तर मी त्यांच्या पुढे म्हणायचो ..
एकदा तर मजाच आली ..
त्या म्हणाल्या
"इंजिनदादा इंजिनदादा काय करतोस ?"
मला वाटले या नंतर त्या सगळ्यांना म्हणायला लावतायेत म्हणुन मी पुढचे जोरात म्हंटलो ..
"कोळसा मी खातो ...... "
अआणि सगळे हसायला लागले ..
मला पुढे बोलावुन कोळसा नाही पण छड्या खाव्या लागल्या ( मारक्या बाई होत्या .. त्याबद्दल नंतर ) .. अआणी आई ला शाळेत बोलवुन आणायला लागले ..
आई ला त्या म्हणाल्या तसा हुशार आहे पण खुप गडबड करतो .. आनि कवितेवेळी माझ्या पुढे बोलतो सारखा..
आई तेथे काही बोलली नाही पण घरी आल्यावर सगळ्यांना माझय पोराला लय कविता पाठ असतात म्हणुन सांगायला लागली .. मज्जा वाटली ( जेंव्हा पहिला कविते/गाण्याचा प्रॉग्रम झाला माझा मी मोठा झाल्यावर .. घरी काही माहीती नव्हते तोपर्यंत .. तेंव्हा हीच आई म्हणाली काय भिकारनाद लागलाय पोराला .. )
-- गणेशा
2 Nov 2010 - 12:13 pm | रमणरमा
शिक्षेची तर मजाच असायची ! कधी कधी उभ राहायची पण शिक्षा व्हायची... मग उगाच वाकदतिकद उभ राहून मागच्या मूलना दिसणार नाही अस करून त्रास द्यायचा ( हे चाळे फक्त मूल करायची )
कविता पाठ करायचा मोठा कार्यक्रम असायचा तेव्हा. मराठी हिंदी सगळ्याच कविता कुठल्यातरी एकाच चालीत म्हणवून घ्यायच्या.. एकदा आम्हाला खूप हौशी बाई आल्या होत्या आणि त्यानी आमच्याकडून फिटे अंधाराचे जाळे पिक्चर मधल्या गाण्याच्या चालीवर तासभर म्हणवून घेतली होती...असा कंटाळा आला होता... गाण ऐकायला बर वाटत ते पन तासभर म्हणायच म्हणजे जरा अतीच!
2 Nov 2010 - 12:41 pm | क्लिंटन
१. आम्ही दहावीत असताना सगळ्यांना क्रिकेट खेळायचे वेड लागले होते.आमची शाळा दुपारची असे.तेव्हा शाळा भरायच्या आधी तासभर, मधल्या सुटीत आणि शाळा सुटल्यावर तासभर क्रिकेट खेळणे हा कार्यक्रम असे. त्यासाठी आमच्या वर्गातील गोखले अडनावाचा एक मुलगा बॅट घेऊन येत असे.एकदा आमच्या गणित शिकविणाऱ्या शिक्षिकांनी पोर्शन पुढे न्यायला म्हणून इतर कोणा शिक्षकाकडून तास मागून घेतला.पण तास सुरू होऊन १० मिनिटे होताच त्यांचे गोखल्याकडील बॅटकडे लक्ष गेले.आणि ती बॅट कशाला, कधी खेळता या सगळ्या प्रश्नांची माहिती करून घेऊन तासाचा उरलेला सगळा वेळ ’दहावीच्या वर्षात परीक्षा इतकी जवळ आलेली असताना क्रिकेट खेळण्यात वेळ वाया घालवणे कसे अयोग्य आहे’ यावर त्यांनी लेक्चर दिले.गणिताचा पोर्शन पुढे नेणे बाजूलाच राहिले.
दुसऱ्या दिवशी शिक्षकांच्या खोलीत आमच्या वर्गातील मुले क्रिकेट खेळण्यात वेळ वाया घालवतात यावर चर्चा झाली.त्यानंतर इंग्रजी शिकविणाऱ्या आपटे बाईंनी ताबडतोब गोखल्याकडील बॅट जप्त केली आणि त्याला सांगितले की मार्चमध्ये परीक्षा संपल्यावर येऊन बॅट घेऊन जा आणि तोपर्यंत बॅट अजिबात मिळणार नाही.
अजून दोन दिवसांनी गणिताचा तास होता. गोखल्याकडे बॅट नाही हे बघून गणिताच्या बाईंना वाटले असावे की आपल्या लेक्चरचा परिणाम म्हणून त्याने बॅट आणली नाही आणि क्रिकेट खेळणे बंद केले. त्यांनी गोखल्याला विचारले,"काय गोखले, आज बॅट कुठे आहे"? आणि त्यावर गोखल्याची इन्स्टन्ट प्रतिक्रिया होती--"आपटे बाईंनी ढापली". यावर सगळ्या वर्गात जोरदार हशा पिकला हे सांगायलाच नको.
२. एकदा मराठी शिकविणाऱ्या बाईंनी ’कलंक मतीचा झडो दुराभिमान सारा गळो’ या ओळी एकालाला वाचायला सांगितल्या. त्याने मतीचा ऐवजी ’कलंक मातीचा झडो’ असे म्हटले.बाईंनी परत वाचायला सांगितल्यावरही तो ’कलंक मातीचा झडो’ असेच वाचत होता.त्यावर बाईंनी त्याला विचारले की तुला या ओळी वाचताना काही वेगळे वाटत नाही का? यावर माझ्या मित्राची उत्स्फुर्त प्रतिक्रिया होती--’त्याच्या मतीचीच माती झाली असल्यामुळे त्याला मतीऐवजी माती असेच दिसत आहे’.
असे शाळेतील अनेक किस्से आहेत. त्यातील काही लिहिण्यासारखे आहेत तर काही लिहिण्यासारखे नाहीत. त्याविषयी परत कधीतरी.
2 Nov 2010 - 2:51 pm | धमाल मुलगा
>>त्यावर गोखल्याची इन्स्टन्ट प्रतिक्रिया होती--"आपटे बाईंनी ढापली"
=)) =)) =))
खल्लास!
2 Nov 2010 - 3:32 pm | आत्मशून्य
हे काय आहे बूवा ?
आप्ल्याला तर यमुनाबाई आगाशे एवडेच माहित होते हे गडू प्रकारण काय आहे ?
2 Nov 2010 - 3:34 pm | धमाल मुलगा
हा हा हा....
गडू ही पहिली पायरी...अंमळ निरुपद्रवी..साधारण चौथीपर्यंतची वगैरे. आगाशे त्यापुढे. ;)