सलाम ~ (फिल्ड मार्शल - अखेरचा भाग)

इन्द्र्राज पवार's picture
इन्द्र्राज पवार in जनातलं, मनातलं
8 Oct 2010 - 8:04 pm

सॅम माणेकशॉ भाग-१
सॅम माणेकशॉ भाग-२
सॅम माणेकशॉ भाग-३
सॅम माणेकशॉ भाग-४

या शेवटच्या भागात आपण पाहणार आहोत 'सॅमबहादूर माणेकशॉ' यांच्याबद्दलचे अन्य पैलू.
सर्वप्रथम त्यांचे कुटुंब >>

Pair

(सॅम आणि सिल्लू)
फिल्ड मार्शल माणेकशॉ यांचे वडिल श्री.होर्मुसजी खुद्द ब्रिटीश लष्कराच्या मेडिकल कॉर्प्समध्ये कॅप्टन होते. सॅम यांना तीन भाऊ व दोन बहिणी. या सर्वांचा जन्म अमृतसरचा, पैकी फक्त फली हा भाऊ मुंबईत तर सॅमसह जान आणि जेमी हे अमृतसर येथील माध्यमिक शाळेनंतर नैनितालच्या शेरवूड कॉलेजमध्ये दाखल झाले, तर दोन्ही भगिनी त्याच जिल्ह्यातील मरी गावातील (आता पाकिस्तानात हे गाव गेले आहे) कॉलेजमध्ये दाखल झाल्या. सॅम हे कॉलेज जीवनात एक होतकरू टेनिस खेळाडू म्हणून प्रसिद्ध झाले होते. १९३३ मध्ये तर डेहराडूनच्या मिलिटरी अ‍ॅकेडमीने त्यांना 'टेनिस ब्ल्यू' जर्सीने गौरविले होते. पुढच्याच वर्षी (१९३४) मध्ये मिलिटरी अधिकार्‍यांची पहिलीवहिली बॅच डेहराडून मिलिटरी अ‍ॅकेडमीमधून बाहेर पडली. [विशेष म्हणजे या पहिल्याच बॅचमधील तीन तरूण पुढे आपापल्या देशाचे 'चीफ ऑफ आर्मी स्टाफ' झाले....एक अर्थातच सॅम माणेकशॉ, दुसरे जनरल मोहम्मद मुसा, पाकिस्तान आणि तिसरे जनरल ड्युन स्मिथ, ब्रह्मदेश].

Fam2

(दोन कन्या > शेरी आणि माया समवेत)

१९३७ मध्ये सॅम लाहोर बेसमध्ये ड्युटीवर असताना त्याना आर्मी मेडिकल कॉर्प्सच्या कर्नलचे एका घरगुती कार्यक्रमाला हजर राहण्याचे आमंत्रण मिळाले. कर्नलच्या पत्नीची मुंबईत राहणारी आणि एलफिन्स्टन कॉलेजची ग्रॅज्युएट असलेली व त्यानंतर जे.जे. मध्ये कलाशाखेची विद्यार्थीनी असलेली 'सिल्लू' नावाची पारसी बहिणही त्या पार्टीला हजर होती. सॅम आणि सिल्लूची ओळख झाली, ओळखीचे प्रेमात आणि मग तो सिलसिला वर्षदीड्वर्ष चालू राहिल्यानंतर २२ एप्रिल १९३९ रोजी सिल्लू सौ.सॅम माणेकशॉ बनल्या....ते पुढील ६१ वर्षाची अखंड साथ देण्यासाठी. सिल्लू यांचे वैशिष्ट्य म्हणजे सॅमच्या पहिल्या लेफ्टनंटच्या रॅन्कपासून अखेरच्या त्या फिल्ड मार्शलच्या पदापर्यंत त्या नित्याच्या 'गृहिणी'च राहिल्या. साध्या सैनिकाच्या बायकामुलांमध्ये त्या रमत आणि सॅमना काही सल्ला द्यायचा असेल तो घरातील चार भिंतीच्या आतच. फक्त 'जवान फंडा' साठी बाहेर पडायचे असेल तरच त्याना आपली ओळख जनरल माणेकशॉ यांच्या पत्नी अशी करून दिली तर चालत असेल, अन्यथा त्या अखेरपर्यंत साधे सरळ जीवन जगल्या.

Fam1

माणेकशॉ जोडीला दोन मुली झाल्या. पहिली 'शेरी' ११ जानेवारी १९४० तर दुसरी माया (मात्र नावाचे स्पेलिंग Maja असे होते.) २४ सप्टेंबर १९४५. शेरी यांनी आपली करीअर एअर इंडियाशी निगडीत ठेवली व तिथूनच त्या शेवटी निवृत्त झाल्या. त्यांचे पती श्री.डिंकी बाटलीवाला 'स्वीस एअर लाईन्स'च्या सेवेत होते. दोघेही आता चेन्नई येथे निवृत्तीनंतरचे आयुष्य व्यतीत करत आहेत. यांना एकमेव मुलगी जी सध्या कॅनडा येथील वास्तव्यास आहे. दुसरी कन्या 'माया' ही ब्रिटीश एअरवेजमध्ये काम करत होती आणि तिची भेट झाली एअर इंडियात इंजिनिअर असलेल्या धुन दारुवाला यांच्याशी. दोघानी विवाह केला आणि माया यांनी एअरवेजमधील नोकरी सोडून लंडनच्या लॉ कॉलेजमध्ये शिक्षण सुरु केले. तिथून त्या बॅरिस्टर झाल्या आणि सध्या त्या दिल्लीत 'मानवाधिकार समिती'चे काम पाहतात. या जोडप्याला रौल आणि जेहान ही दोन मुले. जेहान हा नातू आपले आजोबा माणेकशॉ यांच्याकडेच लहानाचा मोठा झाला पण असे असूनही सॅमनी त्याचा कलाक्षेत्राकडील कल पाहून मिलिटरीत जाण्याचा आग्रह धरला नाही. जेहान आजकाल थिएटर ग्रुप अ‍ॅक्टिव्हिटीशी फार निगडीत आहे. [आमीर खान, आशुतोष गोवारीकर, किरण राव, किट्टू गिडवानी आदी त्याचे निकटचे मित्रमंडळ आहे].

Arjun
(नातू जेहान, सॅमचे निकटचे मित्र निवृत्त एअर चीफ मार्शल अर्जुन सिंग यांच्यासमवेत)

सॅम स्वभाव >

सर्वसाधारणतः जसे मानले जाते की, पारशी व्यक्ती अतिशय बोलघेवडी असते आणि कायम हास्यविनोदात मग्न. आपल्या मराठी साहित्यातही कुठल्याही साहित्यिकाने 'गंभीर पारशी' रंगविलेला नाही....(ठळक उदाहरण : पु.लं.चा भन्नाट सोकरजी त्रिलोकेकर..."इथं सालं आमाला मराठी येत नाही. साला भरडामदी तर सगळं मिडिअम ऑफ इन्स्ट्रक्शन इंग्लिश होती... मदे नको हेकलिंग करू...साला भर्डाचा स्टुडंट.."); तर खुद्द सॅमदेखील या स्वभावापासून अजिबात दूर गेले नाहीत. त्यांचे आजवरचे जितके फोटो प्रसिध्द झाले आहेत ते सगळे हसर्‍या चेहर्‍याचेच. त्यांच्या चेहर्‍यावर वार्धक्याच्या खुणा दिसल्या त्या केवळ सिल्लू गेल्यानंतरच.

युद्ध चालू आहे तो पर्यंतच शत्रू. एकदा शस्त्रसंधी झाली की, आपल्या सैन्याच्या अधिकार्‍यांना आणि सैनिकाना जो आदर प्रेम, तेच शत्रूपक्षाला देखील...हा स्वभाव. भारतीय सैन्यापुढे नियाझी गुढघे टेकणार हे निश्चित झाल्यानंतर त्यांच्या सुमारे एक लाख सैन्याला रेडिओवरून संबोधिताना सॅम माणेकशॉ म्हणाले होते, "तुम्हाला मी शस्त्रे खाली ठेवा असे आवाहन करीत आहे. लक्षात ठेवा, सैनिकाने सैनिकाला शस्त्र परत करण्यात कसलीही मानहानी नसते. मी तुम्हाला खात्री देतो की, तुमच्याशी एक सैनिक या नात्यानेच माझे वर्तन राहील..." याचा परिणाम नक्कीच झाला. ढाक्याच्या शरणागतीनंतर सुमारे ९०,००० पाकिस्तानी सैनिकांची त्यांच्या देशात रवानगी करण्यासाठी त्यांनी रेल्वे खात्याचे हार्दिक सहकार्य घेतले. कलकत्याहून दिल्लीला आलेली युध्दकैद्यांची पहिली ट्रेन पाहण्यासाठी खुद्द जनरल माणेकशॉ रेल्वे स्टेशनवर आले होते. दोनतीन बोगीत असलेल्या पाक सैनिकासमवेत त्यांनी हस्तांदोलन करून त्यांच्यासमवेत चहाही घेतला. त्या कारवाँचे प्रमुख मेजर जनरल व्ही.के.सिंग यांनी आपल्या 'लीडरशीप इन दि इंडियन आर्मी' या पुस्तका नोंदविले आहे, की सॅमबहादुरांची हस्तांदोलनाची ती दिलखुलास छबी पाहून ते पाकिस्ताने सैनिक अक्षरश: भारावून गेले, म्हणत असतील 'सेनाधिकारी असावा तर असा..!"

Fishing

(सॅम यांचा विरंगुळा)

भाषणबाजीची त्यांना अजिबात सवय नव्हती. ज्या शेरवूड कॉलेजमध्ये विद्यार्थीजीवनातील सुंदर काळ त्यांनी व्यतीत केला, त्याच्या एका कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जनरल सॅमबहादुरना निमंत्रीत करण्यात आले होते. ते थोडके भाषण इंग्लिशमधुनच वाचण्याची खुमारी आहे.

"Your Grace, the Metropolitan of India, My Lord Bishop of Lucknow, Mr. Principal, ladies and young gentlemen of Sherwood:
Yesterday evening when my A.D.C. told me that I would have to speak here, I was horrified. I thought the Principal had asked me to come and join the celebrations; I did not realize he wanted me to sing for my supper! Believe me, as I stand here, I am terrified. Those near me can almost hear my knees knocking and my teeth chattering. For eight years in Sherwood, I was at the receiving end. It is customary on these occasions for the guest speaker to give a learned discourse or advice to young gentlemen. It is not my fault that, although I received my early education in Sherwood, I am not learned. Sir, I am fit neither to give you a learned discourse nor advice."

Cover
(काही महत्वाच्या टप्प्यांचे सचित्र वर्णन)

अशा सॅमना 'गुरखा रेजिमेंट' चे फार कौतुक असे. अशा रेजिमेंटचे कमांडंट बनणारे ते पहिले नॉन-गुरखा ऑफिसर होते. या रेजिमेंट्च्या सैनिकांच्या धाडसाचे त्यांना अतिशय कौतुक असायचे. "मी मरणाला भीत नाही असे म्हणणारी व्यक्ती एक तर खोटारडी असली पाहिजे नाहीतर गुरखा सैनिक..." असे त्यांचे मत होते. आपल्या वाढदिवसाचा केक कापण्यासाठी आठवणीने त्यांना गुरखा रेजिमेंटने दिलेली कुकरीच वापरण्याची आठवण आपल्या नातवंडांना ते करत असत. गुरख्यांवरील त्यांच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून पुढे त्यांनी नेपाळ सरकारने ऑनररी जनरल ऑफ नेपाळ आर्मी ही पदवी दिली. असा मान मिळालेले ते पहिलेच गैरनेपाळी लष्करी अधिकारी होते.

निवृतीनंतर ते कुन्नूरच्या टी-गार्डेनमध्ये फार रमले होते. तिथेच त्यानी पुढील पस्तीस वर्षे काढली. त्यांच्या हाताखाली शिक्षण घेतलेले अनेक अधिकारी सुट्टीच्या काळात त्यांनी भेटायला येत असत. त्यांच्यासमवेत पतीपत्नीचा वेळ छान जाई. टेनिस सोडल्यास अन्य क्रिडाप्रकाराकडे त्यांनी लक्ष दिले नव्हते. पण टेबल गेमपैकी ब्रिज प्रेमी होते आणि सिल्लू अर्थातच तिथेही पार्टनर होत्याच. त्या कोकाकोला किंवा वाईन घेत तर सॅम ग्राऊज या स्कॉच व्हिस्कीचे भोक्ते होते. त्यांचे चेले कर्नल राकेश मॅगन याना बीअर देत असताना कर्नल यांनी मुलींच्या नावाबद्दल सहज छेडले : 'तुम्ही तुमच्या मुलीचे नाव शेरी असे जे ठेवले ते अशाच एका ब्रॅण्डच्या संदर्भात का?" यावर खळखळून हसत सॅम उत्तरले, 'असेलही, पण बघ, तिने प्रेम केले तेही एका 'बाटलीवाल्या' बरोबर, ते तर मी सांगितले नव्हते...आणि दोघांनी आपल्या एकुलत्या एक लेकीचे लाडाने नाव ठेवले आहे 'ब्रॅन्डी'... पुढे तर मायाने लग्न केले ते एका 'दारुवाल्या' बरोबर. बोल आता?"

हजरजबाबी तर ते पहिल्या नंबरचे होते. कुन्नुर येथे भेटायला आलेल्या स्टाफ अ‍ॅकेडमीच्या एका कमांडटने त्यांना एकदा सांगितले, "सर, मला अ‍ॅकेडमीमध्ये खूप मान मिळत आहे सध्या...कारण सैनिक समजतात माझे व्यक्तिमत्व तुमच्यासारखेच आहे." सॅमनी हसून उत्तर दिले, "नो वंडर, तुझ्या बायकोने तुलाच नवरा म्हणून निवडले."

अशाच काही सेनाधिकार्‍यांसमवेत चहापानाच्या वेळी सिल्लूही सामील झाल्या होत्या त्यावेळी सॅमच्या वाढत्या घोरण्याविषयी सिल्लू हसतहसत तक्रार करीत होत्या व सॅमचे घोरणे कमी झाले नाही तर मी आजपासून दुसर्‍या खोलीत झोपायला जाणार, असा निर्णय जाहीर केला. यावर सर्वांसमोर सॅम चेहरा चिंताग्रस्त करून म्हणाले, 'च्यामारी, बाकीच्या बायकांनी अजून तक्रार केली नाही, हीच का करत्ये?"

अशी ही ६४ वर्षे साथ देणारी मैत्रीण असणारी पत्नी 'सिल्लू' त्यांच्या आयुष्यातून निघून गेल्यानंतरच खर्‍या अर्थाने सॅम माणेकशॉ कुन्नुरच्या घरी एकटे उरले. मात्र पुढे आजारपण आणि वृध्दत्व यामुळे जरी ते थकले असले तरी वैयक्तीक टापटीप सातत्याने जपली होती. रोजची दाढीची त्यांची सवय डेहराडून मिलिटरी अ‍ॅकेडमीपासून चालू झाली होती ती अखेरपर्यंत. सदैव चकचकीत चेहरा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाची खासियत बनली होती. अनेक कार्यक्रमांना ते प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहत. मात्र ज्या दिवशी कार्यक्रम असेल त्या दिवशी सकाळी दाढी केली असली तरी संध्याकाळी कार्यक्रमाला जाण्यापूर्वीदेखील परत एकदा दाढी ते करणारच. तीच गोष्ट कपड्यांचीही. सैनिकी जीवनातल्या अगदी पहिल्या दिवसापासून आयुष्याचा अखेरच्या दिवसापर्यंत त्यांनी व्यवस्थितपणा कटाक्षाने पाळला.

OldPhoto
(आपलाच 'इतिहास' पाहताना सॅम)

मानसन्मान

१९६८ : पद्मभूषण, १९७२ : पद्मविभूषण, पोस्टाचे तिकिट

Padma

मिलिटरीच्या बॅण्ड पथकाकडून त्यांच्या सन्मानार्थ 'सॅम माणेकशॉ' ही मार्चिंग ट्यून तयार करण्यात आली आहे. जी इथे खाली देत आहे. या चित्रफितीत सॅमसाहेबांचे अनेक प्रसंगातील स्टील फोटोग्राफ्स आहेत, पण मुख्य म्हणजे ती खास धून आपण ऐकावीच; जी त्यांच्याच गुरखा रेजिमेंटच्या श्री.एल.बी.गुरंग या लीडरने तयार केली आहे.

सेनाधिकारी येतात, जातात.... पण १९७३ मध्ये निवृत्त झालेल्या एका 'हाडाच्या' सैनिकाची आज जवळपास ४० वर्षानंतरदेखील आठवण सातत्याने भारतीय सैन्याच्या आणि सामान्य नागरिकांच्या मनात आहे; हे त्यांच्या कर्तृत्वाचे वैशिष्ट्य मानावे लागेल. देशातील सर्वसामान्य जनतेला "फिल्ड मार्शल सॅमबहादूर होर्मुसजी फ्रामजी जमशेदजी माणेकशॉ'' या नावाचा कधीच विसर पडू नये.

(लेखमाला समाप्त....मालेतील सर्व लेखांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल तसेच मुद्दाम खरडीद्वारे प्रोत्साहन दिलेल्या सुह्रदांचे मनःपूर्वक आभार !!)

इन्द्रा

इतिहासविचार

प्रतिक्रिया

पैसा's picture

8 Oct 2010 - 9:02 pm | पैसा

दिव्यत्वाची जेथ प्रचिती
तेथे कर माझे जुळती ॥

जिथे विपत्ती जाळी उजळी
निसर्ग-लीला निळी काजळी
कथुनि कायसे काळिज निखळी
एकाची सगळी वसती ॥

मध्यरात्रि नभघुमटाखाली
शांति शिरी तम चवर्‍या ढाळी
त्यक्त, बहिष्कृत मी ज्या काळी
एकांती डोळे भरती ॥

-बाकीबाब बोरकर

सुनील's picture

8 Oct 2010 - 9:22 pm | सुनील

लेखमाला आवडली होतीच. अशाच अजून येऊदे!

प्रभो's picture

8 Oct 2010 - 9:25 pm | प्रभो

हेच म्हणतो.. :)

बेसनलाडू's picture

9 Oct 2010 - 2:27 am | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

यशवंतकुलकर्णी's picture

8 Oct 2010 - 9:28 pm | यशवंतकुलकर्णी

सुंदर मागोवा.
आलेल्या अभ्यासू प्रतिक्रियादेखील मस्तच!

रणजित चितळे's picture

8 Oct 2010 - 9:42 pm | रणजित चितळे

मी आर्मी ऑफीसर आहे व तुमचे सारे लख वाचुन फार फार छान वाटले. छान संशोधन करुन लेख लिहीले आहेत.
शतशः धन्यवाद

इन्द्र्राज पवार's picture

9 Oct 2010 - 2:19 am | इन्द्र्राज पवार

धन्यवाद सर.... मला बिल्कुल कल्पना नव्हती की आपण आर्मीत ऑफिसर आहात. मात्र आता फार आनंद होत आहे की, एक अ‍ॅक्टिव्ह रँक होल्डर ऑफिसर आर्मीच्या एका 'आयडॉल' वर लिहिलेली ही मालिका आवडली असे सांगत आहे.

इन्द्रा

चतुरंग's picture

8 Oct 2010 - 9:43 pm | चतुरंग

सॅमबहादुरवरची एक अप्रतिम लेखमाला. धन्यवाद इंद्रा.

-रंगा

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Oct 2010 - 9:53 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

सुंदर लेखमाला!
सॅमबहाद्दूरना एक कडक सॅल्यूट!

वात्रट's picture

8 Oct 2010 - 10:16 pm | वात्रट

+१

श्रावण मोडक's picture

8 Oct 2010 - 10:29 pm | श्रावण मोडक

जेवढे लिहिले ते वस्तुनिष्ठ, प्रवाही...

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Oct 2010 - 10:29 pm | बिपिन कार्यकर्ते

छानच. आता नवीन प्रकल्प घ्या हातात. :)

अवांतरः सोकाजी त्रिलोकेकर हे पारशी पात्र आहे? !!!

सुनील's picture

8 Oct 2010 - 10:33 pm | सुनील

नाही. ते पाठारे प्रभू जमातीतील पात्र आहे.

माझ्या लक्षात आले होते पण श्रीखंडात (पुन्हा) विरजण नको म्हणून लिहिले नाही!

पण इंद्राला जे काही सांगायचे आहे ते समजल्यामुळे त्या एररकडे मीसुद्धा डोळेझाक केली !

-रंगा

इन्द्र्राज पवार's picture

9 Oct 2010 - 1:31 am | इन्द्र्राज पवार

सर्वश्री.बिका, सुनील आणि चतुरंग....

~~ माझा सोकरजी त्रिलोकेकर यांच्याबद्दल गोंधळ झाला आहे असं तुमच्या प्रतिसादावरून दिसते. त्याला कारण खरंतर त्रिलोकेकरांचं वारंवार अभिमानाने सांगणं..."साला, भर्डाचा स्टुडंट आहे...साला". मुंबईच्या ग्रँट रोडवरील भर्डा बंधुंनी स्थापन केलेली ही शाळा पारसी समाजातील मुलांसाठी प्रसिध्द होती (आजही असेल...नक्की माहित नाही). झोरोस्ट्रियन एज्युकेशनल इन्स्टि. ही पारसी जमातींची संस्था सातत्याने भर्डा स्कूलमध्ये पारसी समाजाच्या कार्यक्रमांतर्गत धार्मिक व्याख्याने आयोजित करीत असते. [मला वाटते आचार्य अत्रे यांच्या 'मी कसा झालो' या एका महत्वाच्या पुस्तकात 'मी शिक्षक कसा झालो' या लेखात मर्झबान भर्डांच्या पारसी शाळेत त्यांनी केलेल्या शिक्षकाच्या नोकरीचा तपशील आहे.....हेदेखील कारण मनी होतेच.

तुमच्या प्रतिक्रिया वाचल्यानंतर तातडीने 'बटाट्याची चाळ' पाहिले. त्यात सोकाजीच्या घराचे वर्णन असे मिळाले > "सोकाजींच्या घरी रोज 'टाईम्स' पडत असे. सौ.बाबलीबाई ह्या त्या चाळीतील प्रथम विकच्छ नेसण्याची प्रथा पाडणार्‍या भगिनी होत्या. त्यांच्या अलमारीत काही स्कॉटच्या इंग्रजी कादंबर्‍या सोकाजींचे वाङ्मयप्रेम दाखवीत होत्या."

पुढे 'काही वासर्‍या' या प्रकरणात सोकरजी यांच्या नोंदी ::
५ जानेवारी : "सालं, फिश फार कॉस्टली झालं आहे....मटनाची क्वालिटी फार खराब होती. वाईफनी कटलेट बन्वले, ते पण नाय चांगले झाले. जोगदंड साला ब्रॅम्हीन आहे, पण आठ कटलेट खाल्ले. दुपारी झावबा वाडीतल्या ननजींच्या छोकरीचं बिथ्रोटल झालं, नवेवाडीतला विजयकरचा छोकरा.
३० मार्च : "डिसोजा रिटायर झाला. त्याला माँजिनीत पार्टी झाली. डिसोजाची वाईफ त्याच्या मानाने यंग वाटते. वाईफने सुपाची डिश अल्मिडासाह्यबाच्या पँटवर सांङून पँट स्पॉइल केली...."

आदी वर्णन (पुढे 'भ्रमण मंडळा"तही याच धर्तीचे लेखन आहे...) वाचताना माझ्या नजरेसमोर एखाद्या पारसी बावाचेच चित्र नजरेसमोर आले....शिवाय 'भर्डा ईज इक्वल टु पारसी" हे सूत्रही डोक्यात होतेच.

असो. मला सॅम यांच्या हसतमुख स्वभावाच्या संदर्भात नेमके काय म्हणायचे होते हे तुम्हा सर्वांच्या लक्षात आले असल्याने सोकरजींचा तसा 'तो' उल्लेख राहिला तरी चालेल....अन्यथा संपादकांनी तो रेफरन्स मजकुरातून काढून टाकला तरी हरकत नाही.

इन्द्रा

हेम's picture

8 Oct 2010 - 10:33 pm | हेम

छान लेखमाला.

संजय अभ्यंकर's picture

8 Oct 2010 - 10:42 pm | संजय अभ्यंकर

संग्रही ठेवावी अशी लेखमाला दिल्या बद्दल आभारी आहे.

वेताळ's picture

8 Oct 2010 - 10:50 pm | वेताळ

कडक सॅल्युट......

प्राजु's picture

8 Oct 2010 - 11:12 pm | प्राजु

अतिशय सुरेख लेखमाला.
अशाच सुंदर लेखमाला येऊदेत अजून.

मृत्युन्जय's picture

8 Oct 2010 - 11:21 pm | मृत्युन्जय

पुर्ण लेखमाला वाचुन मगच प्रतिसाद देइन अस ठरवले होते. त्यानुसार तुला आणि फिल्ड मार्शल दोघांनाही खणखणीत सलाम

अर्धवटराव's picture

9 Oct 2010 - 1:25 am | अर्धवटराव

पण तुम्ही या लेखात सॅमच्या काहि व्यवसायीक बाबींवर देखील प्रकाश टाकणार होता ना?

एनि वे... आता सेना विभागावरची उर्वरीत लेखमाला लवकर सुरु करा पाहु.

अर्धवटराव

पुष्करिणी's picture

9 Oct 2010 - 2:50 am | पुष्करिणी

मस्त झाली ही लेखमाला. खूप आवडली

धनंजय's picture

9 Oct 2010 - 3:31 am | धनंजय

अनेकानेक धन्यवाद.

सहज's picture

9 Oct 2010 - 5:25 am | सहज

धन्यु इंद्रा. लेख व प्रतिसादांमुळे ही लेखमाला गाजली. आवडली.

नितिन थत्ते's picture

9 Oct 2010 - 10:29 am | नितिन थत्ते

वर मोडक यांनी म्हटल्याप्रमाणेच वस्तुनिष्ठ मालिका.

उत्तम.

केशवसुमार's picture

9 Oct 2010 - 11:48 am | केशवसुमार

सर्व भाग एकत्र वाचले.. अप्रतिम लेखमाला
पवारशेठ..अभिनंदन आणि धन्यवाद..

राजेश घासकडवी's picture

9 Oct 2010 - 11:53 am | राजेश घासकडवी

शेवटच्या भागात माणेकशॉ एक व्यक्ती म्हणून समोर येतात. हा भाग आधी आला असता तर अधिक आवडलं असतं. पण हे अर्थातच छिद्रान्वेषण झालं.

अजून लिहा.

इन्द्र्राज पवार's picture

9 Oct 2010 - 12:43 pm | इन्द्र्राज पवार

"....पण हे अर्थातच छिद्रान्वेषण झालं...."

~~ तरीही एक मत म्हणून तुमचा विचार स्वीकार करण्याजोगा आहेच. पण झाले असे की, व्यक्तीगत जीवनातील माणेकशॉ यांच्यापेक्षा 'फिल्ड मार्शल' पर्यंतचा त्यांचा प्रवास कसा झाला यात अनेकांना रस वाटण्याची शक्यता मी गृहीत धरली होती, त्यामुळे आताचा हा 'शेवटचा' भाग खरे तर अगोदर तयारच होता [ड्राफ्ट स्वरूपात] पण प्रथम युध्द आणि शासन हा प्रवास झाल्यानंतरच खाजगी जीवनाकडे जाऊ असा निर्णय घेतला.

इन्द्रा

डॉ.प्रसाद दाढे's picture

9 Oct 2010 - 3:33 pm | डॉ.प्रसाद दाढे

अप्रतिम! संपूर्ण लेखमाला अतिशय राजबिंडी झाली आहे..सॅमबहादूरांप्रमाणेच!!

<<अप्रतिम! संपूर्ण लेखमाला अतिशय राजबिंडी झाली आहे..सॅमबहादूरांप्रमाणेच!!>> असेच म्हणतो.

कुसुमिता१२३'s picture

9 Oct 2010 - 3:43 pm | कुसुमिता१२३

खुप सुरेख लेखमाला आहे..खुप आवडली..
फि.मा.सॅम माणेकशाँ पुढे तर नतमस्तकच!

प्रिय इंद्रा-जी,
ही लेखमाला खरंच लाजवाब झाली आहे. माणेकशॉ यांच्याबद्दलची इतकी माहिती मला नव्हती. ते एक कुशल सेनाधिकारी होते इतकेच मला माहीत होते. 'बांगलादेश' विजयात तर त्यांचा सिंहाचा वाटा होता.
पण १९६२ साली झालेच्या त्यांच्या कौल यांच्या जागच्या नेमणूकीची माहिती मला नव्हती. ब्रह्मदेशातील त्यांच्या पराक्रमाचीही नव्हती. ती तुमच्या लेखाने झाली याबद्दलही आभार. त्यांचे त्यावेळचे (तुम्ही लेखात दिलेले) भाषण खरंच मस्त आहे. त्यांनी ले.ज. 'जग्गीं'चे क्रेडिट ओरपले नाहीं ही खरंच मोठी गोष्ट होती. सरकारी असो, कॉर्पोरेट असो वा सैन्यात असो, असे ज्याचे श्रेय त्याला देण्याचे मोठेपण फारच थोडे लोक दाखवितात हे मी पाहिले आहे त्यामुळे त्यांच्या स्वभावाचा हा पैलू फारच भावला.
तसेच पाकिस्तानी कमांडरची मर्सिडीज न वापरणे, शत्रूच्या मृत सेनाधिकार्‍यांच्या शवांना योग्य त्या इतमानाने पाठविणे, परतणार्‍या युद्धकैद्यांना स्टेशनवर जाऊन भेटणे यासारख्या छोट्या-छोट्या (मोठ्या) गोष्टीतून त्यांचा मोठेपणा छान दाखविला अहे तुम्ही.
साधारणपणे रोख-ठोक वागणारी व चमचेगिरी न करणारी माणसं दुर्दैवाने सरकार-दरबारी लोकप्रिय नसतात. माणेकशाँचेही असेच झाले असावे.
त्यांच्या नावाचा दुरुपयोग करून कुठल्याशा कंपनीने त्यांना Director Boardवर नेमून त्यांना गोत्यात आणले होते असेही वाचले होते, पण तो तिढाही शेवटी व्यवस्थितपणे सुटला.
मला अब्दुल कलाम यांच्याबद्दल अतोनात आदर आहे. पण त्यांनी जातीने लक्ष घालून माणेकशाँना सव्वा कोटी रुपयांचा चेक देवविला हे मला माहीत नव्हते व ते तुमच्या लेखातून कळल्यावर माझा कलाम यांच्याबद्दलचा आदर अनेक पटींनी वाढला.
त्यांच्यासाठी गुरखा रेजिमेंटने खास मार्चिंग ट्यून बनवणे हेही हृदयस्पर्शी आहे. कुणाचा हुकूम नसताना आपल्या स्वत:च्या स्फूर्तीने असा मान किती लोकांना मिळतो?
करण थापरसारख्या करंट्या व्यक्तीकडे काय लक्ष द्यायचे?
इंदिरा गांधी या आपल्या देशाला मिळालेल्या एकुलत्या एक 'खर्‍या' नेत्या होत्या असे माझे बर्‍याच वर्षांपासूनचे मत आहे. (त्यानंतर नंबर मारतात नरसिंह राव). त्यांनी पुढाकार घेऊन मधले काटे बाजूला करून त्यांना फील्डमार्शलची पदोन्नती दिली यातही तेच नेतृत्वाचे गुण दिसतात!
जसे कारगिलच्या युद्धाच्या १०व्या वर्षगाठीला कुणीही नेता गेला नाहीं त्याच प्रमाणे माणेकशाँच्या अंत्यविधीला कुणीही राजकीय नेता गेला नाहीं. पंतप्रधान, सोनियाताई, उपराष्ट्रपती, संरक्षणमंत्री हे तर गेले नाहींतच पण कमांडर-इन-चीफ असलेल्या प्रतिभाताईही गेल्या नाहींत. एवढेच काय तर विरोधी पक्षनेते (पोपु) आडवाणीही गेले नाहींत. हे खरेच निषेधार्ह आहे. मी याबाबत प्रतिभाताईंना (नेहमीप्रमाणे) निषेधाचे पत्रही लिहिले होते. पण त्याला (नेहमीप्रमाणेच) उत्तर आले नाहीं हा भाग अलाहिदा.
हा लेख लिहिण्यासाठी आपल्याला उद्युक्त केल्याचा उल्लेख करायची गरज नव्हती, पण तसे मी केले याचा मला तुमची लेखमालिका वाचल्यावर आनंदच वाटला.
शेवटी फी.मा. माणेकशाँना एक आदरपूर्ण कडक 'सॅल्यूट'!
(थोडेसे विषयांतरः १५ ऑगस्ट/२६जानेवारीला आपल्या दूतावासात होणार्‍या स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात /प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात हजर रहाणार्‍यां आम्हा जकार्ताकरांना राष्ट्रपतींच्या भाषणाची प्रत मिळते. कलाम यांच्या पाच वर्षांच्या कारकीर्दीतील त्यांच्या प्रत्येक भाषणाची प्रत (quality) इतकी उच्च होती कीं त्याच्या तूलनेने आधीच्या व नंतरच्या राष्ट्रपतींची भाषणे अगदीच किरकोळ वाटतात.)

इन्द्र्राज पवार's picture

9 Oct 2010 - 8:29 pm | इन्द्र्राज पवार

"....शेवटी फी.मा. माणेकशाँना एक आदरपूर्ण कडक 'सॅल्यूट'!...."

श्री. सुधीर जी....
~ मला फार आनंद झाला तुमची अशी ही सविस्तर प्रतिक्रिया वाचून. खरे तर पहिल्या लेखात म्हटल्याप्रमाणे तुम्ही तिघा-चौघांनी सुचविले म्हणून माझ्याकडे अगोदरच तयार असलेल्या माहितीत भर घालून ही मालिका तयार केली इतकेच, त्यामुळे याला जो काही (अर्थात सर्वांनीच स्वागत केले आहे) प्रतिसाद मिळाला त्याचे श्रेय तुम्हाला नक्कीच आहे.

अजून दोन-तीन लेख होतील इतके मटेरियल (फोटोसहीत) माझ्याकडे तयार आहे, इतका प्रचंड कॅनव्हास आहे फिल्ड मार्शल सॅमबहादूरसाहेबांचा. किती लिहावे, कोणते ठेवावे...यावर विचार करे करे पर्यंत पाच लेख झाले. अर्थात एखादी लेखमाला कितीही पसंत पडली तरी तिलाही कालमर्यादा असणे क्रमप्राप्त आहेच. पुढे केव्हातरी या निमित्ताने आणखीन काही लिहिता आले तर मला जरूर लिहायला आनंद होईल, आणि तद्वतच तुमच्यासारख्या जाणकारांना वाचायलाही आनंद होईल.

तुम्ही कलामसाहेबांच्यासंदर्भातील लिहिलेली भावना इतकी सच्ची आहे की ते माझ्याही मनाचे प्रतिक आहे. काही काही वेळा मला वाटते की, समजा एपीजे अब्दुल कलाम नावाची व्यक्ती भारताच्या राष्ट्रपतीपदी आली नसती तर तो 'चेक' निघाला असता? कलामांनी सन २००४ ला ती केस आपल्या हाती घेतली पण तरीही त्याच्या अंमलबजावणीला २००७ चा नोव्हेम्बर उजाडावा लागला. हे एका राष्ट्रपतीकडून आलेल्या फाईलबाबत होते तर सर्वसामान्यांना दिल्लीच्या त्या प्रचंड जंजाळात काय स्थान असेल याची पुसटशी का होईना कल्पना येते. असो ~ ज्याच्या शेवट भला ती कथाही भली, असेच काहीतरी त्या एरिअर्सबाबत म्हणू या.

सॅम यांच्या आठवणीविषयी तर काय सांगायचे? शंभर पाने लिहिता येतील, वेगवेगळ्या सहकार्‍यांनी, बरोबर काम केलेल्यांनी, त्यांना ओळखणार्‍यांनी....किंवा प्रत्यक्ष न ओळखणार्‍यांनीदेखील सांगितलेल्या. खट्याळ तर ते किती होते.....याबद्दलचे किस्से तर अतोनात आहेत....काही तर शासकीय पत्रव्यवहारातून देखील. सर्वच इथे देता येत नाहीत.

निगेटिव्ह विचारसरणीचा त्यांना खूप संताप येत असे. मिलिटरी ट्रेनिंग कॉलेजमध्ये 'वॉर स्ट्रॅटेजी' शिकविताना 'मॉक वॉर प्लॅन' बनविला जातो. मोठ्या अशा टेबलवर युध्द चढाईची आखणी केली जाते. एकदा अशाच एका लेक्चरच्या वेळी गेस्ट म्हणून ते आले असताना एका लष्करी ऑफिसरला त्यांनी 'अमुक एका दिशेने चढाई केल्यास तुझ्या तुकडीला यश मिळेल का?' असे विचारले असता, तो ऑफिसर उत्तर देवू लागला, 'वेल, सर, आय डोण्ट थिंक, व्हेदर....". सॅमबहादुरांनी त्याला तिथल्या तिथे चापले. "स्टॉप इट, नेव्हर यूज 'आय डोण्ट थिंक' इन युवर रिप्लाय चॅप.. ऑल्वेज स्टार्ट विथ 'आय थिंक....".

सल्युट, अशा पॉझिटीव्ह विचाराच्या सेनानीला !

इन्द्रा

विलासराव's picture

9 Oct 2010 - 8:47 pm | विलासराव

इंद्रा.
खुपच माहिती आनि अभ्यासपुर्ण लेखमाला.

नगरीनिरंजन's picture

10 Oct 2010 - 10:25 am | नगरीनिरंजन

सर्वांगसुंदर लेखमाला!
कोणत्याही देशभक्तीच्या लंब्याचवड्या गप्पा न मारता आपल्या कामावर श्रद्धा ठेवणार्‍या आणि आपल्या सहकार्‍यांनाच काय तर शत्रुंनाही सभ्यतेने वागवणार्‍या या खर्‍या अर्थाने सुसंस्कृत आणि पराक्रमी सेनानीचा परिचय मनाला फार भिडला. अशा व्यक्तींचा आदर्श घेऊन प्रत्येकानेच जर आपापल्या क्षेत्रात सर्वोत्तम तेच देण्याचा आणि इतरांशी माणुसकीने वागण्याचा प्रयत्न केला तर प्रगती व्हायला कितीसा वेळ लागणार? दुर्दैवाने तुम्ही अधोरेखित केल्याप्रमाणे समाजातील काही स्वार्थी आणि संधीसाधु लोकांमुळे अशा नररत्नांसही त्रास सहन करावाच लागतो.
असो.
लेखाचे सर्व भाग दोन-तीनदा वाचले. कुठेही व्यक्तिपूजेचा दर्प न येऊ देता तुम्ही अतिशय संयत भाषेत फिल्ड मार्शल सॅम माणेकशाँचे चरित्र थोडक्यात पण रंजकपणे मांडलेत. त्यात दिलेले विविध संदर्भ आणि छायाचित्रे यावरून तुम्ही या लेखासाठी घेतलेली मेहनत दिसते आणि वाचकाना जास्तीतजास्त सत्य माहिती देण्याची तळमळही दिसते.
सॅम बहादूरांबरोबरच तुम्हालाही सलाम.

सुधीर कांदळकर's picture

4 Apr 2014 - 6:56 am | सुधीर कांदळकर

अर्थातच आवडली. १९७१ साली मी १९ वर्षांचा होतो. म्हणजे माणेकशांबद्दल माझ्या मनात काय भावना असतील ते सांगायला नकोच. वाचतांना च्यक्तीपूजेचा दर्प तसा फारसा आला नाही. विषयमूर्तीच्या विरुद्ध जाणारी बाजू पण आलेली आहे. भाषणाच्या तू-नळीवरच्या चित्रफितीतून ऑपरेशन ब्लू स्टार वर माणेकशांनी केलेली टीका तशी चुकीचीच. देशापुढे धर्माची भीड ठेवता नयेच. वाचतांना साहजिकच थोरातांचे चरित्र आणि रोझेस इन डिसेंबर - ले. छागला या दोन पुस्तकांची आठवण झाली.

थोरांतांची एक आठवण लिहितो. बहुधा - इंग्लंडमधल्या मिलिटरी अकॅडमीत. विद्यार्थ्यांनी वात्रटपणा म्हणून तलावातया होड्या बुडवल्या. प्राचार्यांनी विचारले की कोणी बुडवल्या. कोणी उभे राहिले नाही. उद्या देशाचे सरसेनानी होणार्‍यांच्या अंगी फालतू शिक्षेच्या भीतीने एवढेसे सत्य सांगण्याचे देखील धैर्य नाही अशी निर्भर्त्सना करून काय तुम्ही देशाच्या सैन्याला नेतृत्व देणार असा प्रश्न केला. तेव्हा ते वीर प्रामाणिकपणे उभे राहिले आणि ४ अंश सें तापमानात पाण्याखाली बुडी मारून त्या होड्या वर काढण्याची शिक्षा देखील भोगली.

माणेकशा, थोरात आणि छागला यांच्या देशप्रेमाची जातकुळी वेगळी असली तरी देशाभिमान तोच आहे.

असो. माणेकशांपाठओपाठ लेखकमहोदयांना कडक मानवंदना ऊर्फ सॅल्यूट. एक सुरेख लेखमाला उचित प्रसंगी वाचायला दिल्याबद्दल संपादकमंडळाचे देखील अभिनंदन.

मदनबाण's picture

4 Apr 2014 - 1:09 pm | मदनबाण

सुरेख लेखन...

या निमित्त्याने आपल्या देशाची सध्याची सुरक्षा व्यवस्था आणि परिस्थीती याचा विचार केला असता ती फार भयावह असल्याचे चित्र नजरे समोर उभे झाले.
एका पाठोपाठ पाणबुड्यांचे अपघात झालेले आपण पाहत आहोत आणि सागरी सुरक्षेला त्याचा बसलेला भयानक धक्का हा सुरक्षेच्या दॄष्टीकोनातुन आणि मनोधर्याला विचलीत करणारा आहे, तसेच मागच्या आठवड्यात एअर फोर्सचे C-130J Super Hercules ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट कोसळले आणि त्यातील २ विंग कमांडर, २ स्कार्डन लिडर आणि एक क्रु मेंबर असे धरुन ५ जण ठार झाले. या विमानाची अंदाजे किंमत रु ९६० कोटी इतकी आहे.इंडियन एअर फोर्स नी अशी ६ विमाने $1.2 billion च्या कॉन्ट्रॅक्ट मधे २०११ {२००८ साली करार झाला} साली आणली होती त्यातलेच एक हे विमान होते.तुम्हाला मध्यंतरी चीन ने दौलत बेग ओल्डी मधे घुसखोरी केली होती ते आठवत असेलच, त्या वेळी तिथल्या कठीण वातावरणात C-130J Super Hercules उतरवले गेले होते.बाकी फायटर प्लेन कोसळुन वैमानिक ठार होण्याच्या घटना आणि बातम्या आपल्या देशाला नवीन नाही ! :( Lockheed Martin ही कंपनी C-130J Super Hercules हे विमान बनवते आणि त्यांनी आता त्यांचा इंडियन एअरफोर्सशी असलेला कॉन्ट्रॅक्ट संपल्याचे सांगितले आहे,त्यामुळे आता ट्रेनिंग कोण देणार ? अपघात ग्रस्त विमानाचा फ्लाईट डेटा आणि कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डर क्षतीग्रस्त झाल्याचे समजते आणि ते तपासणीसाठी अमेरिकेला पाठवण्यात आले आहे.या बद्धल माहिती येणार्‍या काळात कळेलच.
आता आपल्या टेलिकॉम सेक्टरचा विचार करु या... इथेही सगळी बोंबाबोंबच आहे.
२८ ऑगस्ट २००८ मधे टेलिकॉम मिनिस्ट्रीच्या कॉन्फरन्स मधे चीनकडुन टेलिकॉम क्षेत्रात पुरवल्या जाणार्‍या सामुग्रीवर चर्चा झाली होती आणि त्यात धोका आहे हे समजले होते.याचा डिफेन्स सिक्युरिटीला मोठा फटका बसु शकतो आणि म्हणुन बीएसएनलच्या चायनीज सप्लायर्स कडुन पुरवण्यात येणार्‍या सामानावर बंधन घालण्यात आले.इतके असुन सुद्धा Huawei and ZTE या चायनीज कंपन्यांना बीएसएनल कडुन टेलिकॉम कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले आणि याचा व्हायचा तोच परिणाम झाला तो म्हणजे बीएसएनलचे हॅकिंग ! कोणी केले ? तर Huawei ने. नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल {एनएसी} यांनी Huawei and ZTE या दोन्ही कंपन्यांचे चायनिज मिलेटरीशी संबंध आहेत अशी सुचना आणि इशारा आधीच दिला होता तरी सुद्धा हॅकिंग झालेच.
अशीच बिकट अवस्था आपल्या पावर ग्रीडची,ऑइल फिल्डची आणि अणुभट्ट्यांची सुद्धा आहे,तुम्हाला आठवत असेल तर पहा, की २०१२ साली देशातले नॉर्दन आणि इस्टर्न पावर ग्रिड कोलॅप्स झाली होती,३० आणि ३१ जुलैला झालेल्या ब्लॅक आउट मुळे देशातल्या जवळपास अर्ध्या लोक संख्येला विजे शिवाय रहावे लागले,लाखो लोक रेल्वे मधे अडकुन पडले होते. त्यामागे वेगवेगळी कारणे दिली गेली.परंतु याच्या मागे खरे कारण STUXNET व्हायरस होता असे म्हंटले जाते.
हाच व्हायरस नंतर गुजरात आणि हरियाणा इलेक्ट्रीक बोर्डात तसेच ओएनजीसीच्या ऑफशोअर ऑइल रिग मधील कंप्युटर्स मधे देखील आढळला ! नशिबाने तो अ‍ॅक्टीव्हेट झाला नाही, नाही तर देशाच्या पावर सेक्टरची काय अवस्था झाली असती याचा विचार करुन पहा.
थोडक्यात पाहता आपण आणि आपले सरकार सुरक्षतेच्या बाबतीत पूर्णपणे गाफिल आहोत आणि येणार्‍या काळात आपल्या देशाला याचे परिणाम भोगायला लागतील.

जाता जाता :- पाणबुड्यांच्या दुर्घटने नंतर नौदल प्रमुख डी.के जोशी यांनी राजिनामा दिला,आणि लुंग्या अँटोन्याने तो लगेच स्विकारला ! खरे तर रक्षा मंत्री म्हणुन जवाबदारी या लुंग्याची नाही का ? मग त्यांनी राजिनामा का दिला नाही ? कारण यांची कुठलीच जवाबदारी घेण्याची क्षमताच नाही,यांना फक्त खुर्ची महत्वाची.

काही वाचनिय संदर्भ :-
IAF C-130J Super Hercules cargo plane crash kills 5
Foreign Market Access Report 2010 {पीडीएफ, पान क्रमांक ३३}

Chinese firm Huawei allegedly hacked BSNL network: Govt

Govt to probe if Huawei hacked into BSNL network

'Indian Government should consider banning Chinese imports in telecom sector'

India on the Grand Geopolitical Energy Chessboard – Part I

Stuxnet attack wakes India up to threat to critical infrastructure

Guest Column: Indian Blackout - Some legal perspectives

शिलेदार's picture

4 Apr 2014 - 3:51 pm | शिलेदार

कडक सॅल्युट....
Salute

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Apr 2014 - 6:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर लेखमालिका... एका बैठकीत सर्व भाग वाचून काढले.

चांगली आणि खरी देशभक्त माणसं आपण भारतिय नेहमीच पटकन विसरून जातो... दु:खद पण सत्य ! :(

वाडीचे सावंत's picture

4 Apr 2014 - 8:26 pm | वाडीचे सावंत

खुप सुरेख लेख इन्द्रा

नरेश माने's picture

1 Oct 2015 - 11:53 am | नरेश माने

खुप छान आणि माहितीपुर्ण लेखमालिका.

हेमंत लाटकर's picture

2 Oct 2015 - 10:41 am | हेमंत लाटकर

लेखमाला खुप आवडली