प्रतिष्ठा
निष्ठेला लावून तिष्ठा, बघ राज्य करी प्रतिष्ठा |
ही वसते सर्व जनात
करी जागृत 'अहं' क्षणात
राखाया मर्जी हिची
ना स्वकीयांची ही क्षिति ||१||
हे मित्र होते हो कधी
पण आली प्रतिष्ठा मधी
आज नजरेत यांच्या गरळ
एक शब्द ही न ये सरळ ||२||
उन्मत्त गर्व अन माज
हे स्तवन शब्द ही धरी
वाढवी वर्चस्व भू-वरी
तडतडा तांडव करी ||३||
चालता तुम्ही आदर्शे
ही हळूच तुम्हा चिकटते
आल्हादे मोह पाडुनी
ती अधिकृत ठाण मांडते ||४||
मग आदर्श हो दुय्यम
अन करिती जन तडजोड
कसे चिकटता तिज तुम्ही
हे सुटत नसे हो कोड ||५||
साऱ्या आयुष्याचा खेळ
मोडते एका घडी
लावीन सर्व मी पणाला
पण प्रतिष्ठा आहे बडी ||६||
वावरते राजकरणी
नेस्तनाबूत करी घराणी
किती बळी लेकी बहिणी
तरी संपे न ही कहाणी ||७||
घ्या दाखला हा पुराणी
हा राम असे की कुणी
हा प्रश्न मनाला पडे
जाती विश्वासा तडे ||८||
राखण्या प्रतिष्ठा रामराज्याची
हा क्षणात निर्णय घडे
दिली अग्निपरिक्षा जीने
गर्भिणी वनवासी पडे ||९||
धन दौलत ही तुडवीते
न्याय देऊन ही रडविते
उंच आभाळी चढविते
तोफे तोंडी ही उडविते ||१०||
आहे लक्षण स्व-भक्षण
दुज्याची करून धुळधाण
एकाच्या अंकी चढे
हिज वाचून सारे अडे ||११||
निष्ठेला लावून तिष्ठा, बघ राज्य करी प्रतिष्ठा |
अपर्णा
" width="300" height="300" alt="" />
प्रतिक्रिया
5 Oct 2010 - 2:19 pm | दत्ता काळे
कविता आवडली.
ह्यावरुन एक गाणे आठवलं. नीटसे पूर्ण आठवत नाही, परंतु त्यातल्या ध्रुपदातले शब्द असे होते :
'अशी हि थट्टा, भल्या भल्यांना लावीते बट्टा'
5 Oct 2010 - 2:33 pm | विसोबा खेचर
छान कविता..
तात्या.
--
मिथुनदा अंमळ चिंताग्रस्त वाटताहेत, पण मुनमुन मात्र सुखाने विसावली आहे त्यांच्यावर!
7 Oct 2010 - 7:36 am | पाषाणभेद
तात्या रंगीत चित्र द्या हो!
मुनमुन जास्त नाटकी वाटते आहे. मिथून्दा चे दिसणे नैसर्गीक आहे. रोते क्यूं सुरत वैसी!
5 Oct 2010 - 2:35 pm | मोहन
असेच म्हणतो.
7 Oct 2010 - 7:33 am | पाषाणभेद
मनाची उलाघाल समजली.