पुण्यातली बुधवार पेठ 'अनेक गोष्टींसाठी' प्रसिद्ध(!) आहे.याच वस्तीतल्या लोकांशी माझा अगदी जवळचा सबंध आलेला आहे त्याविषयी थोडंसं....
२००६ सालची गोष्ट्,पुण्यातल्या माझ्या एका ओळखीतल्या एका गृहस्थांनी 'मामाचं गाव' असा एक उपक्रम राबवला होता. कुणासाठी? तर ज्या मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीत जायसाठी मामाचं गावच नाही अशां मुलांसाठी. ही मुलं कोण? तर बुधवार पेठेतल्या वेश्याव्यवसाय करणार्या स्त्रियांची!
ही मुलं ८ दिवस रोज सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यंत आमच्याकडं येत. त्यांना रमवण्यासाठी आम्ही रोज वेगवेगळे खेळ्,चित्रकला,मातीकाम इ. गोष्टी करायचो.त्यातच एके दिवशी ज्या संस्थेतर्फे ही मुलं आमच्याकडं येत त्यासंस्थेच्या ताई आमच्याकडं आल्या,त्यांच्याशी गप्पा मारताना या मुलांबद्दलच्या अनेक गोष्टी कळत गेल्या.
या मुलांच्या आयांचा वेश्याव्यवसाय हाच मुख्य पेशा होता. त्यांबद्दल बोलताना ताई म्हणाल्या,"अरे ज्या खाटेवर यांच्या आया गिर्हाईकांबरोबर असतात्,त्याच्याच खाली यातली लहान मुलं झोपलेली असतात." माझ्या अंगावर सर्रकन काटा आला,एवढं उघडं वाघडं सत्य माझ्या मुर्दाड मनालासुद्धा पचलं नाही. अशा अनेक गोष्टींतून्,मुलांच्या सहवासातून त्यांच 'जिणं' माझ्यासमोर उलगडत गेलं.
शेवटच्या दिवशी मी ताईंना विचारलं,"ताई , मी तुम्हाला काय मदत करू? (आर्थिक सोडून ! त्यावेळी माझाच पडता आणि बेकारीचा काळ सुरू होता.) ताई म्हणाल्या तुला काय जमेल द्यायला? मी म्हणालो सध्या फक्त वेळ ! मग जरा चर्चा करून मी ८वी-१०वीच्या मुलांना सकाळच्या वेळेत शिकवावं असं ठरलं.(८वी-१०वीची मुलं बाहेरच्या शाळेत जात्,संस्थेची शाळा १ली - ७ वी पर्यंतच)
आजकालच्या मुलांना पहीली दुसरी पासूनच ट्युशन लावतात्,पण यातल्या १०वीच्या मुलांनासुद्धा ते परवडायचं नाही. मग त्यांच्या शाळेआधी त्यांना गणित्,ईंग्लिश्,सायन्स(जवळ्पास सगळेच विषय थोडेफार) शिकवायची जबाबदारी मी घेतली.
शाळा सुरू झाल्यावर मंडईतल्या एका केळांच्या भट्टीच्या मागच्या बाजूला असलेल्या शाळेत आमचे सकाळचे वर्ग सुरू झाले.या मुलांच्यात शिकायची प्रचंड तळमळ होती. शिकवता शिकवता त्यांच्याशी माझी मैत्रीच होउन गेली. सकाळी ०८.३० ते ११ पर्यंत आमचे वर्ग चालायचे,आम्ही सगळेच बरोब्बर साडेआठाला हजर व्हायचो. कधीतरी एखादा/एखादी वेळानं यायचे,वेळ का झाला? म्हणून विचारलं तर रात्री २वा.,३वा झोपलो असं उत्तर मिळायचं.(कारणं ही वाढलेली मुलं आईच काम पूर्ण झाल्याशिवाय घरात झोपायलाच यायची नाहीत)
स़काळचा क्लास ११.०० वा संपला की ही मुलं शाळेला जायला निघायची. त्यांना डबा वगैरे चैनी माहीतच नव्हती,घरातनचं ५-१० रु. मिळायचे.(१ली - ७वीच्या मुलांना मात्र शाळेत जेवण मिळायचं) आणि रात्रीच जेवण म्हणजे आम्लेट्,बुर्जीपाव इ.
एका शनिवारी या मुलांच्या पालकांच्या(!) भेटीचा कार्यक्रम होता,मलाही बोलावलं होतं. तेंव्हा या मुलांच्या आयांना भेटायचा भेटायचा योग आला. अगदी साध्या साड्यात,किंचीत सुजलेल्या डोळ्यांच्या,अशा त्या सभेला आलेल्या होत्या. माझं फारसं काही काम नव्हतं,पण तरीही सगळ्या माझ्याशी २-२ शब्द बोलल्या,मीपण बोललो.
थोडे दिवसांनी श्रावणात आमच्या वर्गातल्या मनोजच्या घरी सत्यनारायणाची पूजा होती,सगळ्यांना आमंत्रण होतं,बाकी सगळे सकाळी जाणार होते,पण मला जमणार नव्हतं,मी संध्याकाळी यायचं कबूल केलं. संध्याकाळी ७च्या सुमाराला मला न्यायला शाळेपाशी मनोज्,बंडु,शंकर्,दीपक असं मित्रमंडळ हजर होतं.
मंडई ओलांडून,बुधवार पेठेतल्या अरूंद आणि गर्दीनं भरलेल्या रस्त्यानं आम्ही निघालो. रस्त्यात आम्लेट्,वडापाव इ.च्या गाड्या ,पानपट्ट्या,बाजूला दारूचं दुकानं अशा एका मोडक्या चाळीसारख्या इमारतीच्या पायर्या चढून आम्ही दुसर्या मजल्यावर गेलो. जिन्यातच पायर्यांवर उभारलेल्या गिर्हाईकांशी,आपसात गप्पा मारणार्यांना चुकवत, मनोजच्या खोलीच्या दाराशी पोचलो. बाहेरच्या गॅलरीत अनेकजणी मेकप करून्,गुटखा पान चघळत उभ्या होत्या.
खोलीच्या आतलं वातावरणं मात्र पूर्ण वेगळं होतं.एकच खोली पण अगदी लख्खं. एका कोपर्यात पूर्व पश्चिम बघून पूजा मांडलेली. एका कोपर्यात स्टोव्ह. एका कोपर्यात छोटी न्हाणी त्याला पडद्याचा आडोसा. एक कॉट व त्यावर बैठक.
मी गेलो,बसलो. मनोजची आई हसतमुखानं समोर आली,विचारपूस केली. मी उठून दर्शन घेतलं,तिर्थप्रसाद घेतला. स्टोव्हवरच्या उकळत्या मसाले दुधाचं एक भांड्भरून माझ्यासमोर आलं. बाहेर खिडकीतनं,गॅलरीतनं अनेक डोळे कुतुहलानं आमच्यावर खिळलेले.
मी दुध पिताना मनोजच्या आईनं त्याच्या अभ्यासाविषयी चौकशी केली,बाकीच्या मुलांच्या आयासुद्धा आल्या.मनोजच्या आईच्या 'मावशीबाई' सुद्धा येउन गेल्या. मग मुलांच्या अभ्यासाबरोबरचं माझीसुद्धा चौकशी झाली. घरी कोण कोण ? असे प्रश्न झाले. त्यांच्या बोलण्यातून मला 'आपल्या जगाविषयी' असलेली त्यांची उत्सुकता जाणवत होती.
तासभर गप्पा झाल्यावर मी जायला निघालो,मनोजच्या आई मला डोक टेकवून पाया पडल्या,पाठोपाठ मुलंही. मला अगदी बावरून गेल्यासारख्म झालं,मग एका वारकर्यानं दुसर्या वारकर्याच्या पाया पडावं तस मीही त्यांना नमस्कार केला.तो नमस्कार मी त्यांच्या मनाच्या पावित्र्याला होता.
जाता त्यांनी मला ५१ रु. दिले,म्हणाल्या पुढच्या वेळेला कोल्हापूरला जाल तेंव्हा अंबाबाईची ओटी भरा !
आता मी सुद्धा माझ्या व्यापात अडकलो,घर बदललं तस शिकवायला जाणंही सुटलं. पण अजूनही रस्त्यात कॉलेजला जाणारी ही मुलं भेटतात्,एखाद्या राणीचा,पुनमचा कॉईन बॉक्सवरून फोन येतो,२-५ रुपये खर्च करून त्या माझ्याशी बोलतात.यांच्या हसर्या चेहेर्यामागं अनेक कथा आणि व्यथा दडलेल्या असतात्,त्यांच्याविषयी परत कधीतरी !
प्रतिक्रिया
16 Sep 2010 - 8:27 pm | बेसनलाडू
लेख आवडला. हे विश्व चटका लावून जाणारे, अस्वस्थ आहे, हेच खरे. पण असे असतानाही सत्यनारायणादी पूजेसारख्या प्रसंगांवेळी या विश्वात जाणवणारा साधेपणा, पापभीरू/देवभोळेपणा (मनोजच्या आईने तुमच्या (मास्तरांच्या) पाया पडणे, अंबाबाईची ओटी भरा सांगणे इ.) लेखातील वर्णनातूनही जाणवला. तात्यांच्या 'धूपार्तीचा भिक्षुक' या लेखनातूनही असेच काही जाणवले होते.
(अस्वस्थ)बेसनलाडू
16 Sep 2010 - 8:38 pm | Pain
पुण्यात कर्वे रस्त्यावर मानव्य म्हणून एक संस्था आहे. ते लोकही अशा मुलांना सांभाळण्याचे काम करतात. लहानपणी शाळेत असताना (बहुदा सातवीत असताना) एखाददोन वेळेला आम्हाला त्यांना भेटायला, त्यांच्याशी खेळायला गेलो होतो.
शिवाजी रस्ता किंवा तिथे कुठेतरी एका बाईंचे (बहुदा विजयाताई) यांचे घर आहे, त्याही असेच काम करतात. तिकडेही गेलो होतो.
त्यापैकी काहींना त्यांची काहीही चूक नसताना एडस् झाला आहे. एकूणच त्या सगळ्यांबद्दल खूप वाईट वाटले आणि तेच विचार डोक्यात सतत राहिल्याने त्यांच्याशी खेळण्यात किंवा इतर चित्रे काढण्यात वगैरे, मनाने पूर्णपणे सहभागी होउ शकलो नाही :(
16 Sep 2010 - 9:05 pm | पारुबाई
तुम्ही शिकवुन वेळ सत्कारणी लावलात.
तुमचे अभिनंदन.
16 Sep 2010 - 9:06 pm | रेवती
हे असं वाचल्यावर मनाला त्रास होत राहतो.
तरीही लेख आवडला.
तात्यांचा नुकताच येउन गेलेला लेख आठवला.
तोही आवडला होता.
दोन्ही लेखातलं साम्य म्हणजे पुजेच्यावेळेस राखलेले पावित्र्य!
इतकी मनोभावे पुजा आपल्याला कितीवेळा करणे जमते?
17 Sep 2010 - 12:03 am | संदीप चित्रे
>> दोन्ही लेखातलं साम्य म्हणजे पुजेच्यावेळेस राखलेले पावित्र्य!
इतकी मनोभावे पुजा आपल्याला कितीवेळा करणे जमते?
असेच म्हणतो.
अस्वस्थ करणारा लेख !
16 Sep 2010 - 9:12 pm | अडगळ
जाता त्यांनी मला ५१ रु. दिले,म्हणाल्या पुढच्या वेळेला कोल्हापूरला जाल तेंव्हा अंबाबाईची ओटी भरा>>>
हे वाक्य फार अस्वस्थ करुन गेलं.
ओटी भरणं हा सवाष्णीनं सवाष्णीला द्यायचा मान(असं म्हणतात). इथं एक वेश्या अंबाबाईची ओटी भरायला सांगत आहे.
कुठला जीव कशावर आशा ठेवून जगंल काय माहीत .
16 Sep 2010 - 9:29 pm | धमाल मुलगा
वेश्येला 'अखंडसौभाग्यवती' म्हणलं जातं. पुर्वी म्हणे, वर्षातल्या कोण्या एके दिवशी घरोघरच्या घरंदाज बायका वेश्यांकडे जाऊन त्यांच्याकडचं कुंकू घेऊन यायच्या.
16 Sep 2010 - 9:14 pm | जिप्सी
खरं आहे रेवतीताई !
मला त्यावेळेला ग.दि.मां.ची जोगिया ही कविता आठवली होती !(त्या कवितेचा संदर्भ वेगळा आहे,पण अगदी तसंच पावित्र्य आहे!)
16 Sep 2010 - 9:26 pm | धमाल मुलगा
साला हा जोश्या आपला दोस्त आहे ह्याचा नेहमीच अभिमान वाटतो.
अशी कामं करणार्यांबद्दल बोलायला आमच्या दरिद्री शब्दसंग्रहाची कुवतच थिटी पडते.
हा जोश्या काय, तो मनिष काय, प्रसन्नदा काय.....सालं काय काय सोन्यासारखी माणसं भेटवली मला नशिबानं.
येड्यांनो, माझ्यासारख्या माणसाच्या भाषेत सांगायचं तर तुम्ही देवदूत आहात रे.
अवांतरः सायबा, रोज भेटायला येणार्या मित्रांमध्ये जो उशीरा येईल त्याला दंड करुन त्या दंडाची रक्कम कुठे वापरली जायची ते नाही सांगितलंत.
दोस्ताहो, हे सगळे मित्रलोक, ठरल्या वेळी भेटायला यायला ज्याला उशीर होईल त्याकडुन दंड वसुल करायचे आणि त्या दंडाचे सग़ळे पैसे एकत्र करुन त्या शिकवणीतल्या मुलांसाठी वह्या-पुस्तकं पेनं वगैरे घेऊन द्यायचे....हे कधी? तर बेकारीच्या काळात.
16 Sep 2010 - 9:31 pm | Pain
दोस्ताहो, हे सगळे मित्रलोक, ठरल्या वेळी भेटायला यायला ज्याला उशीर होईल त्याकडुन दंड वसुल करायचे आणि त्या दंडाचे सग़ळे पैसे एकत्र करुन त्या शिकवणीतल्या मुलांसाठी वह्या-पुस्तकं पेनं वगैरे घेऊन द्यायचे....हे कधी? तर बेकारीच्या काळात.
बापरे
16 Sep 2010 - 11:51 pm | श्रावण मोडक
कधी भेट घालून देतोस?
लेखनावरची हीच प्रतिक्रिया आहे!
17 Sep 2010 - 2:09 am | प्राजु
अशक्य आहेत ही माणसे!!
लेख फार चटका लावून गेला..
17 Sep 2010 - 2:14 am | टिउ
क्या बात है! मस्त रे जिप्सी...सलाम!!!
16 Sep 2010 - 9:36 pm | जिप्सी
बेकारीचा काळ सुखाचा ! (बालपणीचा काळ सुखाचाच्या चालीवर) , फार फार शिकवलं त्याकाळानं ! टाईम्स ऑफ इंडिया साठी दारोदार जाउन सर्व्हे आणि मार्केटिंग केलेलं आहे,फोटोफास्ट्मध्ये होतो,काय काय केलं ! त्याकाळात सांभाळलं मित्रांनी आणि आमच्या राजगडानं !
17 Sep 2010 - 5:29 am | चित्रा
जरूर लिहा.
अनुभव उत्तमच, लिहीण्याची साधी शैली आवडली.
17 Sep 2010 - 11:13 am | सहज
हेच म्हणतो.
अजुन लिहा.
लेख आवडला.
16 Sep 2010 - 10:34 pm | बिपिन कार्यकर्ते
चटका!
16 Sep 2010 - 10:40 pm | शिल्पा ब
काही झाले तरी हीसुद्धा माणसेच आहेत हे लक्षात ठेवलेच पाहिजे...
५वी ते ७वी माझ्या वर्गात कामाठीपुर्यातली एक मुलगी होती...माझी छान मैत्रीण होती...दोन चार वेळेस तिच्या घरी जाऊन खेळणे वगैरे झाले होते...त्यावेळेस काही काळात नव्हते.
बहुतेक तिच्या घरचे या व्यवसायात नसावेत पण तरीही वातावरण तेच तर होते..तिने पुढे शिक्षण वगैरे घेतले असावे अशी इच्छा..
या विषयावरचे लेखन अस्वस्थ मात्र करते.
16 Sep 2010 - 11:08 pm | मेघवेडा
तुमच्यासारखी माणसं या समाजात आहेत हे या समाजाचं भाग्यच खरं जिप्सीबुवा! :)
16 Sep 2010 - 11:41 pm | प्रभो
वेड्यासारखेच म्हणतो.. :)
16 Sep 2010 - 11:22 pm | धनंजय
असेच लिहा, ही विनंती.
16 Sep 2010 - 11:26 pm | चिगो
खरोखर मनापासून सलाम... साला, अशी माणसं आहेत म्हणून माणुसकी टिकून आहे. आणि तो दंडाच्या रकमेचा तपशिल तर आणखीच चटका लावणारा.
16 Sep 2010 - 11:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अस्वस्थ करणारा अनुभव....! सर्वत्र वाईटच चालले आहे असे दिसते, नेहमी तसेच बोलल्या जाते.
अशावेळी अशा अनुभवांपुढे, अशा कामांपुढे केवळ नतमस्तक व्हावे...!!!!
-दिलीप बिरुटे
16 Sep 2010 - 11:37 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
दंडवत!
16 Sep 2010 - 11:53 pm | मी-सौरभ
दंडवत
17 Sep 2010 - 12:12 am | नंदन
आहे. सलाम!
17 Sep 2010 - 12:50 am | अनामिक
माझाही सलाम!
16 Sep 2010 - 11:59 pm | मितान
जिप्सी,
तुमचा हा अनुभव निश्चितच मोलाचा आहे. असेच अनुभव अजून शेअर करा. कोण जाणे त्यातून कोणाला प्रेरणा मिळेल !
तुमच्या या लेखना मागे सध्या असे काही करायला वेळ मिळत नाही ही टोचणी जाणवली. ती तशीच जागी ठेवा. भविष्यात त्यातून एखादे सत्कार्य नक्की घडेल. :)
17 Sep 2010 - 12:34 am | विश्वनाथ मेहेंदळे
तुमच्या लिखाणात एक साधेपणा आहे. त्यात "आपण काही वेगळे केले" किंवा "चला, तुम्हाला एका वेगळ्या जगाची सैर करवतो" असा अभिनिवेश नाही, जो या प्रकारच्या इतर काही लिखाणात आढळतो. चमकदार वाक्यांची पखरण न करता जे काही सांगितले आहे ते "as a matter of fact" या पद्धतीने सांगितले आहे, हे आवडले.
तुम्ही केलेले कार्य, तुमचा अनुभव आणि तुमचे लेखन हे तीनही आवडले. शेवटच्या वाक्यात तुम्ही जे आश्वासन दिले आहे, त्याची वाट आम्ही बघत राहू.
17 Sep 2010 - 10:58 am | चिंतामणराव
अस्वस्थ करणारा आणि प्रेरणा देणारा लेख !
आहे माणुसकी आणि जिंदादिली जिवंत अजुन.
17 Sep 2010 - 2:08 pm | भडकमकर मास्तर
अगदी अगदी...
चमकदार वाक्ये नाहीत.. दिखाऊपणा नाही..
उत्तम लेख..
लिहीत राहा
18 Sep 2010 - 10:22 am | प्रदीप
माझ्य्या मनातीलच लिहीले आहे मेहेंदळ्यांनी. कसलाही अभिनिवेश नसलेले, अनुभवसिद्ध आणि खर्याखुर्या अनुकंपेचे दर्शन घडवणारे हे लिखाण आवडले.
18 Sep 2010 - 1:16 pm | राजेश घासकडवी
असंच लिहीत राहा.
17 Sep 2010 - 1:07 am | पुष्करिणी
दंडवत,
17 Sep 2010 - 2:20 am | स्वाती२
माझाही दंडवत!
17 Sep 2010 - 1:44 am | चतुरंग
तुम्हाला अहमदनगरचा गिरीश कुलकर्णी माहीत आहे का हो?
हा सुद्धा तुमच्याच सारखाच काम करतोय वेश्यावस्तीतल्या बायका आणि त्यांच्या मुलांसाठी 'स्नेहालय' ही त्याने उभी केलेली संस्था आहे.
मला जालावर काही लिंक्स मिळाल्या त्या पहा
http://il.youtube.com/watch?v=1yuKsEm55_w&feature=related
http://il.youtube.com/watch?v=oi3MfHnOLBA&feature=related
http://il.youtube.com/watch?v=uJztgXloP3M&feature=related
17 Sep 2010 - 3:00 am | घाटावरचे भट
सलाम!!
17 Sep 2010 - 8:15 am | गांधीवादी
काय बोलू शब्दच नाहीत,
माझा एक मित्र देखील बुधवार पेठेतलाच (नेहरू चौक) राहणारा आहे.
तुम्ही सांगितलेले अनुभव सुद्धा त्याकडून ऐकले आहे. खूप भयानक वाटते ऐकताना.
शब्दच फुटत नाही.
तिकडे आम्ही पाकिस्तान, अतिरेकी, काश्मीर अश्या चर्चा करत असतो, पण समाजाला पुर्वानुपार असलेली हि भळभळीत जखम काय कधी बरी होणार नाय असे दिसत आहे. काय दोष असतो त्या लेकरांचा कि त्यांनी एक वेश्येपोटी जन्म घेतला, त्यांना खेळायला न बागा, ना छान छान कपडे, ना चांगले जेवण, ना चांगले प्रेम. अक्षरशः उकीरड्यावरचे आयुष्य येते त्यांच्या वाटेला. देव सुद्धा का इतका निष्ठुर होतो.
एकदा आमच्या सोसायटीत लहान मुलांचे खेळणे (childern's play park) असल्याने काही गरीब मुले खेळायला आलेली होती, सोसायटीतिल काही (दुष्ट) लोकांना बघून गेले नाही, बाहेर हाकलले त्या बिचार्यांना. म्हणे आपल्या मुलांची संगत बिघडेल. लोक सुद्धा कधी कधी वैरी होतात. वाईट वाटले खूप त्यावेळेस.
17 Sep 2010 - 11:07 am | चिंतामणराव
देव नव्हे आपणच !
"लोक सुद्धा कधी कधी वैरी होतात.
17 Sep 2010 - 11:44 am | समंजस
ह्या प्रकारचं कार्य करण्याचं धाडस दाखवल्या बद्दल.
ज्ञानयोगीपेंक्षा मला कर्मयोगींना दंडवत करायला आवडतं. आरामात एका ठिकाणी बसून दिवसरात्र मो़क्ष प्राप्ती करता प्रवचन देण्यापेक्षा (आणी ते सुद्धा दुसर्यांनी लिहीलेल्या ग्रंथावर विसंबून) किंवा ऐकण्यापेक्षा अश्या प्रकारची कार्ये करून मोक्ष मिळवीणे केव्हाही उत्तम आणि अशी कार्ये करणारी व्यक्ती हेच माझं आदरस्थान.
17 Sep 2010 - 12:10 pm | अब् क
खुपच छान!
17 Sep 2010 - 12:30 pm | अनुराग
वाचून मन सुन्न होते
17 Sep 2010 - 12:56 pm | प्रमोद्_पुणे
...
17 Sep 2010 - 1:10 pm | यशोधरा
काय सुरेख लिहिले आहे! अगदी चटका लावणारे!
कुठे ह्या पद्धतीचे काम करत असाल, तर जमेल तसे आणि तितके तुमच्याबरोबर काम करायला आवडेल.
17 Sep 2010 - 2:55 pm | जिप्सी
सगळ्यांचे आभार !
पण दंडवत्/सलाम घेण्याएवढं माझं काम नाही. चांगल्या कामाला हातभार लावावा एवढ्याच उद्देशानं मी काम करतो.
(बहुतेक)तुकाराम महाराज म्हणतात,
फोडीले भांडार ! धन्याचा तो माल !
मी तो हमाल ! भारवाही !
आपल्या आजूबाजूला अनेक लोक वेगवेगळी कामं करत असतात,त्याना आपल्या मदतीची गरज आहे. दुसर्याच्या फाटल्या आभाळाला आपापल्यापरिनं ठिगळं लावायचा प्रयत्न आपण नक्की करू शकतो.
17 Sep 2010 - 3:15 pm | गणपा
सगळ रटाळ चालु आहे अस वाटत असतानाच असा एखादा चांगला लेख वाचनात येतो आणि आमच्या जाल संन्यासाचे १२ वाजतात.
जियो जिप्सीभौ...
17 Sep 2010 - 8:39 pm | रामदास
सहमत.
17 Sep 2010 - 3:25 pm | विसुनाना
लेख आवडला. आणखी लिहीत जावे.
17 Sep 2010 - 4:53 pm | गणेशा
समाजाचे हे विदारक सत्य मनाला चटका लावुन जाते.
जिप्सि तुझा अभिमान वाटतो मित्रा.
परंतू, त्यांच्या पुजेचे च्या वेळेस चे जे पावित्र्य दिसले त्यावरुन त्यांच्या मुला मुलींना विशेषतः मुलींना पण शिकवून त्यांना ह्या वस्ती बाहेर त्यांनीच काढावे हे मनापासुन वाटते.
त्या मनोज च्या आइइचय मावशी मुलींना पण शाळेत पाठवत होत्या का ?
बाकी पांढर्पेशातील माझ्यासारखी सामाण्य माणसे फक्त वाईट वाटुन काहीच करत नाही याची पण लाज वाटते आहे. हे ही खरेच ..
असो
त्यांच्या कथे पेक्षा व्यथा मांडल्यास तर जास्त आव्डेल
प्रतिक्षेत
17 Sep 2010 - 9:10 pm | जिप्सी
मुलीसुद्धा शाळेत जातात पण प्रमाण फार कमी आहे,त्यांना त्याचं नरकात मात्र संस्था शक्यतो राहू देत नाही,पण पुढं काय ? कोण करणार त्यांच्याशी लग्न ? एकातून अनेक प्रश्न निघतच जातात्,आपण मात्र हतबल ! एक एक कथा अनेक व्यथा उलगडून जाते.
समाज म्हणजे तरी कोण? आपल्यासारखे लोकचं ना? हे पाप आपल्या समाजाचे म्हणजे आपलेच आहे.
आपला पांढरपेशा वर्ग हे हलाहल पचवू शकेल?
20 Sep 2010 - 1:38 pm | गणेशा
नाही पचवू शकणार हे हलाहल .. पण आपला समाज या लोकांनाच दोषी धरतो ..
काही असतात अश्याच पण काही चांगल्या ही भरडल्या जातात ..
१ उदाहरण .. अश्या एका नरकातुन एखाद्याच मुलीला बाहेर काढले जाते .. पण कोठे तर पुन्हा नविन लांबच्या नरकात... हे ऐकलेले आहे.
आणि काही भामट्या मात्र मुद्दाम या मध्ये येतात ..
उदा सत्य आहे ..
माझ्या मित्रांना दारुचा शॉक आहे. त्यांच्या आग्रहाने २-३ दा लेडीज सर्वीस बार ला जाण्याचा योग आला होता.
काय असते ? .. कसे असते .. ? या बद्दल उत्सुकता होती ..
पण गेल्यावर काहीच पित नाही म्हंटल्यावर मित्राने माझयसाठी थम्स उप मागितले १०० रुपयाला १.
आणि मग शेजारी १० च्या नोटांच बंडल ... मग काय एकेक अप्सरा येत होती नाचत तेथे . बरेच होते उडवणारे.
कोणॅए बोलावले तर बाजुला बसत होत्या .. माझ्या मित्राने बळेच एकी जणी ला माझ्याशेजारी बसवले ..
तर मीच थरथर कापत होतो पहिल्यांदा .. यांचे वाईट वाटुन घ्यावे की किव करावी तेच कळाना ..
शेवटी तीच दारु क्यो नही पेता बे ? लु क्या इसको असे बोलायला लागल्यावर मी नाव विचारले
मुलगी : पम्मी
किती वर्षापासुन आहे : दोन . पहिले कल्याण के इधर थी बाद मे अभी इदर ,
घर किदर है : मध्यप्रदेश.
क्यों ये धंदा करती हो : पैसे के लिये .. मस्त पैसे कमा के ४-५ साल गाव जाउगी ..
---
बरेच से संवाद येथे दिले नाहित ..
पण असे कळाले की .. शेट्टी ( मालकाचे नाव) चा हा बार आहे. बरेच हप्ते जातात येथुन .. आणि ह्या असल्या मुली स्वताहुन येतात तेथे .. काही वर्श राहतात आणि जातात घरी. मुले वेटर पण होती ( म्हण्जे ते दलाल होते या मुलींचे ) त्यांनी हि माहीती दिली .. त्यांच्या कडे १०० ची नोट दिली कि सगळे सांगाय्चे .. कीती पैसा मिळतो कोणाचा कीती .. अआणि कोण कसे आहे ते . येथे बार मालक १०० ची बाटली ३०० ला विकतो .. आणि कमवतो खुप .. आणि मुली ३-४ वर्ष स्वताहुन येवून स्वताला विकुन लाखो रुपये न्हेतात नंतर
विशेष म्हनजे मराठी पण मुली होत्या..
तेंव्हा पासुन अश्या लोकांचा मी विचार करण्याचे बंद केले होते. तुमचा लेख वाचुन पुन्हा वाईट वाटले ..
कधी काळी तुम्ही म्हणता तश्या लोकांवर कविता केलय होत्या .. पण फक्त कविता ..
मधल्या गोष्टींमुळे आपण आपले भले या स्व - स्वार्थ विचारात होतो .. आणि सामाजिक सुधारणा वगैरे जमेल तेव्हडे वेगळी कडे करण्याचा प्रयत्न करत होतो
परोपकार म्हनजे कसा हे तुमच्याकडुन या लेखा द्वारे कळाला ..
बाकी प्रस्न अन्नुतरीत राहतात हे खरे आहे .
20 Sep 2010 - 7:30 pm | जिप्सी
काही भामट्या मात्र मुद्दाम या मध्ये येतात ---- मला स्वतःला अशा कमीत कमी ८-१० जणी माहीत आहेत्,ज्यांना सोडवले गेले पण घरच्यांनी परत त्यांना स्विकारले नाही,मग काय कराव त्यांनी? काही जणी एखाद्याच्या प्रेमाखातर घर सोडून पळून येतात्,आणि तो तिला इथं आणून विकतो,मग जरी त्यांना सोडवलं तरी त्यानी जायचं कुठ?तुम्ही,मी देउ शकतो अशांना आसरा? मग त्या परत येतात.
मस्त पैसे कमा के ४-५ साल गाव जाउगी :- हे फक्त स्वप्नरंजन असतं त्यांच. कारण अनेक जणी इथं पैसे कमवून घरी पाठवत असतात. भावाचं/बहीणीचं लग्न होतं यांच्या पैशावर पण याना घरी बोलवतही नाहीत.मग यांचही मन मुर्दाड होतं आणि मग कशाचचं काही वाटेनासं होतं.
20 Sep 2010 - 2:08 pm | गणेशा
नाही पचवू शकणार हे हलाहल .. पण आपला समाज या लोकांनाच दोषी धरतो ..
काही असतात अश्याच पण काही चांगल्या ही भरडल्या जातात ..
१ उदाहरण .. अश्या एका नरकातुन एखाद्याच मुलीला बाहेर काढले जाते .. पण कोठे तर पुन्हा नविन लांबच्या नरकात... हे ऐकलेले आहे.
आणि काही भामट्या मात्र मुद्दाम या मध्ये येतात ..
उदा सत्य आहे ..
माझ्या मित्रांना दारुचा शॉक आहे. त्यांच्या आग्रहाने २-३ दा लेडीज सर्वीस बार ला जाण्याचा योग आला होता.
काय असते ? .. कसे असते .. ? या बद्दल उत्सुकता होती ..
पण गेल्यावर काहीच पित नाही म्हंटल्यावर मित्राने माझयसाठी थम्स उप मागितले १०० रुपयाला १.
आणि मग शेजारी १० च्या नोटांच बंडल ... मग काय एकेक अप्सरा येत होती नाचत तेथे . बरेच होते उडवणारे.
कोणॅए बोलावले तर बाजुला बसत होत्या .. माझ्या मित्राने बळेच एकी जणी ला माझ्याशेजारी बसवले ..
तर मीच थरथर कापत होतो पहिल्यांदा .. यांचे वाईट वाटुन घ्यावे की किव करावी तेच कळाना ..
शेवटी तीच दारु क्यो नही पेता बे ? लु क्या इसको असे बोलायला लागल्यावर मी नाव विचारले
मुलगी : पम्मी
किती वर्षापासुन आहे : दोन . पहिले कल्याण के इधर थी बाद मे अभी इदर ,
घर किदर है : मध्यप्रदेश.
क्यों ये धंदा करती हो : पैसे के लिये .. मस्त पैसे कमा के ४-५ साल गाव जाउगी ..
---
बरेच से संवाद येथे दिले नाहित ..
पण असे कळाले की .. शेट्टी ( मालकाचे नाव) चा हा बार आहे. बरेच हप्ते जातात येथुन .. आणि ह्या असल्या मुली स्वताहुन येतात तेथे .. काही वर्श राहतात आणि जातात घरी. मुले वेटर पण होती ( म्हण्जे ते दलाल होते या मुलींचे ) त्यांनी हि माहीती दिली .. त्यांच्या कडे १०० ची नोट दिली कि सगळे सांगाय्चे .. कीती पैसा मिळतो कोणाचा कीती .. अआणि कोण कसे आहे ते . येथे बार मालक १०० ची बाटली ३०० ला विकतो .. आणि कमवतो खुप .. आणि मुली ३-४ वर्ष स्वताहुन येवून स्वताला विकुन लाखो रुपये न्हेतात नंतर
विशेष म्हनजे मराठी पण मुली होत्या..
तेंव्हा पासुन अश्या लोकांचा मी विचार करण्याचे बंद केले होते. तुमचा लेख वाचुन पुन्हा वाईट वाटले ..
कधी काळी तुम्ही म्हणता तश्या लोकांवर कविता केलय होत्या .. पण फक्त कविता ..
मधल्या गोष्टींमुळे आपण आपले भले या स्व - स्वार्थ विचारात होतो .. आणि सामाजिक सुधारणा वगैरे जमेल तेव्हडे वेगळी कडे करण्याचा प्रयत्न करत होतो
परोपकार म्हनजे कसा हे तुमच्याकडुन या लेखा द्वारे कळाला ..
बाकी प्रस्न अन्नुतरीत राहतात हे खरे आहे .
20 Sep 2010 - 2:57 pm | सहज
अश्या स्व:ताहून आलेल्या "भामट्यांचे" प्रमाण वाढल्यास चांगल्या फसवुन आणण्याचे प्रमाण कमी व्हावे अशी अपेक्षा!
स्वेच्छेने ह्या धंद्यात आलेल्या व्यक्तिंनी ह्या व्यवसायात नैतीकता आणावी असे वाटते.
हा लेख जरुर वाचावा
18 Sep 2010 - 10:14 am | मदनबाण
लेख आवडला...
आपल्या पुढील लेखाची वाट पाहतो आहे.
20 Sep 2010 - 8:00 pm | सूड
नि:शब्द
20 Sep 2010 - 9:06 pm | शाहरुख
जिप्सी, तुमचे कौतूक वाटले !
20 Sep 2010 - 10:00 pm | संजय अभ्यंकर
जिप्सींना दंडवत!
21 Sep 2010 - 2:07 pm | अवलिया
जबरदस्त !! सलाम !!!